गुरुवार, 26 दिसंबर 2013

चारीमुंड्या चीत !


चारीमुंड्या चीत !  ( पर्व दुसरे -भाग ११६ वा )


असे म्हणतात जो पर्यंत एखादा व्यसनी त्याच्या व्यसनासमोर ... स्वतच्या सर्व क्षमतांची ..शक्तींची ..हार झालीय हे मान्य करत नाही तो पर्यंत त्याचे व्यसन बंद होणे कठीण असते ..मी हारलो ..हे कबुल करून ती हार त्याला सतत मनात जपून ठेवावी लागते ..तेव्हा आपोआप व्यसनाचे मनातील आकर्षण कमी होण्यास मदत होते ..मला व्यसनाधीनते मुळे जेल मध्ये लागले होते ...तेथेही मी काही ना काही क्लृप्ती करून बाहेर पडण्याच्या बेतात होतो ..माझा प्लान जवळ जवळ यशस्वी झालाच होता ....अगदी शेवटच्या क्षणी ...माझ्या कुटुंबीयांनी कठोर भूमिका घेवून तो प्लान हाणून पडला होता ...अगदी मी मेलो तरी बेहत्तर असा त्यांनी घेतलेला पवित्रा ..माझ्यासाठी धक्कादायक होता ....मला प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारा होता ...आमच्याकडे उपचारांसाठी दाखल असलेल्या व्यसनी व्यक्तींच्या पालकांना मी नेहमी सांगत असतो कि जो पर्यंत तुम्ही त्याच्या व्यसनाधीनतेमुळे त्याचे आणि इतर कुटुंबियांचेही झालेले नुकसान परखडपणे त्याच्या समोर मांडत नाही ..तो पर्यंत तो प्रामाणिक पणे आत्मपरीक्षण करणे कठीण असते ....जो पर्यंत एखाद्या व्यसनी व्यक्तीला पालक घाबरतात ....तो पर्यंत तो त्रास देत राहतो ..एकदा का घरच्या मंडळीनी घाबरणे बंद केले ..की मगच व्यसनी व्यक्ती स्वतच्या वागण्यात बदल करण्याची शक्यता वाढते .. इतके नुकसान होऊनही ..माझे फारसे काही बिनसले नाही ..मी परत सगळे लवकरच ठीक करीन असा खोटा आत्मविश्वास प्रत्येक व्यसनीला वाटत असतो ..मी त्याला अपवाद नव्हतो ...म्हणूनच तर इतके नुकसान होऊनही पुन्हा पुन्हा मन व्यसनाकडे आकर्षित होत होते ....जेल मधून बाहेर पडायचे सगळे प्रयत्न फसल्यावर ..एकदम आत्महत्येचे विचार मनात येणे हा अजून एक मूर्खपणा होता ..त्याऐवजी माझ्यावर ही वेळ का आली ? याबाबत जर आत्मपरीक्षण केले असते तर अधिक योग्य झाले असते ...माझ्यावर पहारा करण्यासाठी हॉस्पिटल मध्ये असलेल्या शिपायांची देखील मी नाराजी ओढवून घेतली होतो ...ते आता अजिबात माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते ..म्हणूनच त्यांनी अतिशय निर्दयपणे मला 'इन्फेक्शन वार्ड ' मध्ये आणून टाकले होते ...

' इन्फेक्शन ' वार्ड मध्ये क्षयरोग ..धनुर्वात ..रँबीज ..अश्या प्रकारच्या आजाराचे रुग्ण ठेवलेले होते .. तेथील सगळ्या सिस्टर्स नेहमी तोंडाला रुमाल बांधून असत ...या वार्ड मध्ये खास जेल मधून उपचारांसाठी आलेल्या धोकादायक कैद्यासाठी एक गज असलेलली खोली होती ...एका वेळी दोन कैदी तेथे ठेवण्याची सोय केलेली ..बाहेरून ते गजांचे दार बंद राहत असे नेहमी ..आत अगदी छोट्याश्या जागेत संडास कम बाथरूम अशी जागा ..कोंदट असलेल्या त्या खोलीतील माझ्या बाजूच्या बेडवर असलेला कैदी .. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला ..म्हातारा ...अपघातात त्याने एक पाय गमावलेला..नंतर घरगुती भांडणातून दोन खून केले म्हणून जन्मठेपेची शिक्षा झालेली ..जेल मध्ये शिक्षा भोगत असताना क्षयरोगाची लागण झाली म्हणून त्याला येथे उपचारांसाठी आणले होते ..माझ्या आधीपासून तो या खोलीत होता ..अतिशय उग्र चेहरा ..तितकाच खरखरीत आवाज ...काळाभिन्न ..भरगोस झुबकेदार मिश्या ..असे त्याचे रूप ...मला शिपायांनी ज्या अवस्थेत स्ट्रेचर वरून आणले त्यावरून मी देखील कोणातरी खतरनाक कैदी आहे असा त्याचा समज झालेला .. .. खून ..हाफ मर्डर ..यापैकी कोणतातरी गुन्हा मी केला असावा असे त्याला वाटत होते ...सकाळ झाली होती ..रात्रपाळीच्या सिस्टर घरी जायला निघालेल्या ..तसेच वार्डात नातलगांची वर्दळ सुरु झालेली होती ..मी हतबलपणे एक पाय बेडीने पलंगाला अडकवलेल्या अवस्थेत आत्मपरीक्षण करत होतो ..स्वतच्या गुन्ह्यांचा आलेख तपासत होतो ....शेवटी एकाच उत्तर येत होते ..ते म्हणजे निसर्गाने सर्व काही चांगले देवूनही मी केवळ माझ्याच कर्तुत्वाने सगळे शून्य केले होते ...माझी कर्तव्ये ..जवाबदा-या समर्थपणे पार पाडण्यास मी नालायक ठरलो होतो ..एक चांगला मुलगा ..चांगला भावू ..चांगला पती ..चांगला पिता ... समाजातील एक सुजाण नागरिक बनू शकलो नव्हतो ...

बाहेर फटाक्यांचे आवाज ऐकू येत होते ..ऐन दिवाळीत मी अश्या अवस्थेत होतो ..बाहेर लोक दिवाळीच्या आनंदात असतील ..नवी खरेदी ..नवी स्वप्ने ..नवा उत्साह ..मी मात्र या वर्षी कुटुंबियांची देखील दिवाळी खराब केलेली होती ...लग्नानंतर मी सासरी दिवाळ सणाला गेलो होतो ते आठवले ..किती आनंदी दिसत होती मानसी ....हातात फुलबाजी घेवून ती फिरवताना ..तिच्या चेहऱ्यावर असलेली चमक मी डोळ्यात साठवून घेतली होती ..नवा शालू नेसून चाललेली तिची लगबग ..सासू ..सासरा ..मेहुणा यांचे अगत्य ...आता मानसी कुठे असेल या विचाराने काळजात खड्डा पडला ..बिचारी लहानग्या सुमितला घेवून एका कोपऱ्यात बसून असेल ..नवे कपडे ...गोडधोड ..सगळे तिला नकोसे झाले असेल ....मी व्यसनी होतो हे सांगूनही ....मझ्याशी लग्न करण्याचा तिने घेतलेला धाडसी निर्णय तिच्या अंगलट आला ...माझ्या सारखे बेभरवश्याचे ..कंगाल ..सौभाग्य ! आईची तब्येत आता कशी असेल ....मी समजायला लागलेल्या वयापासून म्हणजे सुमारे वयाच्या १३ व्या वर्षापासून आईला केवळ मनस्तापच दिला होता ....भांडणे ..मारामा-या ..खोड्या ..व्यसने .हेच केले होते ..प्रत्येक वेळी तिने वात्सल्याने ..मला पाठीशी घातले होते ...माझ्या चुकांवर पांघरून घालून मला वाचवण्याचा तिचा प्रयत्न असे ....मी मात्र सर्वांच्या प्रेमाचा केवळ गैरफायदा घेतला होता ..शेवटी माझ्यामुळे आईवर आत्महत्या करण्याची वेळ येवून ठेपली ....आता घरची दिवाळी कशी असेल या कल्पनेने पुन्हा मला रडण्याचा उमाळा आला ..कांबळे तोंडावर घेवून तो उमाळा दाबण्याचा प्रयत्न करत होतो ..तरी देखील हुंदके सुरूच राहिले ..सगळे शरीर हुंदक्यांनी हालत होते ..

( बाकी पुढील भागात )

=======================================================

पुन्हा जेल ! ( पर्व दुसरे -भाग ११७ वा )

माझे सगळी योजना फिस्कटल्यावर आता पांगळेपणाचे नाटक सुरु ठेवण्यात काही अर्थ नव्हता ....आपोआप बरा झालोय असे दाखवणेही जरा विचित्र वाटले असते सर्वाना..नेमके त्यावेळी सिव्हील हॉस्पिटल मधील एक्सरे मशीन बंद् पडले होते ...सुमारे चार दिवस लागतील ते दुरुस्त व्हायला असे समजले ..तो पर्यंत मला हॉस्पिटल मध्ये ठेवावे असा निर्णय झाला होता ....टर्की जरा कमी झालेली ....काहीतरी उपचार म्हणून मला सिस्टर पेन किलरच्या गोळ्या देत होत्या सकाळ संध्याकाळ .. टर्की मुळे माझे जेवण जवळ जवळ बंदच होते ..म्हणून दिवसातून दोन वेळा सिस्टर मला सलाईन लावत असत ...इन्फेक्शन वार्ड मध्ये मला शिपाई फक्त लघवी ..संडास ..जेवण यासाठी पायाची बेडी काढून काही काळ मोकळा सोडत असे ..मात्र खोलीचे गजांचे दार तो कुलुपबंद ठेवण्यास विसरत नसे ...बुडावर सरकून माझी पँट खराब झाली होती त्यामुळे ..मला त्यांनी वार्डात पेशंटला देण्यात येणाऱ्या सरकारी कपड्यातील एक पांढरा पोटऱ्या पर्यंत असणारा झगा घालायला दिला होता ...दाढी वाढलेली ..अंगावर तो पांढरा झगा ..या अवस्थेत मी कसा दिसत होतो देव जाणे ..एकदा मला सलाईन लावायला आलेली सिस्टर गमतीने म्हणाली ..तू हा पांढरा झगा आणि दाढी वाढलेल्या अवस्थेत एखाद्या चर्च मधील फादर सारखा दिसतो आहेस ... या वेषात माझ्या चेहऱ्यावर तिला विरक्तीचे भाव दिसले असावेत असे वाटले उगाच ..अर्थात ही विरक्ती पराभूत पणाच्या भावनेने आलेली होती ..सर्व काही असताना आलेली विरक्ती अध्यात्मिक असते तर ..सर्व काही गमावल्यावर आलेली विरक्ती हा नाईलाज असतो ...

पांगळेपणाचे नाटक सोडायचे म्हणून आधी मी हळू हळू उभे राहण्यास सुरवात केली ..नंतर आधाराने चालू लागलो ..तीन दिवसांनी मी व्यवस्थित चालू लागलो ..माझ्या खोलीतील माझा साथीदार ..फारसा माझ्याशी बोलत नसे ..बहुतेक वेळ तो झोपून राही .. त्याचा कोणीतरी नातलग त्याला एक बिडी बंडल आणून देत असे ..क्षयरोगामुळे त्याची तब्येत खूप खालावली होती ..जागा असला की सारखा खोकत राही ..मूड असला की मला आपणहून विडी देई ..एकदा रात्री ..खोकता खोकता त्याच्या तोंडातून विचित्र आवाज येवू लागले ..दम कोंडल्यासारखे ..थंडीचे दिवस ..त्यात क्षयरोगी ..खोकता खोकता तो एकदम निपचित झाला ..बाहरेच्या ट्युबलाईटच्या अंधुक उजेडात त्याचे डोळे अर्धवट उघडे आहेत असे मला दिसले ..मी त्याला दोन वेळा हाक मारली ..त्याचा खरखरीत आवाजातील प्रतिसाद ऐकू आला नाही ..मग मी बाहेर ड्युटीवर असलेल्या शिपायाला हाक मारली ..शिपायाने ..सिस्टरला बोलावून गजांचे दार उघडले ..खोलीच्या आतला मंद दिवा लावला ..मग समजले की तो बेशुध्द झालाय ..अगदी मंद श्वास सुरु होता ....हा खपणार लवकरच असे सिस्टर बडबडली ..त्याला ताबडतोब आपत्कालीन विभागात नेण्यात आले . तो गेल्यावर मी एकटाच होतो त्या खोलीत ...त्याला नेल्यावर त्याच्या गादीखाली हात खालून चाचपडले तर त्याचा अर्धवट संपलेला बिडी बंडल मिळाला ...मी पटकन तो काढून माझ्या गादीखाली लपवला ....मेल्या मढ्याच्या टाळूवरचे लोणी यालाच म्हणत असावेत बहुतेक ...

सहाव्या दिवशी निरोप मिळाला की एक्सरे मशीन सुरु झालेय ...मला हातात बेडी अडकवून शिपायांनी खुर्चीवर बसवून एक्सरे काढायला नेले ..मुळात काही झालेच नव्हते ..फक्त माझ्या पांगळेपणाच्या नाटकाला पूर्णविराम मिळण्याची शेवटची प्रक्रिया होती ..दुसर्या दिवशी रिपोर्ट नॉर्मल आहे ..काहीही इजा झालेली नाहीय पाठीच्या मणक्याला हे कळले ..मग पुन्हा माझी रवानगी जेल मध्ये झाली ..या वेळी मला दुसर्या सर्कल मध्ये ठेवण्यात आले ..जेमतेम आठ दिवस काढावे लागणार होते जेलमध्ये ..मला मिळालेल्या न्यायालयीन कस्टडी पैकी उरलेले ...टर्की संपली होती तरी अशक्तपणा मात्र जाणवत होता ..माझ्या आजारपणाच्या काळात जेलच्या हॉस्पिटल मध्ये माझे सरकारी सामान पडले होते ते पुन्हा घ्याला गेलो ...तर त्यातील काथ्या भरलेली उशी गायब झालेली होती ....कोणीतरी हंडी साठी जाळली असेल असे उत्तर मिळाले म्हणजे आता उशी शिवाय दिवस काढावे लागणार होते ..नव्या बराकमध्ये गेल्यावर तेथील वार्डनने मला कोणती केस असे विचारल्यावर मी ४९८ सांगितले ..त्याने क्षणाचाही विलंब न लावता ..मला बराकच्या संडासजवळ झोपण्यास जागा दिली ...अगदी कोपरा होता ..तेथे सारखा संडासचा दर्प येत असे ..मी त्याला जेव्हा विनंती केली की मध्यभागी जागा दे ..तेव्हा म्हणाला ' कौनसा बडा तीर मार के यहां आया है तू ? ..साले अपने बिबी को सताना मर्दानगी नही होती ' ..नंतर कळले की घरगुती हिंसाचाराच्या गुन्ह्यांना जेलमध्ये तुच्छ समजले जात होते ..अश्या कैद्यांना इतर कैदी चांगली वागणूक देत नसत ..त्यांच्या बाहेर चोऱ्या..दरोडे ...खून वगैरे ठीक होते ..मात्र स्वत:च्या कुटुंबियांना त्रास देवून घरी आतंक माजवणे म्हणजे लुक्खेपणा होता ...अश्या कैद्याची लायकी संडासजवळ झोपायची असते असे त्यांचे मत होते ...मला स्वतःबद्दल खूप वाईट वाटले ....

( बाकी पुढील भागात )

===============================================================


भिकारी ???? ( पर्व दुसरे -भाग ११८ वा )

मला दिलेल्या संडासजवळच्या जागेत रात्री सतरंजी टाकून पडून राहिलो ..उशी नसल्याने पायातील जुनाट स्लीपर्स डोक्याखाली घेवून झोपण्याचा प्रयत्न सुरु होता माझा ...खूप थंडी वाजत असल्याने सतरंजी खालची फरशी गारढोण झालेली ....तो गारवा थेट हाडात पोचत होता ..त्यात इतर कैद्यांची सारखी संडासला जाण्यासाठीची वर्दळ ..दर दहा पंधरा मिनिटांनी कोणी न कोणी माझ्या पायाजवळून संडासकडे जात होते ..चालताना चारपाच जणांचे पाय लागले माझ्या पायाला ..कदाचित एखादा मुद्दामही पाय लावून जात होता ...मग पाय पोटाशी घेवून पडून राहिलो ..माझ्या मनगटावरची जखम भरत आलेली होती ..तरीही थंडीमुळे जखम तडतडत होती ....रात्रभर जागाच होतो ...गिनती झाल्यावर मग चहाचे वेध लागले ..बंदी खुलल्या बरोबर चहाच्या लाईनीत जावून बसलो ..अर्धा तास थंडीत कुडकुडत चहाची वाट पाहिल्यावर कोमट चहा मिळाला ..आता मनाची तयारी केली होती .. अजून एक आठवडा काढावा लागणार आहे आपल्याला इथे ....चहा घेवून झाल्यावर अंगावर उन पडण्याची वाट पाहत बसलो बराकीच्या व्हरांड्यात ..सिव्हील हॉस्पिटलहून माझ्या खोलीतील मित्राचा मी काढून घेतलेला अर्धा बिडी बंडल बराच साथ देत होता ..अर्धी बिडी पिवून झाली की विझवून ठेवत होतो ..ती पुन्हा दुसऱ्या वेळी कामाला येई ..अंगावर उन आले तसे छान वाटले ..एक उबदार भावना सर्व शरीरात पसरली ...कोवळी उन्हे छान शेक देत होती ..मस्त डोळे मिटून उन खात बसून राहिलो ..तितक्यात कानावर भजनाचा आवाज ऐकू आला ..चक्क लता मंगेशकरांचा आवाज..' मोगरा फुलला ..मोगरा फुलला ...फुले वेचिता बहरू कळीयासी आला .." बहुतेक जेलच्या कार्यालयात भोंगे लावून अभंग लावले होते ...मग ...' पैल तो गे काऊ कोकताहे ..शकून गे माये सांगताहे ' सुमारे तासभर संत ज्ञानेश्वर ..संत तुकाराम ..संत एकनाथ वगैरेंचे अभंग लागले होते ...छान वेळ गेला ते ऐकण्यात ..एकाग्रतेने ते अभंग ऐकत मनातल्या मनात त्यांच्या शब्दांचा अर्थ शोधत बसलो ...लहानपणी रेडीओ वर ऐकायला मिळत असत हे अभंग ..नंतर वयात आल्यावर फिल्मी गाणी ..भावगीते ..विरहगीते यातच रस घेतला होता ....तुकारामांचा एक अभंग लागला ..' हाची नेम आता ..न फिरे माघारी ..बैसले शेजारी गोविंदाचे ' ..लता मंगेशकरांनी हे अभंग आपल्या सुरेल आवाजाने अमर केले आहेत .. न फिरे माघारी ऐकताना भरून आले मला ...संत तुकाराम ..विठ्ठलाच्या भक्तीत इतके लीन झालेत की जणू त्यांनी आता परत संसारात परतायचे नाही असा निश्चय स्वता:शी केलाय ...असा अर्थ होता गाण्याचा ..मी देखील तसाच निश्चय करायला हवा होता ..पुन्हा व्यसनांकडे न वळण्याचा ...

माझ्या सारखेच अनेक कैदी उन खात आजूबाजूला बसलेले होते .. काही सरकारी वेशात ..तर काही माझ्या सारख्या घरच्या कपड्यात ..बहुतेकांनी अंगावरचे शर्ट काढलेले होते .. ते त्या शर्टावर बारीक नजरेने झाडी करत होते ..मग काहीतरी सूक्ष्म सापडल्या सारखे ते बोटात पकडून नखांवर घेवून चिरडत होते ..बराच वेळ हा काय प्रकार असावा याचा विचार केला पण समजेना ..शेवटी शर्ट काढलेल्या एकाच्या अगदी जवळ जावून बसलो ..बारकाईने तो नेमके काय करतोय ते पाहू लागलो ..तरीही समजले नाही ..शेवटी तो कैदी माझ्याकडे पाहत म्हणाला ..साली जूवें ..ना जाने कहासे आ जाती है ..रातभर सोने नही देती .. सगळा प्रकार ध्यानात आला ..तो शर्टवरवरून पांढर-या रंगाच्या ऊवा शोधून काढून त्या नखावर घेवून मारत होता ....बहुतेक सगळ्यांचाच हा ऊवा मारायचा सामुदायिक कार्यक्रम सुरु होता ..जेलच्या बराकीत तीन चार दिवसांच्या वर कोणी मुक्काम केला की ..या पांढऱ्या रंगाच्या उवा आपोआप त्याच्या कपड्यात गोळा होता असत ..वर्षानुवर्षे पाणी न लागलेल्या जेलच्या कांबळात बहुधा या ऊवा तयार होत असाव्यात ...ते कांबळे पांघरले की त्या आपोआप अंगावरच्या कपड्यात शिरत असत .. जेथे जेथे कापडाची शिवण असेल तेथे त्या लपून बसत ...रात्री अंगभर चावत असत ..त्यामुळे खाज सुटत असे अंगाला ..मेंटल हॉस्पिटल मध्ये ढेकुण होते ..तर येथे पांढऱ्या ऊवा ...माझ्याशी बोलता बोलता त्या कैद्याने एक जू पकडली ...त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता ..पटकन त्याने ती नखावर घेतली आणि चिरडली ..मग समाधानाने पुन्हा त्याचा शोध सुरु झाला .. जू चिरडतांना मी त्याच्याकडे निरखून पाहत आहे हे लक्षात आल्यावर मला म्हणाला ' तीन चार दिनो के बाद तेरेको भी ये करना पडेगा ..' मला कसेसेच झाले ते ऐकून ..मी असा अंगावरचा टीशर्ट काढून उन्हात ऊवा मारत बसलोय ही कल्पनाही करवेना ..मात्र तसेच झाले ..नंतर दोन दिवसांनी मला देखील टीशर्ट काढून बसावे लागले उवा मारत ..आधी शर्ट मग पँट ..आणि दर दोन दिवसांनी ही सफाई करावी लागे .. उवा आपल्या कपड्यात येवू नयेत म्हणून वार्डन ..जेलमधले रंगदार कैदी ..बराकीत सगळे कैदी झोपतात ..त्यापासून सुमारे दहा फुट अंतर ठेवून स्वतची झोपायची जागा निवडतात ..इतर कैद्यांपासून दूर असा हा कंपू असतो ..त्यांचे कांबळे वेगळे असते ..तसेच ते शक्यतो इतर कैद्यांच्या कांबळांच्या संपर्कात येत नाहीत ....उलट कोणी कैदी त्यांच्या जवळ फिरकला तर त्याला मार देतात ..मला बहुतेक पहिल्या दिवशी याच कारणावरून मारहाण झाली असावी ...

सकाळी साडेसहाला पहिला चहा ..साडेदहा वाजता जेवण ..त्यात तीन जाड चपात्या आणि एखादी उकडलेली पाणीदार भाजी .. तूर ..मुग ..हरबरा..या डाळींचे वरण..असे जेवण मिळे..सांयकाळी जेवणात एक मुद भात.. दोन चपात्या ..पाणीदार भाजी ..वरण ...असे जेवण असे ...सुरवातीच्या दोन दिवसानंतर मला कडाडून भूक लागू लागली ...त्यामुळे मला ते जेवण पुरेनासे झाले ....मेंटल हॉस्पिटल मध्ये असताना जेवणाबद्दल असलेली माझी सगळी नाटके संपली होती ..चव कशीही असो ..रंग कसाही असो ..आवड निवड न ठेवता खायचे हे शिकलोच होतो ..त्यामुळे मला चवीची काहीही समस्या येत नव्हती ..फक्त जेवण पुरत नसे इथे...सगळ्यांना जेवण वाटून झाल्यवर वार्डन उरलेल्या किरकोळ चपात्या कैद्यांना वाटत असे त्यात नंबर लागावा म्हणून आशाळभूत पणे वार्डनच्या हालचालींकडे लक्ष ठेवावे लागे ..जेवण वाटून झाले की तो उरलेल्या चपात्या हातात घेवून ओरडे '..चलो ..रोटी ..' वार्डन असे ओरडला की माझ्या सारखे अनेक जण वार्डनकडे हात पसरत असत ..दयनीय चेहरा करून त्याचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असत ..त्यात धक्काबुक्की होई ..मग वार्डन मनाला येईल त्या कैद्याला एक एक चपाती देत असे ..कधी कधी हवेत आपल्या दिशेने फेकलेली चपाती मध्ये दुसराच कोणीतरी हात घालून बळकावत असे ....आपण भिकारी आहोत असे वाटे ..थोडे अपमानास्पद वाटे ..मग विचार केला ..जगात सगळेच तर भिकारी आहेत ..फक्त भिकेचे प्रकार वेगवेगळे ..कोणी नोकरीची भिक मागतोय..कोणी पैश्यांची ..कोणी मतांची ..कोणी सत्तेची ..कोणी प्रेमाची ..आणी विरक्ती आली की मुक्तीची ! 

( बाकी पुढील भागात )

===============================================================

भेटी लागी जीवा ...... ! ( पर्व दुसरे -भाग ११९ वा )

दोन तीन दिवसात मी जेलचा सराईत रहिवासी असल्यासारखा वागू लागलो ....रोज सकाळी सुमारे दोन तास मोठ्या आवाजात अभंग लागत असत ..ते ऐकून त्या अभंगांच्या शब्दांचा नेमका अर्थ मनातल्या मनात शोधणे ..हा एक चांगला विरंगुळा होता ....तो अभंग लिहिण्यामागे असलेली संतांची भूमिका समजून घेण्यास मदत मिळे ..सर्व संतांचे अभंग ऐकल्यावर एक गोष्ट मात्र लक्षात येत होती ..की या सर्वांची प्रत्यक्ष न पाहिलेल्या परमेश्वरावर अतूट अशी श्रद्धा होती ...त्या शक्तीला भेटण्यासाठी ...तिला अनुभवण्यासाठी ....त्यांनी सारी शक्ती पणाला लावून भक्ती केली होती ..हा भवसागर तारून नेण्यास त्याची सोबत असली की सगळी दुखः ..वेदना ..सहनीय होतात ..तसेच तोच यातून मुक्ती देऊ शकतो असा बहुतेक अभंगांचा अर्थ होता ...काही अभंगात तर त्याच्या भेटी साठी संत मंडळी इतकी व्याकूळ झालेली आढळली की त्यांनी शब्दबद्ध केलेल्या अभंगात लता मंगेशकरांनी आर्तता ओतून तो अभंग व्याकुळतेच्या सर्वोच्च बिंदूवर नेवून ठेवला आहे ..भेटी लागी जीवा ..लागलीसे आस ..पाहे रात्रींदिवस वाट तुझी ...तसेच ..अगा करुणा करा ...करीतसे धावा ...या मज सोडवा लवकरी करुणाकरा .....अगदी मग्न होऊन मी गाणी ऐकत असे ...पुरोगामी विचारसरणी नुसार परमेश्वर वगैरे सगळे झुठ आहे अशी माझी मनोधारणा होती .. तरीही हे अभंग ऐकताना मात्र मी पुन्हा पुन्हा स्वतःशीच वाद घालत बसे ...वाटे की आपण परमेश्वरावर श्रद्धा ठेवली नाही म्हणून तर कदाचित आपल्या जीवनात इतकी वादळे आली नसतील ? पण मग श्रद्धा ठेवावी तरी कशी ? पुन्हा लहानपणी पडणारे प्रश्न मनात घोंगावत असत ..परमेश्वर आहे तर मग विविध भेदभाव का ? दारिद्र्य ..अन्याय ..अपघात ..आजार ...हे सगळे निर्माण करून त्याने काय साधले ? सर्वाना हवे तसे सुख का मिळत नाही ..सुख म्हणजे नक्की काय ? मुक्तीची नेमकी कल्पना काय असावी ? जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती ..संसारातून मुक्ती ..विकारातून मुक्ती ..की दुखा:तून मुक्ती ? उत्तराच्या जवळपास पोचता येत नव्हते ...माझी बुद्धी तोकडी पडत होती ....पुढे कधीतरी नक्की हा शोध सुरु ठेवायचा असे मनात पक्के बसले होते ...भोळी भाबडी माणसे फारसा विचार न करता पुराणांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतात....त्याचा लबाड प्रवृत्तीची माणसे गैरफायदा घेतात ..अनेक बुद्धिमान माणसे विश्वास ठेवताना सावध राहतात ....परमेश्वर आहेही आणि नाहीही या गोंधळात अडकतात ...ठाम मताची आणि फक्त स्वताच्या बुद्धीवर विश्वास असलेली माणसे या कल्पनेला विरोध करतात ..शास्त्रीय दृष्टीकोन बाळगणारी माणसे ..षडरिपूने ग्रस्त माणसांनी ...इतर दुबळ्या ..अशक्त ..असहाय जीवांना लुटू नये ..म्हणून पाप पुण्याची ..परमेश्वराची कल्पना मांडली गेली आहे असे सांगतात ..एकंदरीत काय तर सगळ्यांचे मूळ एका जीवाने आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्या जीवांना त्रास देवू नये हे नक्की !

माझ्या सर्व त्रासांचे मूळ हेच होते बहुतेक ..मी अतिशय स्वार्थी मनोवृत्तीचा होतो ..लहानपणापासून मला हवे तसे कसे घडेल याच विवंचनेत असायचो ...खाण्याचे पदार्थ ..खेळणी ..इतर माणसांकडून हवे असणारे प्रेम ..मान सन्मान ..यश ..या सगळ्या गोष्टी मला माझ्या मनाप्रमाणे आणि माझ्या मार्गाने मिळाल्या पाहिजेत असा माझा अट्टाहास असे ..त्याच नादात मी मला जे आवडेल ते करत गेलो ..कोणतेही नियम पाळले नाहीत ..कोणतीही बंधने घालून घेतली नाहीत ..वर ' आपुन अपने मर्जी के मलिक है ' हा अहंकार बाळगून राहिलो .. आईवडील ..भावंडे ...प्रेयसी ...पत्नी ..नातलग कोणाच्याच भावनांची पर्वा केली नाही ..हु केअर्स ..या अविर्भावात जगलो ..बंडखोरी म्हणून मुद्दाम वेगळ्या गोष्टी केल्या ..समाजात अमान्य असलेल्या गोष्टी करण्यात रस घेतला ...आणि जेव्हा जेव्हा मनाविरुद्ध घडले ...मी असहाय झालो ...तेव्हा नशेचा सहारा घेतला ..स्वतचे अपयश ..निराशा ..वैफल्य ..मनाचा कमकुवतपणा ..सगळे पचवणे जड होत गेले तस तसा व्यसनात अधिक अधिक अडकत गेलो ..जगात सर्वांच्याच मनाविरुद्ध काही ना काही घडत असते ..प्रत्येकाला दुखः भोगावे लागते ...कोणालाही हवे तसे सुख हव्या त्या पद्धतीने कधीच मिळत नाही म्हणून तर समर्थांनी म्हंटले आहे ' जगी सर्व सुखी असा कोण आहे ' मी मात्र फक्त माझ्या आणि माझ्याच सुखाचा विचार करताना इतरांची दुखः नजरेआड केली ....एकीकडे मनात सतत कुरतडत असणारी.. स्वतच्या वर्तना बद्दलची खंत ..आणि दुसरीकडे सतत सुख मिळविण्याची धडपड या कात्रीत सापडून ...पुन्हा पुन्हा व्यसने करत गेलो ...स्वतच्या चुकांचे समर्थन करत इतरांच्या चुका शोधल्या ...कधी प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण केले नाही .

जेल मधले वास्तव्य मला आत्मपरीक्षण करण्यास प्रेरित करत होते ...कारण इथे माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नव्हते ..त्रागा करून ..बंडखोरी करूनही.. काही फायदा होणार नव्हता ...चांगलाच कचाट्यात सापडलो होतो ..कदाचित त्यामुळेच हतबल होऊन स्वतःचे प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करत होतो ..सायंकाळी बंदी झाली की वेळ घालवण्यासाठी कैदी गाणी वगैरे म्हणत असत ..मी त्यांच्यात सामील झालो ...इतके व्यसने करूनही माझा आवाज अजूनही चांगला राहिला होता ..बराकमध्ये लवकरच मी गायक म्हणून प्रसिद्ध झालो ..मग कैदी मला गाण्यांच्या फर्माईशी करत असत ..येथे कव्वाल्या जास्त आवडत कैद्यांना ..तसेच विरहगीताना देखील पसंती होती ....' चिट्ठी आयी है ..आई है चिट्ठी आयी है ..या गाण्याची रोज फर्माईश होई ..त्या बदल्यात ज्या कैद्यांकडे भरपूर बिड्या असत ते मला बिड्या देत ....येथे धार्मिक गाणी देखील आवडत सर्वाना ..त्यात ' अजमेर जाना जरूर ख्वाजा ..अजमेर कितनी दूर ' ' सुख के सब साथी ..दुख मे ना कोय ...' शिर्डी वाले साईबाबा आया है तेरे दरपे सवाली..' वगैरे गाणी असत ...जेवणाची थाळी घेवून त्यावर ठेका धरून किवा हाताने टाळ्या वाजवत ठेका धरला जाई ..सायंकाळी तीनचार तास असे मजेत जात असत ..,आता थंडीलाही सरावलो होतो ..पाय पोटाशी घेवून का होईना झोप लागत होती ...तीन चार दिवसांनी वार्डनने संडासजवळची जागाही मला बदलून दिली ....गाण्याच्या कलेमुळे मला जेलमध्ये चांगल्या प्रकारे स्थिरावण्यास मदत झाली . 

( बाकी पुढील भागात )

=================================================================

रोटी ..हंडी ..!  ( पर्व दुसरे -भाग १२० वा )

मला दिलेल्या मँजिस्ट्रेट कस्टडीचा कालावधी संपत आला .... फक्त दोन दिवस बाकी होते माझ्या सुटकेला ...आता शरीर पूर्ण नॉर्मल झाले होते ..त्यामुळे भुकेचे प्रमाण वाढतच चालले होते ..व्यसनी व्यक्ती व्यसनाच्या काळात ... भरपूर ..पोटभर असे जेवत नाहीत ..कारण आधीच नशेने पोट भरलेले असते ..एकदा शरीरातून व्यसनाचे विष बाहेर पडले की शारीरिक त्रास कमी होऊन ....पचनक्रिया सुरळीत होते ..जास्त प्रमाणात भूक लागू लागते ..इतकेच नाही तर पूर्वी खाल्लेले खाण्याचे एक से एक रुचकर ..स्वादिष्ट पदार्थ आठवू लागतात ...वेगवेगळे पदार्थ खावेसे वाटतात ..माझेही तसेच होत होते ..जेवणाच्या वेळी लोणचे ..चटणी .. कोशिंबीर यांची आठवण होई ..तर इतर वेळी ..जेवणात छान मसालेदार भाज्या असाव्यात ..गरम गरम मउसुत अशी घडीची चपाती ..टोमँटो घातलेले वरण ..वगैरे गोष्टी आठवत ..मध्येच आईच्या हातच्या निरनिराळ्या पदार्थांची आठवण होऊन मन व्यथित होई ....घरी आई आग्रह करून करून वाढे ते आठवे ..इथे तर पोटभर जेवण मिळायची मारामार होती . काही कैदी भिशीत ( जेलचे स्वैपाक घर ) मदत करायला जात असत ..ते तेथून येताना सोबत लपवून चपात्या तसेच मीठ ..तिखट ..घेवून येत ..असे कैदी बराकीतील मित्रांना लपवून आणलेल्या चपात्या देत ..एक असाही प्रकार पाहायला मिळाला की जे रंगदार ..म्हणजे दादागिरी करणारे कैदी आहेत ते ..वार्डनशी ..जेलच्या सरकारी वर्दीतील शिपायाशी संधान बांधून असत ..अश्या कैद्यांना शिपाई जास्त चपात्या देई ..इतक्या जास्त की खाता खाववणार नाहीत ..प्रत्येक बराकीत असे तीनचार रंगदार कैदी असत ..ते वार्डन जवळ इतर कैद्यांपासून अंतर ठेवून झोपत असत ..इथे जरी पैसे जवळ बाळगायला परवानगी नसली तरी ..अनेक कैद्यांजवळ लपवलेले पैसे होते ..त्या पैश्यांच्या जोरावर सरकारी यंत्रणा वाकवता येत होती ..

' हंडी ' नावाचा एक प्रकार समजला .. रंगदार कैदी वार्डनशी अथवा शिपाई ज्यांना जेलमध्ये ' बाबा ' असे म्हणत ..यांच्याशी संधान बांधून असत .. ..असे कैदी ..जेलमध्ये मिळणारे जेवण जास्त रुचकर व चविष्ट नसते म्हणून त्या भाजीवर व वरणावर वेगळी प्रक्रिया करून ..ते पुन्हा नव्याने फोडणी देवून खात असत ...अशी फोडणी देण्यासाठी चुलीची गरज लागे ..बराकीत विटेचे छोटे तुकडे लपवलेले असत ..ही मंडळी सायंकाळी पाच वाजता मिळणारे जेवण घेवून ठेवत ..रात्री सात आठच्या सुमारास लपवून ठेवलेले विटेचे तुकडे काढून त्याची मांडणी करून चूल पेटवली जाई ..जेलच्या अल्युमिनियमची थाळी वाकवून.. त्याचे खोलगट आकाराचे भांडे फोडणी देण्यासाठी तयार केलेले असे ..जळण म्हणून बंदी नसताना बाहेरून गोळ्या केलेल्या वाळक्या काड्या ..कधी कधी नव्या कैद्यांचे चोरलेले कांबळे ..चादर ..उशीमधला काथ्या.. अशा वस्तू वापरल्या जात ..म्हणूनच मला पहिल्या दिवशी कांबळ.. सतरंजी..उशी देताना शिपायाने बजावले होते ..या वस्तू जपून ठेव पुन्हा मिळणार नाहीत ..म्हणजे माझी चोरी गेलेली उशी अश्या हंडीत जळाली होती तर ...चूल पेटली की ...घेवून ठेवलेली भाजी ..वरण यांना थोडे तेल ...तिखट ..मसाले घालून वेगळी फोडणी दिली जाई..मग ते लोक जेवण करत असत ..बाकीचे कैदी अशी हंडी पेटली की ..मंगल कार्यालयाच्या बाहेर जसे भिकारी ..त्यांची दयनीय पोरे समारंभाला आलेल्या लोकांकडे ..जेवणावळीकडे असूयेने ..आशाळभूतपणे पाहतात तसे पाहत असत .. ' हंडी ' हा प्रकार म्हणजे जेलमधील जेवणाची ..चहाची .... एक प्रकारची चैन होती ...वार्डनकडे चहाची भुकटी आणि साखर असे ..हंडी पेटवून त्यावर अधून मधून चहा देखील बनवला जाई ..मोजक्या चार पाच लोकांसाठी ..या हंडीत शक्यतो ठरलेले ..रंगदार ..पैसेवाले सदस्य असत ..त्यांचे मदतनीस म्हणून एक दोन किरकोळ लोचट कैदी असत ...मदतनीस कैदी जळण गोळा करून ठेवणे ...नवीन कैद्यांची कांबळे ..उश्या ..वैगरे चोरून हंडीसाठी जमवणे तसेच रंगदार कैद्यांची खरकटी भांडी धुणे ..त्यांचे कपडे धुणे ..रात्री त्यांची मालिश करणे वगैरे कामे करत असत ..त्या बदल्यात त्यांना बिड्या ..हंडीत बनवलेला पदार्थ ..चहा थोडासा मिळे ..हे मदतनीस कैदी देखील आपल्या धन्याच्या जोरावर नवीन कैद्यांवर दादागिरी करत असत ..

एकदा सकाळी मी उन खाण्यासाठी म्हणून बराकीच्या मागील बाजूस जावून बसलो होतो ..आसपास आठदहा कैदी बसले होते इकडे तिकडे ..मला समोर सतरंजीवर सुमारे तीस चाळीस चपात्या मांडून ठेवलेल्या दिसल्या ..उन्हाळ्यात जसे पापड वगैरे करून वाळवायला ठेवतात ..तशा त्या चपात्या पसरून ठेवलेल्या होत्या ..हा काय प्रकार असेल बरे ? इथे बाकी कैद्यांना पोटभर चपात्या मिळण्याची मारामार इतक्या चपात्या अशा वाळवत ठेवलेल्या ? ..मी बराच वेळ विचार करत बसलो होतो ..त्या चपात्यांच्या जवळपास कोणी नव्हते ...आसपास बसलेले कैदी देखील त्या चपात्यांकडे फिरकत नव्हते ..शेवटी यातील एकदोन चपात्या आपण उचलून घ्याव्यात या हेतूने जवळ गेलो ..तर त्या चपात्या जरा बुरसटलेल्या वाटल्या ..तरीही मनाचा हिय्या करून खाली वाकून दोन चपात्या उचलल्या ..मी चपात्या घेवून वळणार तोच ..एका बराकीच्या खिडकीतून ..' रुक.. रुक ..साले ..अजून दोन शिव्या ऐकू आल्या ..दोनच मिनिटात एक किरकोळ वाटणारा कैदी माझ्या अंगावर धावून आला ..शिव्या ऐकून माझी सटकली होतीच ...तो अंगावर येत आहे पाहून मी देखील त्याच्यावर हल्ला केला ..दोघेही खाली जमिनीवर पडलो ...किरकोळ मारामारी जुंपली ..इतर कैद्यांनी आम्हाला सोडवले ..मग कळले की त्या चपात्या भिशीतून मुद्दाम जास्त प्रमाणात आणल्या गेल्या होत्या..आमच्या समोरच्या बराकीत असलेल्या वार्डन व रंगदार कैद्यांच्या मालकीच्या होत्या त्या चपात्या ..त्या चपात्या वाळवून ..एकदम कडक झाल्या की हंडीत जळणासाठी वापरल्या जाणार होत्या ..जळणासाठी चपात्या ? माझे डोके सुन्न झाले ...देशात जशी मुठभर लोकांकडे अमाप संपत्ती आहे ..ती संपत्ती बँकेत ..दागिन्यांच्या रुपात ...पडून आहे ..जी केवळ मौजमस्ती ..चैन ..करण्यासाठी वापरली जाते ..तसेच होते हे ..त्याच वेळी बहुसंख्य लोक दोन वेळच्या जेवणासाठी महाग...

( बाकी पुढील भागात )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें