बुधवार, 11 दिसंबर 2013

वास्तव


इन्फेक्शन वार्ड !  ( पर्व दुसरे -भाग १०१ वा ) 


सेन्ट्रल जेलचे दोन शिपाई आणि शासकीय रुग्णालयाचे दोन वार्ड बॉय यांनी मिळून मला स्ट्रेचर वरून खाली उचलून एका अंधाऱ्या जागेतील पलंगावर नेवून अक्षरश: आदळले ..मग माझ्या दोन पायात अडकवलेली बेडी एका पायातून सोडवून शिपायाने त्या बेडीचे दुसरे टोक ..पलंगाच्या दांडीला अडकवले ....' मला सोडा..मला मरू द्या ..मला जिवंत राहायचे नाहीय ..असे मी ओरडत होतो ..किंचाळत होतो ..एकाने माझ्या सणसणीत मुस्काटात लगावली ..' भोसडीच्या आमची नोकरी घालवत होतास ' ..असे म्हणत मला लाखोली वाहायला सुरवात केली...बेडी नीट पायात अडकलीय ना ..हे तपासून ते त्या खोलीच्या बाहेर पडले बाहेरून गजांच्या दाराला कुलूप लावले .. माझ्या नजरे समोरून दूर झाले ..मी तसाच किंचाळत होतो ..मला मरायचे आहे असे ओरडत होतो ..किती वेळ असा ओरडत होतो कोण जाणे ..घशाला कोरड पडली होती ..तरीही घसा खरवडून मी बोंबलत होतो ..तितक्यात एक सिस्टर आतील वार्डातून बाहेर आली ...क्षणभर ओरडणे थांबले ..तिच्या हातात इंजेक्शनची सिरींज दिसली ..पुन्हा ओरडलो ..मला मारून टाका ...मला जिवंत ठेवू नका ...सिस्टरला पाहून त्या शिपायांनी पुन्हा ते गजांचे दार उघडले ...मला पलंगावर दाबून धरले ..सिस्टरने माझ्या दंडावर कापसाचा बोळा फिरवून ..दंडात सुई खुपसली ...आत सिरींजमधील द्राव जात असल्याची क्षीण जाणीव होत होती ..मी उसळून उठण्याचा प्रयत्न केला ..पण त्या शिपायांनी घट्ट दाबून धरले होते मला ..इंजेक्शन देवून सिस्टर निघून गेली ...बराच वेळ मला त्या शिपायांनी तसेच दाबून धरले होते ..शेवटी माझा प्रतिकार कमी होत गेला ..फक्त ओरडणे सुरूच राहिले ..निर्विकारपणे ते शिपाई माझ्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करत ..पुन्हा गजांच्या दाराला बाहेरून कुलूप लावून दिसेनासे झाले ...मी ओक्साबोक्शी रडू लागलो ...खोलीत माझ्या डोक्यावर एक झिरोचा मंद बल्ब जळत होता ..बाहेरच्या ट्युबलाईटचा प्रकाश माझ्या तोंडावर आला ..कोणीतरी व्हरांड्यातील ट्यूब लावली होती ...हळू हळू माझी शुद्ध हरपली .

सगळे अंग दुखत होते ..अगदी कुशीवर वळणे देखील कठीण झाले होते ..खोल अंधाऱ्या गुहेतून आल्या सारखा माझ्या डाव्या बाजूने एक घोगरा आवाज आला ..मी हलकेच मान वळवली ...डोळे उघडण्याचा प्रयत्न केला ..डोळ्यांच्या पापण्या जड झालेल्या होत्या ..कसेतरी पापण्या उघडून आवाजाच्या रोखाने पहिले ..एकदम बिचकलो ..एक जाड पांढऱ्याझुबकेदार मिश्या असलेला काळा कुळकुळीत माणूस माझ्या बाजूच्या बेडवर होता ..कोणती केस आहे तुझी ..असे मला विचारात होता ..मी उत्तर देणे टाळले ..नजर थोडी खाली गेली ..त्याच्या पलंगाखाली एक जयपुरी फुट होता ..म्हणजे हा माणूस लंगडा होता तर ..पुन्हा वर पहिले त्याचा म्हातारा देह अस्थिरपंजर झालेला ..मात्र आवाज अगदी करारी भीतीदायक ..त्याला खोकल्याची उबळ आली ..जोरजोरात खोकू लागला ..पलंगावर उठून बसून तो तोंडावर हात ठेवून जीवघेणे खोकत होता ...उबळ थांबल्यावर त्याने गादीखालून बिडी बंडल काढले ..तसे माझे डोळे चमकले ...थोडासा मागे सरकून मी पलंगाच्या दांडीला टेकून बसण्याचा प्रयत्न केला .. एका पायात अडकवलेली बेडी काचली ..तसाच पाय लांब ठेवून अर्धवट उठून त्याच्याकडे बिडी मागू लागलो ..तो नुसताच माझ्याकडे रोखून पाहत बिडी ओढत राहिला ...मी लाचारीने त्याच्या तोंडाकडे पाहत होतो ..अगदी शेवटी ..त्याने जवळ जवळ ९० टक्के ओढून संपवलेले बिडीचे जळते थोटूक माझ्या हाती दिले ..ते थोटूक बोटात नीट पकडता देखील येत नव्हते ..बोटाला चटके बसत होते ..तसाच एक बिडीचा झुरका मारला ..ओठांना देखील चटका बसला ..अजून एक झुरका मारून ते थोटूक खाली फेकले ..आढ्याकडे पाहत पडून राहिलो .

किती तरी वेळ असाच खिन्न पडून होतो ..बाहेर पाखरांची किलबिल सुरु झाली ..तसा भानावर आलो ..कोंबड्याची एक सणसणीत बांग कानावर आली ..बहुतेक पहाटेचे पाच वाजत आले असावेत ..थंडगार वाऱ्याची एक झुळूक अंगावर शहारे उमटवून गेली ..मला प्रथमच थंडी वाजत असल्याची जाणीव झाली .. एका पायाने पायाशी असलेले लाल रंगाचे ब्लकेट अंगावर ओढून घेण्याचा प्रयत्न केला ..कशी तरी घडी उलगडली गेली मग हाताने ओढून ते अंगावर घेतले ..तसा त्याचा कुबट वास आला ..कदाचित अनेक महिने किवा वर्षे त्या ब्लँकेटला पाण्याचा स्पर्श झालेला नसावा ...बाहेरून आता फटाक्यांचे आवाज येत होते ..मला आठवले ..आज बहुतेक नरकचतुर्दशी होती ....पुन्हा रडण्याचा उमाळा आला ..मी घुसमटल्यासारखा रडू लागलो ...हुंदक्यांनी सर्व शरीर हलत होते माझे ..ते पाहून तो बाजूचा माणूस म्हणाला ..' आता रडून काय फायदा ...३०२ केला की ३०७ .." मी रडता रडता केविलवाण्या नजरेने त्याचाकडे पाहत होतो ..बहुतेक तो मला खुनी ..गुंड समजत असावा . नकारार्थी मान हलवली ..त्याच्या कडे पाठ करून पडून राहिलो ..आता बाहेर फटफटत होते ...आतल्या वार्डातून सँन्डलचा आवाज करत मघाची सिस्टर हातात स्टीलची पेटी घेवून आली ..गजांच्या दाराबाहेर उभे राहून ..कोणाला तरी हाक मारली ..तसे बाहेरून रात्री मला येथे आणणारे जेलचे शिपाई बाहेरून आत आले ..आता त्यांच्या अंगावर खाकी ओव्हरकोट होता ..दाराचे कुलूप काढून ते आता आले ..मागोमाग सिस्टर ..बघू कुठे कापलेय ..म्हणत माझ्या डाव्या मनगटावरची जखम पहिली चांगली दोन इंच जखम होती ..अरेरे ..बरेच कापलेय म्हणत तिने त्या स्टीलच्या छोट्या पेटीतून आयोडीनची बाटली काढून जखम स्वच्छ केली ..मग त्यावर मलम लावून चिकटपट्टी लावली ..पुन्हा दार बंद करून ते शिपाई नजरेआड झाले .

( बाकी पुढील भागात )
===================================================================

मँजिस्ट्रेट कस्टडी ! ( पर्व दुसरे _ भाग १०२ वा )

माझ्या व्यसनाधीनतेने अखेर मला जेलच्या दारात आणून सोडलेच ..मला पंधरा दिवस मँजिस्ट्रेट कस्टडी मिळाली होती ..माझा सगळा अहंकार नष्ट झाला ..बुद्धी चालेनाशी झाली ..सारी समर्थने शेवटी फोल ठरली ....खूप पूर्वी अल्कोहोलिक्स अँनाँनिमसच्या मेम्बर्सची अधःपतनाची शेअरींग्स ऐकताना वाटे ..हे लोक अतिरंजित कहाण्या सांगत आहेत ..आपण कितीही व्यसन केले तरीही आपल्यावर जेल मध्ये जाण्याची ..रस्त्यावर झोपण्याची ..भिक मागण्याची वेळ कधीच येणार नाही ..आपण काही तेव्हढे मूर्ख नाही ..आपण मनात येईल तेव्हा व्यसन थांबवू शकतो ..जास्त नुकसान होऊ लागल्यावर आपण कंट्रोल करू शकतो ..वगैरे ..मात्र आता पूर्वी ऐकलेल्या सगळ्या गोष्टी माझ्याबाबत घडून चुकल्या होत्या ..मी अपवाद ठरू शकलो नाही ...मला नकळत झालेल्या म्हणा किवा मी स्वतःहून ओढवून घेतलेल्या व्यसनाधीनता या आजाराने मी शेवटी कायद्याच्या कचाट्यात सापडलोच होतो ...आता एकही पत्ता माझ्या हाती राहिला नव्हता ..जे जे घडेल त्याला तोंड देणे हा एकच पर्याय शिल्लक राहिला होता ..

मुक्तांगण सोडून नाशिकला राहायला आल्यावर सुरवात तर सगळी छानच ..माझ्या मनासारखी झाली होती ...भावाने मला सांगितल्याप्रमाणे अनिल या त्याच्या मित्राच्या ए. बी . लोढा या कंस्टूक्शन कंपनीत कामाला लावले होते ..अनिल हा भावाचा अगदी पुण्यात इंजिनियरिंग कोलेजला शिकत असल्यापासुंचा जुना मित्र ..माझा मोठा भावू पण स्वतची इरिगेशन खात्यातील सांभाळून या मित्राकडेच नकाशे बगैरे बनवून देण्याचे ..साईटवर देखरेख वगैरे करण्याचे काम करीत असे ..तुषार आपल्या डोळ्या समोर राहील ..त्याच्यावर लक्ष ठेवता येईल या हेतूने त्याने मला तेथे नोकरी लावून दिली होती ..अनिल साहेबाना बहुधा माझ्या बद्दल सगळे माहित होते .. मी बिघडलेला आहे ..ब्राऊन शुगरचा व्यसनी आहे ..तरीही भावाकडे पाहून त्यांनी मला कामाला ठेवले..वर भावाला म्हणाले ' तू सांगशील तितका पगार मी तुषारला देईन ..भाऊ साधा आणि सालस असल्याने त्याने सध्या जास्त देवू नकोस ..तुषार जसा जसा कामात प्रगती करेल तसा पगार वाढव त्याचा ...असे सांगत माझा पगार तीन हजार रुपये महिना ठरवला होता ..मुक्तांगण मध्ये तेवढेच मिळत ..शिवाय इथे मला घरभाडे पडणार नव्हते ..आईच्या नावावर असलेल्या फ्लँट मध्ये आई सोबत मी मानसी ..सुमित राहू लागलो ..मी पुण्याला असताना पूर्वी विश्वदीप आई सोबत पेइंग गेस्ट म्हणून रहात असे ..त्याची आता दुसऱ्या गावी बदली झाली होती ..माझा अकोल्याचा भाचा आनंद इलेक्ट्रिक इंजिनीअर होऊन सध्या खाजगी नोकरी करत होता नाशिकला ..तो देखील आमच्या सोबत रहात असे ..सुमारे महिनाभर सारे सुरळीत चालले ..मी ठरवल्या प्रमाणे नाशिकला आल्यावर ब्राऊन शुगर पिणे बंद केले होते ..नियमित सकाळी डबा घेवून कामावर साडेआठ वाजता जावू लागलो ..सायंकाळी घरी यायला सात वाजत... मित्राचा भाऊ म्हणून अनिल साहेब मला धाकट्या भावासारखेच वागवत असत ...ते स्वभावाने थोडे कडक होते ..काम सोडून उगाच फालतू गप्पा टप्पा करीत नसत बहुधा ..सुरवातीला कामाला लागल्यावर रोज सकाळी ते ऑफिस मध्ये आले की मी हातातील काम सोडून ..उठून उभा राहून त्यांना गुड मॉर्निग करत असे ..तीनचार दिवसांनी त्यांनी मला सांगितले तुषार मी तुला कामाचा पगार देतो ..मला गुड मॉर्निंग नाही केलेस तरी चालेल मात्र काम मनापासून कर ..

पहिल्या महिन्याचा पगार झाल्यावर सगळे पैसे घरी देण्याएवजी त्यातले पाचशे रुपये मी स्वतःकडेच ठेवले ..स्वखर्चासाठी ..तेथेच घात झाला ..खरेतर व्यसनमुक्तीच्या सुरवातीच्या काळात गरजेपेक्षा जास्त पैसे खिश्यात ठेवू नयेत ..जुन्या व्यसनी मित्रांना भेटणे टाळावे ..आपल्या वेळेचा आणि पैश्यांचा हिशोब घरातील जेष्ठ व्यक्तीकडे नियमित द्यावा वगैरे पथ्ये पाळावी असे सांगितले जाते व्यसनमुक्ती केंद्रात ..मी जास्त पैसे खिश्यात ठेवणे ..मित्रांना न भेटणे हि पथ्ये पाळली नाहीत ..आता मी पूर्वीसारखा कधीच वाहवत जाणार नाही हा अति आत्मविश्वास पुन्हा नडला मला ..पंचवटीत अनिल साहेबांच्या घरासमोरच आमचे ऑफिस ..थोडे पुढे मालेगाव स्टँड भागात ..भद्रकाली सारखेच दारूचे व ब्राऊन शुगरचे अड्डे होते ..मला ऑफिस मध्ये पर्चेस करणे ..ऑर्डर्स देणे ..तसेच स्वागतकक्ष सांभाळणे अशी कामे दिली गेली होती ..पगार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी मी पेंट पर्चेस करण्यासाठी मालेगाव स्टँड भागात गेलो ..स्कूटर पेंटच्या दुकानासमोर लावून ...दुकानात गर्दी आहे म्हणून ..जरा बाहेर इकडे तिकडे भटकलो ..माझे दोन तीन जुने मित्र भेटलेच ..झाले लगेच गप्पा सुरु झाल्या ..गप्पा शेवटी ब्राऊन शुगरवर आल्या तेव्हा एक म्हणाला ..सध्या चंद्याकडे मस्त माल आलाय ..एकदोन दम मध्ये मस्त होतो माणूस ..ते ऐकून माझ्या अंतर्मनात सुप्त पणे वसलेले व्यसनाचे आकर्षण पुन्हा जागृत झाले ..फक्त आजच्या दिवस म्हणत मी त्यांच्या सोबत ब्राऊन शुगर प्यायलो ..तेथून माझ्या आयुष्यातील शेवटच्या विनाशाला सुरवात झाली .

( बाकी पुढील भागात )

=================================================================

घरातील कलह ! ( पर्व दुसरे -भाग १०३ वा )

नेहमीसारखेच घडले ..एकदा माझ्या शरीरात तो ब्राऊन शुगरचा धूर गेल्यावर ..शरीर- मन बंड करून उठले ...अजून हवे ही मागणी सुरु झाली ...मनाचे वारू निराशेच्या अंधाराकडे उधळले ..लहानपणा पासून मनाविरुद्ध घडलेल्या घटना ....वंचना ..अनघाला गमावणे ...जीवनाची झालेली धूळधाण ..या सर्व विचारांनी अवस्थ झालेल्या मनाला सारखी नशा हवी वाटू लागली ..प्रत्येक व्यसनीचे असेच होता असावे ...व्यसनमुक्तीच्या काही काळानंतर व्यसन एकदा जरी केले तरी ..अंतर्मनात दडलेला राक्षस जागा होतो ..माझ्या बाबतीत अनेकदा असे घडूनही ..प्रत्येक वेळी आता पूर्वी सारखे होणार नाही ..असे मला वाटत राहणे ..हा आजाराच्या धूर्तपणाचा भाग होता ..मी सारखा आजाराच्या धूर्तपणाला बळी पडत होतो .. ..जवळचे पैसे संपल्यावर ...घरी आईकडे पैशाची मागणी सुरु केली ...माझे व्यसन सुरु झाल्याचे आईला समजलेच ..त्यावरून घरात रोज वाद होऊ लागले ..मानसीला बिचारी अशा गोष्टीना प्रथमच सामोरी जात होती ...तिला वाटे यांना आईने पैसे दिले नाहीत तर आपोआप यांचे व्यसन बंद राहील ..अर्थात तिला हे माहित नव्हते की आईने पैसे देणे बंद केले तर ..मी बाहेर चोऱ्या करू शकतो ..जास्त मोठे गुन्हे करू शकतो .. तुम्ही यांना पैसे देवू नका म्हणून मानसी आईशी वाद घाले ..मग आमच्या तिघांचे भांडण सुरु होई ..त्या दोघीही आपापल्या जागी बरोबरच होत्या ..चूक माझीच असे ..आमची भांडणे पाहून लहानगा सुमित रडू लागे ...त्याला समजत नसे हे काय चालले आहे ..मात्र काहीतरी विपरीत घडते आहे याची जाणीव होत असावी नक्की ..कारण आमच्या भांडणाच्या आवाजाच्या वर आवाज काढून तो रडत असे ...ते जेमतेम दीड वर्षाचे पोर असे कळवळून रडताना पाहून ..मनातून वाईट देखील वाटत असे मला ..पण सकारात्मक कृती करणे काही जमत नसे .

अनिल साहेबांकडच्या नोकरीत माझे अँडव्हांस मागणे सुरु झाले .. त्यांनी मला वापरायला दिलेल्या ऑफिसच्या स्कूटर मध्ये पेट्रोलच्या निमित्ताने ..इतर खोटी करणे सांगून पैश्यात गडबड करणे सुरु झाले ... रोज सकाळी व संध्याकाळी ठराविक डोस घेतल्याशिवाय मला चैन पडत नसे ..एकदा नशा करून झाली की पुन्हा पश्चाताप ..अपराधीपणाची भावना ..घरी मानसीची ..आईची माफी मागणे ...पुन्हा असे वागणार नाही याची शपथ घेणे ... नशा उतरली की टर्की ..निराशा ..वैफल्य आणि पुन्हा कसेही करून नशा असे चक्र सुरु झाले ...मध्ये काही दिवस पैश्याचे खूप वांधे झाले की स्पाज्मो प्राँक्सीव्होन च्या गोळ्या खाणे ..कामावर दांड्या मारणे ..पुन्हा दारू ..गांजा ..ब्राऊन शुगर अश्या चक्रात अडकलो पूर्ण ..मध्ये एकदा नाशिकला फॉलोअप साठी मुक्तांगणचे समुपदेशक आले ..तेव्हा त्यांना भेटून सर्व काही आलबेल आहे असे खोटे सांगून ..पूर्वी मुक्ता मँडमने सांगितल्या प्रमाणे मुक्तांगणच्या नोकरीचा राजीनामा देखील लिहून दिला त्याच्या जवळ ..डॉ .नरेंद्र दाभोलकर यांना देखील पत्र पाठवून ..सामाजिक कृतज्ञता निधीचे मला मिळणारे मानधन बंद केले जावे ..मी आता व्यसनमुक्तीचे कार्य करत नाहीय ..ते मानधन दुसऱ्या योग्य अशा कार्यकर्त्याला दिले जावे असे कळवले ..माझ्या वागण्याला काही धरबंद राहिला नव्हता ....पाहता पाहता नाशिकला येवून मला सहा महिने उलटून गेले ..एकदा मानसीने वैतागून माहेरी निघून जाण्याची धमकी दिली तेव्हा ..तिच्या समाधानासाठी ..मुक्तांगणला फोन केला ..बाबांना कळवले की माझे व्यसन सुरु झालेय परत ..बाबांनी मला पुन्हा उपचार घे असे सुचवले ..त्या नुसार एक महिना मुक्तांगणला जावून राहिलो ..आता मुक्तांगण नव्या जागेत म्हणजे मेंटल हॉस्पिटलच्या जागेतून विश्रांतवाडी जवळ शिफ्ट झाले होते ..स्वतःच्या मालकीच्या जागेत ..

बघता बघता मुक्तांगण मधील ३५ दिवसांचे उपचार पूर्ण केले ..मी अजून काही महिने तेथेच रहावे असे आई ..मानसी व सर्वांचे म्हणणे पडले ..मात्र माझी अक्कल अजून ठिकाणावर आलेली नव्हती .. ..हट्टाने डिस्चार्ज घेवून पुन्हा नाशिकला आलो ..आधी दारू आणि नंतर पुन्हा सगळी व्यसने सुरु झाली ..अनिल साहेबांची नोकरी होतीच ..माझ्या वर्तनाला अनिल साहेब देखील कंटाळले असावेत ..तरीही सुहासचा भावू म्हणून ते मला सहन करत होते ..तसेच नवीन संसार आहे ..याला नोकरीवरून काढले तर बिचाऱ्या पत्नी मुलाचे हाल होतील ..ही भावना देखील होतीच त्याच्या मनात ..अनेक दारूड्यांची नोकरी केवळ त्यांच्या बायका पोरांकडे पाहून टिकते ...एकदा तर व्यसनासाठी पैसे नसताना ..पुण्याला घेतलेली लुना व माझी जुनी सायकल भंगारवाल्याला अक्षरशः किलोच्या भावाने विकली ..एकदा माझ्या रोजच्या पैश्यांच्या मागणीला कंटाळून आई काही दिवस भावाकडी राहायला गेली असताना ..मानसीशी गोड गोड बोलून तिच्या कानातले सोन्याचे डूल मागून घेतले ...एकाचे कर्ज फेडायचे आहे असे सांगून ते डूल विकले ..तिनेही फारशी कुरकुर न करता ..या नंतर मी चांगला वागेन या माझ्या खोट्या आश्वासनावर विसंबून मला ते डूल दिले ..मग नंतर माझ्या लग्नात आहेर म्हणून आलेल्या वस्तूंची मोठी पेटी उघडली ..त्यातील मिल्क कुकर ..फ्राय पँन ..शर्टपीस ..पँटपीस ..नॉन स्टिक वेअरची भांडी ..वगैरे एक एक करून व्यसनासाठी विकली ...!

( बाकी पुढील भागात )

( टीप - ज्या प्रमाणे एखाद्या हॉरर सिनेमाच्या सुरवातीला ..यांचे हृदय कमकुवत आहे अशा व्यक्तींनी हा सिनेमा पाहू नये अशी सूचना देतात ..त्या धर्तीवर ..जे भावनाप्रधान आहेत ..ज्यांना व्यसनी व्यक्तीचा तिटकारा आहे ..अश्या व्यक्तींनी हे वाचून अवस्थ होऊ नये अशी सूचना द्यावीशी वाटते ..तर जे दारू अथवा इतर मादक पदार्थांचे थोडेफार सेवन करतात त्यांनी सावध व्हावे ...मी जे काही लिहितोय तो माझा भूतकाळ आहे ..गेल्या नऊ वर्षांपासून मी व्यसनमुक्त असून ..मानसी ..सुमित ..माझी आई ..भावू ..पुतणे ..बहिण ..भाचे व इतर नातलग ..सगळे माझ्या बाबतीत समाधानी आहेत ...त्यांनी मला मोठ्या मनाने माफ केलेय ..आजच मी व्यसनमुक्तीची नऊ वर्षे पूर्ण केली आहेत ..सध्या मी नागपूर येथे ' मैत्री व्यसनमुक्ती केंद्र . या माझा मित्र रवी पाध्ये याने सुरु केलेल्या व्यसनमुक्ती केंद्रात वरिष्ठ समुपदेशक म्हणून यशस्वीपणे काम करतोय . हे माझ्या जीवनातील अत्यंत खाजगी पान केवळ व्यसनाधीनता हा किती भयानक आजार आहे हे वाचकांना सांगण्यासाठी लिहितोय ..यातील शब्द न शब्द खरा आहे )

=============================================================

शर्मनाक ..लाजिरवाणे ..इत्यादी ! ( पर्व दुसरे - भाग १०४ वा )

दिवसेंदिवस माझी परिस्थिती बिघडत चालली होती ...पैसे मिळविण्याचे नवीन नवीन मार्ग रोज शोधावे लागत ...माझा सगळा पगार..कामावर लबाडी करून मारलेले पैसे ..आईची पेन्शन ..सगळे मला व्यसनाला अपुरे पडत होते ..आई भावाकडून काही तरी कारणे सांगून घरखर्चासाठी पैसे घेवून कसेतरी घर चालवीत होती ..व्यसनी व्यक्तीला कोणाच्याच भावनांशी काहीही घेणे देणे नसते ..फक्त मी ..माझे व्यसन ..माझ्या भावना ..अशी आत्मकेंद्रित अवस्था होत जाते ...मध्येच कामावर दांडी मारून गर्दुल्ल्या पाकीटमार मित्रांसोबत फिरे ..त्यांना माझ्या सारखा जरा बरा दिसणारा ..बोलणारा ..व्यक्ती सोबत हवाच असे ...स्वतः जरी कधी पाकीट मारण्याचे धाडस केले नाही ..तरी त्यांचा साथीदार म्हणून वावरलो ...एका मित्राला आग्रह देखील केला ..मला पिक पाँकेटींग शिकव म्हणून ..,..पण त्याने मला सावध केले ..म्हणाला ..' अभी हम तो इसी में मर जायेंगे ....तू मत कर ये काम ..बहोत बद् दुवा लागती है लोगो की ' ...त्याचेही म्हणणे बरोबर होते ....माझ्या अनेक पाकीटमार मित्रांपैकी बहुतेक जण अतिशय वाईट अवस्थेत फुटपाथ वर मरण पावले नंतर ...एकाने तर नंतर मी धुळ्यात ' संकल्प ' व्यसनमुक्ती केंद्रात असताना ..माझ्या मांडीवरच प्राण सोडला होता ..पैसे मिळविण्यासाठी मी वाट्टेल त्या थराला जाण्यास तयार झालो होतो ...घर खर्चाला पैसे हवेत म्हणून आईने वयाच्या ६२ व्या वर्षी ..तिच्या एका मैत्रिणीच्या भांड्यांच्या दुकानात पार्ट टाईम नोकरी सुरु केली ..मला त्याचीही लाज वाटेनासी झाली होती .

एकदा असाच घरून भांडून पैसे घेवून जावून ..ब्राऊन शुगर पिवून घरी यायला निघालो ..दुपारचे कडक उन पडलेले ...पैसे उरले म्हणून स्पेशल ऑटो करून घरी येत होतो ..तितक्यात घराच्या एक किलोमीटर अलीकडे ..मानसी दिसली ..एका सोसायटीच्या गेट मधून बाहेर पडत होती ..भर उन्हात ही कुठे फिरतेय कळेना ..उन लागू नये म्हणून तिने डोक्यावर साडीचा पदर घेतलेला ...ऑटोवाल्याला तिच्याजवळ ऑटो थांबवायला सांगितला ..ऑटो तिच्या जवळ थांबल्यावर म्हणालो कुठे निघालीस इतक्या उन्हात ...ऑटोत मला पाहून एकदम बिचकली ....' कुठे नाही ..जरा काम होते ' असे पुटपुटली..मी तिला ऑटोत बस चल घरी जावू असे म्हणालो तर ..' मला अजून काम आहे ..तुम्ही जा पुढे ..सुमित झोपला आहे ' असे म्हणाली ..तिच्या हातात एक थैली होती ..त्यात काहीतरी वजनदार असावे असे दिसत होते ..मी आग्रहाने तिला ऑटोत बसवून घेतले ..कुठे गेली होतीस ..काय काम आहे अजून ..असे खोदून खोदून विचारले ..मात्र ती सांगायला आढेवेढे घेत होती ..शेवटी तिच्या हातातील पिशवी काढून घेतली ..त्यात काय आहे हे बघू लागलो .. त्यात ..तिखट ..मसाले ..हळद ..चहाचा मसाला ..वगैरेच्या छोट्या छोट्या १०० ग्रँम ..२०० ग्रँमच्या पुड्या ...त्यावर कुठल्या तरी स्थानिक कंपनीचे लेबल होते ...हे काय ? कुठे चालली होतीस हे घेवून ? असे विचारल्यावर ..रडू लागली ..म्हणाली ' घर खर्चासाठी पैसे कमी पडतात ... आईंची खूप ओढाताण होते ..तेव्हा त्यांच्या मागे लागले होते मी नोकरी करते कुठेतरी म्हणून ..तर म्हणाल्या ..नोकरी नको करूस ..सतत बांधल्या सारखे होते ..सुमित अजून लहान आहे ..तू त्याच्याकडे लक्ष दे ..तुला काही करायचेच असेल तर माझ्या मैत्रिणीची तिखट ..हळद ...मसाले निर्मितीची घरगुती उत्पादने आहेत ..त्या पुड्या विक हवेतर ..घरोघरी जावून फावल्या वेळात ..एका पुडीवर एक ते दोन रुपये कमिशन मिळते मला ..आईंनी तुषारला हे अजिबात कळू देवू नकोस असे बजावले आहे . ..कारण तुम्हाला समजले ..तर तुम्ही हे पैसे देखील भांडून घ्याल माझ्या कडून अशी भीती आहे त्यांना ' ..मी थक्कच झालो ..काय बोलावे ते सुचेना ..हे म्हणजे ...गरीब भांडी घासणाऱ्या मोलकरणीच्या दारुड्या नवऱ्या सारखेच होते ..ती बिचारी फाटक्या संसाराला ठिगळ म्हणून चार घरी धुणी भांडी करून पैसे कमावते ..आणि तो दारुडा नवरा ..तिच्याशी भांडून तिचे पैसे हिसकावून घेतो ..दारुड्या नवर्याला ती मोलकरीण नेमके किती उत्पन्न आहे हे सांगत नाही ....कारण ते पैसे देखील सुरक्षित नसतात ...स्वतःची लाज वाटली मला त्यावेळी ..माझ्या व्यसनापायी ..माझ्या पत्नीवर दारोदार ...मसाले विकत फिरण्याची वेळ आलेली होती ...आता या पुढे मी व्यसन करणार नाही असे तिला सांगून तिचे समाधान केले ..मात्र बदल काही झाला नाही वागण्यात ...आपल्या व्यसनामुळे कुटुंबीय काय काय भोगतात याची प्रत्येक व्यसनीला जाणीव होणे गरजेचे असते ..

नोकरीवर सततच्या दांड्या सुरूच होत्या ...एकदा आमच्या कॉलनीत ..माझ्या परिचयाच्या चार पाच गर्दुल्ल्यांची टोळी फिरताना दिसली ..त्यांच्या हातात एक पावती पुस्तक होते ...काय भानगड आहे ? कशाच्या पावत्या असे विचारले ..तेव्हा हे लोक घरो घरी ..दुकानात जावून ..एखादा देवाच्या नावाने ..उरूस ..संदल..यात्रा ..नवस ..वैगरे आहे असे सांगून लोकांकडे वर्गणी मागत फिरत होते ..त्यांची फाटकी अवस्था पाहून ..कदाचित हे सगळे खोटे आहे असे माहित असूनही ..लोक किवा दुकानदार त्यांना पाच दहा रुपये वर्गणी देत असत ..कसे तरी दिवसभरात दोनेकशे रुपये जमवून ही मंडळी त्यातून नशा भागवत असत ..चांगली आयडिया होती ही ..मात्र मिळालेल्या पैश्यात चार पाच जणांचा हिस्सा असे ...त्यांची ही भानगड समजल्यावर माझे डोके वेगाने काम करू लागले .आपणही असे काहीतरी एकट्याने केले पाहिजे असे वाटू लागले ...शिवाय जास्तीत जास्त पैसे लोकांकडून उकळता येतील अशी आयडिया सुचली पाहिजे असे वाटले ..खूप विचार करत बसलो ..कोणीही साथीदार न घेता ..अशी वर्गणी कशी गोळा करायची ? शेवटी एकदाची एक आयडिया सापडली !

( बाकी पुढील भागात )
=============================================================

अष्टविनायक यात्रा ! ( पर्व दुसरे - भाग १०५ वा )

(टीप - आजचा भाग लिहिताना मला मनाची खूप तयारी करावी लागली आहे ..व्यसनाधीनते मुळे व्यसनी व्यक्तीचे सर्वात मोठे नुकसान होते ते म्हणजे नैतिक अधःपतन ....व्यसन सुरु झाल्यावर सर्वात आधी त्याचा सदसद्विवेक त्याला सोडून जातो ..मग व्यसन मिळविण्यासाठी ...व्यसनाचे समर्थन करण्यासाठी ..व्यसनाच्या आड येणाऱ्या व्यक्तींचा सामना करण्यासाठी ..तो कोणत्याही थराचे अविवेकी वर्तन करतो ..आजच्या भागात मी जे लिहितो आहे ते ..नैतिक अधःपतनाचा नमुना आहे ...आजचा भाग लिहू की नको हा संभ्रम होता ..मात्र एकदा आपण सगळे स्वीकार केलेय म्हंटले की काहीच लपवायला नको या निर्धाराने लिहित आहे ..हे लिहिताना मनावर दडपण आले असले तरी ..एकदाचे लिहून झाल्यावर ..मन हलके होणार आहे हे देखील मी जाणतो )

झटपट आणि फारसे कष्ट न करता व्यसनासाठी भरपूर पैसे मिळविण्याचा नवीन मार्ग मी शोधला ...मनात काही आडाखे बांधले ..लोकांची श्रद्धा ..सहानुभूती ..मिळवता आली तर हे सहज शक्य होणार होते ..त्या नुसार दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजताच मी उठून अंघोळ वगैरे करून तयार होतो ..बाजूला सुमारे दोन वर्षांचा सुमित खेळत होता ....त्याला कडेवर घेतले आणि याला जरा फिरवून आणतो म्हणून घराबाहेर पडलो .. त्याला त्याच्या आईने सकाळीच छान अंघोळ घालून ..स्वच्छ कपडे घालून .... लावून केलेले ..अगदी गोंडस दिसत होता ..बाबा आपणहून कौतुकाने मुलाला फिरवून आणत आहेत म्हंटल्यावर सुमितची आजी ..आई व तो देखील खूप आनंदित झाला ..निघताना बाहेर कोणाची नजर लागू नये म्हणून त्याच्या आईने पटकन त्याच्या गालावर एक काजळाचे बोट लावले ..आईला ..आजीला टाटा करून आम्ही बाहेर पडलो ....मी आमची कॉलनी सोडून जवळच असलेल्या एका कॉलनीत गेलो ...एका इमारतीत शिरलो ...जिना चढून वर जात असताना एक मराठी आडनावाची पाटी दिसली .तसा थांबलो ..धीर एकवटून दाराची बेल वाजवली ..साधारण एका चाळीशीच्या स्त्री ने दर उघडले ..दारात अनोळखी माणूस त्याच्या कडेवर एक गोंडस मुलगा पाहून जरा विचारात पडली ..मी लगेच बोलण्यास सुरवात केली ..नमस्कार ..मी तुषार नातू ..इथे बाजूच्या कॉलनीत राहतो ..हा माझा मुलगा सुमित ..दोन वर्षांचा आहे ..दुर्दैवाने याच्या हृदयाच्या एका झडपेत समस्या आहे ..त्याचे ऑपरेशन होत नाही असे डॉक्टर म्हणतात ....सगळे उपाय झालेत ..शेवटी एकाने सुचवलेय की याला दहा अनोळखी घरात वर्गणी मागून ( भिक मागून ) अष्टविनायक दर्शन घडवेन घडवून आणा ...हा नक्की ठीक होईल ..मी सगळे एका दमात बोलून गेलो ..मी हे बोलत असताना ..ती बाई सुमितच्या गोड चेहऱ्याकडे पाहत होती ..हळू हळू तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले ..' अय्या किती गोड मुलगा ' हे भाव जावून त्याच्या जागी आता '' अरेरे ..बिचारा ' असे भाव आले . एकंदरीत माझे बोलणे प्रभावी होते तर ..तिने पटकन विचारले ..किती वर्गणी द्यायची ? ...असा काही निश्चित आकडा नाही ..पण फक्त दहा घरातून पैसे मागणार आहे ....तुम्हाला जमेल तितके दिलेत तरी काही हरकत नाही ..नाही दिलेत तरी चालेल ..फक्त तुमचे आशीर्वाद असू द्या मुलाला ..असे मी मानभावीपणाने म्हणालो ..झाले ..ती बाई पटकन घरात गेली ..एक शंभर रुपयांची नोट घेऊन आली ..माझ्या हातात ती नोट देवून तिने सुमितच्या गालाला हात लावला ..ठीक आहे येतो असे म्हणून मी तेथून निघालो ..

माझी आयडिया कमालीची यशस्वी ठरली होती ..नंतर अशीच तीन चार घरे फिरलो ..प्रत्येक ठिकाणी थोड्याफार फरकाने असाच अनुभव आला ..रुमारे तासाभरात मी पाचशे रुपये गोळा केले होते ...वा स्वतच्या हुशारी वर खुश होत ..तसाच स्पेशल ऑटो करून सुमितला घेवून अड्ड्यावर गेलो ...तेथे ब्राऊन शुगर घेतली ..आजचा दिवस चैन करता येतील इतके पैसे होते ..सुमित सकट माझा एकटा राहणारा गर्दुल्ला मित्र अविनाश याच्या खोलीवर गेलो ..मग निवांत ब्राऊन शुगर ओढत बसलो ..सुमित साठी फाईव स्टार कँडबरीची दोन दहा रुपयावाली पाकिटे घेतली होती ..आतले चाँकलेट सुमितला तर त्यावर गुंडाळलेला बेगड ब्राऊन शुगर ओढायला माझ्यासाठी पन्नी म्हणून ....सुमारे चार तास मस्त ब्राऊन शुगर ओढत बसलो होतो ..थोड्या वेळाने सुमित कंटाळला ..घरी चला म्हणून रडू लागला ..तर तुला अजून कँडबरी घेवून देईन असे आमिष दाखवून शांत बसवले ..त्या खोलीत अवि आणि मी असे दोन गर्दुल्ले ब्राऊन शुगर ओढत बसलेले ..आणि एक गोंडस दोन वर्षांचा मुलगा बाजूलाच खेळतोय हे दृश्य नक्कीच चांगले नव्हते ..आपल्या ब्राऊन शुगरच्या धुराचा ..सुमितवर काही परिणाम होऊ शकतो हे देखील माझ्या गावी नव्हते ..सुमारे दुपारी तीन वाजता घरी परतलो ..सुमित बिचारा कंटाळून माझ्या खांद्यावर डोके ठेवून गाढ झोपला होता ..घरी गेलो तर ..मानसी आणि आई काळजीत होत्या ..इतका वेळ कुठे गेलेत बाप लेक म्हणून ....आई म्हणाली ..असे इतका वेळ नेवू नकोस त्याला बाहेर ..आमचा जीव टांगणीला लागतो ....त्या दिवशी रात्री मनात अनेक प्रकारचे विचार थैमान घालत होते...आपण खूप मोठी चूक करतोय हे समजत होते ..तसा मी देवाला न मानणाराच ..कारण देव आहे तर मग सगळे माझ्या मनासारखे का घडत नाही ..प्रत्येक वेळी मी प्रार्थना केल्यावर देवाने माझ्या मनासारखे घडवले पाहिजे हा अट्टाहास या नास्तिकते मागे होता ..देव किवा ईश्वर हे एक तत्व आहे ..त्याचे काही नियम आहेत ...त्या नियमांना बहुधा अपवाद नसतो ..जन्म -मृत्यू ..सुख -दुखः ..उन -पाउस ..ऋतुचक्र ...जरा -व्याधी -मृत्यू ..अपघात ...नैसर्गिक आपत्ती ..हे सगळे त्या तत्वाचे नियम आहेत ..वगैरे गोष्टी मला जरा उशीरच समजल्या ..हे देखील जाणवले की जगात कोणाच्याच मनासारखे नेहमी घडत नाही ...तरीही कोणती तरी अदृश्य शक्ती शक्ती अगदी नियमबद्ध पद्धतीने अस्तित्वात आहे ..तिला लोकांनी भले वेगवेगळी नावे दिली असतील ...आपल्या मनासारखे न घडूनही त्या शक्तीवर विश्वास अतूट असणे..त्या शक्तीचे नियम स्वीकारणे म्हणजेच श्रद्धा !

असे तीनचार दिवस सुमितला घेवून फिरणे सुरु होते ..रोज किमान पाचशे रुपये तरी मिळत असतच ...नंतर सुमितला घरी सोडून मी अवीच्या रूमवर जावून बसे ..हल्ली तुषारला पोराचे एकदम इतके प्रेम कसे वाटू लागलेय हे कोडे पडले होते आईला ..त्यातल्या त्यात आता घरी पैसे मागून भांडत नाहीय हे समाधान होतेच ..सहाव्या दिवशी भानगड झालीच ... सुमितला घेवून मी एका सोसायटीत शिरलो असताना ..दार उघडणाऱ्या वयस्कर स्त्री ने मी तुषार नातू असे नाव सांगितल्यावर ..मला विचारले ..नातू आजींचा तू धाकटा मुलगा का ? बापरे ..म्हणजे ही माझ्या आईला ओळखत होती तर ...पुढे तीच म्हणाली ..अधून मधून भेटत असतात तुझ्या आई ..मंदिरात ..बाजारात वगैरे ..तू पुण्याला असतोस असे त्या म्हणाल्या होत्या ..त्यांना बरीच माहिती होती तर..त्यातल्या त्यात आई त्यांना अधून मधून भेटते ..रोज नाही.. हे त्यांच्या बोलण्यातून समजल्यावर जरा निर्धास्त झालो ..त्यांना सगळे सांगितल्यावर हळहळल्या ..म्हणाल्या ..माझ्याकडे पाचशे रुपयाची नोट आहे ..तुझ्याकडे सुटे पैसे आहेत का ? शंभर रुपये काढून मला चारशे परत दे ..ते माझे दुसरेच घर असल्याने माझ्याकडे सुटे पैसे नव्हतेच ...मग तीच म्हणाली ..एक काम कर ..तू साधारण तासाभराने ये ..मग तुला देते मी पैसे ..ठीक आहे म्हणून मी निथून निघालो ..पुढची दोन चार घरे करून ..हे प्रकरण मी विसरूनही गेलो ..पुन्हा त्यांच्याकडे न जाता ..तसाच सुमितसकट अड्ड्यावर ..आणि तेथून अवीच्या रूमवर गेलो ...

( बाकी पुढील भागात--- कृपया कोणत्याही व्यसनीने माझी आयडिया वापरू नये ही नम्र विनंती )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें