बुधवार, 4 दिसंबर 2013

तोरा मन दर्पण कहेलाये..


सुमितच्या बाललीला !  ( पर्व दुसरे -भाग ९६ वा )


नव्या बाळाच्या आगमनानंतर ..जेव्हा मी आत ऑपरेशन थियेटर मध्ये मानसीला भेटायला गेलो तेव्हा तिचा चेहरा थकलेला .श्रांत ..वाटत होता ..कदाचित थोडाफार अनेस्थेशियाचा देखील परिणाम असावा ..मी जवळ जाताच तिने फक्त माझा हात घट्ट पकडला .. सुमारे दोन मिनिटे तिने हात धरून ठेवला होता ...न बोलताही ती केवळ स्पर्शाने बरेच काही सांगत असावी ..मी तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला धीर दिला ...तासाभरात फोन करून सर्वाना आनंदाची बातमी सांगितली ..नाशिकला आई ..भाऊ ..वाहिनी ...इतर सर्व नातलग एकदम आनंदी झाले ..आता जवाबदारी वाढलीय ...तू आता अजिबात चुका करू नकोस ..असे सांगायलाही ते विसरले नाहीत ..तेथे असतानाच मानसीला मी तीन महिन्यापूर्वी झालेल्या रीलँप्स बद्दलही सांगून टाकले ..माझ्या मनात एखादी गोष्ट फार काळ गुपित म्हणून टिकत नाही ...जवळच्या व्यक्तीला मी सांगतोच सगळे बोलण्याच्या ओघात ..मानसीने रीलँप्स नंतर माझ्या वर्तनात होणारे बदल ..बेजावाबदार पणा ..पैश्यांची नासाडी ..माझी नाटके वगैरे कधीच अनुभवली नसल्याने..शिवाय लवकरच मुक्तांगण मध्ये पकडला जावून पुन्हा मार्गावर आल्याने तिला हे रीलँप्स प्रकरण फारसे गंभीर वाटले नाही ..आता सगळे विसरून जा ..पुन्हा असे वागू नका इतकेच म्हणाली ती ...नव्या बाळाच्या आगमनाची बातमी घेवून ..आनंदाने पेढे घेवूनच मुक्तांगणला परतलो ..माझे सर्व मित्र देखील आनंदी झाले ..सर्वाना पेढे दिले ..नेमके कोणत्या वेळी कोणता विनोद करावा हे काही लोकांना काळत नाही त्यातला माझा एक मित्र आहे .. ..मुक्तांगांमध्ये मी खूप मस्क-या ..गमती ..फिरकी घेणे वगैरे प्रकार करत असे ..त्यामुळे कधी कधी मला चिडून एखादा जण साल्या ..हरामी वगैरे शिव्या घाले ..तर मी पेढे वाटताना एक जण मस्करीत म्हणाला ' चला आता अजून एका हरामीची जगात भर पडली तर ' ..खरे तर हे वाक्य मस्करीने उच्चारले होते त्याने म्हणून मी देखील न चिडता हसून सोडून दिले ..मात्र नंतर ..मी सगळ्या समुपदेशकांना ..इतर मित्रांना पेढे वाटत असताना ..हा हरामी वाला मित्र माझ्या मागे मागे फिरत होता ..तसेच मी ज्या वेळी कोणाला पेढे देई त्यावेळी ..त्याचा ' अजुन एक हरामी जन्माला आला ' हा फालतू जोकसमोरच्याला सांगू लागला ...मग मला त्याचा खूप राग आला ..परंतु सुमितच्या जन्माच्या आनंदाच्या पुढे मी राग गिळला ..पुढे बरीच दिवस माझी त्या मित्रावर खुन्नस होती .


मानसी काही दिवस नांदेडला राहून ..तेथूनच नाशिकला गेली ..नाशिकला बाळाचे बारसे झाले ..त्याचे नाव जरा वेगळे म्हणून ' प्रेषित ' ठेव असे एकाने सुचवले होते ..मात्र आईच्या सूचनेनुसार ' सुमित ' नाव ठेवले गेले .सर्वाना आवड्ले हे नाव ..बारश्याच्या वेळी एक गम्मत झाली ..अर्थात त्यातून मला बरेच शिकायला मिळाले ..बरसे उरकल्यावर मी बाजूच्या खोलीत जावून तेथे सुमितला भेट म्हणून आलेली पाकिटे ..प्रेझेंट्सच्या वस्तू वगैरे पाहत बसलो होतो ..तर तिथे माझी मोठी बहिण येवून बसली ..बराच वेळ माझ्याशी गप्पा मारल्या ..मग जाताना म्हणाली तू पण चल बाहेर ..मी म्हणालो नको बाहेर गर्दी आहे मी इथेच थांबतो ..तर म्हणाली इथे सुमितच्या भेटीचे आलेले पैसे ..वस्तू ..मुख्य:त सुमितला भेट म्हणून मिळालेले सोने वगैरे आहे ..आम्हाला तू इथे बसला तर उगाच काळजी लागून राहील ..मला समजले तिला काय म्हणायचे आहे ते ..मनात खुप हसू आले ..म्हणजे मी त्या पैश्यांवर ..वस्तूंवर ..हात मारीन की काय अशी तिला भीती होती..बहिणीने व्यसन करण्याच्या काळातील माझ्या भानगडी पहिल्या होत्या ..म्हणून अजूनही तिचा माझ्यावर विश्वास नव्हता हे जाणवले ..तिला उगाच काळजीत न ठेवता ..बाहेरच्या खोलीत गेलो . जवळच्या नातलगांचा विश्वास संपादन करणे सोपे नाही हे समजले ...अश्या वेळी राग न मानता आपल्या पूर्वीच्या कर्माचेच हे फळ आहे हे समजणे केव्हाही चांगले .

बारसे झाल्यावर सुमित सह मी पुण्याला परतलो ..आता मुक्तांगणहून केव्हा एकदा घरी परततो असे व्हायचे ..मग मी सुमितला खेळवत बसे ..अतिशय चळवळ्या होता ..जागा असताना एक मिनिट स्वस्थ नसे ...सारखी काहीतरी हालचाल चालूच ..हातापायांची सायकल तर नेहमीचीच ... छतावर एक दोरी बांधून त्यात त्याला झोका देवून झोपवण्यासाठी एक दोरी बांधली होती ..लवकर झोपत नसे ..त्याच्या हालचाली थांबेपर्यंत झोका देण्याचे काम माझे होते ..कधी कधी खूप कंटाळा येई झोळीची दोरी हलवत बसायला ..दिवस भरात तो जेमतेम पाच सहा तास जागा राही ..बहुतेक वेळ झोपे ..कधी कधी तो झोपलेला असताना मला त्याच्याशी खेळायची लहर येई ..मात्र मानसी त्याला उठवण्यास मनाई करे ..मग नुसताच झोपलेल्या सुमितचा चेहरा निरखीत बसे ..झोपेत अचानक तो गालात हसे ..स्वप्न पडल्या सारखे ..या वयात कोणती स्वप्ने पडत असावी त्याला असा विचार मनात येई ..तर कधी एकदम झोपेतून दचकून उठे ..जवळ मी दिसलो की मला बिलगे ..तो अजिबात रडत नसे ..अगदीच भूक अनावर झाले की थोडे हलक्या आवाजात रडे ...किवा लंगोट खराब केला असला की थोडा रडे ..एरवी सतत हसरा ..मस्ती करायला तयार ..एक दोन वेळा मी उत्साहाने त्याचा खराब लंगोट वगैरे बदलण्याचे काम केले ..मात्र दिवसातून अनेकदा हे काम पडे ..तेव्हा कंटाळा येई ..मानसी हे सारे काम अगदी विनातक्रार हसतमुखाने ..कौतुकाने करे ..तिला कितीही गाढ झोप लागली असली तरी सुमितने थोडी चूळबुळ केली की लगेच जाग कशी येते हे कोडेच होते ..मला वाटते आई म्हणून हे वरदान आपोआपच मिळत असावे ..असा तळहाताच्या फोडासारखा मी देखील वाढवला गेलोय याची जाणीव होई ..मग आईवडिलांशी मी मोठा झाल्यावर कसा वागलो याचेही वाईट वाटे .

( बाकी पुढील भागात )

========================================================================

खस्ता ..!  ( पर्व दुसरे -भाग ९७ वा )


पाहता पाहता सुमित पालथा पडायला लागला ... पालथा पडून पुढे सरकण्याचा प्रयत्न करून लागला ..सुरवातीला तो पालथा पडून हाताचा जमिनीवर जोर लावून पुढे सरकण्याच्या प्रयत्नात नेमका मागे सरकू लागला ..तेव्हा आम्ही खूप हसलो ..एक दोन दिवसांनी मात्र तो भराभर पालथा पडून पुढे सरकू लागला ...एका हाताचे कोपर जमिनीवर टेकवून पटापट त्याच्या जोरावर स्वतचे शरीर पुढे सरकवत असे ...मग घरभर असे सरकणे चाले ..मानसी आतल्या खोलीत स्वैपाक करत असली की तो सरकत तेथे जाई ..मग मी पुढच्या खोलीतून हाक मारली की पुन्हा छान वळून तसाच सरकत माझ्याजवळ येई ...रांगायला लागल्यावर तर त्याला घर कमी पडू लागले ..अतिशय चळवळ्या.. झपाझप पुढे येई ..मी बाहेर जायला निघालो की माझे पाय पकडून मला पण सोबत ने म्हणून हट्ट करी ..रोज संध्याकाळी आम्ही त्याला फिरायला घेवून बाहेर जात असू ....तेव्हा मी अगदी अभिमानाने त्याला कडेवर घेवून मिरवे ..दिसला एकदम मर्फी बॉय..त्यामुळे रस्त्यावरून जाणारे येणारे ... त्याच्याकडे कौतुकाने पाहत ..विशेषतः स्त्रिया आणि मुली तर त्याला पाहून खूपच आनंदित होत असत ..' अय्या ..किती छान बाळ ..' असा अविर्भाव त्याच्या चेहऱ्यावर असे ..काहीजणी त्याच्या गालाला हात लावत ..त्याला कडेवर घेत ..अनोळखी व्यक्तीकडे पण सुमित पटकन जाई मला छान वाटे ..एक दोन वेळा मानसीची तब्येत बरी नसताना मी त्याला घेवून मुक्तांगणला गेलो होतो ....तेथे आफ्टर केअरच्या एका पलंगावर त्याला सोडून मी समूह उपचार ..योगाभ्यास वगैरे घ्यायला निघून जात असे ..मी येईपर्यंत तो सर्वांशी खेळे ..अजिबात रडणे नाही ..झोपेत असताना त्याला सु..सु ..झाली की त्याचा फोर्स इतका असे की एकदा रात्री झोपताना त्याला लंगोट घातला नव्हता ..तो आणि मानसी पलंगावर.. तर मी खाली झोपलो असताना ..रात्री अचानक माझ्या तोंडावर गरम पाणी पडले ..धडपडत उठून पाहतो तर ..हे महाशय झोपेत उताणे झाले होते ..आणि त्यांनी सोडलेली धार थेट मानसीच्या वरून ..खाली झोपलेल्या माझ्या तोंडावर ..मला चिडताही येईना ..मानसीची तर हसून हसून मुरकुंडी उडाली .

एकदा अचानक त्याला खूप ताप भरला ..अंगाला चटके बसत हात लावला तर ..एकदम मलूल पडलेला ..मग जुलाब सुरु झाले ..रडू लागला ..दुध घेईना ..जवळच्या डॉक्टरकडे नेले ..त्यांनी औषधे दिली ..इंजेक्शन दिले ..औषध घेतले की जरा वेळ ताप कमी होई ..पुन्हा दोन तीन तासात ताप चढे ..त्या काळात त्याला धड झोपही लागेना ...खाली ठेवला की जोराने रडे ...सारखे मांडीवर घेवून बसावे लागे .. आळीपाळीने मानसी आणि मी त्याला मांडीवर घेवून बसत तीनचार रात्री जागलो ..शेवटी एकदाचा चार दिवसांनी त्याला बरे वाटू लागले ..तेव्हा आमचा जीव भांड्यात पडला ..मला आठवले व्यसन करण्याच्या काळात जेव्हा माझे आई वडिलांशी भांडण होई ..मी पैश्यांचा ..वस्तूंचा हट्ट करी तेव्हा आई वडिलांवर बेफाम आरोप करी ..तुमचे माझ्यावर प्रेमच नाही ..तुम्हाला माझ्यापेक्षा पैसे जास्त प्रिय आहेत ..तेव्हा एकदा आई दुखा:ने म्हणाली की '' अरे तुला काय माहित ..तुला मोठा करताना आम्ही किती खस्ता खाल्ल्या आहेत ते " हे ऐकल्यावर मी म्हणे ' त्यात काय मोठे केले तुम्ही ..सर्वच आईवडील करतात आपल्या मुलांसाठी ....जर माझे लाड करता येत नव्हते तर मला जन्म दिलात कशाला ? ' वगैरे बोलून मी त्यांचा अपमान करत होतो याचे आता खुप वैषम्य वाटते ..त्यावेळी खस्ता म्हणजे नेमके काय ते मला कळत नव्हते ..फक्त खस्ता या शब्दाचा अर्थ कष्ट असा माहित होता ...त्या अर्थात दडलेली खोली समजली नव्हती ..सुमित आजारी असताना त्याला मांडीवर घेवून रात्र रात्र जागताना मला ' खस्ता ' म्हणजे नेमके काय ते समजले ...पालक आपल्या मुलाला कसे जपतात ...त्याची काळजी घेतात ... ते देखील अगदी निस्वार्थीपणे ..त्यांचे बहुतेक निर्णय मुलांच्या भल्यासाठीच असतात ..काही वेळा त्यांचे चुकतही असेल..मात्र मोठी होणारी मुले एवढ्या तेवढ्या कारणांवरून आईबापाचा पाण उतारा करतात हे अतिशय अयोग्य आहे . 

सुमित मोठा होऊ लागला.. तसा घरखर्च वाढला ..रोज नागपूर चाळीतून मुक्तांगणला येण्या जाण्याचे अंतर सुमारे चार किलोमीटर होते ....पाठीच्या मणक्याचे आँपरेशन झाल्याने फार चालले की माझी पाठ दुखू लागे ..म्हणून जाण्या येण्यासाठी एखादे वाहन असावे असे मला वाटू लागले ....रोज ऑटोचा खर्च परवडत नव्हता ..महिन्याच्या शेवटी बचत म्हणून देखील हाती काही रहात नव्हते...सारखे घरी आईकडे पैसे मागणे योग्य वाटत नव्हते ...मी अतिशय बैचेन होतो त्या काळात ..पैसे कसे जमवावे या विवंचनेत ..एखादा पार्ट टाइम जॉब करावा असेही मनात येई ..पण जवळपास असा जॉब मिळायला हवा होता ..दत्ता श्रीखंडेने जसे ..वाडीत फुटपाथ वर सायंकाळी ..बनियन ..अंडरवेअर ..इतर किरकोळ गरजेच्या वस्तू विकणे सुरु केले तसे करावे असेही मनात येई ..त्याच काळात मुक्तांगणला उपचार घेतलेल्या ... प्रोफेसर म्हणून नोकरीस असलेल्या ..एका सुधीर नावाच्या माणसाचा मुक्तांगण मधून डिस्चार्ज झाला ..सुधीरला दारूचे व्यसन होते ..लग्न झालेले नव्हते ..वारंवार रीलँप्स होऊ नये म्हणून ....सुधीरला त्याच्या सल्लागाराने ..मुक्तांगण जवळच कुठेतरी खोली घेवून राहा ...म्हणजे नियमित फाँलोअप करा येईल असे सुचवले ..सुधीरने ..नागपूर चाळीतच माझ्या घराजवळच रूम घेतली होती ..त्याने रोज एक वेळचा डबा मिळेल का असे विचारल्यावर मी आनंदाने त्याला होकार दिला ..तेव्हढेच थोडे पैसे मिळतील हा हेतू ..त्या नुसार रोज संध्याकाळी सुधीर माझ्या घरून डबा नेवू लागला .

( बाकी पुढील भागात )

========================================================================

विनाशकाले ...! ( पर्व दुसरे -भाग ९८ वा )

माझ्याकडे रात्रीच्या जेवणाचा डबा लावलेला सुधीर हा अल्कोहोलिक होता ..त्याच्या चार पाच रीलँप्स झालेल्या होत्या ...त्यामुळे या वेळी विशेष काळजी घ्यावी म्हणून तो मुक्तांगणच्या जवळ राहायला आलेला ..म्हणजे संध्याकाळी त्याला नियमित फॉलोअप करता येई ..हा इंग्रजीचा प्राध्यापक होता ..अतिशय हुशार ..वय सुमारे चाळीस असावे ..लग्न झालेले नव्हते ..प्रत्येक वेळी एकदोन महिने चांगला राहून हा एकदम झटका आल्यासारखा पिणे सुरु करी ..पिणे सुरु झाले की मागील न प्यायलेल्या दिवसांचा सगळा बँकलॉग भरून काढल्यासारखा पीत असे ...अगदी सकाळपासून सुरु राही पिणे ..जवळचे सगळे पैसे संपेपर्यंत किवा कोणीतरी पुन्हा उपचारांसाठी दाखल करीपर्यंत थांबत नसे ...माझ्याकडे डबा लावल्यावर दोन महिने सुरळीत चालले ..रोज रात्री नियमित माझ्याकडे डबा घ्यायला येई ..एकदा रात्री सुधीर डबा घ्यायला आला नाही म्हणून मी त्याच्याकडे डबा घेवून गेलो ..पाहतो तर गडी प्यायलेला ..मस्तच झाला होता ..खूप बडबड करत होता ..जुने जुने किस्से सांगून कोणाला तरी सारख्या आई बहिणीवरून शिव्या घालणे सुरु होते ..मला हात धरून थांबवून सगळे ऐकवीत होता ..अशा वेळी प्यायलेल्या माणसाला आपले म्हणणे खूप महत्वाचे आहे आणि ते समोरच्याला सांगितलेच पाहिजे असे वाटते ...मात्र त्या अर्थहीन बडबडीत समोरच्याला काहीही रस नाहीय हे पिणाऱ्याच्या लक्षात येत नाही ..मी कसातरी सुटका करून घेवून तेथून निघालो ..त्याला डबा खा म्हणून आठवण केली निघताना ..दुसऱ्या दिवशी सकाळी डबा आणायला गेलो तर ..अर्धवट खाल्लेला डबा तसाच उघडा पडलेला होता ..हे महाशय सकाळी सकाळी पुन्हा लावून आलेले ...वैतागून खरकट डबा घेऊन निघालो ..दोन तीन दिवस असे सुरु होते ..मी त्याला पुन्हा उपचार घे म्हणून सुचवले ..तर आज उद्या करत टाळत गेला ..एकदा असाच रात्री त्याच्याकडे डबा घेवून गेलो ..पाहतो तर दार सताड उघडे ..हा पिवून लक्कास झालेला ..उताणा अस्ताव्यस्त ...तोंड उघडे ठेवून जोरात घोरत होता ..मी त्याला हाका मारल्या ...मग जवळ जावून हलवले ..परिणाम शून्य ..उघड्या तोंडातून लाळ बाहेर पडून उशीवर थारोळे साचलेले ..त्याला कुशीवर करावा म्हणून सरकावू लागलो ..तशी उशी त्याच्या डोक्याखालून निसटली ..उशीखाली असलेल्या पाचशेच्या नोटा उघड्या झाल्या ..त्या कोऱ्या करकरीत नोटा पाहून माझी नियत बिघडली .
मनात लोभ जागृत झाला ...वाटले तसाही हा पिवून हे पैसे संपवणार आहे ...त्या ऐवजी आपण घेतले तर आपल्या कामी तरी येतील ..गेल्या काही दिवसांपासून मुक्तांगणला जाणे येणे करण्यासाठी एखादी सेकंडहँड का होईना मोपेड असावी असे मनात होते ..दुसरे मन सांगत होते की हे चूक आहे ...असे सुधीरचे पैसे घेणे योग्य नाही ...पूर्वी नाशिकरोडला असताना जेव्हा नशेसाठी पैसे नसत तेव्हा ..आम्ही मित्र मंडळी रात्री बेरात्री रेल्वे स्टेशन ..दारूचे अड्डे या ठिकाणी भटकत असू ..एखादा असा दारू पिवून पडलेला दिसला की त्याचे खिसे तपासून आतल्या चीजवस्तू पैसे ..घड्याळ काढून घेत असू ते आठवले ...हो ना करता करता शेवटी लोभ जिंकला ..मी त्या नोटा काढून खिश्यात ठेवल्या ..मग साळसूदपणे बाहेर पडलो ...घरी येवून पैसे मोजले ..तीन हजार रुपये होते .मानसीने ते पाहून मला हे कुठले पैसे ते खोदून खोदून विचारले तर तिला मित्राकडून उसने घेतलेत ..मोपेड घ्यायला हे सांगितले ..त्या दिवशी रात्री नीट झोप लागली नाही ..व्यसन करत असताना केलेल्या चोऱ्या नाईलाज होता ..मात्र प्रथमच मी व्यसनमुक्त असताना हे केले होते ..याची बोच मनात होती ..दोन मनांचा संघर्ष सरू झाला...' लबाडीने कमावलेला पैसा आतडे फाडून बाहेर पडतो ' हे एका ऑटोवर वाचलेले आठवले ..अपराधीपणाची भावना मनात थैमान घालू लागली ..अशावेळी एक मन आपला उत्कृष्ट असा वकील असते ..ते आपण काहीही चूक केलेली नाहीय हे पटवून देते ..जगात अनेक जण भ्रष्टाचार करतात ..अन्यायाने पैसे कमावतात ..लबाडी करतात ..आपण असे केले यात फारसे चूक नाहीय असे स्वतःला समजावले जाते ..तर दुसरे मन ' तोरा मन दर्पण कहेलाये..भले बुरे सारे कर्मो को देखे और दिखाये ' या गाण्याची आठवण करून देते ..मला सुधीरचे पैसे काढताना कोणी पहिले नसले .कदाचित सुधीरला देखील ते समजले नाही ..तरी ' मन से कोई बात छुपेना ..मन के नैन हजार ..जग से चाहे भागले कोई .. ..मन से भाग ना पाये ' हे देखील खरे आहे ..अपराधीपणाच्या भुताने मला झपाटलेच होते .

नंतर दोन तीन दिवसात सुधीर मुक्तांगणला उपचारांसाठी दाखल झाला..त्याला पैसे गेल्याचे समजले होते ..मात्र कोणी घेतले असावेत हे समजले नसावे ..मात्र जेव्हा जेव्हा सुधीर माझ्यासमोर येई तेव्हा मी अवस्थ होई ..मी त्या पैश्यांची एक जुनी मोपेड खरेदी केली ..त्यावरून मुक्तांगणला जाणे येणे सुरु झाले ..ती मोपेड सारखी बिघडत असे ..तेव्हा वाटे ..चोरीच्या पैश्यानी घेतलीय म्हणून असे होतेय ...आपल्या चुकीच्या कर्माचे फळ प्रत्येकाला मिळतेच ..आजार ..अनारोग्य ..अपयश ..जवळच्या व्यक्तीचा मृत्यू ..घरात कलह ..अपघात ..असमाधान ..किवा शेवटी कायद्याच्या मार्गाने का होईना फळ मिळणे अटळ असते .. अनेक मार्ग आहेत फळ मिळण्याचे ..हे आता खूप वर्षांनी उमगले आहे ..चांगल्या कर्माचे देखील तसेच आहे ..चांगले कर्म करत रहा ..यश .समाधान ..विकास ..उत्कर्ष ..हे फळ मिळणारच ..फक्त यासाठी किती वेळ लागेल हे नक्की नसते ...मात्र चांगल्या वाईट कर्माचे फळ मिळणारच हे नक्की ..फळ मिळण्यास उशीर झाला तर ते व्याजासहित मिळते हे देखील खरे आहे .

( बाकी पुढील भागात )

========================================================================

रॉक बॉटम ! ( पर्व दुसरे -भाग ९९ वा )


अल्कोहोलीक्स अँनाँनिमस अथवा मुक्तांगण मध्ये " एखादा व्यसनी व्यक्ती ' रॉक बॉटम ' गाठल्या शिवाय कायमचा व्यसनमुक्त राहणे कठीण असते " असे सांगितले जाते . ' रॉक बॉटम ' म्हणजे व्यसना मुळे झालेले विविध प्रकारचे नुकसान जे व्यसनी व्यक्तीला त्याच्या व्यसनाच्या शक्ती समोरच्या असहायतेची कायमची जाणीव करून देईल किवा व्यसनाच्या काळात झालेले अश्या प्रकारचे नुकसान जे व्यसनी व्यक्तीला कायम स्मरणात राहून व्यसनापुढे आपली बुद्धी ..शक्ती ..पैसा ..समाजिक स्थान ..नाते संबंध ....वगैरे सगळे फोल ठरतेय याची कायमची जाणीव व्यसनीला राहील ..रॉक बॉटम काही व्यसनींना एखाद्या अगदी छोट्या नुकसानामुळे जाणवतो व ते व्यसनमुक्तीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करून यश मिळवितात तर काही वेळा रॉक बॉटम हा विविध प्रकारच्या नुकसानांची मालिका असू शकते ...किवा व्यसनामुळे झालेली एखादी मोठी धक्कादायक घटना असू शकते ...प्रत्येक व्यसनी व्यक्तीला आपल्या बुद्धी चातुर्यावर ..किवा त्याच्याकडे असलेला पैसा ..शिक्षण ..त्याचे सामाजिक स्थान ..नातलगांचे त्याच्यावरचे प्रेम ..वगैरे गोष्टींवर प्रचंड विश्वास असतो ... अहंकारच असतो असे म्हणता येईल ..त्यामुळेच मी कितीही व्यसन केले तरी माझे फारसे वाकडे होऊ शकत नाही ही भावना त्याच्या मनात तयार होते ....किवा माझे कितीही नुकसान झाले तरी मी सगळे काही पुन्हा भरून काढून शकेन असा खोटा आत्मविश्वास असतो त्याला ..जेव्हा व्यसनापुढे हे सगळे अहंकार गळून पडतात.. तेव्हाच त्याच्या सुधारणेला खरी सुरवात होते ..व्यसनाची ओढ ..अथवा मला आहारी करून घेण्याची व्यसनाची शक्ती माझ्या सर्व क्षमता आणि शक्तींपेक्षा मोठी आहे हे जेव्हा तो मनोमन मान्य करतो तेव्हा आता या पुढे एकदाही मी व्यसन करू शकणार नाही हे त्याला उमगते ..मगच आजच्या दिवस ..एकदाच ..थोडीशीच वगैरे आकर्षणे निघून जाण्यास मदत मिळते . रॉक बॉटम ही एक मनाची... हतबलतेची ..सपशेल पराभवाची ..असहायतेची जाणीव असते ..ती जाणीव मनात खोल घर करून रहाते तेव्हाच कायमच्या व्यसनमुक्तीला सुरवात होते ..मग पुढे सगळे सोपे होते ..परंतु हा रॉक बॉटम ..पराभवाची जाणीव होण्यास माझ्या सारख्या अति आत्मविश्वासू ..अहंकारी ..जिद्दी ..हट्टी व्यक्तींना वेळ लागतो ..त्यामुळे अधिक अधिक नुकसान सोसावे लागते ..ही जाणीव होईपर्यंत अश्या व्यसनी व्यक्तीला उपचार देणेच योग्य ठरते ....व्यसनमुक्ती केंद्रात किवा अल्कोहोलिक्स अँनाँनिमसच्या मिटींग्स मध्ये व्यसनामुळे काय काय नुकसान होऊ शकते याची वारंवार जाणीव करून दिली जाते ..मात्र माझ्या सारखे अहंकारी लोक हे सगळे कानाआड करतात ..माझे इतके नुकसान होऊ शकणार नाही ..मी तेवढा मूर्ख नाही ..मी स्वतःला केव्हाही सावरू शकतो असे त्यांना वाटत रहाते ..

मला या पूर्वी व्यसनामुळे अनघाला गमवावे लागले होते ..मेंटल हॉस्पिटल मध्ये राहावे लागले होते ..मुंबईत फुटपाथ ..रेल्वे स्टेशनवर राहावे लागले होते हे खरे तर रॉक बॉटमच होते ..परंतु मी या सगळ्यातून कायमचा बोध घेवू शकलो नव्हतो ..म्हणूनच थोडेसे ..कधीतरी ...मर्यादित प्रमाणात व्यसन करण्याचे आकर्षण माझ्या मनात होतेच ...मागच्या वेळच्या सुमितच्या जन्मापूर्वीची माझी रीलँप्स ..रंगेहाथ पकडल्या गेल्यामुळे लगेचच थांबली होती ..मुक्तांगण ने मला सहा महिन्याचा पगार कापू असे जरी सांगितले असले ..तरी माझ्या सहानुभूती पोटी केवळ तीन महिनेच माझा पगार कापला व नंतर पुन्हा सगळे सुरळीत झाले ..मला वारंवार मदत करणारी सगळी भली ..चांगली माणसे मला उपलब्ध झाली हे खरेतर माझे भाग्य होते ..पण मी सर्वांच्या प्रेमाचा ..विश्वासाचा ..सहानुभूतीचा कायम गैरफायदा घेत आलो होतो ..हे मला समजत नव्हते ...सुधीरचे तीन हजार रुपये चोरल्यानंतर मनात जी अपराधीपणाची भावना होती ती मला कायम अवस्थ ठेवण्याचे काम करत होतीच ..त्यातच मानसी पुन्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्यात माहेरी जायला निघाली ..झाले ..मला पुन्हा आयते रान मिळाले ..मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ..माझे पुन्हा पिणे सुरु झाले ...मागच्या वेळी मुक्ता मँडमनी सांगितल्या नुसार जर मानसी माहेरी गेल्यावर मी स्वतःशी प्रामाणिक राहून .. मुक्तांगण मध्ये राहायला गेलो असतो तर वाचलो असतो ..पण ते केले नाही ..पुन्हा माझे पिणे सुरु झाले ..सोबत बंधू देखील होताच ..यावेळी आम्ही मुक्तांगणमध्ये कोणाला समजू नये याची पुरेपूर दक्षता घेत होतो ..पाहता पाहता ..महिनाभर उलटून गेला ..मानसी परत आली ..तरी देखील आमचे पिणे सुरूच होते ..दारू सारखा ब्राऊन शुगरचा वास येत नसल्याने मानसीला काही समजणे कठीणच होते ..फक्त मी हल्ली जास्त दांड्या मारतो ..जास्त वेळ संडासात बसतो ..पगाराचे सगळे पैसे लवकर संपतात... वगैरे गोष्टी तिच्या ध्यानात आल्या ..तिने मला तसे बोलूनही दाखवले ..मात्र मी काहीतरी थातूर मातुर करणे सांगून तिला उडवून लावले होते ..एकदा व्यसन सुरु झाले की आपोआप सगळ्या नकारात्मक प्रवृत्ती जाग्या होतात व्यसानीच्या ..त्याप्रमाणे ..मला पगार कमी मिळतो ..माझ्यावर अन्याय होतोय ..कोणाला माझ्या भावनांची पर्वा नाही ..माझे नशीबच वाईट ..अशी नकारात्मक मनोवस्था होत गेली माझी .

एकदा व्यसन सुरु झाले की व्यसनी कोणत्या प्रकारचे नुकसान करेल याची काही खात्री देता येत नाही ..तसेच माझे होत गेले ..माझा बेदरकार पणा वाढला ..मानसी ..सुमित यांची पूर्वी सारखी ओढ राहिली नाही ..फक्त तेवढ्यापुरते प्रेम दाखवत होतो ..मनात सतत व्यसन ...व्यसनासाठी पैसे ..लबाड्या ..असेच सुरु राही .एकदा सकाळी सहा वाजताच आम्हाला पुण्यातूनच ब्राऊन शुगर आणून देणाऱ्या मुलाला फोन करायला बाहेर पडलो ..मानसी बाथरूम मध्ये होती ..सुमित झोपलेला ..म्हणून दाराला बाहेरून कडी लावून गेलो ..फोन करून दहा मिनिटात परत येईन असे मनात होते ..परंतु ज्याला फोन केला तो मुलगा फोनवर भेटला नाही ...आज ब्राऊन शुगर कशी मिळणार ..या विचारात खिश्यात पैसे होते म्हणून तसाच पिंपरी येथे गेलो ..दिवसभर ब्राऊन शुगरच्या शोधात भटकलो ..शेवटी मिळवली ...बाहेरच पिवून ..सायंकाळी सहा वाजता घरी परतलो ..पाहतो तर बाहेरून दाराला कडी ..मग एकदम आठवले ..आपण सकाळी जाताना बाहेरून दाराला कडी लावून गेलो होतो ..मनात धस्स झाले ..म्हणजे इतका वेळ आत मानसी आणि सुमित कोंडल्या सारखेच होते ..हळूच कडी काढून आत गेलो ..तर मानसी सुमितला घेऊन पलंगावर टी व्ही पाहत बसलेली ...म्हणाली ' अहो ..तुम्ही सकाळी बाहेरून कडी लावून गेलात ..ते परत आलाच नाहीत ..मला बाहेर कचरा टाकायला जायचे होते ..थोडे सामान आणायचे होते ..तसेच राहिले ते ' तिच्या सुरात तक्रार नव्हती ..तर केवळ मी इतका उशिरा आलो म्हणून माझी काळजी होती ..' अग तू खिडकीतून कोणाला तरी हाक मारून .दार उघडून घ्यायचे होतेस ' असे म्हणालो ..तर म्हणाली ' तसे केले असते तर सर्वाना समजले असते की तुम्ही किती विसरभोळे आहात ते ' म्हणून कोणाला हाक मारली नाही ..बिचारी किती साधी ..किती जपत होती मला .

( बाकी पुढील भागात )

==================================================================

पडत.... धडपडत ..!  ( पर्व दुसरे _ भाग १०० वा )

व्यसनीचे एकदा व्यसन सुरु झाले की त्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्याला ते थांबवता येणे कठीणच असते ...जरी काही काळ नाईलाजाने व्यसन थांबले तरी तो जो पर्यंत प्रामाणिक पणे मदत घेत नाही तो पर्यंत कायमची व्यसनमुक्ती कठीण होते ..माझेही तसेच होत होते ..पुन्हा रीलँप्स झाल्यावर ..माझे ब्राऊन शागर पिणे नियमितच झाले ..मध्ये जेव्हा एकदोन दिवस पैसे नसत तेव्हा टर्कीचा त्रास कमी होण्यासाठी आता मी स्पाज्मो प्राँक्सीव्हॉन च्या गोळ्या देखील खाण्यास सुरवात केली ...म्हणजे आठवड्यातून चार दिवस ब्राऊन शुगर आणि उरलेले दिवस स्प्जामो च्या गोळ्या ..पाहता पाहता माझ्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला ..मानसीला सर्व समजत होते ..मात्र मी रोज विविध करणे सांगून तिचे समाधान करत होतो ..लवकरच हे सगळे थांबून पुन्हा अधिक उज्वल आणि सोनेरी भविष्यकाळ सुरु होईल याची तीला खात्री देत होतो ....ती देखील माझ्यावर विश्वास ठेवून ..माझ्या सुधारणेची आशा बाळगून होती ... पुन्हा माझे घरी आईकडून पैसे मागवणे सुरु झाले ...रोज रात्री स्वत:शी निश्चय करणे की उद्यापासून बंद करायचे ..मात्र सकाळी उठल्यावर ' ये रे माझ्या मागल्या ' असे होई ...मी जर पुन्हा मुक्ता मँडमना सगळे खरे खरे सांगून मदत मागितली असती तर ..नक्कीच त्यांनी मदत केली असती ....मात्र आपण आपल्या स्वत:च्या इच्छा शक्तीवर हे सगळे थांबवू शकतो हा फोल आत्मविश्वास होताच ...त्यामुळे मदत मागत नव्हतो ..मुक्तांगण मध्ये सर्वाना पुन्हा संशय येवू लागला ...माझे सहकारी मला आडून पडून टोमणे मारू लागले ...खरेतर त्या मागे त्यांच्या हेतू मी सावध व्हावे ..व्यसन थांबवावे असाच होता ..परंतु मी ते न करता सहकाऱ्यांवर राग धरू लागलो ..मनात पुन्हा वैफल्याचे ..निराशेचे ..आपल्यावर अन्याय होत असल्याचे भाव गहिरे होत गेले ..सहकाऱ्यांच्या नजरेला नजर मिळविणे कठीण जावू लागले ..प्रत्येक जण जणू आपल्या बद्दलच बोलतोय की काय असे वाटू लागले .. मुक्तांगण मध्ये नोकरी करणे जीवावर येवू लागले .. वाटे आपण पुन्हा नाशिकला जावे ..तिथेच काहीतरी काम करावे .

मुक्तांगण सोडण्याची योजना माझ्या मनात घर करून बसली ..हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा चुकलेला निर्णय होता हे आज उमगते आहे ..मुक्तांगण सोडण्याच्या योजनेचा भाग म्हणून मी घरी आईला आणि भावाला फोन करून खोटेच सांगितले की ... मुक्तांगणला मिळणाऱ्या सरकारी अनुदानाच्या रकमेत आता खूप कपात होणार आहे ..आमचे सर्वांचे पगार कमी करणार आहेत ..तेवढ्या पगारात माझे येथे भागणे शक्यच नाही ..वगैरे ...इकडे मुक्ता मँडमना सांगू लागलो की मला मुक्तांगणचे मिळणारे मानधन आता संसाराला पुरत नाही ..म्हणून भावू म्हणतोय की तू इथे नाशिकला ये .. तो मला त्याच्या ओळखीने चांगली नोकरी लावून देणार आहे .. दुहेरी खोटे बोललो ..भावाने व आईने माझ्यावर विश्वास ठेवला ..मी जर नाशिकला त्यांच्या समोर असतो तर कदाचित ..माझे बदलते रूप त्यांच्या लक्षात आले असते ..त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नसता ..परंतु मी त्यांच्यापासून दूर पुण्याला असल्याने त्यांना ..मी परत व्यसन सुरु केलेय हे कळत नव्हते ..त्यांनी मुक्तांगणला एखादा फोन करून मी सांगतोय तसे खरेच मानधन कमी होणार आहे का ? हे विचारून खात्री करून घेतली असती तर माझे पितळ उघडे पडले असते पण भावाने आणि आईने तसे केले नाही ते माझ्या पथ्यावर पडले .... मानसी बिचारी अगदीच साधीभोळी..तिच्या साधेपणाचा मी चांगलाच गैरफायदा घेत होतो ....जेव्हा मी मँडमना मी भावू नाशिकला बोलावतोय असे सांगितले तेव्हा त्यांनी मला सावध केले ..नाशिकला तुझे जर परत व्यसन सुरु झाले तर ..खूप कठीण होईल ..आता तुझ्यावर जवाबदारी आहे वगैरे समजावण्याचा प्रयत्न केला ..व्यसनीच्या डोक्यात एकदा एखादा विचार शिरला की तो अमलात येईपर्यंत त्याला चैन पडत नाही ..त्याच प्रमाणे मी मँडमना शपथपूर्वक ग्वाही दिली की मी नाशिकला चांगला राहीन ...नाशिकला भावाने त्याचा जिवलग मित्र अनिल याचेकडे माझ्या नोकरीबद्दल सांगून ..माझी त्याच्या मित्राकडे नोकरी पक्की केली ..मला जसे हवे तसे सगळे घडवून आणण्यासाठी मी सगळी बुद्धी पणाला लावली होती ..सगळे हवे मला तसेच घडत गेले .मात्र ते माझ्या भल्याचे नव्हते हे आता समजतेय ..शेवटी मँडमने मुक्तांगणची नोकरी सोडण्यास मला परवानगी दिली ..मी राजीनामा लिहून त्यांच्याकडे द्यायला गेलो तेव्हा त्यांनी ..माझ्या भविष्याबाबत सावधगिरी म्हणून मला सांगितले की आत्ताच राजीनामा देवू नकोस ....आधी नाशिकला जा ..तेथे नोकरीत स्थिर हो ..मग हवे तर महिन्या भाराने राजीनामा दे ..मी मंजुरी दिली ..आज जाणवतेय माझ्यापेक्षा मुक्ता मँडमनाच माझ्या सुरक्षिततेची जास्त काळजी होती .

शेवटी एकदाचा पुणे सोडण्याचा दिवस उगवला ..एक टेम्पो करून सारे समान त्यात भरून मी नाशिकला जायला निघालो ..कायमचा .. नाशिकला आईकडे राहणारा माझा भाचा सामान आवरण्यासाठी मदत करण्यास आला होता ....सामान असलेल्या टेम्पोतच बसून आम्ही नाशिकला रवाना झालो ....निघताना मुक्तांगण मधल्या सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या ...सगळे माझ्या मनासारखे घडले म्हणून मी आनंदी होतो ..स्वतच्या चातुर्यावर खुश झालो होतो ..नाशिकला गेल्यावर मी सहजासहजी व्यसन थांबवू शकेन असा खोटा आत्मविश्वास देखील वाटत होता ..,,चार पाच दिवस स्पाज्मो प्राँक्सिवॉन च्या गोळ्या खावून टर्की दूर करायची आणि नंतर परत कधीच व्यसन करायचे असे मला सोपे वाटणारे ..मात्र वास्तवात अत्यंत अवघड किवा अशक्य असेच गणित मी मनात मांडले होते ..,,मानसी आणि सुमित टेम्पोत आनंदी मुद्रेने बसले होते ..आजीकडे जायला मिळणार म्हणून सुमित खुश होता ..तर मानसी आता नवरा अधिक सुरक्षित भविष्य घडवणार म्हणून आनंदी होती ..सुमितचे वय त्यावेळी सुमारे ११ महिन्यांचा झाला होता .. कोणालाच माहित नव्हते की ही व्यसनामुळे होणाऱ्या नव्या विनाशाची नांदी होती .

( बाकी पुढील भागात )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें