बोनस ? ? ? ( पर्व दुसरे - भाग १२१ वा )
माझी मँजीस्ट्रेट कस्टडी संपायच्या दिवशी ..बंदी उघडल्यापासून मी माझ्या नावाचा पुकारा व्हायची वाट पाहत होतो ..ज्यांची कोर्टात तारीख असेल त्या कैद्यांच्या नावाचा पुकारा सकाळी आठ नंतर होत असे ..तर ज्यांची भेट घ्यायला कोणी नातलग आला असेल त्यांच्या नावाचा पुकारा १० नंतर होई ....ज्यांचा जामीन बाहेरच्या बाहेर वकील किवा नातलग करीत त्यांची नावे दुपारी ३ नंतर जाहीर होत ..सुटीचा दिवस सोडून.. रोज ....प्रशासनाच्या ऑफिस मधून शिपाई आला त्याच्या भोवती गर्दी जमत असे कैद्यांची ..प्रत्येकजण या आशेवर असे की आपले नाही निदान आपल्या मित्राचे तरी नाव यावे यादीत ... एक शिपाई येवून मोठ्याने त्याच्या जवळच्या कागदावरची नावे वाचून दाखवी ..मग त्या कागदाची एक प्रत बराकीच्या वार्डन जवळ दिली जाई ..पुकारा झालेल्या सर्व लोकांना एका रांगेत बसवले जाई ..जेलच्या बाहेर जाणे म्हणजे काही कैद्यांसाठी पर्वणी असे ..त्या दिवशी कोर्टात त्यांना त्यांचे नातलग भेटत असत ..तारीख झाल्यावर परत येताना ते सोबत खायचे सामान ..बिड्या वगैरे घेवून येत असत ..काही सराईत कैदी नातलगांद्वारे इतर कैद्यांचे मेसेज देखील पोचवत असत ..सकाळी सकाळी मी हौदावर थंड पाण्याने अंघोळ करून तयार झालो होतो ..माझ्याजवळ अंगावरचा एकच जोड कपडे होते ..त्यामुळे अंघोळ करण्याच्या वेळी मी बनियन ने अंग पुसून ..नंतर ते बनियन वाळले की अंगात घालत होतो ..माझ्या सारखे अनेक जण असत जे ..रेल्वे स्टेशन ..पंचवटीचा घाट...बस स्थानक वगैरे ठिकाणाहून संशयित म्हणून पकडले जात .. ..त्यांच्याकडेही फक्त अंगावरचे कपडे इतकीच मालमत्ता असे ..असे सगळे जण अंघोळ दिगंबर अवस्थेतच करत ...कोणी कोणाला लाजायचा प्रश्नच नसे ...हालात की मजबुरी !
माझ्या नावाचा पुकारा झाल्याबरोबर मी बाजूलाच लागलेल्या रांगेत जावून बसलो ...कोर्टात नेमके काय होईल याची खात्री नव्हती मला ....भाऊ कोर्टात येईल का ? जामीन करेल का ? वगैरे प्रश्न होतेच मनात ..नऊ वाजता सर्कलचे गेट उघडून आम्हाला रांगेने मुख्य ' लालगेट ' जवळ नेले गेले ..पुन्हा तिथे रांगेने बसवले गेले ..जेलच्या मुख्य भव्य प्रवेशद्वाराला ' लालगेट ' असे म्हणत ...बराच वेळ तेथे बसावे लागले ...आमच्यासाठी तेथेच जेवणही आले ..सोबत थाळ्या देखील होत्या ..कारण आमच्या सगळ्यांच्या थाळ्या बराकीत ...रांगेने जेवण वाढले गेले ..इथे जेवण पोटभर मिळाले ..म्हणजे नेहमी पेक्षा दोन चपात्या जास्त मिळाल्या ...अकरा वाजत आले होते ..आम्ही रांगेत बसून कंटाळलो होतो ..शेवटी एक शिपाई आला ..सगळे उत्सुकतेने त्याच्याकडे पाहत होते ..त्याने जाहीर केले की ..आज पार्टी लागली नाही ..सगळ्यांनी परत बराकीत जायचे आहे ..पार्टी म्हणजे जेलमधून बंदोबस्तात कोर्टात नेण्यासाठी कमिशनर ऑफिस मधून नेमण्यात आलेले पोलीस ..मालेगाव येथे झालेल्या दंगली मुळे बाहेरचे वातावरण तंग होते ..त्यामुळे कैद्यांना कोर्टात नेण्यासाठी पोलीस उपलब्ध झाले नव्हते ..सगळे निराश झाले ..परत मागे फिरलो ... आता अजून पंधरा दिवस मला जेलमध्ये काढावे लागणार होते ...वैतागून बराकीत येवून बसलो ..मनातून घरच्या मंडळींचा खूप राग येत होता ..अनेकदा परिस्थिती इतकी कठीण आणि मनाविरुद्ध असते की त्रागा करून ..चीड चीड करून ....निराश होऊन काहीही उपयोग नसतो ..अश्या वेळी परिस्थितीला शरण जाणे ..हसतमुखाने तोंड देणे हाच योग्य पर्याय असतो ..येथे स्वतःचे खुजेपण चांगलेच जाणवते ..कोणीही कितीही मोठा असला तरी ' वक्त ..हालात ..के सामने मजबूर होनाही पडता है ' बहुधा अहंकार कमी होण्यासाठीच अशी परिस्थिती निर्माण होत असावी ..अनघाच्या वेळीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती ..मी काहीही करू शकलो नाही ..केवळ स्वतःला दोष देणे ..हेच हाती उरले होते ....
दुपारी बंदी उघडल्यावर ..विषण्णपणे बाहेर येवून बसलो होतो ..जेवणाची इच्छा राहिली नव्हती ..माझ्या बाजूला आमच्या बराकीचा शिपाई उभा होता ..त्याच्याजवळ दुसऱ्या बराकीचा एक शिपाई आला आणि त्याला विचारू लागला ' बोनस लिया क्या तुने ? ' आमच्या बराकीचा शिपाई वैतागून म्हणाला ..' कहासे मिलेगा ..आपले सरकार कंगाल झालेय ..त्यांनाच पैसे कमी पडत आहेत ..' मी त्यांच्या गप्पा ऐकू लागलो ..मग दुसरा म्हणाला ' महाराष्ट्र सरकार नै रे ..उधर के सर्कल मे भाई लोगोने बोनस बाँटना शुरू किया है ..बाबा को पाचसों और जमादार को एक हजार रुपये मिल रहे है ..मै अभी श्याम को जानेवाला हु ' मला हे ऐकून नवल वाटले ..त्या वर्षी महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारी कर्मचार्यांना दिवाळीत बोनस दिला नव्हता ... तिजोरीत पुरेसे पैसे नाहीत असे कारण सांगितले होते ..तर इथे जेल मध्ये असलेले भाई लोक बोनस वाटत होते ...एका सर्कल मध्ये मुंबई टोळी युद्धातील गुन्हेगार ..भाई लोक ठेवले गेले होते ..त्यात कलानी ..गवळी ..दाउद अश्या सर्वांच्या गँगचे सदस्य ..ते जेलमध्ये राजासारखे रहात असत ...त्यांच्याकडे भरपूर पैसे येत होते बाहेरून ..सगळे नियम धाब्यावर बसवून ..असे भाई लोक सरकारने बोनस दिला नाही म्हणून ..दिवाळी नंतर जेलच्या कर्मचार्यांना बोनस वाटत होते ..अगदी राजरोस ..मला प्रश्न पडला ....नक्की राज्य कोणाचे आहे ? सरकारचे ..भाई लोकांचे ..की पैश्यांचे ?
( बाकी पुढील भागात )
===================================================================
हृदयद्रावक आठवण !( पर्व दुसरे -भाग १२२ वा )
अजून पुढचे पंधरा दिवस जेलमध्ये रहावेच लागणार होते ...जरी येथे स्थिरावलो होतो तरी ..बाहेरच्या जगाची ओढ मनात होतीच ..माझ्या सारख्या स्वतंत्र वृत्तीच्या माणसाला बंधने नको असतात ..स्वातंत्र्य हवे असते नेहमी ..मात्र स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांची सीमारेषा मला कधीच समजली नव्हती ..मी समजत असलेले माझे स्वातंत्र्य हा खरे तर स्वैराचार होता ..हा स्वैराचार पुढे इतका वाढला की त्यासाठी दुराचार सुरु झाला ... शेवटी अनाचार ..मग व्हावे लागले स्वतच्याच कर्माने लाचार ...येथील गुन्हेगारांच्या जगातही मी घरच्यांना त्रास देत होतो म्हणून लुख्खा ठरलो होतो ...अर्थात ते खरेही होते ..माझ्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या ओघात मी कुटुंबीयांवर नकळत का होईना अन्यायच करत गेलो...मी तासंतास विचार करत बसे ....अनेक प्रश्न आणि प्रत्येक वेळी उत्तर एकच येई ..व्यसनाधीनता ...जो पर्यंत मी व्यसन कायमचे बंद ठेवत नाही तोवर काहीही वेगळे घडणार नव्हते ..आपण काही दिवस व्यसन बंद ठेवले की ..आता थोडेसे घेण्यास हरकत नाही... हा आत्मघातकी विचार मला कायमचा सोडवा लागणार होता ...त्यासाठी वारंवार मनाला व्यसनाने दिलेल्या त्रासाची आठवण करून देणे भाग होते ..कदाचित त्यामुळेच ...फक्त एकदाच ..थोडेसे ..घेण्याचा विचार कायमचा हद्दपार करता आला असता ..
आमच्या बराकीत अनेक जण किरकोळ केसेस मध्ये संशयित म्हणून पकडले गेलेले होते ..त्यातील काही महाराष्ट्राबाहेरचे ... अश्या लोकांना पोलीस स्टेशन मार्फत त्याच्या घरी निरोप जाऊन ..घरून कोणीतरी त्यांचा जामीन करेपर्यंत जेलमध्ये रहवे लागे ..त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे न्याय व्यवस्था जवळ जवळ तुंबलेली ...महिनोंमहिने केस रेंगाळणार..जे पैसेवाले आहेत ते निष्णात वकील देवून केस लवकर तडीस नेणार किवा निरनिराळ्या कारणांनी केस लोंबकळत ठेवणार ....जेलमध्येही पैश्यांच्या जोरावर रंगदारी करणार ...हवे तसे करून घेणार ... जे गरीब आहेत ते हतबलपणे वकील नाही ..पैसा नाही ..अशा कारणांनी असहायपणे जेलमध्ये राहणार असे काहीसे चित्र होते ..अश्याच गरीबांपैकी एक थापा नावाचा हिमाचल प्रदेशातील माणूस होता ..तिशीचा असावा ..थापा म्हंटले की बहुधा विशिष्ट ठेवणीचा ..विशिष्ट उंची असलेला चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो हा थापा मात्र याला अपवाद होता ..उंच धिप्पाड ..सावळा ..थोडासा अबोल ..त्याला म्हणे पंचवटी घाटावर झोपलेला असताना संशयित म्हणून पकडून आणले होते ..घरच्या गरिबीमुळे तो घर सोडून ..कामधंदा करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात आलेला ..अशिक्षित असल्याने हमाली करून पोट भरत होता ...हा थापा सुमारे तीन महिन्यापासून जेलमध्ये अडकला होता . ..स्वभावाने अतिशय गरीब ..बिडीसाठी..पोटभर जेवणासाठी ..बराकीतील भाई आणि वार्डनची सेवा करावी लागे त्याला ..त्यांची जेवणाची भांडी धुवून ठेवणे ..त्यांचे कपडे धुणे ..त्यांची मालिश करणे वगैरे कामे करीत असे ...एकदा सकाळी बंदी उघडल्यावर आम्ही सगळे चहा घेण्याच्या लाईनीत बसलेलो असताना ..अचानक आरडओरडा ऐकू आला ..सगळे त्या दिशेला पाहू लागलो ..हा थापा आमच्या बराकीसमोर असलेल्या कडूलिंबाच्या झाडावर चढत होता ...खूप उंच आणि जाड बुंधा असलेले ते जुने झाड होते ..मोठ्या विस्ताराचे ..मात्र थापा अगदी सराईत असल्या सारखा बुंध्याला विळखा घालून वर चालला होता ..सगळे कैदी ..शिपाई ..वार्डन ..त्याला खाली उतर म्हणून ओरडत होते ..मात्र तो जणू बहिरा झालेला ...कोणाकडेही लक्ष न देता ..तो वर जात राहिला ..' पकडो ..पकडो ' .. असा आवाज सर्वत्र येत होता ..ते झाड खरेतर बराकीच्या आतच होते ..त्या झाडावरून चढून पळून जाणे शक्यच नव्हते ...तरीही तो झाडावर चढला होता ..त्याला पकडण्यासाठी एकदोन उत्साही कैदी ..त्याच्या मागे झाडावर चढू पाहत होते ..मात्र थापा खूप उंच पोचलेला होता ...सुमारे सत्तर ते ऐंशी फुट उंच गेल्यावर थापा एका आडव्या फांदीवर गेला ..ती आडवी फांदी पाण्याच्या दगडी हौदाच्या नेमकी वर ..
लुंगीचे एक टोक त्याने फांदीला बांधले ...दुसरे टोक स्वतच्या गळ्याला ..तो नेमके काय करतोय हे सर्वांच्या लक्षात आले होते ..पुन्हा मोठा आरडओरडा झाला ..क्षणार्धात थापाने स्वतःला खाली झोकून दिले ...तो गळ्याला लुंगी बांधलेल्या अवस्थेत झाडाला लटकला ...अगदी दोन तीन सेकंद..आणि नेमकी उंच धिप्पाड थापाच्या वजनाने ..ती जुनी जीर्ण लुंगी मधून फाटली ..तुटली ...थापा धपकन सुमारे ऐंशी फुट उंचीवरून सरळ खाली पडला ..तो नेमका दगडी हौदाच्या नालीत त्याचे तळपाय अडकले ..मग तो मागे आडवा पडला ..कटकन काहीतरी मोडल्याचा आवाज आला ..माझ्या समोरच थापाच्या नालीत अडकलेल्या घोट्याचे एक बारीक हाड उडून पडले ....सर्व लगेच धावले थापाला उचलले ..तो शुद्धीवर होता ..प्रतिकार करत होता ..त्याला दोन वार्डन ने खांद्यावर घेतले ..खाली पहिले तर त्याची दोन्ही पावले घोट्यापासून लोंबकळत होती ..दोन्ही घोट्याची हाडे तुटलेली ..त्यातून रक्ताची धार लागलेली ..निर्जीव वाटणारी त्याची पावले पाहून ..कसेसेच वाटले मला ..घोट्याच्या तुटलेल्या हाडाचा एक तुकडा माझ्या उडून माझ्या समोर पडलेला ...ताबडतोब ..थापाला सिव्हील हॉस्पिटलमध्य पाठवले गेले..सर्व जण जमून घोळक्याने तीच चर्चा करू लागले ..मला वाटले की लुंगी तुटली नसती तर कदाचित लोंबकळणारया थापाला त्याचा श्वास बंद पडायच्या आत... त्याला पकडायला झाडावर चढलेला वार्डन त्याच्या जवळ पोचून त्याला सोडावू शकला असता ..मात्र लुंगी तुटली आणि जास्तच भयानक प्रकार घडला ..दुपारी एक वाजता बातमी आली की थापा अति रक्तस्त्राव झाल्याने हॉस्पिटल मध्ये गेला ...संपला ...आम्ही सगळे हळहळत होतो ..निराशेच्या भरात थापाने हे कृत्य केले होते यात वादच नव्हता ..दुपारी तीन वाजता बंदी उघडल्यावर जामीन झालेल्या लोकांची नावे वाचायला एक शिपाई आला ..तो मोठ्याने नावे वाचत होता ..त्याने थापाचे नाव वाचले ..सगळे थक्कच झालो ..म्हणजे नेमका थापाचा जामीन आजच झाला होता ...बहुतेक त्याच्या गावी हिमाचल प्रदेशात पोलीस स्टेशनचा निरोप जावून ..त्याचा भावू पैश्यांचा बंदोबस्त करून ...नाशिकला कोर्टात येवून त्याचा जमीन करेपर्यंत सुमारे तीन काहीने उलटून गेले ..तो पर्यंत थापाचा धीर खचला ..आता थापाला जामीन मिळूनही काही उपयोग नव्हता ..तो केव्हाच मुक्त झालेला !
( बाकी पुढील भागात )
========================================================================
जेलरवर हल्ला ! ( पर्व दुसरे -भाग १२३ वा )
पहाटे सहाला बंदी उघडली की अंधुक प्रकाशात पळत जावून चहाच्या लाईनीत पुढचा नंबर घेणे ...चहा घेइपर्यंत कोवळे उन येत असे ...त्या उन्हात अभंग ऐकत ...ऊवा शोधण्याचा कार्यक्रम ..हौदावर कुडकुडत थंड पाण्याने अंघोळ ..तोवर जेवणाची वेळ झालेली असे ..जेवणाच्या लाईनीत .. ..जास्तीच्या दोन तीन चपात्या मिळाव्या यासाठी धडपड ..पुन्हा दुपारची बंदी ....बराकीतच थंडगार जमिनीवर सतरंजी टाकून खालच्या फरशीचा गारवा सहन अनुभवत वामकुक्षी..दुपारी तीनला बंदी उघडली की ..सायंकाळच्या जेवणासाठी लाईन ..इकडे तिकडे तासभर गुन्हेगारीच्या एक से एक गप्पा - टप्पा ऐकत वेळ घालवणे ...पाचला बंदी झाली की मग बराकीत थाळ्या बडवत गाणी म्हणत बसणे...रात्री झोपताना पाय पोटाशी घेवून डोक्यावर ते जुनाट कांबळ घेवून त्याचा वास सहन करत ..त्याच्या आत श्वासांनी उब तयार करत ..विचार करत राहणे ..सगळे विचार थकले की केव्हातरी झोपी जाणे..सकाळी उठल्यावर हौदावर तोंड धुताना नाक शिंकरले की त्यातून श्वासासोबत नाकात ..घश्यात गेलेले त्या कंबळाचे सूक्ष्म तंतू ..बाहेर पडत ..ते पाहून कसेसेच होई ..एकदा उन्हात बसलो असताना ..एक शिपाई बाजूला वर्तमान पत्र वाचत उभा होता ....सहज त्यात डोकावलो ..आश्चर्य म्हणजे त्या आतल्या पानावर मी सुमारे महिन्यापूर्वी शैलेंद्र तनपुरे जवळ प्रकाशित करण्यासाठी दिलेला माझा ' ताण तणावांशी सामना ' हा लेख छापून आलेला .. हा लेख मी लिहिला आहे असे सांगितल्यावर त्या शिपायाचा आधी विश्वास बसला नाही ..मग त्याने माझ्या नावाची खात्री करून घेतल्यावर त्याला पटले ..तो माझ्याकडे जरा आदराने पाहू लागला ..पत्रकार आहे म्हणून मला मान देवू लागला ..ही बातमी बराकीत पसरली ...सर्व जण मला तेथे पत्रकार म्हणून ओळखू लागले ..या नव्या ओळखी मुळे ..मला जेवताना दोन चपात्या जास्त मिळण्यास मदत झाली ..या जास्तीच्या घेवून ठेवलेल्या चपात्या मी कागदात गुंडाळून ठेवत असे ..पहाटे चहा सोबत त्या कडक झालेल्या चपात्या खाता येत असत ..
त्याच काळात माझा एक गर्दुल्ला मित्र अशोक आमच्या समोरच्या बराकीत राहण्यास आला ..त्याला तीन महिन्यांची शिक्षा झाली होती ..हा अशोक पूर्वी जेल मध्ये किमान आठ दहा वेळा तरी आलेला होता ..किरकोळ चोऱ्या करणे ..रात्री एकट्या दुकट्या व्यक्तीला चाकू दाखवून लुटमार करणे वगैरे गुन्हे करत असे ..याचे टोपण नाव ' पिऱ्या ' असे होते ..पाच सहा वर्षे आधी त्याला ' मुक्तांगण ' मध्ये उपचार घेण्यासाठी मी प्रेरित केले होते ..रानडे साहेबांनी जमवलेल्या निधीतून त्याला काही आर्थिक मदतही मिळवून दिली होती ..त्यामुळे पिऱ्या मला चांगला मान देत असे ..सकाळी पिऱ्या भिशीत ( जेलचे स्वयंपाक घर ) कामासाठी जाई ..तेथून जास्तीच्या चपात्या ..बिड्या आणत असे ..पिऱ्या ने माझी बदली त्याच्या बराकीत करून घेतली ..तेथे मला स्पेशल जागा मिळाली झोपायला ..त्या बराकीत ..शंकर भाई या मुंबईच्या दादाची टोळी होती ..शंकरभाई आणि त्याचे तीन चार साथीदार ....' मकोका ' खाली ते लोक आतमध्ये होते ...शंकरभाई अगदी वरच्या दर्जाचा नसला तरी मुंबईतील मध्यम दर्जाचा भाई..हप्ता वसुली ..अपहरण ..खंडणी वसुली अश्या गुन्ह्यात सामील असे ...त्यांच्याशी ओळख झाल्यावर त्यांच्या हंडीत बनलेला चहा मिळू लागला ...तसेच तीनचार दिवसांनी एखादे वेळी ..गांजाचे दम मारायला मिळत ..एकंदरीत आता चांगला जम बसला होता माझा..आठवड्यातून दोन वेळा जेलरचा राउंड असे ..त्यावेळी सगळ्या कैद्यांना बराकी समोरच्या मोकळ्या जागेत उभे करत ..सुमारे अर्धा तास आधी पासून सर्वाना ' सावधान ' च्या पोझ मध्ये उभे करून ठेवले जाई ..जेलर आला की ..एकेका कैद्या जवळ जाई ..त्याचे निरीक्षण करून मग पुढे सरके ..या प्रसंगी मला हटकून ' शोले ' मधील जेलरची आठवण होत असे ...काही कैदी जेलर जवळ किरकोळ तक्रारी करत असत ..बहुधा एकच तक्रार असे ..ती म्हणजे पार्टी लागली नाही ..जामीन झाला नाही ..जेलर अश्या तक्रारींना फक्त मान डोलवून ..पाहू ..बघू ..अशी उत्तरे देई ...एखादा जास्त मागे लागला तर ..त्याला ' इथे तुला काय कमी आहे ? जेवण मिळतेय ना रोजच्या रोज ..मग कशाला बाहेर जायचे ' असे उत्तर देवून चूप करत असे ..
असाच जेलारचा राउंड सुरु असताना ...माझ्या पुढून जेलर जेमतेम दहा पावले पुढे गेल्यावर आमच्याच बराकीतील एका कैद्याने ..दोन महिने झाले पार्टी लागली नाही ..अशी तक्रार केली ..जेलरने त्याला ' जेवण मिळतेय ना ? ' असे छापील उत्तर दिले ..अचानक त्या कैद्याने ..शिव्या देत ..मोठ्याने ओरडत जेलरवर हल्ला केला ..या अनपेक्षित हल्ल्याने जेलर गोंधळाला ..काही लक्षात येपर्यंत जेलरने दोन चार थपडा खाल्ल्या होत्या ..मग जेलर सोबत असलेले संत्री सावध झाले ...त्या कैद्याला पकडण्यात आले ..त्याला मारझोड सुरु झाली ..पाच सहा जण मिळून लाथाबुक्क्यांनी तुडवत होते त्या कैद्याला ..त्यांनी त्याला उचलून सर्कलच्या बाहेर नेले ...जेलरही अपमानित मुद्रेने बाहेर गेला ..सगळे कैदी त्या कैद्याच्या धैर्याचे कौतुक करत होते ..' क्या डेरिंगबाज है साला ..अच्छा किया उसने ' वगैरे चर्चा चालली होती ..मला आता त्या कैद्याचे पुढे काय होईल याची काळजी लागलेली होती ..विलास असे त्याचे नाव होते हे समजले ..एक जण म्हणाला त्याला आता दुसऱ्या सर्कल मध्ये दंडाबेडी लावून ठोकतील ..अर्धमेला करतील वगैरे ...एक दोन दिवस हीच चर्चा होती सगळीकडे ..मग तिसऱ्या दिवशी पिऱ्याने बातमी आणली की विलासचे डेरिंग पाहून त्याला दाउदच्या टोळीतील भाई लोकांनी त्यांच्या बराकीत बदली करून घेतले आहे ..तो मस्त भाई बनेल आता ...त्याच्या घरी महिन्याला ठराविक रक्कम पोचवली जाईल ..हे भाई लोक अश्या डेरिंगबाज तरुणाच्या शोधात असतात ..त्याला लगेच टोळीत सामील करून घेतले जाते ..गुन्हेगारीचे व्यवस्थित प्रशिक्षण दिले जाते ..त्यातूनच ' शुटर' निर्माण होतात .
( बाकी पुढील भागात )
======================================================================
मेरे हमसफर ! ( पर्व दुसरे -भाग १२४ वा )
जरी मी अगदी सराईतपणे जेलमध्ये वावरत होतो तरी अंतर्मनातून मी खूप अवस्थ असे ..हे माझे नेहमीचेच आहे ...अंतर्मनात नेहमीच ...अनेक प्रश्न ..विविध प्रकारची असुरक्षितता ..अविवेकी भावना यांचा कल्लोळ माजलेला असतो ..अगदी क्वचितच माझ्या वर्तनातून इतरांना हे जाणवते ..आठवत असल्यापासून ही अवस्थताच नेहमी मला असमाधानी ठेवण्याचे काम इमानइतबारे करत आली आहे ....व्यसनमुक्तीच्या काळात ही अवस्थता वाढलेली असते ..कारण व्यसन करत असताना नशेत काही काळ सर्व काही विसरल्यासारखे होई ...नशा उतरली की पुन्हा नशा कशी मिळवावी याच विचारात वेळ जाई ..व्यसनमुक्त राहताना शांत ..समाधानी ..प्रसन्न कसे रहावे हे समजत नसे ..इथे जेलमध्ये जरी अधूनमधून मला गांजाचे एकदोन दम मारायला मिळत होते ...तरी त्याची खात्री नसे ..अवलंबित्व देखील नव्हते ... मिळाले तर ठीक नाहीतर राहू दे ..अश्या वृत्तीने मी चिलीम ओढण्यात सामील होई .. अंशतः व्यसन सुरु होते ..तरीही हवी तशी नशा करत नव्हतो ....त्यामुळे मनाचा एक कोपरा सतत भविष्यकाळातील असंख्य संभावना आणि समस्या यांनी त्रस्त राही ..व्यसनमुक्त रहात असताना जर ही अवस्थता संपवता आली नाही तर वारंवार व्यसन सुरु होण्याचा धोका असतोच ...अशा वेळी जीवनावर श्रद्धा ठेवून ..जास्त पुढचा विचार करून चिंतीत होण्याऐवजी किवा भूतकाळातील चुकांबद्दल....गमावलेल्या संधींबद्दल..केलेल्या नुकसानाबद्दल अपराधीपणाची भावना जोपासण्यापेक्षा ..योग्य जाणीव ठेवून वर्तमानातले वास्तव स्वीकारून ...कोणातरी समंजस व्यक्तीकडे मनमोकळे बोलून ..जास्तीत जास्त सकारात्मक कामात मनाला गुंतवून ठेवावे ..असे मुक्तांगण मध्ये शिकवले जाई ... अर्थात मुक्तांगण मध्ये शिकवले गेलेले बाहेर पडल्यावर लक्षात ठेवणे जरी सोपे वाटले तरी ते अमलात आणणे मात्र खूप कठीण असते ...त्यासाठी सतत या आजाराबद्दल सावध ..सतर्क ..खबरदार रहाणे गरजेचे असते ..अति आत्मविश्वास ..स्वतची बुद्धी ..पैसा व इतर बाबतीत असलेल्या अहंकारावर सतत अंकुश ठेवावा लागतो ..मगच भावनिक पातळीवर स्थिर राहता येते ...नाहीतर पुन्हा व्यसनाची गुलामी येतेच .
पहाटे गाढ झोपेत असताना बराकीत एकदम बराच गोंधळ झाल्याचा आवाज आला ...जेवणाच्या मोठ्या भांड्यांचा आवाज ऐकून मी देखील उठून बसलो जागेवर ..पाहतो तर बराकीच्या एका कोपऱ्यात दहाबारा कैदी गोल टोपी घालून वज्रासनात असल्यासारखे बसलेले ...एकमेकांशी न बोलता काहीतरी पुटपुटत होते ..मग सगळ्यांनी तोंडावर हात फिरवले ..उठून उभे राहिले ...बाहेरून बराकीचा दरवाजा उघडला गेला ..बहुधा पहाटेचे पाच वाजून गेले असावेत ..ते सगळे कैदी बराकीच्या दरवाजा जवळ जाऊन आपल्या थाळीत जेवण घेत होते ..पॉट मध्ये चहा देखील घेतला त्यांनी ....मी बाजूच्या कैद्याला इशाऱ्याने काय प्रकार आहे असे विचारले तर उत्तर मिळाले ' आज से ' रोजा ' शुरू हो गया है ' ..त्या वर्षी दिवाळी नंतर रमजान महिना आला होता ..बहुतेक अधिक महिना होता त्यावर्षी ..म्हणून ' रोजे ' एरवीपेक्षा उशिरा सुरु झालेले ...बराकीतील मुस्लीम कैद्यांनी आपापल्या थाळीत जेवण घेवून ते कोपऱ्यात जावून एकत्र जेवण करू लागले ..जेल प्रशासना तर्फे प्रत्येक रमजान महिन्यात रोजे ठेवणाऱ्या कैद्यांना पहाटेची नमाज झाली की जेवण देण्याची सोय केली जात असे असे समजले ..मग दिवसभर हे कैदी काहीही खात नसत ..संपूर्ण उपास ...अगदी थुंकी सुद्धा गिळायची नाही ..कोणतीही व्यसने करायची नाहीत ..या काळात केवळ ' अल्ला ' चे स्मरण केले जाते ...असे पूर्वी कादर कडून समजले होते .. जेलमध्ये सुद्धा हा प्रकार असेल असे वाटले नव्हते ..यालाच आपल्या संविधानातील सहिष्णुता म्हणत असावेत ..सर्व धर्मियांच्या भावनांचा आदर करणे ..त्यांना त्याच्या धर्माचे पालन करण्यासाठी सहकार्य करणे ..किती सुंदर विचार होता या मागे ..धार्मिक स्वातंत्र्य ! देशातील प्रत्येक नागरिकाला तो मानत असलेल्या धर्माचे यथायोग्य पालन करण्याची मुभा ...इतर धर्मियांनी त्याच्या धर्मपालनात अडथळा उत्पन्न करू नये याची खबरदारी ..अर्थात सर्व धर्मियांनी जर संविधानातील या सहिष्णुतेचा अर्थ समजून घेतला तर ..धार्मिक दंगली होणारच नाहीत ..मग हिंदू श्रेष्ठ ..मुस्लीम श्रेष्ठ ..ख्रिस्चन श्रेष्ठ ...बौध श्रेष्ठ कि जैन श्रेष्ठ हा वाद नकोच ....प्रत्येकाने आपापल्या धर्माचे पालन करावे ...इतर धर्मांना दोष न देता ..त्यांच्या धर्माची ते दुखावले जातील अशी चिकित्सा न करता .. ' जगा आणि जगू द्या ' ! जेथे जेथे शोषण ..अंधश्रद्धा ..अन्याय असेल तेथे सर्व सहमतीने सुधारणा !
एव्हाना बराकीतल सगळे कैदी आवाजाने जागे झाले होते ..थंडीमुळे सगळे आपापल्या जागी कांबळे पांघरून बसलेले ..तितक्यात बाहेरून गाण्याचा आवाज कानी पडला ..सगळीकडे असलेल्या निरव शांततेत तो आवाज चांगलाच गहिरा वाटत होता ' किसी राह मे ..किसी मोडपर ..कही चल ना देना तू छोंडकर ..मेरे हमसफर ..मेरे हमसफर ' मुकेश आणि लता मंगेशकरने हे युगुलगीत ...आपल्या आवाजांनी शब्द अक्षरशः जिवंत केलेत गायकांनी ...बराकीच्या बाहेर व्हरांड्यात कोणीतरी कैदी हे गाणे म्हणत होता ..पहाटेच्या वेळी ..त्याचा करुण स्वर ..मनात सुरी फिरवत होता ..मी कान देवून गाणे ऐकू लागलो ....तसतसा अधिक हळवा होत गेलो ...आधी अनघा ..नंतर मानसी ..यांची तीव्र आठवण ...विरहाची टोकदार जाणीव ...कुठे असेल आता अनघा ..मानसी ..चित्रपटात जसे एखाद्या विरह गीताच्या वेळी नायक किवा नायीकेच्या डोळ्यासमोरून जशी त्यांच्या पहिल्या भेटीची ..प्रेमाची ..सहजीवनाची क्षणचित्रे सरकताना दाखवली जातात ..अगदी तसेच झाले माझे ..झरझर सारा भूतकाळ मनातून काटेरी आठवणी जागवत सरकत गेला ...मानसी बिचारी आता लहानग्या सुमितला कुशीत घेवून झोपली असेल ..रात्री खूप वेळ जागी राहिली असावी ..माझ्यामुळे तिच्यावर आलेली ही परिस्थिती कशी बरे स्वीकारली असावी तिने ? असे जीवाला चटका लावून एखाद्याचे जीवनातून निघून जाणे किती वेदनामय असते ..त्याच वेळी ...कोण जाणे ' चोरी चोरी ' या सिनेमातील ' रसिक बलमा .....हाये ..दिल क्यू लगाया तोसे ..दिल क्यू लगाया ' हे गाणे देखील आठवले ...मी कांबळाच्या आत तोंड लपवून ढसढसा रडू लागलो !
( बाकी पुढील भागात )
====================================================================
समलिंगी ? ? ? ( पर्व दुसरे -भाग १२५ वा )
मी जेलमधल्या वास्तव्यात किमान चारदा तरी रडलो होतो ..अगदी मनापासून ..स्वतच्या कर्माला दोष देत होतो ..जे काही घडले आहे त्याला केवळ माझे वागणेच जवाबदार आहे ही भावना पक्की झाली होती ...पूर्वी मी नेहमी माझ्यावर आलेली संकटे माझे दुखः ... माझे अपयश ...माझे होत असणारे नुकसान यांना आसपासचे लोक ...ओढवलेली परिस्थिती...माझे नशीब ..दैव ..यांना जवाबदार ठरवत होतो ..बहुधा प्रत्येक व्यसनी व्यक्ती असेच करत असतो ...आपले व्यसन ..त्या व्यसनामुळे आपले बिघडलेले विचार आणि वर्तन यांना दोष देण्याएवजी तो सगळा दोष इतरांच्या माथी मारतो ..कदाचित स्वतःच्या अहंकाराला सुखावण्यासाठी असे होत असावे किवा व्यसनाच्या समर्थनासाठी असे घडत असावे ...अनेक व्यसनी मित्र मला माहित आहेत जे व्यसन केला असताना झालेल्या अपघातात देखील स्वतःची चूक आहे असे मान्य करू इच्छित नसतात ..रस्ताच खराब आहे तो ..अचानक कुत्रे मध्ये आले ..समोरचा माणूस एकदम अंगावर आला ...वगैरे कारणे देतात ...व्यसन केल्यामुळे माझे रिफ्लेक्सेस कमी झाले असावेत हे काही मान्य करता येत नाही..किवा जर व्यसन न केलेल्या अवस्थेत अपघात झाला असला तर काल केलेल्या व्यसनामुळे माझा आत्मविश्वास कमी झाला असावा ..शारीरिक क्षमता वाहन चालवण्या इतपत योग्य नसावी हे तो काही केल्या काबुल करत नाही ....त्याचप्रमाणे व्यसनामुळे किवा व्यसनाची गुलामीची अवस्था आल्यानंतर प्रत्येकाने आपल्या मनात अनेक गाठी मारून ठेवलेल्या असतात ..या गाठी म्हणजे त्याच्यावर झालेला अन्याय ..इतरांनी केलेला अपमान ...नाकारण्यात आलेल्या संधी ..अपयश ...प्रेमभंग ..जवळच्या व्यक्तीचे त्रासदायक वर्तन ...अशा प्रकारच्या असतात ...प्रत्येकवेळी व्यसनाचे समर्थन म्हणून तो या गाठी वापरतो ...या गाठी सुटणे ..सोडवणे आवश्यक असते ...अन्यथा काही काळच्या व्यसनमुक्ती नंतर ...या मनातल्या गाठी किवा वैचारिक..भावनिक गुंते ..पुन्हा व्यसनाकडे नेतात ..काही अपवादात्मक घटना वगळता व्यसनाच्या गुलामीला ..वारंवार व्यसन सुरु होण्यास ..व्यसनामुळे झालेल्या नुकसानास ..केवळ मीच जवाबदार आहे तसेच पुन्हा व्यसन न करण्याची ..व्यसनमुक्तीची ...जवाबदारी देखील माझीच आहे ...ही जाणीव झाल्याखेरीज कायमची व्यसनमुक्ती अवघड होऊन बसते .
माझ्याबाबतीत देखील असेच घडत होते ..अगदी सुरवातीला केवळ मौज मस्ती ..कुतूहल म्हणून सुरु झालेले व्यसन नंतर प्रेमभंगाचे दुखः... या कारणाने सुरु राहिले ... अनघा जीवनात आल्यावर माझ्या मनाविरुद्ध असणारे मोठ्या भावाचे वर्तन ..भविष्यातील चिंता ...या कारणांनी व्यसन सुरूच राहिले ..नंतर अनघाला गमावण्याचे दुखः ...पुढे सुमारे तीन वर्षे चांगला व्यसनमुक्त राहिल्यानंतर ..एकदा व्यसन केल्यास काही हरकत नाही हा अहंकार ..त्यामुळे पुन्हा झालेली सुरवात ..मग त्यातच चारपाच वर्षे घालविल्यानंतर ..लग्न होऊन मानसी जीवनात आल्यानंतर ..तेच एखादे वेळी करण्यास काही हरकत नाही ही मूर्खपणाची भावना ...एकदा म्हणून करायला गेलो की त्यात पुन्हा अडकणे ..मग इतरांना ..परिस्थितीला ..नशिबाला दोष देत राहणे ...जेलमध्ये अतिशय प्रतिकूल वातावरणात मी असे परखड आत्मपरीक्षण करत होतो ...कायमच्या व्यसनमुक्तीसाठी हे परखड आत्मपरीक्षण नक्कीच मदत करू शकते ..जेलमध्ये माझे वास्तव्य वाढत चालले होते ..आधी पंधरा दिवस मिळालेली मँजिस्ट्रेट कस्टडी पंधरा दिवसांनी कोर्टात न्यायला पार्टी नाही म्हणून आणखी पंधरा दिवस लांबली ..पुन्हा पंधरा दिवसांनी पार्टी नाही याच कारणांनी अजून पंधरा दिवस लांबली ..म्हणजे मला आता जेलमध्ये येवून एक महिना उलटून गेला होता ...माझ्या सारखेच मँजिस्ट्रेट कस्टडी मिळालेले अनेक जण असेच होते ..ज्यांचा येथे राहण्याचा कालावधी काही ना काही कारणाने वाढला होता .. सराईत लोक म्हणत इथे खरी सजा असते ती फक्त लैंगिक इच्छेला ..बाकी सगळे मिळते पैसे असले की ..म्हणजे चांगले जेवण ..झोपण्याची उत्तम व्यवस्था ....भाई लोकांना तर दारू ..गांजा ..ब्राऊन शुगर सारखी व्यसनेही सहजगत्या उपलब्ध होतात ....मात्र जेलमध्ये लैंगिक इच्छापूर्ती होण्यासाठी स्त्री जोडीदार मिळणे मात्र अशक्य असते ..त्यासाठी आजारी पडायचे नाटक करून ..डॉक्टरला ..जेलरला पैसे खावू घालून ..बाहेरच्या दवाखान्यात जायचे ..तेथून मग हवे ते करायचे ..अशी पद्धत होती ...शिक्षा भोगत असलेले जुने कैदी ..हस्तमैथुन हा पर्याय वापरात .मात्र हस्तमैथुना बाबत अनेक प्रकारचे गैरसमज असल्याने काही रंगदार कैदी ...किवा वार्डन ..जेलमध्ये आलेल्या नाजूक प्रकृतीच्या ..घाबरट कैद्यांना ...बिडीकाडी..पोटभर जेवण ..इतर सुविधा उपलब्ध करून देवून त्या बदल्यात समलैंगिक संबंध ठेवत असत त्यांच्याशी ..माझ्या बराकीत असाच एक तरुण कैदी होता ..चोरीच्या गुन्ह्यात येथे अडकलेला..त्याला वार्डनने स्वतःजवळ झोपायला जागा दिली होती ....रात्री सगळे झोपल्यावर केव्हातरी वार्डन त्याच्या पांघरुणात शिरत असे .
त्या कैद्याच्या हावभावावरून तरी तो बायकी प्रवृत्तीचा वाटत नव्हता ..सर्वसाधारण पुरुषांप्रमाणेच त्याचे वागणे होते ..केवळ मिळणाऱ्या सवलतीपोटी तो वार्डनशी असे संबंध ठेवण्यास तयार झाला असावा असे दिसत होते ...पूर्वी मी डॉ . गौड यांचे सोबत ' एड्स प्रतिबंध ' कार्यात सामील असतांना ..समलिंगी संबंधाबाबत थोडीफार माहिती घेतली होती ..काही लोक हार्मोन्सच्या ( संप्रेरक) असंतुलनामुळे जन्मतः असे बायकी प्रवृत्तीचे असू शकतात ...किवा वरवर स्त्रिया दिसणाऱ्या देखील हार्मोन्सच्या असंतुलनामुळे पुरुषासारख्या रांगड्या असतात हे माहित होते ...इथे तसा प्रकार नव्हता ..केवळ लैंगिक उपासमार हे एकमेव कारण होते या समलैंगिक संबंधासाठी ...त्या कैद्याला केवळ स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी वार्डनशी असले संबंध ठेवावे लागत होते ...एकदा अशी गुदामैथुन करून घेण्याची सवय लागली की पुढे सर्वसामान्य लैंगिक संबंध ठेवणे त्या व्यक्तीसाठी अवघड होऊन बसते ..गुदमैथुन करून घेतल्याखेरीज त्याला लैंगिक उत्तेजना येत नाही असे मी ऐकून होतो ..म्हणजे त्या वार्डनने स्वतच्या लैंगिक उपासमारी वर शोधलेला पर्याय हा त्या तरुण कैद्याच्या जीवनाचे वाटोळे करणारा होता ...सिन्नरफाटयाला राहत असताना असे एकदोन जण मला माहित होते ..जे अश्या समलैंगिक संबंधांची चटक लागलेले होते ...बाकी सगळे काही सर्व साधारण असताना देखील केवळ लहानपणी त्यांना कोणीतरी लैंगिक उपासमारीवर उपाय म्हणून वापरून घेतले होते ..नंतर वयात आल्यानंतर ते याच प्रकारच्या संबंधात रस घेवू लागले होते ..बालकांचे लैंगिक शोषण ही एक मोठीच समस्या बनली आहे ..केवळ मुलीलाच नाही तर लहान मुलांनाही जपावे लागते हेच यावरून स्पष्ट होते ...बाराकीतल्या त्या तरुणाची पुढे दुसऱ्या बराकीतील वार्डनने आपल्या बराकीत बदली करून घेतली ..याच कारणासाठी ...चारपाच दिवसांनी त्या मुलाची पुन्हा ..नाविन बराकीत बदली झाली ..म्हणजे तो तरुण जणू याच कारणासाठी वापरला जात होता ..जगभरातील जेलमध्ये असे कितीतरी तरुण असतील ..जे शास्त्रीय दृष्ट्या पूर्णपुरूष आहेत ..मात्र केवळ नाईलाजाने त्यांना अश्या समलैंगिक संबंधाना सामोरे जावे लागत होते ..शिवाय येथे कंडोम वगैरेचा वापर होणे कठीणच असते ..त्यामुळे गुप्तरोग व एच .आय .व्ही ची बाधा होणे सहज शक्य असते .
( बाकी पुढील भागात )
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें