रविवार, 22 दिसंबर 2013

कैदी नंबर ....!



कैदी नंबर ....! ( पर्व दुसरे -भाग १११ )


सेन्ट्रल जेल समोर ऑटो थांबला ..जेलच्या त्या मोठ्या दरवाजासमोर आम्ही उभे होतो ..सायंकाळचे पाच वाजत आलेले होते ....माझ्या सोबतच्या एका पोलिसाने दरवाजा जवळ जावून त्याच्या हातातील कागदपत्रे तेथील पहारेकऱ्याला दाखवली ..त्याच्या हाती सुपूर्द केली ..म्हणजे आता माझे हस्तांतर होत होते ..महाराष्ट्र पोलिसांकडून जेलच्या पोलिसांकडे ..मग मला त्या गेटच्या आत नेण्यात आले ...बाहेरचे जग पाठीमागे पडले ...आत हत्यारबंद शिपाई होते ...एक छोटेसे टेबल मांडून त्यापाशी एक वयस्कर व्यक्ती बसलेली ...माझी कागदपत्रे त्यांनी व्यवस्थित पहिली ..मग ' ४९८ काय रे ' ...असे म्हणत माझ्याकडे उपहासाने पहिले ..म्हणाला ' साल्या तुझ्या .....दम असेल तर ....बाहेर दाखव तुझी मस्ती ... मोठ्या गुंडांना दे त्रास ..घरच्या लक्ष्मीला काय सतावतोस ? ' मी निमुटपणे खाली मान घालून त्याच्या शिव्या ऐकत राहिलो ....डोळ्यात पाणी तरळले ..ते पाहून परत ओरडला माझ्यावर ' ही रडण्याची नाटकं कोणाला दाखवतोस ? घरची बाई रडली तेव्हा आली का रे भडव्या तुला तिची दया ' त्याला काही उत्तर देणे म्हणजे मार खाणे हे मी उमगलो ..गुपचूप तसाच उभा राहिलो ..मग त्याने माझी झडती घेतली ..खिश्यात असलेल्या चारपाच बिड्या माचीस काढून त्याच्या टेबलावर ठेवली ..तब्येत बरीच खालावलेली असल्याने सैल होत असलेल्या पँटला मी पट्टा लावला होता ..तो पट्टा काढून घेतला त्याने ..पट्टा काढताच पँट कमरेखाली घसरू लागली ..ते पाहून म्हणाला ' हालत बघ काय झालीय तुझी ' स्वतःशीच हसला ..मी केविलवाणा चेहरा करून त्याला पट्टा राहू द्या माझ्याकडेच अशी विनंती केल्यावर ..त्याने मला पट्टा परत केला ..मी बिड्या देखील मागुन घेतल्या ....माचीस मात्र त्याने दिली नाही ...त्याच्या जवळील रजिस्टरवर माझ्या नावाची नोंद केली .. तेथून एकाने मला आत नेले ...आत खूप विस्तीर्ण परिसर गेटच्या आतल्या बाजूने ..उंच भिंताला लागून तीन चार खोल्या होत्या ..त्यातील एका खोलीत मला नेले गेले ..तेथे एकाने माझ्या हातात एक अल्युमिनियमची खोलगट थाळी ..एक तसाच अल्युमिनियमचा धरायला दांडी असलेला मग दिला...बाजूला व्यवस्थित रचून ठेवलेल्या सतरंज्या आणि कांबळी यांच्या ठीग होता ..त्यातून एक सतरंजी ..एक जाडसर कांबळ दिले ...त्या सगळ्या वस्तू हातात धरताना माझी तारांबळ होत होती ..तेव्हा ' गांडो ..असे नाही नीट धर ' म्हणत एकाने ती साधारण दोन फुट रुंद साडेपाच फुट लांब सतरंजी खाली मला जमिनीवर पसरायला लावली .. त्यावर ते कांबळे नीट पसरून ठेवायला लावले ..एक काथ्या भरलेली टोचणारी उशी माझ्या हाती देवून ..त्यावर ठेवायला लावली .. ती गुंडाळी करून घ्यायला सांगितले ..म्हणजे बेडींग करतात तसे .. गुंडाळी माझ्या काखेत धरायला लावली ..त्याच हातात थाळी पॉट कसा धरायचा ते शिकवले ...म्हणाला '' या वस्तू सांभाळून ठेवायच्या ..हरवल्या तर परत मिळणार नाहीत ' मी होकारार्थी मान हलवली तेथून आमची वरात निघाली पुढे ....

एका ठिकाणी मध्यम उंचीची भिंत असलेला अजून एक दरवाजा लागला ..त्यावर सर्कल नंबर १ असे लिहिले होते ..दरवाजा अर्धवट उघडाच होता ..त्यातून आम्ही आत शिरलो ..आत समोर मोकळी जागा ..आणि बाजूने दोन मोठ्या बैठ्या इमारती ...त्याला बँरक ( बराक ) म्हणता हे नंतर समजले ..त्यातील एका बराक मध्ये लोखंडी जाड गजांच्या बंद दाराजवळ जावून त्याने हातातील दांड्याने त्या दारावर वाजवले ..आतून एक कैद्याचा परंतु जरा वेगळा वाटणारा ड्रेस घातलेल्या एका माणसाने दाराला आतून लावलेली कडी काढली ..मला आत घेतले ..आत मध्ये सुमारे पन्नास साठ सध्या वेशातील कैदी भिंतीला उकिडवे टेकून बसलेले .. दार उघडणाऱ्याने ( त्यांना वार्डन म्हणतात हे नंतर समजले ) मला इशारा करून एका भिंतीपाशी त्या कैद्यांसारखेचे उकिडवा बसायला सांगितले ..मी निमुटपणे बसून राहिलो ..माझी बँरक मध्ये रवानगी झाल्यावर माझी जेल प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली असावी ..कारण दार परत बंद झाले ..यावेळी ते दार मला घेवून येणाऱ्या शिपायाने बाहेरून कुलुपबंद केले होते ..बहुतेक कैदी माझ्या सारखेच नवखे असावेत असे वाटले ..कारण ते सारे अगदी केविलवाणे चेहेरे करून बसलेले ..मला जाणवले की मेंटल हॉस्पिटल मध्ये नवख्या पेशंटना सर्वात आधी जसे आँबझर्व्हेशन वार्ड मध्ये ठेवतात तसे हे होते ..नंतर दोन तीन दिवसांनी मला दुस-या ठिकाणी हलवले जाईल ..आता सगळ्या घडल्या घटनांचा विचार करत बसलो ..सगळे काही अनपेक्षित झाले होते ..काय घडतेय याचा नीट विचार करेपर्यंत मी जेलमध्ये पोचलो होतो ..घरचे लोक अशी भूमिका घेतील हे कधी स्वप्नात देखील वाटले नव्हते मला ..अर्थात त्यांच्या नाकापर्यंत पाणी आल्यामुळेच त्यांनी हे केले असावे यात शंकाच नव्हती ..खाजगी दवाखाना ..मेंटल हॉस्पिटल ..व्यसनमुक्ती केंद्र ..असे सगळे प्रयत्न माझ्या सुधारणेसाठी करून झाल्यावर देखील मी पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका करत होतो ..दिवसेंदिवस माझे नैतिक अधःपतन वाढतच चालले होते ..पोलिसांची मदत घेणे हा एकमात्र पर्याय उरला होता त्यांच्याकडे ..चूक माझीच आहे हे मनाला पटत होते ..पण ते पचवता येत नव्हते ..मला एकदा तरी त्यांनी सावध करायला हवे होते ..असे उगाच वाटत राहिले ..

थंडीचे दिवस असल्याने बाहेर लवकर अंधारले होते ..बराकीच्या पाच फुट उंच भिंतीच्या वरच्या बाजूला लावलेल्या गजातून थंड वाऱ्याचे झोत आत येत होते..आतले बहुतेक कैदी आता आपापला बिछाना पसरून त्यावर कांबळे पांघरून बसलेले ..मी देखील माझे बेडींग ( बिस्तर ) उघडले ..सतरंजी भिंतीला टेकून पसरली ..कांबळे पांघरून भिंतीला टेकून बसून राहिलो ..बराकीच्या एका मोठ्या भागात सगळे कैदी ..तर साधारण पाच फुट अंतर सोडून उरलेल्या भागात विशेष वेषातील दोन वार्डन आणि त्यांच्या सोबत इतर चार जण बसलेले होते ..जरा वेळाने एका वार्डनने हातावर काहीतरी घेवून ते जरा निवडल्यासारखे केले ..मग चिलीम काढली ..माझे डोळे चमकले ..बहुतेक गांजा ओढणार होते ते लोक ..तसेच झाले ..चिलीम भरून पेटवली गेली ..दम मारणे सुरु झाले ..गांजाच्या वास पसरला सगळीकडे ....मला टर्की सुरु झालेलीच होती ..वाटले आपणही यांच्याकडे एक दम मागवा गांजाचा ..हळूच उठून मी त्यांच्याजवळ जावू लागताच त्यांच्यातील एक जण उठला ..माझ्याजवळ आला माझ्या एक मुस्कटात लावली ..' माद..... खबरदार आपल्या जागेवरून उठलास तर .' त्याने मला खास शिव्या हासडल्या ..आई वरून शिवी ऐकून माझे टाळके सटकले ..मी त्याला भिडलो ..तेवढ्यात त्याचे अजून साथीदार पुढे आले ते सगळे मला भिडले ...लाथाबुक्यांनी तुडवू लागले मला ..शेवटी माझा प्रतिकार संपला ..तसाच निपचित पडून राहिलो ..माझी कीव आल्यावर त्यांनी मला सोडले ..' फिर हमारे पास आया तो और मार खायेगा ' अशी धमकी देवून पुन्हा त्यांच्या जागेवर जावून गांजा ओढत बसले ..अपमानित झालो होतो खूप ..उठून सरकत पुन्हा माझ्या जागेवर गेलो ..भिंतीला टेकून बसलो ..

( बाकी पुढील भागात )

================================================================

पांगळा ? ? ?  ( पर्व दुसरे -भाग ११२ वा )

रात्रभर तसाच भिंतीला टेकून बसून राहिलो ..थंडी होती म्हणून कांबळे गुंडाळून घेतले होते अंगाला ....वार्डन आणि त्याचे मित्र बराच वेळ ..गांजा ओढत होते ..नंतर ते देखील झोपले ..त्यांच्यातला एक फक्त जागा राहिला बराक मधील कैद्यांवर पहारा ठेवण्यासाठी ..टर्की सुरु असल्यामुळे ...मी प्रचंड अवस्थ होतो ....त्यात काल वार्डन कडून विनाकारण मार खाल्ल्यामुळे झालेला अपमान टोचत होता ..घरच्या मंडळींचा प्रचंड राग येवू लागला होता ..मला कधी असे अडकवले जाईल असे वाटले नव्हते ..कसेही करून इथून सुटका करून घेतली पाहिजे असा विचार मनात सुरु होता ..पण आत येताना असलेले पहारेकरी ..प्रचंड मोठ्या भिंती ..सगळा कडेकोट बंदोबस्त होता ..कसे बरे बाहेर पडावे ..मला पँपिलाँन कादंबरीतील हेन्री आठवला ..त्याने जेलमधून पळून जाण्यासाठी केलेल्या एकेक युक्त्या आठवल्या ...काहीतरी कल्पना करत ..बिड्या ओढत टाइम पास करत होतो खरा ...येथे जेव्हा एखाद्या कैद्याला रात्री लाघवी किवा संडासला उठायचे असे तेव्हा तो ..आधी बसल्या जागेवरून पहारा करणाऱ्याकडे पाहून जोरात ओरडून सांगे ..पेशाब ..किवा संडास ..असे सांगितले नाही तर तो पहारेकरी लगेच दंड्याने फटके देत असे ..कारण तुम्ही असे उठण्याचे कारण न सांगता आपल्या जागेवरून निर्हेतुक उठूण्यास सक्त मनाई होती ...पहाटे पहाटे एकदम बाहेरून ' जय श्रीराम ' ..बजरंगबली की जय ' अशा मोठ्याने दिलेल्या घोषणा ऐकू आल्या ..नंतर थोड्याच वेळात ..' अल्ला हो अकबर ' अशा ही घोषणा ऐकू आल्या ....बराच वेळ असे घोषणा युद्ध सुरु राहिले ..मग वार्डन साडेपाचला उठल्यावर त्याने गिनती असा पुकारा केला ..तसे सगळे कैदी एकमेकांचा हात धरून जोडीने खाली बसले ..मी पण एकाचा हात पकडला होता ..बाहेरून कुलूप काढल्याचा आवाज आला ..गरम ओव्हरकोट घातलेले दोन शिपाई आत आले ..त्यांनी सगळे कैदी मोजले ..मग ते बाहेरून कुलूप लावून गेले ...बराकमधील सगळे कैदी आपापले बिस्तर गुंडाळून कांबळे पांघरून भिंतीला टेकून बसले ....बाहेर थोडे फटफटत असताना बाहेरून कुलूप काढले गेले ....सगळे कैदी बाहेर पडले ..बंदी खुलली होती ..जेल मध्ये सकाळी ६ ते दुपारी ११ पर्यंत बराक बाहेरच्या पटांगणात कैदी मोकळे असतात ..त्या वेळात ..चहा ..जेवण ..अंघोळी ..कपडे धुणे वगैरे कामे करण्यासाठी मोकळे सोडले जाई ..नंतर ११ ते ३ सगळे बराक मध्ये बंद ... पुन्हा दुपारी ..३ ते सायंकाळी ५ पर्यंत बंदी खुलत असे ..५ नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ पर्यंत बराक बंद ..असे टाईम टेबल आहे हे एकाने मला सांगितले ..बराक उघडल्यावर मी कांबळे गुंडाळून बाहेर आलो ..बाहेरच्या पटांगणात एक साधारण तीस फुट लांब आणि सहा फुट मोठा असा पाण्याचा कालवा होता ..म्हणजे त्या सिमेंटने बांधलेल्या खोलगट भागात ....मोठ्या नळाने पाणी सोडले जाई ..त्याच्या दोन्ही बाजूला काळ्या दगडांनी बांधकाम होते ज्यावर कैदी बसून खाली वाकून त्या कालव्यातून वाहणारे पाणी घेवून तोंड धुणे ..बादलीत पाणी भरून घेवून अंघोळी करणे वगैरे कामे करत असत ..त्याला हौद म्हणतात हे समजले ..

सगळे कैदी हौदावर तोंड धुवत होते ..तितक्यात बाजूच्या बराकीतून एकदम एक मोठा घोळका बाहेर पडला ..सुमारे १०० तरी लोक असावेत ..सगळे तरुण होते ..त्यांनी बाहेर पडल्यावर '' जय श्रीराम ' अशा घोषणा सुरु केल्या ...त्यांच्या घोषणा सुरु झाल्यार बाजूच्या सर्कल मधून 'अल्ला हो अकबर ' असा पुकारा सुरु झाला ....जरा चौकशी केल्यावर कळले की काल रात्री पासून मालेगाव मध्ये हिंदू -मुस्लीम दंगल सुरु झाली होती ... दंगलखोर लोकांना पकडून रात्री पासून येथे आणले जात होते ..घोषणा बाजीने वातावरण जरा वेळ तंग झाले होते ..मला बाहेर जास्तच थंडी वाजू लागली तसा मी पुन्हा बराक मध्ये जावून बसलो ....माझ्या बाजूला एक जण येवून बसला ...माझी विचारपूस करू लागला ..त्याने बहुधा रात्री मी मार खाल्लेला पहिला असावा ..बहोत मारते हे साले ..अशीच सुरवात केली त्याने ..पुढे म्हणाला ...मेरेको भी मारा था ..गप्पा मारताना कळले की तो कलकत्त्याचा होता ..ड्रायव्हर ...अपघाताच्या केसमध्ये बंद झाला होता ..त्याचा मालक लवकरच त्याचा जामीन करून त्याला सोडवणार होता ...मला मात्र जामीन मिळण्याची काहीही व्यवस्था नव्हती ..कारण घरच्या मंडळींनीच ..माझ्यावर केस केलेली ..जामीन देणार कोण ? हताशपणे बसून होतो ..बाहेर चहाचा पुकारा झाला ..तसा बाहेर जावून रांगेत उभा राहिलो ..दोन कैदी एका मोठ्या अल्युमिनियमच्या पातेल्यातून चहा वाटत होते ..जेमतेम कोमट असा चहा ..मगमध्ये चहा घेवून पुन्हा बराकीत ...येथून बाहेर कसे पडावे हाच विचार मनात होता ..एकाला विचारले की इथे जर कोणी आजारी वगैरे पडला ..किवा काही गंभीर अपघात झाला तर कैद्याला कुठे नेतात ? तेव्हा त्याने सांगितले की येथेच जेलचे हॉस्पिटल आहे दुसऱ्या सर्कल मध्ये ...तेथे नेतात ..आणि तेथे जर उपचार होण्यासारखा नसेल तर कैद्याला बंदोबस्त देवून बाहेर सिव्हील हॉस्पिटल मध्ये पाठवतात ..मला हीच माहिती हवी होती ....कसेही करून इथून बाहेर पडू ..नंतर पुढचे पाहू ....मी बराक मधील संडासचे निरीक्षण करून आलो होतो मघाच ..तेथे जमिनीवर पाणी सांडलेले होते ...एकच संडास होता ...एकूण ६० लोकांना मिळून ..मात्र स्वच्छ ..जरी सिरेमिकचे भांडे मोडके होते तरी संडास मात्र चांगलाच स्वच्छ वाटला ...पन्हा संडास जवळ गेलो ..आत कोणीतरी बसले होते ..आतील व्यक्ती बाहेर येण्याची वाट पाहत उभा राहिलो ..तो बाहेर पडतानाच पाय घसरून पडल्यासारखे नाटक करून त्याच्या अंगावरच पडलो ..तो एकदम घाबरला ..बाजूला सरकला ..मी खाली पडलो ..आणि मोठ्याने विव्हळू लागलो ...माझे ओरडणे ऐकून वार्डन आला संडासात ...मला हात देवून उठवू लागला ..मात्र मी मोठ्याने विव्हळत होतो ..उठताच येत नाही असे भासवत होतो ..मग मला दोघांनी ओढत बाहेर आणले ...मी जणू कमरेखाली पांगळाच झालोय असे नाटक करत होतो ...फक्त बसता येत होते ..बाकी उठून उभे राहणे ..चालणे तर अशक्यच ...

वार्डनचा चेहरा जरा चिंतीत झाला ...मी विव्हळत त्याला सांगितले की माझे पाठीच्या मणक्याचे आँपरेशन झाले होते ...तेथेच मार लागला आहे परत ..त्याने माझ्या पाठीवर पहिले ..टाके घातल्याची खुण होतीच ...तरीही त्याला खात्री वाटत नव्हती ..' होगा ठीक एक दो घंटेमे असे म्हणत त्याने मला तसाच ओढत भिंतीला टेकवून बसवले ..आता जेलचे डॉक्टर येवून मला तपासतील ..पाठीच्या मणक्याचे नाजूक काम असल्याने सी टी स्कँन किवा एक्स रे काढण्यासाठी मला बाहेरच्या हॉस्पिटल मध्ये न्यावेच लागेल यांना ..असा माझा अंदाज होता ..त्यानुसार समस्येची गंभीरता वाढावी म्हणून मी सारखा विव्हळत होतो ..मध्ये एकदा लघवीला जायचे म्हणून तसाच बुडावर सरकत सरकत पांगळ्यासारखा संडासकडे गेलो ...माझ्या कडे पाहून इतर कैदी हळहळत होते ..ज्यांनी काल रात्री मला मारताना पहिले होते ..त्यांना वाटे कालच्या रात्रीच्या मारामुळेच असे झाले असावे याला ..त्यापैकी एक म्हणाला ..अभी जमादार और डॉक्टर आयेगा तो ये वार्डन ने मारा है ऐसा बताओ ...मी नुसताच विव्हळत होतो ..माझी अवस्था पाहून रात्री मला मारणाऱ्या वार्डनने मला स्वतः पुन्हा थोडा चहा आणून दिला ..बिडी देखील पाजली ..बहुधा तो घाबरत असावा की मी पांगळा होण्याला त्याला जवाबदार ठरविन की काय ? मला हळूच म्हणाला देखील तो ..रातको तो हमने जादा नाही मारा था ....ये कमर का लफडा तो सबेरे तू गिर गया इसलिये हुवा है ' ...माझा प्लान चांगलाच प्रभावी ठरत होता ...

( बाकी पुढील भागात )

=====================================================================

जेलचे रुग्णालय ! ( पर्व दुसरे -भाग ११३ वा )

माझे कमरे खाली अधू झाल्याचे नाटक मी सुरूच ठेवले ..दुपारी दोन वाजेपर्यंत चार वेळा मुद्दाम संडासकडे बुडावर सरकतच गेलो ..तेथे खालची जमीन ओली होती .. पँट त्यामुळे सगळी मागून ओली झालेली ..मला पोलिसांनी अंगावरच्या कपड्यासहित घरातून उचलले होते ..तेथून थेट कोर्ट ..सेन्ट्रल जेल .असा प्रवास झाला असल्याने ..माझ्याकडे अंगावरच्या एक पँट ..बनियन ..अंडरवेअर ..टीशर्ट ..या खेरीज दुसरे कपडे नव्हतेच ..मँजिस्ट्रेट कस्टडी मिळालेल्या कैद्याला घरचे कपडे वापरता येतात ..ज्यांना आरोप सिद्ध होऊन शिक्षा सुनावली जाई त्यांना मात्र जेलचे कैद्याचे कपडे घालावे लागत ..पँट आणि आतून अंडरवेअर देखील बुडावर सरकत पाण्यात गेल्याने पूर्ण ओली झालेली होती ..त्यामुळे खूप अवस्थ वाटत होते ..अवघडल्या सारखे झाले होते ..त्यात टर्की सुरु ..प्रचंड उलघाल होत होती शरीरमनाची .. बदलायला दुसरे कपडेही नव्हते . माझे नाटक उत्तम वठण्यासाठी मला तसेच बुडावर सरकत राहणे भाग होते ..सध्या आमच्या सेंटरला दाखल झाल्यावर काही व्यसनी सुरवातीच्या काळात ..कसेही करून घरी जायला मिळावे म्हणून ..तब्येत खराब झाल्याची ..छातीत दुखत असल्याची ..वगैरे नाटके करतात ..त्यांना वाटते आपल्याला लगेच हे लोक व्यसनमुक्ती केंद्रातून काढून हॉस्पिटलला नेतील ..घरच्या मंडळींची भेट घालून देतील ..मग शपथा ..वचने ..इमोशनल ब्लँकमेलिंग ..वगैरे करून आपण डिस्चार्ज घेवू ..माझी गाठीला व्यसनी व्यक्ती किती नाटके करू शकतो या बद्दल स्वतचा चांगलाच अनुभव असल्याने ..मी त्यांची डाळ शिजू देत नाही ...

बराकमधील सगळे कैदी वार्डनला ...बेचारे को जल्दी दवाखानेमें ले जावो असा आग्रह करत होते ...त्याला ही तसेच वाटत होते ..मात्र मी त्याने रात्री मला साथीदारांसोबत मारहाण केल्याची तक्रार करीन बाहेर पडल्यावर अशीही त्याला भीती वाटत असावी ...तो सारखा मला बिडी देवून ..मी रात्रीची घटना विसरावी इतके चांगले वागत होता माझ्याशी ..शेवटी दुपारी तीन वाजता ...मला एका चादरीवर ठेवून ..ती चादर चार कैद्यांनी उचलून मला बराक मधून बाहेर काढले ..तशीच चादरीची झोळी उचलून मला सुमारे शंभर मीटर दूर ..उंच भिंतीच्या आतच असलेल्या जेलच्या रुग्णालयात नेले ..तेथे अँप्रन चढवलेल्या एका डॉक्टरने मला तपासले .... पालथा करून पाठीच्या जखमेवरची खुण तपासली ..कसा पडलास वगैरे प्रश्न विचारले ..मी रात्रीच्या मारहाणीचा अजिबात उल्लेख न करता ..संडासात पडलो असे सांगितले ..तेव्हा सोबत आलेल्या वार्डनला सुटल्यासारखे वाटले ..डॉक्टरने गंभीर चेहरा करून मला हॉस्पिटलला दाखल करून घेतले ..मला तेथे सोडून जाताना बराकच्या वार्डनने मला त्याचे नाव सांगितले नाही याचे बक्षीस म्हणून एक बिडी बंडल माचीस दिले ...जेलच्या रुग्णालयात सगळे पलंग भरलेले असल्याने मला तात्पुरते ..जमिनीवरच जागा मिळाली ..चला इथपर्यंत तर सगळे मनासारखे घडत होते ..बिडी बंडल देखील मिळाला होता ..आता इथून लवकरात लवकर बाहेरच्या उंच भिंती बाहेरच्या दवाखान्यात कसे जाता येईल याचे विचार सुरु होते माझ्या मनात ..पांगळेपणाचे नाटक डॉक्टरच्या देखरेखी खाली उत्तम वठायला हवे होते ..चौकशी करत असताना मी ब्राऊन शुगरचा व्यसनी आहे हे डॉक्टरला सांगितले होते ..त्यामुळे मला टर्की होत असणार हे तो जाणून होता ..त्याने मला एक फोर्टविन चे इंजेक्शन दिले ..पेन किलर म्हणून आणि टर्की कमी व्हावी म्हणून ...ती रात्र जरा बरी गेली ..फोर्टविनच्या इंजेक्शनमुळे जरा गुंगीत होतो ..टर्की फारशी जाणवली नाही ..मात्र झोप अजिबात्र लागली नाही ..रात्री पुन्हा ..तशीच संडासकडे बुडावर सरकत जाण्याची कसरत दोन वेळा केली ..

दुसऱ्या दिवशी सकाळी तसाच बुडावर सरकत हॉस्पिटलच्या व्हरांड्यात येवून उन खात बसलो ..हॉस्पिटल मधील इतर आजारी कैदी माझ्याकडे सहानुभूतीने पाहत होते..एकाने तर स्वतचा पलंग मला देवू केला ..मात्र मी नाकारले ..बसल्या जागेवर चहा मिळाला ..याला बिचाऱ्याला लवकर बाहेरच्या दवाखान्यात नेले पाहिजे ..तरच काहीतरी ऑपरेशन होवून हा नीट होईल ..नाहीतर जन्मभराचा पांगळा होईल असे त्या कैद्यांना वाटत होते ....बाहेर चोऱ्या ..मारामाऱ्या..दरोडे ..असे गंभीर गुन्हे करणाऱ्यांच्या मनात असा माणुसकीचा ओलावा पाहून मला गम्मत वाटली मानवी मनाची ...एकाने तर मला जेल प्रशासनाच्या बद्दल त्याच्या मनात राग असल्याने ...मला लवकर बाहेरच्या हॉस्पिटल मध्ये न्यावे यासाठी एक भलतीच आयडिया सुचवली... आता जेव्हा दहा वाजता जेलर राउंडला हॉस्पिटलला येतील तेव्हा ..माझ्या जवळील चहाच्या पाँट मध्ये संडास मधील मैला भरून तो पाँट मी जेलरच्या अंगावर फेकावा असे त्याचे म्हणणे होते ...आयडिया जरी अफलातून असली तरी मी तसे करणे नाकारले ..कारण त्यानंतर जेलर नेमकी काय भूमिका घेईल या बाबत मी साशंक होतो ...दहा वाजता जेलर राउंडला आल्यावर मी मुद्दाम बुडावर सरकत त्याच्या जवळ गेलो ..काय झाले असे त्याने विचारले ..तेव्हा संडासात पडलो ..पूर्वी ऑपरेशन झाले आहे वगैरे सांगितले ..ठीक आहे ..पाहू इतकेच म्हणून जेलर पुढे गेला ..मला वाटले होते तो मला सिव्हील हॉस्पिटलला नेण्याबाबत सूचना देईल ..मात्र ते घडले नाही ..मी जरा निराश झालो ..मात्र पांगळेपण सुरूच ठेवायचे पक्के केले ..कधी ना कधी ..त्याला कीव येईलच माझी ..एकाने सांगितले की तुझ्याकडे पैसे असतील तर ..तुला बाहेर हॉस्पिटलला लगेच जाता येईल ..इथे बाहेरच्या हॉस्पिटलला रेफर करण्याचे पैसे घेतात ..कोणीही कैदी.. डॉक्टर ..जेलर वगैरेना पैसे खाऊ घालून ..आजाराचे निमित्त करून ..काही दिवस बाहेरच्या जगात जावून येतो ..मग तेथे ..नातलगांच्या भेटी गाठी घेतो ..सर्व इच्छा पूर्ण करून परत आत येतो ..माझ्याकडे फुटकी कवडी नव्हती ....त्यामुळे हा मार्ग मला लागू होत नव्हता ..बाहेरच्या हॉस्पिटल मध्ये रेफर करण्याचा त्यावेळचा रेट पाचशे रुपये आहे ही माहिती पुरवली त्याने .. जेल मध्ये जरी सर्वसाधारण कैद्यांना पैसे जवळ ठेवण्यास मनाई होती ..तरीही अनेक भाई लोकांकडे खूप पैसे असतात ..ते मदत करतात एखाद्या कैद्याला ..बाकीचे कैदी हा व्यवहार नातलगांमार्फत बाहेर जेलरची किवा डॉक्टरची भेट घडवून करतात ...जो खरोखर आजारी असेल त्याला देखील हे लोक चाचपडून पाहतात ..पैसे मिळाले तरच बाहेरच्या दवाखान्यात पाठवतात ..अन्यथा मग कोर्टाकडून आदेश मिळाला तर यांचा नाईलाज होतो ..किवा अगदीच एखादा मृत्यू पंथाला असेल तर त्याच्यावर लवकर कृपा करतात अशी माहिती मिळाली ..म्हणजे एकंदरीत इथून बाहेरच्या हॉस्पिटल मध्ये जाणे दिव्यच होते तर ...!

( बाकी पुढील भागात )

=====================================================================

दुर्दशा ! ( पर्व दुसरे -भाग ११४ वा )


जेलर ..डॉक्टर ..यांनी एकंदरीत माझ्या समस्येकडे दुर्लक्ष करून ..माझी जिद्द वाढवली होती ..कसेही करून जेलच्या बाहेरच्या हॉस्पिटल मध्ये जायचेच हा निर्धार झाला ..दिवसभर मी तसाच बुडावर सरकत ..विव्हळत ..कण्हत ...घालवला ..टर्की सुरु असल्याने भूक लागण्याचा प्रश्नच नव्हता ..दोन वेळा चहा मिळाला ....सायंकाळी बंदी झाल्यावर ...मी कंबर जास्तच दुखते आहे असे भासवू लागलो ..मोठ्याने विव्हळू लागलो ...माझे असे करुण विव्हळणे हॉस्पिटल मधील इतर कैद्यांना त्रासदायक होऊ लागले होते ..आठ वाजता एक जमादार राउंडला आला ..मेंटल बहुधा त्याची रात्रपाळी होती ..मेंटल हॉस्पिटल मध्ये जसे ओव्हरसीयर रात्रपाळी करून दर दोन तासांनी प्रत्येक वार्ड मध्ये राउंड मारतात तसेच हे होते ...माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून तो जमादार माझ्याजवळ आला ....माझी चौकशी करून माहिती घेतली ..तुला पाठवू एकदोन दिवसात सिव्हील हॉस्पिटलमध्ये असे आश्वासन दिले ..तो पर्यंत शांत राहा ..उगाच ओरडून सगळ्यांची झोप खराब करू नकोस असे मला बजावले .....मला झोप लागावी म्हणून रात्रपाळीच्या डॉक्टरकडून त्याने मला दोन कंम्पोझ च्या गोळ्या आणून खायला घातल्या ..ब्राऊन शुगरच्या व्यसनीला ..टर्कीत असताना सर्व साधारण झोपेची औषधे दिली तर तो हँलुस्नेशन मध्ये जातो ..असा माझा अनुभव होता ...परंतु दोन गोळ्या माझ्या हातावर देवून जमादार ..समोरच उभा राहिला ...त्यामुळे त्या गोळ्या घेणे मला भाग पडले ...त्या गोळ्या घेतल्यानंतर देखील माझे विव्हळणे सुरूच होते ..दोन तासांनी पुन्हा राउंडला आल्यावर त्या जमादाराने वैतागून मला अजून दोन गोळ्या आणून दिल्या ..कसेही करून माझा आवाज बंद करायचा होता त्याला ..एकूण चार झोपेच्या गोळ्या पोटात गेल्यावर ..जरा बरे वाटले ..थोडीशी गुंगी वाटली ..म्हणून भिंतीला टेकून.. डोळे मिटून जरा वेळ बसून राहिलो ..

बहुतेक रात्रीचे दहा वाजून गेला असतील ...नंतर चार पाच तास काय घडले ते मला आठवत नाही ....परंतु एक अंधुक आठवते ..की पलंगावरचा एक कैदी ..मला पुस्तक वाचायला देण्यासाठी त्याच्या जवळ बोलवत होता ..मी बुडावर सरकत सरकत त्याच्याजवळ गेलो ..नंतर माचीस संपली म्हणून एक दोन कैद्यांकडे माचीस मागत होतो ...हे सगळे उद्योग बुडावर सरकतच चालले होते माझे ....अचानक कोणीतरी फाडकन माझ्या गालात लावली ..मी डोळे उघडले तर समोर वार्डन त्रासिक मुद्रेने उभा ..काय प्रकार आहे ? मला याने असे अचानक का मारले असावे ते समजेना .... तो म्हणाला ..' साले एक जगह पे बैठे रहेना ..यहां वहां क्यू घूम रहा है ..लोगोके बिस्तर के नीचे हात डाल रहा है ...कितना मार खायेगा और ' ..माझ्या भोवती बरेच कैदी घोळक्याने उभे होते ..मग मला जाणवले ..मी बहुतेक हँलुस्नेशन मध्ये गेला असणार ..त्या भ्रमाच्या अवस्थेत मी उगाच इकडे तिकडे बुडावर सरकत फिरत होतो ..माचीससाठी पलंगावर झोपलेल्या कैद्यांच्या गादीखाली हात घालत होतो ..मी काही चोरतोय की काय असे वाटून ..तो पलंगावरचा कैदी मला दोन थोबाडीत मारत होता ..शरमून ..जरा वेळाने तेच तेच करत होतो ..मध्येच आईच्या ..मानसीच्या नावाने जोरजोरात हाक मारत होतो ..असे उद्योग जवळ जवळ तीन तास सुरु असावेत माझे ..मी हात जोडून वार्डनला सांगितले ..' वो निंद के गोली की वजह से मुझे ऐसा हो रहा है ..' खबरदार अभी अपनी जगह से हिला तो ..बांधके रखेंगे अशी त्याने ताकीद दिली ..मी गुपचूप भिंतीला टेक्न बसलो ..मला स्वतच्या अंतर्मनाचे खूप आश्चर्य वाटले ....हँलुस्नेशन मध्ये गेल्यावर स्थळ ..काळाचे भान हरपते ..कानात आवाज ऐकू येतात ...डोळ्यासमोर काही भ्रम निर्माण होतात ..हे खरेच आहे ..मात्र मी कमरेखाली अधू झालो असून मला चालता येत नाहीय ..हे मी करत असलेले नाटक ..हँलुस्नेशनच्या काळात देखील सुरु होते ..म्हणजे मी अंतर्मनाला दिलेली पांगळेपणाची सूचना अंतर्मनाने ..हँलुस्नेशन च्या काळात देखील लक्षात ठेवली होती ..त्या भ्रमाच्या अवस्थेतही ..जरी स्थळ ..काळ..व्यक्तींची ओळख याचे माझे भान हरपले होते ..तरीही सगळे उद्योग मी बुडावर सरकतच करत होतो ..पांगळेपणाचे नाटक काही विसरलो नव्हतो ..मानवी मन हे खरोखर अतिशय शक्तिशाली आहे ..हे पुन्हा पटले ..जर त्या मनाला सकारात्मक विचारांचे खाद्य देत राहिले तर ..ते नक्कीच सगळे व्यक्तिमत्व बदलविण्यास कारण बनते ..आणि नकारात्मक विचार करत राहिल्यास .. जीवनाची दुर्दशाही करते .

आता पुढे काय ..मी एकदम त्रासून गेलो होतो ..एकतर सारखे बुडावर सरकून कपडे खराब झालेले ..जमिनीवर हात टेकवून बुडावर सरकावे लागे ..त्यामुळे हात देखील दुखत होते ..टर्की ..थंडी ..संपत आलेल्या बिड्या ...वैताग होता नुसता ..सगळे शरीर गलीतगात्र 
झालेले ..मनात एक कल्पना चमकली ...मी कमरेच्या पँटला लावलेला चामडी पट्टा झडती घेताना तेथील शिपायाने मला पँट सैल होते म्हणून परत केला होता ..तो पट्टा मी काढला आणि गळ्याभोवती आवळला ..दोन्ही हातानी पट्ट्याची दोन टोके जोरात ताकद लावून विरुद्ध दिशेला ओढू लागलो ..गळ्याला फास बसत होता ..श्वास कोंडल्या सारखे झाले ..खरे तर असे स्वतच्या हाताने स्वतःला फास लावून घावून मरणे शक्य नसते..कारण जरा जास्त वेळ श्वास कोंडला गेला की हात आपोआप सैल पडतात ..फासाची ओढ कमी होते ..मात्र मी नेटाने प्रयत्न करतच होतो ..श्वास कोंडला गेला की गळ्यातून विचित्र घुसमटल्याचे आवाज येत होते ..खोकला येत होता ..हे सगळे जरा दूर बसलेला एक कैदी पाहत होता ..तो एकदम मोठ्याने ओरडला ..' अरे ..अरे . ..बचावो ..मार जायेगा ये ' ..त्याने अशी बोंब ठोकल्यावर पुन्हा सगळे कैदी उठले ....वार्डन माझ्याजवळ आला .. माझ्या हातातील पट्टा काढून घेतला ..यावेळी त्याने मला मारले नाही ..त्यालाही माझी दया आली असावी ' तू खुद भी तकलीफ मे है ..और दुसरो को भी तकलीफ मे डाल रहा है ..' त्याने मग त्याच्या साथीदार कैद्यांच्या मदतीने एक पलंग रिकामा करून मला पलंगाला बांधले ...म्हणजे पुन्हा मी आत्मघात करू नये ..

( बाकी पुढील भागात )


हँलुस्नेशन म्हणजे नेमके काय ते माहित करून घेण्यासाठी खालील लिंक पहा !

=====================================================================

सुटका ????  ( पर्व दुसरे -भाग ११५ वा )

मला जेमतेम दोन वेळा लघवी..संडास साठी सोडावे असा आदेश जमादाराने दिला होता ...पहाटेचे बहुतेक पाच वाजत आलेले असावेत ..पलंगावर बांधलेल्या अवस्थेत मी पडून होतो ...वार्डन उठला होता ..इतक्या पहाटे उठून स्नान वगैरे करून तो ..त्याचा बिस्तर असलेल्या कोपऱ्यात मांडी घालून डोळे मिटून बसला होता ..मला वाटले काहीतरी बैठे काम करत असेल ..नीट निरखून पहिल्यावर जाणवले तो डोळे मिटून ध्यानस्थ बसला होता ..अगदी निश्चल ...मग जाणवले तो ध्यान करतोय ..मी थक्कच झालो ..इथे जेलमध्ये कोणी ध्यान करणारा सापडेल असे स्वप्नातही वाटले नव्हते मला ..सुमारे तासाभराने बंदी उघडण्याच्या सुमारास तो उठला ..मला चहा हवा का विचारू लागला ..मी त्याला विचारलेच ' आपण आता ध्यान करत होता का ? ' तो हसला आणि म्हणाला ध्यान नाही त्याला ' विपश्यना ' म्हणतात ..म्हणजे 'विपश्यना ' इथेही पोचली होती तर ..त्याची चौकशी केल्यामुळे त्याला जरा बरे वाटले ..मला त्याने पाँट मध्ये चहा आणून दिला ..सांगू लागला ..मागच्या वर्षी इथे जेल मध्ये 'विपश्यना ' चे शिबीर झाले होते ..अनेक कैद्यांनी त्यात भाग घेतला होता ..तेव्हा मी हे शिकलो ..त्या शिबिरासाठी किरण बेदी यांनी पुढाकार घेतला होता....मला आठवले ..किरण बेदी यांनी ' तिहार ' जेल मध्ये जेलर असताना तेथे ' विपश्यना ' शिबीर घेतल्याचे वाचले होते वर्तमान पत्रात ..पुढे अशी शिबिरे त्यांनी देशभरातल्या सर्व कारागृहात घेण्यासाठी आग्रह केला होता .. तो वार्डन पुढे सांगू लागला ...खूप शांत वाटते यामुळे ...मी फार रागीट होतो पूर्वी ..रागाच्या भरात त्याच्या हातून खुन झाल्यामुळे त्याला सक्तमजुरीची शिक्षा झाली होती .. ..दीर्घकालीन शिक्षा झालेल्या कैद्यांना त्यांची जेलमध्ये चांगली वागणूक असेल ..तर वार्डन करण्यात येते ..म्हणजे त्यांना विशिष्ट पगार दिला जातो ..त्यांचा वापर बराकीत व्यवस्थापन करण्यासाठी ..जेलच्या आतच ..इतर सरकारी कामात मदत करण्यासाठी केला जातो ..पिवळी विजार आणि पांढरा शर्ट ..कमरेला पट्टा असा त्यांचा वेष असे ...वार्डन म्हणजे थोडक्यात कैदीपोलीस असे म्हणता येईल ...मी त्याला मला सिव्हील हॉस्पिटल मध्ये केव्हा नेणार असे विचारले तेव्हा म्हणाला ' कल रातको तुने जो लफडा किया ..उसके बाद अब तेरेको यहां रखना खतरा है ऐसा डॉक्टर साहब बोल रहे थे ..शायद आज भेज देंगे तुझे ' बरे वाटले ते ऐकून ..बाहेरच्या हॉस्पिटल मध्ये नेले की तेथून सोबत असलेल्या शिपायाला पटवून त्याला घरी फोन करायला लावू ..माझी अवस्था खूप वाईट आहे असा निरोप द्यायला लावू त्याला ..म्हणजे मग भाऊ लवकर जमीन करून मला सोडवेल ही अशा होती मला..किवा संघी मिळाली तर सरळ पळून जायचे तेथून मुंबईला .असे माझ्या मनात होते .

वार्डन ने सांगितले तसेच घडले ..त्या दिवशी सकाळी जेलर राउंडला आल्यावर माझ्या जवळ आला म्हणाला ..आज पाठवू तला हॉस्पिटल मध्ये ...त्यानुसार दुपारी दोन वाजता ..मला पलंगावरून सोडले गेले ..एका स्ट्रेचर वर झोपवून ते स्ट्रेचर कैद्यांनी उचलून बाहेर जेलच्या मोठ्या दारापाशी आणून ठेवले ..सुमारे तासभर तसाच दारापाशी स्ट्रेचरवर पडून होतो ..मग गेटबाहेर गाडी लागलीय असा निरोप आल्यावर मला उचलून बाहेर गाडीत आणून ठेवले गेले ...चला ..एकदाचा बाहेर पडलो जेलच्या ..तीन दिवसात मी क्लृप्ती करून बाहेर येण्यात यशस्वी झालो याबद्दल स्वतची पाठ थोपटली ..मोठ्या निळ्या गाडीत अजून तीन चार कैदी चार शिपाई बसले होते ..त्या कैद्यांना देखील हॉस्पिटल मध्ये नेण्यात येणार असावे .. तासाभरात पोचली गाडी सिव्हील हॉस्पिटल मध्ये ..ताबडतोब मला स्ट्रेचर वरून उचलून ' आपत्कालीन विभाग ' अशी पाटी असलेल्या वार्ड मध्ये नेले गेले ....तेथे पलंग सज्ज होते ..एका पलंगावर मला झोपवून डॉक्टरांनी तपासले ..उद्या एक्सरे काढून नक्की काय ते समजेल ..असे म्हणाले ..मग मला सलाईन लावले गेले ...माझ्यापाशी एक शिपाई थांबला होता पहारा म्हणून ..गेल्या तीन दिवसात पोटात चहा खेरीज काहीही नव्हते ..टर्की सुरु असल्यामुळे भूक लागलीच नव्हती ..त्या वार्डमध्ये एकूण २० पलंग असावेत ..त्यापैकी जेमतेम पाच पलंग भरलेले होते ..बाकी वार्ड रिकामाच होता ..बाहेर अंधारले होते ..माझ्या योजनेचा पुढील भाग म्हणून मी माझ्या सोबत थांबलेल्या शिपायाला पटवण्यास सुरवात केली ...

त्याला म्हणालो ' ये मेरे ससुराल वालो की चाल है ..मुझे गलात फसाया है उन्होने '...वगैरे ' तो नुसताच हम्म ..ह्म्म्म करत होता ..पुढे म्हणालो अभी मेरे घरवालोको मै ऐसी तकलीफ मे हु ऐसा पता चला तो वो तुरंत मिलने आयेंगे ..मेरा जामीन करायेंगे ...तो माझ्या बोलण्यात अडकतोय असे जाणवत होते मला ..माझ्याबद्दल दया उत्पन्न होत होती त्याच्या मनात ..शेवटी म्हणालो ..आप अगर मेरे घर को एक फोन करके ..उन्हे बतायेंगे के मै यहां बिमार हु ..तो वो तुरंत आयेंगे ..वो आनेके बाद मै आपको खुश करुंगा ..वगैरे ..त्याच्या मनात लालूच उत्पन्न झालीच ..कितने पैसे देगा मेरेको ? त्याने विचारले .. मी त्याला तुला दोनशे रुपये देईन असा सांगितले ..शेवटी तो तयार झाला ... पैश्याच्या लालचेने सहजगत्या विकली जाणारी माणसे भरपूर सापडतात... नितीमत्तेपेक्षा पैश्यांना जास्त महत्व प्राप्त झालेय..त्या जोरावरच तर अनेक राजकारणी ..भ्रष्टाचारी ..समाजकंटक राजरोस वावरत आहेत समाजात ...जेथे पैसा काम करत नाही तेथे ..सहानुभूती ..करुणा ..दया या मानवी भावना नेमक्या नकारात्मक कारणांसाठी वापरता येतात ...तो शिपाई फोन करण्यास तयार झाला ..जरा वेळाने जेव्हा इतर कैद्यांना दुसऱ्या विभागात घेवून गेलेला त्याचा साथीदार परत आला तेव्हा ..साथीदाराला माझ्यापाशी थांबवून तो माझ्याकडून घरचा फोन नंबर घेवून गेला फोन करायला .. पंधरा मिनिटांनी तो परत आला... थोडा चिडलेला..म्हणाला तेरा भाई तो बहोत कडक बात किया मेरेसे ..बोला ..वो हमारे लिये मर गया है ..उसके मरनेके बाद हमे खबर करो ..हे ऐकून मी जरा हादरलो ..त्याला म्हणालो ..आपने भाई से नही मेरी मां से बात करनी चाहिये थी..यावर म्हणाला ' मुझे सब बात दिया है उन्होने ..मग मराठीत म्हणाला ' साल्या तू गर्दा पितोस ..घरच्यांना खूप त्रास देतोस असे मला समजलेय ..तुझा भाऊ म्हणाला की तो खूप नाटकी आहे ..त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका ..यापुढे आमच्याकडे फोन केलात तर मी तक्रार करीन ...वगैरे !..माझा सगळा प्लान फसला ...आता पुढे काय ..खूप निराश झालो होतो....मी घरच्यांसाठी मेलोय असा निरोप ऐकून खूप रडू येवू लागले ..माझ्या व्यसनापायी ..हट्टीपणापायी ..गेल्या पंधरा वर्षात मी काय काय त्रास दिलाय ते आठवू लागले ..प्रत्येकवेळी आता तरी हा सुधारेल या आशेने घरच्या लोकांनी मला मदतच केली होती ..शेवटी जेव्हा आईच्या जीवावर बेतले ..त्यातही मी आईची पाटली काढून विकली ..हे सर्व म्हणजे नीचपणाचा कळसच होता माझ्या ...थोडासा आनंद ..तणावमुक्ती ..गम्मत ..म्हणून जीवनात आलेले व्यसन आता सगळ्या कुटुंबियांना जीवघेणे ठरले होते ..मी एकदाचा मेलो तरच बरे असे त्यांना वाटत होते ..माझी हुशारी ..चतुराई ..बुद्धी ..सगळ्या क्षमता मी वापरून माझाच विनाश करत होतो ...स्वतः बद्दल घृणा वाटू लागली मला ..

तो शिपाई मला निरोप देवून .. बाहेर जावून उभा राहिला ...जाताना त्याने आठवणीने खिश्यात लोंबकळणारी बेडी काढून ..माझा एक पाय बेडीने पलंगाच्या दांडीला अडकवला होता ..उठून पळून जाणे शक्यच नव्हते ..आता खरोखर आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे काहीही पर्याय नव्हता ..मी सावधपणे आसपास नजर फिरवली ..माझा पलंग एका खिडकीपाशी होता ..थोडी मान वर करून मागे वळून पहिले ..डोक्याच्या मागे असलेल्या खिडकीत ..इंजेक्शनची छोटी वायल कापण्यासाठी किवा इतर कापाकापी साठी वापरली जाणारी एक सर्जिकल ब्लेड पडली होती ..बहुतेक ए वापरून झाल्यावर ती फेकण्याऐवजी कोणीतरी खिडकीत ठेवली असावी ..हळूच हात मागे करून मी ती सर्जिकल ब्लेड उचलली ..या वेळी नेमकी शीर कापली गेली पाहिजे ..तरच मृत्यू येईल ..मी ती ब्लेड घेवून मनगटावर चालवणार तोच एकदम एका स्त्रीचा ओरडण्याचा आवाज आला ..सिस्टर वार्डात आली होती .... ब्लेड उचलण्याच्या नादात माझे तिच्याकडे लक्षच नव्हते ..मात्र तिने पहिले मी काय करणार होतो ते ..तिचे ओरडणे ऐकून ..शिपाई धावत आला माझ्याजवळ ..माझ्या हातातून ब्लेड हिसकावून घेतली ..जर मी कापून घेतले असते ..काही बरेवाईट झाले असते ..तर त्याची नोकरी गेली असती ..कर्तव्यात कसूर केला म्हणून बाराच्या भावात गेला असता तो ..खूप चिडला होता तो शिपाई ..त्याने सरळ मला येथे ठेवणे धोक्याचे आहे हे जाहीर करून ..डॉक्टरला सांगून माझी ट्रान्स्फर ' इन्फेक्शन वार्डात ' करून घेतली ..जेथे जेलच्या कैद्यांना ठेवण्यासाठी छोटी गज असलेली खोली होती ..मला स्ट्रेचरवर घालून ..जोरात रागारागाने स्ट्रेचर पळवत ' इन्फेक्शन वार्ड ' कडे मला घेवून निघाले ..मी वाटेत मोठ्या मोठ्याने..आकांताने ओरडत होतो ..मला मारून टाका ..मला मरू द्या ..मला जगायचे नाहीय ..मी खूप वाईट आहे वगैरे ..!

( बाकी पुढील भागात )


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें