शनिवार, 14 दिसंबर 2013

बिंग फुटले !


बिंग फुटले ! ( पर्व दुसरे - भाग १०६ वा )


आईला ओळखत असणाऱ्या त्या काकूंना मी विसरून गेलो होतो ..अविकडे जावून सावकाश ब्राऊन शुगर वगैरे ओढून सायंकाळी पाच वाजता ..सुमित सोबत घरी पोचलो तर ..दर उघडताच मानसीने सुमितला माझ्या कडून ओढून स्वतच्या कडेवर घेतले ...तिचे डोळे रडून लाललाल झालेले ..थोडे सुजलेले ..मला पाहताच आई म्हणाली ..आता पोराला विकायचे तेव्हढेच बाकी ठेवले आहेस ..मी मुद्दाम ' त्या गावचा नसल्यासारखा ' चेहरा करून .. ..काय झाले ? ..असे का म्हणतेस ? वगैरे प्रश्न विचारू लागलो ...तेव्हा आई म्हणाली ..माझी मैत्रीण आली होती दुपारी घरी ..ती सांगत होती ..तू म्हणे सुमितला घेवून तिच्या घरी गेला होतास ..तेथे ..सुमितला हृदयात समस्या आहे ..त्याला अष्ट विनायक यात्रा घडवून आणायची आहे असे सांगून तिच्याकडे वर्गणी मागत होतास ..मी थक्कच झालो ..त्या मैत्रिणीचा राग आला ..तिने अगदी खास घरी येवून सांगायची काय गरज होती वगैरे विचार मनात आले ....आईच पुढे सांगू लागली ..ती बिचारी सकाळी सुटे पैसे नव्हते म्हणून हळहळत होती ..दुपारी खास पैसे सुटे केल्यावर आपल्याकडे आली होती ..तू मागितलेली वर्गणी द्यायला ..जबरदस्ती १०० रुपये देत होती आमच्या जवळ ..शेवटी आता पैसे जमलेत वगैरे सांगून तिची रवानगी केली ..आईने असे सांगितल्यावर सगळे बिंग कसे फुटले ते आले माझ्या लक्षात ..तेव्हा पासून सुमितला माझ्या सोबत बाहेर फिरायला पाठवणे बंद केले त्यांनी ..तेव्हापासून सुमित आणि मानसीला घेवून एकदा तरी अष्टविनायक यात्रा करून गणपतीची माफी मागावी असे मनात आहे ..मानसी अतिशय धार्मिक असल्याने तिच्या मनाला ते फारच लागून राहिले आहे ..कधी कधी सुमित आजारी पडला ..की ती अजूनही ते बोलून दाखवते ..म्हणते आपण अष्टविनायक यात्रा केली की सुमितवर काही संकट येणार नाही ...तुम्ही पत्यक्ष देवाचा अपमान केला आहे ..ते देखील मुलाला मध्ये घालून .



झटपट पैसे मिळवण्याचा माझा मार्ग बंद झाला ...पुन्हा अनिल साहेबांची नोकरी ..दांड्या ..कामावरील पैश्यात किरकोळ अफरातफर..घरात वाद असे सुरु राहिले ..त्याच काळात माझ्या डोक्यात लेखनाचा किडा वळवळत होता ...एखाद्या वर्तमान पत्रात काहीतरी लेखन करावे असे वाटत होते ..खूप आधीपासून मला लिखाणाची आवड आहे ...पूर्वी मुक्तांगणला प्रथम उपचार घेवून ..नाशिकला तीन वर्षे चांगला होतो त्या काळात ..दैनिक सकाळचे संपादक श्री . उत्तम कांबळे यांच्याशी परिचय झाला होता ..त्यांना मी व्यसनमुक्त राहात आहे याचे खूप कौतुक होते ..ते नेहमी मला तुम्ही आपले अनुभव लिहा असे म्हणत ...मला प्रेरणा देत असत लेखनासाठी ..मात्र तेव्हा ते राहून गेले होते ..नंतर माझ्या वारंवार झालेल्या रीलँप्स मुळे श्री . उत्तम कांबळे यांच्याशी संपर्क तुटला होता .. माझा शाळकरी मित्र शैलेंद्र तनपुरे हा ' दैनिक गावकरी ' या वर्तमान पत्रात संपादक आहे ही माहिती मिळाली होती ..त्यावरून एकदा त्याला भेटायला गेलो ..आम्ही खूप वर्षांनी भेटत होतो ..कॉलेजला असताना मी बिघडत गेलो ..त्या नंतर आमचा संपर्क नव्हता ..मला पाहून त्याला आनंद झाला ..मी त्याला.. सध्या चांगला आहे ..व्यसनमुक्त आहे ..लग्न केले..मुलगा आहे वगैरे माहिती सांगितली ..त्याल विनंती केली की काही लेखन करायचे आहे ..तू छापशील का ? त्याने त्वरित होकार दिला ..त्या नुसार त्याच्याकडे ..' ताण तणावांशी सामना ' हा लेख दिला ..' जिज्ञासा ' प्रकल्पासाठी मिळालेले प्रशिक्षण लेख लिहिताना कामी आले ..लवकरच छापून येईल गावकरी मध्ये असे त्याने सांगितले ..त्याच काळात नाशिक मध्ये ' दैनिक लोकमत ' सुरु झाला होता ..पाहता पाहता लोकमतने घरोघरी प्रवेश केला होता ..नाशिक मध्ये आधी पासून असलेली दैनिके म्हणजे गावकरी ..देशदूत ..सकाळ ....लोकमतने या तिन्ही दैनिकांवर अल्पकाळातच मात केली होती ..


एकदा असाच नशेत असताना ..लोकमतच्या अल्पावधीत लोकप्रिय होण्याची करणे मनात शोधात बसलो ...तेव्हा अनेक बाबी ध्यानात आल्या ...वाटले आपण जर शैलेंद्र तनपुरेच्या लक्षात या गोष्टी आणून दिल्या तर ..तो नक्कीच खुश होईल ..गावकरी मध्ये असे बदल करू शकेल ..मला पत्रकार होण्याची पूर्वीपासून इच्छा होती ..मात्र व्यसनामुळे राहूनच गेले होते ..माझी पत्रकार होण्याची हौस या निमित्ताने भागवून घेता आली असती ...मी लोकमतच्या यशाचा तुलनात्मक आढावा घेवून ते लिखाण घेवून शैलेंद्र तनपुरेला भेटलो ..त्याने मला गावकरीचे व्यवस्थापक ..मालक श्री . वंदन पोतनीस यांना भेटायाल सांगितले ..त्या प्रमाणे मी वेळ ठरवून श्री . वंदन पोतनीस यांची भेट घेतली ..लोकमतच्या यशाचा तुलनात्मक आढावा त्यांच्यासमोर ठेवला ..त्यांना विनंती केली की मी सांगतो ते बदल आपण गावकरी मध्ये केले तर नक्कीच गावकरी त्याचे गमावलेले एक नंबरचे स्थान पुन्हा मिळवेल ..त्यांनी ते सर्व शांतपणे वाचले ..मग म्हणाले ..हे तुम्ही काही आडाखे बांधून लिहिले आहे ..काही मुद्दे छान आहेत ..मात्र याच्यावर एक सविस्तर सर्व्हे व्हायला हवा ..तुम्ही जवाबदारी घेत असाल तर ..घरोघरी जावून असा सर्व्हे करण्याचे काम मी तुमच्याकडे सोपवतो ..सर्व्हेसाठी त्यांनी मला एक प्रश्नावली तयार करण्यास सांगितले ..मी त्या प्रमाणे घरोघरी जावून दैनिक वर्तमान पत्रात लोकांना काय काय वाचायला आवडते ..काय काय असले पाहिजे ..अशा प्रकारचे प्रश्न तयार केले ..ती प्रश्नावली श्री . वंदन पोतनीस यांना दाखवली ..त्यांनी हिरवा कंदिल दाखवला ..मला म्हणाले एका सर्व्हेचे मी तुम्हाला पन्नास रुपये देईन ..तुम्ही विविध भागातील ..विविध गटातील ..किमान एक हजार लोकांच्या घरी जावून ही प्रश्नावली भरून घ्या ..नंतर आपण निष्कर्ष काढून ..आवश्यक ते बदल नक्कीच करू आपल्या दैनिकात ..त्या नुसार माझा काम सुरु झाले ..दिवसाला किमान पाच घरी मी सर्व्हेसाठी जावू लागलो ..माझी नशा ..नशेकारिता पैसे..वगैरे भानगडी सांभाळून सर्व्हे साठी जास्त वेळ देणे कठीणच होते ..मात्र मला आशा होती ..की मी जर यशस्वीपणे हा सर्व्हे केला ..तर मला नक्कीच गावकरी मध्ये पत्रकार होण्याची संधी मिळणार होती ..

( बाकी पुढील भागात )

===================================================================

शेवटचा गंभीर गुन्हा !  ( पर्व दुसरे -भाग १०७ वा )


( सर्वांची माफी आधीच मागतोय )



वाचकांच्या सर्व्हेचे काम झाले की दर आठवड्याला मी ते सर्व्हेचे रिपोर्ट्स श्री .वंदन पोतनीस यांना दाखवत असे ..मग मला ठरल्यानुसार प्रत्येकी पन्नास या प्रमाणे सर्व्हेचे पैसे मिळत असत ..अनिल साहेबांच्या नोकरीवर अनियमित जावू लागलो ..दोन तीन वेळा मोठा भाऊ तेथे ऑफिसात आला तेव्हा ..माझे डोळे पाहून काय ते समजला ..त्याने नंतर घरी येवून माझ्याशी कटकट केली ..म्हणाला ' तू कधीही सुधारणार नाहीस असे वाटतेय ....अनिल साहेब काही बोलत नाहीत याचा गैरफायदा घेवू नकोस ...केवळ माझ्याकडे पाहून तुझी नोकरी टिकून आहे ...मी देखील नेहमीप्रमाणेच त्याच्याशी वाद घातला ...तुझा स्वभावच संशयी झालाय ....माझ्या कोणत्याही गोष्टींचे तुम्हाला कौतुक नाही ..लहानपणापासून तुम्ही असे वागत आलात ..म्हणूनच मी व्यसनी झालो मला कोणीच समजून घेत नाही ..वगैरे . भावू वैतागून निघून गेला ..जाता जाता आईला म्हणाला ..' आई तू याचे कितीही केलेस तरीही ..याला कोणाची पर्वा नाही ..आता वर लग्न करून बसलाय ..म्हणजे अजून जवाबदारी वाढवून घेतली आपण ..' आई बिचारी काय बोलणार ? ..भावाचे म्हणणे तसे पहिले तर अगदी बरोबरच होते ...मला सुधारण्यासाठी त्यानेही खूप प्रयत्न केले होते ...अगदी सुरवातीला खाजगी हॉस्पिटल ..नंतर मेंटल हॉस्पिटल ....मुक्तांगण ...सगळे सुरळीत व्हावे या हेतूने माझे लग्नही करून दिले घरच्यांनी ..इतके सगळे करूनही ...मला स्वतचे भले कशात आहे ते कळत नव्हते ..हा तद्दन वेडेपणाच होता माझा ..वर घडल्या गोष्टींचा दोष मी त्यांनाच देत होतो .


पुढच्या आठवड्यात सर्व्हे करून गेल्यावर ..गावकरीच्या ऑफिस मध्ये श्री .पोतनीस भेटले नाहीत ..त्यामुळे पैसे मिळू शकले नाहीत ..असे समजले की ते दोन तीन दिवसांनी येतील ..माझा भ्रमनिरास झाला होता ..कसेतरी जेमतेम एका पुडी पुरते पैसे जमले होते जवळ ..वैतागत एक पुडी घेवून घरी आलो ..सायंकाळचे सात वाजले होते ..सगळ्या जगावर डोके सरकले होते ..वाटले आपण गर्भश्रीमंत असतो तर किती बरे झाले असते ..राजरोस पैसा उडवता आला असता .. ..आपल्यावर निसर्गाने ....आणि सर्वानीच अन्याय केलाय असे वाटत होते ..अनघाशी आपले लग्न झाले असते तर ..पुढे इतके रामायण घडलेच नसते ..तेव्हाच मी सुधारलो असतो ..त्यावेळी कुटुंबीयांनी माझी किती निराशा केली ..अशी वैफल्याची भावना मनात घर करून होती ..एका पुडी पिण्यासाठी संडासात कशाला जायचे म्हणून ..घरात पुढच्या खोलीत जेथे आई ..सुमित ..मानसी बसले होते तेथेच उकिडवा बसून ब्राऊन शुगर ओढू लागलो ...आईला आणि मानसीला हे पाहून धक्काच बसला ...इतके दिवस मी लपून छपून पीत होतो ...मी सोडलीय कधीच ..किवा नक्की सोडणार आहे ..असे म्हणत असे ..आज राजरोस घरातच आई आणि मानसी समोर ब्राऊन शुगर ओढत बसलो होतो ..वर म्हणत होतो की ..तुम्ही कटकट करता म्हणून मला जास्त ब्राऊन शुगर प्यावी लागते ..एकंदरीत आता माझे व्यसन घरच्या मंडळीनी कोणतीही कुरबुर न करता स्वीकारावे ...मला माझ्या मनाप्रमाणे जगू द्यावे असे माझे म्हणणे होते ..आईला म्हणालो ..रोज सकाळी एक पुडी आणि संध्याकाळी एक पुडी इतकेच मी घेणार ..तुम्ही काहीही आडकाठी करायची नाही ..रोज शंभर रुपये इतकाच माझा खर्च राहील ..तुम्ही आडकाठी करता ..त्यामुळे माझी नशा उतरते .. जास्त प्यावी लागते ....माझे महिना तीन हजार यात खर्च होताल ..ते पैसे मी तात्पुरते घरून घेईन ..नंतर कुठूनही आणून तुम्हाला परत करेन ..तुम्ही अजिबात मध्ये बोलायचे नाही ...प्रत्येक व्यसनीला वाटत असते की आपले व्यसन घरच्यांनी निमूटपणे स्वीकारले तर ..आपणही कंट्रोल मध्ये व्यसन करू शकतो ..घरच्यांच्या कटकटीमुळेच जास्त भानगडी होतात ....खरेतर व्यसनाधीनता अशी कधीच कमी होत नाही ..उलट वाढतच जाते असा घरच्या मंडळींचा अनुभव असतो ..म्हणून तर ते विरोध करतात .

त्या दिवशी माझी मजल पाहून आई निशब्द् झाली ..काहीही न बोलता स्वैपाक घरात निघून गेली ..तिची घोर निराशा झाली होती ..मी बिघडल्यापासून प्रत्येक वेळी ..मला ती मदत करत आली होती ..मला वाचण्यासाठी माझी ढाल बनली होती ..सगळे नातलग अनेकदा तिला म्हणत की तुमच्या लाडामुळे हा बिघडला आहे ...माझ्या वर्तनामुळे अनेकदा तिला अपमान सहन करावे लागले होते ...भावू ..वडील ..नातलग ...वाहिनी ..मानसी ..या सर्वांच्या रोषाला बळी पडावे लागले होते ते केवळ माझ्यामुळे ...आणि आता मीच राजरोस व्यसन करीन म्हणत ..घरातच ब्राऊन शुगर ओढत बसलेलो होतो ..तिचा सारा त्याग ...व्यर्थ ठरत होता ..इतके दिवस किमान मी सुधारणार आहे नक्की सोडणार आहे असे म्हणत होतो ..आता सगळे लाथाडून मी व्यसन काहीही झाले तरी सुरूच ठेवणार हा माझा पावित्रा तिला खूप दुखः देत असावा ..त्या दिवशी रात्री आम्ही नेहमी प्रमाणे झोपी गेलो ....झोपताना मनात होते ..की आता घरच्यांना सरळ सरळ सांगितलेच आहे ..तेव्हा उद्यापासून आईकडून राजरोस पैसे घ्यायचे ..आपले कामाचे पैसे मिळाले की आईला परत करायचे ..वगैरे अविवेकी विचार करतच झोपी गेलो ..सकाळी सकाळी सहा वाजता मानसीने मला घाबऱ्या घाबऱ्या उठवले ..म्हणाली ' अहो आई ..आज सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला गेल्या नाहीत ..अजून झोपूनच आहेत ..मी मच्छरदाणी बाहेरून आवाज दिला त्यांना ..पण काहीच उत्तर देत नाहीयेत ..मी पटकन उठून आतल्या खोलीत गेलो ..मच्छरदाणी बाजूला करून पहिले ..तर आई उताणी झोपलेली ..तोंड उघडे ठेवून मोठ्याने घोरत होती ..तिच्या तोंडातून थोडा फेस येत होता ..मी हाक मारल्या ..तिला हलवून पहिले ..मात्र ती उठेना ..अगदी गाढ झोपली होती ..तितक्यात बाजूला लक्ष गेले तर तेथे एक छोटी रिकामी बाटली पडलेली ....ही बाटली माझ्या ओळखीची होती ..वडील गेल्यावर ....त्यांच्या उरलेल्या औषधाच्या गोळ्या आईने त्या बाटलीत भरून ठेवलेल्या मला माहित होत्या ..त्यात कॉम्पोझ ..लारपोझ..व वडिलांना आजारी असताना सुरु असलेल्या रक्तदाबाच्या गोळ्या एकत्र करून ठेवल्या होत्या आईने ...सुमारे तीस चाळीस गोळ्या होत्या एकंदरीत ..पटकन बाटली उघडून पहिले तर रिकामी ..माझ्या छातीत धस्स... झाले ...म्हणजे आईने त्या सगळ्या गोळ्या खाल्ल्या की काय ?..शंकाच नव्हती ..नक्कीच आईने त्या गोळ्या खावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता ..मानसीला आईच्या हाताखाली एक चिट्ठी सापडली ..त्यात ..मी सर्व बाजूनी पराभूत झाले आहे ....जीवनाला कंटाळून जीवन संपवीत आहे ..त्यासाठी कोणालाही जवाबदार धरू नये ..सुहासने मानसी व सुमितचा नीट सांभाळ करावा वगैरे लिहिले होते ..माझ्याबद्दल काहीच उल्लेख नव्हता ..,,मी ताबडतोब मानसीला भावाकडे फोन करण्यास सांगितले ....आठवणीने बजावले की ..मी काल घरत ब्राऊन शुगर प्यायलो असे भावाला सांगू नकोस ..नाहीतर तो मलाच जवाबदार धरेल .

( बाकी पुढील भागात )

======================================================================

( कालचे प्रकरण वाचून वाचकवर्ग माझ्यावर नाराज होईल हे माहित असूनही मी नेटाने लिहिले ..आज त्यापेक्षा भयंकर प्रकार आहे ..ही लेखमाला प्रबोधन म्हणून लिहित असल्याने ...सगळे काही खरे खरे लिहायचे हे आधीच ठरवलेय ...यातील काही गोष्टी मी आपल्या पासून लपवूही शकलो असतो ..किवा मला सगळे लिहिलेच पाहिजे असलेही बंधन नव्हते ..मात्र तरीही वाचकांचा रोष पत्करून मी हे लिहित आहे ..कारण मी केलेले कृत्य जरी सगळ्यांपासून लपले तरी त्या सर्वसाक्षी परमेश्वरापासून काहीही लपलेले नाही ..त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून लिखाण करतोय . माझे हे निंदनीय कृत्य अजून पर्यंत माझ्या कुटुंबीयांकडे कबुल केले नव्हते ..अर्थात त्यांना सगळे माहितच होते ..तरीही मी कबुल केले नव्हते ..त्यांचा मोठेपणा असा की नंतर आईनेही आणि इतर कोणीही मला पुन्हा त्याबद्दल काही विचारले नाही ..की माझ्या व्यसनमुक्तीच्या काळात कधीही माझ्या दुष्कृत्यांची आठवण करून दिली नाही ..हा माझा एक प्रकारे कबुली जबाबच आहे )

संघर्ष ..समर्थन ..!  ( पर्व दुसरे - भाग १०८ वा )

मानसी भावाला फोन करायला गेली ..मी पटकन जवळच राहणाऱ्या डॉक्टरकडे गेलो ..त्यांना घेवून आलो आईला तपासण्यासाठी ..तो पर्यंत भावू आलेला होता ...हे कसे घडले वगैरे विचारात होता ..मानसी घाबरून जमेल तशी उत्तरे देत होती ..त्याचा मुख्य प्रश्न होता ..रात्री आईशी तुषार भांडला का ? ..दुसरे काही भांडण झाले का ? मानसी नुसतीच नकारार्थी मान हलवत होती ..काल रात्री मी केलेला प्रकार त्याला सांगू नकोस असे मी तिला आधीच बजावले होते ..डॉक्टरांनी आईला तपासून जाहीर केले की जास्त परिणाम झालाय ..ताबडतोब हॉस्पिटल मध्ये न्यावे लागेल ..स्टमकवॉश देखील द्यावा लागेल ...ऑक्सिजन वगैरे लागेल ..ताबडतोब भावू खालच्या मजल्यावरच्या परिचितांकडे गेला ..त्यांच्याकडे कार होती ..त्यांनी लगेच गाडी काढली ..आईला बेशुद्धावस्थेत उचलून चारपाच जणांनी मिळून गाडीत टाकले ..तो पर्यंत सुमित उठला .त्याला कळेना काय प्रकार चाललाय ते ..तो गडबड पाहून रडू लागला ..आईला घेवून आम्ही हॉस्पिटलकडे निघालो ..भावू गाडीत पुढे बसला होता ..तर मागे मी ...आईचे डोके माझ्या मांडीवर होते ..अजूनही तसेच उघडे तोंड .. जोरजोरात घोरणे ..मला आईच्या चेहऱ्याकडे पाहून कसेसेच झाले ..रडू येवू लागले ..लहानपणापासून आईचा लाडका असणाऱ्या माझ्यामुळेच आईवर हा प्रसंग गुदरला होता ..आईचे शेपूट म्हणून मला लहानपणी चिडवत असत ..ते आठवले ...अकस्मात हे सगळे कल्पनातीत असे घडले होते .

काल रात्री प्यायलेल्या ब्राऊन शुगरचा परिणाम सकाळी संपला होता ..त्यामूळे टर्की सुरु झालेले होती ....शारीरिक आणि मानसिक अवस्थता देखील वाढली होती माझी ..आता सोबत ब्राऊन शुगर असती तर बरे झाले असते असे वाटले ..तसेच आता आज दिवसभर ब्राऊन शुगर मिळण्याचे वांधे होतील हे जाणवले ..कारण माझ्याकडे काहीच पैसे शिल्लक नव्हते ..माझी ATM असणारी आई ..अशा अवस्थेत ..भावू मला पैसे देणार नाही हे नक्की ..शिवाय आता दिवसभर आईसोबत घालवावा लागणार ..टर्की होणार .. तेथे हॉस्पिटलला सगळे नातलग जमणार..प्रश्न विचारून मला भंडावून सोडणार ..छे...कसेही करून ब्राऊन शुगर मिळवली पाहिजे ...या सगळ्या परिस्थितीला तोंड द्यायला मला मानसिक आणि शारीरिक शक्ती केवळ ब्राऊन शुगर मुळेच मिळणार होती ..मी हताशपणे आईच्या चेहऱ्याकडे पाहत होतो ..माझ्या डोळ्यातून ओघळलेले थेंब गालावरून ओठाशी येवून त्याची खारट चव जाणवत होती ..वाटले रात्रीच आईकडून पैसे घेवून ठेवले असते तर बरे झाले असते ..आईला हॉस्पिटल मध्ये सोडून लगेच ब्राऊन शुगर आणायला जाता आले असते ..पैसे कसे मिळतील त्याचा विचार डोक्यात वेगाने सुरु होता ..त्याच वेळी माझे लक्ष आईंच्या हाताकडे गेले ..तिच्या हाताच्या बोटात सोन्याची अंगठी चमकली ..माझे डोळेही चमकले ...मनात चमकून गेलेल्या विचाराने मी दचकलो ...ती अंगठी काढून घ्यावी हा विचार मनात थैमान घालू लागला ..तो विचार पळवून लावण्यासाठी मी स्वतःचीच निर्भत्सना सुरु केली ..किती हलकटपणा आहे हा ..आई वर हा प्रसंग तुझ्यामुळेच आलाय ..त्याही अवस्थेत आईच्या हातातील सोन्याची अंगठी काढणे म्हणजे नीचपणा आहे ..खूप मोठे पाप आहे ..वगैरे ..स्वतःला दटावत होतो ..तर दुसरीकडे आईच्या हातातील अंगठी पाहून चमकलेले मन ..टर्की वाढवत होते ..ब्राऊन शुगरची लालच अनिवार होत होती ..मग नेहमीप्रमाणे माझ्या मदतीला माझ्या चुकांचे समर्थन करणारा माझ्या मनाचा दुष्ट ..धूर्त ..हुशार वकील आला ..तो म्हणू लागला ..तुषार हे वाईट आहे हे मान्य ..पण तुला ब्राऊन शुगर मिळविण्याचा दुसरा पर्याय आहे का आत्ता ? शिवाय आईचे काही बरे वाईट झाले तर हे सोने नंतर तुलाच मिळणार आहे ..ते तू आधीच काढून घेतलेंस इतकेच ..आणि आई यातून आई सुखरूप बाहेर पडली ..तिने तुला अंगठी बदल जाब विचारला तर ..नाहीतरी तू लवकरच व्यसन सोडणारच आहेस ..तेव्हा आईला नंतर यापेक्षा जास्त किमतीची अंगठी करून दे ...मनात संघर्ष सुरु झाला ..पाहू तर खरी अंगठी सहज निघते का बोटातून असे मनाशी म्हणत मी हळूच आईच्या बोटातून अंगठी काढण्याचा प्रयत्न केला ..तर अंगठी बोटात घट्ट बसलेली ..क्षणभर निराश झालो ..!

पुन्हा स्वतःला सावरले ...मनाच्या लालची वकिलाला दटावले ..आज सहन करू टर्की ..आपण काही मारणार नाही ब्राऊन शुगर मिळाली नाही तर ..मात्र ब्राऊन शुगरसाठी चटावलेले मन स्वस्थ बसू देईना ..वारंवार नजर तिकडेच जात होती ..अंगठी निघत नाही म्हंटल्यावर माझे लक्ष आईच्या हातातील सोन्याच्या पाटल्यांकडे गेले ..हळू हळू मनाचा संघर्ष संपुष्टात येत होता ..मनातील व्यसनाधीनतेच राक्षस पूर्ण जागा झाला होता ..कसेही करून ब्राऊन शुगर हवी म्हणून मागे लागला ..सारासार विवेकाला समर्थनाच्या वकिलाने केव्हाच पळवून लावलेले ...शेवटी मी धीर करून आईच्या एका हातातील पाटली काढून हळूच खिश्यात ठेवली .संभाविता सारखा चेहरा करून बसलो ..हॉस्पिटल आले ..पटकन खाली उतरून स्ट्रेचर मागवले..चार वार्डबॉयनी आईला स्ट्रेचरवर ठेवून ते स्ट्रेचर लिफ्ट मध्ये ठेवू लागले ..मी देखील लिफ्ट मध्ये शिरलो ..वरच्या मजल्यावर गेल्यावर आईला सरळ ऑपरेशन थियेटर मध्ये नेण्यात आले ..तसा मी भावाजवळ जावून म्हणालो ..मी जरा माझ्या मित्रांना फोन करून येतो परत ..तेथून सटकलो ..सरळ अविनाशकडे गेलो ..त्याच्या सोबत त्याच्या ओळखीच्या एका सराफाच्या घरी जावून त्याला ती पाटली दिली ..त्या वेळच्या सोन्याच्या भावाप्रमाणे दहा मिनिटातच त्याने माझ्या हातावर आठ हजार पाचशे रुपये ठेवले ...तेथून सरळ अड्ड्यावर ..ब्राऊन शुगर घेवून अविनाशच्या रूमवर ओढत बसलो दोघे ..ब्राऊन शुगर ओढता ओढता रडतही होतो ..स्वतःला दोषही देत होतो ..आईची महती आठवत होतो ..पोटभर ब्राऊन शुगर पिवून झाल्यावर पुन्हा हॉस्पिटलकडे गेलो.. हॉस्पिटलच्या दारातच भावू माझी वाट पाहत उभा होता ..मला पाहताच त्याने पहिला प्रश्न केला ..आईच्या हातातील एक पाटली कुठे आहे ? मी नकार देवू लागलो ..म्हणालो घरातच कुठेतरी असेल ..तर म्हणाला.. आईला ऑपरेशन थियेटर मध्ये नेल्यावर सिस्टरनी आईच्च्या अंगावरचे दागिने काढले ..त्यात एकाच पाटली मिळाली ...दुसरी कुठे गेली ..मी मानसीला फोन करून विचारले घरात आहे का ? मानसीने नकार दिलाय ...त्याचा रोख सरळ सरळ माझ्याकडे होता ..मी ठाम नकार देत होतो ..मला जाणवले की भावू कदाचित माझी झडती घेईल ..मग खिश्यात असलेले पैसे पाहून त्याला सगळे समजेल ..म्हणून मी भावावर चिडण्याचे नाटक केले ..म्हणालो ...तुला नेहमीच माझा संशय येतो ..प्रत्येक वेळी मलाच जवाबदार धरतोस तू ..वगैरे ..रागारागाने तेथून सटकलो ...पुन्हा अविनाशच्या रूमवर आलो . 

( बाकी पुढील भागात )

========================================================================


अपराधीपणाची होरपळ !
( पर्व दुसरे -भाग १०९ वा )


हॉस्पिटलमधून अवीच्या रूमवर ..पुन्हा ब्राऊन शुगर ....सारखा स्वतःला दोषही देत होतो ...भरपूर ब्राऊन शुगर पिणेही सुरु होते ..दुपारी आईला एकदा पहावे म्हणून हॉस्पिटलला गेलो ..गेट मधूनच बाहेर उभा असलेला भाऊ ..वाहिनी ..मानसी ..जवळपास राहणारे नातलग दिसले ..वाटले या सर्वांसमोर आत जाणे म्हणजे भावाशी भांडणाला आमंत्रण आहे ..कारण त्याने तोच विषय काढला असता ..सर्वांसमोर माझी चोरी उघड झाली असती .. आत गेलोच नाही ..बाहेरूनच परतलो ..वाटेत एका एसटीडी बूथवरून ....टेलिफोन डिरेक्टरीतून त्या हॉस्पिटलचा नंबर घेतला .. तेथूनच हॉस्पिटलला फोन केला ...आपल्याकडे दाखल झालेल्या श्रीमती पुष्पा नातू यांची तब्येत आता कशी आहे हे विचारले ...रिसेप्शनिस्ट मुलीने चौकशी करून सांगितले ..अजून त्या बेशुद्ध आहेत ..आज रात्रभर जीवाला धोका आहे ..पुन्हा अवीच्या रूमवर येवून नशा ...जवळ भरपूर पैसे होतेच ..दर दोन तासांनी हॉस्पिटलला फोन करत होतो ..शेवटी त्या रिसेप्शनिस्टने विचारलेच ..आपण त्यांचे कोण आहात ..कुठे असता वगैरे ..सांगितले की मी त्यांचा मुलगा आहे ..मात्र बाहेरगावी असतो ..रात्रभर जागाच होतो ..केलेल्या कृत्याबद्दल प्रचंड अपराधीपणा वाटत होता ..पहाटे पाचलाच उठून हॉस्पिटलजवळ गेलो ..तर बाहेर माझा भाचा उभा ..मला पाहून म्हणाला ..मामा मी होतो रात्रभर इथे ..आजी अजून शुद्धीवर आलेली नाहीय ..मात्र आधा धोका टळला आहे असे डॉक्टर म्हणाले ..त्याने हळूच मला पाटली बद्दल विचारले .. त्याला म्हणालो हे लोक उगाच माझ्यावर संशय घेत आहेत ..भाच्याशी माझे संबंध मित्रासारखेच आहेत ..म्हणाला ..मामा तू कितीही सांगितलेस तरी तुझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही ..मी खरोखरच पाटली घेतली नाहीय ..माझ्या जवळ काहीच पैसे नाहीत ..असे भासवण्यासाठी त्याला म्हणालो ..कालपासून मी उपाशी आहे ..मला चहा पाज ...त्यासोबत चहा घेतला वरून पाच रुपये घेतले मुद्दाम ..तो इथेच थांब म्हणून आग्रह करत होता ..पण दिवसा इतर नातलग येतील म्हणून थांबलो नाही ..आईच्या जीवाचा धोका टाळला होता ही त्यातल्या त्यात आनंदाची बाब होती ..


खिश्यात पैसे उरले आहेत तो पर्यंत आपणही एखाद्या दवाखान्यात दोन तीन दिवस दाखल होऊन तेथे टर्की काढावी ..आणि व्यसन बंद करावे असे मनाशी ठरवून ..अविसोबत पंचवटीत असलेल्या आयुर्वेदिक दवाखान्यात जाऊन तेथे दाखल झालो ..मात्र जवळ माल होता तो पर्यंत तिथे थांबलो ..दुसऱ्या दिवशी सकाळी माल संपल्यावर टर्की सुरु झाली तसा ..कोणालाही न सांगता तेथून सटकलो .....अवीच्या रूमवर आलो खिश्यात जेमतेम दोन हजार रुपये शिल्लक होते ..म्हणजे मी तीन दिवसात सहा हजार रुपये उडवले ...आई शुद्धीवर येवून तिला आजच डिस्चार्ज मिळणार होता हे समजले होते ..संध्याकाळी आता आईला घरी नेले असेल ..तसेच घरच्या लोकांच्या मूडचा अंदाज घ्यावा म्हणून भावाकडे फोन केला ..माझ्या मोठ्या बहिणीने तो उचलला .. ती आईची अशी बातमी समजल्यावर अकोल्याहून आली असावी ...फोनवर माझा आवाज ओळखून मला रागवायला सुरवात केली ..तुला लाज वाटायला हवी ..असा नीचपणा केलास कसा ?..यापुढे तू आम्हाला मेलास असे म्हणू लागली ..ते ऐकून वैतागलो ..फोन मानसीला दे म्हणालो तर म्हणाली ..या पुढे मानसी तुझ्यासोबत राहणार नाही असे आम्ही ठरवलेय ..तुझी लायकी नाहीय बायको मूल सांभाळायची ..हे ऐकून मात्र मी उखडलो ..तिला म्हणालो तुम्ही माझ्या संसारात ढवळाढवळ करू नका ..मानसीला जर तुम्ही माझ्यापासून दूर केलेत तर मी सर्वांचा बदला घेईन . ..या पूर्वी असेच अनघाला तुम्ही माझ्यापासून हिरावून घेतले आहे..त्याचाच परिणाम म्हणून मी अजून सुधारलो नाहीय ..वगैरे ..फोन वर सर्वाना शिव्या घालू लागलो ..माझी बडबड ऐकून ताईने घाबरून फोन ठेवून दिला ...माझेही डोके फिरले होते .. अपराधीपणाची भावना वाढली होती ..त्यात रागाचीही भर पडली ....अवीच्या रूमवर जावून खूप दारू प्यायलो ..वर ब्राऊन शुगर ..जवळ आता फक्त १०० रुपये शिल्लक होते आणि पाच पुड्या ..आत्महत्या करावी असा विचार मनात घर करू लागला ..द्कानातून एक नवी ब्लेड विकत घेतली ..मरायचेच तर भावाच्या घरासमोर जावून मरू असा विचार केला ..रात्री अकरा वाजता ..खूप दारू प्यायलेल्या अवस्थेत ..भावाच्या घराची बेल वाजवली ...कोणी दार उघडण्यापूर्वीच ब्लेडने डाव्या हाताच्या मनगटावर मोठी चीर मारली ..रक्त बाहेर पडू लागले ...भळभळ वाहू लागले ..खाली जमिनीवर रक्ताचे थारोळे जमत होते ..वाहिनींनी दार उघडले ..त्यांचे लक्ष आधी जमिनीवर पडलेल्या रक्ताच्या थारोळ्याकडे गेले ..त्या मोठ्याने किंचाळल्या ...तसे घरातून भावू ..मोठी बहिण वगैरे बाहेर आले ..मला पाहून भावू म्हणाला ..तू इथे कशाला आलास ..आता तरी आम्हाला सुखाने जगू दे ..तू ताबडतोब इथून निघून जा नाहीतर मी आत्ताच्या आता पोलिसांना बोलावतो ..ते ऐकून तेथे थांबलो नाही ...तसाच रक्ताळलेला हात घेवून ...,रस्त्यावर आलो ..सगळे रक्त वाहून गेल्याशिवाय आपल्याला मरण येणार नाही हे माहित होते ....तेथून मेरीच्या बस स्टॉप वर येवून बसलो ....अंधारातच खिश्यातील उरलेली क्वार्टर लावली ..एक पुडी प्यायलो ..सुमारे तासभर थांबून पुन्हा भावाच्या घरी गेलो ..ब्लेडने कापल्यावर खोल जखम झाली होती हाताला मात्र नेमकी शीर कापली गेली नव्हती ..त्यामुळे आता रक्त कमी येत होते ..या वेळी माझ्या भाच्याने दार उघडले ..त्याने सरळ मला आत बोलाविले ..म्हणाला आधी हाताच्या जखमेवर मलमपट्टी तरी कर ...मला पाहून मानसीने रडणे सुरु केले ....आई बहुधा आतल्या खोलीत होती ..भाच्याने जखमेत हळद भरली ..काहीतरी बडबड करत नशेत मला झोप लागली ..


सकाळी उठल्यावर आधी खिश्यात उरलेल्या ब्राऊन शुगरच्या तीन पुड्या शिल्लक आहेत की नाही याची खात्री करून घेतली ..मानसीला म्हणालो ..मी इथे थांबू इच्छित नाही ..तू पण माझ्याबरोबर आपल्या घरी चल..तेव्हा वाहिनी म्हणाल्या या पुढे मानसीला आणि सुमितला आम्ही तुमच्या सोबत राहू देणार नाही ..तुम्ही त्यांचा जीव घ्यायला देखील कमी करणार नाही ..भावू देखील विरोध करू लागला ..मानसीला विचारले की तुझे काय म्हणणे आहे ? तर ती काहीही न बोलता नुसतीच रडू लागली ..मग म्हणालो ..माझी बायको आणि माझा मुलगा आहे ..ते माझ्या सोबतच राहतील ..मी समर्थ आहे त्यांना पोसायला ..वगैरे बडबड करत पुन्हा भावावर आरोप करणे सुरु केले ..सगळे वेड्या सारखेच चालले होते माझे ..शेवटी मानसी आणि सुमितला घेवून ऑटो करून आमच्या घरी आलो ..मानसी सारखी रडत होती ..तिला समजावत होतो ...शपथा घेत होतो ...मनगटाच्या जखमेतून बरेच रक्त गेल्यामुळे मला अशक्तपणा जाणवत होता ..दोन पुड्या मारून पुन्हा झोप लागली ...दुपारी तीन वाजता ..उरलेली शेवटची ब्राऊन शुगरची पुडी संडासात ओढत बसलो असताना दाराची बेल वाजली ..मानसीने दार उघडण्याचा आवाज आला ..मग संडासा बाहेरून मला म्हणाली ..तुमच्याकडे कोणीतरी आलेय ...मला काही अंदाज येईना कोण असेल ते ..एखादा मित्र असेल या विचाराने पुडी संपवून बाहेर आलो ..तीनचार अनोळखी माणसे बसलेली...मला पाहून त्यातील एकाने उठून माझ्या खांद्यावर हात ठेवला ...मला म्हणाला ..तुमच्या आईने आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्याबद्दल चौकशीसाठी तुम्हाला पंचवटी पोलीस स्टेशनला साहेबांनी बोलावले आहे ..एकदम भानावर आलो ..म्हणजे हे पोलीस होते तर ..डोक्यात पटकन विचारचक्र फिरू लागले ..सुटका कशी करावी ..पाणी पिण्याच्या निमित्ताने आत स्वैपाक घरात जावू न आणि सरळ गँस सिलेंडरची नळी काढून सगळे पेटवून देईन अशी धमकी द्यावी असा विचार पक्का झाला ..त्यांना म्हणालो जरा पाणी पिवून येतो मी ..ते पोलीस पक्के होते ..अजून एकाने उठून माझ्या कमरेत हात घातला ..म्हणाले ..आता पाणीबिणी काही नाही ..सरळ चल आमच्या सोबत चौकीत ..माझा नाईलाज झाला ..मला धरून त्यांनी बाहेर आणले ..मानसीच्या कडेवरचा सुमित आणि मानसी देखील रडत होती ..त्याच्याकडे पाहून क्षणभर जीव गलबलला माझा ..जिना उतरून खाली आल्यावर त्यांनी मला ऑटोत बसवले .


( बाकी पुढील भागात )

===================================================================


सेन्ट्रल जेल ! ( पर्व दुसरे -भाग ११० वा )

ऑटोत बसता बसता माझे बाहेर लक्ष गेले ..एका कोपऱ्यात घाबरलेल्या मुद्रेने मानसीचा धाकटा भाऊ उभा होता ..म्हणजे हे महाशय देखील आले होते तर येथे .. ..ऑटो पंचवटी पोलीस स्टेशनला न थांबता ..पुढे सरळ सीबीएस कडे जाऊ लागली तेव्हा मी त्या पोलिसांना विचारले ....पंचवटी पोलीस स्टेशन मागे पडले ..तुम्ही मला नक्की कुठे नेताय ? त्यातला जरा वयस्कर वाटणा-याने उत्तर दिले ..आपण कोर्टात जात आहोत ..तेथे साहेब भेटतील तुला ..कोर्टाच्या आवारात खाली उतरून पुन्हा एकाने माझा हात पकडला ..एकाने खांद्यावर हात टाकला ..हळूच कानात म्हणाला ..खबरदार जर काही गडबड केलीस तर ..गुपचूप त्यांच्या सोबत चालू लागलो ...वरच्या मजल्यावर पाटी होती ..न्यायदंडाधिकारी वर्ग १ ..बाहेर बरीच गर्दी होती त्या खोलीच्या ...एकाने आत जावून काहीतरी माहिती घेतली ..मी व्हरांड्यातून खालच्या आवारातील गर्दी पाहत असताना ..माझा मोठा भाऊ देखील दिसला मला तिथे ..तो आमच्याच दिशेला पाहत होता ...प्रकरण हळू हळू ध्यानात येत होते ..म्हणजे बहुतेक पोलीस स्टेशनला माझी तक्रार ..मी काल संध्याकाळी बहिणीला फोन वर भांडून धमक्या दिल्यावरच केली गेली असावी ...मग व्यवस्थित मी घरी निवांत आहे अशी बातमी पोलिसांना कळविल्यावरच पोलीस घरी आले असावेत ..म्हणजे मानसीला हे सगळे माहित होते तर ..पण ती माझ्यापासून काहीच लपवत नाही कधीच ..हे मात्र माझ्यापासून लपवले गेले होते ..तरीच मानसी सकाळपासून सारखी रडत होती ..तिला बरेचदा रडण्याचे कारण विचारले .सांगितले नव्हते तिने ....तिला माहित होते मला पोलीस पकडून नेणार आहेत ते ..म्हणून रडत होती ..मात्र मला सांगितले तर मी पळून जाईन म्हणून मला सांगत नव्हती ..


अर्ध्या तासाने माझ्या नावाचा पुकारा झाला ..तसे त्या पोलिसांनी मला आत धरून नेले ..सरळ उभा राहा म्हणाले ..समोर एक तिशीची स्त्री न्यायधीश होती ..तिने तिच्या समोरच्या कागदपत्रावर एक नजर टाकली ...मग मला विचारले ..' तुला पोलिसांनी मारहाण वगैरे केली का ? तसे काही घडले नव्हते ..म्हणून मी नकारार्थी मान हलवली ..मग जामीन आणलाय का असे विचारले ? मी पुन्हा नकारार्थी मान हलवली.. तिने समोरच्या एका कागदावर सही केली .. मला बाहेर आणले गेले ..बाहेर आल्यावर पोलिसांनी माझ्याकडे दोन कागद दिले ..कुतूहलाने मी माझ्यावर कोणती केस लावली गेली ते पाहत होतो ..एका कागदावर शुद्ध मराठीत टाईप केले गेला होते ..त्यात अर्जदार म्हणून सौ .मानसी तुषार नातू असे नाव होते ..पुढे माझे पती श्री .तुषार पांडुरंग नातू ..हे मला रोज पैसे मागतात ..मला मानसिक व शारीरक त्रास देतात ..अशा प्रकारचा मजकूर होता ..खाली मानसीची सही ..दुसऱ्या कागदावर माझ्यावर भारतीय दंड विधान कलम ४९८ अन्वये गुन्हा दाखल करणायत येवून मला चौकशीसाठी १५ दिवस न्यायालयीन कस्टडी सुनावली होती ..म्हणजे आता पंधरा दिवस मला सेन्ट्रल जेल मध्ये राहावे लागणार होते तर ..एकदम सुन्न झालो ..दुपारी पोलिसांनी नुसतेच साहेबांनी चौकशीला बोलावले आहे असे सांगितले होते मला ..मला वाटले होते साहेबांकडे चौकशी झाली कि मला सोडून देतील ..माझ्या हुशारीने मी साहेबाना बरोबर पटविन वगैरे ...आता सगळे उघड झाले होते ..अतिशय व्यवस्थित प्लान करून सगळे झाले होते ..मी आईला ..भावाला पैसे मागून नेहमी त्रास देत होतो हे खरे होते ..मानसी नोकरी करत नव्हती किवा माहेरहून देखील ती पैसे आणून मला देईल अशी स्थिती नव्हती ..त्यामुळे मी तिला पैसे मागतो ..शारीरिक- मानसिक छळ करतो वगैरे गोष्टी मला अमान्य होत्या ..परंतु बहुधा ..स्त्री अत्याचाराची केस अधिक मजबूत होते म्हणून मानसीवर सर्व कुटुंबीयांनी दबाव आणून तीला माझ्याविरुद्ध फिर्याद करण्यास भाग पाडले असावे ..तसेच त्या केस मध्ये साक्षीदार म्हणून माझा भावू ..वाहिनी ..खालच्या मजल्यावर राहणारे एक वृद्ध जोडपे यांच्या सह्या होत्या ..सगळेच माझ्या विरुद्ध होते तर ..सगळे फासे उलटे पडले होते ...


पोलीस मला खाली प्रांगणात घेवून आले ... मला टर्की सुरु होत होती ..दुपारी प्यायलेल्या शेवटच्या पुडीचा परिणाम कमी होत आला होता ..कोर्टातून बाहेर पडत असताना ..समोर भावू आला ...त्याचा चेहरा जरा घाबरलेलाच होता ..पोलीस त्याला म्हणाले ..१५ दिवस सेन्ट्रल जेल ..त्याला पाहून लगेच मी म्हणालो ..' किती दिवस ठेवणार जेलमध्ये ..कधीतरी बाहेर येईनच ..मग पाहतो तुमच्या सगळ्यांकडे ' ..मी त्याला सरळ सरळ धमकी देत होतो ..ते पाहून एका पोलिसाने माझ्या पाठीत एक जोरदार गुद्दा मारला ..गुपचूप चल म्हणाला .. ..सीबीएस वरून ऑटो करून आमची वरात निघाली नाशिकरोड सेन्ट्रल जेलकडे ..पूर्वी पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल मध्ये असताना ..आम्ही जिमखाना ग्राउंड वर क्रिकेट खेळायला वगैरे जात असू तेव्हा सेन्ट्रल जेल वाटेत लागे ..ते मोठे गेट बाहेरून अनेकदा पहिले होते ..कुर्बानी सिनेमाचे शुटींग तिथेच झाले होते ..त्यावेळी ते शुटींग पाहायला देखील गेलो होतो ..तेव्हा त्या उंच भिंतीमागे आत कसे जग असेल याचे कुतूहल होते मला ..आता ते कुतूहल देखील पूर्ण होणार होते तर ...मला मुख्य भीती होती ती टर्कीची ..कारण गेल्या पाच सहा दिवसात पाटली विकून मिळालेल्या पैश्यात भरपूर ब्राऊन शुगर प्यायलो होतो ..त्याचा सगळा त्रास होणार होता ..


( बाकी पुढील भागात )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें