रे तुझ्यावाचून काही ..येथले अडणार नाही ! ( पर्व दुसरे - भाग १५१ वा )
संगीताबाईंच्या घरी पोचल्यावर त्यांनी आम्हाला जेवण वगैरे झालेय का विचारले ..इतक्या रात्री तुम्ही काही त्रास घेवू नका ..आचे बाहेर खाणे झालेय असे मी सांगितले त्यांना ..तरी त्या काही ऐकेनात किमान अंडाभुर्जी बनवते म्हणून मागे लागल्या ..आम्ही अनिल कुठे गेलाय विचारल्यावर म्हणाल्या " मुडदा सकाळ पासून बाहेर जातो ते रात्रीच येतो एकदम .केव्हा येईल काही नेम नाही ..पण येईलच इतक्यात ....झालीय त्याची वेळ ..जेवणाला कोणी विचारात नाही बाहेर ..मी त्याला पैसे देणे अजिबात बंद केले आहे ..त्याचे लग्न लावून दिलेय पण तरीही घरात पाय टिकत नाही '" त्या अनिल बाबत बऱ्याच तक्रारी सांगत बसल्या होत्या .... तिच्या तोंडून माझी आईच बोलतेय की काय असा भास झाला ..कारण प्रत्येक व्यसनीच्या घरी थोड्याफार फरकाने हीच स्थिती असते ..सुमारे अर्ध्या तासाने अनिल आला ..आम्हाला घरात पाहून चकित झाला ..मी अँगीला डोळ्याने इशारा केला त्याबरोबर अँगी अनिलला गळ्यात हात टाकून बाहेर घेवून गेला ..मालाची चौकशी केली .. मला बाहेर बोलावले ...मी त्यांच्या जवळ रविकडून घेतलेल्या दोन हजार रुपयांपैकी ..एक हजार रुपये दिले ..ते दोघेही माल आणायला गेले ..नागपूरमध्ये नाशिकच्या तुलनेत ब्राऊन शुगर जास्त महाग होती ..संगीताबाईंनी गप्पांच्या ओघात ..मी ब्राऊन शुगर सोडलीय मात्र मला दारू चालते ना ? ते विचारले ..मी नुसतीच मान हलवली ...त्या आपणहून विचारात आहेत तर कशाला नाही म्हणा ..एक प्रकारे त्या मला दारू घेणार का थोडी असेच विचारात होत्या ....माझ्या पाहुणचाराचा हा त्यांच्या मते उत्तम मार्ग होता ....अनेक ठिकाणी सन्माननीय पाहुण्यासांठी पाहुणचाराचा मार्ग म्हणून दारूची ऑफर करून ..आग्रहाने दारू पाजली जाते ..संगीताबाईंच्या मते ब्राऊन शुगर खूप वाईट ..दारू जरा बरी ..अनेक लोकांना असे वाटत असते ..ड्रग्स आणि दारू हे दोन भिन्न आहेत ....दारूमुळे फार नुकसान होत नाही ..तर ड्रग्स म्हणजे एकदम खतरनाक ..खरे तर माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवातून दारू आणि ब्राऊन शुगर व इतर ड्रग यात फारसा फरक आढळला नव्हता ....नुकसान दोन्हीत सारखेच होते ..फरक इतकाच की दारू ही विनाशाकडे नेणारी स्लो लोकल आहे ..तर ड्रग्स ही फास्ट लोकल ..
संगीताबाईनी घरातच ठेवलेली एक ओसी ची क्वार्टर काढली ..छानच झाले ..मैत्रीत खूप डोकेफोड करून झाली होती माझी..मला लवकरात लवकर कोणती तरी नशा हवीच होती ..मी अँगी व अनिलची वाट पाहत ..दारूचे घुटके घेत ..संगीताबाईच्या अनिलबद्दलच्या ..त्याच्या त्रास देण्याबद्दलच्या तक्रारी ऐकत बसलो ..अँगी आल्यावर ..आम्ही अनिल सोबत आम्ही त्याच्या घराच्या गच्चीवर गेलो ..तेथे आडोसा पाहून आमचे काम सुरु केले ...संगीताबाईना वाटले अनिल प्यायला गेलाय गच्चीवर आणि मी व अँगी नुसतेच बसलो आहोत त्याला समजावत ...तासाभरातच आम्ही आठशे रुपयांचा धूर केला ...मग खालच्या हॉल मध्ये येवून ...जेवण करून झोपलो ..दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आधी अनिल जवळ अजून पाचशे रुपये दिले ...थंडीच्या दिवसात नशा पटकन उतरते ..सुमारे दहा वाजता ..सामान अनिलच्याच घरी ठेवून आम्ही बाहेर पडलो ..मनातील राग आणि बंडखोरी अजून संपली नव्हती ..खिश्यात पैसे असेपर्यंत संपलीही नसती ...आपण मैत्री सोडून नागपुरातच दुसऱ्या एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रात नोकरी करू असे वाटत होते ..माझ्या जवळ एका व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालकांचा फोन नंबर होता ..मी त्यांना फोन लावून ..तुमची भेट घ्यायची आहे असे म्हंटले ...तर ते बाहेरगावी होते ..दोन दिवसांनी परत येणार म्हणाले ..तो पर्याय संपला ..जवळ आता फक्त पाचशे रुपये उरलेले होते .. संध्याकाळी संपले असते ....नंतर काय हा मोठा प्रश्न होता ...अँगी आणि मी एकमेकांना आपण मैत्रीसाठी आपण किती काम केले ..रवीने त्याची जाण ठेवली पाहिजे होती वगैरे सांगत होतो सारखे ..प्रत्येक व्यसनीला.. तो घरात ...बाहेर कामाच्या ठिकाणी ..खूप उपयुक्त व्यक्ती आहे असे वाटत असते ..अनेकदा तर आपल्यामुळेच सर्व सुरळीत चालले आहे अशा भ्रमात तो असतो ..त्याचा हाच अहंकार त्याला पुन्हा पुन्हा व्यसन करण्यासाठी प्रवृत्त करतो ..मी खूप हुशार आहे ..पूर्वी मी खूप मोठी कामे केली आहेत ..सर्वांच्या भल्यासाठी झटलोय ..वेळप्रसंगी कष्ट केलेत ..त्याच्या बदल्यात माझे व्यसन इतरांनी खपवून घेतले पाहिजे असा त्याचा अट्टाहास असतो ..जरी मी खूप मोठी कामे केली नसली तरी किमान माझ्यावर जर नातलगांचे आणि इतरांचे खरे प्रेम असेल तर ..माझ्या आनंदासाठी म्हणून त्यांनी मला अधूनमधून का होईना व्यसन करू देण्यास आडकाठी करू नये वैगरे ...
सायंकाळी उरलेल्या पैश्यांचा धूर केल्यावर अनिलच्या गच्चीवर ...अंगावर अनिलने दिलेली गोधडी पांघरून विचार करत पडलो होतो ..अनिलच्या आईला अजून जरी माझे ब्राऊन शुगर पिणे सुरु झालेय हे समजले नसले तरी ..त्यांच्या घरी असे किती दिवस राहता येईल आपल्याला ..? अँगीसोबत पुण्याला जावूनही काही विशेष घडणार नव्हते ..अँगी पण माझ्या सारखाच भणंग होता ....दोघांना राहायची देखील सोय नव्हती ..मुंबईला परत जावून रस्त्यावरचे जीवन जगण्यात काही अर्थ नव्हता ....मी जरी अनेकदा रागात सर्वाना ...मी कुठेही जाईन ..कुठेही राहीन ..माझा मी समर्थ आहे वगैरे ऐकवत असलो ...तरी पूर्वी एकदा मी फुटपाथच्या जीवनाचा अनुभव घेवून झाला होता ..तेथे अक्षरशः फाटली होती माझी ..आपण असे आयुष्य व्यर्थ जगण्यासाठी जन्माला आलेलो नाहीत ..तारुण्यात प्रवेश करताना आपण स्वतःबद्दल ..कुटुंबियांबद्दल ..समाजाबद्दल अनेक स्वप्ने पहिली होती ..पुढे एकदा रस्ता चुकल्यावर ..चुकतच गेलो ..भरकटत राहिलो ..कटलेल्या पतंगासारखे ..अधांतरी झोके खात राहिलो ..कुठे पडणार याचा काही नेम नाही ..वारा येईल तसे दिशाहीन भरकटत राहणे हेच आपले जिवन आहे का ? एखाद्या दिवशी मृत्यू गाठणारच ..मरायचे तर प्रत्येकालाच आहे ..परंतु आपण जगलो कसे यालाही महत्व आहेच ...आपले जगणे जर इतरांसाठी त्रास दायक असेल ..त्यांना दुखः देणारे असेल तर ..आपला असून नसूनही काही फायदा नाही ..समजा मी मेलो तरी जगाचे काही अडणार नव्हते ..मला ते गाणे आठवले ' रे तुझ्या वाचून काही येथले अडणार नाही ' मोठे मोठे समाजसुधारक .थोर नेते ..महान संत ..सगळे काळाच्या पडद्याआड गेले ...जगरहाटी थांबली नाही ....इतके मौल्यवान जिवन आपण केवळ आपल्या इच्छेने जगून व्यर्थ करतोय ..आपल्या मृत्युपश्चात काय उरेल .. " बरे झाले गेला एकदाचा ..जगणे नकोसे केले होते आम्हाला ..त्याच्यासाठी काय नाही केले ? तरीही कोणाचेही काही ऐकले नाही कधी ..." असे इतरांचे सुटकेचे दबक्या आवाजातील उद्गार ..!
( क्रमशः )
===================================================================
शरणागती ? ? ? ? ( पर्व दुसरे - भाग १५२ वा )
खिश्यातील पैसे संपत गेले तसा माझा आत्मविश्वास मला सोडून जावू लागला ..माझा मी पाहून घेईन ..कुठेही जाईन ..मेलो तरी पर्वा नाही ..अशा गर्जना करून तडफदारपणा दाखवणे व त्यानुसार खरोखर वागणे यात खूप फरक असतो ..मानव हा समूहात जगणारा प्राणी आहे ....तो सर्वार्थाने स्वतःच्या जिवावर एकटा जगणे कठीणच असते ....अनेकदा खिश्यात पैसे असले की सारे सोपे वाटू शकते कारण बऱ्याच गोष्टी पैश्याने विकत घेता येतात ..मात्र पैसा कधीही भावनिक सुरक्षितता देवू शकत नाही ...पैसा फक्त तुमच्या भौतिक गरजा भागवण्यासाठी मदत करू शकतो .. भावनिक ..मानसिक गरजा भागवण्यासाठी माणसेच लागतात ..ती देखील मायेची ...आपल्यावर प्रेम करणारी ..संकटकाळात आपल्या पाठीशी उभी राहणारी ..दिलासा देणारी ..वेळ प्रसंगी स्तुती करणारी ...तर कधी रुसणारी ..रागावणारी..पुन्हा क्षमा करून सारे अपराध पोटाशी घालणारी मायेची माणसे ..पैश्याने माणसे खरेदी करता येतात मात्र ती यंत्रासारखे बेगडी प्रेम करतात ..पैसा संपताच सोडूनही जातात ..मायेची माणसे ही भाग्यानेच मिळतात .. .माझी चूक असतानाही उन्मत्तपणे ...नशेच्या भरात मैत्री सोडून ..बाहेर पडलो होतो ..माझ्यावर प्रेम असणाऱ्या मित्रांना अव्हेरून ..लहानपणापासूनच्या माझ्या आत्मकेंद्रित वृत्तीमुळे मी फक्त स्वतच्या भावनांचा विचार करत आलो होतो ..माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि माझ्यासाठी त्यागास तयार असलेल्या माणसांच्या भावनांची कधीच काळजी केली नाही म्हणूनच तर भरकटत गेलो होतो ..या वेळीही आपण तीच चूक करत आहोत हे माझ्या ध्यानात येत गेले ...वाटले सरळ रविला फोन करून त्याला म्हणावे ..मी तयार आहे उपचाराला ..येतो परत मैत्रीत ..परंतु अहंकारी मन सहजासहजी असे करू देत नाही ..मी रवी ऐवजी मुकुंदला फोन केला ..त्याने काहीतरी मध्यस्थी करावी अशी इच्छा प्रदर्शित केली ..मुकुंद सरळ म्हणाला ' तुषार ..व्यसनाधीनता हा एक गंभीर मनोशारीरिक आजार आहे हे मी तुझ्याच तोंडून अनेकदा ऐकलेय ..व्यसनाधीनते मुळे अनेक चांगल्या गुणी माणसांची कशी माती झाली ते आजूबाजूला पाहिलेय ..असा आजार झालेल्या व्यक्तीने आयुष्यात एकदाही व्यसन करणार नाही असा पण करून तो पाळण्यासाठी सतत स्वतःला आठवण करून दिली पाहिजे... हेच तर तू पण येथील उपचारात शिकवतोस ....इतके सगळे माहित असूनही तू स्वतःला मात्र अपवाद कसा मानतोस ? तुलाही हा आजार जडलाय हे मान्य करूनही तू त्याची पथ्ये मात्र पाळण्यास तयार नाहीस ...फक्त एकदाच ..आजच्या दिवस ..कधीतरी ..वगैरे समर्थने देत तू आयुष्याची अनेक वर्षे या आजाराशी झुंज देण्यात घालवली तरीही तुला आपल्याला एकदाही व्यसन करता येणार नाही हे स्वीकारता आले नाहीय ..अश्या वेळी वारंवार मदत घ्यावी लागते हे तूच सांगत असतोस ...मग स्वतची वेळ येताच मदत का नाकारतो आहेस ?
मुकुंदचे म्हणणे बरोबरच होते ..तो अवांतर बडबड करत नसे कधीच ....नेहमी मोजके आणि नेमके बोलणारा होता मुंकुंद ..मला त्याचे म्हणणे पटले ....मी त्याला तुझ्या घरी चर्चा करायला येतो असे सांगून त्याच्या घरी गेलो ..तेथे त्याने रविला ही बोलावले होते ..रवी व मुकुंदचा मी पुन्हा एक महिना मैत्रीत उपचार घ्यावेत हाच पवित्रा कायम होता ..मी त्यांना सगळ्या थेरेपीज न करता केवळ काही थेरेपीज करेन अशा अटी घालत बसलो ..हा माझा मानभावीपणा चालला होता ..' तू पेशंट आहेस हे का स्वीकारत नाहीस ? काही आजार दीर्घकाळ पर्यंत ग्रासणारे असतात ..तेव्हा उपचार घेत राहण्यात कसला आलाय कमीपणा ? वगैरे मुकुंद समजावत राहिला ..माझ्या अहंकारामुळे चर्चा फिस्कटली पुन्हा ..तावातावाने उसने अवसान आणून मुकुंदच्या घरातून बाहेर पडलो ..पुन्हा अनिलच्या घरी गेलो ..येथे मुक्काम ठोकून दोन दिवस झाले होते ..संगीताबाई जरी काही म्हणाल्या नव्हत्या तरी माझे स्वागत करण्याच्या वेळचा त्यांचा उत्साह कमी होत चालला होता हे मला जाणवत होते ..इथून बाहेर पडून जावे तरी कुठे हा प्रश्नच होता ....मैत्रीतून बाहेर पडताना रवीने घेवून दिलेला मोबाईल देखील मी परत करून बसलो होतो ..त्यामुळे या दोन दिवसात आई ..मानसी माझ्याशी संपर्क साधू शकल्या नव्हत्या ..किती काळजीत असतील त्या दोघी या विचाराने अवस्थ झालो होतो ....आईला माझे बेगडी तत्वज्ञान ऐकवून मी तिचा फोन कापला होता ..त्या नंतर तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल ? माझ्या बाबतीत असलेली आईची ..मानसीची ..भावाची स्वप्ने मी धुळीस मिळवली होती ....इतकेच नव्हे तर चिमुकल्या सुमितच्या भविष्याचीही पर्वा केली नव्हती ...तरीही ते सगळे माझ्यावर निर्व्याज प्रेम करत राहिले ..प्रत्येक वेळी ..आता सारे ठीक होईल या आशेवर जगले .. प्रत्येक वेळी मी त्याच बेजवाबदारपणे वागत गेलो ..नशेच्या वेडेपणाच्या आकर्षणाला बळी पडलो ..
ती तारीख १० डिसेंबर २००४ होती ..सुमारे तीन दिवस मी अनिलकडे घालवलेले ..जवळचे सगळे पैसे संपलेले ..सकाळी सकाळी शेवटची पुडी संपवून मी चहा घेवून सहज चक्कर मारायला घराबाहेर पडलो होतो ..अनिल आणि अँगी झोपलेलेच होते ..थंडीची सकाळी आठची वेळ ..एक लूत भरलेले कुत्रे रस्त्याच्या कडेला मरून पडलेले दिसले ..क्षणभर त्याच्याकडे पाहून खूप अंगावर काटाच आला ...सुटला एकदाचा असे मनात आले ..अचानक मनात चमकलेल्या विचाराने दचकलो ..कधीतरी आपलेही प्रेत असेच रस्त्याच्या कडेला पडलेले असेल ...बापरे ...किती भयानक अवस्था ? ..मला असा मृत्यू आलेला अजिबात पसंत पडला नसता ...निसर्गाने माझ्यावर कुठलाही अन्याय न करता सशक्त शरीर प्रदान केलेले ..सोबतीला प्रेम करणारे नातलग ..चांगले संस्कार ....मी ओढवून घेतलेल्या प्रत्येक संकटातून मला सहीसलामत बाहेर काढणारे लोक मला वेळोवेळी मिळत गेले ..तरीही माझा माज मात्र कमी झाला नव्हता ..कुठपर्यंत चालणार हा माज ? अनेक वेगवेगळे विचार मनात घोंगावत होते ..त्याच वेळी मानसीची आणि सुमितची तीव्रतेने आठवण झाली ..त्याच तिरमिरीत घरी फोन लावावा वाटले खिश्यात तेव्हढे पैसे होते ..एका पानठेल्यावरून घरी फोन लावला ..आईने फोन उचलला ..माझा आवाज ऐकून तिला खूप दिलासा मिळाला असावा हे जाणवले ..कुठे आहेस तू ? कसा आहेस ? या तिच्या प्रश्नांनी गलबलून आले ..मी ठीक आहे इतकेच बोललो ..मानसीला फोन दे म्हणालो ..मानसी फोन वर आली ..मात्र नुसतेच हुंदके ऐकू येत होते ..ती रडत ..हुंदके देत ..काहीतरी सांगत होती ..तिच्या रडण्यातून काही स्पष्ट ऐकू येत नव्हते ..तरीही हे समजले की मी जे वागतोय हे तिच्यासाठी असह्य होते ..कसा कोण जाणे ..मी जातोय रवीकडे परत असे तिला म्हणालो ..आणि फोन कट केला ..मग रविला फोन केला ..सकाळचे नऊ वाजत आले होते ..माझा आवाज रवीने लगेच ओळखला ..काय म्हणताय तुषारभाऊ ? त्याचा तसाच आश्वासक स्वर ..रवी ..यार कंटाळलो आता ..काय करावे सुचत नाही ? ..यावर तो सहज पणे म्हणाला ...कशाला स्वतःचा त्रास वाढवून घेताय उगाच ? ..त्यापेक्षा या इथे परत ..पाहता पाहता एक महिना संपेल उपचारांचा ..अहंकार बाळगून नुकसानच होते ..मी पटकन त्याला चालेल म्हणालो ..तुला भेटायला सेंटरला येतोय असे सांगितले ..अनिलकडे येवून झोपेतून नुकत्याच उठलेल्या अँगीला ..रवीकडे जावून येतो असे सांगितले ..अनिल सोबत त्याच्या स्कूटरवरून मैत्रीत पोचलो !
( क्रमश : )
===================================================================
मनाची शस्त्रक्रिया ! ( पर्व दुसरे -भाग १५३ वा )
सेंटरला आल्यावर ..एक महिनाभर उपचार घेण्याची माझी तयारी आहे असे रविला सांगितले ..त्याला बरे वाटले ....पुढे मी लगेच रवी जवळ अँगीचा विषय काढला व त्यालाही माझ्यासोबत मी सेंटरला घेवून येतो असे सांगितले ...अँगी मुळे तुषार चांगला असताना बिघडला असा त्यांच्या समज होता ....त्याला म्हणालो ..मी नाशिकहून माल आणला ही माझी चूक आहे ..त्यामुळे अँगीला त्याची शिक्षा मिळायला नकोय ..त्याला पण परत उपचार घेण्याची संधी मिळाली पाहिजे ..रवीने यालाही मान्यता दिली ..सगळी व्यवस्थित बोलणी झाल्यावर रविकडून शेवटचे म्हणून दोनशे रुपये घेतले ..अनिलकडे जावून अँगीला आपल्याला सेंटरला परत जायचे आहे असे सांगून ....थोडासा माल पिवून ...सामान घेवून सायंकाळी सेंटरला आलो ....नेहमी प्रमाणे सायंकाळी मुकुंद ..तसेच चांगले राहून फॉलोअपला येणारे आमचे मित्र आल्यावर ..मुकुंदने मला ऑफिस मध्ये बोलावले ..म्हणाला ' चांगले केलेस ..परत आलास ते ..पण तुझी पत्नी ..मुलगा ..वगैरे मंडळी नाशिकला असतात ..त्यांना भेटायच्या निमित्ताने तुला पुन्हा नाशिकला जायची इच्छा होईल ...आम्ही तुला अडवू शकणार नाही ....त्यावेळी नाशिकला गेल्यार परत असे होणार नाही याची काय खात्री ? ' मुकंदची शंका अगदी रास्त होती ..नाशिकला गेल्यावर का कोणजाणे मी स्वतःला व्यसन करण्यापासून रोखू शकत नव्हतो असा इतिहास होता ..जरी अकोल्यात ...पुण्यात ..धुळ्यात ..इतर ठिकाणीही माझ्या रिलँप्स झाल्या असल्या तरी ...नाशिकच्या बाबतीत हे जास्त वेळा घडले होते ....एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी ..स्थानाशी ..खास मित्राच्या भेटीशी ... जुन्या आठवणींशी .. एकदा व्यसन केले पाहिजे ही माझी भावना निगडीत असावी हे नक्की होते ..मी ते मान्य करून ' या पुढे पाच वर्षे मी नाशिकला जाणार नाही ' असे जाहीर केले ..मी घेतलेला हा निर्णय पाळण्याची जवाबदारी अर्थातच माझी होती ..मी पाच वर्षे नाशिकला जाणार नाही असे जाहीर केल्यावर....रवी आणि मुकुंदचे समाधान झाले ..म्हणाले ' तुझ्या पत्नी व मुलाला लवकरच आपण इथे राहायला घेवून यायची सोय करू ' तो पर्यंत तुला स्वतःवर नियंत्रण ठेवले पाहिजे ..झाले एकदाचा परत सुरक्षित ठिकाणी येवून पोचलो होतो ....!
टर्की मुळे दोन तीन दिवस मी झोपूनच काढले ..नंतर उपचारात सहभागी होण्यास सुरवात केली ....समूह उपचार घेणारे कार्यकर्ते माझ्याच तालमीत तयार झालेले होते ..उपचार घेणाऱ्या मित्रांमध्ये समोर मी बसलेला असल्याने सुरवातीला त्यांची तारांबळ उडत असे ..कारण मीच त्यांना शिकवलेले ते आता मला नव्याने शिकवणार होते ..बोलताना आपले काही चुकेल की काय याची त्यांना धास्ती वाटे ..' ध्यान ' या उपचारात मी अल्कोहोलिक्स अँनाँनिमस च्या ' प्रतिबिंब ' या पुस्तकातील एक विचार रोज वाचून त्यावरचे माझे विवेचन देत असे पूर्वी ..ते विवेचन देताना ..मी अत्यंत तल्लीन होऊन जात असे ..तेच विवेचन माझ्या समोर तेव्हढ्या प्रभावीपणे देणे आमच्या कार्यकर्त्यांना जमत नसे ..त्यामुळे स्वाभाविकच उपचार घेणारे इतर मित्र माझी व त्यांची तुलना करून ' तुषार सर ..जादा अच्छा लेते है ध्यान असे ' त्यांना सुनावत असत..चारपाच दिवसानंतर एकदा तर ..आमचा नवोदित कार्यकर्ता ' प्रतिबिंब ' चे वाचन करत असताना उपचार घेणाऱ्या सगळ्या मित्रानी त्याला थांबवले आणि ते वाचन मीच करावे असा आग्रह धरला ..मी त्यांना सांगितले की सध्या मी पण इथे पेशंट म्हणून आहे ..तेव्हा असे वाचन मी करणे योग्य होणार नाही ..तरीही ते ऐकेनात ..किमान ' ध्यान ' तरी मीच घ्यावे असा त्यांचा आग्रह होता ..त्या नुसार मी ' ध्यान ' घेण्यास सुरवात केली ..' प्रतिबिंब ' या पुस्तकात वर्षाच्या ३६५ दिवसांसाठी रोज ' आत्मचिंतन ' करायला प्रेरित करणारा एक विचार दिलेला असतो ..अल्कोहोलिक्स अँनाँनिमसच्या व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या बारा पायऱ्याचे ...प्रत्येक महिन्यात एका पायरी वरचे विचार ..असे त्या पुस्तकाचे स्वरूप आहे ....तो डिसेंबर महिना सुरु होता ..दहाव्या पायरीवरचे विचार वाचन सुरु होते ..दहाव्या पायरीत असे म्हंटले आहे की ' आम्ही नियमित स्वतचे आत्मपरीक्षण सुरु ठेवले व जेथे जेथे आम्ही चूक आढळलो तेथे त्याची तत्काळ स्वतःशी कबुली देवून दुरुस्ती केली ' या पायरी वरचे विचार मला प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्यास मदत करणारे होते ..
अगदी प्रथम ' मुक्तांगण ' मध्ये ज्या प्रामाणिकपणे मी उपचार घेतले होते ..मोठ्या मँडमवर श्रद्धा ठेवून त्यांच्या सूचनांचे पालन केले होते ..ते सगळे आठवले ..तितका प्रामाणिकपणा नंतर न ठेवता आल्याने माझ्या वारंवार रिलँप्स झाल्याचे माझ्या लक्षात आले ..नुसते व्यसन बंद करून भागत नाही ..तर व्यसन करण्यास प्रवृत्त करणारे माझ्या मनातील विचार बदलले पाहिजेत ..व्यसनमुक्तीचे उपचार घेणे म्हणजे जादूची छडी नव्हे ....नुसते यापुढे व्यसन करणार नाही असे स्वतःशी ठरवले असले तरी ..मानसिकतेत योग्य बदल न करता आल्याने माझ्यासारखेच अनेक जण पुन्हा पुन्हा व्यसनाच्या जाळ्यात अडकतात ..माझ्या व्यसनाधीनतेला इतर कोणी जवाबदार नसून माझे व्यसनाकडे पाहण्याचे दृष्टीकोन ..माझ्या अनियंत्रित भावना ..त्या मागचे अविवेकी विचार ..मनातील असंख्य गुंते ..गाठी ...कारणीभूत आहेत हे उमगले ..हे सगळे निस्तरायला अनेक दिवस लागतात..उपचारा नंतरही ही स्वतःला बदलण्याची प्रक्रिया सतत सुरु ठेवावी लागते ....त्यासाठी सतत स्वतःच्या मनाची शस्त्रक्रिया करावी लागते ..या शस्त्रक्रियेसाठी नेमाने समुपदेशकाशी चर्चा करून त्याचे मार्गदर्शन घेतले पाहिजे ..तसेच एकदा व्यसनमुक्त राहण्यास सुरवात केली की आजवर व्यसनामुळे झालेले सारे नुकसान ताबडतोब भरून निघावे ..गमावलेल्या साऱ्या गोष्टी परत मिळाव्यात ..सर्वांनी माझ्यावर तसाच पूर्वीसारखा विश्वास ठेवावा ..वगैरे अपेक्षा न बाळगता व्यसनमुक्ती वाढवत गेली पाहिजे ...हळू हळू सारे सुरळीत होईल हा विश्वास मनी ठेवून तो विश्वास वाढवत नेला पाहिजे ..हे देखील मान्य केले पाहिजे की गमावलेल्या साऱ्या गोष्टी कदाचित परत मिळणार नाहीत ..तरीही समोर आहे तो वर्तमान ..आणि पुढील भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे ..हा विश्वास मात्र कायम असायला हवा !
( क्रमश : )
========================================================================
========================================================================
चरखा थेरेपी !( पर्व दुसरे - भाग १५४ वा )
' मैत्री ' मधील या शेवटच्या उपचारांमध्ये मी अंतर्मनाची सगळी शक्ती पूर्णपणे वापरून या पुढे काहीही झाले तरी व्यसनमुक्त राहायचे हे ठरवले होते ..वारंवार व्यसन सुरु होण्याची सारी पाळेमुळे खोदून काढायची ..माझ्या अंतर्मनातील सगळे गुंते -गाठी सोडवायच्या ..कितीही मानसिक शारीरिक त्रास झाला तरी पुन्हा व्यसनाच्या मार्गाला जायचे नाही असा निश्चय करत होतो ..माझ्या लक्षात आले की माझ्या व्यसनी होण्याला तसेच वारंवार व्यसन करून उध्वस्त होण्याला कुणी व्यक्ती ..मित्र ..कुटुंबीय ..माझ्या बाबतीत घडलेले चांगले- वाईट ..प्रसंग परिस्थिती ..निसर्ग अजिबात जवाबदार नाहीय तर माझ्या अंतर्मनातील स्वतःबद्दल ..जगाबद्दल ..एकंदरीत जीवनाबद्दल ..तयार झालेले नकारात्मक दृष्टीकोन जवाबदार आहेत ..तसेच दारू ..ब्राऊन शुगर .अन्य मादक पदार्थांबाबत असलेली माझी ' एकदा घ्यायला काय हरकत आहे ' ही वेडेपणाची भावना जोपासण्यासाठी माझा सुप्त अहंकार कारणीभूत आहे ..जन्मतः माझ्या स्वभावात असलेली काही स्वभाव वैशिष्ट्ये ( स्वभाव दोष ) ..चंचलपणा ..भावनिक असंतुलन ..आहारी जाण्याची वृत्ती ..आत्मकेंद्रितपणा ..आत्मकरुणा ( सेल्फ पीटी ) ..कधी कधी प्रबळ होणारी आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना ..आणि निसर्गाने विनामुल्य बहाल केलेल्या स्वस्थ...सदृढ शरीराबद्दलची अनास्था ...नेहमीचा अतिआत्मविश्वास ..सगळ्यांना गृहीत धरण्याची प्रवृत्ती ..याच बरोबर वारंवार व्यसन केल्याचा मानसिक परिणाम म्हणून बेफिकीर वृत्ती ..आजाराचा धूर्तपणाचा भाग म्हणून माझ्यात निर्माण झालेले अमली व मादक पदार्थांबद्दलचे कायमचे आकर्षण ..ज्यामुळे माझ्या सर्व समस्या ..अडचणी ..चिंता ..संकटे यावर एकदा व्यसन केले पाहिजे हा मूर्खपणाचा उपाय ...असे सगळे आहे ..हे सगळे साफ करून एक सर्वसामान्य जीवन जगायला सुरवात केली पाहिजे ..त्यासाठी प्रामाणिक ..आणि सर्व शक्तीनिशी प्रयत्न करण्याचे मी ठरवले ..कितीही वेळ लागला तरी चालेल ..मात्र बदल झालाच पाहिजे ही भावना माझ्या मनात दृढ झाली ..त्या नुसार मी थेरेपी नसेल त्या वेळात ' ध्यान ' करू लागलो ...हे ध्यान म्हणजे डोळे मिटून ..तटस्थपणे आत्मपरीक्षण करत राहणे होते .
आमच्याकडे पूर्वी वर्धा येथे सेवाग्राम आश्रमाशी संबंधित एक जण उपचारांसाठी दाखल होऊन नंतर काही दिवस कार्यकर्ता म्हणून राहत होता ..त्याचे सोबत रवी व मी जाऊन एकदा सेवाग्रामला भेट देवून आलो होतो..तेथून येताना आम्ही दोन छोटे आधुनिक पद्धतीचे चरखे दोन हजार रुपये अनामत रक्कम भरून कौतुकाने आणले होते ..मला नेहमीच नवीन गोष्टीबद्दल कुतूहल असते ..मात्र ते चरखे आणून वर्षभर झाले तरी मी कधी त्याकडे ढुंकूनही पहिले नव्हते ..या वेळी उपचार घेताना निवांत वेळी मी तो चरखा काढून बसलो ..तो कसा काम करतो ते समजून घेतले ..कापसाचा पेळू त्याला अडकवला नीट लावून ..त्याला जोडलेले एक हँडल ..सावकाश फिरवायचे ..मग त्यातून कापडाचे सूत तयार होते ..मी हे शिकू लागलो ..वरवर पाहता सोपे वाटले तरी हे खूप अवघड व अतिशय एकाग्रतेचे काम होते ..सुरवातीला सारखे सूत तुटू लागले ...पेळू चरख्यावर बसवताना चुका होता असत ..मात्र नेटाने ते शिकलो ..चरख्याचे हँडल फिरवताना त्याचा वेग खूप जास्ती ठेवला तर सूत तुटते किवा खूप कमी असला तरी ते बिनसते ..हे लक्षात आले ..मात्र त्याचा वेग नेमका संतुलित कसा ठेवायचा हे शिकताना जाणवले की मानवी भावनांचे असेच आहे ..त्या संतुलित ठेवल्या गेल्या नाहीत तर ..नुकसान होणारच ..काम बिघडणारच ..माझा अतिराग ..अतिनिराशा ..अतिवैफल्य ..अतिआत्मविश्वास ..किवा न्यूनगंड ..अपराधीपणा ..वगैरे भावनांचे तसेच असावे ..प्रत्येक व्यक्तीने चरखा दिवसातून दोन तास तरी चालवलाच पाहिजे असा सेवाग्राम आश्रमात राहणाऱ्या व्यक्तींसाठी नियम बनवला होता गांधीजीनी असे आम्हाला कळले होते ..तो नियम का बनवला असावा ते समजले ..सुतनिर्मिती हा प्राथमिक उद्देश नव्हता ..तर चंचल मनाला एका ठिकाणी बांधून ठेवण्याचा तो एक मार्ग होता हे जाणवले ..चरखा फिरवताना कधी कधी मनात अचानक काहीबाही भूतकाळातले विचार यायचे तेव्हा आपोआप चरख्याचा वेग वाढत असे किवा भविष्यकाळातील काही चिंता मनात उद्भवल्या तर चरख्याचा वेग मंदावत असे ...लगेच सारखे सूत तुटण्यास सुरवात होई ...आधी मला वाटे आपला वेग आपोआप वाढतोय किवा कमी होतोय ..नंतर जाणवले आपल्या मनातील भावना जशा वरखाली जातात तसा चरख्याचा वेगावर परिणाम होतो हे रहस्य समजल्यावर शक्यतो शांतपणे चरखा चालवायची सवय लावून घेतली ..माझ्या सोबत त्या वेळी अँगी देखील दुसरा चरखा काढून बसे ..आम्हाला अनेकदा गप्पा मारण्याचा मोह होई ..पण गप्पा मारताना देखील सूत..वेग यावर लक्ष ठेवावे लागे ...यालाच अवधान म्हणत असावेत .!
यावेळी मी पूर्वी मुक्तांगण मध्ये शिकलेले सगळे नव्याने आठवत होतो ..तसेच अल्कोहोलिक्स अँनाँनिमस ने सुचवलेल्या व्यक्तिगत सुधारणेच्या बारा पायऱ्यांचा मनापासून अर्थ समजून घेत ..त्याचे सखोल विश्लेषण करून ..मला नक्की सुधारणा कशी करता येतील हे ठरवत होतो ..सध्या भूतकाळ ..भविष्यकाळ वगैरे विचार न करता फक्त वर्तमानात मनात काय चालले आहे ..ते योग्य आहे का ? त्यात बदल कसा करता येईल याबाबतच विचार करत राहिलो ..उपचार घेवून महिना पूर्ण होऊन मी पुन्हा कार्यकर्ता म्हणून मैत्रीत वावरू लागलो ..मात्र मी तरीही मी सुधारलो असे न समजता ..सुधारणेच्या वाटेवर वाटचाल करतोय ..अजूनही मी पेशंटच आहे हे मनाला बजावत होतो ..हा आजार कायमचा मानला गेल्याने ..आपण स्वतःला सुधारलो असे न म्हणता सुधारणा करतोय म्हणजे रिकव्हर्ड न म्हणता रिकव्हरिंग असे का म्हणायचे हे नीट समजले ..म्हणजे फाजील आत्मविश्वास टाळता येतो .
( क्रमश : )