दुर्दैवी हरीष ! ( पर्व दुसरे -भाग १४१ वा )
आमच्या सोबत मैत्रीत रहात असताना ..पहिली पालखी म्हणून उचलून आणलेल्या हरिषबाबत हळू हळू सर्व माहिती मिळू लागली ..तसेच त्याच्या विक्षिप्तपणाचे अनेक प्रकारही आम्हाला अनुभवायला मिळाले ....दारूमुळे लिव्हर वर परिणाम होतो हे सर्वश्रुत आहे ..तसेच लिव्हरची तपासणी करून नेमका किती परिणाम झालाय हे देखील शोधून काढता येते ....औषधे घेवून काही प्रमाणात ते परिणाम कमी करून ...व्यसन बंद ठेवल्यास खाण्याची काही पथ्ये पळून व्यसनी व्यक्ती सर्वसामान्य आयुष्य जगू शकतो ..परंतु दारू किवा तत्सम मादक पदार्थांमुळे मानवी मेंदूवर देखील गंभीर परिणाम होतात ..याबाबत बरेच लोक अनभिज्ञ आहेत ...प्रगत विज्ञान देखील अजून मानवी मेंदुबाबत संपूर्ण संशोधन करू शकले नाहीय ...प्रचंड गुंतागुंतीची असलेली मेंदूची यंत्रणा अजूनही वैज्ञानिकांसाठी साठी एक न सुटलेले कोडे आहे....दारू किवा सर्व मादक पदार्थांना शास्त्रीय परिभाषेत ' माइंड अल्टरिंग सबस्टन्स ' असे संबोधले जाते ..याचा सरळ सोपा अर्थ असा की मानवी मनोव्यापारावर किवा मनोवस्थेवर परिणाम करणारे पदार्थ असा सांगता येईल ..सेवन करणाऱ्या व्यक्तीचे विचार ..भावना ..वर्तन यात काही काळा पुरता बदल करणारे हे पदार्थ काही व्यक्तींच्या मेंदूवर कायमचा परिणाम करू शकतात हे व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या चांगलेच अनुभवास आलेले आहे ..दारू व अन्य मादक पदार्थांच्या सेवनाने कायमचे वेडे ...ठार वेडे... झालेले अनेक लोक मला माहित आहेत ....निसर्गाने जसे प्रत्येक मानवाला वेगवेगळ्या क्षमता प्रदान केलेल्या आहेत ..रंग ..रूप ..उंची ..मानसिकता यात जसे वेगळेपण असते तसेच प्रत्येकाच्या मेंदूची कार्य करण्याची क्षमता देखील वेगवेगळी असते ..काही व्यक्तींचे मेंदू दारू व इतर मादक पदार्थांच्या बाबतीत अधिक संवेदनशील असतात ..अश्या लोकांच्या मेंदूवर अगदी अल्पकाळ केलेल्या व्यसनाने देखील मंभीर दुष्परिणाम होतात ...तसेच व्यसनांमुळे मेंदूवर नेमका काय परिणाम होतोय हे तपासण्याची सध्या तरी कुठलीही खात्रीलायक टेस्ट उपलब्ध नाहीय...सेवन करणा-याच्या मेंदूत काही रासायनिक बदल घडून आल्यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन ..आसपासच्या व्यक्ती ..भोवतालची परिस्थिती ...याबाबतचे अत्यंत चुकीचे किवा काल्पनिक आकलन होऊन अशी व्यक्ती विक्षिप्त वर्तन करू लागते ..हे बदल इतके हळू हळू घडत जातात की अनेकदा पूर्ण नुकसान होईपर्यंत ते लक्षात येणे देखील अवघड असते ...डिप्रेशन ..ओब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिंसऑर्डर .स्किझोफ्रेनिया ..पर्सनँलिटी डिंसऑर्डर ..वगैरे सारखे मनोविकार निर्माण होऊन एखादी व्यक्ती कायमची कुचकामी होऊ शकते ...
हरीषने स्वतच्या जीवनाचे एक अजब तत्वज्ञान बनवून ठेवले होते ...आईबापांनी आपल्या नेहमीच पोसले पाहिजे ...सरळ प्रामाणिकपणे काम करून अधिक पैसा मिळू शकत नाही ..काहीतरी लांड्यालबाड्या केल्याच पाहिजेत ...आपल्याला आपल्या मर्जीने जगण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे ..त्यासाठी इतरांच्या भावनांचा विचार करू नये ...कौटुंबिक बंधने ..समाजिक बंधने ....नैतिक बंधने ..वैवाहिक बंधने ..वगैरे अनेक प्रकारची बंधने ..हे एक खूळ आहे ...वगैरे प्रकरचे त्याचे तत्वज्ञान बनले होते ..शाळेत अतिशय हुषार असणारा हरीष सुमारे नववी नंतर वाईट मित्रांच्या संगतीत पडला ...आधी तंबाखू ..धुम्रपान आणि नंतर दारूचेही अधूनमधून सेवन सुरु झाले ..तेव्हाच केव्हातरी ..त्याच्या मेंदूत व्यसनांमुळे रासायनिक बदल होऊ लागले होते .. कॉलेजला प्रवेश घेतल्यावर त्याच्या वर्तनात झपाट्याने बदल होऊ लागला ..दुरुत्तरे करणे ..प्रत्येक चुकीचे असंबद्ध समर्थन देणे ...सगळे जग एक वेडेपणा आहे अशी मनोवृत्ती बनत गेली ..त्यातूनच घरात खटके उडू लागले ....एरवी सर्वसामान्य वाटणारा हरिष जवळच्या लोकांसाठी असहनीय बनू लागला ...अस्वच्छता ...वेळी अवेळी घरी येणे ..त्याचा ' तुच्छतावाद' दिवसेंदिवस वाढतच गेला अशा वर्तनाला कंटाळून..कुटुंबीयांनी त्याला तू घरात न राहता एखाद्या लॉजवर रहा ..आम्ही लॉजचे तसेच तुझ्या जेवणाखाण्याचे ठराविक पैसे तला देवू असे सांगितले ....अतिशय हट्टी असल्याने तो एखाद्या मानसोपचार तज्ञांची मदत घेण्यास देखील तयार नव्हता ..त्याच्या मते मानसोपचार तज्ञ हा ' चुत्या बनवण्याचा धंदा आहे ' मला त्याच्याकडे जायचे नाही ..शेवटी मैत्रीची माहिती मिळाल्यावर..पालकांनी आमच्याशी संपर्क करून हरीषला मैत्रीत ठेवण्याचे ठरवले ...आम्ही त्याला उचलून आणले ..आमच्या सोबत राहताना ..त्याने नियमित अंघोळ करावी ..दात घासावेत ..स्वच्छ कपडे घालावेत म्हणून त्याच्यावर आम्ही नियमित लक्ष ठेवत होतो ..त्याच्या वृत्तीत थोडासा बदल होण्यास सुरवात झालेली होती..आमच्या भीतीने का होईना तो सगळे व्यवस्थित करू लागला ..सुमारे तीन महिने आमच्याकडे राहिल्यानंतर हरिषला घरी सोडण्यात आले ..त्याने बाहेर एका खाजगी ठिकाणी काही काळ संगणकचा छोटासा कोर्स करून नोकरीही केली ..मात्र सुमारे आठ महिन्यानंतर तो पुन्हा जुन्या मित्रांच्या संगतीत गेला ..रीलँप्स झाली ..पुन्हा विक्षिप्तपणा सुरु झाला ..यावेळी प्रमाण वाढले होते ..आम्ही पुन्हा हरिषला उचलून आणला ..या वेळी आम्ही मानसोपचार तज्ञांची मदत घेतली ..त्याला औषधे गोळ्या सुरु केल्या ..त्या गोळ्या तो स्वतःहून घेत नसे ..त्याला समोर उभे करून खायला लावावे लागे ...
एका विशिष्ट टप्प्यावर मानसोपचार तज्ञ फारशी मदत करू शकत नाहीत ..फक्त मेंदूचे अधिक नुकसान होऊ नये म्हणून काळजी घेता येते ..तसेच झाले हरिषचे ..नंतर दोन वेळा संधी मिळाल्यावर हरिष मैत्रीतून पळून गेला ..घरी न जाता बाहेरच भटकत राहिला ..त्या काळात त्याने अजिबात व्यसन केले नाही ..शेवटी कंटाळून पुन्हा स्वतःहून मैत्रीत आला ..इथेच राहतो म्हणाला ..वर्तनात काहीच बदल झालेला नव्हता ..अगदी गेला तसाच परत आला ..चार दिवसा उपाशी होता म्हणे बाहेर ...आता हरीषचे वय सुमारे ३८ वर्षे आहे ..अधून मधून त्याला आईवडील आठदहा दिवस घरी घेवून जातात ..पुन्हा घेवून येतात ....त्याच्या हातून या काळात म्हणजे सुमारे दहा वर्षात किमान पन्नास वेळा त्याचा चष्मा फुटलेला आहे ..अजूनही अंघोळ ..कपडे बदलणे ..वगैरे साठी आठवण करून द्यावी लागते त्याला ...स्वताशी बडबड करण्याचे प्रमाण वाढले आहे ..त्याच्या मते जगात सगळ्यात मूर्ख....बेअक्कल अशी पाच माणसे आहेत आहेत ..एक त्याची आई ..दोन त्याचे वडील .. तीन त्याला उपचार देणारे मानसोपचार तज्ञ ..तसेच त्याला मैत्रीत ठेवणारे रवी पाध्ये व तुषार नातू ..हे त्याचे मत कायमचे बनले आहे ..त्याला उपचार खर्चात सवलत देवून आम्ही ठेवून घेतलेय ..कारण आम्हाला माहिती आहे ..बाहेर हा जगू शकणार नाही ..उपाशी तापाशी भटकेल ..रस्त्यावर फिरणारा ..भणंग ..दाढी वाढलेला ..ओळख हरवलेला ..फाटके कपडे घातलेला वेडा म्हणून ...मग एखादे दिवशी थंडी ..उन..पाउस ..उपासमार यामुळे खंगलेले शरीर दम सोडेल ...रस्त्याच्या कडेला याचे प्रेत बेवारशी सापडेल ....सध्या हरीष आमच्याकडे किरकोळ कामात मदत करतो ..आमच्या धाकाने बरेच विधी सुरळीत करतो ..हरीष सारखे अजून दोन जण मैत्रीचे कायमचे रहिवासी झालेत..बहुधा प्रत्येक व्यसनमुक्ती केंद्रात असे माणसातून उठलेले एकदोन जण सापडतील !
( माझ्या व्यसनाधीनतेच्या काळात ..असे अनेक जण मला माहित आहेत जे व्यसनांमुळे मेंदूत कायमचे रासायनीक बदल होऊन असे विक्षिप्त बनले आहेत ..व्यासानाधीनते मुळे दारूण ..गंभीर .कधीच भरून न येणारे नुकसान झालेले शेकडो लोक मी पहिले आहेत ..म्हणूनच जनजागृतीसाठी हे लिखाण नेटाने करतोय ..)
( बाकी पुढील भागात )
=======================================================================
========================================================================
======================================================================
=======================================================================
=======================================================================
प्राधान्य ..अग्रक्रम ..वगैरे ! ( पर्व दुसरे - भाग १४२ वा )
एखाद्या व्यसनी व्यक्तीने व्यसनमुक्त राहण्याची सुरवात केल्यावर सदोदित आपल्या व्यसनमुक्त राहण्याला प्राधान्य द्यावे असे या क्षेत्रात सांगितले जाते ..म्हणजे एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रत उपचार घेवून .अथवा अल्कोहोलिक्स अँनाँनिमसच्या मिटींगला जायला सुरवात करून ... एखाद्या खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार घेवून ..स्वतच स्वतःच्या मानसिक शक्तीच्या बळावर व्यसन बंद करून ..एकदा व्यसनमुक्त राहण्याची सुरवात झाली की ..त्या व्यक्तीने सुरवातीची काही वर्षे फक्त व्यसनमुक्त रहाणे हेच त्याचे ध्येय ठेवले पाहिजे ..ते ध्येय साध्य करण्यासाठी समुपदेशकाने आवश्यक सांगितलेली मानसिक पथ्ये पाळणे महत्वाचे असते ..त्यात जुन्या व्यसनी मित्रांना न भेटणे ....आपण व्यसन करण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी म्हणजे जेथे ओली पार्टी असेल ...इतर लोक दारू पीत असतील ..अश्या ठिकाणी जाणे टाळणे ..स्वतच्या नकारात्मक भावनांवर सतत नियंत्रण ठेवणे..त्यासाठी कोणाची तरी मदत घेणे ..सतत आत्मपरीक्षण करत राहून स्वत:चे स्वभावदोष शोधून काढून ते कमी करण्याचा प्रयत्न करणे ...किठीही संकटे आली ..समस्या आल्या ....टेन्शन आले ..तरी एकदाही व्यसन न करणे ..जिवनात आपल्या आयुष्यात व्यसनमुक्ती अतिशय महत्वाची ...मगच इतर गोष्टी हे सतत स्वतःला बजावणे आवश्यक असते ..कारण सतत व्यसनमुक्त राहत गेले की शारीरिक ..मानसिक ..आर्थिक ..कौटुंबिक ..सामाजिक वगैरे सगळ्या बाबी हळू हळू व्यवस्थित होत जातात ...याबाबत रविचे स्वत:चे एक छान उदाहरण सांगत असे ..त्याला एकदा मुक्ता मँडमनी समुपदेशन करताना विचारले ..तुझी स्वतच्या जीवनाबद्दल काय काय स्वप्ने आहेत ? ते मला एका कागदावर लिहून दे ...रवीने त्यावर लिहिले मला छान पगार असलेली नोकरी मिळावी .... मनासारखे लग्न व्हावे...स्वतची गाडी असावी ..कुटुंबाचा गमावलेला विश्वास परत मिळावा ..समाजात मान सन्मान प्राप्त व्हावा ..वगैरे ..ते वाचून मँडम हसल्या ..म्हणाल्या आता या कागदाच्या दुसऱ्या बाजूला ..तुझे आई वडील व कुटुंबियांची तुझ्या कडून कोण कोणत्या अपेक्षा आहेत ते लिही ..त्यावर रवीने खूप आठवून ..कुटुंबियांची फक्त मी व्यसनमुक्त राहावे हीच अपेक्षा आहे हे लिहले ..मँडमने रविला तो कागद आता सतत उलटा ठेव ..म्हणजे कुटुंबियांची व्यसनमुक्तीची अपेक्षा लिहिलेला भाग वर ठेव ... आणि तुझी स्वतःबद्दलची स्वप्ने ..जीवनाकडून इतरांकडून असलेल्या अपेक्षा वगैरे लिहिललेला भाग मागच्या बाजूला राहू दे ..त्याचा विचार न करता फक्त व्यसनमुक्तीला आणि संबंधित गोष्टीना प्राधान्य देत रहा काही वर्षे ..मग पहा काय होते ते ..रवीने त्यांनी सांगितल्याप्रमाणे केले ..पाहता पाहता आज त्या गोष्टीला सुमारे पंधरा वर्षे उलटून गेल्यावर ..रवीच्या लक्षात येतेय की तो फक्त मनापासून व्यसनमुक्त रहात गेला ..सगळी पथ्ये पाळत गेला ...तशी तशी त्याची सगळी स्वप्ने पूर्ण होत आलीत ...मलाही पूर्वी मोठ्या मँडमने हेच वेगळ्या पद्धतीने सांगितले होते ..मात्र मी ते गंभीरतेने घेतले नव्हते ..म्हणून मी वारंवार चुका करत होतो .. व्यसनमुक्तीच्या सुरवातीच्या काही वर्षात पथ्ये न पाळल्याने रीलँप्स होतच जाते ...माझ्या बाबतीत अनेकदा चुका करूनही माझे प्राधान्य नेहमीच व्यसनमुक्ती असले पाहिजे ..बाकी सगळ्या गोष्टी नंतर हे योग्य पद्धतीने समजायला मला पुन्हा एकदा रीलँप्सला सामोरे जावे लागले ...!
नागपूरला नव्याने व्यसनमुक्तीची छान सुरवात झाल्यावर ..आता लगेचच माझे सगळे काही व्यवस्थित व्हावे .. मानसी सुमित सोबत राहायला मिळावे ..चांगला पगार मिळावा....वगैरे वाटू लागले ..हे स्वाभाविक असले तरी व्यसनी व्यक्तीसाठी प्राधान्य फक्त व्यसनमुक्तीचे असले पाहिजे हे विसरलो मी ..' मैत्री ' ची आर्थिक घडी अजून नीट बसली नव्हती ..सर्व खर्च भागवताना रवीची ओढाताण होत असे..हे सर्व मी पाहतच होतो ...मला घाई झाली होती लवकरात लवकरात सेटल व्हायची ..खरेतर अजून कुटुंबीयांनी माझ्याकडे पैसे कमावून आण असा अजिबात तगादा लावलेला नव्हता ..तरीही येथे पगार मिळत नाही ..कधी सगळे सुरळीत होणार ..वगैरे चिंता मला सतावत असत ..त्याच काळात एकदा बंधू मुक्तांगण मधून बाहेर पडून नागपूरला आला होता चारपाच दिवस ..बंधू हा प्राणी व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात मला भेटलेला सगळ्यात हुशार व्यसनी ..अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता ....खूप उत्साही ..कार्यक्षम ..कोणतेही काम करण्यास सदैव तत्पर ..इतरांना मदत करण्यात आनंद मानणारा ...वाचन ..संगीत ..अभिनय ..खेळ सर्वात प्राविण्य असलेला ..परंतु अतिशय चंचल ..भावनाप्रधान ..माझ्यासारखच अहंकारी ..जिद्दी ..' असेल तर सुत नाहीतर भूत ' या प्रवृत्तीचा ..त्याच्याकडे व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील प्रचंड अनुभव ..माहिती आहे परंतु ही माहिती स्वतःच्या व्यसनमुक्ती साठी योग्य प्रकारे न वापरता येणारा ..बंधूची पुन्हा रीलँप्स झाल्यावर तो मुक्तांगण सोडून नागपूरला आला होता..मैत्रीचे वातावरण त्याला आवडले ..आम्ही त्याला आग्रह केला इथेच राहण्याचा ..मात्र त्याला ते पटले नाही ..मैत्रीची आर्थिक स्थिती चांगली नाही ..आपल्याला पगार मिळू शकणार नाही हे जाणून होता तो ..तसेच इतकी वर्षे पुण्यात राहिल्याने त्याला पुण्यापासून इतक्या दूर यायचे नव्हते कायमचे ..पाचसहा दिवस तो मैत्रीत राहून टर्की काढून ..परत पुण्याला गेला ..त्या नंतर दहा दिवसांनी त्याचा रविला फोन आला असताना तो माझ्याशीही बोलला ..म्हणाला मी सध्या धुळे जिल्ह्यात बेटावद नावाच्या छोट्याश्या गावी ' संकल्प ' नावाच्या व्यसनमुक्ती केंद्रात संचालक म्हणून काम करतोय ..चांगला पगार मिळतोय मला ..तू पण येथे ये ..तुलाही पगार मिळेल ...आपण मिळून छान काम करू ..बेटावद च्या ' संकल्प ' व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख डॉ. श्री अहिरराव हे होते ..बंधूचा प्रस्ताव मला आवडला .
मैत्रीत इरफानशी होणारी भांडणे ..खुन्नसबाजी ...यांना मी वैतागलो होतोच ..वाटले चांगला पगार मिळत असेल तर जायला काय हरकत आहे ..शिवाय बेटावद हे नाशिक पासून जेमतेम तीन चार तासांच्या अंतरावर ..तेथून आपणास नाशिकला मानसी व सुमित यांना भेटण्यासाठी नियमित जाता येईल ..आता व्यसनमुक्तीचे आठ महिने झालेच आहेत आपले ..आता आपली रीलँप्स होणारच नाही ..आता पैसा कमावणे ..सगळे लवकरात लवकर ठीक करणे याला प्राधान्य दिले पाहिजे ....वगैरे ! रवी जवळ मी बंधू जे म्हणाला त्या बद्दल काहीच बोललो नाही ..मनातल्या मनातच माझे मैत्री सोडून ' संकल्प ' ला जाण्याचे मनसुबे सुरु झाले .
( बाकी पुढील भागात )
========================================================================
मु . पो . बेटावद ! ( पर्व दुसरे - भाग १४३ वा )
' संकल्प ' येथे बंधू आहे आणि तो मला तेथे बोलावतोय म्हंटल्यावर मी तेथे जायचे ठरवले ...रवीला हे मी सांगितले नाही ...त्याच्यापाशी विषय देखील काढला नाही ..कदाचित तो मला अडवेल अशी भीती वाटत होती मला ....खरेतर उलट मी मोकळेपणी रविशी चर्चा करून... माझ्या अडचणी सांगून ..आर्थिक चणचण सांगून..काहीतरी मार्ग काढू शकलो असतो ..परंतु तसे न करता ...रविला न सांगता येथून निघून जायचे असे ठरवले ..तशी संधीही मिळाली मला ..दिवाळीत मानसी ..आई ..सुमित वगैरे मंडळी अकोल्याला येणार होती ..मलाही दोन दिवसांसाठी तेथे बोलावले होते त्यांनी ...त्यानुसार रवीचा निरोप घेवून दोन दिवसांसाठी म्हणून मी अकोल्याला गेलो ..तेथे आई आणि मानसीला ' संकल्प ' बद्दल सांगून तेथे चांगला पगार मिळेल वगैरे गोष्टी सांगितल्या बंधू तेथे आहे म्हंटल्यावर आई जरा सावध झाली ..' मुक्तांगण ' ला असताना मी दोन तीन वेळा बंधू सोबत रीलँप्स झालो होतो हे तिला माहित होते ..ती म्हणालीच ' अरे ..पण बंधू आणि तू एकत्र राहणार म्हणजे काळजीच वाटते ...तुम्ही दोघेही पूर्वी गडबड केलेली आहे ..आता परत एकत्र राहणे कितपत योग्य राहील ? ' यावर मी आता तसे होणार नाही ..अजून तुम्ही लोक विश्वास का ठेवू शकत नाही माझ्यावर ..वगैरे मखलाशी करून आईला चूप केले ..रविला हे माहित आहे का असे तिने विचारल्यावर ..हो रविला माहित आहे असे खोटे बोललो ..बंधू कितीही हुषार असला ..खूप चांगला कलावंत असला .. चांगला माणूस असला तरी ..व्यसनमुक्तीच्या बाबतीत आईला त्याच्यावर आणि माझ्यावर देखील विश्वास नव्हता...ही जोडी एकत्र आली की अनर्थ होऊ शकतो याची भीती तिच्या मनात होतीच ...पूर्वी कादर आणि मी ..अजित आणि मी ..किरण आणि मी ..भारत आणि मी अश्या अनेक जोड्या आईला माहित होत्या ... ठराविक मित्रांच्या संगतीत आल्यावर तुषारला स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते ...यात त्या मित्रांचा दोष नसतो ..दोष दोघांच्या स्वभावाचा असतो ....प्रत्येक व्यसनीला असा एखादा मित्र असू शकतो ..ज्याच्या संगतीत आल्यावर दोघानाही व्यसन करण्याची अनावर ओढ होऊ शकते ...व्यसनमुक्तीच्या बाबतीत आईचा रवि वर जास्त विश्वास होता ..अशा मित्रांना एकटे भेटणे किवा असुरक्षित वातावरणात भेटणे टाळावे लागते ..हे मला नंतर शिकायला मिळाले . तसेच व्यसनमुक्तीच्या सुरवातीच्या काही वर्षात ..व्यसनी व्यक्तीने स्वतच्या जीवना वर परिणाम करू शकणारे मोठे निर्णय घरातील वडीलधारी मंडळी ...समुपदेशक ..यांच्याशी मोकळेपणी चर्चा करून घेतले तर अधिक फायद्याचे असते . स्वतच्या निर्णयाचा अट्टाहास न ठेवता ....त्यांच्या म्हणण्याला मान देवून स्वतचे घोडे पुढे दामटणे बंद केले पाहिजे .. .
अकोल्याहून मी येतोय असा बंधूला फोन करून मी परस्पर ' बेटावद ' जिल्हा धुळे येथे गेलो ..तेथे पोचल्यावर दुसऱ्याच दिवशी बंधूने माझी डॉ. अहिरराव यांचेशी भेट घालून दिली ..त्यांना सर्वजण ' आप्पा ' म्हणत असत ..साधारण पन्नाशीच्या पुढे वय ..टक्कल ..बोलण्यात अतिशय मृदू ..असे व्यक्तिमत्व ....श्री छगन भुजबळ यांचेशी चांगले संबंध असल्याने ..धुळे जिल्ह्यात त्यांचे राजकीय संबंध होते ..तसेच ते त्यावेळी महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य खात्याच्या समितीचे सदस्यही होते ..' श्रीराम अहिरराव मेडिकल ट्रस्ट ' या नावाने ट्रस्ट स्थापन करून त्या मार्फत ' संकल्प ' व्यसनमुक्ती केंद्र सुरु केलेले ..सरकारचे अनुदान देखील मिळत होते संस्थेला ..त्याच प्रमाणे त्यांच्या ट्रस्ट मार्फत इतरही अनेक अनुदानित योजना सुरु होत्या ...व्यसनमुक्तीच्या कामासाठी अनुभवी ..असे कार्यकर्ते मिळून मुक्तांगण सारखे चागले काम उभे रहावे अशी त्यांची तळमळ होती ...व्यसनमुक्तीच्या कार्यात पूर्वाश्रमीचे व्यसनी जर व्यसनमुक्त राहून सामील झाले तर अधिक चांगले ..परिणामकारक आणि तळमळीने काम करू शकतात हे माहित असल्याने त्यांनी बंधूला स्वतःकडे बोलावून घेतले होते ...मग बंधूच्या सल्ल्याने मलाही तेथे कामावर ठेवले ..मला सुरवातीला सहा महिने तीन हजार रुपये पगार ठरला ..नंतर पुढे वाढवू असे त्यांनी सांगितले ..' संकल्प ' व्यसनमुक्ती केंद्राचा परिसर आप्पांच्या घराच्या बाजूलाच होता ..सुमारे हजार फुटांचा हॉल ..त्याला जोडून एक वेगळी खोली ..ऑफिस ..पुढे छान अंगण ज्यात फुलझाडे लावलेली होती ..तर मागच्या बाजूला अंगणात संडास बाथरूम होते ..त्या वेळी तेथे दहा जण उपचार घेत होते ..तेथे दुसऱ्या दिवशी पासूनच मी योगाभ्यास ..ध्यान ..समूह उपचार घेणे सुरु केले ...बंधू आणि माझ्या स्वभावात अनेक समान दुवे असल्याने आमचे चांगलेच जमत होते ..रविला मी नंतर दोन दिवसांनी फोन करून बेटावद येथे ' संकल्प ' व्यसनमुक्ती केंद्रात आलोय ..येथेच राहणार आहे हे कळवले ..कदाचित त्याला वाईट वाटले असावे ..मात्र तो काही बोलला नाही ..उलट मला काळजी घ्या असे सांगून शुभेच्छा दिल्या त्याने ..
बेटावदला ' लोड शेडींग ' या प्रकारचा चांगलाच अनुभव घेतला ..सुमारे आठ ते दहा तास लाईट जात असे ..वीज ..पाणी..चांगले रस्ते या सुविधा सरकारने जनतेला पुरवायच्या असतात हे पूर्वी नागरिक शास्त्रात वाचले होते ..त्या मोबदल्यात जनतेने सरकारला विविध करांच्या स्वरुपात पैसा द्यायचा ...परंतु करवसुली ..सार्वजनिक हिताच्या योजना साऱ्याचाच बट्ट्याबोळ झालेला आहे ..नीट करवसुली करणायत सरकारचे भ्रष्ट अधिकारी नाकाम ठरले आहेत ....जनतेचाही कर बुडविण्याकडे जास्त कल ..कारण घेतल्या जाण-या करांचा योग्य उपयोग होईल असा राज्यकर्त्यांवर विश्वास नाही ... दुसरीकडे जमा झालेला कर योग्य प्रकारे जनतेसाठी खर्च करण्यात राजकीय लोकांना रस नाही ..सगळे स्वतःची तुंबडी भरून घेण्यात मग्न ...जनतेलाही स्वताच्या अधिकाराची व जवाबदा-यांची जाणीव नाही ..असे चित्र ...ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेला दहा दहा तास विजे विना रहावे लागते ..तर शहरी भागात जाहिरातीचे मोठे मोठे होर्डींग.. मोठे मोठे मॉल.. चित्रपटांच्या मोठ्या मोठ्या जाहिराती असलेले फलक या ठिकाणी विजेचा झगमगाट...अनेक ठिकाणी दिवसही स्ट्रीट लाईट सुरु ..हा अनागोंदी कारभार ...सकाळी सहा वाजता गेलेली वीज दुपारी २ वाजता येई ..किवा दुपारी दोन वाजता गेलेली रात्री एकदम दहा वाजता ..अनेकदा आम्हाला कंदिलाच्या उजेडात रात्रीची जेवणे उरकावी लागत असत ..पाहता पाहता मला ' संकल्प ' ला एक महिना होत आला .
( बाकी पुढील भागात )
======================================================================
चुपके चुपके ! ( पर्व दुसरे - भाग १४४ वा )
बंधू आणि मी मिळून बेटावद येथे चांगल्या प्रकारे काम करू लागलो होतो ..उपचार घेणाऱ्या मित्रांचे मुक्तांगण सारखे छान टाईम टेबल बनवून ..त्यात योगाभ्यास ..समूह उपचार ..ध्यान .. व्यक्तिगत समुपदेशन वगैरे सुरु केलेले ...आप्पा ( डॉ. अहिरराव ) खूप उत्साही होते ..त्यांच्या पत्नी ज्यांना आम्ही अक्का म्हणत असू त्या देखील या कामात अप्रत्यक्षपणे सहभाग घेत असत सगळ्या उपचारी मित्रांच्या चहा ..नाश्ता..जेवण या व्यवस्थेचे नियंत्रण व देखरेख करण्याचे काम त्या आनंदाने करत असत ...विविध खानदेशी खाद्यप्रकार त्या आवर्जून करायला लावत असत स्वैंपाक करण्या-या बाईना ...त्यांचा मुलगा डॉ. निलेश ...देखील आम्हाला निरनिराळ्या कल्पना सांगून काम कसे वाढवता येईल याबाबत चर्चा करत असे ..त्यांच्या विविध प्रकल्पांमध्ये काम करणारे त्यांच्या संस्थेतील इतर कार्यकर्ते सगळ्यांशी आमचे चांगले सबंध होते ...रोज सायंकाळी आम्ही सगळ्या उपचार घेणाऱ्या मित्रांना घेवून तेथील नदीवर जात असू ..तेथे बंधू त्यांना व्यायामाचे प्रकार शिकवीत असे ..एकंदरीत ' संकल्प ' व्यसनमुक्ती केंद्राचा कारभार सुरळीत चालला होता ..उपचार घेण्यासाठी अधिक जण प्रेरित व्हावेत म्हणून बंधूने धुळ्यातील स्थानिक वर्तमानपत्रात एकदोन लेख लिहिले ....' लोड शेडींग ' वगळता काहीही त्रास नव्हता आम्हाला तेथे ...आमचा पगार झाल्यावर जवळच नाशिकला घर असल्याने कुटुंबियांना भेटून यावे म्हणून मी आप्पाकडे तीन दिवसांची सुटी मागितली..बंधुलाही तसे सांगितले ...मी नाशिकला जाणार म्हंटल्यावर बंधू जरा अवस्थ झाला ..म्हणाला ' साल्या ..तू नीट परत येशील का ? नाहीतर करशील गडबड '.......' नाही यार बंधू ..आता तरी माझा काहीही विचार नाहीय गडबड करण्याचा ' असे बंधूला पटवत होतो ....अर्थात हे बोलणे सुरु झाल्यावर बहुतेक आमच्या दोघांच्याही मनात ब्राऊन शुगरचे आकर्षण जागृत झाले असावे ...कारण आम्ही दोघेही एकमेकांना चांगले ओळखून होतो ..बंधू पुढे म्हणाला ' जरी तू काही गडबड केलीस तरी इथे समजणार नाही कोणाला ..मी मात्र बरोबर ओळखीन..तेव्हा काहीही एकटा करण्याऐवजी जरा आपल्या दोस्तीची आठवण ठेव ' बंधू मला अप्रत्यक्षपणे हेच सुचवीत होता की नाशिकला गेल्यावर माझा जर ब्राऊन शुगर प्यायचा विचार असेल तर ते मी एकटयाने न करता ..बंधुचाही विचार करावा ...शेवटी मी उघड म्हणालो ..' तसे आता बरेच दिवस झालेत व्यसनमुक्तीचे ...एखादे वेळी केल्याने काही बिघडणार नाही ' ...बहुतेक बंधू माझ्या याच उद्गारांची वाट पाहत असावा ..मला टाळी देवून म्हणाला ..डन...येताना मला पण आण थोडी ...झाले ...बेटावदहून नाशिकला जायला निघतानाच मी डोक्यात ब्राऊन शुगर घेवून निघालो ...
व्यसनमुक्तीच्या काळातही .... संधी मिळेल तेव्हा ..कोणाला समजणार नाही अश्या पद्धतीने ..कधीतरी ..सुरक्षित पद्धतीने ..नुकसान होणार नाही याची काळजी घेवून व्यसन करण्याचे विचार मनात येणे ..त्या विचारांशी खेळणे ...हा ' व्यसनाधीनता ' या घातक आजाराचाच एक भाग आहे ' याला स्लीप इन माइंड ' असे म्हणतात ..अश्यावेळी ते विचार ताबडतोब झटकून टाकणे ..आपल्याला एकदाही करणे जमणार नाही ..कारण एकदा जरी केले तरी शरीरातील ' अँलर्जी ' जागृत होऊन वारंवार व्यसन करण्यासाठी शरीर- मन बंड करेल ...पूर्वी अनेकदा याच विचाराने आपला घात केला आहे ..याची स्वतःला आठवण करून देणे ...पूर्वी व्यसनामुळे झालेले नुकसान आठवणे ...हे विचार मनातून काढून टाकण्यासाठी कोणाची तरी मदत घेणे ..वगैरे गोष्टी कराव्या लागतात ..मात्र बंधू आणि मी दोघेही एकाच माळेचे मणी होतो ..कोण कोणाला अडवणार ? ..म्हणूनच या क्षेत्रात उपचार घेणाऱ्या मित्रांना समुपदेशक नेहमी ' तुम्ही स्वतःसाठी व्यसनमुक्त राहा ' असा सल्ला देतात ...कोणाला समजेल ..कोणीतरी आपल्याला रागवेल ..वगैरे भीती पेक्षा आपण स्वतःचेच नुकसान करणार आहोत ..स्वतःलाच फसवणार आहोत ....पुन्हा एकदा त्यात अडकल्यावर आपलेच नुकसान होणार आहे हे लक्षात ठेवायला हवे ...आपली व्यसनमुक्ती सगळ्यात जास्त आपल्याच फायद्याची असते ....कोणावर उपकार म्हणून आपण व्यसन सोडलेले नाहीय ..याचे भान हवे मग असे चुपके चुपके करण्याचे मनातील विचार पळवणे सोपे जाते .
नाशिकला जाताना आप्पांनी मला तेथे वर्तमान पत्रात ' संकल्प ' बद्दल बातमी देण्याची जवाबदारी दिली ..तसेच पगारा व्यक्तिरिक्त थोडेफार पैसेही दिले खर्चासाठी ...मी बंधूकडून देखील थोडे पैसे घेतले ..तुझ्यासाठी पण ब्राऊन शुगर आणतो म्हणून ...बसमध्ये बसल्यावर ..घरच्या मंडळीना भेटण्याच्या आनंदाऐवजी ...खूप दिवसांनी व्यसन करायला मिळणार याचाच आनंद होता मनात ..' स्लीप इन माइंड ' ने ताबा घेतला होता विचार मनाचा...केव्हा एकदा नाशिकला पोचतो असे झाले होते ..पत्नी मुलाच्या ओढीने नव्हे ..तर ब्राऊन शुगरच्या ओढीने...नाशिकला पोचल्यावर घरी जाण्याऐवजी सरळ अड्ड्यावर गेलो ..तेथून चार पुड्या घेवून ..मग घरी पोचलो ... !
( बाकी पुढील भागात )
=======================================================================
आजाराचा धूर्तपणा ! ( पर्व दुसरे - भाग १४५ वा )
व्यसनाधीनता या मनोशारीरिक आजाराला धूर्त व कावेबाज असेही संबोधले जाते ..याचा सरळ अर्थ असा की ..व्यसनी व्यक्तीने व्यसनमुक्त राहण्याची सुरवात केल्यावर क्वचित ..कधीतरी ..कोणत्याही कारणाने संयमित पद्धतीने ...नियंत्रित पद्धतीने ..तो व्यसन करू शकणार नसतो ....अर्थात हे त्याला वारंवार सांगूनही ...त्याला मात्र त्याच्या अहंकारामुळे असे वाटते की ....मी कधीतरी करण्यास हरकत नाही ..व्यसनाधीनता हा गंभीर आजार आहे ....वगैरे सगळे मान्य करूनही हा आजार ' मला झालेला आहे ' हे त्याच्या पचनी पडणे कठीणच असते...किवा ते स्वीकारणे त्याला जड जाते ... ' मला जमू शकेल ' हे आकर्षण त्याच्या मनात दीर्घकाळ पर्यंत जिवंत राहू शकते ...त्यामुळे तो अधून मधून व्यसनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत राहतो ...अनेकांना कायमचे व्यसन सोडण्याऐवजी ..स्वतःला व इतरांना त्रास होणार नाही इतपत सुरक्षित पद्धतीने व्यसन करण्याचे प्रयोग करावेसे वाटतात ...प्रत्येक वेळी या प्रयोगांचे फलित एकच असते ..ते म्हणजे पुन्हा पुन्हा उध्वस्त होत राहणे ...नवीन नुकसानाला सामोरे जाणे..माझ्याही बाबतीत वारंवार हेच घडत आले होते ...आपण आयुष्यात यापुढे एकदाही ..कधीही व्यसन करू शकणार नाही हे स्वीकारणे मला जड जात होते ..प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कारणांनी मी एकच चूक करत गेलो ...आमच्या ' मैत्री ' व्यसनमुक्ती केंद्रात देखील अनेक सध्या अनेक गुणी मुले..माणसे .. प्रौढ किवा वयोवृद्ध देखील ... ' मी एकदाही व्यसन करू शकत नाही ' हे न स्वीकारता आल्यामुळे ..प्रयोग करत राहतात व पुन्हा पुन्हा उपचारांना यावे लागते ...तर काही सुज्ञ मंडळी एकाच उपचारात चांगले राहतात ..व्यसनमुक्त होतात ...मात्र एक क्षण प्रत्येकाच्या त्याच्या जीवनात नक्की येतो ...जेथे त्यांना त्यांच्या आजाराचा स्वीकार करणे सोपे जाते ..व्यसनमुक्तीची निर्विघ्न सुरवात होऊन व्यसनमुक्ती टिकवता येते ..परंतु तो पर्यंत अश्या व्यक्तीला उपचार देत राहणे हेच पालकांच्या आणि उपचाराकांच्या हाती असते ..नाहीतर ते अधिक अधिक नुकसान करत जातात ...!
नाशिकला गेल्यावर मी अड्ड्यावरून घेतलेल्या चार पुड्या रात्री सगळे झोपल्यावर संडासात जावून प्यायलो ..कोणाला काही संशय आला नाही ...दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी ...वर्तमान पत्रात ' संकल्प ' बद्दल बातमी ....इतर किरकोळ कामे वगैरे करून ..भावालाही भेटून आलो ..त्याला संशय आलाच ...त्याने मला सावध केले ..मी तू उगाच संशय घेतोस ..तसे काही नाही ..वगैरे समर्थने दिली ..दुसऱ्या दिवशी रात्री परत तेच केले ..तिसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा बेटावदला जायला निघताना आधी अड्यावर जावून माल घेतला ....बंधू तेथे मी कधी येतो याची वाटच पाहत होता ..त्याचा एकदाही फोनही येवून गेला ' लवकर ये ' असा ....मग लगेच बंधू आणि मी दुपारी बाजारात चक्कर मारायला म्हणून बाहेर पडलो ..एका सुरक्षित ठिकाणी जावून एकत्र माल प्यायलो ..हे शेवटचे ..पुन्हा नाही ..असे एकमेकांना बजावत ...परंतु पुन्हा आजाराची सुरवात झालेलीच होती ....नंतर पंधरा दिवस पुन्हा सगळे सुरळीत चालले ..मग बंधूने चार दिवसांसाठी पुण्याला जायचे काढले ...तेव्हाही तेच झाले ..पुण्याहून तो देखील माझ्यासाठी माल घेवून आला ..वार्डच्या संडासात आम्ही एकेकटे जावून माल पिवू लागलो ..बंधूने पुण्याला जावून जाहिरात केली होती ' संकल्प ' ची ...तेथे तुषार आणि बंधू आहेत म्हंटल्यावर ..मुक्तांगणला उपचार घेतलेले ..आमचे जुने गर्दुल्ले रीलँप्स मित्र ' संकल्प ' ला उपचारांना येवू लागले ....नाशिक ..त्र्यंबकेश्वर..नगर ..पुणे या ठिकाणचे नफ्फड आमच्या सारखेच प्रयोगशील गर्दुल्ले .... ' संकल्प ' ला उपचारांसाठी येवू लागले ...येताना सोबत ते शेवटचे म्हणून ..माल घेवून येत असत ..त्यात आम्हीही वाटेकरी होऊ लागलो ...नाशिकचा माझा जिवलग मित्र अजित देखील आला ....पुन्हा पिणे सुरु केल्याचा परिणाम माझ्या तब्येतीवर होऊ लागला ..पुन्हा सगळ्या नकारात्मक भावना मनात जोर धरू लागल्या ...कदाचित आमच्या रीलँप्स झाल्याची ..अधूनमधून व्यसन करण्याची कुणकुण आप्पा व अक्कांनाही लागली असावी ..कारण उघड नाही तरी अप्रत्यक्षपणे त्यांनी आम्हाला समजावून सांगितले ..पुढे धुळ्याचा एक गर्दुल्ला आमच्याकडे उपचारांसाठी दाखल झाला ..तेव्हा धुळ्यात कुठे माल मिळतो ही माहिती आम्हाला समजली ..झाले ..मग दर आठ दिवसांनी काहीतरी कारण काढून बंधू किवा मी ..कोणीतरी जवळच धुळ्याला जावून ' माल ' आणू लागलो ..आता पैश्यांचीही ओढाताण सुरु झाली ...
एकदा मी नाशिकला गेलो असताना ..अड्ड्यावर माझा जुना पाकीटमार मित्र कुबेर भेटला ..खूप खराब तब्येत झाली होती त्याची ..पायावर सूज आली होती ..बहुतेक क्षयरोग देखील झाला होता ..सारखा खोकत होता तो ....पूर्वी अनेकदा मी त्याला ' मुक्तांगण ' मध्ये उपचार घे म्हणून मागे लागलो होतो ..तो काही बधला नव्हता ..या वेळी मात्र तो स्वतःहून म्हणाला ' तुषार भाई ..मै भी आता हुं ' संकल्प ' में..जरा तबियत बहोत खराब हुवी है ' एकदाची त्याला उपरती झाली होती तर ..मात्र त्याची तब्येत इतकी खराब झालेली होती की ' संकल्प ' मध्ये टर्की काढू शकेल का ? ..ब्राऊनशुगर त्याच्या शरीरात इतकी खोलवर पसरली होती की ब्राऊन शुगर शिवाय हा जगू शकेल का ? याची शंका होती ...मी त्याच्या घरी जावून त्याच्या पत्नीला व आईला भेटलो ..त्यांना सांगितले की याला एखाद्या हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यास अधिक योग्य होईल ..व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे हॉस्पिटल नव्हे ..याला चोवीस तास वैद्यकीय निरीक्षणात राहण्याची गरज आहे ..वेळ पडली तर ऑक्सिजन ..व इतर हॉस्पिटलच्या सुविधा व्यसनमुक्ती केंद्रात नसतात ..मात्र कुबेर मी तुझ्याकडे ' संकल्प ' लाच येणार म्हणून हटून बसला ...शेवटी मी आप्पांना फोन करून कुबेर बद्दल सांगितले ..त्याला उपचारांना आणू का विचारले .त्याच्या कुटुंबियांना सर्व धोक्याची कल्पना देवून त्याला आण ..हवे तर सोबत त्याच्या पत्नीलाही घेवून ये ..ती त्याच्यावर नीट लक्ष ठेवेल ..अशी सूचना देवून आप्पांनी संमती दिली ..कुबेर आणि त्याच्या पत्नीसह मी बेटावदला पोचलो ...सोबत कुबेरने २० पुड्या घेतल्या होत्या ब्राऊन शुगरच्या !
( बाकी पुढील भागात )
( व्यसनाधीनता या मनोशारीरिक आजाराची सविस्तर माहिती पुढे लिंक दिलेल्या ब्लॉगवर आहे ..सर्वांनी जरूर वाचावी ..व इतरानाही सांगावी )