शुक्रवार, 25 अक्तूबर 2013

समुपदेशनाचे धडे

मँडमचे निधन ....!  ( पर्व दुसरे -भाग ७१ )

' विपश्यना ' अर्धवट सोडून आलो होतो तरी तेथे टर्की निघून गेली असल्याने ..परत घरी आल्यावर मी सुमारे २ महिने चांगला राहिलो ..अनेक दिवस उगाच ' विपश्यना ' अर्धवट सोडली असे वाटत राहिले .. जरी चांगला रहात होतो तरीही मनाची अवस्थता काही कमी होत नव्हती .. वयाची पस्तीशी पूर्ण होत आली होती माझी ..व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातच कार्य करायचे ठरवले होते ..मात्र तेथेही स्थिरावत नव्हतो .. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्य करण्याचा निर्णय घेवून आपण चूक तर केली नाहीय ना ? असे ही अनेकदा वाटे ..कारण सामाजिक कार्यात काम करताना प्रामाणिक पणे काम करणाऱ्यांची आर्थिक प्रगती बेताचीच होते..शिवाय अनेकदा माझी रीलँप्स झालेली असल्याने हाती घेतलेले काम देखील धड करत नव्हतो ..अश्या वेळी बरोबरीचे इतर मित्र ..नातलग ..यांची भेट झाल्यावर जेव्हा ते माझ्याबद्दल विचारत तेव्हा सांगण्यासारखे माझ्याकडे काहीही नव्हते ..तर त्यांची आर्थिक ..कौटुंबिक ..सामाजिक प्रगती पाहून मला न्यूनगंड निर्माण होई ..त्यामुळे मी सार्वजनिक सण- समारंभात ..नातलगात ..जाणे टाळू लागलो .जेव्हा ऐन तारुण्यात होतो..स्वतच्या भविष्यासाठी काहीतरी ठोस करण्याची संधी होती तेव्हा मी बेफिकीर राहून नशा करत गेलो .. मी सगळे एक दिवशी नक्की नीट करीन या अहंकाराने जगलो ..आणी वय वाढल्यावर आपण काहीच करू शकलो नाही ही खंत .. अतिशय विचित्र मनस्थितीत मी जगत होतो ..पुन्हा पुन्हा निराशा ..वैफल्य ...पराभवाचा सल..अपराधीपणा या भावनांच्या चक्रात अडकून गुदमरत होतो ...शेवटी पुन्हा व्यसन सुरु झाले ..!
दिवसेंदिवस व्यसनासाठी पैसे मिळणे दुरापास्त होत होते ..काहीतरी खोटीनाटी करणे सांगून आईकडून ..भावाकडून पैसे उकळत होतो ..प्रत्येक वेळी काहीतरी नवीन कारण शोधात होतो पैसे मागण्यासाठी ..अशातच विश्वदीपणे बातमी आणली मँडम गेल्याची ...सुमारे सात वर्षे त्यांनी त्याच्या कँन्सर सारख्या आजाराशी झुंज दिलीहोती ..केमोथेरेपी मुळे अनेक प्रकारचे त्रास असूनही त्यांनी अगदी शेवटच्या आठ दिवसांपर्यंत मुक्तांगणला जाणे सुरु ठेवले होते .. त्यांचे असे जाणे माझ्यासाठी तसेच त्यांच्या अनेक पेशंटसाठी धक्कादायक होते ..दुसऱ्याच दिवशी मी विश्वदीप सोबत पुण्याला जाऊन आलो ..सोबत विश्वदीप असल्याने ब्राऊन शुगर नेली नव्हती ..पुण्याला एक दिवस राहिलो ..तेथे टर्की सहन केली ....मुक्तांगण मधील वातावरण अतिशय गंभीर होते ... सगळ्या थेरेपीज नियमित सुरु होत्या ..तरीही सगळ्यांच्या चेहऱ्यावरील दुखः लपत नव्हते ....दुसऱ्याच दिवशी नाशिकला परतलो ..नवा घाव घेवून ..आपण आपल्या जवळच्या माणसाना किती गृहीत धरत असतो हे जाणवले .. ती माणसे आपल्या पासून कधी दूर जातील हा विचारही मनाला शिवत नाही ..आणि तसे घडले तर ते स्वीकारणे किती कठीण असते ते अनुभवले .. निसर्ग नियमापुढे सगळे काही व्यर्थ असते ..मानवाचे हे पराधीनपण मला खूप जीवघेणे वाटे ..सगळे काही आपल्या मनाप्रमाणे का घडू नये ? हा बंडखोर विचार वारंवार सतावत असतो .. स्वतची असहायता ..हतबलता .. किवा निसर्गापुढे असणारी आपली शून्य किंमत ...सगळे काही विदारक ..!मँडमच्या जाण्यानंतर मी अधिकच बेभान झालो ..भरपूर नशा करून मनाचे विचारचक्र थांबवण्याचा अथक प्रयत्न ..त्यात अपयश ..पश्चाताप ..अगदी वेड लागल्या सारखा वागू लागलो .. जेवण ..अंघोळ वगैरे गोष्टी नगण्य वाटू लागल्या ..माझी अवस्था विश्वदीप पाहत होता .. शेवटी त्याने एकदा माझ्याजवळ विषय काढलाच .. तू असे कुढत जगण्यापेक्षा सरळ सरळ पराभव पत्करून टाक स्वतचा ....पुन्हा मुक्तांगणला उपचार घे असे त्याने मला सुचविले .. मँडमच्या निधनानंतर मुक्तांगणला जावेसेच वाटेना ..माझे असे वारंवार रीलँप्स होणे मँडम समजून घेत असत ..त्यांच्या नंतर आता तेथे मला कोणी समजून घेईल का ? योग्य वागवतील का ? असे अनेक प्रश्न होते मनात .. शेवटी विश्वदीप खूप मागे लागला म्हणून मुक्तांगणला जायला तयार झालो ..येथे मी आईची काळजी घेईन ..सगळे सांभाळीन .. तू कसलीही काळजी न करता निर्धास्त रहा तेथे असा त्याने धीर दिला .. एकदाचा परत मुक्तांगणला गेलो..विश्वदीपने मुक्ता मँडमला सगळी माहिती पुरवली असावी असे दिसले ..मुक्तांगण मध्ये तितक्याच आस्थेने माझे स्वागत झाले ..अनघाचा दुरावा .. अभय ..संदीपची आत्महत्या ..मँडमचे निधन ..व्यक्तिगत पातळीवरचे अपयश या सगळ्या गोष्टींमुळे माझा जीवनावरची श्रद्धा पूर्ण ढासळली होती .याला ताबडतोब मानसोपचार तज्ञाला दाखवावे असेही कदाचित विश्वदीपने मुक्ता मँडमना सांगितले असावे ..कारण तेथे दुसऱ्याच दिवशी मला नव्याने मुक्तांगणला रुजू झालेले मानसोपचार तज्ञ डॉ . डे यांची भेट घेण्यास सांगण्यात आले .. डॉ . डे यांनी मला माझ्या इतिहासा बद्दल जुजबी प्रश्न विचारले ..मग लग्न का केले नाही वैगरे विचारले .. आता आठवत नाही मला मी त्यांच्याशी नेमके काय बोललो ते ..मात्र मी बोलत असताना ते गंभीर झाल्याचे जाणवले .. त्यांनी माझ्या फाईलवर काहीतरी शेरा लिहिला .. दुपारी लगेच मला मुक्ता मँडमचे बोलाविणे आले .. त्यांनी मला तू डे सरांशी काय बोलला ते विचारले ..यावर मी त्यांना आठवले ते थोडक्यात सांगितले .. पुढे त्या हसून म्हणाल्या .. तू बहुतेक त्याच्या कडे काहीतरी भयंकर विचार व्यक्त केले असल्याचे दिसतेय ..कारण त्यांनी तुला येथे न ठेवता ..मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करावे असा शेरा लिहिलाय तुझ्या फाईलवर ..मी चकितच झालो !
( बाकी पुढील भागात )
======================================================

बंधूचा खजिना ? ? ?  ( पर्व दुसरे -भाग ७२ )

डॉ. डे यांचे जवळ मी काहीही बडबड केली असली आणि त्यांना मी ताबडतोब मेंटल हॉस्पिटलला पाठवण्याजोगा वाया गेलेला वाटत असलो ...तरी मुक्तांगणचे माझे जुने सहकारी व मुक्ता मँडम माझा इतिहास जाणून होत्या त्यामुळे सुदैवाने त्यांनी डॉ . डे चा शेरा गंभीरतेने घेतला नव्हता .. डॉ . डे ना भेटलो तेव्हा माझ्या टर्कीचा दुसराच दिवस होता ...प्रचंड अशी शारीरिक व मानसिक अवस्था असताना मी शहाण्यासारखा बोलणारच नव्हतो ...मी डॉक्टरना मानवी जन्मच काय तर इतर कुठल्याही योनीत जन्म घेणे म्हणजे एक शाप आहे ..कारण प्रत्येक प्राण्याच्या आयुष्यात त्याला अनेक प्रकारच्या वेदनांना ..व्यथांना सामोरे जावे लागते .. जीवन अतिशय अनिश्चित आहे ..कोणाच्याच मनासारखे कधीच घडत नाही ... जर कधीकाळी मनाप्रमाणे घडलेच तर एखादी दुर्घटना लगेच आपले सुख हिरावून नेते .... माणसे उगाचच आपण सुखी आहोत अशा भ्रमात वावरत असतात .. पुन्हा पुन्हा नवीन सुखाच्या मागे धावतात ...वगैरे बोललो होतो ..जेव्हा त्यांनी अनघाच्या दुराव्यानंतर तू लग्न का केले नाहीस असे विचारले तेव्हा मी त्यांना ..लग्न म्हणजे असाच सुख मिळविण्याचा एक भ्रम असतो .. लग्न करून मुलेबाळे जन्माला घालणे म्हणजे पुन्हा नव्या जिवानां या त्रासदायक जगात.. स्पर्धेच्या जगात आणून त्यानाही आपल्या प्रमाणेच ..सुखाच्या भ्रमात जगायला भाग पाडणे आहे ..इथे मीच माझ्या जीवनाला कंटाळलोय .. एकदोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न करून झालाय ..मात्र त्यात अपयशी झालो ..आपल्या मृत्यूची देखील वेळ ठरलेली असते .. म्हणजे एकतर जीवन मनाप्रमाणे जगायला मिळत नाही आणि मृत्यू देखील मनासारखा मिळत नाही ..ही मोठीच शोकांतिका आहे ..असे उत्तर दिले होते ..माझ्या मनात जीवनाबद्दलचा जो कडवटपणा भरलेला होता ..तो सारा मी डॉक्टरांसमोर उघड केला होता ...माझा आयुष्याबद्दलचा नकारात्मक दृष्टीकोन त्यांच्याकडे मांडला होता ..अर्थात मी त्यावेळी हा सर्व विचार अतिशय एकांगी करत होतो हे आज जाणवते आहे ....म्हणूनच त्यांनी कदाचित मला मेंटल हॉस्पिटलला ठेवण्याचा शेरा लिहिला असावा ..खरेतर सुख -दुखः , जन्म -मृत्यू , मिलन -विरह , उन -सावली , दिवस -रात्र , हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे .. मला नेहमीच सुखात जगायला मिळावे ..कधीच दुखः ..आजारपण ..प्रिय व्यक्तीचा विरह ...माझ्या वाट्याला येवू नये असे सतत वाटून मी एकप्रकारे जीवनाचे दुसरे अंग नाकारत होतो ..आहे तसा जीवनाचा स्वीकार करून त्यातल्या त्यात निसर्गाने दिलेल्या मर्यादा आणि क्षमता यांची योग्य जाणीव ठेवून .. आपल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून ...आपण नक्कीच या अनिश्चित ..अशाश्वत ..आयुष्यात आनंद निर्माण करू शकतो हे आज समजते आहे ..सतत आपल्या मनासारखे घडावे ..लोकांनी आपल्या मनाप्रमाणे वागावे .. माझ्या जीवनातील सर्व घटना ..सर्व व्यक्ती .. मी जसा विचार करतो तशीच ...त्याच क्रमाने असावीत हा अट्टाहासच अधिक दुखः देतो ..माणसाला ..
मुक्ता मँडमनी मला वार्ड मध्ये न पाठवता ..आफ्टर केअर विभागातच राहायला सांगितले .. त्यांना माहित होते टर्कीचे चारपाच दिवस उलटून गेल्यावर तुषार नव्याने कामाला लागणार आहे ... आफ्टर केअर मध्ये माझे काही जुने मित्र होतेच ..काही जण नवीन होते .. बंधूशी माझी विशेष जवळीक होती ...तो देखील कदाचित माझ्या सारखाच मनाप्रमाणे जगायला मिळावे या अट्टाहासामुळे वारंवार चुका करत असावा .. मुक्तांगण ला जाताना मी सोबत फक्त कपडे.. पेस्ट -टूथ ब्रश असे सामान बरोबर घेतले होते .. अंघोळीचा साबण तेथेच घेवू असा विचार केला होता ..मात्र मुक्तांगण मध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळण्याचे ठराविक वार होते ..त्यामुळे मला अजून दोन दिवस तरी अंघोळीचा साबू मिळणार नव्हता ..बंधूला मी तशी अडचण सांगून साबण असला तुझ्याकडे जास्तीचा तर दे असे म्हणालो ..बंधूचे डोळे एकदम चमकले ..त्याने मला तोंडावर बोट ठेवून ..इशारा केला मागोमाग येण्याचा .. जिना चढून एकदम गच्चीवर गेलो आम्ही ..तेथे मोठ्या चौकोनी अशा जुन्या पाण्याच्या चार टाक्या होत्या .. त्यातील दोन टाक्या आता गंजल्यामुळे त्यात पाणी साठवले जात नसे ..त्यातील एका टाकीच्या वर बंधू चढला ..मलाही चढण्याची खुण केली .. मी देखील वर चढून गेलो ..टाकीचे पत्र्याचे झाकण उघडून बंधू टाकीत उतरला ..मी होतोच पाठोपाठ .. आता पहिले तर मला आश्चर्यच वाटले .. तेथे बंधूने जमवलेला खजिना होता .. वेगवेगळ्या प्रकारचे अर्धवट वापरलेले साबण .. वेगवेगळ्या ब्रांडच्या अर्धवट भरलेल्या डोक्याला लावायच्या तेलाच्या बाटल्या ..छान घडी करून ठेवलेले जुने वापरलेले कपडे ...वेगवेगळ्या प्रकारचे शेविंग क्रीम ..ब्लँकेट्स ..वगरे सामान होते आतमध्ये .. सगळे सामान छान रचून ..मांडून ठेवलेले ..बंधू म्हणाला " घे तुला कोणत्या ब्रांड चा साबू पाहिजे तो .. हवे असेल तर तेल ..शेविंग क्रीम पण घे ..थंडी वाजली तर ब्लँकेट पण आहे " हे सर्व बोलताना बंधूचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता ..बंधू नेहमीच वार्ड इनचार्ज म्हणून काम करत असल्याने ..त्याने वार्डातील डिस्चार्ज झालेल्या लोकांकडून ..त्यांनी वार्डात असताना वापरलेले हे सामान मागून घेतले होते ..जमवून ठेवले होते ...हेतू हा की जे कोणी गरीब ..गरजू पेशंट मुतांगणला दाखल होतील त्यांना गरजेप्रमाणे हे समान देवून त्यांची मदत करावी ..त्यावेळी बंधू मला मुलांना खेळणी वाटणाऱ्या प्रेमळ संताक्लोज प्रमाणे वाटला ..त्याच्या चेहऱ्यावर देखील त्यावेळी तसेच निर्व्याज ..निर्मळ असे भाव होते . हे सगळे लपवून का ठेवलेस असे विचारल्यावर म्हणाला ' काही लोक उगाचच गरज नसताना केवळ वेगळेपणा म्हणून माझ्याकडे या वस्तू मागत असतात ..म्हणून लपवून ठेवतो व खरा गरजू असेल त्यालाच देतो ..तुला पण फक्त आजच देणार आहे .. या नंतर तुझ्या गरजेच्या वस्तू तू तुझ्या पैश्यातून मागाव .
( बाकी पुढील भागात )
======================================================

अज्ञानी पालक ! ( पर्व दुसरे -भाग ७३ )

टर्की संपल्यानंतर मी पुन्हा मुक्तांगणला स्थिरावलो ...आफ्टर केअर विभागात राहून नियमित व्यायाम देखील करायला सुरवात केली .. आपोआपच आठवड्यातून एक दोन समूहउपचार घेणे .. योगाभ्यासाचे सेशन घेणे ..व्यक्तिगत नेमून दिलेल्या झाडू मारणे ..संडास धुणे वगैरे गोष्टी करू लागलो .. आता लवकर नाशिकला जायचे नाही हा विचार पक्का करत होतो ..कारण नाशिकला वारंवार माझी रीलँप्स होत होती ....त्या वेळी मुक्तांगण मध्ये ज्यांचे उपचारांचे दिवस पूर्ण झाले त्यांचा डिस्चार्ज बुधवारी व नवीन अँडमिशन गुरुवारी होत असत ..त्या दिवशी डिस्चार्ज व अँडमिशनच्या प्रक्रियेतही मदत करू लागलो ....डॉ . डे .यांना नवीन आलेले पेशंट दाखवणे अशीही जवाबदारी मला सकाळी ९ ते ११ या वेळात दिली गेली ...या वेळी मी मस्करी वगैरे यात जास्त वेळ घालवत नव्हतो ....नेहमी टिवल्या बावल्या करणारा ..विनोदी ..उडाणटप्पू अशी माझी जी मुक्तांगण मध्ये प्रतिमा होती ती पुसून काढायचा प्रयत्न सुरु होता माझा ..तरीही कधी कधी आसपास इतकी भन्नाट पात्रे असत की मला त्यांची खोडी काढल्याशिवाय राहवत नसे ....माझे अगदी पहिल्या म्हणजे १९९१ सालच्या वेळचे काही जुने सहकारी होतेच आफ्टरकेअर मध्ये ..तर काही नवीन भरती झालेले..यात द्विजेन व परेश हे दोन नवीन मित्र मिळाले मला .. द्विजेन सुरत येथील तर परेश मुंबई मधील ..
डॉ . आनंद नाडकर्णी प्रत्येक महिन्यात एकदा मुक्तांगणला भेट देत तेव्हा नेहमी प्रमाणे स्टाफ मिटिंग होत असे त्यात स्टाफला येणाऱ्या अडचणींची ..व्यवस्थापनात असणार्या त्रुटींची चर्चा होत असे .. तसेच स्टाफ मधील किरकोळ कुरबुरी सोडवण्याचे काम होतेच ..डॉ . आनंद नाडकर्णी व मुक्ता मँडम शिताफीने अशी प्रकरणे हाताळून योग्य तो निर्णय घेत असत ..मँडमच्या जाण्यानंतर मुक्ता मँडमनी मुतांगणची जवाबदारी घेतली होती .. काही लोकांना हे सुरवातीला घराणेशाही सारखे वाटले ..मात्र मुक्ता मँडमनी मानसशास्त्रात एम .ए केले होते ..तसेच त्यांच्या विषयात त्यावेळी सर्वधिक मार्क्स मिळवून त्यांनी सुवर्ण पदकही मिळविले होते या गोष्टी त्यांची पात्रता सिद्ध करणाऱ्या होत्या ..तसेच नंतर मुक्ता मँडमनी त्यांच्या उत्तम प्रशासन ..योग्य समुपदेशन ..आणि बाबा व मँडम इतक्याच आस्थेने मुक्तांगणचा कारभार त्या चालवू शकतात हे सिद्ध केले .. केवळ डॉ . अवचट यांच्या सुकन्या म्हणून नव्हे तर त्यांच्या इतकीच सामाजिक जाणीव ..तशीच संवेदनशीलता आणि आस्था त्यांच्या मध्ये आहे हे जाणवे त्यामुळे विरोध मावळला होता .
स्टाफ मिटींग्स मधील एक नेहमीची तक्रार अशी होती की बहुधा पालक उपचारामध्ये योग्य सहभाग देत नाही याची ..हा एक मनोशारीरिक आजार आहे ..यात पेशंटची सद्सद्विवेक बुद्धी काम करत नाही ..उपचार घेताना तो योग्य सहभाग नोंदवेल याची खात्री नसते ..तसेच जास्त जिद्दी .हट्टी ..अहंकारी लोकांना एक वेळ उपचार देवून भागत नाही ..काही जणांना वारंवार उपचार द्यावे लागतील या गोष्टींबाबत बहुधा पालक अज्ञानी असत .. मुक्तांगण मध्ये भरती केले म्हणजे आपली जवाबदारी संपली असे काहींना वाटत असे ..तर काही पालक आपल्या रुग्णाची इतकी काळजी करत की दिवसातून दोन तीन वेळा ..जेवला का ? झोपला का ? काय करतोय ? वगैरे प्रश्न फोन करून विचारून हैराण करत असत ... काही पालक केवळ आपल्या पेशंटच्या सांगण्यावरून त्याला उपचार पूर्ण न करता घरी घेवून जात असत . या सगळ्या बाबतीत एकदा स्टाफ मिटिंग मध्ये चर्चा झाली व असे ठरले की पेशंटला अँडमिट करण्याच्या दिवशीच संबंधित पालकांची एक वेगळी मिटिंग घेवून .. त्यांना आजार ..मुक्तांगणचे उपचार ... बदलाची प्रक्रिया ..उपचारांमधील पालकांचा सहभाग .. जवाबदारी ..याबद्दल जाणीव करून दिल्यास पालकांचे सुरवातीपासूनच योग्य प्रबोधन करता येईल .. त्या नुसार कधी कधी बंधू ..कधी खटावकर गुरुजी तर कधी मी अशी मिटिंग घेवू लागलो .
( बाकी पुढील भागात )
======================================================
सर्व साधारण गैरसमज ! ( पर्व दुसरे -भाग ७४ )

व्यसनी व्यक्ती मुक्तांगण मध्ये दाखल होताना जी पालकांची सभा घेतली जाई त्यात व्यसनाधीनते बद्दल तसेच उपचारांबद्दल पालकांच्या मनात अनेक गैरसमज असतात हे प्रत्यक्ष अनुभवत होतो ..पालक अनेक प्रकारचे प्रश्न विचारत असत ..त्यातून त्यांची व्यसनी व्यक्तीच्या वर्तनाने ढासळलेली मनस्थिती पाहायला मिळत होती ..त्यातच त्या व्यसनीबद्दल असलेले त्यांचे प्रेम ..त्याच्या वागण्याबद्दल मनात निर्माण झालेला तिरस्कार .. त्याच्या काही अंगभूत गुणांचे कौतुक .. त्याच्या बदलची चिंता ..काळजी ...व्यसनाबद्दलचा राग ....तो असा का वागतो याबद्दल असलेले अनुत्तरीत प्रश्न ..कदाचित आपणच कोठेतरी याला संस्कार देण्यात ..याच्यावर लक्ष ठेवण्यात कमी पडलो अशी अपराधीपणाची भावना ..त्याला नेमके काय दुखः आहे हे जाणून घेण्याचे कुतूहल अशा अनेक संमिश्र भावना पाहायला मिळत ..
व्यसनाधीनता हा एक मनोशारीरिक आजार आहे व एका व्यसनी व्यक्तीमुळे त्याच्या आसपासच्या किमान ४० नातलगांना त्याच्या व्यसनामुळे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष पणे दुष्परिणाम सोसावे लागतात असे संशोधन आहे ..म्हणूनच या आजाराला कौटुंबिक आजार असे देखील म्हंटले जाते .. एका व्यक्तीच्या व्यसनामुळे सारे कुटुंबियाच अनेक प्रकारच्या नकारात्मक भावनांनी वेढलेले असतात .. असे त्रस्त पालक जेव्हा व्यसनीला मुक्तांगण मध्ये दाखल करायला येतात तेव्हा ..त्यांच्या मनात खूप आशा असते हा सुधारेल याबद्दल ...काही पालक तर भावनावेगाने रडू लागत ..अगदी त्या पेशंटच्या तोंडावर मायेने हात फिरवून त्याला साश्रू नयनांनी निरोप देत ..काही पालक या विरुद्ध असत ..याला आता कायमचेच मुक्तांगणला ठेवा आम्हाला अगदी नकोसा झालाय असे निक्षून सांगत ..मात्र लगेच दुसऱ्या दिवशीपासूनच ते पालक वारंवार फोन करून पेशंट बद्दल चौकशी करून हैराण करत ...काही लोकांना व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे एखादे सर्व प्रकारच्या सुविधांनी युक्त असे हॉस्पिटल असते.. असे वाटत असे ..असे पालक येथे आमच्या पेशंटला स्पेशल खोली द्या .. मनोरंजनाची सारी साधने उपलब्ध करून द्या ..त्याला हवे ते खायला द्या असा आग्रह करत ..अनेकदा असे पालक यांची राहण्याची व्यवस्था कशी आहे ..जेवणाची व्यवस्था कशी आहे ते आधी दाखवा मगच पेशंटला दाखल करू असा हट्ट करत ...तसेच पेशंटला रोज का भेटात येणार नाही ? किमान फोनवर दिवसातून एकदा तरी आम्हाला त्याच्याशी बोलू द्या असे टुमणे लावत ..पहिल्यांदा दाखल होणाऱ्या काही पेशंट सोबत वार्ड मध्ये घालायच्या नवीन पांढऱ्या ड्रेसचे दोन जोड ...नवीन स्लीपर्स .. लोणचे , चटणी , मुरांबा ,, मिरचीचा ठेचा .. विविध प्रकारची बिस्किटे ..केक , पेस्ट्रीज , कोल्डड्रिंक्स..वाचायला मासिके, पुस्तके वगैरे असे त्यावरून पालक किती लाड करत असतील याची कल्पना येई ..असा पेशंट जेव्हा वारंवार रिलँप्स होई तेव्हा याच्या बरोबरचे हे समान प्रत्येक अँडमिशन मध्ये कमी कमी होत जाई यावरून पालकांची झालेली निराशा जाणवे.
काही जण याने रोज थोडी घेतल्यास आमची काही हरकत नाही ..मात्र हा जास्त घेतो म्हणून अँडमिट करावे लागतेय असे समर्थन देवून व्यसनीच्या व्यसनाच्या ओढीला खतपाणी घालत ..तर काही जण याने डूग्ज सोडून दारू प्यायलास आमची काही हरकत नाही असे सांगत ..काहीवेळा तर दाखल करणारे वडील किवा भाऊ देखील दारू पिवून असत .. लग्न झालेल्या बहुतेक केसेस मध्ये व्यसनीचे पालक व त्याची पत्नी यांच्या खूप दुरावा निर्माण झालेला आढळे ..पालकांना वाटे की पत्नी नीट वागत नाही म्हणून हा जास्त प्यायला लागला ..ती सारखी कटकट करते..माहेरी जाते ..घरातील मोठ्यांचा अपमान करते हे याला सहन होत नाही म्हणून पितो अशी तक्रार करत तर पत्नीच्या मते आईवडील खूप लाड करतात यांचे ..यांना हवे तसे पैसे देतात .. चुकांवर पांघरूण घालतात माझ्याबद्दल कान भरतात ..म्हणून यांचे पिणे वाढले .. काही उत्साही पालक तुम्ही मुक्तांगण मध्ये काय काय उपचार करा याबद्दल त्यांच्या सूचना देत ..अश्या सर्व प्रकारच्या पालकांचे शंका निरसन करणे ..त्यांना आजार समजावून सांगणे ..शास्त्रीय मनोशारीरिक उपचार म्हणजे नेमके काय हे समजावून सांगणे ही मोठी कसरतच असे .. मुक्तांगण मधील वरिष्ठ समुपदेशकांकडून आम्हाला तसे मार्गदर्शन देखील मिळे वेळोवेळी .. एकंदरीत उपचार ..पालकांचा योग्य सहभाग ..आणि सुधारणेतील सातत्य याबाबत बरेच शिकायला मिळे आम्हाला !
( बाकी पुढील भागात )
========= ==================================

सनसनी !  
( पर्व दुसरे -भाग ७५ वा )

मुक्तांगण मध्ये पूर्वीसारखाच मी विविध कामांमध्ये मग्न होऊ लागलो ..तशी माझ्या जवाबदा-यात वाढ होत गेली ..आफ्टर केअर विभागाचा प्रमुख म्हणून माझी नेमणूक झाली ..मुक्तांगण मध्ये ३५ दिवसांपेक्षा अधिक काळ वास्तव्य करणाऱ्या लोकांचा आफ्टर केअर हा विभाग इरसाल म्हणूनच ओळखला जाई..निवासी कर्मचारी व अधिक काळ उपचार घेणारे व्यसनी मित्र ..असे सुमारे ३० लोक आफ्टरकेअर विभागात रहात असत ..आफ्टरकेअर विभाग नियम मोडण्यात अग्रेसर मानला जाई ..तसेच येथे राहणारे लोक मुक्तांगणच्या अनेक प्रकारच्या कामात जमेल तशी मदत देखील करत असत ..काही जण अजून घरी जाणे सुरक्षित नाही म्हणून मुक्तांगण मध्ये राहूनच बाहेर नोकरीवर जात ..सायंकाळी ते परत व्यवस्थित मुक्तांगणला परत येत ..सफाई कामे वगैरे जवाबदार्या आफ्टरकेअर विभागाकडे होत्या ...मी विभाग प्रमुख झाल्यावर या सफाई कामाच्या जवाबदार्या देण्याचे काम माझेच होते ..म्हणजे वार्ड ..व्हरांडा ..संडास बाथरूम ..व इतर ठिकाणी सफाई करण्यासाठी नेमणूक करणे .. अर्थात मला स्वतःलाही हे सफाईचे काम करावे लागे ..आफ्टर केअर विभागातील लोक सकाळी सफाईचे काम उरकले की सर्वांबरोबर सकाळी ९.३० ला मेडीटेशन या उपचारात सहभागी होत असत ..मात्र नंतर विशेष काम नसे ....मुक्ता मँडमच्या सुचनेप्रमाणे आफ्टर केअर विभागाच्या लोकांनी देखील योगाभ्यासात सामील व्हावे असे ठरले .. वार्ड मधील पेशंटच्या दुपारी चार वाजता योगाभ्यास करण्याच्या वेळी हॉल भरलेला असे म्हणून आफ्टर केअरच्या लोकांनी सकाळी ५ वाजता उठून योगाभ्यास करावा असे ठरवले गेले .. थंडीच्या दिवसात पहाटे उठून योग करण्यास आम्हाला सर्वाना अतिशय कंटाळा येई ..विभाग प्रमुख असल्याने सर्वांच्या आधी उठून ..सर्वाना उठवणे ..मग योगाभ्यासाला घेवून जाणे हे काम मला करावे लागे ..गम्मत म्हणजे अनेक जण पहाटे अंगावर व्यवस्थित चादर वगैरे पांघरून योगाभ्यास करण्यास येत ..टे मोठे गमतीदार दिसे ..अंगावर चादर अशी घट्ट लपेटलेली असे की त्यांना असणे करणे शक्यच नसे ..तरीही केवळ आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे अशा अविर्भावात हे उपकार केल्या सारखे योगाभ्यासाला येत ..आफ्टर केअर विभागाच्या रोजच्या कार्यक्रमाचा अहवाल लिहिण्याची जवाबदारी देखील आपसूकच मझ्याकडे आली .. थेरेपीज न करणाऱ्या ..योगाभ्यास बुडवणाऱ्या वगैरे लोकांची माहिती मला नियमित मुक्ता मँडमना द्यावी लागे ..हे काम कठीणच होते .. कारण माझ्याच मित्रांची तक्रार मलाच करावी लागे ..शिवाय माझ्या तक्रारीवरून मँडम कोणाला रागावल्या तर ते मित्र माझ्यावर राग धरत .. त्यांना वाटे ..विभाग प्रमुख झाल्यापासून मी चढलो आहे ..माझा अहंकार वाढला आहे ..मी उगाच खुन्नस म्हणून तक्रारी करतो वगैरे आरोप माझ्यावर होत ..अर्थात मी याची पर्वा करत नसे ..
एकदा सकाळी १२ वाजता एक उदय नावाचा आफ्टर केअर विभागातील निवासी कर्मचारी हँगरला लावलेला त्याचा शर्ट घालायला गेला तेव्हा त्याच्या असे लक्षात आले की त्याचा शर्ट पाठीमागून कोणीतरी ब्लेडने चारपाच ठिकाणी फाडून ठेवला आहे ..तो आरडा ओरडा करू लागला .. त्याच वेळी इतर दोघांच्या शर्ट वरही असे ब्लेड ने फाडलेले आढळले .. मग कोणीतरी बातमी आणली की दत्ता श्रीखंडेच्या नवीन घेतलेल्या ..इमारतीच्या आत ठेवलेल्या स्कूटरची सीट कोणीतरी ब्लेडने फाडली आहे ...पुन्हा बातमी आली की दत्ताच्या बाजूला ठेवलेल्या मुक्ता मँडमच्या स्कूटरची सीट देखील तशीच फाडली आहे ..एकदम सगळे वातावरण तंग झाले ..हे काम कोणाचे यावर चर्चा सुरु झाली ..मुक्ता मँडमला तर धक्काच बसला होता ...आपसातील वादामुळे जर हे घडले असेल तर मग मर्यादित प्रमाणात व्हायला हवे होते ..इथे शर्ट ..स्कूटरची सीट अशा ठिकाणी फाडून ठेवलेले होते ..मुक्तामँडचे कोणाशी काही वाकडे असण्याचा प्रश्नच नव्हता ..विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले ..प्रत्येक जण स्वतच्या कल्पनेने हा कोण? याचा शोध घेवू लागला ..यातून चारपाच नावे समोर आली ..माझी आणि उदयची पंधरा दिवसांपूर्वी काहीतरी कुरबुर झाली होती ..त्या निमित्ताने माझेही नाव चर्चेत आले .. हे फार भयंकर होते .. कोणीही कोणाचेही नाव घेत होते.. लगेच त्यावर चर्चा होत होती ..वार्डातील पेशंटचे हे काम असणे शक्य नव्हते कारण ती मंडळी फक्त वार्डात रहात असत .. हा प्रकार सगळीकडे फिरणाऱ्या व्यक्तीने केला होता ..कोणातरी मुद्दाम सनसनी निर्माण करण्यासाठी हे केले असावे की आपला राग व्यक्त करण्यासाठी हे झाले काहीच कळेना ..दिवसाढवळ्या हे घडले होते हे मात्र खरे ..माझेही नाव चर्चेत आहे हे समजल्याने मी घाबरलो होतो ..खरेतर मी सरळ सरळ ..उघड उघड भांडण करणारा होतो ..हे असे मागून ..लपून छपून वार करणे किवा खुन्नस काढणे मला जमलेच नसते ..सरळ एक घाव दोन तुकडे असे माझे गणित असे ..आडदांड पणा ..मारामारी ..या गोष्टीना मी अजिबात घाबरत नसे ..केव्हाही समोरासमोर दोन हात करायला मी तयार असे ..तरीही माझे नाव या इतर दोनचार लोकांबरोबर चर्चेत यावे याचे मला वैषम्य वाटले ..

( बाकी पुढील भागात ) 

मंगलवार, 8 अक्तूबर 2013

विपश्यनेचा अनुभव

आर्यमौन ! ( पर्व दुसरे -भाग ६६ )


स्पीकरवरून सतत गुरुजींच्या सूचना आणि मार्गदर्शन सुरु .. माझी मन एकाग्र करण्याची केविलवाणी धडपड .. किती वेळ झाला असावा याचा अंदाज लागत नव्हता .. केव्हा एकदा गुरुजी डोळे उघडायला सांगतात असे झाले होते मला .. मध्ये एक दोन वेळा डोळे किलकिले करून पहिले ...आता पायाला रग लागलेली .. मग पद्मासन सोडून ..साधी मांडी घातली .. जरा वेळाने पुन्हा मांडी बदलून बदलली ..अतिशय अवस्थ झालो होतो ..मुळातच चंचल असलेले मन ...टर्की मुळे अधिकच सैरभैर झालेले होते ...शेवटी न राहवून डोळे उघडले ..आजूबाजूला पहिले तर माझ्य सारखे काही नवखे डोळे उघडून होते ..एकमेकांची नजरानजर होताच कानकोंडे होऊन पुन्हा डोळे मिटत होते ..कादर बसलेल्या जागी पहिले तर तो जागेवर नव्हता ..पुन्हा डोळे मिटले ..मग मन कादर कुठे गेला असेल हा विचार करण्यात गुंतले ..एकंदरीत मन श्वासोश्वासावर काही केंद्रित रहात नव्हते ..नेमका श्वासोश्वास सोडून सगळीकडे भटकत होते ....मध्येच लघवी वैगरेला जायचे असेल तर जाता येईल असे कालच सांगितले गेलेले ..त्या सूचनेचा फायदा घेवून लघवीसाठी उठलो .. चोर पावलांनी बाहेर आलो..एकदोन जण हॉलच्या बाहेर असलेल्या बाथरूम मध्ये होते .. बहुधा ते देखील कंटाळून बाहेर पडले असावेत ..त्या पैकी एकाने मला खुणेने तळहातावर बोट चोळून तंबाखू आहे की असे मोठ्या आशेने विचारले .. मी मानेने नकार दिल्यावर त्याचा चेहरा उतरला ... 


कादर कुठे दिसेना ..परत हॉल मध्ये येवून बसलो ..सुमारे तासाभराने डोळे उघडण्याची सूचना मिळाली ..एकदम हायसे वाटले मला .. नाश्त्याची सुटी झाली ..आता सुमारे मध्ये दीड ते दोन तास वेळ होता नाश्ता व इतर गोष्टींसाठी ..आधी कादरला शोधू लागलो ..तर एका ठिकाणी कादर आणि संजय दिसले ..बोलायचे नव्हतेच ..नुसताच त्यांच्या बाजूला जावून उभा राहिलो ..मग संजयने खुण केली आणि एका बाथरूमच्या मागे आम्ही तिघे गेलो ..तेथे आसपास कोणीही नव्हते .. संजय एकदम हसायला लागला ..तो स्वतच्याच वैतागाला हसतोय हे लक्षात येवून आम्हीही हसू लागलो ..एकमेकांना टाळ्या दिल्या ..न बोलताच एकमेकांची ' ध्यान ' करताना काय गोची झाली असावी हे एकमेकांना समजले होते ... हे हसणे स्वतच्याच फजितीवर होते ..लगेच हलक्या आवाजात बोलणे देखील सुरु झाले ..हे ' आर्यमौन ' म्हणजे कठीणच होते ..पहिल्याच दिवशी आम्ही मौनाचा नियम मोडला ..आमची कुजबुज सुरु असताना एक धम्मसेवक अचानक समोर आला ..हात जोडून उभा राहिला ... त्याने आम्ही बोलतो आहोत हे कुठूनतरी पहिले होते ..नम्रपणे तो आम्हाला नियम पाळण्याची आठवण करून देत होता ..त्याचे असे हात जोडून उभे राहणे आम्हाला खजील करणारे होते ..गुपचूप इथून सटकलो सगळे .. 

डायनिंग हॉलच्या बाहेर नाष्ट्या साठी रांग लागलेली ..तेथे रांगेत लागलो ..निशब्दपणे सगळा कारभार चाललेला ..नाश्त्यामध्ये उपमा ..दोन केळी.. दुध होते ..मला टर्कीत असल्याने भूक लागलेली नव्हतीच ..मात्र रात्रभरच्या जागरणाने खूप पित्त झालेले होते ..म्हणून अर्धा ग्लास दुध घेतले ..इतकी माणसे आजूबाजूला वावरत असूनही सगळीकडे निरव शांतता .. सगळा कारभार न बोलता . खाणाखुणा न करता चाललेला .. दुध घेवून बाहेर आलो ..समोरच एका बाकावर कादर आणि संजय पुन्हा बसलेले दिसले .. कदाचित आम्ही नकळत एकमेकांवर नजर ठेवून होतो .. बिडीची पुन्हा आठवण झाली ..कादर आणि संजय इतके स्वस्थ कसे बसले असावेत ? साल्यानी गुपचूप कुठूनतरी बिडीचा बंदोबस्त केला असावा असा संशय आला .. त्यांना खुणेने बिडी मागितली .तर अगदी अपराध्या सारखा चेहरा करून त्यांनी नकार दिला ..पुन्हा तिघे जरा निर्जन ठिकाणी जावून बोलू लागलो ..बिडीचा काहीतरी बंदोबस्त झाला पाहजे असे तीव्रतेने आम्हाला वाटत होते ...जणू आमच्यावरच नजर ठेवून असल्यासारखा तो धम्मसेवक पुन्हा कुठून तरी उगवला ..हात जोडून समोर उभा राहिला .. त्याची नम्रता आम्हाला खूप लाजवणारी होती ..भामटे होऊन पुन्हा एकमेकांपासून दूर झालो .

( बाकी पुढील भागात )

======================================================


अनित्य भाव ! ( पर्व दुसरे -भाग ६७ ) 


नाश्ता झाल्यावर अंघोळ उरकून ध्यानकक्षात गेलो ...आता पुन्हा दोन तास ध्यान होते .. मांडी घालून बसल्यावर परत कँसेट लावली गेली ...तोच भारून टाकणारा धीर गंभीर आवाज ..सूचना ... संवेदनाचा अनुभव .. मनाचा चुकारपणा .. मध्येच लहानपणी शाळेत पाठ केलेली बहिणाबाईंची कविता आठवली .. ' मन पाखरू पाखरू , त्याले ठायी ठायी वाटा ..आता होतं भुईवर गेल गेल आभाळात ' हे अवखळ मन कसे ताब्यात ठेवावे ? सारखी विचारांची आवर्तने ..म्हणजे एकाच वेळी मी सूचनाही ऐकत होतो .. त्या पालन करण्याचा निर्धारही करत होतो ..त्याच वेळी मनही आपले स्वतच्या मस्तीत चौफेर उंडारत होते ..नेमक्या त्याच वेळी ..लहानपणीच्या अगदी विस्मृतीच्या गर्तेत गेलेल्या आठवणी हटकून मन:पटलावर येवून वाकुल्या दाखवत होत्या ....अगदी कितीही हाकलल्या तरी सारख्या मला टुक टुक करत होत्या .. चारपाच वेळा मांडी बदलून झाली ..पायाला रग लागली ...पाठीत कळा.. डोक्यात विचारांचा भुंगा .. आणि त्यात टर्की ..वेड्यासारखे झाले मला ..अचानक गहिवरून यायला लागले ..वाटले खूप रडून घ्यावे ..स्वतच्या आयुष्यावर .. पराभवावर ..सतत गोंजारत बसलेल्या व्यथेवर .. शेवटी डोळे उघडलेच .. बाथरूमसाठी बाहेर सटकलो ....कादरची सहनशक्ती माझ्याआधीच संपलेली ..तो जणू माझीच वाट पाहत असल्यासारखा बाहेर उभा ..मला बाहेर येताना पाहून मनापासून हसला .. मग बाथरूमच्या मागे गेलो दोघे ..हळूच कुजबुज करत .एकमेकांचे हाल हवाल घेवू लागलो ....एकदोन जण अजून उठून बाहेर आले तसे आम्ही अपराध्यासारखे पुन्हा आत गेलो .. गुरुजींच्या सूचना सुरूच होत्या स्पीकरवर ..श्वास आला ... गेला ..पुन्हा नवीन श्वास .. प्रत्येक श्वासागणिक जीवन पुढे जातेय ..कणाकणाने ..क्षणाक्षणाने..तिळतीळ.. मघाचा क्षण मागे पडला .. नवीन श्वास नवीन क्षण .. नाकाजवळ श्वास घेताना हलकेसे हुरहूरलेपण .. रोमांच .. खाजवल्याची भावना .. 
गेला तो क्षण ..सगळ्या वेदना ...संवेदना अनित्य आहेत ..भ्रम आहेत मनाचे ...एकमेव सत्य हेच की श्वास सुरु आहे ..शरीर जिंवंत आहे ..त्याची सगळ्यात निकडीची गरज म्हणजे पुढचा श्वास .

जीवनातील दुख: ..आनंद .. निराशा .. वैफल्य ..सगळ्या भावना अनित्य ..क्षणभंगुर .. सगळे उत्सव कधी न कधी संपणार .. भ्रमित भावनाचक्र असेच फिरत राहील...काही क्षण गुरुजींच्या सूचनांकडे मन एकाग्र झाले .. खरोखर हे जीवन पुढे पुढे जात आहे .. आपणही हळू हळू ..प्रत्येक श्वासागणिक वार्धक्याकडे जाणार .. मग ..मग ..जरा.. व्याधी ..शेवटी मृत्यूला सामोरे जाणार.. ज्या शरीराच्या भोगांसाठी मरमर केली ..हेवेदावे ..वैर ..द्वेष ..तिरस्कार ...लळा ..जिव्हाळा .. ओढ ..तारुण्याचा उन्माद ..आसक्ती ..सगळे सगळे शेवटी शून्य होणार ..निश्चेत होणार शरीर ... वासनांचे उत्सव थंडावणार ....बापरे ! ..मी एकदम घाबरून डोळे उघडले ....पुन्हा मोहाच्या दुनियेत प्रवेशलो ...घर .. कॉलेज .. मित्र ..अनघा .. मुक्तांगण .. पुन्हा असत्याची झापडे ओढून स्वतःवरच खुष झालो ...वेळ संपत आली होती .. गुरुजींनी एक पाली भाषेतील श्लोक म्हंटला .. शेवटी सबका मंगल हो ..सबका मंगल हो ..सबका मंगल हो असे गुरुजींनी म्हंटले ..त्यांच्या पाठोपाठ सर्वांनी तेच म्हंटले ....मला आठवले लहानपणी ' शुभंकरोति कल्याणं , आरोग्यं धनसंपदा ..शत्रुबुद्धि विनाशाय ..दीपज्योती नमोस्तुते : ' म्हणून झाल्यावर शेवटी आई देवासमोर हात जोडून ..सर्वाना चांगली बुद्धी दे .. असे म्हणायला लावायची .

जेवणाची वेळ झाली होती ..सगळे डायनिंग हॉल कडे निघाले ....जेवणात अगदी कमी तिखट ..कमी मसाले ..मात्र अतिशय रुचकर जेवण होते .. थोडासे जेवलो .. आता विडीची तल्लफ आली .. तेथे काहीतरी दुरुस्तीचे काम सुरु होते .. काम करणारे मजूर आराम करत बसले होते एका झाडाखाली .. कादरने डोळ्यानीच त्या मजुरांकडे इशारा केला ..मी समजलो ..त्या मजुरांकडे नक्की बिडी असणार ..हळूच आम्ही दोघे त्या मजुरांमध्ये जावून बसलो ..कादरने हलक्या स्वरात त्यांना बिडी मागितली ..तर त्यांनी नकारार्थी मान हलवून हातातील तंबाखूची डबी दाखवली .. कादरने लगेच हात पुढे करून चिमुटभर तंबाखू घेतली त्याच्याकडून .. मला तंबाखू खाणे अजिबात जमत नसे .. पूर्वी एकदोन वेळा चिमुटभर दाढेखाली ठेवली होती ..मात्र नंतर थुंकून टाकल्यावर बराच वेळ तोंडात काहीतरी अडकलेय असे वाटत राहिले ..शेवटी स्वच्छ चूळ भरून दात घासले तेव्हा .. बरे वाटले होते ..तेव्हा पासून मी तंबाखूच्या वाट्याला गेलो नव्हतो .

दोन तास विश्रांतीसाठी मोकळे होते .. संजय आलाच आम्हाला शोधात ..मग तिघेही ..एकांतात जावून कुजबुजल्या स्वरात गप्पा मारू लागलो .... उगाच इकडे तिकडे टंगळ मंगळ करत फिरलो .. ध्यानाची वेळ झाल्यावर आपापल्या जागी जावून बसलो .. पुन्हा दोन तास ..अनित्य भाव .. फक्त श्वास एके श्वास .. 

( बाकी पुढील भागात )

=====================================================

साधक नव्हे बाधक !  (पर्व दुसरे -भाग ६८ )



पाहता पाहता दोन दिवस उलटले ' विपश्यनेचे ' ..दिवसभरात सुमारे सहा तास ध्यान ..नंतर सायंकाळी २ तास गोयंका गुरुजींचे विवेचन ..त्या विवेचनात गुरुजी मनात काय काय खळबळ उडते ते अगदी तंतोतंत सांगत असत .. सायंकाळी जेवणा ऐवजी मक्याच्या लाह्या ..रात्री ज्यांना मधुमेह आहे त्यांच्या करिता जेवण असे त्या जागी स्टीलच्या मोठ्या किटलीत भरून ' जिंजर वाँटर ' ठेवले जाई .. आल्याचा रस घातलेले गरम पाणी प्यायला छान वाटे ...घश्याला शेक मिळावा म्हणून मी ते आनंदाने घेई .. या वेळी टर्की लवकर कमी झाली असे वाटले .. मात्र बिडीसाठी अवस्थता होतीच .. रोज दुपारच्या ध्यानानंतर हॉल मधील आचार्य एकेकाला जवळ बोलावून त्याची विचारपूस करत असत ..मन एकाग्र झाले का ? काय काय विचार आले मनात ? काय काय त्रास जाणवले वगैरे प्रश्न ते विचारात असत .. मी सांगितले होते की शरीर आणि मन खूप अवस्थ होते ..मनात भलते सलते विचार ..जुन्या आठवणी ..गहिवर ..वगैरे .. ते म्हणाले ' चिंता मत करो ..सब विकार निकाल रहे है...धीरे धीरे ये सब बंद होगा '...म्हणजे त्यांच्या मते माझ्या मनातील सुप्त विकार या प्रक्रियेने बाहेर पडत होते ...ध्यानात एकाग्रता मिळाली की हे सुप्त विकार जागृत होऊन मनात खळबळ माजवण्याचे काम करत असत ..तरीही न कंटाळता मन एकाग्र करत गेले की हळू हळू विकार निष्प्रभ होत ..जातात ..फक्त जशा जशा सूचना मिळतील तसे ध्यान पुढे न्यायचे .. अगदी बरोबर होते त्यांचे म्हणणे ..मी येथे आल्यावर मौनाचा नियम मात्र पूर्णपणे मोडला होता .. याचे कारण एकटा न येता मित्रांसोबत आलो होतो .. तिथे आमच्या सारखे मौनाचा नियम मोडणारे काही लोक होते ते देखील एकटे न येता मित्रांसोबत आले होते ..एक दोन जोडपी होती मध्यमवयीन ..नवरा आणि बायको दोघांचीही राहण्याची व्यवस्था वेगवेगळी .. त्यामुळे रोज पहाटे आधी हॉल मध्ये आले की ते नवरा बायको एकमेकांची खबर घेत असत ..विपश्यनाचा खरा फायदा हवा असेल तर कोणी मित्र नातलग त्या शिबिराला असता कामा नये असे वाटले ..!


तिसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता झाल्यानंतर ...संजय कादर आणि मी ..एका बाथरूम मध्ये गुपचूप बोलत असताना ..कादरला एक जुने जीर्ण झालेले ..उन पाउस .वारा खाऊन खरपूस तपकिरी रंगाचे झालेले एक बिडीचे थोटूक सापडले ..जवळ जवळ अर्धी बिडीच होती ..आम्हाला एकदम लॉटरी लागल्यासारखा आनंद झाला ..आता वांधा होता तो माचीसचा ... कादरला आठवले ...ध्यानकक्षाच्या कोपऱ्यात कासवछाप अगरबत्ती लावायला एक माचीस ठेवलेली असते अशी त्याने झाडी केली होती .. कादर हळूच ध्यान कक्षात जावून ती माचीस चोरून घेवून आला .. ते थोटूक पेटवून पहिला झुरका मी मारला ..आणि एकदम गरगरू लागले .. अगदी चक्करच आली मला .. एकाच झुरक्यात मी एकदम सुन्न झालो ..डोके धरून खालीच बसलो ..मग कादरला आणि संजयला देखील तोच अनुभव आला ..सुमारे अडीच दिवसानंतर आम्ही बिडीचा दम मारला होता. 
त्या विडीच्या झुरक्याने पुन्हा मनात चलबिचल सुरु झाली ..आपण बिड्या सोबत आणायला हव्या होत्या असे वाटले .. 

आमच्या जवळचे थोडेफार पैसे आम्ही अविनाश जवळ देवून ठेवले होते ..संजयच्या मनात एक प्लान तयार झाला ..अविकडून किमान दहा रुपये मागून घ्यायचे आणि गुपचूप डोंगर उतरून खाली वस्तीत जावून बिडीबंडल आणायचा ..लगेच आम्ही अविला शोधले ..अवि भेटला पण म्हणाला तुमचे पैसे मी सध्या प्रशासनाकडे जमा केलेले आहेत ..आता ते पैसे एकदम परत जातानाच मिळतील .. आमची निराशा झाली ..संजयला आठवले त्याच्या राहण्याच्या जागी ..एक मध्यम वयीन गृहस्थ आमच्या सारखाच तंबाखूसाठी अवस्थ झालेला होता .. त्याच्या जवळ पैसे होते .. संजयने दुपारी जेवणाच्या वेळी त्या माणसाला गाठले आणि त्याला तंबाखू आणून देतो असे सांगून त्याच्या कडून दहा रुपये घेतले .. मग जेवण झाल्यावर मध्ये जे दोन तास विश्रांती साठी असतात त्या वेळात .. आम्ही तिघेही ध्यान कक्षाच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूम कडून डोंगर खाली उतरलो ..खाच खळगे पार करत ...वाटेत दोन ठिकाणी तारेचे कुंपण होते ..तारा वाकवून त्या खालून सटकलो .. पावसाळा असल्याने खूप चिखल होता .. आमचे पाय पूर्ण चिखलाने भरले .. डोंगरावरून खाली उतरल्यावर ..भाताची शेते लागली ..त्यातही गुढघाभर पाणी साचलेले ..ते तुडवत कसे तरी सुमारे तीन किलोमीटरचा वळसा घालून ..एका वस्तीत पोचलो .. एका किराणा दिकानातून एक बिडी बंडल आणि तंबाखूच्या दोन पुड्या घेतल्या ..कादरला तीन दिवसात चहा मिळाला नव्हता ..तो एक नंबर चहाबाज ..एका चहाच्या गाडीवर तिघांनी मिळून एक चहा घोट घोट घेतला ..आणि परत तसाच वळसा घेवून पुन्हा डोंगरावर शिबिरात परतलो .. 

( बाकी पुढील भागात )
======================================================

माघार .....! ( पर्व दुसरे -भाग ६९ )

बिडीबंडल घेवून आल्यावर तर आमची चंचलता अजून वाढली .. दर तासाभराने आम्ही बिडी ओढण्यासाठी म्हणून ध्यानकक्षातून बाहेर पडत असू ..एव्हाना सर्व धम्मसेवकांना यांचे त्रिकुट सारखे नियम मोडते आहे हे कळून चुकले असावे ..ते सारखे आमच्यासमोर येवून हात जोडून उभे रहात ..इतकी नम्रता आम्हाला लाजवणारी होती ..ते जर आम्हाला काही बोलले असते तर बरे असे अनेकवेळा वाटले ..कारण ते बोलले असते तर आम्ही त्यांना समर्थने देवू शकलो असतो ..काहीतरी कारणे देवू शकलो असतो ..मात्र काहीही न बोलता माफी मागत असल्यासारखे हात जोडून समोर उभे राहणे खूप लाजिरवाणे होई .. तो बिडी बंडल आम्ही अगदी क्वचित बिडी ओढायची असे ठरवून दहा दिवस पुरवायचा असे ठरवले होते ..परंतु जेमतेम दीड दिवसात आम्ही बंडल संपवला .. दिवशी चौथ्या दिवशी सकाळी बिड्या संपल्या मग संजय आणि कादरची कुरकुर सुरु झाली ... इतके दिवस राहणे कठीण आहे वगैरे बडबड करू लागले .. मी त्यांना समजावत होतो ..पाहता पाहता चार दिवस होत आले आहेत .. अजून सहा दिवस कसेही काढू ..पण सगळे शिकून घेवू वैगरे ..मग त्यांनी समर्थने सुरु केली ..आता टर्की तर संपल्यातच जमा आहे ..आपण त्याच उद्देशाने आले होतो ..बाकी इतके सगळे आध्यात्म आता शिकून काय सन्यास घ्यायचा आहे का आपल्याला वगैरे...खरेतर गुरुजींनी सुरवातीच्या सत्रातच ' विपश्यना ' म्हणजे सन्यास नाही असे स्पष्ट केले होते ..उलट विपश्यना म्हणजे संसारात राहून ..जीवनात नित्य नवीन येणाऱ्या अडचणी ...समस्या ..चिंता यांचा यशस्वी पणे सामना करत ..स्वतःला शांत चित्त ठेवण्याची एक कला आहे .. अर्थात कादर आणि संजय यांनी परत जाण्याचा निश्चय केलाच होता त्यामुळे त्यांची समजूत काढण्यात काही अर्थ नव्हता .. ते दोघेही आचार्यांकडे गेले आणि आम्हाला घरी जायचे आहे असे सांगितले .. आचार्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला ...तर यांनी आम्ही येथील बहुतेक नियम मोडले आहेत असे त्यांना सांगितले ... वर बिडी बंडल आणला ..माचीस चोरली ही देखील माहिती पुरवली ..यावर बिचारे आचार्य अवाक झाले .. यांना समजावण्यात काही अर्थ नाही हे त्यांनी ओळखले आणि जाण्याची परवानगी दिली .. दोघेही लगेच समान घेवून सायंकाळी चारच्या सुमारास निघून गेले .

ते दोघे गेल्यावर सुरवातीला दोन तास मला बरे झाले ते गेले असे वाटले ..कारण आता ध्यानातून उठून बाहेर येण्याचे कारण उरले नाही ..जरा जास्त एकाग्रतेने ध्यान होऊ लागले ..चौथ्या दिवसापासून ' आनापान सत्ती ' हा फक्त श्वासावर लक्ष ठेवण्याचा अभ्यास संपून प्रत्यक्ष विपश्यना सुरु झाली होती ..म्हणजे आता डोक्याच्या टाळू पासून शरीरातील संवेदना तपासायला सुरवात करायची होती ..शरीरातील प्रत्येक भागात नेमक्या कोणत्या कोणत्या संवेदना जाणवतात ते अभ्यासून ..त्या संवेदना कशा बदलत आहेत ..अनित्य आहेत ..हे अनुभवायचे होते ..निसर्गाने प्रदान केलेल्या ज्ञानेंद्रियांमार्फत आपल्याला बाह्य जगातील संवेदनांचे ज्ञान होते .. मात्र शरीराअंतर्गत होणाऱ्या अत्यंत सूक्ष्म संवेदना या क्रियेने अनुभवता येणार होत्या .. शरीरातील प्रत्येक अवयवाची सविस्तर खबरबात घ्यायची होती ..शरीर जिवंत ठेवण्यास ..कार्यक्षमतेने जगण्यास ..विचारांप्रमाणे कृती करण्यास शरीराला साथ देणारे अवयव कसे कार्य करतात ते जाणून घ्यायचे होते ..एरवी निसर्गाने दिलेले शरीर एखाद्या मशीन प्रमाणे नियमित सगळी कार्ये बिनबोभाट पार पाडत असल्याने कधी त्याच्याकडे लक्ष जात नाही ..फक्त जेव्हा एखादी वेदना ..त्रास .दुखणे उद्भवले तरच आपण शरीराची दखल घेतो ..औषधे गोळ्या घेवून ..डॉक्टरकडे जावून ..तात्पुरती मलमपट्टी करतो .. आता आस्थेने या शरीराची विचारपूस करायची होती . 

( बाकी पुढील भागात )
======================================================

माझाही पराभव !  ( पर्व दुसरे -भाग ७० )

प्रत्यक्ष ' विपश्यना ' करणे हा खरोखरच आनंदानुभव होता .. डोक्याच्या टाळू पासून सुरवात केल्यावर सर्व शरीरातील संवेदना अनुभवताना ..स्वतच्या शरीराकडे तटस्थपणे पाहायला गम्मत वाटायची .. आपले शरीर हा केवळ एक हाडामासाचे बनलेले साधन आहे ..जे मनाच्या द्वारा इच्छापूर्ती साठी ..वासनापूर्तीसाठी राबवले जातेय .. ? आसपासच्या परिस्थितीचे ..वातावरणाचे ..पंचेंद्रियां मार्फत आकलन करून जे संदेश मेंदूकडे कडे पाठवले जातात... त्यानुसार मेंदू शरीराला प्रतिक्रिया देण्याचे आदेश देतो ..हे सर्व आदेश मनाच्या कलाने दिले जातात ...बापरे ..सगळे समजून घेण्यास कठीण होते मात्र ..अनुभवताना मजा येई ..गुरुजींनी सांगितलेला ' अनित्य भाव , वेळोवेळी प्रत्ययास येत होता ..कधी कधी शरीराच्या एखाद्या वेदना जाणवत ..काहीतरी अस्वस्थ आहे ..कुठेतरी खुपतेय ..गडबड आहे असे वाटे ..तर काही क्षणातच ते बोचणारे ..दुखणारे गायब होऊन तेथे दुसरी आनंदाची .. संवेदना जाणवे ..पूर्वीपेक्षा आता माझे मन जास्त एकाग्र होऊ लागले होते .. तरीही अजूनही हवी तशी तटस्थता मिळत नव्हती ..हे सगळे हवेहवेसे वाटले तरी ..मन मात्र विषयांचा पाठलाग सहजासहजी सोडायला तयार होत नाही ..कारण आपण मनाला तशी भोगांची सवयच लावली असते किंबहुना ..जमला आल्यापासून आपल्या मनाचे आपण लाड करत गेल्यामुळे मन असे तटस्थ राहणे कठीणच असते .. सारे विकार टपूनच बसलेले असतात ...घरदार ..नातलग ..प्रिय व्यक्ती ..खाण्यापिण्याचे वेगवेगळी स्वादिष्ट स्वादिष्ट पदार्थ .. उत्तम उंची कपडे ..ते कपडे घालून दिसणारी आपली छबी .. लोकांकडून मिळणारा मान ..सन्मान ... भौतिक सुखे मिळवण्याची आंतरिक ओढ ..लैंगिक सुख भोगण्याची अनावर लालसा ..कधी कधी मला विपश्यना करताना स्वतःचेच शरीर परके वाटे ..मात्र हा परकेपणाचा भाव फार काळ जपता येत नव्हता .

कादर आणि संजय नसल्याने आता मधल्या वेळात मी सर्व परिसर भटकून माहिती घेत राहिलो .. तेथे दुसऱ्या वेळी ' विपश्यना ' करण्यास आलेल्या साधकांची ..दुपारच्या वेळच्या ध्यानाची वेगळी सोय केलेली होती ..जेथे मुख्य बुद्ध विहाराच्या बाजूने गोलाकार अश्या छोट्या छोट्या ..जेमतेम एका वेळी एक व्यक्ती व्यवस्थित सुखासनात बसू शकेल अश्या खोल्या बांधलेल्या होत्या ..त्यात हे जुने साधक बसून ध्यान करत असत .. दहा दिवसांचे शिबीर होते तसेच २० दिवस ..१ महिना ..२ महिने अशी दीर्घ साधनेची देखील शिबिरे होती ...ध्यान प्रक्रियेतील पूर्णत्व गाठण्यासाठी .. काही लोक अशी शिबिरे करतात असे समजले .. हे दीर्घ शिबिरातील लोक चालताना अतिशय हळुवार ..नजर खाली ठेवून चालत असत .. अगदी आत्मसंमोहनाच्या अवस्थेत असल्यासारखी .. मन डोळ्यांद्वारे इकडे तिकडे भटकू नये म्हणून त्यांची दृष्टी फक्त पायाकडे असे ..चालताना फक्त रस्ता दिसावा हा हेतू .. एकदा गम्मत झाली ..असाच एक दीर्घ शिबिराचा परदेशी साधक खाली दृष्टी ठेवून ...चालत समोरून येत होता .. मी त्याचे निरीक्षण करत होतो ..तितक्यात मागील बाजूने एक मुलींचा घोळका येत होता ..बहुधा या मुली ' विपश्यना ' परिसर पाहण्यासाठी आलेल्या असाव्यात .. त्यांची आपापसात किलबिल चालू होती .. मुलींचा आवाज ऐकल्याबरोबर त्या साधकाने पटकन मागे वळून पहिले ..तरुण मुली ...सुंदर ..त्यात काही मुलीनी जीन्स , टी शर्ट असे घट्ट कपडे परिधान करून शरीराच्या आकर्षणात भर घातलेली .. त्या मुलींकडे मागे वळून पाहणारा तो साधक क्षणभर थांबला ..सुमारे मिनिटभर तो तसाच स्तब्धपणे त्या मुलींकडे पाहत होता .. त्याच्या मनातील विकार जागृत होत होते हे मला जाणवले .. साधारणपणे मिनिट भराने... बहुधा मोठ्या निग्रहाने त्या मुलींकडे पाहणे बंद करून पुन्हा समोर तोंड केले .. आणि हलकेच स्वतच्या गालावर दोन चापट्या मारून घेतल्या ..त्या चापट्या अश्यासाठी की भरकटलेल्या मनाला त्याने ताकीद दिली असावी .. पुन्हा साधनेच्या मार्गावर येण्यासाठी . मनात विकार जागृत होणे हा मनाचा स्थायी भाव आहे ..मात्र वारंवार अश्या मनाला चापट्या माराव्या लागतील हे त्याने दर्शवले होते .

विपश्यनेच्या सहाव्या दिवशी सकाळपासूनच मला जास्त अवस्थ वाटू लागले .... या अलिप्ततेच्या जगातून केव्हा एकदा ..पुन्हा मोहाच्या जगात शिरतो अशी घाई झाली .. आणि मी शिबीर सोडण्याचा निर्णय घेतला .. आचार्यांकडे जावून त्यांना तशी परवानगी मागितली ..तर त्यांनी आता जेमतेम चार दिवस बाकी आहेत .. थोडा मनाला आवर घाला असे समजावले ..तर मी त्यांना खोटेच सांगितले की काल माझ्या स्वप्नात माझी आई खूप आजारी आहे असे मला दिसले ..मला तिची काळजी वाटते आहे म्हणून मी जाणे आवश्यक आहे वगैरे समर्थने दिली .. शेवटी त्यांनी परवानगी दिली .मुळातच चंचल असलेल्या मनाला ..व्यसने करून मी अधिकच चंचल बनवले असल्याने मी विपश्यना पूर्ण दहा दिवस करू शकलो नाही ..सहा दिवसांनी माझा निर्धार कोलमडला व मी शिबीर सोडले !

( बाकी पुढील भागात )