शुक्रवार, 29 नवंबर 2013

खुनशी आजार


खुनशी आजार !  ( पर्व दुसरे -भाग ९१ वा )


मानसीचा संसाराला हातभर म्हणून नोकरी करावी किवा एखादे काम करावे हा उद्देश कितीही चांगला असला तरी ..सध्या तिने फक्त स्वतच्या प्रकृती कडे लक्ष द्यावे ..संसाराच्या उठाठेवी पुढे करायच्या आहेतच ...रोटी ..कपडा ..मकान या आपल्या प्राथमिक गरजा कोणाकडे भिक न मागता व्यवस्थित भागत आहेत ..बाकी सारी भौतिक सुखे हवीशी वाटली तरी त्या पायी जर घरतील मनशांती नष्ट होत असेल तर त्याबाबत नीट विचार करूनच काय ते ठरवावे असे मला वाटत होते ..मानसी नांदेड सारख्या छोट्या शहरातून आलेली ..शिवाय तिच्या घरातील अतिशय धार्मिक वातावरण ..त्यांत तिचे उपास -तापास ..आठवड्यातून तीन दिवस ती उपास करत असे ... कोणीतरी सांगितले लग्न जमावे म्हणून सोळा सोमवार कर ..तिने ते केले .. कोणी गुरुवार सांगितले ..कोणी शनिवार ..तिचे असे तीन दिवस उपास करणे गरोदर अवस्थेत तिच्या तब्येतीला मानवणारे नव्हते ...म्हणून उपास करणे सोड असा तिला आग्रह केला ..यावर तिने गुरुवार आणि शनिवारचे उपास सोडले मात्र त्या बदल्यात मी चतुर्थीचा उपास करावा अशी अट मला मान्य करावी लागली ..सोमवार मात्र ती सोडायला तयार होईना .. सोळा सोमवार करून झाल्यावर महिन्याभरातच आपले लग्न जुळले आहे ..असा तिने सोळा सोमवारचा महिमा मला सांगितला तेव्हा . ..तेव्हा गमतीने तिला म्हणालो ..म्हणूनच पार्वतीला जसा कफल्लक नवरा मिळाला ..तसा तुला देखील मिळाला आहे ...


एकंदरीत मी तिने नोकरी करण्याच्या विरुद्ध होतो ..या मागे कदचित असुरक्षिततेची भावना आहे की काय माझ्या मनात असेही मला वाटले ..मानसीचे वय त्यावेळी ३६ वर्षे होते ..या पूर्वी तिला नोकरीचा अनुभव व सवयही नव्हती ..शिवाय पुण्यासारख्या मोठ्या शहरात नोकरी साठी कोठे दूर जाणे तिला मानवले नसते ..असा सगळा विचार माझ्या मनात होता ..यात ती आपल्यापासून दूर जाईल की काय या भीतीपेक्षा तिची काळजीच जास्त होती ..बाहेरच्या जगात वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत ..अतिशय लबाड लोकही आहेत ..आपली साधीसुधी ..निरागस ..भोळी पत्नी ..या जगात कशी तग धरू शकेल ही चिंता देखील त्या पाठीमागे होती ...कदाचित ही पुरुषप्रधान संस्कृती मुळे मनात निर्माण झालेली भावना असावी ..अर्थात मानसी देखील ..स्वतःचे करिअर ..स्त्री स्वातंत्र्य ..वगैरे विचारांचा हट्ट धरणारी नव्हती ..तिला फक्त आर्थिक चिंतेमुळे नोकरी करायची इच्छा होती ...नीट समजावून सांगितल्यावर तिने नोकरीचा विचार सोडून दिला .

रोज सायंकाळी आम्ही फिरायला जात असू ...मानसीने कधीही कोणत्याही गोष्टीचा हट्ट केला नाही ..फिरायला गेल्यावर कधी कधी ... ठेल्यावर साधी पाणीपुरी किवा भेल पुरी जरी खाल्ली ..तरी तिचा चेहरा आनंदाने फुलून येई ..पाहता पाहता दिवस उलटत होते ..मानसीला सातवा महिना लागल्यावर डोहाळजेवण वगैरे करावे ..त्यासाठी तिने नाशिकला यावे अशी आईची इच्छा होती ..तेथूनच मग बाळंतपणा साठी नांदेडला आईसोबत जाणार होती ..त्यानुसार मी दोन दिवस सुटी घेवून ..मानसी सोबत नाशिकला गेलो ..पहिल्या दिवशी घरातच थांबलो ..दुसऱ्या दिवशी बाहेर एकटा बाहेर फिरायला पडलो आणि घात झाला ..व्यसनाधीनता हा खुनशी आजार मानला जातो ..कोणत्या क्षणी व्यसनी व्यक्तीच्या मनात व्यसनाचे आकर्षण जागृत होईल याचा काही भरवसा नसतो .. जेव्हा केव्हा व्यसनी व्यक्ती व्यसन करण्याची शक्यता आहे अश्या असुरक्षित वातावरणात जाईल तेव्हा ..व्यसनाचे आकर्षण जागृत होऊ शकते ..जुने व्यसनी मित्र भेटणे ..पूर्वी व्यसन केलेल्या जागी जाणे ...हे सर्व व्यसनी व्यक्तीने टाळायचे असते ..तरीही या आजाराचा धूर्तपणाचा भाग असा की नेमका व्यसनी व्यक्ती अति आत्मविश्वासामुळे बेसावध राहतो ..किवा बरेच दिवस व्यसन केले नाही ..आता एखादे वेळी करूयात हा विचार त्याच्या मनात घर करतो ..पूर्वी सारखे आपण वाहवत जाणार नाही अशी मूर्ख पणाची खात्री त्याला वाटते ..माझेही तसेच झाले ..बाहेर पडल्यावर एका जुन्या मित्राला भेटायला गेलो ..त्याचे व्यसन सुरूच होते ...फक्त एकदाच असे मनाशी म्हणत ... मी पण ब्राऊन शुगर प्यायलो ..घरी आलो ..तर मानसीच्या डोहाळजेवणाची गर्दी ...भावाने माझा चेहरा पाहूनच काय ते ओळखले ..मला रागावला .. मी नेहमीचा तोच नकाराचा पवित्रा घेतला ..मी काहीही केलेले नाहीय ..तू उगाच संशय घेतो वैगरे ..थोडी कटकटही झाली ..त्या रागात मी ताबडतोब पुण्याला जायला निघालो .

( बाकी पुढील भागात )

========================================================================

बिंग फुटले ! ( पर्व दुसरे -भाग ९२ वा )

घरून रागाच्या भरात निघालेला मी आधी ब्राऊन शुगरच्या अड्ड्यावर गेलो ..दहा पुड्या सोबत घेतल्या ..मग पुण्याला जाणाऱ्या बसमध्ये चढलो ..मनात भावाबद्दल राग खदखदत होता ..व्यसन सुरु होण्यापूर्वी भावाबद्दल मनात असणारा आदर ..त्याने केलेली मदत वगैरे सगळे विचार कुठल्या कुठे पळून गेले होते ..व्यसनी व्यक्तीने एकदा व्यसनाचे सेवन केले की जो त्याच्या व्यसनाच्या आड येतो तो त्याच्या शत्रू पक्षात जातो .. मनातील सगळी सकारात्मकता ताबडतोब नाहीशी होते ...मी किती गरीब बिचारा .. माझ्यावर हकनाक किती अन्याय होतोय असेच त्याला वाटत राहते ...इतके दिवस मी व्यसनमुक्त राहिलो ..आता फक्त एखादे दिवशी व्यसन केले तर काय मोठे आभाळ कोसळणार होते ?.. लगेच मला रागावण्याची ..माझा पाणउतारा करण्याची काय गरज आहे होती ..असे अविवेकी विचार मनात घर करतात ..खरेतर ..पूर्वी व्यसनापायी मी खूप त्रास दिलेला होता ..शिवाय एकदा माझे सुरु झाले की आणखी पुढे काय काय होऊ शकते याचा घरच्या मंडळीना चांगलाच अनुभव पूर्वी आलेला होता ..त्यामुळे असे एकदाही व्यसन करणे त्यांना मान्य नसते .. त्यांना आता पुढे काय काय अनर्थ घडेल याची धास्ती वाटते आणि ही धास्ती खरीही असते .. ..म्हणून घरची मंडळी लगेच तो मुद्दा सिरीयसली घेतात ..मात्र व्यसनीला आपले काही फारसे चुकलेच नाही असे वाटते .व्यसनी समजत असतो की आपण अजिबात पुन्हा व्यसन करणार नाहीय ..आता पूर्वीसारखा मी वाहवत जाणार नाही वगैरे ..भावाची आणि माझी झालेली कुरबुर मानसीला समजली असली ..तरी ती दुसऱ्या खोलीत असल्याने व घरात इतर पाहुणे असल्याने ..आमच्या भांडणाचा नेमका विषय काय आहे हे तिला समजले नव्हते ..तरीही मी रागाने समान घेवून घराबाहेर पडल्यावर ...तिने मला घराच्या खिडकीतून हाक मारून थांबवण्याचा प्रयत्न केला होता ..अंगावर डोहाळ जेवणाचा नवीन शालू ..दागिने वगैरे घालून सजलेली मानसी सुंदरच दिसत होती .. मी असा रागाने निघालोय याबद्दल तिच्या डोळ्यात पाणी आलेले ..काहीतरी खावून जा ..नाहीतर सोबत डबा न्या ..असे ती खिडकीतून म्हणत होती ..तर मी खिडकीच्या खाली उभा राहून ..आता मी इथे क्षणभर सुद्धा थांबणार नाही ..माझा अपमान झालाय वगैरे तिला सांगत होतो ..शेवटी तिच्या पाणावलेल्या डोळ्याकडे दुर्लक्ष करून मी निघालोच होतो .

बसमध्ये सारखा डोळ्यासमोर मानसीचा डोळे पाणावलेला चेहरा नजरेसमोर येत होता ..तरीही त्यासाठी मी जवाबदार आहे हे मात्र मान्य करायला तयार नव्हतो ..सगळा दोष भावाला देत होतो ...रात्री पुण्याला पोचल्यावर ..घरी जावून पुन्हा रात्रभर ब्राऊन शुगर ओढत बसलो ..सकाळी मुक्तांगणला कामावर गेलोच नाही ..फोन करून निरोप दिला की माझी तब्येत बरी नाहीय ..माझा निरोप बंधूला कळला ...तो मला चांगलाच ओळखत असल्याने ..काहीतरी लोचा आहे हे त्याने ओळखले ...मुक्तांगण मध्ये कोणाला न सांगता बंधूही सटकून ..माझ्या घरी पोचला ..मी दार उघडल्यावर ..माझा चेहरा पाहून काय ते समजला ..मला समजवण्या ऐवजी मला किती पुड्या शिल्लक आहेत हे विचारू लागला ..त्यालाही ब्राऊन शुगर प्यायची आहे हे माझ्या लक्षात आले ..मग तो देखील माझ्या पिण्यात सहभागी झाला ..दुसऱ्या दिवशी सोबत नेलेला माल संपल्यावर अवस्थता सुरु झाली ..शारीरिक त्रास ( टर्की ) जरी फारशी नसली तरी मन मात्र सारखे ब्राऊन शुगरकडे ओढ घेत होते ..बंधूची देखील तशीच अवस्था ..मग काहीतरी जुगाड करून ..बंधू पुण्यातूनच माल घेवून आला ..आमच्या दोघांचेही व्यसन लपून छपून सुरु झाले ..पुण्याला नाशिकच्या तुलनेत ब्राऊन शुगर महाग मिळत होती ..तसेच आम्हाला विशेषतः बंधूला पुण्यातील बहुतेक ब्राऊन शुगर विक्रेते व गर्दुल्ले ओळखत होते ..कोणी ही बातमी मुक्तांगण मध्ये सांगू नये याची काळजी घ्यावी लागत होती ... मी त्यावर असा उपाय शोधला ... मी जास्त पैसे घेवून जावून नाशिकमधून ब्राऊन शुगर आणावी ..
त्यानुसार पिणे सुरु झाल्यवर आठ दिवसातच पगार झाल्यावर मी ते पैसे घेवून बसमध्ये बसलो ..रात्री १ वाजता नाशिकला ..सरळ अड्ड्यावर जावून माल घेतला ..पुन्हा लगेच बसमध्ये बसून सकाळी सात वाजता पुणे गाठले व ड्युटीवर हजार झालो ..संध्याकाळी कामावरून सुटल्यावर पुन्हा बंधू माझ्या घरी आला ..पिणे सुरु . ब्राऊन शुगर पिवून झाली की बंधू पुन्हा मुक्तांगण मध्ये जाई ..दारू सारखा ब्राऊन शुगरचा तोंडाला वास येत नाही त्यामुळे ..आम्ही नशा करून मुक्तांगण मध्ये गेलो तरी कोणी ओळखण्याची शक्यता कमी होती ..अर्थात जे स्टाफ पूर्वी ब्राऊन शुगरचे व्यसनी होते त्यांना सुगावा लागण्याची शक्यता होती ..म्हणून आम्ही त्यांच्या समोर जाणे टाळत असू.

एकदा मी असाच रातोरात नाशिकहून माल घेवून आलो ...पिवून मुक्तांगणला गेलो .नेमके त्यादिवशी बरेच स्टाफ बाबा शेखच्या मुलीच्या लग्नाला गेलेले ..गेटवर माझा मित्र द्विजेन होता ..त्याने माझा चेहरा पहिला ..त्याला लगेच समजले कारण तो देखील पूर्वी ब्राऊन शुगर ओढत असे ..तो मला काही बोलला नाही ..परंतु त्याने सरळ वरच्या मजल्यावर जावून मुक्ता मँडमना फोन लावला ' तुषार काहीतरी गडबड करून आला आहे ..काय करायचे ? ' मँडमने त्याला सांगितले की असे एकदम आरोप करणे योग्य नाही ..तू इतर स्टाफला विचारून खात्री करून घे ...मग उद्या पाहू काय करायचे ते..यावर द्विजेन सिनियर स्टाफ म्हणून बंधूकडे गेला ..त्याला सांगितले की तू बघ तुषारचे डोळे वेगळे दिसत आहेत ..तो बहुतेक पिऊन आला असावा ..बंधू माझाच साथीदार ..तरीही त्याने सरळ माझी बाजू घेवून मला क्लीनचीट न देता ..म्हणाला बहुतेक असेल ..मात्र खात्री देता येत नाही ..म्हणजे ना धड माझी बाजू घेतली ना द्विजेनची ..संशयाची सुई तशीच ठेवली ...मला हा सगळा सुगावा लागलाच ...आता प्रथम आपली झडती घेतली जाईल हे मला ठावूक होते..सुदैवाने मी मुक्तांगणला सोबत ब्राऊन शुगर नेलेली नव्हती.

( बाकी पुढील भागात )

========================================================================

नाटकबाजी ! ( पर्व दुसरे - भाग ९३ वा )


झडती घेतली असती तरी माझ्या खिशात काही माल नव्हता ..त्यामुळे कुठलाही पुरावा सापडला नसता मी व्यसन केल्याचा ..तरीही द्विजेनला संशय येणे हे पुरेसे होते मी ब्राऊन शुगर ओढल्याचे सर्वाना समजायला ..बंधूने माझी बाजू न घेतल्याने माझी केस कमकुवतच ठरली होती ..मला बंधूचा रागही आला ..माझ्या सोबत ब्राऊन शुगर ओढण्यात तो देखील सामील होता ..त्याने द्विजेनने माझ्यावर संशय व्यक्त केल्यावर मला खरेतर क्लिनचीट देवून प्रकरण मिटवायला हवे होते ..आता पुढे काय ? उद्या मुक्ता मँडम काय बोलतील ? सगळ्यांना नक्कीच मी रीलँप्स झाल्याचे कळणार ..या विचारांनी मी अवस्थ झालो ..काहीतरी आयडिया करायला हवी होती ..ज्या योगे माझे रीलँप्स होणे गंभीरतेने घेतले जाणार नाही ...सगळ्यांची सहानुभूती मिळविण्यासाठी काहीतरी नाटक करायला हवे होते ..सर्वांचे लक्ष कुठल्यातरी दुसऱ्या गोष्टीकडे विचलित केले असते ..तर माझ्या रिलँप्स वर पांघरूण घालता आले असते ..एक आयडिया सुचली ..मी किचन कडे गेलो ..तिथे कँरीडाँर मध्ये स्टाफ मध्ये एक वर्षापूर्वीच सामील झालेला ..रवी पाध्ये उभा होता ..हा रवी अतिशय साधा सरळ ...मितभाषी ...मी रवी जवळ जात एकदम लुंगीत पाय अडकून खाली पडण्याचे नाटक केले ..आणि मोठ्याने विव्हळू लागलो ..रवी लगेच माझ्या जवळ आला ..त्याने आधार देवून मला उठवले ..मी खूप वेदना होत असल्यासारखा विव्हळत होतो ..अजून दोन तीन जण धावत आले ...मला आधार देवून सगळ्यांनी पलंगावर नेले ..सहा महिन्यापूर्वीच माझे पाठीच्या मणक्याचे ऑपरेशन झाल्याचे सर्वाना माहितच होते ..सर्वाना वाटले ..हा आता पडला ..आणि परत याच्या पाठीच्या मणक्यात काही समस्या आली की काय ? आफ्टर केअर मधील सर्व जण माझी विचारपूस करू लागले ..मी वेदनांनी विव्हळण्याचे नाटक सुरूच ठेवले होते ..व्यसनी व्यक्ती तसा फार नाटकी असतो ..आपले व्यसन करणे लपवण्यासाठी ..घरच्या किवा बाहेरच्या लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी त्याला अनेक नाटके करायची सवय असते ..मी तर पूर्वी नाटकात कामही केले होते ..त्यामुळे माझे नाटक मस्त सुरु होते ..दिवसभर पलंगावर पडून राहिलो ..पेन किलर पण घेतली ...माझ्या रीलँप्सची चर्चा बाजूला पडली .

दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता मुक्तामँडम आल्यावर ..मला निरोप आला मुक्ता मँडमनी भेटायला बोलावल्याचा ...मुक्ता मँडमची केबिन वरच्या मजल्यावर ..तर मी खालच्या मजल्यावर आफ्टरकेअरच्या पलंगावर विव्हळत पडलेलो ..मी निरोप पाठवला की मला चालता येत नाहीय ..वरच्या मजल्यावर जिना चढून येणे कठीण आहे ..त्यावर मुक्ता मँडम खालच्या मजल्यावरच्या एका केबिन मध्ये येवून बसल्या ..त्यांना कसेही करून माझी भेट घ्यायचीच होती ..माझा नाईलाज झाला ..दोन मित्रांच्या आधाराने मी कसातरी उठून हळू हळू चालत मुक्ता मँडमच्या केबिन मध्ये गेलो ..चेहऱ्यावर खूप वेदना असल्याचे भाव घेवून ..मँडमनी कसा पडलास ? खूप दुखतेय का ? वगैरे प्रश्न विचारले ..यावर मी देखील दयनीय चेहऱ्याने उत्तरे देत गेलो ..मग मँडम मूळ प्रश्नावर आल्या ..काल काय केले होतेस ? द्विजेन म्हणतोय की तुझे डोळे ठीक नव्हते ..तू ब्राऊन शुगर ओढली होतीस ? ..मुक्ता मँडमची नजरही आता अनुभवाने धारधार झालेली ..मोठ्या मँडम सारखी तीच थेट डोळ्यात पाहून बोलण्याची स्टाइल ...क्षणभर मला मोठ्या मँडमचाच भास झाला ..एकदम सगळे नाकारण्याऐवजी अर्धवट खोटे बोललो ..म्हणालो ..मँडम मानसी डिलिव्हरी साठी गावी गेल्यापासून मला खूप एकटेपण वाटतोय ...खूप अस्वस्थ वाटते ..घरात मानसीच्या असण्याची इतकी सवय झालीय की एकटा असताना घर खायला उठते ... परवा रात्री नीट झोप येत नव्हती म्हणून मी रात्री एक लीब्रीयमची गोळी घेतली होती ..त्यामुळे दिव्जेनला माझे डोळे तसे वाटले असतील ..मी अजिबात ब्राऊन शुगर ओढलेली नाही ..मी असा नकार दिल्यावर पुढे मँडम म्हणाल्या ..जर तुला एकटेपणा वाटत होता घरी ...तर तू मुक्तांगण मध्ये राहायला यायचे होतेस..मानसी घरी नसताना या पुढे तू एकटा घरी राहू नकोस ..येथे ये राहायला ..तू जे सांगतो आहेस त्यावर मी विश्वास ठेवतेय ..या पुढे मात्र काळजी घे ..आणि हा विषय आता इथेच बंद करू ..बाहेर गेल्यावर कोणी काही विचारले तर काही चर्चा करू नकोस ..पाठीची काळजी घे ..वगैरे समुपदेशन केले त्यांनी ..मी आज्ञाधारक पणाचा आव आणून त्यांचे ऐकत ..साळसूद पणे मान डोलावली .. पुन्हा कण्हत उठून उभा राहिलो ... केबिन बाहेर उभे असलेले मित्र लगेच मला आधार द्यायला आले ..त्यांच्या आधाराने पलंगावर येवून पडून राहिलो ..मनातल्या मनात हुश्श केले ..सुटलो तर ..माझ्या पाठीच्या दुखण्याच्या नाटकाने वाचलो ...मँडमनी मला क्लीनचीट दिली ..कदाचित त्यावेळी मी खोटे बोलत आहे हे माहित असूनही मँडमनी सहानुभूती पोटी माझ्यावर विश्वास ठेवला असावा असेही वाटते !

मानसी गेल्यापासून भरपूर ब्राऊन शुगर ओढली असल्याने मला टर्की सुरु झाली होतीच ..आता माझ्या डोक्यात किडा वळवळत होता तो घरी लपवून ठेवलेल्या ब्राऊन शुगरबाबत ..बंधूने हळूच एकदा येवून ..घरी माल कुठे ठेवला आहे याची चौकशी केली होती..मी त्याला घराची किल्ली देणे टाळले ..काल त्याने माझी बाजू न घेतल्याने मला त्याचा राग आला होता ..शिवाय याला माल घरी कुठे ठेवला आहे हे सांगून किल्ली दिली असती तर त्याने एकट्यानेच सगळी ब्राऊन शुगर संपवली असती ..किवा त्यात हेराफेरी केली असती ..त्याला म्हणालो मी उद्या काहीतरी कारण काढून मँडम कडून थोडा वेळ घरी जाण्याची परवानगी काढतो ..आपण दोघेही जाऊ ...मग पाहू काय ते..रात्रभर टर्की मुळे तळमळत होतो ..शिवाय पाठीच्या वेदनांचे नाटक सुरूच ठेवावे लागले ...दुसर्या दिवशी सकाळी मँडम आल्यावर ..मी एका कागदावर लिहून पाठवले की ..मला पाठीच्या दुखण्याची परत एकदा तपासणी करावे लागेल असे वाटतेय ..त्यासाठी माझी घरी ठेवलेली ऑपरेशनची फाईल घेवून येण्यास परवानगी मिळावी ..हवे तर मी एकटा न जाता बंधू सोबत जावून येतो ..मँडमने परवानगी दिली ..मी बंधूला तसे सांगितले ..तर तो मी आत्ता येत नाही म्हणाला .. माझ्या सोबत रिलँप्स झाल्याचा संशय त्याच्यावर येवू नये म्हणून सावधगिरी बाळगत होता ..म्हणाला आपण संद्याकाळी जावू ..पण मला धीर नव्हता ..कधी एकदा घरी जावून लपवलेली ब्राऊन शुगर काढून आणतो ..आणि गुपचूप दम मारतो असे मला झालेले ..मग दत्ता श्रीखंडे म्हणाला मँडमनी मला तुझ्या बरोबर जायला सांगितले आहे ..दत्तापण पूर्वी ब्राऊन शुगर ओढत असल्याने त्याच्या सोबत जायला मला नको होते ..कारण दत्ता अतिशय हुशार होता ..त्याच्या समोर मला घरी लपवलेली ब्राऊन शुगर काढणे कठीण गेले असते ..शेवटी नाईलाजाने दत्ताच्या स्कूटरवर बसून घरी गेलो ..दत्ताने डोळ्यावर काळा गाँगल लावलेला होता ..घरी गेल्यावर मी दत्ताला पाणी दिले ...आणि स्वैपाक घरात गेलो ..जरा पसारा आवरतो म्हणून ..चलताना लंगडण्याचे नाटक सुरूच होते ..नेमकी ब्राऊन शुगर लपवलेली माचीस बाहेरच्या पलंगावर ठेवलेल्या उशीच्या अभ्र्यात होती ..दत्ता पलंगाच्या समोर खुर्चीवर बसलेला ..त्याला नकळत उशीच्या कव्हर मध्ये ठेवलेली माचीस काढणे मोठे दिव्यच होते ..एकदार त्याने गाँगल लावलेला असल्याने तो नक्की कुठे पाहतोय ते समजत नव्हते ..त्याची नजर कुठे आहे हेच काळत नव्हते तर नजर चुकवणार कशी ..कठीणच होते ..पण कसेही करून ब्राऊन शुगर मिळवायचीच हे मनात पक्के होते .

( बाकी पुढील भागात )
========================================================================

रंगेहात !  ( पर्व दुसरे - भाग ९४ वा )



दत्ता श्रीखंडेकडे पाठ करून त्याच्याशी बोलत बोलत मी पूर्वीच्या शस्त्रक्रियेची फाईल पलंगाखाली ...गादीखाली ..शोधण्याचे नाटक करत होतो ..तसे करता करताच हळूच उशीच्या कव्हर मध्ये हात घालून ...माल ठेवलेली माचीस काढून खिश्यात घातली ..मग फाईल सापडली असे म्हणून पलंगाच्या वर खिळ्याला टांगलेली पिशवी काढून त्यातून फाईल घेतली ..दत्ताला चल म्हणालो ..दत्ता खुर्चीवरून उठत म्हणाला ..माफ कर तुषार ..तुला राग येईल पण तुझ्या घरून निघताना तुझी झडती घ्यावी अश्या सूचना आह मला ..मी थंडच झालो ..' साप सुंघ जाना ' म्हणजे काय असते ते जाणवले ..अरे ..यार दत्ता माझ्यावर तुझा विश्वास नाही का ? वगैरे बोलू लागलो ..पण दत्ता तसा स्वभावाने ठाम आहे ...नाईलाजाने त्याला झडती घेवू दिली .. त्याने खिश्यातून माचीस काढली ..ती उघडली तर आत काड्यांच्या ऐवजी ..छोट्या कागदाच्या पुडीत ठेवलेली सुमारे २ ग्रँम ब्राऊन शुगर ...दत्ताने माझ्याकडे पाहत पुडी उघडली ..हे काय आहे ..असे म्हणत माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागला ...म्हणजे तू रिलँप्स झालेला आहेस तर ..आम्हाला संशय होताच काही दिवसांपासून ...मी गयावया करून दत्ताला हे तू कोणाला सांगू नकोस ..आपल्यातच राहू दे ..आपण जुने मित्र आहोत ..वगैरे पटवण्याचा प्रयत्न करत होतो ..माझ्याशी बोलत बोलत दत्ता स्वैपाकघरात गँस जवळ गेला ..गँस पेटवला ..आणि त्या बर्नरवर ती सगळी पुडी ओतली ..माझ्या समोर सगळे भस्सम ....मी हतबल होऊन जळणाऱ्या ब्राऊन शुगर कडे पाहत होतो ..यार शेवटची थोडी तरी मला पिवू द्यायची होतीस असे दत्ताला म्हणालो ..तो म्हणाला अरे तू माझ्यापेक्षा जुना आहेस या क्षेत्रात ..कितीही नशा केली तरी कधी समाधान होते का आपले ? पुन्हा लागतेच ..तितक्यात मला आठवले उशीच्या कव्हरमध्येच ब्राऊन शुगर ओढण्याचा पाईप ठेवला होता ..त्याच्या आतील पन्नीवर साचलेल्या मालाचे एक दोन दम लागले असते ..तो पाईप काढला अन दत्ताला म्हणालो ..आता हे एक दोन दम तरी मारू दे मला ..टर्की होतेय खूप ..दत्ता काही बोलला नाही ..मला ते दोन दम मारू दिले ..मग जड पावलांनी दत्ताच्या मागोमाग घराबाहेर पडलो .

वाटेत दत्ताने विचारले ..तुझी इच्छा असेल तर मी यातले काहीही मँडमना सांगणार नाही ..मात्र तुझ्या रिलँप्स मध्ये कोण कोण सामील आहे ते मला खरे खरे सांग ..मी अगदीच गोंधळलो होतो ..आता मला नोकरीवरून काढून टाकतील की काय ? मानसीला सगळे कळेल ..घरी कळेल ..वगैरे भीती होतीच मनात ..दत्ताने टाकलेल्या जाळ्यात अडकलो ..आणि बंधूचे नाव सांगितले ..कुठून कशी सुरवात झाली ते पण सांगितले ..दत्ता नुसता हं..हं करत ऐकत होता ..मुक्तांगणला पोचल्यावर मी सावकाश आफ्टर केअरकडे वळलो ..दत्ता थेट वरच्या मजल्यावर गेला ..मला माहित होते तो मँडम कडे गेलाय ते..एकदा त्याच्याकडे असहाय नजरेने पहिले ..त्याने दुर्लक्ष केले ..दुपारी मला मँडमचे बोलावणे आले ...बळी द्यायला नेल्या जाणाऱ्या बकऱ्या सारखा केबिन मध्ये गेलो ... मँडमनी खुर्चीवर बसायची खूण केली ..मी बसलो ..बोल आता काय म्हणणे आहे तुझे ? .मी मान खाली घातली .. ' तुषार ..तुझे नुकतेच लग्न झालेय ..छान संसार सुरु झालाय ..कुठून पुन्हा सुचले तुला हे ? ' माझ्यापाशी काहीच उत्तर नव्हते ..' काल मी तुला सगळे खरे खरे सांग म्हणाले होते ..तू खोटेच बोललास ..तरी पण तुझ्यावर विश्वास ठेवला ' मान वर करून पहायची हिम्मतच नव्हती मला ..शेवटी म्हणाल्या उद्या नाडकर्णी सर बोलतील तुझ्याशी ..त्या वेळी नेमके डॉ . आनंद नाडकर्णी मुक्तांगणला आले होते ..आणि या पुढे मानसी इथे परत येईपर्यंत तू मुक्तांगणलाच राहायचे ..हे मी मानसीला सांगणार नाहीय ..तिच्या या अवस्थेत तिला हे सगळे सहन होणार नाही .. तुला नसली तरी आम्हाला तिची काळजी आहे ..मानवर करून मँडमकडे कृतज्ञतेने पहिले .. मान डोलावली आणि बाहेर पडलो .

थोड्या वेळाने बंधू माझ्या पलंगाजवळ आला ..त्याचाही चेहरा पडलेला ..म्हणाला तू मूर्ख आहेस ..मी काहीच बोललो नाही ..पुढे म्हणाला मला पण मँडमने बोलावले होते ..मी साफ नकार दिलाय.. तुझ्याबरोबर ब्राऊन शुगर ओढल्याचा इन्कार केलाय ..मी क्षीण हसलो ..दोस्तीत गद्दारी केलीय की काय मी असे वाटले मला..बंधू चरफडत निघून गेला ..नंतर समजले की बंधूला मँडमने काय प्रकार आहे हे विचारले तेव्हा त्याने सपशेल नकार देवून ..तुषार घाबरून कोणाचेही नाव घेतोय असे सांगितले होते ..दुसऱ्या दिवशी नाडकर्णी सरांनी मला बोलावले ..सगळे ऐकून घेतले..नक्की बंधू होता ना यात ? असे विचारून खात्री करून घेतली ..मग रिलँप्स झालेल्या स्टाफचा आपण सहा महिने पगार कापतो याची मला आठवण करून दिली ..मात्र तुझे नुकतेच लग्न झालेले आहे म्हणून तुझा सगळा पगार न कापता अर्धा पगार आम्ही कापणार आहोत हे सांगितले ...मी नुसताच मान डोलवत होतो ..बंधुलाही त्यांनी नंतर बोलावले होते ..त्याने तोच नकाराचा पवित्रा घेतला ..नाईलाजाने मग नाडकर्णी सरांनी त्याला एक महिना सुटीवर जायला सांगितले ..व्यसन केल्याचे नाकारणाऱ्या स्टाफला असे सुटीवर पाठवले जात असे ..म्हणजे जर त्याचे पिणे सुरु झाले असेल ..तर तो सुटीवर असताना जोमाने व्यसन करतो आणि स्वतःहून कबुल करायला येतो ..किवा या धक्क्याने बाहेर आपोआप चांगला राहतो असे गणित त्या मागे होते ...आता मानसीचे बाळंतपण होऊन ती परत पुण्याला येईपर्यंत सुमारे अडीच महिने तरी मला मुक्तांगणला राहावे लागणार होते..अर्धाच पगार मिळणार होता सहा महिने ..त्यातल्या त्यात समाधान हे होते की मानसीला यातले काहीही समजणार नव्हते ..घरीही आईला आणि भावाला काही सांगितले जाणार नव्हते ..मुक्तांगण एखाद्या पालकांप्रमाणेच माझी काळजी घेत होते ...

( बाकी पुढील भागात )

======================================================================

पितृत्व !  ( पर्व दुसरे -भाग ९५ वा )

या वेळच्या रीलँप्स मधून फारसे नुकसान न होता वाचलो होतो ..मुख्य म्हणजे मानसी आणि घरी कोणाला काही सांगितले जाणार नाही असे सांगून मँडमने मला मोठाच दिलासा दिला होता ...मी पुन्हा व्यसन सुरु करण्याला काही ठोस कारण नव्हतेच ..तसेही जगात व्यसने करून कोणतीच समस्या सुटत नाही ..किवा व्यसन करण्याला समर्थन म्हणून कोणतेच कारण असू शकत नाही ..हे सारे व्यसनीच्या मनाचे खेळ असतात ...व्यसनाधीनता या आजारात मनावर व्यसनाने पूर्वी दिलेल्या आनंदाचा ठसा इतका खोलवर असतो की तो कदाचित कधीच पुसला जात नाही ...ते सुप्त आकर्षण मनात अंतर्मनात दडलेलेच राहते ...मी कधीतरी संयमित पद्धतीने व्यसन करू शकेन ही वेडी आशा व्यसनीला सोडून द्यावी लागते ..किवा वारंवार व्यसनामुळे आजवर झालेल्या हानीची मनात सतत आठवण ठेवावी लागते ....व्यसनमुक्तीच्या काही काळानंतर उगाचच व्यसनी व्यक्तीला असे वाटते की आता आपले व्यसन कायमचे सुटलेय अथवा या पुढे मी कधीतरी व्यसन करण्यास हरकत नाही ..माझ्या बाबतीत व्यसनमुक्तीचे काही दिवस सुरळीत गेल्यावर असेच होत होते ..माझी बेफिकिरी वाढत जाई ..फाजील आत्मविश्वास माझा घात करत असे ...अर्थात माझे हे सारे विचार पश्चातबुद्धी होते ..आता व्यसन केल्याचे पकडल्या गेल्यावर हे सगळे सुचत होते ..आधीच स्वतःला सावध करू शकलो नव्हतो ..अजून गम्मत म्हणजे हे मानसीला समजणार नाहीय या समाधानात होतो ..मानसीला किवा घरच्या मंडळीना न समजण्याच्या आनंदापेक्षा मी स्वत:च स्वतःला फसवतोय ही भावना मनात असायला हवी ..कोणाला कळले नाही म्हणजे झाले ...हे समाधान मूर्खपणाचे होते .. कोणाला कळो वा न कळो नुकसान तर होणारच .

आता मला मानसीच्या डिलिव्हरीचे वेध लागले होते ..अजून किमान अडीच महिने तरी होते बाळाचे आगमन व्हायला ..सगळे काही सुरळीत व्हावे अशी आशा बाळगून होतो ..काही दिवसातच पुन्हा कामाला लागलो ..कुत्सीत नजरा आणि मित्रांचे टोमणे बंद झाले महिन्याभरातच ...नव्या बाळाच्या आगमना विषयी स्वप्ने रंगवू लागलो मनात ..वाटे इतर प्राण्यांप्रमाणे गर्भधारणा झाल्यावर थोड्याच दिवसात किवा दोन तीन महिन्यात डिलिव्हरी का होत नाही ? नऊ महिने आणि नऊ दिवस हे कोणते गणित असेल ..मानव जन्माला इतका जास्त कालावधी का लागत असावा ...कदाचित निसर्गाला आपली सर्वोत्तम निर्मिती करण्यास अधिक वेळ लागतो ..सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ ठरणारा जीव तयार होताना निसर्गाने देखील योग्य वेळ घेतला आहे ..फक्त दुर्दैव असे की माझ्यासाखा अथवा आत्मकेंद्रित ..विकारांच्या आहारी जाणारा मानव निसर्गाने असा नीट काळजी घेवून दिलेला जन्म .. निसर्गानेच दिलेल्या शक्तीचा आणि बुद्धीचा वापर करून निसर्गाचेच नियम मोडतो ..निसर्गाला वेठीस धरतो ..निसर्गाचे महत्व समजून न घेता स्वतचाच नाश करून घेतो .

पाहता पाहता मानसीची वेळ भारत आली ..डॉक्टरांनी डिलिव्हरीची दिलेली तारीख दोन दिवसांवर आल्यावर मी चार दिवस सुटी घेवून नांदेडला गेलो ...मानसीच्या हालचाली आता बऱ्याच अवघडल्या सारख्या झालेल्या ..मात्र तिच्या चेहऱ्यावर खूप तेज आल्या सारखे वाटले ..जास्त उजळ झाला होता रंग ..मी तेथे गेल्यावर तिला खूप आनंद झाला ..नव्या बाळाच्या आगमनाच्या वेळी आपला जोडीदार सोबत आहे ही भावना खूप बळ देत असावी ...एक दिवस आधी तिला दवाखान्यात दाखल केले गेले ..आता बाळंतवेणा सुरु होण्याची सगळे वाट पाहत होते ..मात्र ठरलेली निर्धारित तारीख उलटून गेली तरीही वेदना जाणवत नव्हत्या ..एक दिवस वाट पाहून मग सिझरीन करावे असा डॉक्टरांनी सल्ला दिला ..त्या नुसार मग ३ ऑगस्ट 19९९ रोजी पहाटे पाच वाजता मानसीला स्ट्रेचर वरून ऑपरेशन थियेटर मध्ये नेले गेले ..बाहेर सासूबाई आणि मी वाट पाहत होतो ..एकेक क्षण जीवघेणा होता ..अर्ध्या तासात नर्स बाहेर आली ..तिने सासूबाईन आत बोलावले ..मग रडण्याचा आवाज आणि सासूबाई हातात एक लाल गुलाबी जीव घेवून प्रफुल्लीत चेहऱ्याने बाहेर आल्या ..पेढे वाटा ..मुलगा झालाय असे म्हणाल्या ..त्यांनी तो जीव माझ्या हातात दिला ..माझे हात थरथरत होते ..तो नाजूक जीव हातात घेतल्यावर त्याच्या स्पर्शाने अंग एकदम रोमांचित झाले ..किती नाजूक ..इवलासा ..गुलाबी ..आणि हात पाय हलवत हलकेसे रडणे ..वर्णन करायला शब्दच अपुरे पडतात माझ्या अवस्थेचे ..माझ्या जन्माच्या वेळीही माझे वडील असेच रोमांचित झाले असतील ..नवी स्वप्ने त्याच्या मनात अंकुरली असतील ..हा विचारही मनात डोकावून गेला ..मात्र मी वडिलांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली होती ..बापरे ..या नव्या जीवाला सांभाळणे ..त्याची निगा राखणे ..त्याला योग्य ते संस्कार ..शिक्षण देणे आपल्याला झेपेल का ? अनेक विचार मनात होते ..नुसता बाप होणे विशेष नसते ..कुत्री ..गाढवे ..देखील बाप बनतात ..बाप कोणीही होतो ...एक जवाबदार बाप आपल्याला बनता येईल का ?

( बाकी पुढील भागात )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें