मंगलवार, 7 जनवरी 2014

रेड अलर्ट ...!


रेड अलर्ट ...! ( पर्व दुसरे -भाग १२६ वा )


दुसर्यांदा पार्टी लागली नाही म्हणून माझा जेलमधील मुक्काम अजून पंधरा दिवसांनी वाढला होता ...एव्हाना माझी दाढी भरपूर वाढली होती ..एकदा सकाळी उन्हात बसलेला असताना एक वार्डन जवळ आला ..म्हणाला ' चलो ..उधार बार्बर आया है ..दाढी कटवा लो अपनी ' दाढी न काढण्याचे काहीही कारण नव्हते ..तसेच वाढवण्याचे देखील काहीच कारण नव्हते ..मात्र का कोणजाणे दाढी काढू नये असे वाटत होते ..त्या वार्डनला नंतर येतो सांगितले ..तर त्याने हात धरूनच मला बराकीच्या मागच्या बाजूला नेले ..तेथे रांगेत अनेक कैदी उभे ..दोन वार्डनच्याच वेशातील माणसे ..रांगेत उभ्या असलेल्या कैद्यांना हातातील दाढीच्या ब्रशने साबू लावत होते ..तर एक जण हातात वस्तरा घेवून तोंडावर साबू लावलेल्या एकेका कैद्याची पटापट दाढी करत होता ..ते काम इतके झटपट चालले होते की मला खरोकर आश्चर्य वाटले ...माझ्या तोंडाला साबू लावायला एक वार्डन आला ....मी उगाच नकार देण्यास काहीतरी कारण म्हणून सांगितले ' मेरेको तिरुपती जाना है ..वहापर दाढी उतारुंगा ..आधी तो रागावून काहीतरी ओरडणार होता ..पण तिरुपतीचे नाव ऐकल्यावर चूप बसला ..' सच्ची ' ? खात्री करून घेण्यासाठी त्याने विचारले ..त्यावर मी गळ्याला हात लावला ..त्याने ताबडतोब मला रांगेतून बाजूला जायला सांगितले ..चला ..सुटलो होतो दाढी करण्यातून ..गम्मत वाटली ती त्याच्या श्रद्धेची ...तिरुपतीचे नाव घेतल्यावर त्याने सहजपणे माझ्यावर विश्वास ठेवला होता ..जेलमध्ये बहुतेक कैदी अतिशय श्रद्धाळू होते ....तसेच सर्वधर्म समभाव बाळगणारे श्रद्धाळू ...अजमेरचे ' ख्वाजा गरीब नवाज ' आणि शिर्डीचे ' साईबाबा ' ही प्रमुख दैवते..त्याशिवाय ..हाजी मलंग ..सैलानी बाबा ..गजानन महाराज ..बालाजी ..वगैरे दैवते होतीच ...या सर्वांची श्रद्धा कदाचित अपराधीपणाच्या भावनेतून निर्माण झाली असावी असे वाटले ...बाहेरच्या जगात पोट भरण्यासाठी किवां उदरनिर्वाहासाठी चोऱ्या ..गुन्हेगारी ..दरोडे ..लुटमार ..असे प्रकार करणे ..मग मनाची बोच कमी करण्यासाठी एखाद्या दैवताचा आधार घेणे अशी श्रद्धा वाटली ...जितक्या भाविकपणे हे कैदी भजनात सामील होत असत तितक्याच निर्दयपणे कदाचित गुन्हे करीत असावेत ...कदाचित त्यांच्या मनात जिवंत असलेली श्रद्धाच कधीकाळी त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त देखील करेल असे वाटले ... श्रद्धेचे बीज फक्त रुजण्याची गरज असते ...भले ती श्रद्धा नैतिकतेची असो ..एखाद्या देवा धर्माची असो ..अथवा एखाद्या सदूविचारावरची असो असो ...पुढे कालांतराने नक्की सन्मार्ग मिळणार ..मात्र जर ती श्रद्धा अहंकार ..पैसा ..स्वार्थ ..सत्ता ..अशी स्वकेंद्रित असेल तर पुढे त्याचीही कटू फळे मिळणार !

एकदा दुपारी आमच्या बराकीत संडास धुण्यास येणारा एक कैदी ..माझ्याकडे माचीस मागायला आला ..त्याला माचीस दिली ..तो माझ्या शेजारीच बसला ..निवांत बिडी पेटवली त्याने ..सहज कुतूहल म्हणून मी त्याची चौकशी करू लागलो ...रेल्वे गाडीत चोऱ्या करणारा होता ...एक वर्षाची शिक्षा झालेली ..म्हणाला बस अब सिर्फ दो महिने बाकी है मेरे छुटने को ..ये कुंडी काम करके सजा मे एक महिने की मोह्लात मिल गई ..ही माहिती मला नवीन होती ..म्हणजे येथेही संडास धुण्याचे काम हलक्या दर्जाचे समजले जात होते ..बहुधा कोणी कैदी हे काम करण्यास तयार नसत ..त्या ऐवजी ..टेलरकाम ..विणकाम ..शेती ..सुतारकाम ..वगैरे कामांना पसंती होती ..म्हणून जे कैदी संडास धुण्याचे काम करतील त्यांना त्यांच्या शिक्षेत ठराविक दिवसांची सूट दिली जाई ..तसेच जेलमध्ये रक्तदान शिबिरात भाग घेणाऱ्या कैद्यांना देखील पंधरा दिवसाची सुट मिळे शिक्षेत ..त्याच प्रमाणे चांगली वागणूक ..पंधरा ऑगस्ट ..२६ जानेवारी या निमिताने देखील शिक्षेत काही दिवस सूट दिली जाई ..एकाने सांगितले की विपश्यना शिबिरात सामील होणार्या कैद्यांना सुद्धा जेव्हा शिक्षेत सूट मिळेल असे आमिष दाखवले तेव्हा विपश्यना शिबिरात गर्दी वाढली ..जेलबाबतच्या माझ्या सामान्य ज्ञानात चांगलीच भर टाकली त्या कुंडी काम करणा-याने . ( जेलमध्ये संडास धुण्याच्या कामाला कुंडीकाम म्हणतात ) पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कैद्याला सक्तीने लाल रंगाची टोपी घालायला लावतात ..सर्व त्याला ' लालटोपी ' या नावानेच हाक मारतात ..वैगरे बरीच बडबड करत होता तो कैदी ...जाताना तो मी त्याच्याशी आपुलकीने बोललो म्हणून मला दोन बिड्या देखील देवून गेला .

आता जेलमध्ये मला चाळीस दिवस झाले होते येवून ..घरी काय चालले आहे याबद्दल काहीच बातमी नव्हती ..तसेच पुढे काय ? हा प्रश्न होताच ..माझ्या विचार करण्यावर काहीच अवलंबून नव्हते ..सर्व सूत्र परिस्थितीच्या हाती गेलेली ..मुकाटपणे सामोरे जाण्यास भाग पडले होते ....असाच काहीबाही विचार करत ..पश्चाताप करत ..थंडीत कुडकुडत पोटाशी पाय घेवून झोपलो असताना ..अचानक जेलचा मोठा भोंगा वाजू लागला ..तो आवाज एकताच सगळे कैदी धडपडून उठले ..अनुभवी कैदी ..पटकन एकाचा हात धरून गिनती करण्याच्या वेळे सारखे खाली जोडीने खाली बसले ..मी देखील एकाचा हात धरून खाली बसलो ..कोणीतरी पळाले असावे ..पळण्याचा प्रयत्न केला असावा ..अथवा कोणत्यातरी बराकीत मारामारी झाली असावी ..असा अंदाज व्यक्त केला जात होता ..हा मोठा भोंगा वाजला की ' रेडअँलर्ट 'मानला जाई ..अश्या वेळी सर्व बाराकीतील कैद्यांनी एकाचा हात धरून रांगेने बसायचे असते ..नाहीतर वार्डन बेफामपणे सपासप काठ्या चालवतात कैद्यांवर ..सुमारे पाच मिनिटे भोंगा वाजत होता ...मग आमच्या बराकीत चार शिपाई आले ..त्यांनी सगळे कैदी मोजले ..समाधान झाल्यावर ते निघून गेले ....तोपर्यंत सगळे कैदी जीव मुठीत धरून बसलेले ..एकंदरीत ' रेडअँलर्ट ' बाबत बरीच दशहत आहे हे जाणवले ..दुसऱ्या दिवशी सकाळी समजले की एका कैद्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता ..त्याला लगेच पकडले गेले ..आता तो ' लालटोपी ' म्हणवणार होता .

( बाकी पुढील भागात )

======================================================================

श्री ४२० ! ( पर्व दुसरे - भाग १२७ वा )


मला पक्के आठवतेय २३ डिसेंबर तारीख होती ..दुस-या दिवशी म्हणजे २४ डिसेंबरला मला कोर्टात नेले जाणार होते ..उद्या जर पार्टी लागली तर कसेही करून सुटका करून घ्यायची असे ठरवत होतो ...सकाळचे जेवण करून बराकीत बसलो असताना ..बाजूच्या सर्कल मधून एक वार्डन मला बोलवायला आला ..म्हणाला हमारे बराकमे आपको बुलाया है ..मला कशासाठी ते समजेना ..मग म्हणाला ..तू बहोत अच्छा गाना गाता है इसलिये बुलाया है ..मी काहीतरी कारण सांगून टाळणार होतो ..पण आमच्या बराकीचा वार्डन पण मागे लागला जावून ये म्हणून ...मग निघालो त्या वार्डन सोबत ..मला खास गाणी म्हणण्यासाठी बोलावणारी मंडळी कोण आहे हे पाहण्याचे कुतूहल होतेच ..बहुतेक चांगली रंगदार पार्टी असणार कारण आमच्या बराकीचा वार्डन देखील खूप आग्रह करत होता ....आमच्या सर्कलच्या बाजूच्याच सर्कल मध्ये मला नेले गेले ..येथे तीन बराकी होत्या ..दुपारची बंदी झालेली होती तरीही ..या सर्कल मध्ये अजून कैदी बाहेरच होते ..मस्त निवांत ..दोन तीन निग्रो कैदी देखील दिसले ..हे निग्रो बहुधा मादक द्रव्यांच्या तस्करीत पकडले गेले असावेत ..त्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था भारतीय कैद्यांपेक्षा जरा वेगळी असते किवा अधिक चांगली असते ..म्हणजे हे सर्कल स्पेशल व्यक्तींचे होते असे वाटले ..एका बराकीत आम्ही गेलो ..तेथे जाताच माझ्या भोवती चारपाच जण जमले ..मला नाव वगैरे विचारले ...त्यांच्यातील एक जण म्हणाला रोज रातको बाजुके सर्कलमेसे अच्छे गाने की आवाज आती है ..तो हमने पूछकर जानकारी ली और तेरेको यहां बुलाया ...मग एकाने मला बिस्किटाचा पुडा खायला दिला ..कोणती केस वगैरे विचारले ...जामीन करायचा असेल तर सांग असेही म्हणाला ..हे सगळे कैदी एकदम झकपक कपड्यात होते ..काहींच्या अंगाला तर परफ्युमचा देखील वास होता .येथे गाद्या देखील होत्या झोपण्यासाठी ...बराकीत एका कोपऱ्यात कँरम उभा करून ठेवलेला ..दोन जण बुद्धिबळाचा डाव मांडून बसलेले दिसले ..एकंदरीत सगळे हाय -फाय काम होते तर ..

त्या लोकांनी मला पाच सहा गाणी म्हणायला लावली ....एकाने चलो खाना खायेंगे असेल म्हणताच सगळे जेवायला बसले ...मोठे मोठे टिफिन उघडले गेले ..त्यात मटण..पुलाव ..असे मस्त जेवण ...मलाही जेवायचा आग्रह झाला ..माझे जेवण झाले असल्याने मी नकार दिला ...तो पर्यंत पर्यंत दुपारचे दोन वाजत आलेले ..त्यांचे जेवण आटोपल्यानंतर ..पुन्हा एक दोन गाणी म्हंटली मी ..मला दोन बिडी बंडल ..बिस्किटांचा एक पुडा देवून त्यांनी निरोप दिला ..म्हणाले २५ तारीख को नाताल है ..उस दिन यहां आनां...मस्त पार्टी करेंगे रातको ..हम तेरे वार्डनको बोलते है ..तू चाहे तो तेरी ट्रान्स्फर कर लेंगे इस बराक मे ..मी नुसतीच होकारार्थी मन हलवत निघालो ..माझ्या बराकीत आल्यावर ..आमच्या वार्डनने आदबीने मला स्वतःजवळ बसवून ..तेथे काय काय केले याची चौकशी केली ..म्हणाला वो तेरेको जामीन भी दिलवा सकते है ..हे लोक नेमके कोण आहेत ? ..कोणत्या गुन्ह्यात जेलमध्ये आहेत असे वार्डनला विचारल्यावर म्हणाला चारसोबीस है सब ..मग त्याने सांगितले की जेलमध्ये सगळ्यात जास्त वट असते ती भाई लोकांची ..नंतर नंबर लागतो तो या चारसोबीस लोकांचा ..आणि सगळ्यात शेवटी किवा खालचा दर्जा म्हणजे इतर गुन्हेगार ..मला आश्चर्य वाटले ..चारसोबीस म्हणजे ..खोटे चेक देणारे ..मोठ्या रकमेचा अपहर करणारे ..पतसंस्था काढून असंख्य सभासदाचे पैसे हडप करणारे ..सहकारी बँकां बुडवणारे .. करणारे वगैरे आर्थिक गुन्हे केलेली मंडळी होती ती ...सध्या असे फसवणूक करणारे लोक वाढत चालले आहेत ..जास्त व्याजाचे आमिष दाखवून पतसंस्थेत भरपूर सभासद जमवायचे आणि नंतर एकदोन वर्षात सगळा कारभार गुंडाळून पोबारा करायचा किवा पतसंस्था बुडीत ..कर्जबाजारी ....दिवाळखोर जाहीर करून पैसे हडप करायचे ...जर पकडले गेलेच तर पैश्यांच्या जोरावर जेलमध्येही राजेशाही थाटात राहायचे ..कायद्याच्या पळवाटा शोधून सहीसलामत सुटायचे किवा अगदी नगण्य अशी शिक्षा भोगायची ..यांना जरी पोलिसांनी पकडले ..केस केली ..शिक्षा झाली ..तरी देखील त्यांनी ज्या सभासदांचे पैसे खाल्ले असतील किवा बुडवले असतील त्यांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्याची कोणतीच सोय नाही कायद्यात ..खरे तर हे गोड बोलून गळा कापणारे गुन्हेगार जास्त नालायक असतात ..चोरी ..दरोडे ..वगैरे घालणारी मंडळी तरी ओळखीच्या लोकांकडे चोरी करत नाहीत किवा.. राजरोस चोऱ्या करत नाहीत ..ही मंडळी मात्र राजरोस गोड बोलून ..भूलथापा देवून ..समाजात प्रतिष्ठीत म्हणून वावरत असताना प्रचंड रकमेचे आर्थिक घोटाळे करतात ..पैसा दाबून ठेवतात ....सर्वसामान्य मंडळीनी कष्टाची पै पै जमवून साठवलेली आयुष्यभराची पुंजी साफ करतात ..माझ्या माहितीत एक प्रकरण असे होते ..ज्याने मुलींच्या लग्नासाठी ...असेच जास्त व्याज मिळेल या आशेने एका पतसंस्थेत सेवानिवृत्तीचा मिळालेला सगळा पैसा गुंतवला होता ..ती पतसंस्था बुडाली ..सगळे पैसे गेले बिचारयाचे ..त्याने शेवटी आत्महत्या केली होती ..

त्या चारसोबीस लोकांनी जरी मला खूप चांगले वागवले होते ...बिड्या बिस्किटे दिली होती ..तरीही २५ तारखेला त्यांच्या बराकीत जावू नये असे वाटत होते ...आमच्या बराकीचा वार्डन मात्र आग्रह करत म्हणाला अगर तू २५ को वहा नाही जायेगा तो वो लोग मेरेको गुस्सा करेंगे ..म्हणजे पैश्यांच्या जोरावर त्यांनी येथल्या वार्डनवर देखील वचक ठेवलेला होता ..दुसऱ्या दिवशी कोर्टात जायला म्हणून लाल गेट जवळ बसलो होतो आम्ही रांगेत ..त्याच वेळी खबर आली की आज पार्टी लागली आहे ..कोर्टात हजर होता येईल ..एका मोठ्या निळ्या गाडीत बसवून आम्हाला सगळ्याने बंदोबस्तात कोर्टात आणले गेले ..आमच्या हातात दोन दोन कैदी मिळून बेड्या अडकवल्या होत्या ..कोर्टाच्या आवारात गाडी थांबल्यावर ..जेव्हा खाली उतरवण्यात आले तेव्हा ..कोणी ओळखीचे आपल्याला अशी बेडी लावलेल्या अवस्थेत पाहिलं की काय याची भीती वाटत होती ..!

( बाकी पुढील भागात )

===================================================================

पर्सनल बाँड ! ( पर्व दुसरे -भाग १२८ वा )

गाडीत पार्टी म्हणून आमच्यासोबत एकूण सहा शिपाई होते ..दहा कैद्यांना कोर्टात न्यायची ..केस असेल त्या कोर्टात न्यायमुर्तींसमोर त्यांना सादर करायची ..पुन्हा सुरक्षित जेलमध्ये पोचवायची या सहा शिपायांची जवाबदारी होती ..सगळ्याच गुन्हेगारांना एकाच न्यायधीशा समोर न्यायचे नव्हते ..जशी केस असेल त्या प्रमाणे एकाच आवारात वेगवेगळ्या ठिकाणी जायचे होते ..त्याप्रमाणे त्याशिपायांनी आधी चार कैद्यांना गाडीतून खाली उतरवले ..त्यांच्या हाताला जाड दोऱ्या बांधून त्यांना चार शिपायांनी कोर्टात नेले ..तो पर्यंत आम्हाला सहा जणांना गाडीतच ठेवले गेले ..आमच्या प्रत्येकाच्या हाताला बेडी अडकवून ती बेडी गाडीच्या खिडकीच्या गजांना लावली गेली ..बेडी अडकवताना शिपाई जरा निष्काळजीच वाटले कारण त्यांनी आमच्या हातात असलेली बेडी मनगटावर नीट चपखल बसली आहे किवा नाही याची काळजी घेतली नाही ..मी आणि दुसरा एक कैदी यांची मनगटाची बेडी जरा ढिली होती ..त्या कैद्याने हळूच बेडीतून हात बाहेर काढून मला दाखवला ..मी प्रयत्न केला तर माझाही हात बेडीतून सहज बाहेर निघाला ..आम्ही दोघेही खूप हसलो ..अर्थात गाडीच्या खाली दोन शिपाई आमच्या पहाऱ्यावर उभे होते ..बेडीतून असा तळहातच्या अलगद बाहेर निघू शकतो याची मला गम्मतच वाटली ..क्षणभर आपण पळून जावू शकतो हा विचारही मनात आला ..परंतु जेलमध्ये आता पन्नास दिवस राहिलोच होतो ..कदाचित आज माझी सुटका होऊ शकली असती ..अश्या वेळी पळून जाण्याचा मूर्खपणा खूपच अंगाशी आला असता ... पळून मला घरीही जाता आले नसते ... बाहेरही सतत पोलिसांचा ससेमिरा पाठीशी लागला असता ..गाडीजवळ बघ्यांची गर्दी झाली ..अनेकांना जेलमधील कैदी कसे असतात हे पाहण्याचे कुतूहल ...बरेच लोक आमच्या गाडीपाशी गोळा झालेले ..त्यात एकदोन कैद्यांचे नातलगदेखील होते ..ज्यांना आज आपल्या माणसाला कोर्टात आणणार आहेत हे माहित होते असे नातलग ..खिडकीशी उभे राहून आतील कैद्याशी बोलू लागले ..तसे गाडीबाहेर उभ्या असलेल्या पोलिसांनी त्यांना हाकलले ..जरा वेळाने ते नातलग परत आले खिडकीशी ..निर्धास्तपणे बोलू लागले .बहुतेक बाहेरच्या पोलिसांशी सेटिंग झाले असावे ..सुमारे तासभर गाडीतच बसून होतो ...आधी नेलेले कैदी परत आणल्या गेल्यावर मग माझा आणि एकाचा नंबर लागला ...!

कोर्टात काय बोलायचे हे मी ठरवून टाकले होते ..सगळे खरे खरे सांगायचे ..मी पत्नीला मारहाण वगैरे करत नव्हतो ..ना तिच्याकडे माहेरहून पैसे आण असा तगादा लावत होतो . ..मात्र माझ्या व्यसनामुळे घरातील सगळ्याच मंडळीना माझा त्रास होत होता ..विशेषतः आईकडून पैसे उकळत होतो ...मग तिने कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला वगैरे ...मला एका महिला न्यायमूर्तीसमोर उभे करण्यात आले..मागच्या वेळी बहुधा यांच्याच समोर मला उभे केले गेले होते . .. समोरचे पेपर्स चाळून त्यांनी माझ्याकडे पाहत विचारले ..पत्नीला का मारहाण करतोस ? ..मँडम आपल्या सगळ्या प्रश्नांची मी खरी खरी उत्तरे देतो ..फक्त त्यापूर्वी मला काही सांगायची परवानगी मिळावी असे नम्रपणे म्हणालो ..त्यावर त्यांनी सांग असा हाताने इशारा केला ..मी पटापट बोलू लागलो ..अस्खलीत मराठीत ..माझा व्यसनाचा इतिहास सांगितला ..उपचार घेवूनही वारंवार व्यसन कसे सुरु होत गेले ते सांगितले ..कुटुंबियांना त्याचा कसा त्रास होत होता हे नमूद केले .. म्हणालो ..माझ्या व्यसनाला कंटाळून शेवटी कुटुंबीयांनी असे पाउल उचलले आहे ..मात्र माझ्यावर केलेली केस खोटी आहे ..बहुतेक कसेही करून मला जेलमध्ये पाठवण्यासाठी कुटुंबियांना खोटी केस करावी लागली आहे ..कारण नुसता व्यसन करून त्रास देतो या सबबीवर मला जेलमध्ये पाठवता आले नसते ..त्यासाठी पत्नीला मारहाण ..तिच्याकडे पैसे आण म्हणून तगादा ..वगैरे गोष्टी खोट्या सांगाव्या लागल्या कुटुंबियांना ...माझे बोलणे मँडम लक्षपूर्वक ऐकत होत्या ..माझ्या बोलण्याची छाप त्यांच्यावर पडत होती हे त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवत होते ..त्यांनी पुन्हा समोरच्या कागदपत्रांवर नजर टाकली..म्हणाल्या ..बरोबर आहे तू म्हणतोस ते ..कारण ४९८ केस बहुधा एकट्या पतीवर लावली जात नाही ..तर पती .त्याचे कुटुंबीय वगैरे सर्वाना त्यात आरोपी केलेले असते ..येथे मात्र फक्त तू एकटा आरोपी आहेस ..तुझ्या कुटुंबीयांबद्दल ..म्हणजे तुझी आई ..भाऊ वगैरेंबद्दल तुझ्या पत्नीची काहीही तक्रार नाहीय ..उलट तू मारहाण करतोस याचे साक्षीदार म्हणून तुझ्या भावाची सही आहे .. सगळे कुटुंबीय ..तुझी पत्नी विरुद्ध तू अशी केस दिसतेय ...मग पुढे म्हणाल्या ..बरेच दिवस तू जेलमध्ये राहिला आहेस ..तू जामीन घेतला नाहीस का ? .यावर मी क्षीण हसलो ..मँडम कुटुंबियांनीच केस केलेली आहे ..कोण जामीन करणार मला ? ...त्या म्हणाल्या ..तुझे मित्र वगैरे आले नाहीत का जामीन करायला ...हा प्रश्न अतिशय बालिश वाटला मला ..व्यसनीचे मित्रही सगळे त्याच्यासारखेच व्यसनी असतात ..ते त्यांच्या व्यसनाला वैतागलेले असतात ..ते कुठून जामीन देणार ? ..मी असे म्हणताच ..त्या मोकळेपणी हसल्या ..म्हणाल्या बोलतोस तर खूप हुशारीने ..मग व्यसन करू नये ही साधी गोष्ट कशी समजत नाही तुला ? यावर मी नुसतीच मान खाली घातली ..पुढे त्या म्हणाल्या तू जर पुन्हा असे वागणार नाही असे कबुल करत असशील तर मी तुला पर्सनल बाँडवर सोडू शकते ..मात्र नंतर तुला एका आठवड्यात जामीन आणावा लागेल ..मी चालेल अशी मान हलवली ..नंतर काय झाले कोण जाणे ..त्या म्हणाल्या ...आता नको ..मी पुढच्या तारखेला तुला सोडते पर्सनल बाँडवर ..असे म्हणत त्यांनी मला जायला सांगितले ..माझ्या मागे उभ्या असलेल्या शिपायाने पुन्हा माझा हात धरला ..आम्ही बाहेर पडलो ..मी सगळी हुशारी पणाला लावून खरे तेच सांगितले होते ..माझ्या बोलण्याची छाप पडलीही होती मँडमवर ...मात्र अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी आपला निर्णय बदलला होता मला पर्सनल बाँडवर सोडण्याचा ..पुढच्या वेळी सोडते असे सांगून माझी बोळवण केली होती ....म्हणजे अजून पंधरा दिवस जेलमध्ये काढावे लागणार होते ..आणि पुढच्या वेळी पार्टी लागली नाही तर जास्ती दिवसही रहावे लागले असते .

जड पावले आणि निराश अंत:करणाने पुन्हा गाडीजवळ परतलो ..गाडीत बसलो ..अजून दोन कैदी कोर्टात न्यायचे बाकी होते ..उदास चेहऱ्याने बसून राहिलो ..तितक्यात खिडकीच्या बाहेरून आवाज आला ' तुषार सर ...ओ तुषार सर ...' मला कोणीतरी हाक मारत होते ..मी खिडकीच्या बाहेर पहिले तर माझा गर्दुल्ला मित्र मकसूद होता ..हा बागवानपुरा येथे रहाणारा ..त्याला पूर्वी मी मुक्तांगणला दाखल होण्यासाठी मदत केली होती ..तसेच रानडे साहेबांनी जमवलेल्या निधीतून उपचारखर्चासाठी काही पैसेही मिळवून दिले होते ..त्यानंतर माझी रीलँप्स झाल्यावर ..त्याच्या सोबत अनेक वेळा ब्राऊन शुगर देखील ओढली होती मी ...तरीही पूर्वीच्या आदराने तो मला ' सर ' असेच संबोधत असे ..मकसूद अतिशय चांगले मराठी बोलणारा ..त्याचे वडील पूर्वी कोर्टातच नोकरीला होते ..वडील रिटायर झाल्यावर हा ब्राऊन शुगरचे व्यसन भागवण्यासाठी कोर्टातच ..आरोपींना वकील मिळवून देणे ..कोणाचे काही अँग्रीमेंटचे काम असेल तर त्यासाठी त्याला मदत करणे ...वगैरे कामे करून व्यसनासाठी पैसे मिळवीत असे ...थोडक्यात एजंट म्हणून तो कोर्टात कामे करीत असे ..त्यातून त्याचे व्यसन भागवण्यासाठी पैसे मिळत होते ..चोरी ..लबाड्या यापासून तो दूरच राहत होता ..कोर्टाच्या आवारात रेंगाळताना त्याने मला पोलिसांनी आणून गाडीत बसवताना पहिले होते .. मग खिडकीशी आला होता ..मी त्याला खिडकीतूनच थोडक्यात सगळे सांगितले ..त्यावर तो म्हणाला ' सर तुम्हाला जामीन हवाय का ? ' मी उत्तरलो ' अरे मकसूद पण कोण देणार मला जामीन ? माझ्याकडे पैसेही नाहीत वकिलाला द्यायला ..' यावर म्हणाला ' पैसे कोण मागतोय तुमच्याकडे ..तुम्ही फक्त सांगा जामीन घ्यायचा असेल तर ..मी करतो वकिलाचा बंदोबस्त ' ही चांगली संधी चालून आली होती ..चालेल असे म्हणालो ..' मी आलोच पाच मिनिटात ' असे म्हणून मकसूद निघून गेला !

( बाकी पुढील भागात )

=======================================================================

जेलमधून घरी ! ( पर्व दुसरे - भाग १२९ वा )

पाच मिनिटात आलो असे सांगून गेलेला मकसूद खरोखरच पाच मिनिटात आला ..त्याच्या सोबत एक काळा कोट घातलेला तरुण वकील होता ..मकसूदने त्याची ओळख करून दिली ..' हे शेख साहेब ..वकील आहेत ..सर तुमचे काम करण्यास तयार आहेत हे ' ..मग माझी ओळख त्या वकिलाला करून देताना म्हणाला .. ' ये हमारे तुषार सर ..नशमुक्ती का काम करते थे ..जरा फँमिली मँटरमे फंसे है जेलमें.... ' .....' अभी क्या बोली मँडम आपको ? ' त्या वकिलाने एकदम विषयालाच हात घातला ...मी त्यांना पर्सनल बॉंड बद्दल न्यायमूर्ती मँडम जे म्हणाल्या ते सांगितले ...आम्ही येतो मँडमकडे जाऊन असे म्हणत तो दोघेही कोर्टात गेले .....सुमारे दहा मिनिटे मी अधिरतेने वाट पाहत होतो ...शेवटी ते दोघे हसतमुखाने परत आले ..म्हणाले ' आप को फिरसे बुलाया है मँडमने ' ..शेख साहेबांनी माझ्या सोबत पहाऱ्यावर असलेल्या शिपायाला एका कागदावर लिहून आणलेले काहीतरी दाखवले ...मला गाडीखाली उतरवून पुन्हा कोर्टात उभे केले गेले ..या वेळी मँडम माझ्याकडे प्रसन्न मुद्रेने पाहत होत्या ..म्हणाल्या ' आधीच का वकील दिला नाही ? ' त्यावर मी क्षीण हसून म्हणालो ..' मँडम हे सगळे अचानक घडले ..मला वकील मिळेल अशी आशा नव्हती ..माझा मित्र अचानक भेटला ..त्यामुळे सगळे जमून आलेय ..' समोरच्या कागदावर काहीतरी खरडले त्यांनी ...' हे पहा ..वकील आहेत आता तुझ्याकडे ..तरीही मी तुला आता जामीन न करता ..पर्सनल बाँड वर सोडतेय ..म्हणजे तू आठ दिवसात पुन्हा कोर्टात हजर राहून जामीन घेवून यायचा आहेस ....त्याकाळात तू चांगल्या वर्तवणूकीची हमी म्हणून इथे सही कर ..या आठ दिवसात जर तू घरी काही भांडण किवा गडबड केलीस..कुटुंबियांकडून तशी तक्रार आली ..तर तुला पुन्हा जेलमध्ये डांबण्यात येईल ..आणि त्यावेळी अजिबात जामीन देखील देणार नाही मी ' .....मँडमने मला दम दिला ..मी आनंदाने मान हलवली ...शिपायाने पुढे केलेल्या कागदावर सही केली ...' जा आता ...पुन्हा व्यसने करू नकोस ' असे म्हणत मँडमने मला निरोप दिला ...हसतमुखाने मी शिपायासोबत बाहेर पडलो ...' या मँडम खूप कडक आहेत ..पण तू मात्र गुंडाळलेस त्यांना बरोबर ' ..असे म्हणत शिपायाने माझ्या पाठीवर थाप मारली ..त्याला काय माहित की हा सगळे खरे खरे सांगितल्याचा महिमा होता ..तुम्ही जेव्हा जे काही असेल ते अगदी खरे खरे बोलता ..तेव्हा तुमच्या सोबत तुमची आत्मिक शक्ती असते ...ही आत्मिक शक्ती तुमच्या शरीर भाषेतून प्रकटते ..त्या लहरींचा परिणाम नक्कीच समोरच्या व्यक्तीवर होतो ..पुढे होणाऱ्या परिणामांची तमा न बाळगता खरे बोलणे केव्हाही चांगले ...' सत्य ' या शक्तीची ताकद अतुलनीय असते ...माणसे उगाचच खोटे बोलून स्वतःमधील ही शक्ती क्षीण करतात .

बाहेर पडल्यावर मकसूद म्हणाला ..' सर आता जेलमध्ये गेल्यावर पटापट तयारी करून ..तुमचे सामान नीट घेवून ..लाल गेटजवळ या ..आता साडेचार वाजले आहेत ...सहाच्या आत तुम्ही गेटच्या बाहेर पडू शकाल ..उशीर झाला तर आजची सुटका उद्यावर लांबेल ' ही माहिती मला नवीन होती ...जेलमध्ये प्रवेश व सुटकेच्या वेळा ठरलेल्या असतात ..एकदा सायंकाळची बंदी होऊन ..गिनती झाली की बहुधा कोणी जेलमध्ये जावू शकत नाही किवा जेलच्या बाहेर पडू शकत नाही..अगदी आणीबाणी असल्यासच हा नियम मोडला जातो ..मी गाडीत बसताना मकसूदचे आणि शेख साहेबांचे आभार मानले ..माझ्याकडे एकही पैसा नसताना शेख साहेब माझ्यासाठी जामीन करायला तयार झाले होते ....जरी मी पैसे नंतर देईन असे गृहीत असले ..तरी एका भणंग गर्दुल्ल्यावर विश्वास ठेवणे ही सोपी बाब नव्हती ...मकसूद तर अगदी परमेश्वरासारखाच ऐन वेळी मदतीला आला होता ..पूर्वी कधीतरी मी त्याला केलेल्या मदतीला स्मरून ..त्याने मला निस्वार्थीपणे मदत केली होती ...चांगले कर्म करत रहा ..नक्कीच त्याचे फळ तुम्हाला कधीतरी मिळतेच ..तसेच वाईट कर्म केले तर ..त्याच्याही फळ भोगावे लागतेच ..फक्त फळ कोणत्या स्वरुपात मिळेल ..कधी मिळेल ..हे मात्र निसर्ग ठरवतो ..आपल्या हाती फक्त कर्म करीत राहणे इतकेच असते ..कर्माचे फळ विशिष्ट पद्धतीनेच मिळावे हा अट्टाहास नको ..अथवा वाईट कर्माचे फळ इतके जास्तच का ? अशी उलटतपासणीही नको ...' क्रिया -प्रतिक्रियेच्या ' न्यूटनने सांगितलेल्या सिद्धांताची प्रचीती आली होती...निसर्ग नियमांना निसर्ग देखील बांधील असतो फळ मिळणारच हे नक्की ...म्हणून कर्म करताना सावधगिरी बाळगायला हवी .. ' कर्मण्ये वाधिकारस्ते ' चा नवा अर्थ मला उमगला होता ..अर्थात मला समजलेले सगळे अंमलात आणणे मला लगेच शक्य होईल असेही नव्हते ..अजूनही अज्ञान बाकी होते ..बरेच काही शिकायचे बाकी होते .

गाडी जेलच्या प्रवेशद्वारा जवळ पोचताच मी अधिरतेने खाली उतरलो ..माझ्या सुटकेची ऑर्डर असलेला कागद सोबतच्या शिपायांनी गेटजवळ असलेल्या जमादाराकडे सुपूर्द केला .. त्या जमादाराने मला .....ताबडतोब बराकीतून तुझे सामान घेवून परत गेट जवळ ये अशी सूचना देवून एक शिपाई दिला माझ्यासोबत ..मी बराकीत येवून माझी सतरंजी ..कांबळ..थाळी ..पाँट असे मौल्यवान सामान घेवून निघालो ..काल चारशेवीस मंडळीनी दिलेल्या दोन बिडी बंडालापैकी एक अर्धा संपला होता ...त्यातील उरलेल्या बिड्या मी सोबतच्या कैद्यांना वाटून टाकल्या ..एक सीलबंद बंडल मात्र स्वतःजवळ ठेवला ..गेटजवळ आल्यावर मला तेथे बाजूला असलेल्या कार्यालयात नेण्यात आले ....माझ्या अंगावरच्या सगळ्या खुणा पडताळून ..बाहेर सोडला जाणारा कैदी तुषार नातूच आहे याची खात्री करून घेतली गेली .. मला जेलकडून मिळालेले सामान परत करताना उशीची अडचण आलीच ..माझी उशी पूर्वीच कोणीतरी चोरून हंडीत जाळली होती ..त्या बद्दल शिपायाने मला फटकारले ..एक हलकासा दडा मारला पायावर ..एकदाचा बाहेर पडलो लालगेटच्या ...चालत जेलरोडवर आलो ..घरी जायला भाड्याचे पैसे नव्हतेच खिश्यात ..तसेच मानसी सध्या कुठे आहे ? आईची तब्येत कशी आहे ? वगैरे प्रश्न होतेच ..घरी गेल्यावर भावाच्या प्रतिक्रिया काय असतील याची चिंता ..जेलरोड वर एका पानपट्टी वर जाऊन माझ्याजवळील सीलबंद बिडीबंडल त्याला देवून त्याच्याकडून चार रुपये मिळवले ...तेथल्याच फोन वरून भावाला फोन लावला ..माझा आवाज ऐकून भाऊ जागच्या जागी उडालाच असावा ..' तू कसा काय फोन करतोस ..तुला कोणी फोन दिला ' वगैरे घाब-या स्वरात विचारू लागला ..हे भूत आता पुन्हा घरी हजर होणार ..ही भीती डोकावत होती त्याच्या बोलण्यात ..' मला आज कोर्टात नेल्यावर एका मित्राने जामीन देण्याची तयारी दाखवली होती ..मात्र सध्या पर्सनल बाँडवर सोडले आहे मला ' असे मी सांगितले ..माझ्या बोलण्यातील नरमाई त्याला जाणवली असावी ..म्हणाला ठीक आहे तू आता इकडे तिकडे न भटकता ताबडतोब इथे घरी ये ....जवळ पैसे नसतील तर स्पेशल ऑटो करून ये ..जर तासाभरात तू घरी आलास तरच तुला घरात प्रवेश आहे . 

( बाकी पुढील भागात )

=======================================================================

कर्णपिशाच्च ? ? ( पर्व दुसरे - भाग १३० वा )

इकडेतिकडे न भटकता तासाभरात घरी आला तरच तुला घरात प्रवेश आहे ..या भावाच्या बोलण्यातला गर्भितार्थ असा होता..कुठे दारूच्या ..गांजाच्या ..ब्राऊन शुगरच्या अड्ड्यावर न जाता ..व्यसनी मित्रांना न भेटता सरळ घरी ये ..त्याला हे देखील माहित होते की आता याने व्यसन केलेले नाहीय म्हणून चांगला बोलतोय ..जर गडबड केली तर याचे डोके फिरेल ..विचार बदलतील ...पुन्हा धमक्या देणे सुरु करेल ..खुन्नसबाजीची भाषा करेल ..भावाची सूचना समजून मी जेलरोड वरूनच स्पेशल ऑटो केला ..सरळ ' आदर्श गोकुळ ' सोसायटीच्या गेटजवळ उतरलो ....भावू बाल्कनीतच उभा होता ..त्याने किती पैसे विचारून ..ऑटोवाल्याला पैसे दिले ...सोबत अंगावरचे कपडे हेच सामान होते ..सोसायटीत शिरताना ...अंधार असूनही असे वाटले की आसपासच्या घरांच्या खिडक्यातून लोक आपल्याला पाहत आहेत ..मान खाली घालून पटकन जिना चढलो ..दारातच वहिनीनी सुहास्य मुद्रेने स्वागत केले ....म्हणाल्या ' काय अवतार झालाय हो तुमचा ' ..जरा बरे वाटले ....आई देखील आतल्या खोलीतून उठून बाहेर आली ..खूप अशक्तपणा वाटत होत्या तिच्या चेहऱ्यावर ..मानसी कुठेय ? मी विचारलेच...तिला तिचा भाऊ माहेरी घेवून गेलाय काही दिवस ..असे वहिनींचे उत्तर मला समाधान कारक वाटले नाही ....संशय आला ..मानसी कायमची तर माहेरी गेली नसावी ? कधी गेली ? केव्हा येणार ? वगैरे प्रश्न विचारू लागलो तर ..आई म्हणाली आधी तू स्वच्छ अंघोळ कर ..चांगले कपडे घाल मग बोलू आपण ...पुतण्या मोहित व पुतणी रसिका माझ्याकडे कुतूहलाने पाहत होते ...जेलमध्ये जावून आलेला माणूस कसा दिसतो ..असे बालसुलभ कुतूहल होते त्यात ..मग जरा वेळाने ते देखील जवळ येवून बिलगले .. पाणी गरम करायला ठेवलेलेच होते ..मस्त घासणीने अंग घासून अंघोळ केली ..

वहिनींच्या सुचनेप्रमाणे कपडे बाजूच्याच गरम पाण्याच्या बादलीत भिजायला ठेवले ..अंघोळ करून जरा प्रसन्न वाटले ..आई म्हणाली ...उद्या सकाळी दाढी कटिंग करून घे आधी ...माझ्या मनात मानसीचेच विचार चालू होते ....तेव्हढ्यात फोन वाजला ..वहिनीनी फोन घेतला ..पलीकडून बोलणार्या व्यक्तीला म्हणाल्या ' हो ..आले आहेत भावजी इतक्यातच '....बोल तूच ' माझ्या हाती फोन दिला ..कसे आहात तुम्ही ? मानसीचा आवाज ऐकून मस्तच वाटले ..मानसी सांगू लागली ..अहो उगाच आसपासच्या लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यापेक्षा मी काही दिवस इकडे माहेरी आले निघून ..शिवाय तुम्ही नक्की कधी येणार हे माहित नव्हते ...मी न विचारताच ती माहेरी जाण्याबद्दल सफाई देत होती ..बहुधा मी जेलमधून बाहेर पडल्यावर भावाला येतोय असा फोन केल्या बरोबर त्याने मानसीच्या माहेरी मी सुटलोय असे कळवले होते ..वाटले किती काळजी घेतात हे लोक आपली ..आपण भले बाहेरच्या लोकांशी चांगले वागतो ..मात्र कुटुंबियांच्या भावना समजून घेता येत नाहीत आपल्याला ..मी येतेच तीनचार दिवसात असे सांगून मानसीने फोन ठेवला ..चला मुख्य धोका टळला होता ..मानसी या प्रकरणानंतर मला सोडून कायमची जातेय की काय ..अशी अंतर्मनातील भीती संपली . 

जेवताना भाऊ म्हणाला ' उद्या सकाळी दाढी ..कटिंग करून घे ..एक दिवस आराम कर .. परवापासून तुला पुन्हा अनिलसाहेबांकडे नोकरीला बोलावले आहे...माझे सगळे लोचे भावाने अनिल साहेबाना सांगितले असतील कारण ते जवळचे मित्र होते ..इतके प्रकार करूनही अनिल साहेब पुन्हा मला नोकरीवर ठेवतील अशी आशा नव्हती ..ती भीती देखील संपली ...रात्री झोपताना बराच वेळ भविष्यकाळात कसे चांगले वागायचे असा विचार करत होतो ..आपल्याला पोलिसांनी ऑटोत बसवून नेताना कोणी पहिले असेल ? ते लोक भेटल्यावर विचारतील ? त्यांना काय सांगावे ? असे प्रश्न मनात होतेच ..दुसऱ्या दिवशी साडेपाचलाच उठून तयार होऊन बसलो ...वहिनीनी मला जरा तुमचे कपडे भिजवलेली बादली बघून या ..असे सांगितल्यावरून पाहायला गेलो ..तर त्या बादलीत पाण्यावर मेलेल्या पांढऱ्या ऊवाचा अक्षरशः थर जमलेला ..मी दर एक दिवसाआड काळजी पूर्वक शोधून काढून ..मारून देखील कपड्याच्या शिवणीत ..शोधायला अवघड अशा जागी लपून बसलेल्या त्या उवा गरम पाण्यात कपडे टाकताच सगळ्या मरून पाण्यावर तरंगत होत्या ..कसेसेच झाले ते पाहून ..जेलमध्ये ऊ सापडली की आपण किती आवेशाने ती पकडून नखावर चिरडून मारत असू ते आठवले ..दाढी कटिंग करायला नेहमीच्या दुकानात न जाता पायी चालत जरा दूर पंचवटीत गेलो ..आपल्या जेल प्रकरणाचा सगळी कडे बभ्रा झाला असेल ..नेहमीच्या दुकानात गेलो तर चार प्रश्नांना तोंड द्यायला नको म्हणून दूरच्या दुकानात गेलो ..का कोण जाणे..रस्त्याने चालताना सगळे लोक आपल्याकडेच बघत आहेत असे वाटत होते ...खाली मान घालूनच चालत होतो ..बहुतेक माझा आत्मविश्वास कोलमडल्या सारखा झाला होता ..इतक्या वर्षांच्या व्यसनाच्या इतिहासात मला प्रथमच असे वाटू लागले होते ..दिवसभर घरीच वेळ घालवला ..बाहेर कुठेच जावेसे वाटेना ...रात्री झोपेचा प्रयत्न करताना ...' लाज कशी वाटली नाही तुला आईची पाटली चोरताना ' ..असे कोणीतरी बोलल्या सारखा भास झाला ..उठून आजूबाजूला पहिले तर कोणीच नव्हते ..पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागलो ....' एखादा असता तर त्याने सरळ आत्महत्या केली असती इतका त्रास देण्यापेक्षा ' ..पुन्हा कोणीतरी बोलले ..मी समजलो ..हे बहुतेक मला ' हँलुस्नेशन ' सारखे होत होते ..तोंडावर गच्च पांघरूण घेवून मनात अथर्वशीर्ष म्हणत पडून राहिलो ..केव्हातरी झोप लागली असावी . 

सकाळी आटोपून अनिल साहेबांकडे गेलो ..मला कोणीही काहीही प्रश्न विचारले नाहीत ..बरे वाटले ..इतके दिवस कुठे होतात ..बरीच सुटी घेतली वगैरे प्रश्न मला त्रासदायक झाले असते ..अनिल साहेब देखील पूर्वीसारखेच बोलले ..सगळे जाणीवपूर्वक माझ्याशी चांगले वागत आहेत असे वाटत राहिले ..मनात गहिवरून आले ..तरीही मनातून सर्वाना माझ्या बद्दल काय वाटत असेल असा विचार वारंवार मनात येवू लागला ..कसातरी दिवस पार पाडून ..सरळ घरी येवून पलंगावर पडून राहिलो ..पुन्हा तेच आवाज ..मला रागावणारे ..निंदा करणारे ..निर्भत्सना करणारे ..नुसता कल्लोळ ..जेवणाला बोलावल्यावर उठून जेवण करून झोपण्याचा प्रयत्न करू लागलो ....माझ्या अंगावर एकही कपडा नव्हता ..अगदी दिगंबर अवस्थेत मी रस्त्याने चालत होतो .येणारे जाणारे सगळे ..माझ्याकडे पाहून हसत होते ....बोटे दाखवत होते ....मी शरमेने मान खाली घालून लोकांच्या नजरेपासून स्वतःला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो ..अंगाला भीतीने दरदरून घाम सुटलेला ..छातीतील धडधड नगारा वाजवल्या सारखी कर्कश्य ..घशाला कोरड पडली होती ..कोणीतरी छातीवर बसून गळा आवळतेय ..वाकुल्या दाखवतेय ..सर्व शक्तीनिशी छातीवर बसलेल्या त्या अदृश्याला झुगारून दिले अंगावरून ..धडपडत उठून बसलो ..आसपास कोणीच नाही ..मंद जळणारा निळसर नाईट लँम्प आणि त्या खाली असलेले ...अंधुक दिसणारे भिंतीवरचे घड्याळ फक्त जागे ...बाकी सर्व गाढ झोपलेले ....घड्याळात पहाटेचे चार वाजलेले.. पाणी पिवून पुन्हा पलंगावर आलो ..बापरे अतिशय भयानक स्वप्न होते ते ..पुन्हा झोपलो तर ते स्वप्न पुन्हा पडेल या भीतीने जागा राहण्याचा प्रयत्न करू लागलो ...!

( बाकी पुढील भागात )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें