सोमवार, 13 जनवरी 2014

नया दौर जिंदगीका....!!!


धडकी ..धास्ती ..वगैरे ! ( पर्व दुसरे - भाग १३१ वा )


तीन चार दिवस मी अतिशय अवस्थेत काढले ..माझा आत्मविश्वास पूर्णपणे संपल्या सारखा झाला ..ओळखीच्या लोकांशी मी रस्त्यात दिसल्यावर बोलणे टाळू लागलो ..रस्त्याने जाता येत प्रत्येक जण आपल्याकडेच पाहतोय असा भास होई ..,,एखाद्याशी बोलताना ..सारखे वाटत राही की ..हा जरी आपल्याशी सर्व साधारण गप्पा मारत असला तरी ..तरी मनातून आपली लायकी ओळखून आहे ..आपला तिरस्कार करतो ..आपल्या बद्दल याच्या मनात घृणा आहे ...वगैरे ..खरेतर हे सगळे माझ्या मनाचे खेळ होते हे देखील मला समजत होते ..मात्र ते असे थांबवावेत हे काही केल्या कळात नसे ..रात्री झोपायची भीतीच वाटे ....एकसे ..एक भीतीदायक स्वप्ने पडत असत ..प्रत्येक वेळी त्याचा शेवट .. शरीराला दरदरून घाम सुटलाय ..छातीचा भाता धपापतोय ..घसा कोरडा झालेला ..अश्या अवस्थेत जाग येण्यात होई ..मी रस्त्याने उघडा फिरतोय ..एखाद्या उंच सुळक्यावर अडकलोय ..समुद्रात पडलोय ..हातापायातले बळ नष्ट झालेय ...बुडतोय ..अश्या प्रकारचे स्वप्ने असत . अश्या वेळी जीवनावर श्रद्धा ठेवून ..मनातील अवस्थता ..नेमक्या भावना ..आपल्या समुपदेशकाशी ..जवळच्या व्यक्तीशी ..एखाद्या शुभचिंतक मित्राशी ..हे सगळे बोलून दाखवले पाहिजे ..तसेच नियमित ध्यान ..प्राणायाम ..योगाभ्यास करून मनाला प्रसन्नता ..संतुलन ..देण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत ..मन संगीत ..मनोरंजन ..विविध कला प्रकारांचा आनंद ..वगैरे गोष्टींमध्ये गुंतवून ठेवले पाहिजे ..असे मुक्तांगण मध्ये शिकवले गेले होते ..मात्र ते त्या वेळी मला सुचले नाही ...किवा सुचले तरी त्या गोष्टीना मी महत्व दिले नाही ...प्रत्येक व्यसनी व्यक्तीला व्यसनमुक्तीच्या अवस्थेत किवा व्यसनमुक्ती केंद्रातून उपचार घेवून आल्यावर अश्या प्रक्ररचे भास होतातच असे नाही .... काहीना नियमित आळस वाटणे ..कोणत्याही कामात रस नसणे ..नोकरीवर जाण्याची इच्छा नसणे ..सारखी चिडचिड होणे ...आपल्यावर अन्याय झालाय असे वाटणे ..वगैरे गोष्टी होऊ शकतात ...व्यसनी मित्रांशी भेटण्याची इच्छा होणे ..वगैरे प्रकार होऊ शकतात ..माझ्या बाबतीत घडणारे प्रकार हे ' स्किझोफ्रेनिया ' या मानसिक विकाराची लक्षणे देखील असू शकत होती ..मात्र सुदैवाने तसे घडले नाही .

. जेल मध्ये जाण्यापूर्वी घडलेल्या घटना अतिशय गंभीर स्वरूपाच्या होत्या ..जेलमध्ये असताना कित्येकदा त्या घटनांची उजळणी मी मनातल्या मनात करून ..स्वतःची अपराधीपणाची भावना मोठी करून ठेवली होती ..स्वतःच स्वतःची मनातल्या मनात अनेकदा निर्भत्सना केली होती ..त्याचा परिपाक म्हणून ..बाहेर पडल्यावर मला असे भास होणे सुरु झाले होते ..याचे मूळ माझ्या अंतर्मनातच होते ..कुचकामी पणाची ...वैफल्याची ..निराशेची ..अपराधीपणाची ..नाकारलेपणाची ....दारूण पराभवाची ..अश्या साऱ्या नकारात्मक भावना माझ्या मनात ठाण मांडून बसलेल्या होत्या ...परिणामी रात्रीची झोप पुरेशी होईनाशी झाली ..कशातच मन रमेनासे झाले ..आपण मुक्तांगण उगाच सोडले असे वाटू लागले ....एकदोन वेळा मुक्तांगण मध्ये फोन करून सारे सारे सांगून ..मुक्ता मँडमची माफी मागून ..परत मुक्तांगणला जावून रहावे असेही वाटले ..परंतु मनातील सुप्त अहंकार तसे करू देत नव्हता..सुप्त अहंकार किवा मदत घेण्याची तयारी नसणे ही प्रत्येक व्यसनीची समस्या असते ..आपण स्वतः सगळे काही नीट करू ..सगळे काही आपोआप नीट होईल ..अथवा मदत घेण्यात वाटणारा कमीपणा ..या सर्व गोष्टींमुळे मी अधिकच पराभूत होत होतो ... नेमकी मदत घेणे मी टाळले होते ..एरवी मी अतिशय बोलका आहे ..परंतु मनातल्या नेमक्या गोष्टी कोणाजवळ मनमोकळे पणाने बोलणे कटाक्षाने टाळतो ..त्या मुळे माझेच नुकसान होते...' ओपन माइंडेडनेस ' हा सुधारणेच्या काळात अतिशय महत्वाचा असतो ..मनातली सारी खळबळ ..अवस्थता समुपदेशकाकडे बाहेर काढून ... समुपदेशक सांगेल त्या सूचनांचा स्वीकार करणारा मनमोकळेपणा इथे अभिप्रेत असतो ..इथे जर ..तर ..न लावता मदत घेणे गरजेचे असते .अर्थात हे सगळे मला आता नीट कळतेय ..त्यावेळी अहंकारामुळे मी सारे संघर्ष मनातल्या मनात विनाकारण जपून ठेवले होते .

मानसी चार दिवसांनी सुमितसह परत आल्यावर आई मी व मानसी पुन्हा आधीच्या घरात राहायला गेलो ..भावाने मला सांगितले जरी तुझा मित्र तुला जामीन मिळवून देणार असला ..तरी तू त्याचा जामीन न घेता ..माझा मित्र तुझा जामीन करेल ..म्हणजे तू जरा गडबड केलीस की आम्हाला लगेच जामीन काढून घेता येईल ..तुला पुन्हा जेल मध्ये पाठवता येईल ..त्या नुसार आठ दिवसांनी कोर्टात जावून माझा पर्सनल बाँड रद्द करून ..शेख वकिलांच्या मदतीनेच.. माझ्या भावाच्या मित्राने मला जामीन दिला ..तसेच भावाने आईला आणि सर्व कुटुंबियांना सक्त ताकीद दिली ..याने एकदा जरी व्यसन केले आहे असे तुम्हाला समजले तर तुम्ही ते न लपवता ताबडतोब मला सांगा ..या पुढे व्यसनाच्या बाबतीत अजिबात तडजोड नाही ..इतर बाबतीत लाड केलेत तर हरकत नाही ..मात्र व्यसन अजिबात चालणार नाही ..प्रथमच भावाने इतका कडक पवित्रा घेतला होता ...जामिनावर असल्याने मी देखील भावाशी भांडू शकत नव्हतो ..नाहीतर परत जेल मध्ये जावे लागले असते ..अगदीच जायबंदी झालो होतो ..हतबलता काय ते अनुभवत होतो ..मानसी परत आल्यावर मी तिला जेलमधील घटना सांगत असताना.. ती खूप रडली ..म्हणाली दुसरा काही पर्यायच नव्हता शिल्लक ..तुम्ही जरी मला त्रास दिला नाहीत ..तरी तुमच्या व्यसनांचा ..अशा बेजावाबदार वागण्याचा मलाही त्रास होतोच ..घरातले सगळे वातवरण बिघडते ..सुहास भावोजी ..वाहिनी ..आणि सर्वांनी मला सांगितले होते की तुषारला जर सुधारावायचे असेल तर ..आता कडक पवित्र घेतलाच पाहिजे ..त्यासाठी भले खोटी केस करावी लागली तरी चालेल ..त्याच्या भल्यासाठी आपण हे करतोय ..त्यामुळे मला खोटी तक्रार द्यावी लागली ..तिलाही अपराधीपणा वाटत होता ..तिला दोष न देता मी तिला धीर दिला ..आपली प्रिय व्यक्ती आपल्यामुळे असहाय झालीय ..आपल्यामुळे तिचे जीवन जगणे कठीण होतेय ....ही जाणीव प्रत्येक व्यसनीला होणे आवश्यक असते .

( बाकी पुढील भागात )

====================================================================

नागपूरकडे प्रयाण ! ( पर्व दुसरे -भाग १३२ वा )

सुमारे पंधरा दिवस अशा घाबरलेल्या मनस्थितीत काढले ..व्यसनाची वारंवार आठवण येत होतो ..मात्र भावाला समजले तर तो जामीन काढून घेईल या भीतीने व्यसन करणे टाळत होतो ...तो दिवसातून एकदा तरी माझ्या ऑफिसमध्ये किवा घरी चक्कर मारून जात असे ..मुख्य हेतू हाच की माझे कसे चाललेय ते प्रत्यक्ष पाहणे ..ब्राऊन शुगर घेत ल्यावर त्याला माझ्या डोळ्यांच्या बाहुल्यांवरून समजलेच असते ..दारू प्यायलो असतो तर ..दारूचा वास आला असता ... व्यसनाने खूप पूर्वी दिलेला आनंद असा सहजा सहजी विसरता येत नाही ...नंतर व्यसनामुळे कितीही त्रास झाला असला तरीही ..व्यसनाची इच्छा होणारच नाही असे अजिबात नसते ..व्यसनमुक्तीच्या उपचारात व्यसन करण्याची इच्छा आणि ते करण्याची कृती या मधील अंतर वाढवण्यास शिकवले जाते ...तसेच कितीही इच्छा झाली तरीही ..व्यसन माझ्यासाठी ..माझ्या भविष्यासाठी ..कुटुंबियांसाठी या पूर्वी किती घातक ठरलेय याची स्वतःला वारंवार आठवण करून द्यावी लागते ..त्यासाठी मन स्थिर असावे लागते ...मनमोकळे पणे बोलणे ..मदत घेणे ..मनातील कलह ..गुंते ..नष्ट करण्यासाठी स्वताच पुढाकार घ्यावा लागतो ..या बाबतीत मात्र मी काहीच करत नव्हतो ..केवळ धास्तीमुळे व्यसन करणे टाळत होतो ..एकदा पाठ दुखतेय असे कारण सांगून मी राजरोस स्पाज्मो प्राँक्सिव्हानच्या दोन गोळ्या खाल्ल्याच ....तोवर स्पाज्मो च्या दुष्परिणामांबद्दल फारसा गवगवा झाला नव्हता ....आई व मानसीला ते पाठदुखीचे औषध आहे असेच वाटले ..त्या दिवशी रात्री छान झोप लागली ..स्वप्ने वगैरे पडली नाहीत ..शिवाय कोणाला समजलेही नाही ....व्यसनापासून दूर राहत असताना व्यसनी कोणाला समजू नये म्हणून ..झोपेच्या गोळ्या ..दारू ऐवजी ताडी किवा गांजा ओढणे ..ब्राउन शुगर ऐवजी दुसरे स्वस्त व्यसन करणे ..अशी पर्यायी व्यसने शोधण्याचा धोका असतोच ...मग दर दोन दिवसाआड पाठ दुखीच्या निमित्ताने मी स्पाज्मोच्या गोळ्या खात गेलो ...पगार झाल्यावर जास्त पैसे मिळाले म्हणून घरी येतानाच ब्राऊन शुगर विकत घेवून ठेवली ....भावू घरी येवून भेटून गेल्यावर ..सगळे झोपल्यावर ती गुपचूप संडासात जावून ओढली ..असे चक्र हळू हळू पुन्हा सुरु झाले .. पुन्हा जेल मध्ये जाण्याच्या भीतीने ..जरा जपूनच चालले होते सगळे ....पैशांसाठी भांडणे ..घरात कटकटी वगैरे टाळत होतो ..पैसे नसतील तेव्हा चुपचाप टर्की सहन करत होतो ..

मनातून हे सगळे कायमचे बंद व्हावे अशीही इच्छा होती ..तरीही इच्छेला आत्मशक्तीचे पाठबळ मिळत नव्हते ....आपण पूर्वी व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातच कार्य करण्याचा घेतलेला निर्णय सोडून उगाच नाशिकला परतलो असे वाटत होते ....एक दोनदा नाटकीपणे मुक्ता मँडमना फोन केला ..मात्र त्यांना खरे काय चाललेय ते अजिबात सांगितले नाही ..सगळे काही ठीक आहे असेच भासवले ..मानसीला मात्र माझी गडबड परत सुरु झाल्याचा संशय होताच ..ती अधूनमधून मला सावध करत गेली ...असे सुमारे तीनचार महिने सुरु राहिले ..पुढे पुढे बाहेर पडावे वाटेनासे झाले ..कामावर दांड्या मारून घरात निराशेत झोपून राही ..परंतु कुटुंबियांना सगळे खरे खरे सांगून मदत मागत नव्हतो ..शेवटी मानसीनेच एकदा पुढाकार घेवून मुक्ता मँडमना फोन केला ..सविस्तर नाही तरी त्यांना मानसीने ..माझे व्यसन पुन्हा सुरु झाल्याचे सांगितले ..यावर त्यांनी त्याला मला फोन करायला सांग असा तिला निरोप दिला ..मात्र मी आज ..उद्या ..असे करत ते टाळत गेलो ..तिने पुन्हा एकदा फोन केला ..तेव्हा मुक्ता मँडमने तिच्या जवळ रवी पाध्येचा नंबर दिला ..म्हणाल्या ..हा रवी तुषारचा मित्र आहे ..इथे ते सोबतच राहत होते मुक्तांगणला..त्याने नागपुरात स्वतचे व्यसनमुक्ती केंद्र सुरु केलेय . गेल्याच आठवड्यात तो मुक्तांगणला भेटीसाठी आला होता ....तेव्हा तो तुषार बाबत चौकशी करत होता.. ..त्याला त्याच्या व्यसनमुक्ती केंद्रासाठी अनुभवी कार्यकर्त्यांची मदत हवी आहे ..तू त्याला फोन करायला सांग तुषारला..सायंकाळी घरी आल्यवर मानसीने मला रवी पाध्ये बद्दल सांगितले ....मी तेथे फोन करावा असे सुचवले ..हा पर्याय मला आवडला ..मुक्तांगण मध्ये वारंवार अँडमीट होणे तसेही लज्जास्पद वाटू लागले होते ..तसेच तेथे सगळे समुपदेशक माझे मित्रच असल्याने मी गंभीरतेने उपचार घेत नव्हतो ...एखाद्या व्यक्तीला वारंवार उपचार घेवून फायदा होत नसेल ..किवा ती व्यक्ती उपचारांना योग्य सहकार्य करत नसेल ..तर दुसरया व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करून पहावे असे सुचवले जाते मुक्तांगणकडून ..त्या नुसार मुक्ता मँडमनी..मानसीला रवी पाध्येचे नाव सुचवले होते .. .थोडक्यात सांगायचे तर मी मुक्तांगण मध्ये ब्लँक लिस्टेड झालो होतो ..प्रत्येक व्यसनमुक्ती केंद्रात अशा नफ्फड लोकांची यादी असते ..उपचारात योग्य सहकार्य न करणारे ..अनेकदा संधी देवून देखील न सुधारणारे ..उपचारांच्या काळात मस्ती ..गोंधळ करणारे ..स्वतःला अति शहाणे समजणारे ..वगैरे प्रकारचे लोक या ब्लँक लिस्ट मध्ये असतात ....माझ्या मागच्या मुक्तांगणच्या उपचारांच्या वेळीच ..मला जास्त दिवस राहावे असे सुचविण्यात आले होते ते मी ऐकले नव्हते ..त्या वेळी अशी गम्मत झाली होती की ..बाबांना फोन करून जेव्हा मी मुक्तांगण मध्ये दाखल झालो होतो ..तेव्हा तेथे समुपदेशक म्हणून काम करणाऱ्या माझ्या मित्राने येवून सांगितले होते की वर स्टाफ मिटिंग मध्ये ..तुझी फाईल समुपदेशक म्हणून स्वीकारण्यास कोणीही समुपदेशक तयार होत नाहीय ..तुला समुपदेशन करण्याची कोणाचीही तयारी नाहीय ..तूला समुपदेशन करणे म्हणजे दगडावर डोके आपटून डोके फोडून घेण्यासारखे आहे असे सर्वांचे मत आहे ..एकंदरीत आता मुक्तांगण मध्ये मी उपचार घेऊ नये असे मत दिसले मुक्तामँडमचे म्हणून त्यांनी मानसीला रवी पाध्येचा नंबर दिला होता ..

रवी पाध्ये हा अल्कोहोलिक होता ...१९९७ साली मी मुक्तांगण मध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत असताना माझ्या समोरच तो उपचारांसाठी दाखल झाला होता..३५ दिवसांचा उपचार पूर्ण करून स्वखुशीने आफ्टर केअर मध्ये राहिला होता ..हळू हळू त्याने बंधूला वार्डात मदत करायला सुरवात केली होती ..,,त्याचे कौशल्य पाहून त्याला कार्यकर्ता म्हणून मानधन देखील सुरु झाले होते ..हा रवी गोरापान ..उंच ..हसरा ..मितभाषी आणि एकदम टापटीप राहणारा कार्यकर्ता म्हणून मुक्तांगण मध्ये लवकरच सगळ्यांचा आवडता झाला होता ..कोणाशीही त्याचे भांडण नसे ..अतिशय समजूतदार अशी याची छबी होती ...मी आफ्टर केअर इन्चार्ज असताना तो वार्ड मध्ये इन्चार्ज म्हणून बंधुसोबत काम करत असे ..रात्री आम्ही सगळे कार्यकर्ते आफ्टर केअर मध्ये एकत्रच झोपत असू ..त्याचा पलंग अनेक दिवस माझ्या शेजारी होता ..त्यामुळे तो माझाही चांगला मित्र होताच ..मानसीने मला त्याचा फोन नंबर देवून मुक्ता मँडमचा निरोप सांगितल्यावर मी दुसर्याच दिवशी रविला फोन केला ..मला आठवतेय ती१४ एप्रिल २००२ अशी तारीख होती ..सकाळी मी रवीला फोन केला ....मी बोलतोय हे समजल्यावर त्याला आनंद झाला ..म्हणाला ..कसे चाललेय तुमचे तुषारभाऊ ..अनुभवाने आणि वयानेही मी त्याच्यापेक्षा मोठा असल्याने तो मला तुषारभाऊ असे संबोधत असे ..एरवी देखील रवी कोणालाही पटकन अरे तुरे करत नाही ..सर्वाना सन्मानानेच बोलतो ..मी रविला माझे व्यसन परत सुरु झाल्याचे सांगितले ..त्यावर त्याने मला इथे नागपूरला येत का ? असे विचारले ..मी ताबडतोब होकार दिला ..

( बाकी पुढील भागात )

====================================================================

शून्य मैल ! ( पर्व दुसरे - भाग १३३ वा )

रवी पाध्येशी बोलणे झाल्यावर मी जास्त विचार करत बसलो नाही ..काळजी होती प्रपंचाची ..नाहीतरी मी कुठे प्रपंच नेटका करत होतो ...रवीच्या नवीन सेंटर वर नव्याने सुरवात करावी हे मनाशी योजले ..सुरवातीला काही दिवस संघर्ष करावा लागेल ..नाशिक पासून इतक्या दूर कधी मला नव्याने जीवन सुरु करण्याची संधी उपलब्ध होईल असे वाटले नव्हते ...लहानपणी एकदा वडिलांची बदली नागपूरला होता आहे असे ऐकले होते ..त्यावेळी वडिलांनी प्रमोशन मिळत असूनही बदली नाकारल्याचे आठवतेय ..खूप उन्हाळा असतो ..एकदम गरम वातावरण आहे ..बकाल शहर आहे ..असे काहीतरी वडील बोलत असत नागपूरबद्दल हे आठवले ..त्या वेळीच बालमनात नागपूरबद्दल तेथे कधीच राहायला जायचे नाही अशी अढी बसली असावी ..नागपूरचा विषय निघाला की ..उन्हाळा ..बकाल शहर वगैरे गोष्टी आठवत ..वडिलांचे असे मत बनण्यास एक कारण होते ..त्यांचा रेल्वेतील एका मित्राला सरकारी कामासाठी म्हणून एका आठवड्यासाठी नागपूरला पाठवले गेले असताना ..त्यावेळी नेमका उन्हाळा असल्याने त्याने योग्य काळजी न घेतल्याने त्याला सनस्ट्रोक होऊन तो गेला होता ...सायंकाळीच मी नागपूरला निघण्याचे ठरवले ..तसे रविला सांगितले ..तसेही आता नाशिकमध्ये राहणे मला अवघड होत चालले होते ...अगदी सुरवातीला मुक्तांगण मध्ये उपचार घेवून परतल्यावर ..मी तीन वर्षे व्यसनमुक्त असताना ..मुक्तांगणचा कार्यकर्ता म्हणून चांगला लौकिक मिळवला होता ....नंतर होत गेलेल्या रीलँप्स मुळे मीच तो लौकिक धुळीस मिळवला होता .. शेवटच्या जेलच्या घटनेनंतर तर मला बाहेर फिरण्याची देखील लाज वाटू लागली होती ..उगाच इथे कुढत जगण्यापेक्षा जावू नागपूरला ..उन्हाळा असेल ..गरम वातावरण असेल ..बकाल शहर असेल ..तरीही जावूच हा निर्धार पक्का केला ...आईने सांगितले मी तू मानसी व सुमितची काळजी करू नकोस ..आम्ही त्यांची काळजी घेवू ..तू फक्त सध्या तुझ्या सुधारणेकडे लक्ष दे ..हे व्यसनाचे जोखड कायमचे झुगारून दे मनावरून ...चार पैसे कमी मिळवलेस तरी हरकत नाही ..आम्हाला तुझ्याकडून आर्थिक संपन्नतेची नाही तर ..व्यसनमुक्तीची अपेक्षा आहे ..प्रत्येक व्यसनीच्या घरी हेच सांगत असावेत ..जास्त पैसे कमावले नाहीस तरी चालेल ..मात्र व्यसनमुक्त रहा ..अर्थात आम्हा व्यसनी मंडळीना कुटुंबियांच्या भावना समजत नाहीत ..आमच्या जीवनाच्या बिघडलेल्या गाडीची इतर लोकांच्या चांगल्या जीवनाशी तुलना करून ....स्वतःच मनात खंत ..अपराधीपणा ..निराशा अशा भावना जोपासत असतो ...पुन्हा पुन्हा त्याच चुका करत जातो .

दुपारी आईकडून पैसे घेवून ब्राऊन शुगरच्या दोन पुड्या आणि एक संत्राची क्वार्टर घेवून ठेवली ..गाडीत प्यायला म्हणून ...शेवटचे म्हणून ...व्यसनी मंडळींचे हे शेवटचे असतेच नेहमीचे ..खरे तर असे शेवटचे म्हणत अनेकदा परत परत तेच केलेलं असते ..आताही आम्ही जेव्हा एखाद्या व्यासानीला उपचारांसाठी घेवून येतो तेव्हा ..तो मला एकदा व्यसन करून द्या ..शेवटचे ..असे विनवत असतो .. ..सायंकाळी सेवाग्राम एक्प्रेसने निघालो ..भावू स्टेशनवर सोडण्यासाठी आला होता ..त्यानेही मानसी व सुमितची काळजी करू नकोस ..तू फक्त स्वतच्या सुधारणेकडे लक्ष दे असे बजावले ..घरून निघताना ..मानसीच्या डोळ्यातील पाणी पाहून जीव कळवळला ..तिच्या कडेवरचा सुमित नेमके काय चाललेय हे न समजल्याने मी पण बाबांबरोबर जातो म्हणून रडत होता ..मनावर दगड ठेवून निघालो घरातून ...गाडीत स्टेशनवरून हलल्याबरोबर ..संडास मध्ये शिरलो ..एक ब्राऊन शुगरची पुडी आणि अर्धी क्वार्टर लावली ..मग बर्थवर येवून बसलो ..मनात सगळ्या भूतकाळाला उजळणी देत ..अनघा लग्न होऊन नागपूरजवळच कोठे तरी राहते हे माहित होते ..नागपूरला कधीतरी ती रस्त्यात दिसेल ..भेटेल असे उगाच वाटत राहिले ..मानसीशी लग्न झाल्यावर ..मानसीने मला खूप प्रेम दिले होते ..पत्नी धर्म अगदी उत्तम निभावला होता ..उलट मीच पती म्हणून योग्य जवाबदारी निभावयास कमी पडलो होतो ..तरीही अनघाची आठवण येतच असे...अनघाशी जर आपले वेळीच लग्न झाले असते तर ..आपले जीवन नक्कीच वेगळे असते ..यापेक्षा चांगले असते असे वाटे ..व्यसनमुक्तीच्या वाटेवर ..हे जर ...तर..किवा IF ..But ..न लावता चालता यायला हवे ..जे समोर आहे त्यात समाधान मानून जगायला शिकले पाहिजे ..माझी असमाधानी वृत्तीच नेहमी माझा घात करत आली आहे ..जे मिळाले आहे ..मिळते आहे ..त्यापेक्षा अजून काहीतरी ...जे मला हवे होते ..जे मिळू शकले नाही ..जे कदाचित कधीच मिळणार नाही ..याबद्दल जास्त खेद वाटत राहतो ..त्या मुळे जे समोर आहे त्याची किंमत रहात नाही ...गाडीत उलट सुलट विचार करत जागाच होतो रात्रभर 

सकाळी सात वाजता अजनी स्टेशनवर उतरलो ...रवी आणि त्याचे तीन मित्र मला घ्यायला आले होते स्टेशनवर ..त्या मित्रांना रवीने माझ्या बद्दल खूप काही तरी चांगले सांगितलेले जाणवले ..कारण ते सगळे खूप आदराने माझ्याशी बोलत होते ..रवीचे हे एक वैशिष्ट्य आहे ..तो बहुधा कोणाबद्दल वाईट बोलत नाही ..त्याला माहित असले तरी.. ..अगदी जवळच्या ...मोजक्याच लोकांजवळ तो एखाद्या बद्दल असलेले खरे मत मांडतो बहुधा सर्वांबद्दल चांगलेच बोलतो ...मला रवीने आनंदाने मिठी मारून माझे स्वागत केले ..म्हणाला तुषारभाऊ मुक्तांगण मध्ये असतना पेक्षा आता तब्येत जास्त खराब झालीय तुमची ..मी नुसताच हसलो ..स्टेशनवरून रवीच्या घरी शंकर नगर येथे गेलो ...रवी मुक्तांगणला असताना एकदा त्याचे आईवडील त्याला भेटायला आले असताना त्यांना पहिले होते ..मात्र ओळख नव्हती ..रवीने माझी ओळख करून दिली त्यांच्याशी ..चहा ..नाश्ता वगैरे करून आम्ही सेंटरवर निघालो ..सेंटर वर अँग्नेलो देखील आहे हे रवीने सांगितले ..मला रविचे व्यासानुक्ती केंद्र कसे आहे हे पाहण्याचे कुतूहल होते ..नागपूरपासून सुमारे ३४ किलोमीटर वर सेंटर आहे असे त्याने सांगितले ..एका ' मंगरूळ ' नावाच्या खेडेगावात ..एका मित्राच्या मदतीने ..भाड्याची जागा मिळाली होती ...आम्ही सगळे बाईक वर तेथे जाण्यास निघालो होतो ..एप्रिल महिना असल्याने उन खूप तापले होते ..अगदी सकाळी १० वाजताच ..खूप गरम होत होते ..रवीने मला एक पांढरा कपडा दिला डोक्याला गुंडाळायला ..म्हणाला ..हे इथे आवश्यक असते ..उन्हापासून बचाव करायला ..मला गम्मत वाटली ..तो कपडा डोक्याला नेमका कसा बांधायचा हे देखील शिकवले त्याने ..वाटेत मी रविला सांगितले ..माझे व्यसन सुरु होते ..त्यामुळे आता मला दोन तीन दिवस टर्की चा त्रास होईल ..स्पाज्मो प्राँक्सिव्हानच्या गोळ्या घे वाटेत ...मात्र आम्ही शहराच्या बरेच पुढे आल्याने एका छोट्याशा मेडिकल स्टोर्स मध्ये ..नुसत्या सध्या प्राक्सिव्हान मिळाल्या ..टर्की कमी होण्यास याचा फारसा फायदा होणार नव्हता ..सुमारे तासभराने आम्ही सेंटर वर पोचलो ..साधारण सातशे स्क्वेअरफुटांचा एक हॉल..बाहेर पडवी ..असे ते शेतातील फार्महाऊस सारखे होते ..वर छत टिनाचे ..सेंटरवर अँगी आणि इरफान हे मुक्तांगणचे जुने मित्र भेटले !

( बाकी पुढील भागात )

===========================================================

नवी सुरवात ...! ( पर्व दुसरे - भाग १३४ वा )

रवीने मुक्तांगणला उपचार घेवून तिथेच सुमारे तीन वर्षे आफ्टर केअर मध्ये वास्तव्य केले होते ...मुक्तांगणचा निवासी कर्मचारी म्हणून काम करत असताना ..त्याची तेथे नागपूरहून मुक्तांगण मध्ये समुपदेशकाच्या प्रशिक्षणासाठी आलेल्या एका मुलीची ओळख झाली ...मने जुळली .. त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला ..मी जेव्हा सन २००० जुलै मध्ये मुक्तांगण सोडले ..त्याच सुमारास रवीने देखील नव्याने नागपूरला जीवनाची सुरवात करावी या हेतूने ..सर्व संमतीने मुक्तांगण सोडले होते ..मुळचा नागपूरचाच असल्याने मुक्तांगण मध्ये यशस्वी उपचार घेवून तसेच व्यसनमुक्तीचा कार्यकर्ता म्हणून पुरेसे अनुभव घेवून तीन वर्षांनी त्याने ..पुन्हा नागपूरला येण्याचा निर्णय घेतला होता ...नागपूरला आल्यावर शासकीय अनुदान मिळणाऱ्या एका व्यसनमुक्ती केंद्रात त्याने समुपदेशक म्हणून नोकरी पत्करली ..त्याची होणारी पत्नी देखील तेथेच काम करत असे ...दरम्यान त्यांनी लग्नही केले ....नागपूरच्या अनुदानित व्यसनमुक्ती केंद्रात करताना त्याला आलेले अनुभव भयंकर होते ....केवळ शासनाचे अनुदान मिळते म्हणून व्यसनमुक्ती केंद्र सुरु करणारे अनेक लोक आहेत..ज्यांना व्यसनाधीनता या आजाराची शास्त्रीय माहिती नसते ..उपचार पद्धती नेमकी कशी असली पाहिजे याचेही ज्ञान नसते ..उपचार घेण्यासाठी दाखल झालेला व्यसनी सुधारावा याची कळकळही नसते ...फक्त शासनाचे अनुदान मिळवावे या हेतूने सुरु केलेल्या त्या व्यसनमुक्ती केंद्रात ..दाखल झालेल्या व्यसनी व्यक्तीला ..केवळ काही दिवस व्यसन मिळणार नाही अशा ठिकाणी डांबून ठेवणे असाच प्रकार होता ...समूह उपचार ..व्यक्तिगत समुपदेशन ..पालकांचे समुपदेशन ..वैवाहिक समुपदेशन ..अशी व्यसनमुक्तीस सर्वांगीण मदत करू शकणारी शास्त्रीय उपचार पद्धती नव्हती .... ..अनेकदा तर अनुदान मिळावे म्हणून खोटे अहवाल तयार केले जात ....शासनाकडून तपासणी करण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना पैसे वाटून ते अहवाल अधिकृत करून घेतले जात असत ....मुक्तांगण सारख्या समर्पित हेतून काम करणाऱ्या संस्थेत काम केले असल्याने ...रविला ते सारे खटकले ..त्याचे नियमित संचालकांशी खटके उडू लागले ..अशी व्यसनमुक्ती केंद्रे व्यसनमुक्तीच्या नावावर समाजाच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक करण्याचे काम करत असतात ...शेवटी अति झाल्यावर रवीने मुक्तांगण सारखे सर्वांगीण उपचार देवू शकणारे व्यसनमुक्ती केंद्र सुरु करायचे ठरवले..योगायोगाने त्याच्या पत्नींने पूर्वीच ' मैत्री बहुउद्देशीय संस्था ' या नावाने एक सामाजिक संस्थेची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करून ठेवली होती ..त्या संस्थे मार्फत ' मैत्री व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र हा प्रकल्प ' राबवण्याचे उभयतांनी मनावर घेतले ..पुरेसा पैसा हाताशी नव्हता ..तसेच साधन सामुग्रीची कमतरता देखील होतीच ..परंतु सगळे काही ठीक होईल या विश्वासाने काम सुरु करण्याचे ठरले ..कुटुंबियांची मदत ..मित्र मंडळींची मदत ..तसेच रवी ज्या संस्थेत काम करत असे ...तेथील रवीच्या मदतीने व्यसनमुक्त राहणाऱ्या चार मित्रांच्या मदतीने शेवटी फेब्रुवारी २००२ मध्ये ' मैत्री व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र ' या प्रकल्पाची सुरवात नागपूरजवळ असलेल्या ' मंगरूळ ' नावाच्या खेडेगावात मित्राच्या शेतातील फार्म हाउसवर झाली होती .

अनुभवी कार्यकर्ते म्हणून जमवाजमव सुरु करताना ..रविला पूर्वी मुक्तांगण मध्ये असलेला अँगी व लवकरच इरफान सामील झाला ..हे दोघेही माझ्या सारखेच ' नफ्फड ' म्हणजे वारंवार रीलँप्स होणारे ..त्यानाही मदतीची गरज होतीच म्हणून रवीकडे आलेले ..मी नंतर दोनच महिन्यात तेथे सामील झालो ..मी गेलो तेव्हा तेथे उपचार घेणारे जेमतेम पाच जण होते ..सगळे ' अल्कोहोलीक ' अँगी व इरफान जरी अनेकदा मुक्तांगण मध्ये असले तरी ..त्यांनी मुक्तांगण मध्ये समूह उपचार घेणे ...योगाभ्यास घेणे..पथनाट्यात काम करणे ..वगैरे कामात रस घेतला नव्हता ..ते इतर व्यवस्थापन करण्यात अनुभवी होते ..म्हणजे देखरेख ..किचन मधील काम ..सुरक्षा व्यवस्था ..विजेची कामे ..फिटिंगची कामे ..वगैरे ..मी मुक्तांगणला असताना कुतूहल म्हणून किवा शिकायची आवड म्हणून व्यसनमुक्ती केंद्राशी संबंधित उपचारांच्या सर्व बाबी शिकलो होतो ..माझ्या प्रवेशानंतर कार्यकर्त्यांची योग्य सांगड घातली गेली ... परिपूर्ण अशी टीम तयार झाली ..मंगरूळ पासून सुमारे एक किलोमीटर असलेल्या शेतात ..केंद्राच्या परिसर अतिशय शांत ..निसर्गरम्य असा होता ..वीज व पाण्याची थोडी असुविधा होती ..कारण तेथे शेतात असलेली विजेचा ट्रान्स्फार्मर दर एक दोन महिन्यांनी नादुरुस्त होई ..किवा चोरीला जाई ..मग तो नवीन बसेपर्यंत अंधारात राहावे लागे ..शिवाय लोड शेडींग होतेच ..उन्हाळ्यात तर खूपच वांधे होत असत ..वर घातलेले टीनाचे पत्रे ..गरम होऊन आत मध्ये तापलेल्या भट्टीसारखे वातावरण निर्माण होई ..वीज असताना कुलर मदतीला असे ..मात्र वीज नसली की भट्टी ..पाण्यासाठी एक विहीर होती ..त्याचा जुना पंप जेव्हा नादुरुस्त होई ..तेव्हा त्याला सुरु करण्यासाठी खटाटोप करावा लागे ..नाहीतर मग बाद्ल्यांनी विहिरीतून पाणी काढून अंघोळ ..पिण्याचे पाणी ..वापरण्याचे पाणी वगैरे गरजा भागवल्या जात ..सेंटरच्या हॉल मध्ये एक संडास कम बाथरूम होते ..बहुधा तेथे कोणी जात नसत ..सकाळच्या वेळी बाजूच्या डोंगरावर उघड्यावर काम उरकले जाई ..विहिरीतून पंप सुरु करून पाण्याचा चार इंची फवारा बाहेरच्या अंगणात अंगावर घेवून एकत्रच अंघोळ ....तेथील आमचे जीवन ' सत्ते पे सत्ता ' मधील फार्म हाउस सारखे होते ..आम्ही सर्व बहुधा फक्त एखाद्या शाँर्टसवर वावरत असू ..निसर्गाच्या सानिध्यात ..मला सुरवातीला चार दिवस टर्की झाली ..नंतर मी देखील कामाला लागलो ..तेथे नियमित समूह उपचार ..योग्याभ्यास वगैरे घेणे सुरु केले ...रवी दिवसभर शहरातील कामे करत असे ..म्हणजे पालकांना त्याच्या घरी जाऊन भेटणे ..किराणा सामान ..भाजी वगैर खरेदी ..त्याच्या जवळ त्यावेळी सेलफोन नव्हता ..त्याच्या घरी असलेल्या फोन वरूनच सर्व कारभार चाले ..रात्री तो मुक्कामाला सेंटरला येई.. तो पर्यंत दिवसभर कारभार आम्ही सांभाळत असू ..अनेकदा रवीच्या सेंटर ते नागपूर अशा दोन तीन चकरा होत असत मोटार सायकलवर ..मनापासून कष्ट करत होता तो ..केंद्राच्या उभारणीसाठी ..तुटपुंज्या आर्थिक बळावर सुरु असलेले त्याचे प्रयत्न कौतुकास्पद होते ..त्याच्या जवळ त्यावेळी सेलफोन नव्हता ..त्याच्या घरी असलेल्या फोन वरूनच सर्व कारभार चाले ..

माझ्या ४९८ च्या केसची भावाने तीन महिन्यानंतरची तारीख घेतली होती ..तेव्हा मला नाशिकला जावे लागले असते ..हळू हळू मी नवीन ठिकाणी रुळत चाललो होतो ..नवीन वातावरणाशी जुळवून घेत होतो ..मनोरंजन म्हणून त्यावेळी तेथे ..कँरम बोर्ड .. एक रेडीओ उपलब्ध होता ...समोरच्या शेतात एक मोठे पिंपळाचे झाड होते ...त्याच्या सावलीत बसून निसर्ग निरखत राहायचे ..पहाटे क्षितिजावर हळू हळू पसरत जाणारी लाली ..' तेजोनिधी लोहगोल ' या गाण्याची आठवण करून देई ....सकाळ ..दुपार ..सायंकाळ ...रात्र ..निसर्गाच्या विविध छटा ..विविध रंग ..एप्रिल ...मे ...मधील रखरखीत उन ..रात्री २ पर्यंत असलेल्या झळा ..नंतर पहाटे एकदोन तास जाणवणारा सुखद गारवा ....तब्येत सुधारत चालली होती माझी ..एकदा आईचा रवीकडे फोन आला ..मे महिन्यात माझा भाचा आनंद याचे लग्न ठरले होते अकोल्याला ..तेथे लग्नाला नाशिकची सगळी मंडळी येणार होती ..मला नागपूरहून जायचे होते ..दोन दिवसांसाठी सर्वांची भेट होणार होती ..मुख्य म्हणजे भाच्याची होणारी पत्नी ही अनघाच्या दूरच्या नात्यात होती ..त्या निमित्ताने अनघा नक्की लग्नाला येईल अशी मला खात्री होती ..तिला नक्की भेटता येणार होते ..आईचा निरोप येताच मी स्वप्न रंजन करू लागलो ..सुमारे एक तपानंतर ...अनघाला पाहायला मिळाले असते ...जमले तर बोलता आले असते ..ती माझ्याशी बोलेल का ? सुरवात कशी होईल ? ..नाहीच बोलली तर ? वगैरे प्रश्न मनात होतेच .

( बाकी पुढील भागात )

===============================================================

दिल ढूंढता ....है फिर वोही ! ( पर्व दुसरे - भाग १३५ वा )

अकोल्याला लग्नात अनघा भेटेल या विचाराने मनाचा ताबा घेतल्यावर ..मन उलट सुलट विचार करू लागले ..तिला शेवटचे पाहून १२ वर्षे उलटून गेली होती ...तिचे लग्न झालेय ....नवरा छान सरकारी नोकरीत आहे वगैरे माहिती आधीच मिळाली होती ..एकंदरीत ती सुखात होती ...नंतर झालेली माझी वाताहत पाहता तिचे लग्न झाले हे बरेच झाले असे सर्वाना वाटत असेल ..त्यावेळी तिच्या कुटुंबीयांनी आम्हाला दूर करण्यासाठी घेतलेला कठोर निर्णय ..तिच्या भल्याचाच होता ..असे एकंदरीत चित्र तयार झाले होते ..पण जर तसे घडले नसते ..तर कदाचित मी लवकर सुधारलो असतो ..इतक्या टोकाला जावून व्यसने केली नसती ..असे मला वाटत असे ...शेवटी नियती की काय जे असते ते आडवे आलेच होते माझ्या मार्गात ....तुम्ही विश्वास ठेवा ..नका ठेवू ..टीका करा किवा समर्थन करा ..नियती तिचे काम करणारच ..तिचे तडाखे खावे लागणारच ...तिच्या प्रत्येक जण फेऱ्यात सापडणारच ..अशा वेळी मानव खरोखरच किती असहाय असतो हे मी अनुभवले होते ....जर कर्मे चांगली ठेवली तर नियती तिच्या मर्जीने हवी तशी ..हवी तेव्हा सूट देणार ...आहे तसा स्विकार करून पुढे हसतमुखाने पुढे चालत रहायचे ..किवा उभा जन्म रडत ....कुढत ..रहायाचे ही निवड मात्र आपल्या हाती असते...काही लोक ..निसर्गापुढे स्वतःच्या मर्यादा ओळखून ..सगळे स्वीकारून हसतमुखाने जगतात ..त्यांच्या व्यथा ..संकटे ..सारे पचवण्याची ताकद श्रद्धेच्या मार्गाने देवाकडून मिळवतात ...नाहीतर काही देवाला शिव्या घालत ... तिरस्काराची तिडीक मस्तकात घेवून तो तिरस्कारच जगण्याचा आधार बनवून जगात रहातात ..त्याच विखाराला जीवन उर्जा बनवून ..तुच्छतेने जगतात ..सगळ्यांकडे पाठ फिरवून अंगार वाटत फिरतात ...माझ्या सारखे व्यसनी ..एखाद्या व्यसनाला जीवनाचा आधार बनवून ..भ्रमात ..तात्पुरत्या धुंदीत ...रडत ..भेकत ..बंडखोरीचा झेंडा फडकावून ..स्वतःलाच जिंकण्याच्या कैफात ..स्वतःलाच नष्ट करत राहतात . 

अकोल्याला लग्नघरी पोचल्यावर मी शांत शांतच होतो ...नाशिकची सगळी मंडळी आलेली होती आधीच ..सुमित मला लगेच बिलगला ..सुमारे महिनाभरानंतर त्याला भेटत होतो...मानसीच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता ....धावपळीत कोणाशी काही बोलणे झाले नाही ..सायंकाळी सगळे कार्यालयात गेलो ..आज रात्री सीमंतीपूजन होते ...कार्यालयात महिलावर्ग नटूनथटून मिरवत होता ...तर पुरुषमंडळी कडेच्या ठेवणीतले कपडे घालून खुर्च्यांवर बसून सगळी गम्मत पाहत बसलेले ...मी उगाचच सारखा कार्यालयाच्या दारापाशी जावून बाहेर डोकावत होतो ..अजून अनघा आलेली नव्हती ..माझी घालमेल चाललेली ...अनघा दिसताच पुढे जावून तिच्याशी बोलावे का ? की नुसतेच स्मित करावे .. ओळखच देवू नये स्वतःहून ....मी समोर दिसल्यावर नेमक्या काय प्रतिक्रिया असतील तिच्या ..या बाबत मन साशंक होते ....आधार म्हणून सुमितला कडेवर घेतले होते ...अशा वेळी एखादा मित्र जवळ असला की बरे असते ..त्याच्याशी काहीतरी बोलून..स्वतःला धीर देता येतो ..सुमितला कडेवर घेतल्यामुळे का कोणजाणे मला थोडे सुरक्षित वाटत होते ..असाच अर्धातास गेला ..बाहेर अंधारून आले होते ..पूजेचे विधी सुरु झाले ..आता अनघा आज तरी येत नाही ..असे वाटून निराशेने कार्यालयाबाहेर चक्कर मारून यावे म्हणून निघालो ..गेट जवळच अनघाची आई दिसली ..तिच्या मागे अनघा ....छान भरजरी साडी नेसून ....गळ्यात दागिने घालून ..त्यांच्या मागे एक साधारण १० वर्षांची मुलगी ..अगदी सेम अनघासारखी दिसणारी..तसेच डोळे ..तशीच गोरी ..हे सगळे एकदम अचानक समोर दिसल्यावर ..मी गडबडलो ..घाईने पुढे निघून गेलो ...चक्क मी त्यांच्या नजरेला नजर देणे टाळले होते ..अनघाची आई दिसताच ..माझा आत्मविश्वास पळाला होता...नंतर अनघा दिसताच शरीराला कंप सुटला होता ..मनात योजलेले सगळे विसरून गेलो ...सुमितला घेवून तसाच पुढे गेलो ... रस्त्यावर एक चक्कर मारली ..छाती खूप धडधडत होती ..खूप धीट ..वगैरे असणारा मी गोंधळलो होतो ..चक्क घाबरल्या सारखे झाले होते ..इतक्या वर्षांनी अनघा दिसली होती ..तशीच तजेलदार ...प्रसन्न ..काळजात घालमेल होणे म्हणजे काय ते अनुभवत होतो .

सीमंती पूजनात सुरु असताना .. बायकांच्या गर्दीत सारखा अनघाकडे नजर लावून होतो ..तिने ..तिच्या आईने ..मला महिले होते हा नक्की ...मात्र त्यांनी काहीच प्रतिक्रिया दाखवल्या नव्हत्या चेहऱ्यावर ..निर्विकारपणे पुढे निघून गेल्या होत्या ...कदाचित मी त्यांच्यासमोर अनपेक्षितपणे गेल्याने ...मेंदूकडून काही सूचना येवून प्रतिक्रिया देण्याचा आतच मी पुढे निघून गेलो होतो ..अनघा आत हॉल मध्ये स्थिरावल्यावर ..गर्दीत मला शोधेल अशी मला आशा वाटत होती ..म्हणून तिला मी पटकन दिसावा अशा जागी बसलो होतो ...तिची नजर पकडण्याच्या टप्प्यावर ..मात्र तसे काही वाटले नाही ..ती सहजपणे सर्व स्त्रियांच्यात मिसळली होती ..गप्पा ..हसणे सुरु होते ..मी तिला निवांत निरखत होतो ..लग्नानंतरही फारसा बदल झालेला नव्हता तिच्या शरीरयष्टीत ..तशीच दिसत होती ..चेहऱ्या वरचे तेज वाढलेलेच वाटले ...सेम तिच्यासारखी दिसणारी तिची मुलगी ..समवयस्क मुलींबरोबर खेळण्यात दंग झालेली ...मानसी आणि अनघा त्या बसलेल्या स्त्रियांच्या गर्दीत एकमेकींपासून अवघ्या १० फुट अंतरावर होत्या ..मानसी अधून मधून सुमित माझ्याकडेवर शांत बसलेला आहे ना याची खात्री करून घेत होती..अनघाला आणि मला ओळखणारा भाच्याचा एक मित्र माझ्याजवळ येवून बसला ..त्याने माझ्या मनात काय चालले आहे हे ओळखले असावे ..' मामू ..काय गडबड है ? ' असे म्हणत माझ्याशी त्याने हात मिळवला ..मी उसने अवसान आणून हसलो ..डोळे सतत अनघाकडे लागलेले ..ती मात्र अनभिज्ञ असल्यासारखी ...सहजसुंदर !सुमारे दीड तासात एकदाही तिने माझ्याकडे पहिले नव्हते ..इतकी सहजपणे कशी वागू शकते ही ..याचे आश्चर्य वाटले मनात ..मला पाहून काहीच घालमेल झाली नसावी का हिची ? ..की स्त्रिया असे मनातले भाव सहजासहजी लपवण्यात जास्ती वाकबगार असतात ? ..कदाचित आता आपण विवाहित आहोत ..हे भान अनघाला सोडता येत नव्हते ..कदाचित तुषारकडे बघितले ..नजरानजर झाली तर ..स्वतःला सावरणे कठीण जाईन हे तिला माहित होते ..किवा आता मी तिच्या साठी चक्क परका झालो होतो !

( बाकी पुढील भागात )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें