गुरुवार, 14 नवंबर 2013

नवे आयुष्य


खतरनाक !  ( पर्व दुसरे -भाग ८१ वा )


संध्याकाळी दाखवायला आणलेली मुलगी म्हणजे खतरनाक असेच म्हणावे लागेल ..कारण तिला पाहताक्षणीच स्तब्ध ..पुतळा ..दगड ..विषण्ण ..वगैरे झालो .. एकाच वेळी मनात परस्पर विरोधी भावना येत होत्या ..मुलीचे वय ३४ वर्षे होते ..रंग आफ्रिकी काळा ..वजन सुमारे १०० किलो असावे ..बुटकी ..तिची मान वेगळी अशी दिसतच नव्हती ..मान आणि खांदा एकत्रच झालेले .. मला ग्लँडस्टन स्मॉल या गोलंदाजाचीच आठवण झाली . हिला कोण पसंत करणार या विचाराने बिचारीची दयाही येत होती ..वजन इतके वाढे पर्यंत हिच्या लक्षात कसे आले नाही असा विचार मनात डोकावून गेला ..रंग तर कोणाच्या हाती नसतो ..मात्र जे काही निसर्गाने दिले आहे त्याची नीट निगा तर माणूस राखू शकतो ..या मुलीने वाढत्या वजनाची अजिबात काळजी घेतलेली दिसत नव्हती ..कदाचित तिला वजन वाढण्याचा आजार असावा ....पदवीधर ..नोकरी नाही ... म्हातारे आईवडील..परिस्थिती बेताचीच ..म्हणजे पैसा पाहून कोणी लग्नाला तयार होईल अशीही परिस्थिती नव्हती . आई ..वहिनी ..मी आणि आमच्याकडे राहणारा विश्वदीप देखील त्यावेळी घरात होता ..सगळेच एकदम सुन्न झालेले ..काय बोलावे हेच सुचेना कोणाला ..आईनेच पुढाकार घेवून मुलीला एकदोन प्रश्न विचारले ..मग मला काही विचारायचे का म्हणून माझ्याकडे पहिले ...मी मानेनेच नकार दिला .मुलीच्या आई वडिलांना देखील आमच्या स्थितीची कल्पना आली असावी ..कदाचित त्यांना हे सवयीचे झाले असावे ..निर्विकार पणे ते सगळ्या गोष्टीतून जात असावेत . चहा घेवून मंडळी जायला निघाली ..नंतर कळवतो असे आईने त्यांना सांगितले ..इथे माझ्या पूर्व इतिहासाबद्द्दल काही सांगण्याची गरजच उरली नव्हती . एकमेकांशी न बोलताही सर्वांनी मुलगी एकमताने नापसंत केली होती ...विश्वदीप माझी मस्करी करत होता ..म्हणाला ' हिच्याशी लग्न झाले तर एक फायदा होईल ..तुषार परत कधी रिलँप्स झाला तर ही अशी बदडून काढेल की पुन्हा त्याची व्यसन करायची हिम्मतच होणार नाही ' .



एकंदरीत प्रकरण कठीणच होते ..मला तिच्याबद्दल वाईट वाटत होते ..कसे होणार हिचे लग्न ..तिच्या आईवडिलांना तुम्ही हिच्या लग्नाचा विचार सोडा ..हिला एखादी स्वत:च्या 
पायावर उभे राहता येईल अशी नोकरी करायला लावा ..आणि स्वाभिमानाने एकटीला जगू द्या ..असा आगावू सल्ला द्यावासा वाटला .जगात अनेक लोकांचे अनेक वेगवेगळ्या कारणांनी लग्न होत नाही ..त्यात विशेष ते काय ?..रात्री थट्टा मस्करी करतच झोपी गेलो .. मी जरी नकार दिला असला तरी बिचारीचे काहीतरी चांगले व्हावे असे मनापासून वाटत होते मला ...माणसाच्या मनाची गम्मतच वाटली ..त्या मुलीबद्दल मनात कणव दाटून आली तरीही मी तिला होकार मात्र दिला नाही हा स्वार्थीपणा होताच माझा ...दुसऱ्या दिवशी पुन्हा सायंकाळी एके ठिकाणी जायचे होते .

मुलगी पाहण्याच्या या दोन अनुभवानंतर माझा उत्साह मावळला होता ..आपल्याला बहुधा अशीच स्थळे सांगून येणार असा नकारात्मक विचार येत होता मनात ..किवा जर दिसायला चांगल्या मुली सांगून आल्या तरी ..माझा पूर्व इतिहास आड येणार ..म्हणजे एकूण आनंदच ...संध्याकाळी जी मुलगी पाहायला जाणार होतो ..तिचे वय २९ वर्षे होते ..एकुलती एक मुलगी .. नोकरी करणारी ..आम्ही त्यांच्या घरी पोचलो तेव्हा ..मुलगी बाहेर नोकरीवर गेलेली ..आता दहा मिनिटात येईलच असे तिच्या आईने सांगितले ..तो पर्यंत अवांतर गप्पा सुरु होत्या ..मुलीची आई सारखी माझ्या डोळ्यात रोखून पाहत होती असे मला जाणवले ...कारण काय असावे ते समजेना ..एकदाची मुलगी आली ..चपला काढून सरळ घरात गेली ..मी तिला पाठ्मोरीच पहिली ..बारीक चणीची होती ..एकंदरीत चालण्यावरून चटपटीत वाटली ..लवकरच ती ट्रे घेवून बाहे आली ..तेव्हा मी तिचा चेहरा पहिला .. गोरी होती ..मात्र ती नेमकी कुठे पाहतेय तेच कळेना ..मग लक्षात आले ..हिचा एक डोळा तिरळा आहे ..हे एक व्यंगच होते..तरीही चेहऱ्यावर कुठलेही भाव न दर्शवता मी तसाच बसून राहिलो .. आता मुलीची आई माझ्या डोळ्यात रोखून का पाहत होती ते उमगले .. माझ्या देखील डोळ्यात काही व्यंग आहे की काय ते तपासात असावी बहुधा ..मागील अनुभवावरून माझ्या व्यसनाच्या इतिहासाबद्दल इतक्या लौकर काही सांगायचे नाही हे आईने ठरवलेले होते ..आधी मुलीकडून पसंती आल्यावरच पुढील बोलणी करायची असे ठरले होते . इथेही नंतर कळवतो असे सांगून आम्ही बाहेर पडलो ..रस्त्यावर आल्यावर वहिनी तिचा एक डोळा तिरळा आहे असे म्हणालो ..तर वहिनी म्हणाली अहो तुम्हालाही तर टक्कल पडतेय की ..याचा अर्थ वहिनी सरळ सरळ हे सुचवीत होत्या की आता पसंतीचे जास्त नखरे न करता मी त्यातल्या त्यात चांगल्या मुलीला होकार द्यावा ..त्यांचेही बरोबरच होते म्हणा ..आयुष्यात सगळी व्यसने करून झाली होती माझी ..विशेष अशी नोकरी नाही ..वय ३६ वर्षे ..जास्त अटी ठेवायला नकोत .

( बाकी पुढील भागात )

========================================================================

पसंतीची कहाणी ! ( पर्व दुसरा -भाग ८२ वा ) 

मागील दोन अनुभवांवरून मी योग्य तो धडा घेवून जे समोर येतेय त्याला होकार देण्याच्या मनस्थितीत येत होतो .. तरीही मुलगी तिरळी आहे हे सत्य पचवणे तसे कठीणच होते ..मला मुख्य म्हणजे मित्र काय म्हणतील याचीच काळजी जास्त वाटली ...मित्र माझी मस्करी करणार हे तर नक्की होते ..त्यांना काय उत्तर द्यावे हे देखील मनात ठरवत होतो .. वाटले त्यांना सांगावे मुलगी बघायला गेलो तेव्हा चांगली होती ..पसंती कळवल्यानंतर मधल्या काळात लग्नापूर्वी तिचा छोटासा अपघात होऊन त्यात डोळा तिरळा झाला आहे ...मला स्वतःचेच मनातल्या मनात हसू आले ..माणूस प्रत्येक बाबतीत लोक काय म्हणतील याचाच जास्त विचार करतो ..लोकांनी नावे ठेवू नये म्हणून वेळप्रसंगी खोटे बोलतो ..लपवाछपवी करतो ..प्रत्येक वेळी ' लोक काय म्हणतील ' हा विचार अग्रभागी असतो ..हे लोक म्हणजे मुख्यतः समाजातले आपल्या जवळचे मित्र किवा नातलग असतात ...बहुधा ' नावे ठेवणे ' हे एकच काम जणू त्याना उत्तम जमते या हिशेबानेच आपण त्यांच्याकडे पाहतो .

शेवटी झोपताना मी निर्णय घेतला की उद्या आईला सांगून त्या मुलीला होकार कळवायचा ..दुसऱ्या दिवशी आईला तसे सांगितले .. आई म्हणाली ' आपण घाई करायला नको ..कालच दुपारी तुझ्या मामाने नांदेडहून एक स्थळ सुचवले आहे ..मुलीची माहिती आणि फोटो आलाय पोस्टाने ..एकदा शेवटचे म्हणून ते स्थळ देखील पाहून घेवू ' तू आज मुक्तांगानला परत जा व पुढच्या शनिवारी परस्पर सुटी घेवून नांदेडला मामाकडे ये ' त्या नुसार सर्व आईवर सोपवून मी मुक्तांगणला परतलो ...शुक्रवारी पुन्हा दोन दिवसांची सुटी घेवून नांदेडला गेलो ..तेथे आई आदल्या दिवशीच आली होती .. हे नांदेडचे माझे मोठे मामा तसे खूप कडक ..माझ्या बाबतीत त्यांना सर्व इतिहास माहितच होता .लहानपणी मला ते अनेकदा रागवत असत ..पुढे बोलून फायदा नाही या विचाराने त्यांनी रागावणे सोडले होते ..मात्र आईकडून टे व्यवस्थित माझी माहिती घेत होते ..जेव्हा मी चांगला राहतोय असे समजले तेव्हा त्यानाही माझ्या लग्नाच्या बाबतीत पुढाकार घ्यावासा वाटले म्हणून त्यांनी हे स्थळ सुचवले होते ..मामा सेवानिवृत्तीनंतर काहीतरी व्याप पाहिजे म्हणून हे लग्न जुळवून देण्याचे काम विनामुल्य करत असत.

दुसऱ्या दिवशी सकाळी मामाने मुलीच्या घरी आज दुपारी चार वाजता मुलगी पाहायला येतोय असा निरोप पाठवला ..तो निरोप मिळाल्यावर मुलीचा भाऊ आधीच मला पाहायला घरी आला ..खूप बोलका वाटला..त्याने माझी सर्व माहिती विचारली ..त्याचे समाधान झाल्यासारखे दिसले ..इथे माझ्या व्यसनाधीनते बाबत आधच काही सांगायचे नाही असे मामाने ठरवले होते ..आधी मुलीची पसंती आल्यावरच पुढचे बोलायचे असे सर्वांनी मला बजावले ..किवां माझ्या व्यसनाधीनते बाबत वडिलधाऱ्या लोकांना मामाच योग्य वेळी माहिती देईल असे ठरले ..या बाबतीत मी पुढाकार घेवू नये अथवा काही आगावूपणा करू नये अशी सर्वांची इच्छा दिसली ..मी जरा जास्त बोलका असल्याने ..तसेच स्वतःबाबत काही लपविण्याची माझी प्रवृत्त नसल्याने ..मी काही जास्त बोलून जाईन यांची त्यांना भीती वाटत होती ... मी तसे मान्य केले ..परंतु व्यसनाधीनते बाबत काही लपवायचे नाही हे पक्के ठरले ...दुपारी ४ वाजता मामा ..मामी ..आई ..मामाच्या सुना ..असे सगळे मुलीकडे गेलो ..मुलगी नाकीडोळी छानच होती ..वय ३४ वर्षे ..म्हणजे मुलीच्यात आणि माझ्यात जेमतेम २ वर्षांचे अंतर .. अंगाने जरा जास्त वाटली ..पण अगदीच बेढब नव्हती ..माझ्या मनात फक्त कुतूहल होते की मुलीचे इतके उशिरा लग्न होण्याचे कारण काय असावे ? मुलीच्या भावाला तसे विचारले तेव्हा तो म्हणाला खूप नखरे होते हिचे ..मुलगा काळा नको ..बुटका नको .. महाराष्ट्रातीलच हवा ..वगैरे कारणांनी मुलीने अनेक स्थळे नाकारली होती पूर्वी ..काही ठिकाणी देण्याघेण्यावरून बोलणी फिस्कटली ..नंतर वय वाढले तसे स्थळे सांगून येणे कमी झाले ..मग वडील आजारी होते म्हणून राहिले ..या उत्तराने माझे समाधान झाले ..मुलगी सर्वाना पसंत पडली ..मात्र मुलीच्यांकडून होकार बाकी होता .. मामाला मी सारखे विचारात होतो की मुलीकडे माझ्या व्यसनाधीनतेबद्दल सांगितले का ? तर तो म्हणाला मुलीच्या भावाला कल्पना दिली आहे ..तो यथावकाश मुलीला सांगेल ..मी निश्चिंत झालो .. रात्रीच मुलीच्या भावाचा पसंतीचा फोन आला .. तसे सगळे आनंदी झाले ..नंतर परत माझी सुटी ..आईचे पुन्हा नांदेडला येणे वगैरे गोष्टी लक्षात घेवून लगेच दुसऱ्याच दिवशी साखरपुडा करावा असे ठरले ..त्यापूर्वी एकदा मुलीने आणि मी सोबत फिरून यावे असा प्रस्ताव आला ..त्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी मी मुलीबरोबर बाहेर जाण्यास तयार झालो ..आई मला सारखे बजावत होती ..तुझ्याबद्दल जास्त बडबड करू नको .. मेंटल हॉस्पिटल वगैरे बोलशील तर मुलगी घाबरेल .. त्यापेक्षा तू जास्त बोलूच नको ..अगदी मोजकेच बोल वगैरे ..पुढे माझ्या मोजक्या बोलण्यामुळे भलतीच गम्मत झाली .

( बाकी पुढील भागात )
========================================================================


मतिमंद ??????  
( पर्व दुसरे -भाग ८३ वा )


दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगी मामाकडे आल्यावर मी तिच्यासोबत बाहेर पडलो .. जाताना आईने तिचे नाशिकचे आरक्षण करण्यासाठी मला सांगितले ..मी आरक्षण करताना काही घाई गडबड करू नये म्हणून मुलीला आईने वेगळ्या सूचना दिल्या की तू पण मिळणारे तिकीट नीट बघून घे ..तारीख वगैरे तपासून पहा ..नाहीतर चुकीची तारीख पडेल ..आईच्या अशा सूचनांची मला सवय होती .. सकाळी १० वाजता आम्ही निघालो होतो ..नांदेडला सायकल रिक्षा असतात ..त्यात बसून आम्ही रेल्वे स्टेशनकडे निघालो ..वाटेत मी शांतच होतो ..सायकल रिक्षामध्ये बसून आसपासची दुकाने ..लोक ..वाहने यांचे निरीक्षण करणे छान वाटते ..स्टेशनला गेल्यावर मी आरक्षणाच्या खिडकी जवळ जाऊन फॉर्म भरला ..भरून झाल्यावर मुलीने माझ्या हातून तो फॉर्म मागून घेतला व तारीख वगैरे तपशील तपासले ..आरक्षणाचे तिकीट घेवून आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो ..इतके सगळे होईपर्यंत आमचा अजिबात संवाद नव्हता ..बाहेर आल्यावर तिला म्हणालो एखाद्या हॉटेल मध्ये जाऊन काहीतरी खाऊ आपण ..तिने नुसतीच मान हलवली ..त्यातल्या त्यात बऱ्या दिसणाऱ्या एका हॉटेल मध्ये जाऊन बसलो ..काय खाणार असे तिला विचारले तर टिपिकल मध्यमवर्गीय मुलीचे उत्तर आले ..मसाला डोसा ..अरे वा ..मला पण मसाला डोसा आवडतो ..असे म्हणत मी दोन मसाला डोसा मागवले ..खाताना तिची जरा काट्या चमच्याची अडचण जाणवली ..ते पाहून मी तिला म्हणालो असे काट्याने ख्यायला मजा येत नाही ..हातानेच खावू ..म्हणत मी हाताने खावू लागलो ..तेव्हा तिनेही हातानेच सुरवात केली खायला ..ते संपल्यावर कोल्ड ड्रिंक्स काय घेणार विचारले तर मँगोला असे उत्तर आले ..मलाही मँगोलाच आवडतो ..असे म्हणत मी दोन मँगोला मागवले ..ती तोंडात स्टूॉ घेवून मँगोला पीत असताना मी मात्र सरळ बाटली तोंडाला लावली तेव्हा तिने जरा आश्चर्याने माझ्याकडे पहिले असे वाटले ..तेथून मग आम्ही सरळ घरी आलो ..आई धस्तावल्या चेहऱ्याने मामाच्या घराच्या दारातच उभी होती ..याने स्वतः बद्दल काही भलती सलती बडबड केली तर नसावी ही भीती आईच्या चेहऱ्यावर ..सगळ्यांचा निरोप घेवून मुलगी परत तिच्या घरी गेली .

सायंकाळी मुलीकडचे स्नेही श्री .नाईक यांचेकडे साखरपुडा होणार होता ..आम्ही सगळे उत्साहात होतो .. दुपारी साधारणपणे तीन वाजता मुलीच्याकडून कोणीतरी स्त्री मला भेटायला आली ..ती म्हणे मुलीच्या आईची मैत्रीण होती ..साधारण मध्यमवयीन ..सदाशिवपेठी गोरी ..बोलण्यात हुशार ..अस्सल पुणेकर वाटली ..तिला माझी थोडी माहिती घ्यायची होती ..तिने मला पूर्ण नाव ..शिक्षण ..वय ..असे प्राथमिक प्रश्न आधी विचारले ...मग माझ्या आवडी निवडी ..मी तिला गायन ..काव्य ..अभिनय . ..वाचन असे सांगितले ..मग माझ्या मुक्तांगणच्या नोकरी बद्दल माहिती विचारली ..मी तिला समजेल अशा प्रकारे .व्यसनाधीनता हा आजार ..उपचार ..सुधारणा अशी माहिती पुरवली ..माझ्या बोलण्याने तिचे समाधान झालेले दिसले ..शेवटी ती म्हणाली ..अहो मी मुद्दाम तुम्हाला माहिती विचारायला आलेय ..कारण सकाळी तुम्ही जेव्हा मुली सोबत फिरायला गेला होतात तेव्हा म्हणे तिच्याशी काहीच बोलला नाहीत ..गप्पगप्पच होतात ..मुलीला भलतीच शंका आली ..घरी येवून आम्हाला म्हणाली ..मुलगा एकदम गप्प होता .. खूप लाजत होता ..नुसता हो ला हो करत होता ..मला तो मंदबुद्धी असल्याचा संशय आहे..म्हणून मी आले तुमची वेगळी मुलाखत घ्यायला ..तुम्ही तर चांगलेच बोलके आहात . 

म्हणजे माझ्या कमी बोलण्याचा ..गप्प राहण्याचा अर्थ मुलीने भलताच काढला होता तर ..म्हणून मी खरोखर मंदबुद्धी तर नाही हे तपासायला एक हुशार बाई पाठवली होती ..मला मनातून खुप हसू येत होते ..म्हणजे जास्त बोलू नकोस ..उगाच फालतू बडबड करू नकोस या आईच्या सूचना मी तंतोतंत वठवल्या होत्या तर .. ...अजूनही मी पत्नीची ' मंदबुद्धी ' विषयावरून फिरकी घेतो ..लग्नाच्या इतक्या वर्षांच्या अनुभवावरून आता ती म्हणते ..' अहो आता वाटते की मंदबुद्धी असतात तर अधिक चांगले झाले असते ..तुम्ही जास्त वेळ दिला असतात मला ' 

( बाकी पुढील भागात ).

========================================================================

दोनाचे चार ! 
( पर्व दुसरे -भाग ८४ वा )


मी मंदबुद्धी नाही याची खात्री करून घेवून समाधानाने त्या बाई निघून गेल्या ..मी विचारात पडलो होतो ..मुलगी मला मंदबुद्धी समजली याचे एक कारण माझे गप्प राहणे ..हो ला हो करणे हे होते हे समजले पण त्याचा दुसरा अर्थ असाही निघत होता की मामाने माझ्या पूर्वीच्या व्यसनी जीवनाबद्दल मुलीच्या भावाला सांगितलेली माहिती त्या भावाने बहुधा मुलीला सांगितलेली दिसत नव्हती ...म्हणजे तिला बिचारीला अजून माझी नेमकी माहिती मिळालेली नव्हती हे स्पष्ट होत होते ..अनेकदा मुलीकडचे लोक मुलीचे लवकर लग्न व्हावे म्हणून इतके अधीर झालेले असतात की ते लग्नाच्या आड येवू शकतील पुढे संसारात समस्या येवू शकतील ..अशा गोष्टींचा नीट विचारच करत नाहीत ..कसेही करून एकदाचे लग्न उरकले पाहिजे असाच त्यांचा आग्रह असतो ..लग्नानंतर सारे आपोआप सुरळीत होते हा गैरसमज देखील असेल त्यामागे ..किवा मुलीचे लग्न जमवताना येणाऱ्या अनंत अडचणींचा सामना करताना ते इतके हातघाईला येत असतील की लग्न या एकमेव उद्दिष्टांपुढे त्यांना बाकी गोष्टी नगण्य वाटत असतील ...कारण काहीही असो पण माझ्या व्यसनी पणाबद्दल मुलीला माहिती मिळालीच पाहिजे या विचारांचा मी होतो ...साखर पुडा जेमतेम एक तासावर आलेला ..मी आईला तसे म्हणताच आई म्हणाली ..आपण तिच्या भवाला सांगितले आहे ना ..मग आता बाकी काळजी करू नकोस ..हवे तर नंतर तिला तू विश्वासात घेवून सांग सगळे ...आता या भानगडी काढू नकोस आयत्या वेळी ...आईच्या म्हणण्या प्रमाणे मी शांत राहिलो . 

सायंकाळी साग्रसंगीत असा साखर पुडा झाला ..देण्याघेण्याच्या काही विशेष अडचणी नव्हत्याच ..फक्त मुलामुलीकडच्या नातलगांचा मानपान वगैरे गोष्टी होत्या ..त्या ठरल्या ..जवळचा मुहूर्त म्हणून ५ सप्टेंबर १९९८ ही तारीख ठरली...मुलीचे नाव विद्या तुप्पेकर ..वय ३४ वर्षे ..शिक्षण बी. ए. ...गृहकृत्यदक्ष वगैरे ...मुलगा बी.कॉम ..समाजिक कार्यकर्ता म्हणून मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात नोकरी ..मानधन रुपये ३००० ..होतकरू ..कुटुंबवत्सल आहे की नाही ते नक्की नाही . एकदाचे लवकरच माझे दोनाचे चार हात होणार हे पक्के झाले ...दुसऱ्या दिवशी पुण्याला परत येताना बसस्टँडवर मला सोडायला मुलीचा भावू आला होता ... मी मुलीच्या नावाने एक पत्र लिहून त्याच्याकडे दिले त्या पत्रात ..मी पूर्वी दारू , गांजा . ब्राऊन शुगर वगैरे प्रकारच्या व्यसनांच्या आहारी गेलो होतो ..मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेवून आता तेथेच कार्यकर्ता म्हणून काम करतोय हे लिहिले होते ..कदाचित तुला हे तुझ्या भावाने सांगितले नसावे असे मला वाटले म्हणून वेगळे पत्रात लिहितोय ....आपल्या दोघांना संसार करायचा आहे त्यामुळे तुला हे सर्व माहित असणे आवश्यक आहे ..जर तुला माझ्या पूर्व इतिहासाबद्दल काही आक्षेप असेल तर ..अजूनही तू मला नकार देवू शकतेस ..साखरपुडा झाला म्हणजे आता काही इलाज नाही असे समजू नये वगैरे लिहिले ..या पत्राचे उत्तर मला मुक्तांगणच्या पत्त्यावर लवकर पाठवावे असे शेवटी लिहून शेवट केला ..पत्र पाकिटात बंद करून मुलीकडे द्यायला तिच्या भावाला सांगितले .

पुण्याला पोचल्यावर दुसऱ्याच दिवशी मुक्ता मँडमना भेटून सगळा वृत्तांत कथन केला ..मुलीला तुझ्या व्यसनाबद्दल नक्की सांगितलेस का ? हा त्यांचा पहिला प्रश्न होता ..त्यांना सांगितले की मुलीच्या भावाला आधी सांगितलेय ..नंतर मी मुलीसाठी देखील एक पत्र त्याच्याजवळ दिलेय ..तर मँडम म्हणाल्या की जर त्या भावाने ते पत्र मुलीला दिला नाही तर गोंधळ होईल ..त्या मुळे तू पुन्हा एक वेगळे पत्र लिहून मुलीच्या नावाने त्यांच्या पत्त्यावर पाठव ..एका मुलीला अंधारात ठेवून तिच्या आयुष्याचे निर्णय घेतले जावू नयेत म्हणून मुक्ता मँडम खूप जागरूक आहेत हे जाणवले ...त्यांच्या सांगण्यानुसार मी पुन्हा तशाच आशयाचे एक पत्र लिहून त्यांना दाखवले आणि त्यांच्या समती नुसार ते पत्र लगेच मुलीच्या पत्त्यावर पोस्ट केले ..मग सुरु झाला इंतजार ..मुलीच्या पत्राचा ..माझा इतिहास समजल्यावर मुलगी नकार तर देणार नाही ही शंका सारखी मनात येवू लागली ..आम्हा व्यसनी व्यक्तींचा स्वभावच असतो जास्ती चिंता करण्याचा ..त्या काळात मी अत्यंत अस्वस्थ होतो ..वेगवेगळे नकारात्मक विचार मनात येत असत ..त्यांचा शेवट आपले लग्न जमणे शक्यच नाही इथवर होत असे ..अशा वेळी खूप उदास वाटे ..त्याच वेळी कसा कोण जाणे मी मनातल्या मनात गणपती अथर्वशीर्ष म्हणत असे ..त्यामुळे जरा मनाला धीर मिळे ..गणपती जरी माझ्या आयुष्यात मला हवे तसे मिळवून देणार नसला तरी ..जे होते आहे ते सहन करण्याची ..शांतपणे स्वीकारण्याची शक्ती नक्कीच देवू शकेल अशी माझी श्रद्धा होती ...इतक्या सगळ्या भानगडी करूनही मी पुन्हा उभा राहिलो होतो ..हे जरी इतरांना माझ्या इच्छाशक्तीचे फलित आहे असे वाटत असले तरी मला खात्री होती ..की कोणतीतरी शक्ती नक्कीच आहे या मागे ...जी मला वारंवार उभे राहण्याचे बळ देते ..तिला कोणी देव म्हणो ..कुणी अल्ला म्हणो.. वा कुणी येशू म्हणो ...निसर्ग म्हणो ..किवा अजून कोणते नाव देवो ..मात्र ती अदृश्य ..सर्वव्यापी ..सर्वसाक्षी शक्ती असलीच पाहिजे असे माझे दृढ मत बनले होते आजवरच्या अनुभवातून ..ती शक्ती प्रत्यक्ष जरी तुमच्या समोर येत नसेल ..तरी काही व्यक्ती ..विचार ..घटना ..या द्वारे तुमच्यापर्यंत पोचते ..आपला अहंकार बाजूला ठेवून तिची योग्य ओळख झाली तर ..ती शक्ती आपल्याला शहाणपणाचा मार्ग दाखवू शकते .

शेवटी सुमारे एका आठवड्याने मला फोन आलाय नांदेडहून असा निरोप फोनड्युटी वर असलेल्या कार्यकर्त्याने मला दिला ..मी धडधडत्या हृदयाने फोन कानाला लावला ..तिकडून हँलो ..मी विद्या बोलतेय असा आवाज आला .. हृदय अजूनच धस्तावले ..आता बहुधा हे लग्न होणे मला मान्य नाही असे ऐकायला मिळते की काय ? पण नाही ..ती पुढे म्हणाली ..तुमचे पत्र वाचले...बराच विचार केला ..सगळ्यात जास्ती आवडला तो तुमचा प्रामाणिकपण ...आता तुम्ही व्यसनातून बाहेर पडला आहात हे वाचून खूप बरे वाटले ..असेच चांगले रहा पुढेही ..जर तुम्हाला नकार देवून मी एखादा पूर्ण निर्व्यसनी व्यक्ती निवडली तर ती पुढे आयुष्यात व्यसनी होणारच नाही याची काय खात्री द्यावी ? त्या पेक्षा सगळे अनुभव घेवून तुम्ही त्यातून बाहेर पडलात ही समाधानाची बाब आहे ..माझी होकार पक्का आहे ....! मी फक्त हो ..हो ..हो ..असेच बोललो ..आणि फोन कट झाला !

( बाकी पुढील भागात )
========================================================================
शुभमंगल ...सावधान !  ( पर्व दुस्र्रे -भाग ८५ वा )

माझे लग्न ठरले म्हणून आई खूप आनंदात होती .. आता हा खऱ्या अर्थाने मार्गी लागणार याची तिला खात्री वाटली ...वहिनींना देखील आई सारखाच आनंद झालेला ..माझा मोठा भाऊ जरा माझ्या बाबतीत सावधच होता ..त्याला आनंद झाला असला तरी पुढे हा सगळे निभावून नेईल की नाही याची शंका होती ..लग्नात जास्त खर्च करण्याऐवजी नोंदणी विवाह करावा असे आमचे म्हणणे होते ..मात्र मुलीच्या कडून योग्य पद्धतीनेच लग्न झाले पाहिजे असा आग्रह होता ..मुलीकडचे लोक खूप धार्मिक होते ..एकदाचे कसेतरी लग्न जमतेय म्हंटल्यावर आम्हाला नोंदणी विवाहाचा जास्त आग्रह करता आला नाही ...लग्न झाल्यावर मला मुक्तांगण मध्ये निवासी कर्मचारी म्हणून राहता येणार नव्हते म्हणून पुण्यातच भाड्याने जागा घेवून तेथे मी संसार थाटणार होतो ..त्यासाठी मुक्तांगण च्या जवळपास जागेचा शोध घेणे सुरु झाले ..या साठी एजंट या प्राण्याची मदत घ्यावी लागली ...पूर्वी केवळ ओळख असलेल्या किवा परिचितांच्या परिचितांकडून अशी कामे होत असत .. कमिशन वगैरे प्रकार नव्हता ..एकमेका सहाय्य करू या उक्तीप्रमाणे लोक एकमेकांना मदत करत असत ..आता इथेही व्यवहार आला ..माझ्या मते आज असणारी महागाई ..जागेची समस्या ..व इतर अनेक समस्या हा एजंट आणि कमिशन नावाचा प्रकार बंद झाला तर नक्कीच कमी होऊ शकतील . ...शेवटी मला परवडेल अशी जागा येरवडा जेल जवळ असलेल्या नागपूर चाळीत जागा मिळाली ..रु .१० ००० अनामत रक्कम दोन महिन्याचे आगावू भाडे ..महिना एक हजार रुपये घरभाडे या प्रमाणे जागा मिळाली ..माझा मुक्तांगणचा पगार रुपये अठराशे आणि सामाजिक कृताज्ञता निधीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचेकडून मिळणारे रुपये बाराशे असे एकूण तीन हजार रुपये मला महिन्याकाठी मिळत असत ..आईने घरभाडे तिच्या कडून देण्याचे ठरवले ..त्यामुळे सर्वकाही जेमतेम होणार होते ...

एजंटला कमिशन म्हणून एका महिन्याचे भाडे दिले ...नांदेडहून येताना लग्नासाठी कापड खरेदी वगैरे केली होती..माझा मुक्तांगण मधील मित्र द्विजेन सोबत जावून कपडे शिवायला टाकले . दरम्यान सामाजिक कृदाज्ञता निधीप्राप्त कार्यकर्त्यांचे एक शिबीर झाले ..त्यात मी डॉ . दाभोळकर यांना माझ्या लग्नाची बातमी दिली ..त्यानाही खूप आनंद झाला ..म्हणाले ' तुझे उत्तम उदाहरण आहे की माणूस कितीही बिघडला असला तरीही तो सुधारला की लोक नक्कीच त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहतात ' ..लग्न नांदेड येथेच होणार असल्याने मुक्तांगणहून जास्त मित्र येवू शकणार नव्हते ..मुक्तांगणहून लग्नाला परेश कामदार आला होता ..विश्वदीप नाशिकलाच रहात असल्याने आमच्या सोबतच तो लग्नाला आला होता ..सर्व विधिवत होऊन ..५ सप्टेंबरला मी बोहल्यावर उभा राहिलो ..लग्नात मुलाचा बूट लपवणे ..मग त्याबद्दल मुलीच्या बहिणींनी नव-या मुलाकडून पार्टी मागणे वगैरे प्रकार मला पसंत नव्हते ..वाटे हे खूळ ' हम आपके है कौन ' या हिंदी सिनेमा पासून जास्त बोकाळले आहे ..म्हणून मी बूट घालणारच नव्हतो किवा ते पेटीत कुलूप लावून ठेवणार होतो ..मात्र मोठ्या भावाने मला मनाई केली ..म्हणाला ' अरे ..हौस असते मुलींची ..लपवू दे त्यांना बूट ..हवे तर त्यांनी मागितलेले पैसे मी देईन त्यांना ' ..भावाच्या अशा बोलण्यावरून मला समजले की त्यालाही माझ्या लग्नाचा खूप आनंद झालेला आहे ..फक्त तो व्यक्त करण्याची त्याची पद्धत वेगळी आहे ..तसेच मोठा भावू या नात्याने त्याची जवाबदारी जास्त आहे म्हणून तो अधिक सावध आहे .. मुलीचे नाव मी लग्नानंतर ' मानसी ' असे ठेवले ..त्या वर्षी त्याच दिवशी गणेश विसर्जन आणि शिक्षक दिन होता असे आठवते.

..पाठवणीच्या वेळी रडारड सुरु झाली ..मी खूप संवेदनशील असल्याने मुलीच्या आईचे ..चुलत बहिणीचे ..भावाचे रडणे पाहून माझ्याही डोळ्यात पाणी तरळले ..वाटले खरोखर आपण जरी याला रडारड म्हणत असलो तरी ..प्रत्यक्ष ज्या मुलीला आणि तिच्या नातलगांना या प्रसंगाला सामोरे जावे लागत असेल त्यांचे असे रडणे स्वाभाविक आहे . आईवडील ..नातलग ..ज्यांच्या अनेक वर्षे सहवास होता ..अशी सर्व जिवाभावाची माणसे सोडून मुलीला एका नव्या घरी राहायला जावे लागते ..तेथील माणसांचे स्वभाव ..आवडी निवडी ..रूढी ..परंपरा यांच्याशी सतत जुळवून घ्यावे लागते ..पत्नी म्हणून ..सून म्हणून आपले समर्पण सिद्ध करावे लागते ..सर्वाना आपलेसे करावे लागते ..तसेच ज्या पालकांनी मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले ..त्यांना देखील तिला असे परक्या घरी ..पाठवताना त्रास होणारच ! लग्नानंतर आम्ही फिरायला म्हणून नाशिक जवळच असलेल्या ' वणी ' गावी ' सप्तशृंगी ' देवीच्या दर्शनाला गेलो ..तेथेच दोन दिवस राहिलो ...मानसी तशी अबोल स्वभावाची मात्र खूप समजूतदार आहे हे मला जाणवले .. आता कोणतेही बंधन नसल्याने मी भरपूर बडबड केली ..आपली बडबड आपल्याला नावे न ठेवता ..आपले परीक्षण न करता कोणी ऐकत आहे हे खूप छान असते ..त्याच भरात मी मानसीला अनघाबद्दल देखील सर्व कहाणी सांगितली ..मानसीला ते ऐकून वाईट वाटले ..म्हणाली ' कसे हो तुम्ही ..इतकी चांगली मुलगी होती अनघा ..का वारंवार व्यसने केलीत ' माझ्यापाशी याचे उत्तर नव्हते . 

( बाकी पुढील भागात )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें