'जिज्ञासा' - कुमारवयीन जीवन शिक्षण प्रकल्प ! ( पर्व दुसरे -भाग ७६)
पहिला नकार ! ( पर्व दुसरे -भाग ८० वा )
आफ्टर केअर मधील हे प्रकरण वार्ड मध्ये देखील समजले ..तेथेही चर्चा सुरु झाली ..प्रत्येक जण अगदी गुप्तहेर असल्यासारखा अंदाज बांधत होता ..प्रत्येकाला कोणाचा ना कोणाचा तरी संशय वाटे ..बाहेरून कामाला येणारे कार्यकर्ते ..निवासी कार्यकर्ते ..आफ्टर केअर मधील उपचारी मित्र ..सगळेच संशयाच्या भोवऱ्यात.. बाबांनी प्रकरण उगाच वाढून अजून काही भानगडी होऊ नयेत म्हणून ज्यांचे शर्ट फाटले होते त्यांना नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शवली ..त्यांच्या मते कोणावर उगाच संशय घेवून बदनाम करणे योग्य नव्हते .. तसेच मुक्तांगण मधील बिघडलेले वातावरण लवकर पूर्वपदावर यावे हा देखील बाबांचा हेतू होता ..त्याच काळात डॉ .आनंद नाडकर्णी तेथे आलेले होते ..त्यांनी आफ्टर केअर मधील सर्व लोकांना ..प्रत्येकाला जे नाव संशयित वाटते ते एका चिठ्ठी वर लिहून देण्यास सांगितले ..सर्व चिट्ठया गोळा करून मग जी पाच सहा नावे समोर आली ..त्यांना नाडकर्णी सरांनी एकेकाला व्यक्तिगत भेटून ..त्याच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला .. मलाही नाडकर्णी सरांनी चौकशीस बोलावले होते .. मी त्यांना माझी ज्या व्यक्तीवर खुन्नस आहे त्याच्याशी सरळसरळ मारामारी करीन ..भांडण करीन ..मात्र असला प्रकार करणार नाही हे सांगितले ..नंतर कोण जाणे काय झाले ..बाबांनी आणि नाडकर्णी सरांनी आता या विषयावर पडदा असे जाहीर केले ..तो विषय मागे पडला ..पुढेही नंतर एक दोन वेळा असे प्रकार घडले ..त्यावेळी मला नक्की अंदाज बांधता आला नाही कोण व्यक्ती असेल तो ..मात्र आता खूप वर्षांनी अनेक प्रकारचे हिशोब मनात केल्यावर एक नाव माझ्या डोळ्यासमोर आहे ..ज्याने हा प्रकार केला असावा ..कारण ती व्यक्ती हे प्रकार जेव्हा जेव्हा मुक्तांगण मध्ये घडले त्यावेळी तिथे उपस्थित होती ..आता इथेही ते नाव मी सांगत नाहीय ..मात्र एक नक्की ..त्या व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ मिळालेले आहे ..त्याचा व्यसनाधीनता हा आजार ..वाढते वय ..त्या अनुषंगाने होणारे इतर आजार ..या सर्व बाबींपुढे तो चारीमुंड्या पराभूत झालेला आहे ...या आणि अशा अनेक गोष्टींवरून प्रत्येकाला त्याच्या कर्माचे योग्य फळ मिळते या वर माझा आता ठाम विश्वास बसला आहे .
त्याच काळात नाडकर्णी सरांनी आम्हा कार्यकर्त्यांच्या मिटिंग मध्ये आपल्याला मुक्तांगण च्या सहभागाने ' जिज्ञासा ' नावाचा कुमारवयीन जीवन शिक्षण प्रकल्प ..पुण्यातील जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये राबवायचा आहे हे सांगितले .. ' जिज्ञासा ' हे नक्की प्रकरण आहे हे कोणालाच माहित नव्हते ..मग नाडकर्णी सरांनी माहिती दिली की नाडकर्णी सरांच्या इन्स्टिट्यूट फॉर सायकाँलाँजीकल हेल्थ , टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडिज ..व मुंबईच्या आणखी दोन सामाजिक संस्थातर्फे ..कुमारवयीन मुला मुलांसाठी मुंबईत काही सरकारी शाळांमध्ये ..हा प्रकल्प राबवला होता .. त्याचे प्रमुख उद्दिष्ट हे कुमारवयीन मुलामुलींना योग्य जीवन शिक्षण देणे हा होता ..तोच प्रकल्प आता पुण्यात राबवला जाणार होता ...कुमारवय हे अत्यंत संवेदशील असते .. याच काळात व्यक्तीच्या जीवनाचा पाया रचला जातो .. जर या वयात त्यांना जीवनविषयक ..आसपासच्या वातावरण विषयक ...आरोग्यविषयक ...सामाजिक समस्यांबाबत ..योग्य असा दृष्टीकोन दिला गेला तर नक्कीच देशाची पुढील पिढी अधिक जवाबदार बनू शकते ..तसेच अनेक मुले पुढे बिघडण्याचे प्रमाण देखील कमी होईल ...हल्लीच्या स्पर्धेच्या युगामुळे ..विभक्त कुटुंब पद्धतीमुळे .. इतर अनेक कारणांनी पालक मुलांना जास्त वेळ देवू शकत नाहीत किवा मनात असूनही मुलांवर योग्य असे संस्कार करण्यात कमी पडतात ..सकस आणि विवेकपूर्ण मानसिकता मुलांमध्ये वाढीस लागावी म्हणून हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरेल असा नाडकर्णी सरांना विश्वास वाटत होता ..
' जिज्ञासा ' या प्रकल्पामध्ये शाळेत शिकणाऱ्या कुमारवयीन मुलांना एकूण सहा विषयांचे प्रशिक्षण किवा माहिती दिली जाणार होती विषय पुढील प्रमाणे .
१) कुमारवय -या विषयांतर्गत मुलांना कुमारवय म्हणजे नक्की काय ? या वयात होणारे मानसिक बदल ..विविध आकर्षणे ..त्यातील धोके ..पालकांचे जीवनातील महत्व ..आनंदी कौटुंबिक वातावरण ..वगैरे प्रकारच्या गोष्टी होत्या .
२) मूल्यशिक्षण - यात आदर्श जीवन व्यतीत करण्यासाठी आवश्यक असणारी जीवनमूल्ये ..समानता ..न्याय ..सहिष्णुता ..सर्वधर्मसमभाव..कायद्याचे पालन ..घटनेचा आदर .देशप्रेम ..अशी माहिती देण्यात येणार होती ..तसेच ही जीवनमूल्ये व्यक्तिगत जिवनात राबवण्यासाठी मुलांना प्रेरित केले जाणार होते .
( बाकी पुढील भागात )
=================================================
' लैंगिक शिक्षण ' ( पर्व दुसरे -भाग ७७ वा )
३) ताण तणावांशी सामना - ( स्ट्रेस मँनेजमेंट ) या विषयात ..मानवी विचार ..भावना ..त्याचे वर्तन , मानवी जिवनात उद्भवणारे निरनिराळे ताण तणाव .. त्यामुळे येणारी भावनिक अवस्थता .. त्याचे दुष्परिणाम ..अशा वेळी नेमकी समस्या ओळखून त्यावर कशी मात करता येईल . वगैरे गोष्टी होत्या .
४) व्यवसाय मार्गदर्शन - यात दहावी बारावी नंतर करता येणारे विविध कोर्सेस .. अभ्यासात कच्च्या असणार्या मुलांसाठी शिक्षणाचे इतर पर्याय ...निरनिराळ्या व्यवसायांसाठी मिळणारी शासकीय मदत .. रोजगाराच्या संधी ..या बद्दल सविस्तर माहिती असे .
५) लैंगिक शिक्षण - स्त्री -पुरुषांची शरीर वैशिष्ट्ये ..स्त्री चा आदर ..तारुण्यात प्रवेश करताना होणारे मानसिक व शारीरिक बदल .. प्रेम आणि शारीरिक आकर्षण यातील फरक ..गर्भधारणा ..शारीरिक संबंध ठेवण्या मागील जवाबदारी ..विविध लैंगिक आजार ..एड्स ..या सर्व बाबतीत माहिती दिली जाई ..
६) व्यसनाधीनता - विविध प्रकारच्या घातक व्यसनांचे दुष्परिणाम ...व्यसन व छंद किवा सवय यातील नेमका फरक .. व्यसनाधीनते वरील उपचार .. व्यसनमुक्तीसाठी शास्त्रीय प्रयत्न .. वगैरे सांगितले गेले .
' जिज्ञासा ' हा प्रकल्प मुंबईत यशस्वी पणे राबवला गेला होता ..त्या नंतर किमान सर्व मोठ्या शहरात तरी हा प्रकल्प राबवून जास्तीत जास्त मुलामुलींपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जाणार होता ...या प्रकल्पात संवादक म्हणून काम करण्यासाठी सामाजिक कार्याची आवड ..तळमळ ..असलेल्या कार्यकर्त्यांची आवश्यकता लागणार होती ..म्हणून नाडकर्णी सरांनी.. स्त्री मुक्ती संघटना ..व प्रकल्पात सहभागी संस्थांनी पुण्यात प्रकल्पाची योग्य अशी जाहिरात करून ..प्रकल्पात काम करू इच्छिणाऱ्या स्त्री -पुरुषांसाठी एक तीन दिवसांचे प्रशिक्षण शिबीर मुक्तांगण मध्ये आयोजित केले .. मुक्तांगण मधील उत्साही ..बोलके ..कार्यकर्ते म्हणून प्रकल्पात काम करण्यासाठी मी ..बंधू ..परेश आणि इतर आणखी दोघांची निवड केली गेली .
हे प्रशिक्षण शिबीर खूपच छान झाले .. पुणे शहरातून ..महाविद्यालयीन विद्यार्थी -विद्यार्थिनी ..गृहिणी ..सामाजिक कार्यात सहभागी होऊ इच्छिणारे कायर्कर्ते ..असे सुमारे १०० जण उपस्थित होते ..आम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी डॉ .आनंद नाडकर्णी व मुंबईत हे काम केलेले तज्ञ .. स्त्री मुक्ती संघटनेच्या पदाधिकारी ..प्रत्येक विषयातील अभ्यासू व तज्ञ मंडळी उपस्थित होती ...सकाळी ९ ते सायंकाळी पाच अशी प्रशिक्षण शिबिराची वेळ ठरली होती .. पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात ..एकमेकांशी ओळख ..विषया बद्दल थोडक्यात माहिती ..आमचे दृष्टीकोन ..वगैरे चर्चा होऊन वातावरण अत्यंत खेळीमेळीचे झाले ..नंतरच्या सत्रा पासून प्रत्येक विषयाची सविस्तर माहिती देण्यास सुरवात झाली .. सर्वात जास्त गम्मत आली ती लैंगिक शिक्षण या विषयाची माहिती घेताना आणि त्यावर चर्चा करताना .. या विषयाच्या सुरवातीला सगळेच एकदम गंभीर चेहरे करून बसले होते ..अजूनही आपल्या समाजात लैगिकता या विषयावर उघड चर्चा करणे व बोलणे टाळले जाते हे सर्वांनी अनुभवले .. नाडकर्णी सरांनी अतिशय कौशल्याने आम्हाला बोलते केले .. अत्यंत नाजूक व संवेदनशील विषय असल्याने ..नीट ..सखोल समजून घेणे आवश्यक होते ..शाळेत मुलामुलींसमोर हा विषय मांडताना नेमकी शास्त्रीय माहिती कशी देता येईल ..मुलांच्या मनातील शंकांचे समाधान ..आणि त्यासाठी सर्व प्रथम विषयाबाबत चर्चा करण्यास संवादाकाच्या मनातील संकोच ..या बाबींवर नाडकर्णी सरांनी उत्तम माहिती दिली ..प्रशिक्षणार्थींचा संकोच दूर करण्यासाठी सरांनी आम्हाला स्त्री व पुरुष इंद्रियांना ..शरीर संबंधाला ..नेहमीच्या बोलीभाषेत कोणते कोणते शब्द वापरेले जातात हे विचारले ..सर्वांनी अगदी छापील स्वरूपातील उत्तरे दिली ..म्हणजे ..लिंग ..योनी ..संभोग ..ही उत्तरे जरी बरोबर असली तरी प्रत्यक्ष बोलीभाषेत नेमके काय म्हणतात ते कोणीही उघड सांगण्यास तयार होईनात .. आपण संवादक म्हणून महापालिका व जिल्हा परिषदेच्या शाळात जाणार आहोत ..तेथे शिकणारे विद्यार्थी बहुधा गरीब ..निन्म मध्यमवर्गीय ..झोपडपट्टीतून राहणारे येतील ..त्यांच्या बोलीभाषेत या सर्व गोष्टीना वेगवेगळे शब्द आहेत ..ते नेमके शब्द आपण माहिती करून घेतले पाहिजेत ..तरच मोकळेपणी संवाद साधता येईल ..असे सांगून सरांनी एक आभ्यास म्हणून आम्हाला सर्वाना एका कागदावर या सर्व बाबतीत माहित असलेले पर्यायी शब्द लिहिण्यास सांगितले ..सर्व कागद गोळा केले गेले ..मग सरांनी फळ्यावर एकेक शब्द लिहिण्यास सुरवात केली तेव्हा गम्मत झाली ..अगदी झोपडपट्टीत वापरले जाणारे शब्द देखील त्यात लिहिले होते सर्वांनी ..म्हणजे आता संकोच दूर होत होता ..
( बाकी पुढील भागात )
=====================================================
मोकळ्या आकाशी ! ( पर्व दुसरे -भाग ७८ वा )
जिज्ञासाचे प्रशिक्षण झाल्यावर लगेच प्रत्यक्ष शाळांमध्ये जावून विद्यार्थ्यांना या जीवन शिक्षणाचे धडे देण्यास सुरवात झाली ..प्रशिक्षण शिबिराला जरी १०० जण उपस्थित असले तरी प्रत्यक्षात काम करताना मात्र त्यातील अनेक जण गळाले ..शेवटी सुमारे ५० जण हे काम नेटाने करण्यास तयार राहिले ..मग या पन्नास जणांचे विभागवार तीन समूह बनवले गेले ..प्रत्येक समूहाचा एक कोऑर्डीनेटर नेमला गेला ..त्या नुसार उत्साही असल्याने आमच्या विभागाचा कोओर्डीनेटर म्हणून माझी नेमणूक झाली .. आमच्या समूहात महाविद्यालयात शिकणाऱ्या आठ विद्यार्थिनी ...चार विद्यार्थी ...तीन गृहिणी होत्या .. त्या वर्षीसाठी येरवडा व जवळपास असलेल्या १० शाळा निवडल्या गेल्या ज्यातून आम्हाला संवादाकाचे काम करायचे होते .. प्रत्यक्ष कामही सुरु झाले ...हे काम अतिशय कौशल्याने करावे लागत असे ...शाळेतील विद्यार्थी वर्ग तसा चंचलच असतो .. शिवाय आमचा तास सुरु असताना बहुधा कोणी शिक्षक उपस्थित नसावा अशी आमची अपेक्षा असे ..कारण शिक्षक वर्गात असला तर त्याचा एक धाक असतो ..त्यामुळे विद्यार्थी मोकळेपणी बोलणार नाहीत असे शक्यता होती .. सुमारे ६० ते सत्तर मुला मुलींसमोर त्यांना गोंधळ करू न देता ....न रागावता ...आम्ही बोलत असलेल्या विषयात रस निर्माण व्हावा या पद्धतीने ...साधारण एका विषयासाठी दीड तास खिळवून ठेवणे सोपे काम नव्हते ..
मात्र आम्हाला हळू हळू ते जमू लागले ..लैंगिक शिक्षण या विषयासाठी मात्र मुले मुली एकत्र बसवू नयेत असे ठरले होते ..कारण उगाच मुले चेकाळतात ..तर मुलीना माना खाली घालून बसावे लागते असा पूर्वीच्या संवादाकांचा अनुभव होता .. त्या नुसार लैंगिक शिक्षण या विषयावर संवाद साधताना पुरुष संवादक मुलांशी तर स्त्री संवादक मुलींशी वेगवेगळ्या ठिकाणी संवाद साधत असत ..जसे जसे आम्ही मुलांशी बोलत गेलो तसे तसे त्यांचे भावविश्व आमच्या समोर उलगडत गेले ..देशाची भावी पिढी असलेले हे विद्यार्थी खरोखर अतिशय मनस्वी असतात ..त्यांना योग्य पद्धतीने हाताळले गेले तर त्यातील प्रत्येक जण एक आदर्श नागरिक बनू शकतो ..असे वाटू लागले ..मला या कामात खूप आनंद वाटू लागला ..एका दिवशी दोन विषय आम्ही घेत असू ..म्हणजे तीन तास बोलावे लागे ..या काळातील आमचा प्रवास खर्च ..चहा पाणी वगैरे ..या खर्च साठी प्रत्येक संवादकला एका विषयाचे १५० रुपये मानधन मिळणार होते ..या प्रकल्पाचा आर्थिक भाग आयोजक संस्था तसेच टाटा इन्स्टिट्यूट तर्फे सांभाळला जाणार होता .
दरम्यान मी मुक्तांगण मधील माझे नेमून दिलेले काम करतच होतो ..शिवाय व्यायाम ..योगासने हे नियमित सुरु होते ..त्यामुळे तब्येत चांगलीच डोळ्यात भरण्यासारखी झाली होती ..दिवस कसा निघून जाई ते समजत नसे ..त्या वर्षी २६ जून या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनाची थीम ' संगीतातून व्यसनमुक्ती ' अशी होती ..बाबांनी त्यासाठी ..व्यसनांचे दुष्परिणाम ..व्यसनमुक्तीचा प्रवास ...या वर आधारित पाच सहा गाणी लिहिली होती ..पोवाडा ..फटका ..असे प्रकार असलेली ती गाणी आम्हाला २६ जून रोजी ....' टिळक स्मारक ' मध्ये सदर करायची होती ..त्या गाण्यांना संगीत देण्यासाठी बाबांचे स्नेही ...पुण्याचेच संगीतकार राहुल रानडे हे तयार झाले ...मी ..यशोदा ( बाबांची धाकटी मुलगी ) बंधू ..इतर दोन गायक असा सहा जणांचा समूह तयार झाला ..तो कार्यक्रम देखील यशस्वीपणे पार पडला .. या सर्व गाण्यांचे रेकॉर्डिंग करून त्याची एक ' मोकळ्या आकाशी ' नावाची कँसेट तयार करण्याचे ठरले ..मुक्तांगण मधून डिस्चार्ज घेतल्यानंतर उपचार घेवून बाहेर पडणा-या मित्राला ती गाणी नक्कीच सतत व्यसनमुक्ती प्रेरणा कायम ठेवण्यास मदत करतील हा या मागे हेतू होता ..त्या नुसार मग पुण्यातच एका स्टुडीओ मध्ये आमच्या गाण्याचे ध्वनिमुद्रण झाले .. यात मी एक पोवाडा आणि यशोदा बरोबर एक गीत म्हंटले .. कानाला हेडफोन वैगैरे लावून आपल्या आवाजात गाण्याचे ध्वनिमुद्रण करण्याचा हा अनुभव अविस्मरणीय होता ..पाहता पाहता माझे व्यसंनमुक्तीचे एक वर्ष पुन्हा उलटले .. दरम्यान दोन वेळा घरी नाशिकला जावून सुरक्षित परत आलो होतो ..त्यामुळे आई व भावू देखील आनंदात होते ..आता माझी वयाची पस्तिशी उलटून गेलेली ....याने लग्न करून पुढील जवाबदार्या घेतल्या पाहिजेत असे आईला वाटणे स्वाभाविक होते ..अनघा पुन्हा माझ्या आयुष्यात येणे केवळ अशक्य होते ..त्यामुळे तिला विसरून मी नव्याने उभे राहावे असे मलाही वाटू लागले ..!
( बाकी पुढील भागात )
=====================================================
मुलगी पहाणे..वगैरे ! ( पर्व दुसरे - भाग ७९ वा )
पूर्वी अनघा शिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलीचा पत्नी म्हणून मी विचार करू शकत नव्हतो ..मात्र आता अनघा पासून दूर होऊन आता बराच काळ लोटला होता ..ती पुन्हा आयुष्यात येणार नाही हे कटू मन स्वीकार करू शकत होते ....माझे बरोबरीचे मित्र केव्हाच संसाराला लागलेले ..त्यांच्या जिवनात विशिष्ट स्थिरता आलेली ..अशा वेळी आपणही लग्न करावे असे माझ्याही मनात येवू लागले .. पण त्या बरोबरच मनात अनेक शंका येत असत ..व्यसनाधीनते मुळे मी एकही नोकरी फार काळ टिकवून ठेवू शकलो नव्हतो ... बँकेत जेमतेम पैसे साठवलेले ..शिवाय मुक्तांगण मधील समाजसेवकाच्या नोकरीत मिळणारे तुटपुंजे मानधन ..माझा व्यसनांचा पूर्व इतिहास ..वगैरे गोष्टी माझी बाजू कमकुवत करणाऱ्या होत्या ..बाकी रंग रुपात विशेष समस्या नव्हती..पण डोक्यावरच्या केसांनी फारकत घ्यायला सुरवात केलेली ...आईच्या लग्नाच्या प्रस्तावाला मी दुजोरा दिला... भाऊ मात्र याच्या विरुद्ध होता ..त्याला जरी माझेही लग्न व्हावे असे वाटत असले ..तरी तो व्यवहारी असल्याने ..लग्नानंतर जर याचे व्यसन पुन्हा सुरु झाले तर ..मोठी समस्या उद्भवणार होती हे जाणून होता ..उगाच एका मुलीचे आयुष्य उध्वस्त होईल याची त्याला जाणीव होती ..म्हणून तो या बाबतीत फारसा पुढाकार घेण्यास तयार नव्हता ..माझ्या वाहिनीला मात्र आई सारखाच उत्साह होता ...व्यसनाधिन झाल्यावर माझा त्रास मुख्यतः पैश्यांचा होत असे सर्वाना ..वागण्याच्या बाबतीत फारसा उपद्रवी नव्हतो मी घरी .. व्यसन बंद असताना तर माझे वागणे अधिकच चांगले वाटे सर्वाना ..तेव्हा याचेही दोनाचे चार हात व्हावे अशी वहिनींची इच्छा असणे स्वाभाविक होते ...माझे वय ..आर्थिक परिस्थिती ..इतर जमेच्या बाजू लक्षात घेवून तसे स्थळ पाहावे लागणार होते ..आमची सर्वांची मुख्य अट अशी होती की ...मुलाला आणि तिच्या घरातील मंडळीना विश्वासात घेवून ..माझा पूर्व इतिहास सांगण्याची ..कारण माझ्या व्यसनाधीनतेबद्दल मुलीच्याकडे न सांगता लग्न लावून देणे म्हणजे विश्वासघात ठरला असता ..तसे करावे असे आम्हाला कोणालाही वाटत नव्हते .. एकंदरीत विचार करता मला लग्न होणे कठीणच वाटू लागले ..मुलाचा पूर्व इतिहास माहित असताना ..चांगल्या पगाराची नोकरी नाही ..स्वतचे घर नाही .. पुढे पेन्शन ..फंड वगैरे प्रकार नाही ..अश्या परिस्थितीत एखादी मुलगी मिळणे दुरापास्तच होते ..तरीही प्रयत्न म्हणून आईने ..जवळचे नातलग ..स्नेही ..यांना ' मला यंदा कर्तव्य आहे ' अशी जाहिरात करून ठेवली ... विवाह जुळवून देणाऱ्या संस्थांकडे देखील नोंदणी करून झाली ..त्यात माझी आर्थिक स्थितीचा स्पष्ट उल्लेख होता .
मुक्ता मँडमना या बदल सांगितल्यावर त्यांनीही ..मुलीच्या घरच्यांना तुझ्या पूर्व इतिहासाची कल्पना देवूनच लग्न कर अशी अट घालून ..लग्नाच्या बेतला संमती दर्शवली ...मुलगी जर नोकरी करणारी असेल तर अधिक बरे असेही सुचवले ..म्हणजे आर्थिक भाग नीट सांभाळला गेला असता .. आश्चर्य म्हणजे एका महिन्यातच आईचा फोन आला की एक दोन स्थळे सांगून आली आहेत ..तेव्हा तू दोन तीन दिवस सुटी घेवून नाशिकला ये ..मुली पहा ..पसंती कळव ..बाकी सर्व आम्ही ठरवू .. त्या वेळी मोबाईल फोन नव्हताच माझ्याकडे ..त्यामुळे मुक्तांगणच्या फोन वर आईचा फोन येत असे ..त्यामुळे लगेच सर्व आफ्टर केअर मध्ये बातमी पसरली ...माझी मस्करी करणे सुरु केले मित्रांनी ..मुलगी पाहायला आम्हालाही ने म्हणून काही जण चिडवू लागले ..तर काही जण तुला एखादी व्यंग असणारी मुलगीच मिळणार अशी भविष्यवाणी करू लागले .. काही जणांनी मुलीला आधी तुझ्या व्यसनाबद्दल कल्पना देवू नकोस ..असा शहाणपणाचा सल्लाही दिला ..
तीन दिवस सुटी घेवून मी नाशिकला गेलो ..तर तीन स्थळे सांगून आलेली ..आईने तीनही मुलीना पहायची वेळ ठरवून टाकली होती ..तिन्ही मुली नाशिक मधीलच होत्या .. मुलगी पहाणे हा प्रकार जरी कुतूहल पूर्ण असला ..त्याला विशेष महत्व असले तरी ..माझ्या मनाला ते जरा विचित्रच वाटत होते .. सर्व वडिलधा-या मंडळींसमोर मुलीने यायचे ..मर्यादा सांभाळून वागायचे ..पोहे आणायचे ..नम्रपणे समोर बसायचे ..त्यावेळी सर्व तिचे नीट निरीक्षण करणार ..तिला प्रश्न विचारणार .. मुलीचे कुटुंबीय मुलीचे कौतुक करणार .. इतके करूनही शेवटी ..नंतर कळवतो ..असे म्हणून ..मुलाकडील मंडळी निघून जाणार ..तो पर्यंत मुलीचा जीव टांगणीला ...नकार आला तर ..पुन्हा नवीन मुलगा ..तेच नाटक ..नकार म्हणजे त्या मुलीच्या मनावर आघात ..आपल्यात काहीतरी कमी आहे ही जाणीव .. आपल्या लग्नासाठी आईबाबांना त्रास होतोय ही खंत .. मला तर मुलीनेच नकार देण्याची भीती वाटत होती ....कारण उज्वल असे स्थळ नव्हतेच माझे .. मला नकार मिळाला तर मला कसे वाटेल ही कल्पना करूनच ..मला खूप वाईट वाटे ..असा नकार पचवणे मला जमेल का ? असेही विचार मनात येत .. नकार म्हणजे एका व्यक्तिमत्वाचा चक्क अपमान असतो असे वाटू लागले .. पहिली मुलगी पाहायला गेलो तेव्हा मी जरा नर्व्हसच होतो .
( बाकी पुढील भागात )
======================================================
पहिला नकार ! ( पर्व दुसरे -भाग ८० वा )
आई , वहिनी , भावाची लहान मुलगी रसिका , हे सगळे मुलगी पाहायला जाताना अतिशय उत्साहात होते .. नाशिकला सुंदर नारायण मंदिरा जवळ मुलगी रहात होती ..पदवीधर ..वय ३२ वर्षे ..खाजगी नोकरी ..अशी इतर माहिती ...सुंदर नारायण मंदिराच्या मागे माझा एक गर्दुल्ला मित्र रहात होता ..पूर्वी त्याने गर्द्विक्रीचा व्यवसाय देखील केलेला...त्यामुळे माझे तेथे बऱ्याचदा जाणे झाले होते ..तेथे जाताना मला उगाच कोणी गर्दुल्ला मित्र तर भेटणार नाही ना याची भीती वाटत होती ..शिवाय माझे तेथे जाणे कधी त्या मुलीने पहिले तर नसेल अशीही शंका मनात डोकावून गेली ...एकदाचे मुलीच्या घरी पोचलो ..साधे चाळवजा घर ..आसपास राहणाऱ्या महिलांना बहुतेक अशा बातम्या लगेच कळतात ..त्यामुळे आम्ही मुलीच्या घरात शिरताना ..आसपासच्या बायकांचे आमच्याकडे कुतूहलाने आणि निरीक्षणाच्या नजरेने पहाणे आधीच झाले होते ...घरात छान स्वागत झाले आमचे ..मुलीची आई आणि मोठा भाऊ अगत्याने मुलीची ...कुटुंबाची माहिती सांगत होते .. मी काय करतो ते मुलीच्या भावाने विचारले ..मी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात कार्यकर्ता म्हणून काम करतो असे सांगितल्यावर तो जरा विचारात पडलेला दिसला ..मग मी त्याला उत्साहाने मुक्तांगण बद्दल थोडीफार माहिती सांगितली ..माझे बोलणे झाल्यावर तो म्हणाला . ' ऐकून आहे मी मुक्तांगण बद्दल ..आमच्या गल्लीतील एकदोन लोक तेथे जाऊन आलेले आहेत ...अहो पण त्यांचे व्यसन परत सुरु झालेय ' ..व्यसनाधीनता हा अतिशय गंभीर आजार आहे ..काही लोकांना एकदा उपचार देवून भागात नाही ..वारंवार उपचार द्यावे लागतात वगैरे माहिती मी पुरवली .
तितक्यात परंपरेनुसार ट्रे मध्ये पोह्यांच्या प्लेट्स घेवून मुलगी आली ...डोळ्यावर चष्मा होता ..उजळ ..मध्यम उंची .. नाकीडोळी ठीक ...मी एका नजरेत झाडी करून घेतली ..तिच्या हातून भावाने ट्रे घेवून आम्हाला पोहे दिले ..मुलगी संकोचाने बाजूला उभी राहिली ...आई व वहिनीने तिला शिक्षण ..आवड ..असे निरुपद्रवी प्रश्न विचारले ..मला म्हणाले तुला काही विचारायचे आहे का ? ..मी नकारार्थी मान हलवली ..मी काही विचारात नाहीय असे पाहून मुलीचा भाऊ जरा रीलॅक्स झाल्यासारखा वाटला ..अश्या वेळी नेमके काय विचारावे हे मला सुचतच नव्हते ..कारण बहुतेक माहिती आधीच मिळाली होती ..बाकीचे लोक मग इकडतिकडच्या गप्पा मारत बसले ..जरा वेळाने निघायची वेळ झाली तसे ..आईने मुलीच्या भावाला बाजूला घेवून माझ्या व्यसनाधिनतेच्या इतिहासाबद्दल थोडीफार कल्पना दिली .. तो नुसताच मान हलवताना दिसला .. नंतर कळवा असे म्हणून ..आम्ही बाहेर पडलो ...आम्ही मुलीला नाकारण्याचे काही कारणच नव्हते ..उलट माझीच बाजू कमी होती ..त्या दिवशी रात्री मी खूप अवस्थ होतो ..मुलाच्या घरून नेमके काय उत्तर येईल याबद्दल चिंता वाटत होती ..माझा काळाकुट्ट इतिहास सारखा डोळ्यासमोर नाचत होता .. आपण भूतकाळात किती मूर्खपणे वागलोय हे सारखे आठवून स्वत:चा रागही येत होता ..मात्र आता काहीही हाती राहिले नव्हते ..भूतकाळ पाटीवर लिहिलेल्या मजकुरासारखा पुसून टाकता आला असता तर किती बरे झाले असते असे वाटले ...याच वेळी अशा लग्नाळू मुलीला जेव्हा लोक पाहायला येतात ..तेव्हा पुढचा निरोप येईपर्यंत तिची काय अवस्था होत असेल ते देखील मी अनुभवत होतो ..तिला तर बिचारीला माझ्या सारखा इतिहास नसून देखील ..आर्थिक बाबी ..मुलाच्या व त्याच्या नातलगांच्या विशिष्ट विचारसरणी मुळे किवा ..त्यांच्या प्रत्येकाच्या आवडी निवडीतील वेगळेपणामुळे नकार मिळण्याची शक्यता असते ...माझ्या बाबतीत नकार मिळाला तर दोष माझ्या भूतकाळाचा असणार होता ...बाकी नाव ठेवण्यासारखे विशेष नव्हतेच .
दुसऱ्या दिवशी दुपारी मुलीच्या भावाने आम्हाल फोन करून नकार कळवला .. मुलाचा इतिहास आम्हाला मंजूर नाही याचा त्याने अस्पष्टपणे उल्लेख केला बोलण्यात ... मी जरा निराशच झालो होतो .. वाटले आपले लग्न होणे कठीणच नाही तर केवळ अशक्य आहे ...आई आणि वहिनी मला धीर देत होत्या .. त्यांना भीती होती की याने फार मनाला लावून घेतले तर पुन्हा याचे व्यसन सुरु व्हायला नको ..त्याच दिवशी पुन्हा एक मुलगी दाखवायला आमच्याकडे मुलीच्या घरचे येणार होते ..त्या तयारीला सगळे लागले !
( बाकी पुढील भागात )
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें