गुरुवार, 21 नवंबर 2013

नवा संसार....!!!

नस्ती आफत !  ( पर्व दुसरे -भाग ८६ वा )

लग्नानंतर चार दिवस नाशिकला राहून मी परत मुक्तांगणला आलो ..मानसी नाशिकला चार दिवस राहून नंतर माहेरी जाणार होती ..त्या वर्षी दिवाळी ऑक्टोबर महिन्यातच शेवटच्या पंधरवड्यात होती ..त्यामुळे ती काही दिवस नांदेडलाच राहील ..दिवाळसणाला जेव्हा मी नांदेडला जाईन तेव्हा मग तिला घेवून मी पुण्यात येणार असे ठरले होते ....दिवाळसण देखील मस्त पार पडला ..आम्ही जोडीने आमचे कुलदैवताचे आंबेजोगाई येथे जावून दर्शन घेतले ..जावई म्हणून माझी चांगली बडदास्त ठेवत होते मानसीच्या माहेरचे लोक ..मी देखील जवाबदार व्यक्ती असल्यासारखा वावरत होतो ..तुम्ही आमच्या मुलीचा स्वभाव बदलावलात असे लोक मला म्हणत ..म्हणजे काय तर पहिली विद्या खूप अबोल होती .. लवकर चिडायची ..मात्र आता मानसी झाल्यापासून ती जरा बोलायला लागलीय ..इतकेच नव्हे तर सारखी हसतमुख राहतेय वगैरे ..हे ऐकून मला छान वाटे ...मलाही ते जाणवले होते सुरवातीला अबोल असणारी मानसी आता बरीच बोलायला लागली होती ..कदाचित लग्न होण्यापूर्वी ..वय वाढतेय म्हणून ...लग्न होणार की नाही या चिंतेने ..आसपासच्या लोकांच्या कुत्सित नजरांनी ..नातलगांच्या चौकाशांमुळे वगैरे ती हैराण असावी ..शिवाय घरात आईवडिलांचे सारखे लग्नाबद्दल बोलणे ..काळजी व्यक्त करणे ..वगैरे कटकटींमुळे तिच्या मनात पूर्वी न्यूनगंडाची भावना तयार झाली असावी ... मुलीचे लग्न हा विषय कुटुंबियांच्या फार जिव्हाळ्याचा असतो ..शिवाय पुरुषप्रधान संस्कृतीत मुलगी म्हणजे आईवडिलांच्या डोक्याला ताप ..काळजी ..वगैरे अनेक गैरसमज मुलीच्या विरोधात असतात ..मुलीची निरोगी मानसिक वाढ होण्याच्या आड येतात ...लहानपणापासूनच मुलीच्या रंगरूपावरून घरात चर्चा होते ..या सगळ्या चर्चा शेवटी तिच्या लग्न जुळण्याशी जोडल्या जातात ..काही व्यंग असेल तर ' हिचे कसे होणार ' अशी मते व्यक्त होतात ..मुलीच्या जातीने असे करायचे नाही ..तसे वागायचे नाही ..मुलांशी बोलायचे नाही ..स्वैपाक आला पाहिजे ..घरकामे केली पाहिजेत ..सासरी आमचा उद्धार व्हायला नको ..सूचना सल्ले ...यांना सतत समोरे जावे लागते ..नंतर वयात आल्यावर झालेल्या शारीरिक आणि मानसिक बदलांमुळे ..आसपासच्या लोकांच्या बदलेल्या नजरा ..त्यामुळे बाळगावी लागणारी सावधगिरी ..प्रवासात ..गर्दीत ..घराबाहेर येणारे विचित्र विकृत अनुभव ..या सगळ्या गोष्टींचा विचार केला तेव्हा जाणवले की स्त्री चे जीवन एकंदरीत कठीणच झालेय पुरुषप्रधानते मुळे ...हे बदलण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले पाहिजेत ..पुरुषांकडून आणि मुख्यतः स्त्रियांकडूनही .



दिवाळसण आटोपून मी मानसीसह पुण्यास परतलो आणि आमचे सहजीवन नागपुर चाळीत सुरु झाले ..माझ्याकडे गँस नव्हता ..एका छोट्याश्या स्टोव्ह वर स्वैपाक होऊ लागला ..पलंगही नव्हता ..तुटपुंज्या सामानावर संसार सुरु झाला ..मी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळात मुक्तांगणला डबा घेवून कामावर जाई..मग सायंकाळी घरी आल्यावर आम्ही आसपास फिरायला जात असू ..एखाद्या कुटुंबवत्सल माणसाप्रमाणे किराणा सामान आणणे ..रॉकेलचा डबा घेवून जावून रॉकेल आणणे ..दळण आणणे ..भाजी आणणे वगैरे कामे मी सहजपणे करू लागलो होतो ...मुक्तांगणला माझ्यावर समूह उपचार घेण्याची तसेच योग्याभ्यास घेण्याची जवाबदारी होती ..शिवाय इतर कामामध्येही सहभाग होताच ...पगार जरी कमी असला तरी त्यामुळे काटकसर शिकायला मिळाली ..' जिज्ञासा ' प्रकल्पाचा संवादक म्हणून महिन्यात किमान चार पाच सेशन घेत होतो त्याचे वेगळे पैसे मिळत असत ...एकंदरीत ' दृष्ट लागण्यासारखा ' संसार सुरु झाला .



साधारण महिन्याभराने ..एकदा सकाळी मुक्तांगणला असताना ..अचानक आरडा ओरडा झाला ..मी देखील पळत मुक्तांगणच्या मुख्य दाराजवळ गेलो ..तेव्हा पहिले की सकाळी दाराजवळ सुरक्षेचे काम पाहणारे दोघे ' पळाला ..पळाला ..पकडा ..' असे ओरडत होते ..वरच्या मजल्यावरून जिन्यावरून उतरून एक उपचार घेणारा पेशंट ..रक्षकांची नजर चुकवून ..मुख्य दाराबाहेर पडला होता ..त्याने धूम ठोकली होती ..तो खूप वेगात पळत होता ..आणि माझे दोनचार मित्र नुसतेच पकडा पकडा असे ओरडत होते ...माझ्या नेहमीच्या साहसी स्वभावानुसार मला राहवले नाही ..मी त्याच्या मागे पळू लागलो ..वेग वाढवला ..खूप जोरात..मागून पळत जावून त्याला पकडले ..तो झटापट करू लागला माझ्याशी ..विरोध करू लागला ..शेवटी त्याला घट्ट पकडून मी खांद्यावर उचलले ..त्याच वेळी माझ्या पाठीत एकदम कळ आली ..एकदम खालीच बसलो ..एव्हाना माझे मित्र पळत येवून तेथवर पोचले होते ..त्यांनी मला उठवण्याचा प्रयत्न केला ..उठता येईना ..कंबरे जवळ ..पाठीच्या मणक्याच्या खालच्या भागात प्रचंड वेदना ...शेवटी मला कसेतरी आधार देवून उठवण्यात आले ..मित्रांच्या आधारानेच मुक्तांगण मध्ये आलो ..मला वार्डात थेट पलंगावर नेण्यात आले ..वेदना सुरूच होत्या ..एक पेन किलर घेवून पडून राहिलो ..थोड्या वेळाने डॉक्टर जॉन आले ..त्यांनी तपासणी केली ..म्हणाले कदाचित पाठीचा मणका सरकला असावा ..दुखावला गेला असावा ..सी ती स्कँन करावा लागेल ..तपासणी केल्याखेरीज नक्की कळणे कठीण आहे ..माझा डावा पाय देखील हळू हळू बधीर होत ..उठणे..बसणे..उभे राहणे ..चालणे .सगळेच बंद झाले ..नुसता एका कुशीवर पडून राहिलो होतो .

( बाकी पुढील भागात )

========================================================================

पायगुण ???????  ( पर्व दुसरे -भाग ८७ वा )


प्रचंड वेदनांनी तडफडत मी पलंगावर पडून होतो ..मला मानसीची काळजी वाटत होती ..तिला निरोप द्यायला घरी एका मित्राला पाठवले..ती रडतच मुक्तांगणला आली ..खूप घाबरली होती ..मी काही दिवस घरी येवू शकणार नाही हे सांगितल्यावर अधिकच घाबरली ..मला तपासण्या वगैरे करण्यासाठी मुक्तांगणला राहणे आवश्यक होते ..शिवाय इथे माझे मित्र सोबत असल्याने त्यांनी माझी काळजी चांगली घेतली असती ..घरी मानसीला हे सगळे कठीण गेले असते ..मुक्तांगण मधूनच नाशिकला भावाला फोन केला ..लवकरच मी तेथे येतो म्हणाला ..तो पर्यंत मला मदत म्हणून त्याने ताबडतोब आईला पुण्याला रवाना केले ... आई रात्रीच पोचली ..दुसऱ्या दिवशी डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आम्ही तपासण्या करायला मुक्तांगणच्याच गाडीने गेलो ..दत्ता श्रीखंडे आणि बंधू सोबत होता ..डॉक्टरांनी सी.टी.मायलो आणि सी .टी.स्कँन करायला सांगितले होते ..त्यानुसार आधी माझ्या पाठीच्या मणक्यात एक इंजेक्शन दिले गेले ..नंतर सी .टी.स्कँन च्या मशीनमध्ये मला घातले . .. पेन किलरची इंजेक्शने घेत होतो ..परंतु तरीही जरा विपरीत हालचाल झाली की प्रचंड वेदना होत असत ...सी .टी.स्कँनच्या वेळी एकदा स्कँन सुरु झाला कि अजीबत हालचाल करायची नाही असे मला बजावले होते ...त्यामुळे अजिबात हालचाल न करता पडून राहावे लागले ..सरळ उताणे झोपताच येत नव्हते ..तरीही स्कँनच्या वेळी उताणेच झोपून राहावे लागले ..ही एक शिक्षाच होती ...एकदाचा स्कँन पार पडला ...रिपोर्ट मध्ये पाठीच्या मणक्याच्या खालच्या भागात गडबड आहे हे स्पष्ट झाले ..लुंबर ४ व ५ ( L4 , L5 )या ठिकाणी दुखापत होती ..तेथील मणका सरकला आहे असे निदान झाले ..शस्त्रक्रिया केली पाहिजे असे सांगितले गेले ...सुमारे ४० हजार रुपये खर्च येणार होता ..भावाने क्षणाचाही उशीर न करता ..शस्त्रक्रिया करण्यास मान्यता दिली ..खर्च भावूच करणार होता ..पूर्वी मी  त्याला इतका त्रास दिला असतानाही तो माझ्या पाठीशी उभा होता .



डॉ.जॉन अल्मेडा याच्या सल्ल्याने कोरेगाव पार्कच्या बाजूला असलेल्या इनलँक्स बुदरानी हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया करण्याचे ठरले ..तो पर्यंत वेदनाशामके घेवून मी वेळ काढत होतो ..लगेच मला हॉस्पिटल मध्ये दाखल केले गेले ..तीन दिवसांनी शस्त्रक्रिया होईल असे ठरले ..त्या आधी इतर तपासण्या करायच्या होत्या ..भावू पैश्यांची व्यवस्था करून परत नाशिकला गेला ..शस्त्रक्रियेच्या वेळी तो परत येणार होता ...हॉस्पिटल मध्ये माझ्या जवळ दिवसा आई आणि रात्री मानसी राहत असे ..पहिल्याच दिवशी रात्री माझ्या बाजूला बसलेल्या मानसीला पुन्हा रडू येवू लागले ..तिचे असे दवाखान्यात रडणे मला बरे वाटले नाही ..तिला समजावले ..सगळे ठीक होईल म्हणून धीर दिला ..माझी शस्त्रक्रिया वगैरे सगळे नीट पार पडेल की नाही या काळजीने ती रडत होतीच पण त्याच बरोबर तिने रडण्याचे अजून एक कारण सांगितले ..तिला भीती वाटत होती की लग्नानंतर जेमतेम महिनाभरात मला असा अपघात झाला म्हणून कुणी तिला तर दोष देणार नाहीत ना ? अशी शंका आणि अपराधीपणाची भावना तिच्या मनात होती ..मुलीचा पायगुण चांगला नाही असे लोकांना वाटेल ...याची भीती होती तिला ...मी तिला समजावले ..असे पायगुण वगैरे काहीही नसते ..ही अंधश्रद्धा आहे ..सुख -दुखः , भरती-ओहोटी , दिवस -रात्र , हा तर निसर्गचा नियम आहे ..त्या नुसार वेगवेगळ्या कारणांनी घटना घडतात ..माझ्या किवा माझ्या नातलगांच्या मनात अजिबात पायगुण वगैरे विचार नाही ...माझ्या बोलण्याने तिला जरा धीर आला ..दुसऱ्या दिवशी सकाळी आईला मानसीचे म्हणणे सांगितले तेव्हा आईनेही तिला धीर दिला ..आईने धीर देवून ..तू अजिबात काळजी करू नकोस असे सांगितल्यावर मानसी निश्चिंत झाली ..कदाचित तिला सासू काय विचार करत असेल याचीच जास्त भीती असावी .

त्या दोन दिवसात शस्त्रक्रियेची तयारी म्हणून माझी एच .आय .व्ही .टेस्ट देखील करण्यात आली ..सायंकाळी रिपोर्ट आला .. मी सिस्टरना रिपोर्ट बद्दल विचारले ..त्यांनी काहीतरी कारण सांगून मला रिपोर्ट बद्दल सांगणे टाळले ..म्हणाल्या उद्या परत एकदा टेस्ट करू ..दुसर्या दिवशी पुन्हा टेस्ट केली गेली ..सायंकाळी कळले की शस्त्रक्रिया दोन दिवस पुढे ढकलली आहे ..मी गोंधळात पडलो ..माझी एच .आय .व्ही .टेस्ट तर गडबड नाहीय ना ? अशी शंका मनात आली .. सिस्टरना विचारले तर त्यांनी पुन्हा थातूर मातुर उत्तर दिले ...म्हणाल्या उद्या पुन्हा बाहेरच्या लँब मधून टेस्ट करू मग पाहू ..म्हणजे नक्कीच माझ्या रिपोर्ट मध्ये गडबड होती तर ..रात्रभर मी झोपू शकलो नाही ..मनात वेगवेगळे विचार थैमान घालत होते .

( बाकी पुढील भागात )
========================================================================


टांगती तलवार ! ( पर्व दुसरे -भाग ८८ वा )


एच .आय .व्ही . टेस्ट मध्ये गडबड आहे हे समजल्यावर मी घाबरलो ..हा उपटसुंभ व्हायरस माझ्या शरीरात कुठून आला असावा या बद्दल विचार करून डोके शिणले ..,नेमका काहीच संदर्भ लागेना ....दुसऱ्या दिवशी सकाळी मानसी ..माझ्या रक्ताचा नमुना घेवून बाहेरच्या लँब मध्ये तपासणीसाठी गेली ..ती रिपोर्ट घेवून परत येईपर्यंत जीव टांगणीला होता ...केवळ विचारानेच माझी अशी अवस्था झालीय ..जे लोक खरोखर बाधित होत असतील त्यांची ...त्यांच्या नातलगांची नेमकी अवस्था होत असेल ..ते जाणवले ..एकदाची मानसी हसतमुखाने रिपोर्ट घेवून आली ..तिच्या चेहऱ्यावरूनच रिपोर्ट निगेटिव्ह आलाय हे मी समजलो ...मग भानगड कळली ..हॉस्पिटल मध्ये स्पाँट टेस्ट केली होती ..त्यात गडबड झाली ..म्हणून मग बाहेर ' इलीझा ' करायला पाठवले होते ...रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर ..उद्याच शस्त्रक्रिया करू असे ठरले ..त्या आधी सिस्टरने मला सही करायला एक फॉर्म दिला ..शस्त्रक्रियेचे स्वरूप ..प्रक्रिया ..उद्दिष्टे वगैरे सांगितली ..सुमारे साडेतीन तासांची शस्त्रक्रिया होणार होती ..तीन बाटल्या रक्त लागणार होते ..मला शस्त्रक्रियेच्या आधी ' अनेस्थेशिया ' दिला जाईल ..कदाचित त्यामुळे काही समस्या येवू शकेल ..शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही तर ..कमरेखालचा सगळा भाग निकामी होऊ शकतो ..नपुसंकत्व येवू शकते ..किवा मेंदूत काही बिघाड निर्माण होऊ शकतो ..वगैरे गोष्टी फॉर्म मध्ये स्पष्ट केल्या होत्या ..माझी परवानगी म्हणून मला सही करायची होती ..मी सही केली मात्र नंतर विचारात पडलो ..जर शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही तर होणारे परिणाम वाचून पुन्हा जीव धस्तावला ..मानसी सही करताना रडू लागली ..माझी काळजी सोडून तिलाच समजावत बसलो .


उद्या माझी शस्त्रक्रिया होणार हे मुक्तांगण मध्ये समजले माझे अनेक सहकारी मला भेटून गेले .. संध्याकाळी मुक्ता मँडम आशिषसह भेटायला ..मला धीर द्यायला आल्या ..त्यांनी मला आर्थिक मदत म्हणून मुक्तांगणच्या कार्यकर्त्यांनी गोळा केलेले पाच हजार रुपये आई जवळ दिले ..अजून काही मदत लागली तर कळवा असे आश्वस्त केले ..बाबा येवू शकले नाहीत ..मात्र त्यांनी मुक्ता मँडम सोबत माझ्यासाठी एक लेख पाठवला होता वाचायला ..कोल्हापूरच्या सामाजिक कार्यकर्त्या ' नसीमा हुरजूक ' यांच्या बद्दल माहिती असलेला तो लेख होता ..त्यानाही अशाच प्रकारची पाठीच्या मणक्याची समस्या येवून ..नेमके उपचार न झाल्याने त्या कशा कमरेखाली अपंग झाल्या ..नंतर त्यांनी धीर न सोडता ..त्या अपंगत्वावर मात करत मोठे सामाजिक कार्य उभारले ..त्यांच्या सारख्याच अपंगाना मदत केली ..वगैरे माहिती होती त्या लेखात ..बाबांनी मुद्दाम मला तो लेख पाठवला होता ...मी घाबरून न जाता शस्त्रक्रिया आणि नंतरच्या परिणामांना तयार राहावे असेच बहुधा त्यांना सुचवायचे होते ..खरोखर तो लेख वाचून माझा निर्धार बळावला ....वाटले जे होईल ते होऊ दे ..आपणही हरायचे नाही ..लढायचे जीवनाशी .

बंधूने मला एक सूचना दिली होती की आपल्या व्यसनी लोकांना सर्व साधारण लोकांना देतात तो ' अनेस्थेशिया ' चा डोस कामी येत नाही ..तू आधीच व्यसनी असल्याचे सांगून ..जरा त्या प्रमाणात ' अनेस्थेशिया ' द्यायला तज्ञांना सांग ..त्या नुसार मी अनेस्थेशिया द्यायला आलेल्या तज्ञांना संगितले ..ते म्हणाले बरे झाले सांगितलेस ..त्या नुसार मग त्यांनी मला इंजेक्शन दिले ..माझ्याशी ते तू काय करतोय ..वय किती ..शिक्षण किती ..वगैरे बोलता असतानाच माझी शुद्ध हरपली ...सकाळी जे ७ वाजता ऑपरेशन थीयेटर मध्ये गेलेला मी ..एकदम पावणेकरा वाजता शुद्धीवर आलो ...पहिले तर मला स्ट्रेचर वरून बाहेर वार्डात आणत होते ..हाताला रक्ताची बाटली लावली होती..माझ्या आसपास बंधू ..आई ..मानसी ..दत्ता श्रीखंडेची बायको राधा ..माझी ठाण्याची चुलत बहिण ..वगैरे लोक ...माझ्या तोंडाला कोरड पडल्यासारखे झालेले ..स्पष्ट बोलता येत नव्हते ..जीभही जड वाटत होती ..सर्वांनी इशार्यानेच मला बोलू नकोस ..स्वस्थ पडून राहा असे सांगितले ..शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती ..बारा टाके लागले होते पाठीच्या खालच्या भागात ..आता पंधरा दिवस जखम भरून येईपर्यंत आराम करायचा होता ..नंतर हळू हळू मला चालता येणार होते .

( बाकी पुढील भागात )

========================================================================


कृतघ्न ? ? ? ? ( पर्व दुसरे -भाग ८९ वा )


शस्त्रक्रियेनंतर पाठीची जखम भरून टाके काढेपर्यंत मला जास्त हालचाल करायच्या नाहीत असे बंधन होते अशी ..नुसते पाठीवर उताणे पडून रहायचे ...मोठी शिक्षाच होती माझ्यासारख्या चळवळ्या माणसासाठी ..दिवसभर खूप बोअर व्हायचे ..मग वार्डातील इतर पेशंट्सना बघत राहणे ..त्यांचे नातलग ..येणारे जाणारे ..झाडूवाला ..सिस्टर्स ...डॉक्टरांचा राउंड ..या गोष्टीत मन रमवत असे ..माझ्या पाशी दिवसा आई थांबे ..तर रात्री मानसी बसे ...मानसी नांदेड सारख्या छोट्या शहरातून आलेली असल्याने तिला पुण्याच्या वाहतुकीची ..गर्दीची ..धावपळीची सवय नव्हती ..रोज नागपूर चाळीतून शेअर ऑटो करून दवाखान्यात येणे - जाणे तिला अवघड जात असे ..तरी बिचारी काहीही कुरकुर न करता सगळे व्यवस्थित करत होती .. तिचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी दत्ता श्रीखंडेची पत्नी राधाची खूप मदत झाली ..राधा पुण्यातच लहानाची मोठी झाल्याने ..बोलायला हुशार .. खमकी देखील आहे . मला मुक्तांगण मधील बहुतेक जण भेटून गेले होते ..सगळ्यांनाच नवीन लग्न होऊन सारे सुरळीत होत असताना माझ्यावर आलेल्या या संकटामुळे माझ्याबद्दल सहानुभूती होती ...मला लघवी ..संडास वगैरेसाठी पाँट देण्याचे काम बहुधा मानसीला करावे लागत असे ..लग्न झाल्यानंतर केवळ एक दीड महिन्यात माझी सुश्रुषा करण्याची जवाबदारी तिच्यावर आली होती ...तिनेही हे सारे आईच्या मायेनेच केले ..मला वाटते सुश्रुषा हा स्त्रियांमधील एक नैसर्गिक गुण आहे ..त्यामुळेच त्यांच्याकडे मातृत्वाची जवाबदारी दिलीय निसर्गाने ..स्त्रिया जितक्या आत्मीयतेने एखाद्या नातलगाची किवा आजारी व्यक्तीची सृश्रुषा करतात तितकी पुरुषांना जमणे कठीणच आहे ...मानसीला त्याचे शंभर मार्क्स दिलेच पाहिजेत .

पाचसहा दिवसांनी माझ्याकडे फिजियो थेरेपिस्ट आले ..त्यांनी मला हळू हळू पायाच्या हालचाली कशा करायच्या वगैरे मार्गदर्शन केले ..आधार देवून मला थोडे उभे केले ..दुसऱ्या दिवशी थोडे चालवले ..एकंदरीत सगळे ठीक होते ..शस्त्रक्रिया फायदेशीर ठरली होती ...नंतर हळू हळू मी वार्डातच चालण्याचा सराव करू लागलो ..थोडे हळू चालावे लागत असे ..तसेच काही दिवस चालताना पाठीच्या मणक्याला आधार देणारा पट्टा वापरावा लागेल असे सांगितले गेले ...पंधरा दिवसानंतर मला डिस्चार्ज देण्याचा दिवस उगवला ..परेश ..बंधू ..हे मित्र आले होते दवाखान्यात ...आई आणि मानसी होतीच ..डिस्चार्ज फॉर्म वर मानसीची सही घेतली गेली ..तो फॉर्म मी वाचायला घेतला तेव्हा माझ्या लक्षात आले की सही करताना मानसीने मराठीत मानसी नातू ..अशी सही करण्याएवजी ..मानशी नातू ..असे लिहिले होते ..मराठीचे खूप वाचन असणाऱ्या मला ..मानसी ऐवजी मानशी असे लिहिलेली चूक खटकली ..ही व्याकरणातील चूक होती ..मला आठवले मानसी बी .ए .झालेली आहे ..तरीही अशी चूक करते हे योग्य नव्हे ...मी पटकन बोलून गेलो ' मानसी अग ..तू बी ए .आहेस ना ? अशी कशी पदवीधर झालीस तू ? इतकी साधी गोष्ट समजत नाही तुला ? ..सर्वांसमोर मी माझा शहाणपणा पाजळत होतो ...मानसी कसनुस हसली ' अहो , होते चूक ..त्यात काय मोठेसे ' इतकेच म्हणाली .

नंतर सगळी प्रक्रिया होत असताना माझ्या लक्षात आले की मानसी कुठे दिसत नाहीय ..मी आईला विचारले ..तर आई म्हणाली ..असेल इथेच कुठेतरी ..पाच दहा मिनिटे झाली तरी मानसी दिसेना ..मग बंधूला पाठवले तीला शोधायला ..बंधू वार्डाबाहेर जावून लगेच परत आला ..म्हणाला वहिनी तिथे जिन्यात रडत उभ्या आहेत ..आता सर्व सुरळीत झालेय रडण्या सारखे काय घडलेय टे मला समजेना ..मग बंधूच म्हणाला ' यार ..तुला पण काही अक्कल नाहीय ...तू सर्वांसमोर त्यांची व्याकरणाची चूक काढलीस ...त्यांना त्याचे वाईट वाटले असेल ' ..मग माझ्या लक्षात आले ..खरेच होते बंधूचे ..मी माझी आई ..मित्र यांच्या समोर जाहीर रीतीने मानसीची छोटीशी व्याकरणाची चूक दाखवून ..वर असली कसली बी .ए .असेही म्हणालो होतो ..हा तिचा अपमानच होता ..माझा शहाणपणा दाखवण्याच्या नादात मी तिच्या भावनांची पर्वा केली नव्हती ..जीने मला लग्नानंतर जेमतेम दीड महिन्यात लघवी ..संडासला पाँट दिला ...कसलीही कुरकुर न करता ..रात्र रात्र जागली ...मायेने माझी सुश्रुषा केली त्या पत्नीला मी मित्रांसमोर अपमानित केले होते ..खरोखर मी मूर्ख होतो ..माझा हा कृतघ्नपणाच होता . आज खूप वर्षांनी जाणवतेय ..पुरुष किती सहजपणे ..पत्नीच्या माहेरचा उद्धार करतो ..तिच्या भाबडेपणाचा बावळट म्हणून चारचौघात उल्लेख करतो ..किवा ती कशी मूर्ख आहे हे किस्से सर्वाना सांगतो ..विनोद म्हणून इतरांसमोर आपल्या पत्नीला अपमानित करतो ..तरीही त्या निष्ठेने पतीला मान देतात ..बहुधा स्त्रिया मात्र असे करत नाहीत ..खूप काही शिकण्यासारखे असते त्यांच्याकडून !

( बाकी पुढील भागात )

========================================================================

गोड बातमी !  ( पर्व दुसरे -भाग ९० वा )


महिन्याभरात मी पूर्ववत चालू लागलो ...काही पथ्ये पाळावी लागत होती .. जोरात पळणे ..कमरेत खाली वाकणे ... वजन उचलणे वगैरे गोष्टी शक्यतो टाळायच्या होत्या किवा काळजीपूर्वक करायच्या होत्या ..याच काळात माझ्या चिंचवडच्या चुलत बहिणीने माझ्याकडे गँस नव्हता म्हणून तिच्या कडील जास्तीचा सिलेंडर मला वापरायला दिला ..स्टोव्ह बंद झाला ..माझी मुक्तांगणची नोकरी पूर्ववत सुरु झाली ..एकदा मानसीने मला पाळी चुकलीय हे जरा काळजीनेच सांगितले ..मी खूप आनंदलो ...नव्या जिवाच्या आगमनाची ही चाहूल आहे हे मला समजले ..मी लगेच नाशिकला फोन करून ती बातमी दिली .. आई ...भाऊ ..वहिनी ..सगळेच आनंदले ..मानसी मात्र जरा घाबरत होती ...हे सगळे आपल्याला झेपेल का ? सगळे व्यवस्थित पार पडेल का ? अशी भीती तिच्या मनात होती ...शिवाय प्रसूती वेदना वगैरेबद्दल तिने जे ऐकले होते त्यामुळेही तिला भीती वाटत असावी...तिला मी बरेच समजावले ..मात्र ती निर्धास्त झालेली वाटली नाही ..मग तिला मुक्ता मँडमना भेटायला घेवून गेलो ..त्यांनी तिला व्यवस्थित समुपदेशन केले ..मग निश्चिंत झाली ..तपासणी केल्यावर बातमीवर शिक्कामोर्तब झाले ...इतकी वर्षे व्यसने केल्यावर ..शुक्राणू कमकुवत होऊन ... नपुसंकक्त्व येण्याची शक्यता असते ..माझ्या मनातील ती भीती देखील संपली ....सगळाच आनंदी आनंद ....फक्त आर्थिक बाबतीतच मी कमकुवत होतो ...हॉटेलिंग ..सिनेमा ..अशी चैन परवडत नव्हती ...मानसी देखील तशी अगदी साधी असल्याने तिने कधीही असल्या गोष्टींसाठी माझ्याकडे हट्ट केला नव्हता.. छान दिवस चालले होते ..!

पितृत्वाच्या कल्पेनेने मी खूप आनंदलो होतो ..अशा वेळी मुलगा की मुलगी अशी चर्चा सुरु होते ...माझ्या दृष्टीने दोन्ही सारखेच ..परंतु सर्वसाधारण मुलगा हवा अशीच बहुतेकांची भावना असते ...मानसीच्या तब्येतीवरून..तिच्या चेहऱ्याच्या तेजावरून ..तिच्या हालचालीवरून ..आसपास राहणाऱ्या ..तिची ओळख झालेल्या स्त्रिया मुलगा की मुलगी याबाबत काही अंदाज बांधत आणि ते मानसीला सांगत ...सायंकाळी मी घरी आल्यावर कोण काकू काय म्हणाल्या ते ती मला सांगे ..माझे छान मनोरंजन होई ..वाटे स्त्री -पुरुष हा फरक किती खोल रुजला आहे लोकांच्या मनात ..खरेतर निसर्गाने दोन्हीही एकमेकांना पूरक असे बनवले आहेत ..वृत्ती जरी भिन्न असली तरी मला नेहमी वाटते ..की पुरुष्यांच्या तुलनेत स्त्रिया.. ..हिंसा ..भ्रष्टाचार ..विध्वंसक कारवाया ..कुटिलता वगैरे पासून शक्यतो दूर राहतात ..अर्थात यालाही काही सन्माननीय असे राजकीय आणि ऐतिहासिक अपवाद आहेतच पण तरीही दया ..ममता ..शांतीवाद ..या बाबतीत त्या केव्हाही पुरुष्यांना मागे सोडतात ...सध्या तर प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी बाजी मारली आहे ..मुलगा असो की मुलगी ..पालकांनी त्याची योग्य काळजी घेतली ..त्याच्या निरोगी मानसिक विकासाकडे लक्ष दिले तर काहीच काळजी करण्याचे कारण नसते !

बाळाची चाहूल लागल्यापासून मानसीला सारखे आर्थिक असुरक्षितता वाटे ..तुटपुंज्या पगारात पुढे सगळे नीट होईल की नाही याची चिंता ती बोलून दाखवे ..एकदा सायंकाळी मुक्तांगणहून घरी आलो तर मानसी तुरीच्या शेंगांच्या ढिगाऱ्याशेजारी बसलेली दिसली ..एका परातीत ती त्या तुरीच्या शेंगा सोलून त्याचे दाणे टाकत होती ..घरभर शेंगांची साले पसरलेली ..मला समजेना काय भानगड आहे ते ..मग म्हणाली ..अहो घरात एकटी बसून कंटाळा येतो म्हणून बाजूच्या एका बाई सोबत एका ठिकाणी नोकरी शोधायला गेले होते ..तर हे काम मिळाले ..या शेंगा तेथून वजनावर मोजून आणायच्या आणि सोलून दाणे त्यांना द्यायचे ..त्याचे ठराविक पैसे मिळतात ..मला हसूच आले तिच्या भाबडेपणाचे ..तिला हे काम खूप सोपे वाटले होते ..मात्र त्या शेंगाची साले तेलकट किवा थोडी चिकट असतात ..सोलताना हात काळे होतात ..किचकट काम असते ...शिवाय खराब शेंगामधील अळ्या नीट लक्ष दिले गेले नाही तर शेंगातून बाहेर पडून घरभर पसरतात वगैरे !..मी पण तिला शेंगा लवकर संपाव्या म्हणून मदत केली ..सधारण तीन दिवस लागले पाच किलो शेंगा सोलायला ...त्यामानाने मिळणारे पैसे अगदीच कमी होते ..मात्र नंतर घरात दोन तीन दिवस कुठेही एखादी हिरवी अळी दिसे ...मग मानसीचे किंचाळणे आलेच ..मी काळजी पूर्वक ती अळी उचलून बाहेर फेकून देई ...नंतर मी तिला ते काम करण्यास मनाई केली .

( बाकी पुढील भागात )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें