मंगलवार, 25 जून 2013

दुनियादारी

नेकी कर ......गाली खा ! (पर्व दुसरे - भाग ३१ वा )


महेशभाऊंनी आपल्या समस्येचे निराकरण झाले नाही तर एकदम दारू प्यायलेले बरे असे म्हंटले तेव्हा मी जरा गंभीर झालो ..गेल्या दोन महिन्यापासून ते व्यसनमुक्त राहत होते ..तसेच मिटिंगला देखील नियमित येत होते या वरून त्यांची व्यसनमुक्ती टिकविण्याची इच्छा मनापासूनची इच्छा दिसली होती ..मात्र उतारवयातील लैंगिक सुखाच्या किरकोळ समस्येला त्यानी मनात मोठे स्थान देवून स्वतःला अवस्थ करून ठेवले ..अनेक व्यसनी व्यक्तींच्या बाबतीत असे घडते की एखाद्या शुल्लक कारणावरून ..किरकोळ घटनेवरून ..एखाद्या व्यक्तीच्या न आवडणाऱ्या वर्तनावरून लगेच ते अवस्थ होतात आणि पुन्हा प्यायला सुरवात करतात ..पुन्हा व्यसन सुरु झाल्यावर समस्या कमी होण्याऐवजी वाढतातच असा अनुभव असून देखील वारंवार व्यसनाचे विचार व तसे वर्तन हाच या आजाराचा वैचारिक धूर्तपणा आहे ...' मला बाहेर दुसरा पर्याय शोधायला हवा ' असे म्हणत त्यांनी लैंगिक सुखासाठी आपली शरीरविक्री व्यवसाय करणाऱ्या स्त्री कडे जाण्याची तयारी आहे हे दर्शविले तेव्हा मी ते फारसे गंभीरतेने न घेता त्यांना ...तुम्हाला हवे ते करा म्हणालो खरा ..पण त्यांच्यातील पांढरपेशा मध्यमवर्गीय माणूस '...सफेद गल्लीत पोलीस येतात म्हणून तेथे जायला घाबरणे स्वाभाविक होते ..मग ते मला म्हणाले की तुमची ' सफेद गल्ली ' येथे ओळख आहे..तसेच भद्रकालीतील पोलीस देखील तुमच्या ओळखीचे आहेत ..तेव्हा तुमच्या ओळखीने मला काहीतरी जमवून द्या .. मी जरा विचारात पडलो ..सफेद गल्लीत जरी माझी ओळख असली तरी तेथिल महिला माझा आदर करत असत ..त्यांच्याकडे हे ध्यान गिह्राईक म्हणून घेवून जाणेमाझ्या मनाला कधीच पटले नसते . म्हणजे एकप्रकारे हे ' एजंट ' असल्यासारखेच झाले असते ..मी महेशभाऊना ' सफेद गल्लीत ' नेण्यास स्पष्ट नकार दिला ..तरीही ते खूपच पाठीमागे लागले म्हणून ..मी त्यांना म्हणालो कि तुम्ही एक काम करा ..मेनरोड वर ज्या ' स्ट्रीट ऑपरेटर्स' ( रस्त्यावर उभे राहून गिह्राईक शोधून ..एखाद्या विशिष्ट लॉज मध्ये जाणाऱ्या ) उभ्या राहतात त्यापैकी एखादीला तुम्हीं गाठा ..तर म्हणाले ..अहो मला त्यांच्याशी बोलणे ..रेट वगैरे ठरविणे जमणार नाही .. म्हणजे पुन्हा वांधा आला .. पुढे महेशभाऊ म्हणाले ' तुम्हीच ते सगळे ठरवा ' ...या प्रकरणात मी आता अडकत चाललो होतो .. बर ठीक आहे असे म्हणत ...मी त्यांना तुम्ही पुढच्या वेळी मिटिंगला याल तेव्हा पैसे वगैरे घेवून या ..मी मदत करीन तुम्हाला असे आश्वासन दिले .


पुढच्या मिटींगला महेशभाऊ छान गुळगुळीत दाढी वगैरे करून आलेले .. नवा सफारी घातला होता ...आल्याबरोबर मला बाजूला घेऊन म्हणाले भरपूर पैसे आणलेत सोबत ..कीती पैसे आणलेत विचारले तर म्हणाले पाच हजार ..१९९३ सालचे पाच हजार म्हणजे भरपूरच होते एकंदरीत ..मिटिंग संपल्यावर बाकीच्या मित्रांना निरोप देवून आम्ही मेनरोडवर आलो ..सोबत माझी सायकल होतीच .. मेनरोडवरील दोन तीन स्ट्रीट ऑपरेटर्स माझ्या ओळखीच्या होत्या ..पण त्यांच्याकडे असा प्रस्ताव घेवून जाणे मला मान्य नव्हते ..एखादी अनोळखी दिसली तर मी तिच्याशी बोलणे करायचे ठरविले ..मेनरोडहून आत सोमवार पेठेकडे जाणारी एक गल्ली आहे ..त्या गल्लीत रस्त्यावर पिवळ्या कव्हरची पुस्तके ..जुनी मासिके ... वगैरे विकणारे लोक बसतात ..तेथे एक सावळी जरा बर्यापैकी दिसणारी मुलगी उभी होती ..तिच्या हावभावावरून ..उभे राहण्याच्या पद्धतीवरून ..ती स्ट्रीट ओपरेटर आहे हे मी ओळखले ..महेशभाऊंनी तिला पाहून पसंतीदर्शक मान हलविली ..धीर करून मी पुढे झालो ..तिच्याकडे पाहून हसलो ..ती देखील ओळख असल्यारखी हसली ..आजूबाजूने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचे मला दडपण आले होते ..तिच्या जवळ जावून कुजबुजलो ..चलेगी ????? त्यावर मान हलवून तिने होकार दिला ..उगाचच तोंडाला पदर लावून लाजली ..कितने पैसे .. असे विचारल्यावर ..फुल नाईट के पाचसो..एक बार के पचास असा तिने भाव सांगितला .. मी विचार केला हा महेशभाऊ जास्तच काट्यावर आलाय तेव्हा ' फुलनाईट ' असे म्हणून तिला कुठे जायचे हे विचारले तर तिने रविवार कारंजा हून मेनरोड कडे जाणार्या रस्त्यावरील एक लॉज सांगितले ..ठीक आहे अस म्हणून मी महेशभाऊना जवळ बोलाविले ..तिला समजेना नक्की भानगड काय आहे ते .. महेशभाऊ जवळ आल्यावर मी तिला सांगितले .. मला नाही तर यांना बसायचे आहे .. महेशभाऊना पाहून तिचा जरा विरस झाल्यासारखा दिसला .. आता आपण सुटलो असे वाटले पण अजून माझा रोल बाकी होता बहुतेक ..मी एक ऑटो थांबविली त्यात ती बाई आणि महेशभाऊ बसले .. ऑटो सुरु व्हायच्या वेळी महेशभाऊ परत म्हणाले ...तुम्हीं चला न लॉजपर्यंत सोबत ..त्यांचा स्वर काकुळतीला आल्यासारखा होता म्हणून मी त्यांना म्हणालो तुम्ही जा पुढे ऑटोने ..मी सायकल घेवून येतोच तिथे .. लॉज जवळ ऑटो आणि माझी सायकल एकदमच पोचली ..लॉजवाल्याचे भाडे वगैरे ठरवायला देखील मलाच पुढाकार घ्यावा लागला .. मग महेशभाऊ म्हणाले मी जवळ जास्त पैसे ठेवत नाही ..हे तीन हजार तुमच्याजवळ ठेवा असे म्हणत त्यांनी पाच पैकी स्वतःजवळ दोन हजार ठेवले व माझ्याकडे तीन सुपूर्द केले .. त्या स्त्रीला लगेच त्यांनी पाचशे दिले ..आता सुटलो असे वाटले तोच पुन्हा महेशभाऊ म्हणाले ..तुषारभाऊ तुम्ही एक काम करा ना .. याच लॉजवर माझ्या शेजारची रूम तुम्ही घ्या आणि इथेच रहा ..म्हणजे रात्री काही गडबड झाली तर ... कारण लॉजवर देखील म्हणे कधी कधी पोलीस धाड टाकतात .. म्हणतात ना ' बुडत्याचा पाय खोलात ' तसेच होत चालले होते ..महेशभाऊंच्या प्रकरणात मी खोल अडकत चाललो होतो ..हो नाही करता करता मी लॉज वर बाजूच्या रूमवर राहायला तयार झालो .. त्यावेळी सेलफोन नसल्याने घरी देखील निरोप देता येत नव्हता .. !

एकदाचे महेशभाऊ रूमवर पोचले ..मी बाजूचीच रूम बुक केली होती .. जरा वेळ माझ्या रुममध्ये थांबून सहज सिगरेट ओढायला म्हणून बाहेर पडलो .. तर यांच्या रूमचा दरवाजा उघडा दिसला .. रूम समोरून मला जाताना पाहून ती बाई बाहेर आली .. मला म्हणाली तुमचे साहेब पान खावून येतो म्हणून बाहेर गेलेत .. ह्म्म्म ..असे म्हणत मी खाली पान टपरीवर आलो तर तेथे पान खायच्या बहाण्याने खाली आलेले महेशभाऊ दिसले नाहीत .. माझ्या मनात पाल चुकचुकली .. तितक्यात समोरून ते येताना दिसले .. मला खाली उभा पाहून जरा बिचकल्यासारखे वाटले ..मी त्यांच्यावर माझी ' खास ' झाडीची नजर टाकली तर पँटचा खिसा फुगलेला दिसला .. शेवटी महेशभाऊंनी ' काशी ' केलीच होती .. त्यांच्या खिश्यात चक्क क्वार्टर होती .. मी त्यांना रागावलो ...अहो तुम्ही दारू पिऊ नये म्हणून मी इतका खटाटोप करतोय आणि तुम्ही तर क्वार्टर घेवून आलात सोबत .. ते ओशाळले .. पण विनवण्या करू लागले ..फक्त जरा आजच मूड आलाय म्हणू लागले .. आता मला समजले की यांचे सेक्स आणि दारू असे असोशिअशन आहे ..म्हणजे सेक्स करण्याच्या वेळी दारू घेतलीच पाहिजे असे यांच्या अंतर्मनात खोल रुजले आहे ..त्या शिवाय त्यांना तो विशिष्ट आत्मविश्वास येत नाही ..त्यांची पत्नी त्यांच्या पासून दूर का राहते देखील लगेच समजले .. शरीरसंबंधांच्या निमित्ताने यांची दारू सुरु होऊ शकते हि भीती असल्यामुळेच पत्नी त्यांना टाळत असावी .. मी रागावून त्यांना म्हणालो ..मी जातो आता घरी ..तुम्ही तुमचे पहा .. तर चक्क हात जोडू लागले ..अहो प्लीज असे करू नका .. फक्त आजच घेतोय मी .. उद्यापासून नाही घेणार ..वचन देतो वगैरे .. आता मी प्रकरणात चांगलाच अडकलो होतो ..इतक्या सहजासहजी काढता पाय घेणे जमले नसते ..आता यांनी प्यायची तयारी केलीच आहे ..समजावून काही फायदा नाही ....तसेच हे संगमनेर सोडून परक्या गावात आहेत .. यांना असे वाऱ्यावर सोडणे ठीक नाही असे वाटले ... मी त्यांच्यासोबत वर गेलो .. त्यांना ताकीद दिली ..आता परत रुमच्या बाहेर जावू नका ..आणि माझ्या खोलीत गेलो .. दहा मिनिटांनी माझ्या दारावर थाप पडली ..दारात महेशभाऊ .. अर्धी क्वार्टर पोटात गेली असावी .. चांगलाच आत्मविश्वास होता बोलण्यात ..म्हणाले अहो जरा कंटाळा आलाय ..तुम्ही माझ्या रुममध्ये चला गप्पा मारायला .. हे अतीच होते ..तेथे ती स्त्री असताना हे मला कंटाळा आला म्हणत होते .. तितक्यात ती बाई देखील रुमच्या बाहेर आली व म्हणाली ..हा माणूस लई इचीत्र आहे .. फालतू चाळे करत बसलाय .. मुख्य काम सोडून हे ध्यान काहीतरी विकृत गोष्टी करत असणार हे माझ्या लक्षात आले .. ती बाई तरातरा खाली जायला लागली ..तर हे भडकले .. तिला मोठ्याने हाक मारू लागले .. शिव्या देवू लागले ..तमाशा नको म्हणून मी त्यांना रूममध्ये खेचले ...!

( बाकी पुढील भागात )

======================================================


करायला गेलो एक .... ! (पर्व दुसरे -भाग ३२ वा )


महेशभाऊ पोटात दारू गेल्यावर एकदम आक्रमक झाले होते .. त्या बाईला ते शिव्या देवू लागल्यावर मी त्यांना त्यांच्या रूम मध्ये खेचले .. त्यांना शांत करू लागलो ..गडी काही केल्या ऐकायला तयार नव्हता .. त्या बाई कडून पैसे परत घेतो म्हणू लागला .. आता अजून पंचाईत होती .. ती बाई असे पैसे परत देणार नव्हतीच ... तिच्या निघून जाण्यात तिचा विशेष दोष नव्हता .. वयापरत्वे किवा व्यसनाधीनते मुळे ..अथवा इतर काही कारणांनी जर नपुसंकत्व आले असेल तर काही जण प्रत्यक्ष लैंगिक सुखाचा आनंद घेता येत नसल्याने उगाच स्त्री च्या शरीराशी काहीतरी खेळणे समजून विकृत गोष्टी करतात हे मला माहित होते ..हा बुवा त्या पैकीच असावा ...अनेकांना व्यसनाधीनते मुळे तात्पुरते अथवा कायमचे नपुसंकत्व येवू शकते .. एका प्रकारात त्या व्यक्तीची प्रजनन शक्ती कमी होते व मुलबाळ होऊ शकत नाही कारण व्यसनाधीनते मुळे शुक्रजंतू तयार होण्याचे प्रमाण मंदावले असते किवा ते शुक्रजंतू अशक्त निर्माण होऊन .गर्भधारणा होण्यास अडथळा उत्पन्न होतो ..दुसऱ्या प्रकारात शुक्रजंतूच्या बाबतीत सगळे आलबेल असते मात्र व्यक्तीच्या लिंगाला उत्तेजना येत नाही .. त्यामुळे तो प्रत्यक्ष शरीर संबंध करण्यास असमर्थ होतो .. खरे तर व्यसन बंद करून योग्य तज्ञांचा सल्ला घेतला तर नक्कीच लाभ होतो ..परंतु लैंगिकता हि अतिशय नाजूक बाब असल्याने बहुधा लोक लैगिक उपचार तज्ञांकडे जायचे टाळतात ...त्या ऐवजी ते रस्त्यावर बसलेल्या फालतू वैदू कडे ..किवा वर्तमान पत्रात जाहिरात देणाऱ्या एखाद्या भोंदू कडे जातात कसल्या कसल्या जडी बुटी ..' ' सांडे का तेल ' असे अशास्त्रीय उपचार घेवून पैसे घालवतात ..दारू मात्र सोडत नाहीत ..एकाने मित्राने तर एका अश्या बोगस वैदू बाबत सांगितले की त्या वैदू कडे एका खोलीत संबंधित व्यक्तीला नेले जाई ..तेथे तुझ्या अंगात किती लैंगिक पाँवर आहे ते तपासतो असे सांगून त्याच्या लिंगाला दोन इलेक्ट्रिक वायर जोडल्या जात .. जर त्या वायर जोडल्यावर समोरच्या बोर्डवर असलेला हिरवा दिवा लागला तर ..खूप छान लैंगिक शक्ती आहे ..जर पिवळा दिवा लागला तर शक्ती जरा कमी पडतेय ..आणि लाल दिवा लागला तर म्हणे ..लैंगिक पाँवर पूर्ण संपली असे समजायचे .. कोणाला हे कळत नसे की त्या वैदूचा एक माणूस आतल्या खोलीतून बटने दाबून हे दिवे लावतोय .. आम्ही खूप हसलो होतो ते ऐकल्यावर ...पुन्हा तोच मुद्दा होता ..आपल्याकडे ' पुरुषार्थ ' याचा अर्थ केवळ लैंगिकतेशी जोडला जातोय .. तुम्ही लैंगिक संबंधात निपुण असणे किवा मुलबाळ निर्माण करण्याची क्षमता असणे म्हणजेच ' मर्द ' असल्याची खुण मानणे हा निव्वळ मूर्खपणा आहे ...तुमचे ' कर्तुत्व ' केवळ यावरूनच ठरत नाही . उत्तेजनेच्या बाबतीत असलेला कमीपणा हा सातत्याने किमान वर्षभर व्यसनमुक्त राहिले तर जातो .. अर्थात वयपरत्वे लिंगाची उत्तेजना कमी होत जाते हे देखील खरे आहे ... अनेक जण या उत्तेजनेच्या समस्येमुळे पुन्हा पुन्हा दारू पितात ..त्यांना वाटते आपली उत्तेजना कमी झाली म्हणजे आपण त्या अर्थाने ' नालायक ' झालोत ..आपला जोडीदार कदाचित आपल्याला झिडकारेल वगैरे .. तसे काही नसते ..जर आपल्या जोडीदाराशी मनमोकळे पणे चर्चा केली तर हि समस्या सोडविता येते .

ती बाई शरीरविक्रीचा व्यवसाय करणारी होती तरी ती ज्या अर्थी इतकी चिडून निघून गेली ...त्या अर्थी नक्कीच याने काही तरी चाळे केले असणार याची मला खात्री होती ...पैसे काही परत मिळणार नाहीत असे मी त्यांना समजावू लागलो तर म्हणाले .. बर जाऊ दे ..पैसे नाही तर नाही ..पण आता मला अजून एक क्वार्टर प्यायची आहे ..म्हणजे गाडे पुन्हा मूळपदावर आलेले .. मी वैतागलो होतो खूप ..पण पुन्हा या बाबाला असा खिश्यात इतके पैसे ठेवून एकटा सोडणे मला प्रशस्त वाटले नाही म्हणून ..नाईलाजाने त्यांना अजून एक क्वार्टर प्यायला परवानगी दिली ..मला वाटले पिवून हा शांत झोपेल तरी किमान .. रात्रीचा १ वाजत आलेला होता ..शहरातले सगळे ' बार ' व दारूची दुकाने बंद झालेली होती ..मी त्यांना तसे सांगताच ते म्हणाले मुंबई आग्रा रोडवर असलेले ' इनायत कँफे ' उघडेच असते .. म्हणजे यांना सर्व माहिती होती तर .. लॉज सोडून आम्ही ऑटोने ' इनायत कँफे ' ला गेलो .. माझे जेवण बाकीच होते अजून ..तेथे गेल्यावर मी जेवणाची ऑर्डर दिली ..महेशभाऊंनी दारूची ऑर्डर दिली .. काही लोकांचे मेंदू दारूच्या बाबतीत इतके जास्त संवेदनशील असतात की अगदी थोडी जरी दारू पोटात गेली कि त्यांचे ' माकड ' बनते .. ते लगेच शिवीगाळ सुरु करतात ..भांडतात .. वाट्टेल त्या स्तराला जातात ..महेशभाऊ त्यापैकीच होते हे मला नंतर समजले .. मी जेवत असताना त्यांची बडबड सुरूच होती .. वयाला न शोभणारे अश्लील जोक सांगत बसले होते मला ..ते सगळे जोक मला आधीच माहित होते तरीही ..त्यांना खोटे हसून ..टाळी देवून दाद द्यावी लागत होती ...मध्येच ते एका वेटर वर भडकले .. त्याच्याशी भांडू लागले ..हा मंत्री माझा नातलग आहे ..तो आमदार माझा पाहुणा आहे .. वगैरे सांगू लागले .. तितक्यात रात्रीचा राउंड घेणारी एक पोलीस व्हँन आली हॉटेल च्या दारात ..ती गाडी पाहून महेशभाऊ एकदम चूप झाले ..मी देखील जरा घाबरलोच होतो ..जर भद्रकालीतील कोणी माझ्या ओळखीचे पोलीस असतील तर मला रात्री या वेळी इथे पाहून त्यांच्या गैरसमज झाला असता .. सुदैवाने गाडीत कोणीच नव्हते ..ड्रायव्हर ने स्वतच्या जेवणासाठी सरकारी गाडी आणली होती .. अर्धवट जेवण सोडून महेशभाऊना घेवून मी सी .बी एस वर आलो ..जर एखादी संगमनेरला जाणारी बस असेल तर हे पार्सल बसमध्ये बसवून देणार होतो ..मला नंतर लॉजवर जावून माझी सायकल देखील घ्यायची होती .. एकही बस दिसेना संगमनेर कडे जाणारी ..यांचे माकडचाळे सुरूच होते .. स्टँडवर असलेल्या महिलांकडे रोखून पाहत होते .. अचकट विचकट बोलून वर मला टाळी देत होते .. बापरे ..हा बाबा बहुतेक मार खायची पाळी आणणार होता माझ्यावर ..

शेवटी माझी सहनशक्ती संपली ..मी खिश्यातून त्यांनी माझ्याकडे ठेवलेले तीन हजार रुपये काढून त्यांच्या हातावर ठेवले ..त्यांना हात जोडले ..म्हणालो .. हे तुमचे पैसे .. आता माझी जवाबदारी संपली ..मी घरी जातो आहे .. मी घरी निघालेला पाहून ते एकदम असुरक्षित झाले असावेत .. मला थांबा म्हणून गयावया करू कागले ..पण आता मी थांबणार नव्हतोच ..रात्रीचे तीन वाजले होते ..नीट जेवता आले नव्हते ..खूप झोप आली होती ..वर यांचे तमाशे सहन करण्याची इच्छा नव्हती .. मी त्यांच्याकडे पाठ फिरवून चालू लागलो .. दहा पावले पुढे गेल्यावर त्यांची हाक ऐकू आली ' ओ ..सर ..तुषार सर ..थांबा ना ' मी त्याकडे दुर्लक्ष करून पुढे चालतच होतो ..पुन्हा वीस पावले गेल्यावर दुसरी हाक आली .. ' तुषार भाऊ ..अहो थांबा ' मी चालतच होतो ..मग तिसरी हाक आली ' ए तुषार जास्त शहाणा बनू नकोस .. थांब जरा ' मी चालतच होतो आणि शेवटी माझे नाव घेवून त्यांनी शिव्या द्यायला सुरवात केली .. माझे रक्त उकळत होते आतून ..दुसरा कोणी असता तर इतक्या शिव्या ऐकून मी त्याचा मुडदाच पाडला असता .. लहानपणी एकदा मी असेच शिव्या दिल्या म्हणून एकाचे डोके फोडले होते ..पण इथे नाईलाज होता .. विषण्णपणे मी त्या शिव्यांकडे दुर्लक्ष करत चालतच होतो .

( बाकी पुढील भागात )



=============================================

लंगडी माधुरी ...! 
( पर्व दुसरे - भाग ३३ वा )


नाशिकच्या सीबीएस ( बस स्थानक ) पाच सहा वेळा माझे मध्यरात्री जाणे झाले होते ...तेव्हा एकदा सिगरेट संपली म्हणून आसपास कुठे सिगरेट मिळते ते शोधत होतो..मध्यरात्र झाली असल्याने ..आसपास च्या सगळ्या पानटपऱ्या बंद.. एका ऑटो वाल्याला सिगरेट कुठे मिळू शकेल हे विचारले तर तो सहज पणे म्हणाला ' लंगडी माधुरी ' असेल बघा स्टँड वर कुठेतरी गर्दीत बसलेली ..हे ' लंगडी माधुरी ' काय प्रकरण असावे ते समजेना .. त्याने सांगितल्याप्रमाणे सगळ्या सीबीएस वर झाडी केली तेव्हा कँटीनच्या बाजूला एका ठिकाणी चारपाच लोकांचा घोळका दिसला .. तेथे गेलो तर केसात मोगऱ्याचा गजरा माळलेली .. नाकीडोळी सुंदर ..गोरीपान ..अतिशय सुंदर चेहऱ्याची एक मुलगी दिसली ..तिच्या समोर एक पत्र्याची पेटी होती त्यात सर्व प्रकारच्या सिगरेटस ठेवलेल्या होत्या .. लोक तिला पैसे देवून तिच्या कडून सिगरेट विकत घेत होते .. मी देखील दहाची नोट पुढे करून दोन चारमिनार मागितल्या ...तिने सिगरेट आणि पैसे परत दिले ..अपेक्षेपेक्षा कमी पैसे होते ते ..बापरे इतकी महाग ? मी विचारले तर एकदम फिस्कारली ती ..' इतक्या रात्री ..तुम्हाला सिगरेट दुसरीकडे मिळेल का ? हवी तर घ्या ..नाहीतर फुटा इथून ' लगेच दहाची नोट मला परत देवू लागली ..तिचे खरेच होते जरी एक रुपया जास्त घेत होती ती ..तरी इतक्या रात्री सगळ्या पानटपऱ्या बंद असताना सिगरेट मिळणे दुरापास्त होते .. राहू दे ..राहू दे ..असे पटकन म्हणत मी सिगरेट पेटविली .. बाजूलाच उभा राहून त्या मुलीचे निरीक्षण करू लागलो ..तिचा चेहरा अतिशय निरागस होता ..मात्र जीभ एकदम तलवार ... ती पटापट लोकांना हवी ती सिगरेट किवा गुटखा देत होती .. आणि किमतीपेक्षा ५० पैसे ते एक रुपया जास्त आकारात होती..तिने एक ढगळ असा पंजाबी ड्रेस घातला होता .. चेहरा जरी सुंदर होता तरी तिचा ड्रेस मात्र एकदम मळलेला होता ..नीट निरीक्षण केले तेव्हा जाणवले... अरे ही तर सिनेमा नटी माधुरी दीक्षित सारखीच दिसते थोडीशी .. म्हणून कदाचित तिला ' लंगडी माधुरी ' म्हणत असावेत ..तिच्या मानेवर मळाची पुटे चढलेली दिसली .. तिचा एक हात अधू होता .. तिला बहुधा पँरँलीसीस झाला असावा असे वाटले ..तो अधू हात ती छातीशी धरून एका हातानेच सिगरेटचे पाकीट उचलत होती ..ते पाकीट छातीशी धरलेल्या हातांच्या बोटात पकडत होती ..त्या अधू हाताची मधली दोन बोटे सरळ होती बाकीची आतल्या बाजूला वळलेली .. मग पाकीट उघडून सिगरेट देत होती .. कसरतच होती एक ..मात्र सवयीमुळे हि कसरत ती कौशल्याने करत असावी ..मध्येच ती एकावर डाफरली ..' मुडद्या ..नुसता पाहत काय बसला आहेस मला ..पोरगी पहिली नाही का कधी..तो माणूस खजील होऊन तिथून उठला .. मी पण चमकलो ..कारण मी देखील तिचे निरखून निरीक्षण करत होतो ..!

दुसऱ्या दिवशी मी माझा मित्र विलास पाटील याला तिच्याबद्दल सांगितले तर त्याला ती मुलगी आधीच माहित होती ..म्हणाला .. एकदा तिच्याशी बोल तू ..मग कळेल तुला तिची स्टोरी ...मला जगातील समस्त वेगळ्या वाटणाऱ्या ..सर्वसामान्य नसणाऱ्या गोष्टींबद्दल प्रचंड कुतूहल असते .. त्यांची माहिती घेण्याचा माझा प्रयत्न असतो ..म्हणून परत चार दिवसांनी मुद्दाम सीबीएस वर मध्यरात्री गेलो .. ती त्याच ठिकाणी बसलेली होती .. सिगरेट घेवून मी तिच्याकडे पाहून ओळखीचे हसलो तशी एकदम तिचा चेहरा आक्रसला .. तिला ते आवडले नसावे हे समजले मला .. जरा दूर उभा राहून तिच्याकडे पाहत मी सिगरेट ओढत उभा राहिलो .. एक दोन वेळा तिची माझी नजर नजर झाली ..प्रत्येक वेळा तिने रागाने कटाक्ष टाकला माझ्यावर ..त्या काळी खादीचा रंगीत झब्बा ..जीन्स .. पायात कोल्हापुरी चपला दाढी वाढलेली ..असा माझा वेश असे ..अनेक लोक मला पत्रकार समजत.. तिलाही तसेच वाटले असावे म्हणून तिने मला एकदम काहीतरी टाकून बोलणे टाळले असावे .. मात्र रागाची नजर होतीच .. जरा गर्दी कमी झाली असे पाहून मी तिच्याजवळ आत्मविश्वासाने गेलो ..म्हणालो ' मला तुझ्याशी जरा बोलायचे आहे ..तुझी माहिती हवी आहे .. ' तशी पटकन म्हणाली ' मुलाखत घेताय व्हय माझी ??? ' मी पटकन हो असे म्हंटले ..मग म्हणाली ' काय करणार माझी माहिती घेवून ? .. पेपर मध्ये छापून देखील काही फायदा होणार नाही .. ' तिच्या बोलण्याला एक ग्रामीण धार होती ..कदाचित तिला माझ्या बद्दल आता जरा विश्वास वाटला असावा ..मग म्हणाली तुम्हाला थांबावे लागेल जरा ..पहाटे पाच पर्यंत ..चार वाजतच आलेले होते ..अजून एक तास होता ..चालेल.. म्हणालो मी ..बाजूलाच एका बाकड्यावर सिगरेट ओढत बसलो ..मध्ये ती एकदा उठून उभी राहिली ..आणि माझ्या लक्षात आले की तिचा उजवा पाय देखील अधू होता ... पोलियो झाल्यासारखा .. एका बाजूला झुकत लंगडत चालत होती ..बहुधा बाथरूम ला जात असावी ..मला म्हणाली ..जरा लक्ष ठेवा दुकानावर ..मी मानेनेच होकार दिला ..ती लंगडत गेली .. परत आल्यावर मी पुन्हा दोन सिगरेट घेतल्या ..या वेळी तिने माझ्याकडून जास्त पैसे घेतले नाहीत हे विशेष .. पाच वाजण्याच्या सुमारास तिने तिची पेटी आवरली .. मग म्हणाली बोला आता ..आधी जरा बाहेरच्या चहा टपरी वर चहा सांगून येते ..चहासाठी तिने लंगडत जाणे मला प्रशस्त वाटले नाही ..तिला तू थांब ..मी सांगतो चहा म्हणून चहा सांगून आलो ..स्टँड च्या बाहेर ची दुकाने आता उघडत होती .. चहा घेवून झाल्यावर म्हणाली ..माझी कहाणी इथे सांगत बसले तर गर्दी होईल .. लोक उगाचच माझ्या भोवती गोळा होतात .. माझ्या खोलीवर चला म्हणत तिने धड हाताने त्या पेटीला बांधलेली दोरी उचलली आणि खांद्याला टांगली ..माझ्याकडे दे ती पेटी असे मी स्त्री म्हणालो ..तर पटकन म्हणाली .' .रोज येणार आहत का माझी पेटी उचलायला ?? .ज्याचे मढे त्यालाच वाहायचे असते ..'

लंगडत चालत ती बाहेर आली ते पेटीचे ओझे होतेच सोबत ..एका मी तिच्या मागोमाग होतोच ..एका ऑटोवाल्याला तिने हात दिला ..आम्ही दोघेही बसलो .. कँनडा कॉर्नर च्या आधी दुकानांच्या मागे ..एक झोपडपट्टी होती तिथे तिने ऑटो थांबवली .. ..मी पैसे देवू लागलो तर तिने पुन्हा तोच डायलॉग मारला ' रोज देणार आहात का ??? ' झोपडपट्टीत चालत चालत आम्ही दोन तीन गल्ल्या पार करून एका पडक्या झोपडीपाशी उभे होतो .. पडकी झोपडी म्हणजे त्या झोपडीच्या वरील एका बाजूचे प्लास्टिक चे छत फाटलेले होते ..उघडीच होती झोपडी..आत शिरलो तर खूप कचरा साठलेला .. कोपऱ्यात एक गोधडी गुंडाळून ठेवली होती तिने पायाने गोधडी उलगडली न मला त्यावर बस म्हणाली .. मी बसलो ती पण गोधडीच्या कोपऱ्यात बसली .. मग म्हणाली बोला आता काय ते ..तुला हे असे अपंगपण लहान पानापासून आहे का ? ..' हो ..मला पोलिओ होता ..आठवते तेव्हापासून अशीच आहे लंगडी .. तुझे आईवडील कुठे असतात ..असे विचारले तर ..रडू लागली .. पुन्हा स्वतःला सावरले तिने आणि सगळे सांगू लागली .. मालेगाव येथील राहणारी .. आठवीपर्यंत शिक्षण झालेले ..वडील निम्नमध्यम वर्गीय .. चार वर्षाची असताना आई वारली .. मग वडिलांनी दुसरे लग्न केले ..सावत्र आई .. ' सावत्र ' या शब्दाला न्याय देणारी ...कजाग होती .. अश्या पोलीओने अधू झालेल्या अवस्थेतही हिला भांडी घासणे ..कपडे धुणे अशी कामे करावी लागत .. वर लंगडी म्हणून टोमणे होतेच ... जीव नकोसा होई .. मरणे जमत नव्हते .. अधून मधून डोळे पुसत ..ती बोलत होती !

( बाकी पुढील भागात )



=================================================

वासनेचा वणवा ! (पर्व दुसरे - भाग ३४ वा )


प्रथमदर्शनी सुंदर ...बोलताना कठोर ..तर चालताना दयनीय वाटणारी माधुरी जेव्हा आपल्या हृदयात लपविलेले दुखः सांगू लागली तेव्हा अतिशय करुण भासत होती .. बोलता बोलता मध्येच तिचा खालचा ओठ वाकडा होई ..आत मुडपला जाई .. श्वास अडकल्यासारखा होई... ती बाहेर पडू पाहणारा रडण्याचा उमाळा आवरण्याचा प्रयत्न करी ..मात्र क्षणातच बांध फुटून पाण्याचे लोट वाहावेत तशी ती भेसूर स्वरात रडू लागे .. तिने जे काही सांगितले ते एकून मनाची लाही लाही झाली माझ्या .. तिचे खरे नाव माधुरी नव्हे तर ' शीतल ' काहीजणांनी उगाच माधुरीसारखी सुंदर म्हणून तिला माधुरी म्हणायला सुरवात केलेली होती ....सावत्र आईचा जाच सहन करीत ..टोमणे.. शिव्या खात माधुरी घरकाम सांभाळून जमेल तशी शाळेत देखील जात होतील ..पोरीची जात आणि लंगडी म्हणजे आमच्या जीवाला घोर असे सारखे सावत्र आई तिला हिणवत असे ..बाप सावत्र आईच्या हातातील बाहुले बनलेला .. त्याला काही सांगायला जावे तर घरात अजून तमाशा होई ..म्हणून ही मुकाट्याने सारे सहन करीत होती....मी मलगी म्हणून जन्माला आले यात माझा काय दोष हा तिचा निरागस प्रश्न होता ..शिवाय मला मुलीची जात ..जीवाला घोर म्हणून ..टोमणे मारणारी सावत्र आई देखील एक ' स्त्री ' च आहे ..एक स्त्री दुसऱ्या ' स्त्री ' ला स्त्री त्वा बद्दल कशी रागावू शकते हे कोडेच होते तिच्या दृष्टीने .. असे सारे सहन करीत माधुरी मोठी झाली ..आठवीत गेली ..पोलिओमुळे एका पायाने आणि एका हाताने अधू असली तरी निसर्गाने आपले काम चोख केले होते .. वयात येताच माधुरीच्या अडचणी वाढल्या ..आई उगाचच ' बाहेर शेण खाशील ' असे म्हणू लागली ..तिच्या अधू पणाबद्दल एरवी तिची दया करणाऱ्या .. तिच्याबद्दल सहानभूती असणाऱ्या गल्लीतील ..नात्यातील .. शाळेतील पुरुष्यांच्या नजरा आता तिच्या सौंदर्याने दिपू लागल्या ..उगाचच मदत करण्याच्या बहाण्याने होणारे स्पर्श वाढले ..बाहेर पडायची भीती वाटू लागली ..!

सावत्र आईचा एक भाऊ उडाणटप्पू होता ..अर्धवट शिक्षण सोडलेले ..दारू ..जुगार वगैरेची दीक्षा घेतलेला ..तो जेव्हा जेव्हा बहिणीकडे येई तेव्हा ..हिचे लाड करी ..गोळ्या बिस्किटे देई ... त्याचीही नजर आता बदलली होती .. एकदा त्याने डाव साधला ..घरात कोणी नसताना .. अब्रूवर घाला घातला ..अधू मुलगी प्रतिकार कितीसा करणार ? .. नशिबाला दोष देत ही रडत बसली ... आल्यावर सावत्र आईला हे सांगितले तर आईने हिच्यावर विश्वास न ठेवता भावाची बाजू घेतली .. तू लंगडी उगाच माझ्या भावावर आळ घेतेस ..बाहेर कुठेतरी शेण खाल्लेस ..आता माझ्या भावाला यात गोवतेस म्हणून कांगावा करू लागली ....हिलाच मार पडला ..वर बाहेर कुठे बभ्रा करशील तर घरातून हाकलून देईन म्हणून धमकी मिळाली ..काही दिवसांनी पुन्हा तोच प्रकार .. तो आता चटावला होता ..आपले काहीही वाकडे होऊ शकत नाही याची खात्री झाली होती त्याची ...एकदा हा प्रकार सुरु असताना सावत्र आई घरात आली .. प्रकरण पाहून आरडाओरडा करू लागली ...माझ्या सोन्यासारख्या भावाला नासवले या लंगड्या सटवीने असे म्हणू लागली ..लोक गोळा झाले .. त्यांना आईने हिनेच माझ्या भावाला फशी पाडले असे सर्वाना सांगितले ..तो देखील बहिणीच्या बोलण्याला दुजोरा देत होता ....खूप मारले .घरातून हाकलून दिले रडत रडत ..लंगडत ...घराबाहेर पडली ..उघड्यावर आली ... मग पुढचे मात्र तिला बोलवेना .. आता रडून रडून अश्रूही आटले होते नुसतेच कोरडे हुंदके येत होते .. इतके सांगून झाल्यावर ती भकास मुद्रेने माझ्याकडे पाहू लागली .. पुढे काही ऐकायची माझ्यातही हिम्मत नव्हती ...उघड्यावर पडलेले ..राखण नसलेले ..मालक नसलेले पक्वान्न ... काय झाले असेल याची कल्पना करणे कठीण नव्हते .. !

वासनेच्या वणव्यात बिचारी होरपळून गेली होती .. कोणीतरी तिला इथे सीबीएस वर सिगरेट ..बिडी ..विकण्याची कल्पना दिली ..थोडेफार भांडवल दिले .. काही महिने इथे स्थिरावली ..तेव्हा जीवनात एक जण आला ..हिला सहानुभूती दाखवली .. लग्नाचे वचन दिले ..बिचारी हुरळून गेली ..त्याच्या सोबत त्याच्या झोपडीत राहायला गेली ..त्याच्या घरची मंडळी गावी होती .... दोन तीन महिने झाले तरी हा लग्नाचे नाव घेईना ...मग माझ्या घरचे लग्नाला परवानगी देणार नाहीत म्हणू लागला .. शेवटी काय ते समजली आणि पुन्हा सीबीएस वर आली .. लोक गोड बोलून कसा गैरफायदा घेतात याचा चांगलाच अनुभव असल्याने ती सर्वांशी तिरसट बोलण्याची कला शिकली ..तिची सिगरेट विकण्याची वेळ फक्त रात्री सुमारे १ ते पहाटे चार पाच अशी होती ..या काळात जरी ती महाग सिगरेट विकत असली तरी जेमतेम १०० ते २०० रुपयांचा गल्ला मिळे त्यात भांडवल वजा जाता .. तिला तीस चाळीस रुपये मिळत ..इतक्या पैश्यात भाड्याने चांगली खोली घेवून राहणे शक्य नव्हते म्हणून ती या पडक्या झोपडीत राहत होती .. झोपडीत कोणतीच भांडी दिसली नाहीत ..फक्त एका कोपऱ्यात छोटीशी फारशी बसवलेली दिसली .. बहुधा हिची मोरी होती..त्याचा कोपऱ्यात एक प्लास्टिकची बादली ..आणि प्लास्टिकचा मग होता .. वर आडव्या बांधलेल्या दोरीवर एक मळका ड्रेस व टॉवेल लटकत होता .. एकंदरीत तिच्या संसाराची कल्पना आली .. एका हाताने व पायाने अधू असल्याने अंघोळ करताना तिला सगळे अंग नीट घासता येत नव्हते म्हणून तिच्या मानेवर मळाची पुटे दिसली .. चहा ..जेवण बाहेरच होई ..जेवण म्हणजे मिसळ पाव ..वडा पाव ..सामोसे असेच काहीतरी .. तिच्या जवळ पेटीत एक ट्रांझिस्टर होता .. घरात असताना त्यावर लागणारी गाणी ऐकणे हाच विरुंगुळा...म्हणाली मला गाण्याची पण खूप आवड आहे ..त्यावेळी लागलेला माधुरी दीक्षितचा ' साजन ' पाच वेळा पहिला म्हणाली .. तिला जरा मूड मध्ये आणण्यासाठी मी गाणे म्हण एखादे असा आग्रह करू लागलो तर ..जिये तो जिये कैसे ..बिन आपके ' या गाण्याच्या चार ओळी म्हणून दाखविल्या तिने ..मग मला आग्रह करून तिच्यातर्फे एक सिगरेट पाजली ! सुमारे तीन तासांनी तिच्या झोपडीतून बाहेर पडलो तेव्हा बाहेर सगळी कडे जाग आलेली होती ..आठ वाजून गेलेले .. झोपडपट्टीतील लोक माझ्याकडे आश्चर्याने पाहत होते ..पुढे अनेकवेळा माधुरीला भेटलो ..तिला गौड सरांच्या ऑफिस ला देखील नेले होते ..!

( बाकी पुढील भागात )




=================================================


' हमाल भवन ' गुलटेकडी ! (पर्व दुसरे - भाग ३५ वा )


एके दिवशी मला ' सामाजिक कृतज्ञता निधी ' कडून कार्यकर्ता शिबिराला उपस्थित राहण्याविषयीचे पत्र मिळाले ..खाली श्री .नरेंद्र दाभोलकर यांची सही होती .. मलाही या शिबिराला उपस्थित राहण्याची उत्सुकता होतीच ..महाराष्ट्रात वेगवेगळ्या सामाजिक समस्यांसाठी पूर्णवेळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी झाल्या असत्या ..त्यांच्या कार्याची माहिती मिळाली असती ...दोन दिवसाच्या या शिबिराचे आयोजन ' हमाल भवन ' पुणे येथे करण्यात आले होते .. याच शिबिरात प्रत्येकाला आपापल्या कामाचा अहवाल देखील सुपूर्द करायचा होता .. ठरल्यानुसार ' हमाल भवन ' येथे पोचलो ..डॉ. बाबा आढाव यांच्या हमाल बांधवांच्या चळवळी बद्दल पूर्वी फक्त एकले होते .. मात्र प्रत्यक्ष हमाल भावनाची इमारत पहिली तेव्हा त्यांच्या कार्याची व्याप्ती लक्षात आली ..हमाल बांधवाना संघटीत करून ..त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांना प्रेरणा देणे .. आंदोलने करणे ..या माध्यमातून सुरु झालेले कामाने मोठे स्वरूप धारण केलेय हे जाणवत होते .. शिबिराला महाराष्ट्राचा विविध भागातून कार्यकर्ते आले होते .. वैशिष्ट्य म्हणजे सर्वांचे पोशाख अगदी साधे होते ..' ग्राउंड झिरो ' म्हणजे प्रत्यक्ष समस्याग्रस्त भागात ..समस्याग्रस्तांसाठी काम करणारे हे सारे कार्यकर्ते त्यांच्या कामाच्या विशिष्ट ध्येयाने झपाटलेले दिसले ..शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी डॉ . नरेंद्र दाभोलकर , निळू फुले , डॉ . श्रीराम लागू ..डॉ . बाबा आढाव , श्रीमती पुष्पा भावे आदि प्रभूती असणार होत्या .. हमाल ..कागद वेचणारे .. कपडे धुणे ..भांडी घासणे आदी घरकाम करणाऱ्या मोलकरणी ..अनाथ ..अंध ..अपंग .. दंगलग्रस्त .. अंधश्रद्धा निर्मुलन .. देवदासी निर्मुलन .. धरणग्रस्त विस्थापित ....आदिवासी .. पर्यावरण ..प्राणी संरक्षण ..अश्या विविध समस्यांसाठी काम करणारे हे कार्यकर्ते आपापल्या क्षेत्रात तज्ञ होते .. तरीही त्यांच्या वागण्या बोलण्यात अतिशय साधेपणा पाहून मी भारावून गेलो ..!

डॉ . नरेंद्र दाभोलकर यांनी प्रस्ताविक करून .. सर्वाना आपापली ओळख करून देण्यास सांगितले .. सामाजिक कृतज्ञता निधी चे मानधन घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा एकमेकांशी समन्वय असावा ..एकमेकांच्या कार्याची ओळख व्हावी हा देखील या शिबिराचा एक हेतू होता ..डॉ ,. नरेंद्र दाभोलकर बाबांचे( डॉ . अनिल अवचट ) मित्र म्हणून पूर्वी ' मुक्तांगण ' मध्ये असताना एकदा तेथे व्यसनमुक्तीच्या वाढदिवस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना मी त्यांना पहिले होते .. अतिशय कार्यक्षम ..सतत कार्यमग्न .. अशी त्यांची बाबांनी ओळख करून दिली होती तेव्हा .. त्यांनी ' मुक्तांगण ' च्या धर्तीवर सातारा येथे ' परिवर्तन ' व्यसनमुक्ती केंद्र सुरु केले होते .. त्या कार्यक्रमात डॉ . दाभोलकर फक्त व्यसनमुक्ती बद्दल थोडेसे बोलले होते ..मात्र या शिबिरात त्यांचे बोलणे ऐकून ..विविध सामाजिक समस्यांबद्दल असलेला त्यांचा व्यासंग समजला .. खादीचा साधा शर्ट ..आणि साधीच पँट असा वेश असणारे डॉ . दाभोलकर सामाजिक कृतज्ञता निधीच्या कामकाजात महत्वाचा सहभाग देतात हे लक्षात आले .. त्यांच्या प्रास्तविकात त्यांनी देशात असलेल्या विविध समस्यांवर प्रकाश टाकत .. त्या समस्यांसाठी पूर्णवेळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले .. धार्मिक ..जातीय ..प्रांतीय .. आर्थिक ..शैक्षणिक .. सांस्कृतिक ..अश्या वेगवेगळ्या विषमता असलेल्या समाजात समानतेसाठी .. न्याय हक्कांसाठी ..प्रबोधनासाठी .. तळमळीने काम करणारे कार्यकर्ते म्हणजे ' दीपस्तंभ ' असल्याचा त्यांनी उल्लेख केला ..डॉ . दाभोलकरांचे सर्वात मोलाचे कार्य म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचे ... समाजात असलेल्या विविध अंधश्रद्धा ..बुवाबाजी .. मंत्रतंत्र .. देवभोळेपणा या सर्व गोष्टींमुळे कसे शोषण केले जाते याचा त्यांचा अभ्यास गाढा होता ..प्रगतीचा ..विकासाचा .. समानतेचा मार्ग अनुसरून आपला देश अधिक समृद्ध कसा होईल ..देशाचा प्रत्येक नागरिक सर्वार्थाने विकास कसा करून घेवू शकेल या विचारांवर श्रद्धा ठेवावी असे सांगितले .

डॉ . दाभोलकर यांच्या नंतर डॉ . श्रीराम लागू बोलले .. मध्यंतरी त्यांच्या ' देवाला रिटायर करा ' या विधानाने बरीच खळबळ उडवून दिली होती .. त्यांनी देव या संकल्पाने बद्दल थोडक्यात परामर्श घेतला ..विविध धर्मानी सूचित केलेला देव अनेकदा लोकांना परावलंबी करतो .. देवावर विसंबून राहून लोक प्रत्यक्ष प्रामाणिक पणे कष्ट करून यश मिळविण्या ऐवजी नवस .. सायास करून .ढोंगी बुवा ..साधू ..चमत्कार करणारे भोंदू यांच्या नादी लागून स्वतचे शोषण करून घेतात .. तसेच काहीही पाप करा आणि तीर्थयात्रा करून ..गंगेत डुबकी मारून ..देवस्थानाला देणगी देवून ते पाप धवून काढा अशी वृत्ती बळावत चालल्याचे नमूद केले .. त्यांचे म्हणणे देवाला रिटायर करा याचा अर्थ देवावर विसंबून राहू नका अश्या अर्थाचे होते .. प्रत्येकाची श्रद्धा असतेच एखाद्या व्यक्तीवर ..विचारांवर .. कार्यावर .. मात्र जेव्हा श्रद्धेचे रुपांतर अंधविश्वासात होते तेव्हा माणूस बुद्धी गहाण ठेवतो हे देखील खरे होते ..मानवाने स्वतच्या शक्तीचा .. बुद्धीचा ..संपत्तीचा ..सामाजिक स्थानाचा अहंकार बाळगून इतर मानवांवर अन्याय करू नये ... आपल्या सगळ्या कर्माचा हिशोब कोठे तरी द्यावा लागेल .. आपल्या अनैतिक कृत्यांची कोणीतरी दखल घेतेय ....याची मनात नोंद ठेवून अनाचार करू नये या हेतूने तसेच .. भीषण संकटात .. आपत्तीत ..गंभीर आजार ..समस्या आल्या असताना कोणीतरी तारणहार आहे या विचाराने धीर मिळावा ....संकटांचा सामना करण्याची शक्ती मिळावी सुख -दुखः , आशा -निराशा .. जन्म -मृत्यू , या निसर्गनियमांचा स्वीकार करण्यास मनाची तयारी असावी या हेतूने कदाचित देवाची ..धर्माची निर्मिती झाली असावी .. परंतु जर ज्ञात विज्ञानाला अनुसरून आपण बुद्धीचा उपयोग केला नाही तर .. शोषण होते .. माणूस दैवाधीन वृत्तीचा बनतो .. अश्या प्रकारचे मनोगत त्यांनी व्यक्त केले .. त्यांचे बोलणे मुद्देसूद होते ..त्यानंतर निळू फुले बोलले .. त्यांनी विविध सामाजिक समस्यांबद्दल चिंता व्यक्त करून .. माणसाने सर्व प्रथम माणुसकी धर्माचे पालन केले पाहिजे असे सांगत ..जरी मी सिनेमात अन्याय करणाऱ्या .. दुष्ट ..स्वार्थी .. कपटी ..वासनांध अशी भूमिका करत असलो तरी व्यक्तिगत जीवनात मी निर्व्यसनी आहे तसेच सदाचारी आहे हे नमूद केले .. 

( बाकी पुढील भागात )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें