अनोखी प्रेमकहाणी ! (पर्व दुसरे -भाग २६ वा )
डॉ .मीना यांच्या प्रभावी आवाहनानंतर मग आपल्या व्यथा मांडण्याची जणू चढाओढच लागली .. बहुधा सगळ्यांच्या व्यथा सारख्याच होत्या ..आणि अपेक्षा एकच आम्हाला एक माणूस म्हणून तरी किमान सन्मान मिळायला हवा .. या पैकी काही महिला रस्त्यावर कोपऱ्यात उभ्या राहून किवा थियेटर च्या बाहेर उभ्या राहून व्यवसाय करणाऱ्या होत्या यांना स्ट्रीट ऑपरेटर्स असे म्हंटले जाते .. अश्या स्ट्रीट ऑपरेटर्स रस्त्यावर उभ्या राहून ग्राहक शोधात असत .. इच्छुक व्यक्तीशी संपर्क झाला कि मग त्याच्या सोबत एखाद्या हॉटेल मध्ये किवा तो नेईल त्या ठिकाणी जात असत ..अनेकदा याची फसवणूक केली जाई ..एक जण त्यांना घेवून त्याच्या ठिकाणी घेवून जाई व तेथे गेल्यावर एकाऐवजी चार पाच जण सक्तीने त्य महिलेचा उपभोग घेवून ..तिला योग्य मोबदला न देता हाकलून दिले जाई... अश्या वेळी तिने कोणाकडे तक्रार करायची ? .. तसेच रस्त्यावर उभ्या राहिल्या की आसपासचे दुकानदार अशा महिलेला माझ्या दुकानासमोर उभी राहू नकोस म्हणून हाकलून लावत .. अचकट ..विचकट बोलत . ..त्या नुसत्या जरी रस्त्यावर उभ्या राहिल्या तरी पोलीस त्यांच्यावर ..सार्वजनिक ठिकाणी अश्लील इशारे करणे ..अशा प्रकारचे कलम लावून केस करत असत किवा मग पैसे उकळले जात .. काही महिलांना ग्राहक दारू पिण्याची सक्ती करत असत .. ग्राहकाचे ऐकले नाही तर धंदा कसा होणार म्हणून त्यांना दारू घ्यावी लागे ...काही जण गुदासंभोगाची अपेक्षा करत असत .. पोटासाठी ते देखील सहन करावे लागे ... प्रत्येकीची व्यथा दाहक होती .. या महिलांच्या बोलण्यानंतर त्यांना धीर देवून संमेलनाची सांगता झाली .. किमान आपले म्हणणे कोणीतरी साहेब लोकांनी ऐकून घेतले हे तरी समाधान त्यांना नक्कीच मिळू शकले ...!
' सफेद गल्ली ' येथे आम्ही कार्यकर्ते आठवड्यातून किमान एकदा तरी जावून या महिलांच्या भेटी घेवून वारंवार त्यांना कंडोम वापरला प्रोत्साहित करत असू .. या ठिकाणी आम्हाला एक मुलगी भेटली ..साधारण पंचविशीची असावी .. सावळी..कृश बांध्याची .. नेहमी आजारी असल्यासारखा चेहरा करून ती एका कोपऱ्यात बसून राही .. तिला कधी नट्टा पट्टा करून इतर महिलांसोबत हास्यविनोद करताना आम्ही पाहिले नव्हते .. तिच्या कडे रोज दुपारी एक जण डबा घेवून येई .. ते दोघे एकत्र जेवत आणि मग तो माणूस निघून जाई ... कुरळे केस ..चांगला धडधाकट ...दिसायला बरा या सदरात मोडणारा हा तरुण तिशीचा होता .. त्याची चौकशी केल्यावर कळले कि तो एका हॉटेलात वेटर म्हणून काम करतो ..या जोडीबाबत आम्हाला अतिशय कुतूहल होते ..एकदा न राहवून आम्ही विचारलेच त्या मुलीला... साधना असे तिचे नाव म्हणूयात आपण .. साधना मराठवाड्यातील एका खेड्यातील मुलगी बारावी पर्यंत शिकलेली होती ..निम्न मध्यमवर्गीय घरातील .. बारावीत असताना तिचे गावातीलच एका मुलासोबत प्रेम संबंध जुळले .. जातीची अडचण आली म्हणून घरातून या प्रेम संबंधाना विरोध झाला .. शेवटी त्याने तिला पळून जाण्याचा प्रस्ताव दिला ..एके दिवशी दोघे घरातून पळून मुंबईला गेले ..सोबत तिने घरातून काही पैसे देखील चोरून नेले होते .. मुंबईला एका परवडेल अश्या हॉटेल मध्ये जेमतेम तीन चार दिवस राहिल्यानंतर ..का कोण जाणे त्या मुलाने साधनाला तशीच हॉटेल मध्ये सोडून देवून पलायन केले ..भानावर आली तेव्हा सर्व संपले होते .. आता परत गावी जाणे शक्यच नव्हते ..कारण सर्व गावात बदनामी झालेली होती .. आपल्या मुळे कुटुंबियांना त्रास नको ..म्हणून तीने परत घरी जायचा मार्ग स्वीकारला नाही .. एकाने हिला मुंबईहून पुण्याला आणले .. पुण्यात 'बुधवार पेठ ' येथे विकले .. हिला बिचारीला आता काहीच पर्याय उरला नव्हता ..तेथे काही दिवस शरीर विक्रय केल्यावर तिची तब्येत बिघडली ..तपासण्या केल्यावर समजले की ती एच .आय .व्ही पाँझिटीव्ह झालीय .. आभाळच कोसळले होते .. सगळ्या वस्तीला हे माहित पडल्यावर तिच्याकडे कोणी ग्राहक फिरकेना ..मग ती नवीन जागी जावे म्हणून नाशिकच्या ' सफेद गल्लीत ' आली ..तिला आजाराचे महत्व समजले होते म्हणून ती ' कंडोम ' शिवाय कोणाला बसू देत नसे ..नाशिक मध्ये या वेटर ची तिची ओळख झाली त्याचे नाव अरुण ..अरुण विवाहित होता ..मात्र विवाहानंतर पाच वर्षात त्याची पत्नी अपघातात गेलेली होती ..त्याला एक लहान मुलगा देखील होता ..अरुण पत्नीच्या मृत्युनंतर शरीर संबंधांच्या गरजेपोटी सफेद गल्लीत येत असे .. निर्व्यसनी .. प्रामाणिक पणे हॉटेल मध्ये वेटर म्हणून नोकरी करणारा अरुण जेव्हा साधनाच्या सहवासात आला तेव्हा ...ती करत असलेला कंडोम चा आग्रह पाहून त्याला जरा कुतूहल वाटले .. त्याने विश्वासात घेवून विचारले तेव्हा साधनाने त्याला सर्व कहाणी सांगितली .. !
साधनाची कहाणी ऐकून अरुणच्या मनात तिच्याबद्दल प्रेमभाव जागृत झाला .. ती एच .आय .व्ही ,बाधित आहे हे माहित असून देखील अरुणने तिच्याशी लग्न करायची तयारी दर्शविली ..मात्र साधनाने माझ्यासारख्या शरीरविक्रय करणाऱ्या तसेच एच .आय .व्ही बाधित महिलेशी लग्न करणे म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे असे सांगून अरुणला लग्नाला नकार दिला ..शेवटी असा पर्याय निघाला की साधनाने ' सफेद गल्ली ' येथेच रहावे ..अरुण तिला रोज भेटत होता ..तिच्यासाठी तो घरी स्वैपाक करून दुपारी जेवण घेवून येई .. दोघे नवराबायको सारखे एकत्र जेवत ..मग दुपारी अरुण हॉटेल मध्ये कामाला जाई .. अजबच होते सगळे ..आम्ही एकदा अरुणला देखील गाठले ..त्याला साधनाकडून आमच्या बदल माहिती समजली असावी ..तो देखील मोकळेपणी बोलला .. म्हणाला लग्न नंतर पत्नी चार वर्षाच्या मुलाची जवाबदारी माझ्यावर टाकून निघून गेलेली .. शारीरिक भूक भागविण्यसाठी येथे यावे लागले ..साधनाशी ओळख झाल्यावर ..तिची कहाणी ऐकून तिच्याबद्दल मनात प्रेम आणि करुणा दोन्ही निर्माण झाले ..तिच्याशी लग्नच करणार होतो ..पण ती लग्नाला तयार नाही ..म्हणून रोज एकदा तरी तिला भेटायला येतो ..साधना पुढे अधिक आजारी पडत गेली ..तिच्या मानेवर टी.बी,च्या गाठी आल्या ..तेव्हा अरुणने तिला शासकीय दवाखान्यात भारती केले ..तिच्याजवळ थांबून तिची सृश्रुषा केली .. मात्र वर्षभरातच साधना गेली .. अरुणने शेवट पर्यंत तीला साथ दिली होती .. पुढे एकदा एका गर्दुल्ल्या मित्राच्या घरी फॉलोअपला गेलो होतो तेव्हा त्याच गल्लीत अरुण भेटला ..तो तिथे जवळच राहत होता ..आग्रहाने मला घरी घेवून गेला .. घरात त्याचा छोटा मुलगा देखील होता .. अगत्याने चहा केला ..माझे लक्ष भिंतीवरच्या फोटोंकडे गेले .. एक फोटो अरुण आणि त्याच्या बायकोचा होता लग्नाच्या वेळचा ..आणि बाजूला दुसरा फोटो होता ..साधनाचा .. दोन्ही फोटोला हार घातले होते .. मी मनातल्या मनात अरुणला सलाम केला !
( बाकी पुढील भागात )
===================================================
शापित .....? ? ? ? ? ? (पर्व २ रे - भाग २७ वा )
' एड्स ' संदर्भात कार्य करताना ..संबंधित असलेल्या सगळ्या घटकांची आपोआप माहिती मिळत गेली मला .. लैंगिकतेशी संबंधित आजार असल्याने लैंगिक संबंधांचे सारे वैध ..अवैध प्रकार मला माहित होत गेले .. विभिन्न्न लिंगी आकर्षण हे नैसर्गिक मानले जाते ..परंतु एका पुरुष्याने दुसऱ्या पुरुष्याशी लैंगिक संबंध ठेवणे किवा एका स्त्री ने दुसऱ्या स्त्री शी लैंगिक संबंध ठेवणे हा प्रकार आपल्या देशात तरी अनैतिक या सदरात मोडतो ..काही लोकांच्या दृष्टीने तर हा प्रकार अतिशय किळसवाणा मानला जातो ..आठवीत असताना एकदा NCC च्या दोन दिवसांच्या कँम्प ला गेलो होतो तेव्हा ..रात्री मी झोपेत असताना .. शरीरावर कोणाचा तरी हात रेंगाळतोय असे जाणवले होते .. तो हात नको तिथे जावू लागताच मी पटकन उठून बसलो आणि शिव्या घातल्या बाजूच्या थोराड मुलाला ..तो खजील होऊन बाजूला सरकला होता ..मोठा होत गेलो तसा याबाबत काही ऐकीव माहिती गोळा होत गेली ..त्यामागची शास्त्रीय कारणे जरी नीट समजली नव्हती तरी एकंदरीत हा प्रकार समजायला मदत मिळाली .. काही लोकांना मूलतः असे आकर्षण असते .. काही वेळा याचे कारण लैंगिक उपासमार असू शकते ...किवा हार्मोन्स मधील असंतुलन ... विशिष्ट मानसिकता ...वयात येताना योग्य लैंगिक माहितीचा अभाव हे देखील एक कारण असू शकते .. नाशिकरोडला असा एक माणूस आम्हाला माहित होता ..जो विवाहित होता ..त्याला मुलेबाळे होती ..हा गृहस्थ सार्वजनिक मुतारीच्या आसपास रेंगाळायचा नेहमी ..आणि कोणी मुतारीत गेले कि त्याच्या बाजूला उभा राहून निरीक्षण करायचा ..तो म्हणे आपले सावज हेरत असे .. त्याला म्हणे आधी एखाद्या पुरुषाने त्याच्या सोबत गुदा मैथुन केल्याशिवाय लैंगिक उत्तेजना येत नसे ..अश्या प्रकारच्या व्यक्तीला टपोरी भाषेत 'अठ्ठा..म्हणजे आठ नंबरचा ' ' रिव्हर्स गियर ' असे म्हणतात हे असे आकर्षण बहुधा लहान वयात इतर पुरुष्यांकडून लैंगिक शोषण केले गेल्यामुळे निर्माण होत असावे ..म्हणजे लहानपणी जर समलैंगिक संबंधांचे आकर्षण असणाऱ्या एखाद्या माणसाकडून मुलाचे लैंगिक शोषण केले गेला तर .त्या मुलाला लैंगिक संबंध म्हणजे असेच असते असे वाटू लागते ..पुढे वयात आल्यावर जरी हार्मोनल बदलांमुळे तो पूर्ण पुरुष होत गेला तरी ..सुप्त मनात समलैंगिक संबंधांचे आकर्षण उरतेच .. त्याला त्याला लैंगिक उत्तेजना येण्यासाठी म्हणे आधी कोणातरी पुरुश्याशी लैंगिक संबंध करावे लागतात त्याशिवाय त्याला उत्तेजना येत नाही ..हि मानसिकता खरे तर शास्त्रीय मानसिक उपचारांनी बरी होऊ शकते मात्र त्यासाठी समस्या असलेल्या व्यक्तीने लैंगिक उपचार तज्ञाकडे जायला हवे ....यात अक्टीव आणि पँसीव्ह असे दोन प्रकार आहेत .. पहिल्या प्रकारात असा संबंध करून घेण्याची आवड असते ..तर दुसऱ्या प्रकारात असा संबंध करण्याची आवड असते ..टपोरी भाषेत ' मारून घेणे ' हा पहिला प्रकार तर ' मारणे ' हा दुसरा प्रकार असे म्हणता येईल थोडक्यात काय तर ..लहान मुलीच नव्हे लहान मुलांचे देखील शोषण होऊ शकते... .त्यामुळे त्यांच्यावर ही लक्ष ठेवणे गरजेचे आहे !
पुढचा प्रकार तर केवळ लैंगिकतेचा अतिरेक या सदरात मोडणारा असतो याला हेट्रो सेक्सुयल किवा बायो सेक्सुयल असे म्हणतात अश्या लोकांना केवळ स्त्री शी संबंध करून समाधान होत नाही म्हणून एकाच वेळी स्त्री आणि पुरुष हे दोघेही सोबत असतात आणि ही व्यक्ती दोघांशीही त्याला वाटेल त्या प्रकाराने संबंध ठेवते .. लैंगिक स्वातंत्र्य या सदराखाली असे प्रकार सध्या वाढत आहेत ...त्या नंतरचा चा प्रकार हार्मोनल असंतुलना मुळे अथवा विशिष्ट मानसिकते मुळे तयार होतु शकतो ज्याला ' होमोसेक्शुअल ' किवा ' लेस्बियन ' असे म्हणतात ..पुरुष्याला पुरुश्याशी संबंध ठेवण्याचेच आकर्षण आढळते किवा एखाद्या स्त्री ला स्त्री शी संबंध ठेवण्यास आवडते .. या संबंधाना कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून प्रयत्न सुरु आहेत अश्या लोकांचे ..अर्थात तत्वतः असले प्रकार मान्य असले तरी सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीकोनातून विचार केला असता अशी कायदेशीर मान्यता मिळणे कठीणच आहे .. पुढचा अतिशय दुर्दैवी प्रकार आहे तो म्हणजे ' हिजडा ' किवा ' छक्का ' ... काही मुलं जन्मत:च हिजडा म्हणून जन्माला येतात, अशी आपल्याकडे समजूत आहे. पण हे अजिबात खरं नाही. हिजडा कसा तयार होतो, याची शास्त्रीय कारणं समजून घेणं गरजेचं आहे. गर्भधारणा होताना .X क्रोमोझोम्स एकत्र आले तर मुलगी आणि X व Y क्रोमोसोम असले तर मुलगा हे समीकरण आता सगळ्यांना माहीत आहे. मात्र पहिले सहा आठवडे लिंगाचं स्वरूप मुलगा आणि मुलगी दोघांतही सारखंच असतं. त्यानंतर क्रोमोझोन्स विशिष्ट जनुक कार्यान्वित होतो. त्यातून जननेन्द्रिय विकसित व्हायला सुरवात होते बहुसंख्य वेळा हि नैसर्गिक प्रक्रिया गर्भात सुरळीत होते ...मात्र काही ठिकाणी यात गडबड होते गर्भ पुरुष असेल तर त्याची पुरुष जननेंद्रिये योग्य प्रकारे विकसित होत नाहीत किवा जरी जननेंद्रिये जरी विकसित झाली तरी लिंग पुरुष्याचे व मानसिकता मात्र स्त्री ची असते काही काही ठिकाणी उलटेही होते .. अश्या तृतीय पंथी लोकांना सामाजिक सृष्ट्या उपेक्षित जीवन वाट्याला येते .. रामायणात यांच्या संदर्भात एक गोष्ट अशी आहे की प्रभू श्रीराम जेव्हा वनवासात जायला निघाले तेव्हा त्यांना सर्व अयोध्यावासी वेशी पर्यंत निरोप द्यायला आले होते ..शेवटी रामचंद्रांनी सर्व स्त्री पुरुष्यानी आता आपल्या घरी जावे असे सांगितल्यावर सर्व आपापल्या घरी निघून गेले मात्र जे स्वतः आपण स्त्री आहोत कि पुरुष आहोत हे ठरवू शकत नव्हते असे लोक तेथेच उभे राहिले .. श्रीराम वनवासातून येईपर्यंत ते तेथेच होते ..१२ वर्षांनी परत आल्यावर त्यांना तेथेच उभे पाहून श्रीरामांना गहिवरून आले ..त्यांनी यांना वर दिला कि तुम्ही दिलेला आशीर्वाद नेहमी फळाला येईल ..तेव्हापासून जरी यांच्या आशिर्वादाला किवा शापाला महत्व प्राप्त झाले असले तरी यांचे सामाजिक स्थान मात्र उपेक्षितच राहिले ...!
असे लोक जरी लैंगिक दृष्ट्या अपूर्ण असले तरी बौद्धिक ....शारीरिक व इतर बाबतीत सर्व सामान्यांसारखे असतात ... मात्र सामाजिक दृष्ट्या उपेक्षित असल्याने यांना काही कामधंदा मिळणे दुरापास्त आहे .. अर्थात म्हणून हे लोक लग्न ..बारसे ..व इतर मंगल कार्याच्या ठिकाणी जावून भिक मागतात .. त्यांच्या बाबत प्रचलित असलेल्या कथेमुळे लोकही त्यांच्या आशीर्वाद शुभ मानून त्यांना पैसे देतात ..यातील काही लोक मात्र जरा लालची प्रवृत्तीचे आढळतात ते हवे तेव्हढे पैसे मिळावेत म्हणून किळसवाणे हावभाव करतात ..टाळ्या वाजवणे ..अश्लील वाटावेत असे अंगविक्षेप करणे ..हे प्रकार करून अनेकदा हे लोक सार्वजनिक ठिकाणी भिक देण्यासाठी जबरदस्ती करतात .. अश्या लोकांमुळे हि जमात अधिक बदनाम होते आहे ..आताश्या तर काही लोकांनी भिक मागण्याचा यशस्वी पर्याय म्हणून अश्या मुद्दाम साड्या नेसून ..स्त्री सारखे हावभाव करून हे ' नकली हिजडा ' बनणे सुरु केले आहे .. खरे तर हे लोक शारीरिक श्रम करू शकतात ..त्यामुळे नोकरी धंदा करू शकतात ..मात्र सामाजिक उपेक्षेमुळे त्यांना हे करता येत नाही .. ! सध्या विकसित असलेल्या विज्ञानामुळे अशी विरोधी मानसिकता असलेले लोक लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून घेतात .. पुरुषी मानसिकता असलेल्या स्त्रिया शारीरिक सृष्ट्या देखील पुरुष बनतात तर स्त्री ची मानसिकता असलेले पुरुष शारीरिक दृष्ट्या देखील स्त्री बनू शकतात ... एकंदरीत विज्ञान हे या लोकांसाठी वरदान ठरलेले आहे ..लैंगिकता हा आपल्या जीवनातील महत्वाचा भाग आहेच ...मात्र केवळ लैंगिकता म्हणजेच जीवन नव्हे हे लक्षात घेतले तर या पैकी अनेक गोष्टीत बदल होऊ शकेल असे वाटते
( बाकी पुढील भागात )
=================================================
अरुण दाते यांची भेट ! (पर्व दुसरे -भाग २८ वा )
नाशिक मध्ये मी स्थिरावत असताना ... ' आझाद सेना ' सुरु करण्यास पुढाकार घेणारा ..क्रांतिकारी विचारांचा माझा मित्र विलास पाटील हा पुन्हा माझ्या संपर्कात आला .. त्याचे विचार अजूनही तसेच क्रांतिकारी होते .. मात्र वयपरत्वे तो थोडा मवाळ झाला होता ..मी व्यसनमुक्त असलेला पाहून त्याला खूप आनंद झाला ..तो देखील आता नाशिक रोड सोडून नाशिकला सिडको वसाहतीत राहायला आला होता त्यामुळे तो नियमित भेटू लागला .. त्याच्या सोबतीने मी इतर कामांसोबतच नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात देखील वावरू लागलो .. परशुराम सायखेडकर नाट्यगृहात होणारे काव्यसंग्रहाचे प्रकाशन समारंभ ..सार्वजनिक वाचनालयातर्फे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम .. वगैरे ठिकाणी जावू लागलो होतो .. त्यानेच जयविजय सासीणे ( निपाणीकर ) नावाच्या वाल्लीशी माझी ओळख करून दिली ..हा जयविजय प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करत होता ..अतिशय संवेदनशील ..हुशार .. निर्व्यसनी ..सामाजिक प्रश्नांबद्दल अत्यंत जागरूक असणारा .. वयाच्या तिशीतच ' आदर्श शिक्षक ' हा पुरस्कार मिळवलेला ..याने आधी msw केले मग MA.b.ed केलेले होते ..याला देखील साहित्याची आवड . ..अफाट वाचन मध्यम उंची ..सावळा वर्ण .. चेहऱ्यावरून एकदम शांत वाटणारा ..मात्र बोलू लागला ध्यानात येई की हे पाणी वेगळेच आहे ..जयविजयशी देखील माझी पटकन मैत्री जमली होती .. माझ्या पूर्व आयुष्याबद्दल ऐकून असल्यामुळे ..तो नेहमी माझी व्यसनमुक्ती टिकविण्यास मला मदत करी .. तो देखील त्याच्या सामाजिक कार्याच्या आवडीमुळे डॉ. गौड यांच्या कार्यात सहभागी झालेला होता .. त्याची नाशिकच्या साहित्यिक स्तरात चांगली ओळख होती ..एकदा त्याने माझी भेट श्री .वसंत पोतदार यांचेशी घालून दिली ..वसंत पोतदार हे एक बेदरकर व्यक्तिमत्व ..स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावर आधारित ' योद्धा संन्यासी ' हा कार्यक्रम ते गेली अनेक वर्षे सादर करीत आले होते ..गावोगाव भटकून तरुणांमध्ये स्वामी विवेकानंदांचे विचार रुजविण्यासाठी हा कार्यक्रम करीत असत .. खणखणीत उच्चार ..स्पष्ट वाणी .. ओघवते वक्तृत्व ..आणि आक्रमक शैलीत सादर केलेले ' योद्धा संन्यासी ' हे एकपात्री कथन पाहणे हा एक रोमांचक अनुभव होता .. वसंत पोतदार त्यावेळी नाशिक मध्ये स्थायिक झालेले होते ..माझी स्टोरी ऐकून त्यांनी नाशिक च्या 'दैनिक ' देशदूत ' मध्ये ब्राऊन शुगरच्या भयानक परिणामांबद्दल तसेच या समस्ये बद्दल लिहायचे ठरवले ..ते माझ्यासोबत गर्दच्या आहारी गेलेल्या मुलांना भेटले ..त्यांची माहिती घेतली व ' गर्द चे गारदी ' या नावाने त्यांनी ' देशदूत ' मध्ये लेखमाला लिहिण्यास सुरवात केली .. लेखमालेच्या सुरवातीला त्यांनी व्यसनमुक्तीचा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख देखील करून दिली होती .. माझी माहिती सांगत असताना मी त्यांना ' मुक्तांगण ' मध्ये दाखल होण्याच्यावेळी कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेले व श्री .अरुण दाते यांनी गायिलेले ' या जन्मावर ..या जगण्यावर शतदा प्रेम करावे ' या गाण्याने कशी प्रेरणा दिली हे सांगितले ..तसेच हे गाणे टर्कीत असताना अनघाच्या मांडीवर डोके ठेवून किमान ५० वेळा एकूण टर्की सहन केली हे सांगितले होते .. !
एकदा वसंत पोतदार यांचा मला निरोप आला कि तू सायंकाळी सहा वाजता ' कालिदास 'नाट्यगृहात मला भेट ..त्यानुसार मी त्यावेळी व्यसनमुक्त राहत असलेल्या अजित सोबत ' कालिदास ' ला गेलो तर तेथे श्री .अरुण दाते यांच्या ' शुक्रतारा ' या कार्यक्रमाचे पोस्टर लागलेले होते ..खूप गर्दी होती कार्यक्रमाला आवारातच मला श्री. वसंत पोतदार भेटले ..माझीच वाट पाहत होते ..त्यांनी मला सरळ आत मेकअप रूम जवळ नेले ..आणि मला बाहेर उभा ठेवून आत गेले .. बाहेर येताना त्यांच्या सोबत प्रत्यक्ष अरुण दाते होते .. उंच ..टक्कल पडलेले .. गहिरे घारे डोळे .. तेजस्वी मुद्रा .. हिरवा झब्बा त्यांच्या गोऱ्या वर्णाला खुलून दिसत होता .. वसंत पोतदार यांनी बहुतेक श्री अरुण दाते यांना माझ्याबद्दल आधीच सांगितले असावे .. त्यांनी माझ्याशी हस्तांदोलन केले .. मला म्हणाले आजचा कार्यक्रम पहा तुम्ही .. त्यांनी कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी आमची बसायची व्यवस्था समोरच्या रांगेत केली .. कार्यक्रम सुरु झाला .. दातेसाहेब त्यांची एकसे एक गीते सादर करीत होते .. श्री. अरुण दाते म्हणजे मराठीतील ' तलत महेमूद ' होते माझ्या मते .. हृदयाला भिडणारा आर्त स्वर .. मध्यंतरानंतर त्यांनी एकदम माईक वरून माझे नाव पुकारले व मला स्टेजवर बोलाविले .. मी आधी गोंधळलो ..माझे नाव यांनी का पुकारले असावे या विचारातच स्टेजवर गेलो .. मग त्यांनी श्रोत्यांना माझी ओळख करून दिली .आणि मला ' या जन्मावर ' गाण्याबद्दलचा अनुभव सांगण्याची विनंती केली ..मी सर्व श्रोत्यांना या गाण्याचा माझ्या व्यसनमुक्तीची प्रेरणा टिकविण्यात असलेला सहभाग सांगितला तसेच .. टर्कीत प्रेयसीच्या मांडीवर डोके ठेवून हे गाणे ऐकताना आलेला अनुभव सांगितला ..सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला ..मग अरुण भैयांनी मला त्यांच्या बाजूला बसवून घेतले ..आजचे गाणे तुषारला समर्पित असे म्हणत ' या जन्मावर ' हे गाणे गाण्यास सुरवात केली .. अत्यंत रोमांचक अनुभव होता तो माझ्यासाठी ..माझ्या आवडत्या गायकाच्या शेजारी बसून त्याने मला समर्पित केलेले गाणे ऐकण्याचा .. माझा खूप मोठा सन्मान होता तो !
नंतर पुन्हा एकदा ' शुक्रतारा ' चा कार्यक्रम असताना श्री . अरुण दाते यांनी मला बोलावून घेतले .. त्यांनी मला ' या जन्मावर ' या गाण्याबद्दल चा अनुभव लिहून देण्याची विनंती केली ..ते त्यांचे जीवनचरित्र लिहिण्याच्या विचारात होते त्यात त्यांना माझा अनुभव घालायचा होता .. माझे नाव छापले तरी हरकत नाही असे मी त्यांना सांगितले मात्र त्यामुळे तुझ्या कुटुंबियांना त्रास होऊ शकतो म्हणून त्यांनी तुझे नाव न लिहिता हे मी माझ्या पुस्तकात छापीन असे मला सांगितले .. सहा महिन्यातच श्री . अरुण दाते यांचे ' शतदा पेम करावे ' नावाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले त्यात एका प्रकरणात मी त्यांना सांगितलेला माझा अनुभव व मी त्यांना त्या बदल लिहून दिलेले पत्र प्रकाशित झालेले होते . ते पुस्तक मला श्री . वसंत पोतदार यांनी भेट म्हणून दिले .
( बाकी पुढील भागात )
================================================
हर एक जिस्म घायल..हर एक रूह प्यासी ! (पर्व दुसरे -भाग २९ वा )
नाशिक मध्ये व्यसनमुक्तीचे कार्य करताना माझ्या संपर्कात आलेला कादर हा ब्राऊन शुगरचा व्यसनी आता नियमित मिटींग्सना येत होता .. त्याची आणि माझी घट्ट मैत्री झाली लवकरच .. तो देखील माझ्या सोबत डॉ.गौड यांच्या ' एड्स ' जागृतीच्या कामात सामील झाला होता ..त्याला मुक्तांगण च्या बाहेर पडून त्याला एक महिना होऊन गेला होता ..अतिशय हुरहुन्नरी असा कादर नेहमी हसतमुख दिसे ...जरासा लहानखुरा वाटणारा .. दाउद इब्राहीम सारख्या जाड मिशा..बहुधा पांढरा किवा त्याच्या जवळपास पोचणारा फिकट रंगाचा शर्ट ..शक्यतो काळी पँट अश्या वेशातील कादर नेहमी सावली सारखा माझ्या सोबत वावरू लागला ..तो मराठी अतिशय उत्तम बोलत असे फक्त त्याच्या मराठी उच्चारांमध्ये हिंदीची झलक अनुभवायला मिळे.. मला भेटेपर्यंत त्याच्या मुक्तांगण च्या किमान १० अँडमिशन होऊन गेल्या होत्या ..मी ' मुक्तांगण ' च्या पहिल्या उपचारानंतर चांगला राहू लागलो होतो आणि कादरने मात्र आतापर्यंत दहा वेळा उपचार घेतले होते .. इतका हुशार कादर..वारंवार रीलँप्स का होतो हे माझ्या दृष्टीने एक कोडेच होते ..एकदोन वेळा मी त्याला पुन्हा पुन्हा कशी प्यायला सुरवात झाली हे विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने हसून उत्तर टाळले होते .. एकदा तो माझ्या जवळ येवून बसला व म्हणाला ' आज खूप एकटे वाटते आहे ..साला पुराने दिनोकी याद बहोत तकलीफ देती है ' ..कादरची भेट झाल्यापासून त्याला इतका गंभीर मी पहिल्यांदाच पहात होतो ..जरा खोदून विचारल्यावर म्हणाला ' क्या करेंगे यार तुम्हे बताकर ... हर एक का अपना रोना है ..अपना झगडा है किस्मत के साथ ' मी चिकाटीने त्याच्या पाठीमागे लागलो तेव्हा समजली त्याची व्यथा .. कादरला दोन भाऊ आणि एक बहिण ..हे कुटुंब मूळ कच्छी मुसलमान .. कादर पेक्षा दोन वर्षांनी एक मोठा भाऊ ..तर एक भाऊ व बहिण त्याच्यापेक्षा लहान ..कादर पाच वर्षांचा असतानाच वडील एकदा रागाच्या भरात त्याच्या आईला ' तलाक ' देवून घर सोडून निघून गेलेले .. मग कादरच्या मामाने पदरात चार मुले असलेल्या बहिणीचा सांभाळ करायला सुरवात केली ..गुजरात मधून स्थलांतर करून मग हे कुटुंब नाशिकच्या भद्रकाली विभागात स्थायिक झाले .. मामाची मदत असली तरी ती पुरेशी नव्हती म्हणून कादरच्या आईने लहानमोठी कामे करायला सुरवात केली .. ती घरी बिड्या वळण्याचे काम करू लागली .. कादरला हे सर्व समजायला लागले तेव्हा वडिलांबद्दल त्याच्या मनात राग बसला ....नुसते ' तलाक ' म्हणून वडील आपल्या आईला सोडून ..मुलांची जवाबदारी टाळून कसे काय निघून जाऊ शकतात हे कोडे त्याला उलगडत नव्हते ..अभ्यासातील लक्ष उडाले ..दहावीनंतर शिक्षणाला रामराम करून तो आई सोबतच विड्या वळण्याचे ..तसेच विड्यांच्या कारखान्यात हमालीचे काम करू लागला .. तेव्हाच कोणीतरी त्याला सांगितले की भांग खावून काम केले तर माणूस लवकर थकत नाही ..हमालीचे काम करताना थकायला होऊ नये म्हणून कादरने भांग खाण्यास सुरवात केली ..मग गांजाही आलाच ..दारू क्वचित दारू घेणेही सुरु झाले ..
वयात आल्यावर कादरने हमाली सोडून स्वतचा व्यवसाय सुरु करण्यासाठी उधार पाचशे रुपयांचे भांडवल घेवून ..बिडी ..तंबाखू ..सिगरेटस वगैरे माल घाऊक भावात घेऊन सायकल वरून पानठेल्या वाल्यांना विकायला सुरवात केली ..गोड बोलणे .. मनमिळावू स्वभाव यामुळे लवकरच व्यवसायात जम बसू लागला .. मग त्याने भद्रकाली च्या भाजी मार्केट समोर एक छोटेसे दुकान भाड्याने घेतले व तेथे बसून होलसेल भावात सिगरेट ..बिडी ..तंबाखू विकू लागला ..एव्हाना मोठा भाऊ देखील पदवीधर होऊन कादरच्या मदतीला आला होता ..माझ्यासारखीच गांजाच्या अड्ड्यावर त्याची ब्राऊन शुगरशी ओळख झाली .. ब्राऊन शुगर पिणे देखील सुरु झाले ..दरम्यान त्याच्या दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एका हिंदु मुलीसोबत कादरचे प्रेम संबंध जुळले ...साथ जियेंगे ..साथ मरेंगे च्या आणाभाका झाल्या .. मात्र जेव्हा त्या मुलीच्या घरच्या लोकांना जेव्हा कुणकुण लागली तेव्हा यांच्या भेटीत अडथळे निर्माण होऊ लागले .. मुलीच्या बाहेर जाण्यावर बंधने लादली गेली ..मात्र तरीही एकदोन वेळा कुटुंबियांचा डोळा चुकवून ती मुलगी कादरला भेटली..ते देखील कुटुंबियांना कळले ..मग आपल्या मुलीला समजावून ..मारझोड करून ..काही फायदा नाही हे समजल्यावर एक दिवस त्या मुलीची आई कादरला भेटली .. विनवणी केली ..त्यामुलीला तीन लहान बहिणी होत्या .. एका मुलीने असे केले तर ..बाकीच्या बहिणींची देखील लग्ने होणे कठीण होईल .. समाजात आम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही हे सांगितले ..अतिशय संवेदनशील असलेल्या कादरला त्या माउलीचे बोलणे पटले ..त्याने तिच्या आईला तुमच्या मुलीला या पुढे भेटणार नाही असे वचन दिले ..काही दिवस या जागेतून दूर जावे म्हणून दुकान मोठ्या भावावर सोपवून भद्रकाली भागात जाणे टाळू लागला..दोन तीन वेळा त्यामुलीने भेटायचा निरोप देवूनही भेटायला गेला नाही .. त्याच काळात रिकामपणामुळे ... प्रचंड भावनिक संघर्षामुळे ब्राऊन शुगरचे व्यसन वाढले .. इकडे दोन महिन्यातच घरच्या लोकांनी त्या मुलीचे लग्न उरकले .. ती मुलगी सासरी गेल्यावर कादर पुन्हा दुकानात जाऊ लागला ..तो पर्यंत व्यसन वाढले होते .. मग दुकानातले लक्ष उडाले ..पैसे कमी पडू लागले .. कादरचे असले वर्तन पाहून दुकान मोठ्या भावाने ताब्यात घेतले .. कादरला जेमतेम खर्चापुरते पैसे मिळू लागले .. मग तो स्वतच्याच दुकानात चोऱ्या करू लागला ..मुक्तांगण बद्दल माहिती मिळाल्यावर भावाने त्याला मुक्तांगण मध्ये उपचारांसाठी दाखल केले .. मात्र एकदा व्यसनाची गुलामीची अवस्था आली की व्यसन कायमचे बंद ठेवणे सोपे नसते ..कादरचे तसेच झाले ..काही दिवस व्यसनमुक्त राहिल्यावर जुने मित्र ..जुन्या आठवणी ..जुन्या जखमा ..जुन्या व्यथा उफाळून आल्या की कादरचे पिणे पुन्हा सुरु होई ..त्याने सुरु केलेले लहान दुकान नंतर बंद करून भावाने जवळच एक मोठे दुकान सुरु केले .. भद्रकालीतील बिडी ..तंबाखूचे मोठे होलसेल दुकान म्हणून प्रगती झाली ..घरची आर्थिक स्थिती सुधारली ..पण कादर वाया गेला ..ती मुलगी जेव्हा जेव्हा माहेरी येई तेव्हा काही दिवस कादर खूप अस्वस्थ राही ..स्वतच तिच्या आईला दिलेल्या वचनात अडकला होता..एकीकडे त्यामुलीवरचे प्रेम आणि दुसरीकडे तिच्या आईची विनवणी त्या कुटुंबाची अगतिकता .. मोठाच पेच होता .
कादरला जेव्हा मी म्हंटले की तू त्या मुलीच्या आईला असले वचन द्यायला नको होते ..म्हणजे मग त्या मुलीशी तुझे लग्न होऊ शकले असते .. त्यावर तो म्हणाला ' यार अपनी माँ और उसकी माँ मे मै फरक नाही समझता .. माँ- बाप बहोत कष्ट उठाकर बच्चो को बडा करते है .. अपना पेट काटकर ..अपनी इच्छा मारकर बच्चो का सुख देखते है .. जब बच्चे बडे हो जाये ...और वो अगर माँ बाप कि इच्छाका सन्मान नही करेंगे तो बहोत बुरा लागता है उन्हे ' कादरने जरी त्यामुलीच्या आईच्या भावना समजून घेवून आपल्या प्रेमाचा त्याग केला होता तरीही ...हा त्याग पचवणे त्याला जड जात होते ..स्वतचे वडील आईला आणि आपल्याला वाऱ्यावर सोडून निघून गेलेले .. तरीही त्याला त्या मुलीच्या आईवडिलांच्या भावनांची काळजी होती .. आमचे बोलणे झाल्यावर कादर मोकळेपणी हसला माझ्याकडे पाहून म्हणाला तुने गुरुदत्त का वो गाना तो सुनाही होगा ' हर एक जिस्म घायल ..हर रूह प्यासी ..निगाहो मे उलझन ..दिलो मे उदासी ..' मी देखील हसलो त्याच्या हातावर टाळी दिली .. कादर जरी समाजाच्या नजरेत एक व्यसनी ..वाया गेलेला होता तरी मला त्याच्या आत एक सच्चा माणूस गवसला होता !
( बाकी पुढील भागात )
==================================================
आ बैल ..मुझे मार ! (पर्व दुसरे -भाग ३० वा )
दर बुधवारी व शनिवारी रोटरी क्लब हॉल येथे फॉलोअप च्या मिटींग्सना नियमित येणाऱ्या लोकांची संख्या आता वाढत चालली होती ..माझी व्यसनमुक्तीची दोन वर्षे पूर्ण होऊन गेलेली असल्याने मी नाशिक मध्ये चांगलाच स्थिरावलो होतो ..कादर ...अजित ..अभय ..अनिल ..राजेंद्र ..दिगंबर वगैरे आणि व्यसन सुरु असलेले तरी मिटिंग न येवून स्वतची व्यसनमुक्तीची इच्छा कायम ठेवणारे देखील काही जण मिटिंगला येत असत ...नाशिक प्रमाणेच संगमनेर येथून देखील दारू व गर्द चे व्यसनी मुक्तांगण ला दाखल होऊन गेलेले असल्याने मँडमनी मला संगमनेर येथे देखील महिन्यातून एकदा फॉलोअप ला जाण्यास सांगितले होते .. त्यानुसार महिन्यातून एकदा संगमनेर ला जावून मी तेथील लोकांना भेटत होतो ..ज्यांच्या सोबत मी पूर्वी व्यसन करत होतो अश्या जुन्या जिगरी मित्रांना भेटण्याचे मात्र शक्यतो टाळत होतो ..कारण असे मित्र भेटल्यावर व्यसन केल्याच्या जुन्या आठवणी जागृत होऊन मी गडबड करण्याची शक्यता आहे हे माझ्या लक्षात आले होते ... मिटींग्स न आलेले अनेक जण मला कधी कधी तुमच्याशी एकांतात बोलायचे आहे असे म्हणून मला आपल्या अडचणी सांगत असत ..मला जमेल तसे मी त्यांना समुपदेशन करत असे .. काही घरगुती वाद असतील ..गैरसमज असतील ते ते दूर करण्यसाठी त्यांच्या कुटुंबियांना भेटून त्यांनाही समुपदेशन करीत असे..एकदा राजेंद्र मिटिंगला आल्यावर खूप वैतागलेला दिसला ..म्हणाला ' दारू प्यायची खूप इच्छा होतेय .. कितीही चांगले वगले तरी घरचे लोक विश्वास ठेवत नाहीय ..वगैरे ' मी त्याला सांगितले कि इतका लवकर कुटुंबीय विश्वास ठेवणे कठीण असते .. कारण पूर्वी अनेक वेळा आपण त्यांच्या विश्वासघात केलाय ..खोट्या शपथा घेतल्यात .. वचने मोडली आहेत .. आपल्या वर्तनाने कळत..नकळत आपण कुटुंबियांना खूप त्रास दिलाय ..तेव्हा किमान एकदोन वर्षे आपण सातत्याने व्यसनमुक्त राहिलो तरच पुन्हा घरच्यांचा विश्वास संपादित करता येईल .. मात्र त्या दिवशी अनिल खूपच रागात होता ..
त्याला घरून एक व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल हवे होते ..आणि त्याचा लहान भाऊ व वडील त्याच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते .. राजेंद्र त्यावरून घरात भांडून मिटिंगला आलेला होता ..आठ वाजता मिटिंग संपल्यावर आम्ही एकमेकांचा निरोप घेवू लागलो तेव्हा राजेंद्र म्हणाला आज घरी जावेसे वाटत नाहीय अजिबात ..जर घरी गेलो तर पुन्हा माझे भांडण होईल .. राजेंद्रचे कुटुंब नाशिकरोड मधील एक प्रस्थापित कुटुंब होते ..राजकारणात देखील त्याच्या कुटुंबियांचा चांगला दबदबा होता .. कॉलेज जीवनापासून वाया गेलेल्या राजेंद्रने पूर्वी अनेक भानगडी केलेल्या होत्या मात्र प्रत्येक वेळी कुटुंबियांच्या नाशिक मधील असलेल्या दबदब्या मुळे तो पोलीस केस वगैरे पासून वाचला होता .. राजेंद्रचे बोलणे ऐकून .. त्याला खरोखर व्यसनमुक्त राहायची इच्छा आहे हे मला जाणवले ..आज रात्री मी घरी गेलो तर परत भांडणे होतील आणि मी दारू पिवू शकतो ही त्याची भीती रास्त होती..पण रात्री तो कुठे मुक्काम करणार हा देखील प्रश्न होता .. त्याच्याशी गप्पा मारत मारत मग आम्ही सी .बी.एस च्या एस .टी स्टँड वर आलो ..रात्रीचे नऊ वाजून गेलेले होते .. इतर जण घरी जायला निघाले..फक्त अजित , मी व राजेंद्र उरलो होतो .राजेंद्र ला एकटे सोडणे योग्य ठरले नसते म्हणून मग आम्ही त्याच्या सोबत गप्पा करत तेथेच बसलो ..बाराच्या सुमारास अजीत देखील झोप आली म्हणून घरी निघून गेला .. त्याकाळी मला देखील झोप येत होती .भूकही लागली होती ..पण राजेंद्रला एकटे सोडावेसे वाटेना .. आमच्या दोघांच्या खिश्यात मिळून फक्त पाच रुपये होते .. त्या दिवशी रात्रभर आम्ही सी.बी.एस वर चहा घेत गप्पा मारत आम्ही रात्र काढली .. मुक्तांगण मधून बाहेर आल्या पासून प्रथमच मी असा रात्रभर घरच्यांना न सांगता बाहेर थांबलो होतो .. अर्थात चांगल्या कामासाठी .. त्या काळी मोबाईल नसल्याने मला घरी निरोप देखील देता आला नाही .. सकाळी राजेंद्र म्हणाला आता मी जातो घरी ..आता माझा राग शांत झालाय .. त्याल निरोप देवून घरी गेलो तर आई काळजी करत होती तिला सर्व प्रकार सांगितल्या वर म्हणाली ' हे असे नेहमी करत गेलास..तर तुझे व्यसन सुरु व्हायची भीती आहे ' मी मात्र आपण राजेंद्रला मदत केली या समाधानात होतो .
संगमनेरचे एक जरा वयस्क गृहस्थ देखील आठवड्यातून किमान एकदा तरी मिटिंग साठी खास संगमनेर हून येत असत .. ते मुक्तांगणहून उपचार घेवून परत आल्याला दोन महिने उलटून गेले होते .. त्यांचे नाव महेश होते ..वय साधारण ५५ वर्षे होते त्यांचे .. सरकारी नोकरीतून ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेली .. शेतीवाडी होती चांगली .. मुलेही मोठी झालेली .. वयाने मोठे असल्याने आम्ही सर्व त्यांना महेशभाऊ असे संबोधत होतो ..एकदा महेशभाऊ देखील मला तुमच्याशी एकांतात बोलायचे आहे असे म्हणाले ..मी त्यांना घेवून जरा लांब जावून बसलो .. मग ते म्हणाले मी व्यसनमुक्त आहे मात्र आता मला माझी पत्नी नीट साथ देत नाहीय ..आधी मला ते नेमके काय म्हणत आहेत ते समजले नाही ..मी म्हणालो ' अहो उलट पत्नीने इतकी वर्षे तुमचे व्यसन सहन केलेय .. तिला खूप त्रास झालाय ..उलट सध्या तुमची पत्नी आणि मुलेच तुमचे खरे हितचिंतक आहेत ..ते तुम्हाला प्रेम ..जिव्हाळा देतात म्हणूनच तुम्ही व्यसनमुक्त आहात ' या वर महेशभाऊ हसून म्हणाले ' अहो ..नुसते प्रेम काय चाटायचेय .. माझी पत्नी गेल्या दहा वर्षापासून मला लैंगिक संबंधात साथ देत नाहीय .. दारू पिताना हे फारसे जाणवत नव्हते ..मात्र आता व्यसनमुक्त राहताना हि लैंगिक संबंधांची ओढ मला खूप अस्वस्थ करते ..मात्र पत्नी झिडकारते मला ' त्यांची ही समस्या ऐकून मी विचारात पडलो ..यांना नेमके कसे समजवावे हे कळेना .. मी त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान ..तसेच अविवाहित होतो .. शक्यता अशी होती पत्नीचे देखील वय सुमारे ५० वर्षे होते त्यामुळे तिची ' मेनापाँझ ' ( मासिक धर्म संपुष्टात येणे )ची अवस्था उलटून गेली असल्याने तिला शरीर संबंधात रस उरला नसावा ..किवा घरात मोठी मुले असल्याने तिला आता ते नकोसे होत असेल ..अशीही एक शक्यता होती की तिला पूर्वीची यांची दारू पिण्याची अवस्था आठवून असे संबंध ठेवण्यास पती जवळ आला की ' नॉशिया ' येत असावा . कारण बहुधा स्त्रियांना दारूचा वास आवडत नाही व पूर्वीचे यांचे ताल आठवून ती जाणीवपूर्वक दूर राहत असावी ...नेमके काय कारण असेल ते समजू शकत नव्हते ..मी महेश भाऊंना धीर देत म्हणालो ' अहो ..हळू हळू सगळे सूरळीत होईल ..तुम्ही तुमची व्यसनमुक्ती टिकवून ठेवा फक्त ' या वर ते म्हणाले सर्व हळू हळू सुरळीत होईपर्यंत मी पूर्ण म्हातारा झालेला असेन हो ... ' यावर मी चूप बसलो ... आपण पुढच्या मिटिंगला सविस्तर बोलू म्हणून मी त्यांना निरोप दिला ... ते परत पुढच्या मिटिंगला आले तेव्हा तीच तक्रार करू लागले ..म्हणाले ' त्यापेक्षा दारू प्यायलेले परवडेल मला .. जर पत्नी असेच वागणार असेल तर ' ..मला या गृहस्थाचे आश्चर्य वाटले .. लैंगिक संबंधासाठी हा या वयात इतका उतावीळ कसा हे समजेना ..त्यांच्या आनंदाच्या सर्व कल्पना लैंगिकतेशी जोडल्या होत्या त्याने .. लैंगिकता म्हणजे सगळे जीवन नसते .. तो या वयात स्वतःला वाचन ..लेखन .. संगीत ...अध्यात्मिकता .. अश्या छंदात गुंतुवून ठेवू शकला असता .. मी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे समजविण्याचा प्रयत्न केला ..मात्र त्यांचा हेका एकच होता .कसेही करून तुम्ही काहीतरी पर्याय शोधा .. मी हा विषय त्यांच्या पत्नीशी उघड बोलणे शक्यच नव्हते ..कारण ती संगमनेर सारख्या छोट्या गावात राहणारी जुन्या वळणाची ..विचारांची स्त्री असणार .. मी जरी शरीरविक्रय करणाऱ्या महिलांशी लैंगिक संबंध या विषयावर उघड चर्चा करत असलो तरी ..एखाद्या विवाहित ..संसारी आणि वयस्क महिलेशी या बाबत बोलणे मला जमले नसते हे नक्की .. ! महेश भाऊ तर एकदम घाईला आलेले.त्यांच्या या ' कामातुर' पणाचे मला मनातून हसू देखील येत होते ..बहुधा ' म्हातारचळ ' यालाच म्हणत असावेत ..शेवटी एकदा ते मला म्हणाले की जावू दे ..पत्नी गेली खड्ड्यात ..मला दुसरीकडे कुठेतरी आता माझी सोय करावी लागणार .. त्यांचा रोख स्पष्ट होता ..मग मी देखील म्हणालो ..हो चालेल तुम्ही योग्य ते काळजी घेवून करा काय हवे ते .. तर म्हणाले पण मला ' सफेद गल्लीत ' जायला भीती वाटते ..तेथे नेहमी पोलिसांची धाड येते म्हणे .. हे देखील खरे होते त्यांचे ..
( बाकी पुढील भागात )
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें