बुधवार, 12 जून 2013

रंग मनाचे !


' टर्की ' त लागलेले लग्न ! (पर्व दुसरे -भाग २१ वा )


अजितची आणि माझी मैत्री व्हायला वेळ लागला नाही ..थोड्याफार फरकाने आमची कहाणी सारखीच होती .. मी मग अजितला ' मुक्तांगण ' मध्ये उपचार घेण्यास तयार केले .. तुषार जर चांगला राहू शकतो तर आपणही नक्कीच चांगले राहू या विचाराने त्याने माझे ऐकले असावे .. अजितला त्याच्या भावाने मुक्तांगण मध्ये दाखल केले .. मिटिंगला अगदी पहिल्यांदा मी ज्याला समुपदेशन केले होते तो अभय देखील नियमित येत होता ..पाहता पाहता त्याच्या व्यसनमुक्तीचे चार महिने पूर्ण होत आले होते ..फॉलोअप करताना अनेक घरे मला सापडत नसत ..कारण काही लोकांचे पत्ते बदलले होते ..त्यात एकाचा पत्ता सापडायला खूपच शोधाशोध केली पण व्यर्थ ..त्याचे नाव होते कादर .. या कादरच्या मुक्तांगण मध्ये माझ्याही आधी म्हणे एकूण १० अँडमिशन झालेल्या होत्या .. त्याला भेटण्याची मला का कोण जाणे खूप उत्सुकता होती ..कदाचित लागोपाठ १० वेळा उपचाराला दाखल झालेला प्राणी किती हट्टी असेल हे मला पहायचे असावे .. एकदा असाच सायंकाळी रोटरी क्लब हॉल वर मिटींगच्या वेळेच्या जरा आधीच जावून बसलो असताना ..एक मध्यम उंचीचा ..दाट केस ..जाड मिश्या .. पांढरा शर्ट ..काळी पँट ..अशा वेशातील हसतमुख चेहऱ्याचा साधारण तिशीचा दिसणारा तरुण ...हात एक चिट्ठी घेवून माझ्यासमोर उभा राहिला .. ' तुषार नातू आपणच का ? ' शुद्ध मराठीत तो बोलू लागला .. मी त्याला होकार दिला ..तसा लगेच माझ्या बाजूला बेंच वर बसला अगदी जुना मित्र असल्यास्रखा बोलू लागला ..' या वेळी मी ठरवले कि नक्की व्यसनमुक्त राहायचे .. मँडमनी मला येथील रोटरी हॉल मध्ये तुषार नातू असतात ..त्यांना नियमित भेट असा सल्ला दिलाय .. मी परवा ..मुक्तांगण मधून डिसचार्ज झालो ..काल दिवसभर खूप बोर झालो घरात बसून .. केव्हा मिटिंग ला जाऊन तुम्हाला भेटतो असे झाले होते ..मला .. बरे झाले तुम्ही भेटलात ..' अतिशय बडबड्या प्राणी वाटला हा ...मी त्याला तुझे नाव काय असे विचारले तर म्हणाला ' कादर ' ..म्हणजे मी ज्याचे घर मनापासून शोधात होतो तोच प्राणी माझ्या समोर होता .. मला आनंद झाला ..त्याला म्हणालो मी तुमचे घर खूप शोधले .. सापडले नाही मला ..पत्ता बदलला आहे का ? ..त्यावर त्याने हात पुढे करून टाळी घेतली माझ्याकडून .. हो ..घर बदलले आमचे ..आता स्वतचे मोठे घर घेतलेय भावाने माझ्या ..तिथेच राहायला गेलोय दोन सहा महिन्यांपासून .. कादरशी माझी गट्टी जमायला वेळ लागला नाही .. !

कादर भद्रकालीतील सर्व गर्दुल्ल्याना ओळखत होता .. तो स्वतःला गमतीने ' पुराना पापी ' म्हणून घेत असे ... कादरने यावेळी गंभीरतेने व्यसनमुक्त राहायचे ठरवले होते ..त्यामुळे मी त्याला सांगितले की तू जर जास्तीत जास्त वेळ माझ्यासोबत घालविला तर अधिक चांगले ..म्हणजे तू पुन्हा जुन्या मित्रांमध्ये जाणार नाहीस ..तुझा वेळ देखील सत्कारणी लागेल ..त्या नुसार मग कादर रोज सकाळी मला भद्रकाली पोलीस स्टेशनच्या बाहेर भेटू लागला ..तेथून आम्ही दोन चार ठिकाणी फॉलोअप करून मग ..डॉ . गौड यांच्या कार्यालयात जात असू .. कादर मराठी चांगले बोलत असे .. दहावी पर्यंत शिकलेला होता मात्र अतिशय सुसंस्कृत असा वागत असे .. त्याचे सामान्य ज्ञान ..विनोदबुद्धी .. हजरजवाबीपणा हे गुण वाखाणण्याजोगे होते .. आता कादर ..अभय ..मी ..एक मुक्तांगण मधून आलेला अल्कोहोलिक संदीप असे चार जण नियमित एकमेकांना भेटत होतो .. अजित मुक्तांगण मधून उपचार घेवून आल्यावर तो देखील आमच्यात सामील झाला ..मेरी मध्ये देखील ' लोकशाही मित्र ' या आमच्या सामाजिक संस्थेचे सदस्य वाढत होते .. मी नेहमी लोकशाही मित्र च्या वार्ताफलकावर छान छान सुविचार लिहून लोकांना आकर्षित करत असे .. मेरीतील बहुतेक सर्व तरुण मला ओळखू लागले होते ..मी पूर्वाश्रमीचा व्यसनी आहे हे कधीच लपवत नसे ..याचे लोकांना आश्चर्य वाटे ..एकदा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला मेरीतील ई टाईपच्या क्वार्टर्स मधील मित्रमंडळाने मला तेथे प्रमुख अतिथी म्हणून देखील बोलावले होते .. आम्ही मराठी तरुण इंग्रजी भाषेबाबत जरा घाबरून असतो ..किवा मराठी माध्यमातून शिकल्यामुळे त्याला इंग्रजी बाबत न्यूनगंड असतो ..त्यामुळे तो मुलाखतीत कमी पडतो .. त्याला अधिक आत्मविश्वास मिळावा म्हणून ' लोकशाही मित्र ' तर्फे ' इंग्लिश स्पिकिंग ' चे क्लासेस सुरु केले ..एका इंग्रजी माध्यमातून शिकविणार्या शिक्षिकेला आम्ही यासाठी गळ घातली ..सामाजिक कार्य म्हणून अगदी अल्प म्हणजे फक्त २० रुपये महिना इतक्या फी मध्ये त्या शिक्षिका इंग्रजी बोलणे शिकवू लागल्या ..या क्लासला तरुण मुला मुलींचा चांगला प्रतिसाद मिळू लागला होता .. व्यसनाधीनते बाबत जनजागृती म्हणून एकदा मेरी तील सर्व लोकांसाठी आम्ही मेरी चे त्यावेळचे चीफ इंजिनियर श्री .परांजपे साहेब यांची परवानगी घेवून ...सांस्कृतिक भवनात पथनाट्य देखील सदर केले ..एकंदरीत छानच चालले होते माझे ..!

अजित मुक्तांगण मधून उपचार घेवून आल्यावर काही दिवस चांगला राहिला ..त्याच्या घरच्या मंडळीनी त्याचे लग्न देखील ठरविले .. मात्र लग्न अगदी पंधरा दिवसावर आले असताना अजितने गडबड केली .. त्याचे पिणे परत सुरु झाले .. तो पिणे सुरु झाल्यावर मला देखील टाळू लागला .. हे स्वाभाविक होते ..परत पिणे सुरु झाल्यावर व्यसनी आपल्या चांगल्या मित्र .शुभचिंतक यांना टाळू लागतो ..कारण त्याला अपराधी वाटत असते हे एक कारण आहे ..दुसरे कारण असे की पिणे सुरु झाल्यावर त्याला व्यसनमुक्ती बाबत काही चांगले ऐकावेसे वाटत नाही .. हा व्यसनाधीनता या आजाराचा धूर्त पणाचा भाग आहे ..अजितचे तसेच झाले होते ..मी त्याच्या घरी जाण्याच्या नेमका काही वेळ आधीच तो घरातून निघून जात असे ..मग एकदम मध्यरात्रीच परत येई .. त्याच्या घरी गेल्यावर त्याचे आई वडील ..मला गळ घालत कि लग्न तोंडावर आलेय आणी हा असा वागतोय ..आता लग्न मोडता देखील येत नाहीय ..याला कसेही करून समजावा तुम्ही ..लग्नाच्या आठ दिवस आधी तर अजित घरातून तीन दिवस गायब होता .. सगळीकडे शोधाशोध सुरु झाली ..मला एका गर्दुल्या कडून बातमी कळली कि अजित दुसऱ्या एका गर्दुल्या सोबत त्याच्या शेतात गेलाय ..तेथे तो टर्की काढून मग व्यसनमुक्त होऊन येणार आहे ..हा अजितचा जरी चांगला विचार होता ..तरी लग्न जवळ आले असताना ..घरच्या लोकांना न सांगता गायब होणे खचितच योग्य नव्हते .. शेवटी अजित तीन दिवसांनी परत आला .. मात्र त्याचे व्यसन काही बंद होऊ शकले नव्हते ..एकट्याच्या बळावर व्यसनमुक्ती केंद्राची मदत न घेता ..असे व्यसनमुक्त राहणे फार कमी लोकांना जमते ..अजितला जमले नाही ..आता लग्न तीन दिवसांवर आले होते .. अजितच्या वडिलांनी मला गळ घातली कि कसेही करून याला व्यसन करण्यापासून थांबवा .. हे जरा अवघडच काम होते ..मी मला माहित असलेल्या ..माझा आदर करणाऱ्या गर्द विक्रेत्यांना.. कोणीही अजितला गर्द विकत देवू नका असे सांगितले ..मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही ..अजित दुसऱ्या कोणाकडून तरी गर्द मागवीत असे .. लग्नाच्या आदल्या दिवशी अजितला मी पहाटे सहा वाजताच घरी जावून पकडले .. तेथपासून ते लग्न लागून वर वधू कार्यालय सोडेपर्यंत मी अजित जवळ सावली सारखा वावरत होतो ..त्याच्याजवळ थोडाफार माल होता ..त्या दिवशी मी त्याला अजिबात बाहेर पडू दिले नाही .. त्यानेही माझे ऐकले हे विशेष .. मला समजले होते कि अजितने लग्नाच्या दिवशी त्याला माल आणून द्यावा म्हणून तों तीन मित्रांजवळ पैसे देवून ठेवले होते .. लग्नाच्या दिवशी मी ..कादर ..अभय मिळून कार्यालया बाहेर फिल्डिंग लावली ..कोणीही गर्दुल्ला आत प्रवेश करणार नाही ..अजित पर्यंत पोचणार नाही म्हणून डोळ्यात तेल घालून पहारा ठेवला .. इकडे लग्नाचे विधी सुरु होते ..अजितला सकाळपासूनच टर्की सुरु झाली होती ..त्याच्या डोळ्यातून पाणी येत होते ... सगळे अंग दुखत होते .. तो सगळे विधी सुरु असताना तो खूप आशेने दाराकडे पाहत होता कि कोणीतरी गर्दुल्ला माल घेवून येईल ..पण इकडे मी कडक बंदोबस्त ठेवलेला .. अजितला हे समजले होते कि तुषार आज आपल्याला माल मिळू देणार नाही .. तो कधी रागाने तर कधी केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पाही ..मलाही त्याची दया येत होती ..त्याची टर्की पाहून असे वाटले एकदा कि जाऊ दे याला एखादी पुडी पिवूदे ..पण अजितच्या वडिलांना मी वचन दिले होते की अजितला मी लग्नाच्या दिवशी व्यसनमुक्त ठेवीन .. कादरला देखील माझा हा निर्णय आवडला नव्हता ..त्याचे म्हणणे असे होते कि लग्न हा आनंदाचा समारंभ ..आयुष्यात एकदाच येतो ..अशा वेळी अजितला टर्कीत ठेवणे म्हणजे त्याच्यावर अन्याय आहे ..माझा देखील नाईलाज होता .. शेवटी टर्कीत असतानाच अजितचे सात फेरे झाले ..लग्न लागले ! एकदाचे लग्न लागल्यावर आम्ही निर्धास्त झालो .. अजितला अजूनही आशा होती कि कोणी त्याला माल आणून देईल म्हणून मात्र तसे आम्ही होऊ दिले नाही ..अगदी शेवटी ..वधू वर घरी निघण्याच्या वेळी अजित माझ्या कानाशी लागून म्हणाला ' साले .. अब तेरे दिलकी तसल्ली हो गई ना ? ' मी नुसताच हसलो ..मग तो पुढे म्हणाला ..' तुषार ..मी इतका वेळ तुझ्या शब्दाला मान देवून चूप बसलो ..मात्र आता लग्न लागून गेलेय .. तू माझ्या वडिलांना दिलेले वचन पाळले ..मी इतका त्रास होत असताना देखील तुला सहकार्य केले ..आता माझी रात्रीची सोय मात्र झालीच पाहिजे ' ..मलाही त्याची दया आली ..मी कादरला सांगून मग अजितला माल आणून दिला !

( बाकी पुढील भागात )

======================================================



रंग मनाचे ! (पर्व दुसरे -भाग २२ ) 


अजित लग्नानंतर १५ दिवसांनी ..बायको माहेरी गेल्यावर परत ' मुक्तांगण ' ला दाखल झाला ..कादर देखील आता मला नियमित भेटत असे .. स्वतची व्यसनमुक्ती टिकविण्यासाठी तसेच अनघाच्या दूर जाण्याचे दुखः विसरण्यासाठी मी स्वतःला ..लोकशाही मित्र .. मुक्तांगण .. डॉ. गौड .. या सर्व कामात अखंड गुंतवून ठेवले होते .. मात्र तरीही जुन्या आठवणी एखादेवेळी भूता सारख्या मानगुटीवर बसत .. त्यावेळी झोप येत नसे ..मग उगाचच कूस बदलत राही ..असे दोन तीन दिवस अवस्थतेचे जात .... या काळात खूप निराश वाटे ....कोणत्याच गोष्टीत मन रमत नसे ..सारखे जुन्या आठवणींचे काटे मनाला घायाळ करत असत ..एकदा मी अश्या निराश अवस्थेत मँडमना पत्र लिहिले ..त्यात अनघाशिवाय जगणे व्यर्थ आहे असे वाटते .. माझ्यावर अन्याय होतोय असे वाटते ..इतरांचे जीवन माझ्यापेक्षा अधिक सुखी आहे अशी तुलना होते .. पुन्हा व्यसन सुरु होईल कि काय याची भीती वाटते वगैरे लिहिले होते .. आश्चर्य असे की मँडमनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून आवर्जून वेळ काढून माझ्या पत्राचे उत्तर दिले .. त्यांचे पत्र म्हणजे लेखी समुपदेशनाचा एक उत्तम नमुना होता .. त्या पत्राचा आशय असा होता ' तुषार प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ठराविक काळाने असे निराशेचे विचार येतात .. सर्व सामान्य लोक अशा वेळी काही दिवस आपले मन.. नेहमीचे रुटीन सोडन दुसऱ्या कोणत्यातरी गोष्टीत गुंतवतात .. हा काळ व्यसनी व्यक्ती साठी अधिक सावधगिरी बाळगण्याचा असतो ..अश्या मानसिक अवस्थेत आपले व्यसन पुन्हा सुरु होण्याचा धोका टाळण्यासाठी .. वाचन .. लेखन .. आपले छंद याकडे जास्त लक्ष द्यायचे असते ..कोणाशीही कसलेही वाद घालण्याच्या भानगडीत पडायचे नाही ..तुझ्या सारखाच प्रत्येक व्यक्तीच्या मनाचा एक कप्पा अतिशय हळवा असतो ..तेथे एखादी अनघा किवा एखादा तुषार असतो ..काहीतरी न मिळू शकल्याची ..काहीतरी गमावल्याची ..उपेक्षितपणाची..अपराधीपणाची किवा जगणे व्यर्थ होत असल्याची भावना उगाचच जीवापाड सांभाळून ठेवणारा हा मनाचा कप्पा देखील ...आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे हे स्वीकार कर ...आमच्या दृष्टीने तुझे छान चालले आहे .. तू देखील स्वतच्या कामातून आनंद मिळव .. नाहीतरी शेवटी जीवन म्हणजे शेवटी वजा -बाकी चाच एक खेळ आहे .. जे मिळू शकले नाही त्याचे दुखः करत बसण्यापेक्षा .. जे मिळतेय ते टिकव..वाढव .. म्हणजे सगळे सुरळीत होईल ! मँडमचे ते पत्र माझ्यासाठी खूप प्रेरणा दायी होते 

सामाजिक कृतज्ञता निधीचे मला मिळणारे ५०० रुपये मानधन परस्पर माझ्या पुण्याच्या मुक्तांगण ने उघडलेल्या बँकेच्या खात्यात जमा होत होते .. कुटुंबीय मी व्यसनमुक्त राहतोय यात आनंद मानून होते ..मात्र सर्व सामान्य लोकांसारखे सुरळीत आयुष्य हा कधी जगेल याची चिंता होतीच त्यांना .. मी आता व्यसनमुक्तीची सुमारे दोन वर्षे पूर्ण केली होती .. भावाला वाटे याने या सामाजिक कार्याबरोबरच स्वतच्या भौतिक .ऐहिक ..कौटुंबिक ...प्रगतीचा विचार केला पाहिजे..सामाजिक कार्यात मिळणारे मानधन तुटपुंजे असते .. पुढे जर याला लग्न संसार करायचे असेल तर ..याने एखादी चांगली नोकरी केली पाहिजे ..म्हणजे मग याच्या लग्नाबाबत विचार करता येईल ..मी मात्र अनघा शिवाय दुसऱ्या कुणा मुलीचा विचार करू शकत नव्हतो ..लग्न ..संसार या भानगडीत न पडता आयुष्यभर सामाजिक कार्यात राहायचे असे मी ठरविले होते .. एकदा माझ्या पुण्याचे चुलत मेव्हणे श्री . अनंतराव दामले यांचे कडून एका चांगल्या नोकरीचा प्रस्ताव आला ..पिंपरी चिंचवड येथे पालिकेच्या टोल नाक्यावर कारकून म्हणून नोकरी मला मिळू शकत होती ..अनंतरावांनी यासाठी प्रयत्न करायचे ठरवले होते .. त्यासाठी त्यांनी मला व आईला पुण्याला बोलाविले .. त्यादिवशी रविवार होता ..आईला चुलत बहिणीच्या घरी सोडून मी मँडम ना भेटायला त्यांच्या घरी पत्रकार नगर येथे माझ्या रवी जोगळेकर या मित्रासोबत गेलो .. बाहेरच्या हॉल छान भारतीय बैठक घातलेली होती..तेथे बसून मँडम आपल्या डायरीत काहीतरी टिपणे काढीत बसल्या होत्या .. त्यांना माझ्या येण्याचे कारण सांगून त्यांचा सल्ला विचारला तेव्हा त्या हसून म्हणाल्या .. असा कोणी सल्ला मागितला तर मला जरा दडपण येते ... कारण सल्ला देणे ही सगळ्यात सोपी गोष्ट असली तरी त्याचे बरे -वाईट परिणाम हे प्रत्यक्ष ज्याला सल्ला दिला जातो त्या व्यक्तीला अनुभवायचे असतात .. आताचे तुझे काम छानच चाललेय यात वादच नाही ..तरीही जर तुझ्या कुटुंबियांना तू हे काम सोडून एखादी चांगली नोकरी करून सर्वसामान्य लोकांसारखा संसार करावा असे वाटणे अजिबात वावगे नाही ..प्रश्न येतो तो तुझ्या पसंतीचा .. तुझ्या मते तुला या कार्यातच रहायचे आहे ..म्हणजे आता निर्णायक क्षण आहे हा .. मी तुला नेमके काय कर असे अजिबात सांगणार नाही ..तुझी आवड ..तुझा कल.. तुझे प्राधान्य ..या सर्व गोष्टी लक्षात घेवून तूच निर्णय घे ..मात्र एक लक्षात ठेव ..एकदा एखादा निर्णय घेतला मग .. पश्चाताप करत बसायचे नाही .. कोणतीही संधी ही शेवटची कधीच नसते ..सामाजिक कार्यात देखील तू मन लावून कल्पकतेने काम केलेस तर नक्कीच खूप मोठे काम उभे करू शकशील .. प्रत्येक निर्णयाच्या चांगल्या -वाईट बाजू असतात .. वगैरे ..एकंदरीत मँडम ने निर्णय माझ्यावरच सोपविला होता ..फक्त त्यांचा एक आग्रह दिसला की कोणताही निर्णय घेतला तरी तुझी स्वतची व्यसनमुक्ती टिकवून ठेवण्याला तू प्राधान्य दिले पाहिजेस ..मग मँडमनी आम्हाला चहा बद्दल विचारले ..आणि जरा गमतीने आतल्या खोलीत असलेल्या बाबांना हाक मारली ' अहो ..डॉ . अनिल अवचट ..जरा बाहेर येत का ? बघा आपल्याकडे कोणी आलेय ' बाबाही हसत हसत बाहेर आले ..एका सुती कापडाची पांढरी बंडी आणि खाली एक साधी ढगळ बर्म्युडा अशा घरगुती वेषा त होते बाबा .. एकदम साधे ... त्यांनी आम्हाला अभिवादन केले .. मग मँडम त्यांना म्हणाल्या ' पाहुण्यांना चहा पाजणार का आज तुमच्या हातचा ' .. हो ..तर आलो लगेच घेवून असे म्हणून बाबा स्वतः चहा करायला आत गेले .. चहा करून आमच्या साठी टेू मध्ये चहा घेवून आले ..मग बडीशेप दिली .. आम्हाला या सगळ्याचे नवल वाटले ..इतकी मोठी माणसे मात्र किती साधेपणा ..किती सरळपणा होता वागण्यात ..वागण्या बोलण्यात कोठेही मोठेपणाचा लवलेशही नाही ..अत्यंत खेळकर मूड !

मँडमशी चर्चा केल्यानंतर मी निर्णय घेतला तो सामाजिक कार्यातच राहायचा .. हेच काम काझ्या आवडीचे होते . मी आईला व अनंतरावांना तासे सांगितले ..त्यांनी फारश्या प्रतिक्रिया दिल्या नाहीत ..फक्त जे करशील ते मनापासून कर ..व्यसनमुक्त रहा असे बोलले ..चला..म्हणजे आता मी सामाजिक कार्यातच राहणार कायाम्चानी निश्चित झाले होते .. पुण्याहून परत आल्यावर .. डॉ . गौड यांचे कडे मुंबईच्या एका सामाजिक संस्थेचे काम आले .. हे काम एड्स संबंधीच ..मात्र संशोधनाचे होते .. ज्यात अनेक प्रकारच्या लोकांच्या भेटीगाठी घेवून एक सर्व्हे करायचा होता .. त्यासाठी त्या संस्थेने नाशिकच्या के.टी .एच .एम महाविद्यालयातील चार पाच मुली व पाच मुले निवडली होती .. संस्थेची एक प्रश्नावली मजूर ..कारकून ..अधिकारी .. हमाल .. व्यावसायिक . अश्या सर्व प्रकारच्या लोकांकडे जावून भरून घ्यायची होती ..स्त्रियांची प्रश्नावली मुली भरून घेणार होत्या ..तर पुरुश्यांची प्रश्नावली मुले भरून घेणार होत्या .. गौड सरांनी मला देखील या कामात सहभागी होण्यास सांगितले .. यातून अनेक प्रकारच्या लोकांचा लैंगिकते बाबतचा दृष्टीकोन समजण्यास मदत झाली असती .. किवा लैंगिकते बद्दलच्या सवयी ..माहिती वगैरे गोष्टी कळण्यास मदत मिळणार होती .

( बाकी पुढील भागात )


======================================================


लैंगिकतेचा सर्व्हे..एक कसरत ! (पर्व दुसरे - भाग २३ वा )


निरनिराळ्या वर्गातील .निरनिरळ्या वयोगटातील स्त्री पुरुष्यामध्येलोकांमध्ये जावून ..त्यांना असलेली लैंगिक माहिती .. त्यांचा एड्स कडे पाहण्याचा दृष्टीकोन .. लैंगिक तृप्तीची त्यांची कल्पना .. कंडोम वापराबद्दल असलेला कल ..गर्भनिरोधकाची साधने ...समलैंगिक संबंध ..वगैरे माहिती मिळविण्यासाठी भरून घ्यायची असलेली प्रश्नावली वाचून आम्ही जरा विचारात पडलो .. त्यातील अनेक प्रश्न खाजगी किवा व्यक्तिगत लैंगिक जीवनाशी निगडीत होते .. लोक कसा प्रतिसाद देतील या बद्दल मनात शंकाच होती आमच्या .. कारण अजूनही भारतात लैंगिकता हा विषय चारचौघात चर्चा करण्याचा नाहीय असे मानले जाते ..भले जवळच्या मित्रमंडळी मध्ये हलक्या आवाजात मस्करी होत असेल ..पण नवख्या माणसाजवळ असे कोणी बोलणे कठीणच होते ...मात्र एक बरे होते की मुलाखत देणाऱ्या व्यक्तीचे नाव भरण्याचा आग्रह नव्हता फॉर्म मध्ये ..म्हणजे नाव न सांगण्याच्या बोलीवर लोक कदाचित बोलले असते ..महत्वाच्या आणि नाजूक विषयावर लोकांना बोलते करण्यासाठी आम्हाला खूप चतुराईने बोलणे गरजेचे होते .. पहिल्या दिवशी आम्ही सगळे जेव्हा सर्व्हे करण्यास निघालो तेव्हा ..सकाळी ११ वाजले होते .. प्रथम मजूर वर्गात जायचे ठरवले होते ..त्या नुसार आम्ही पंचवटीत असलेल्या मार्केट यार्ड येथे गेलो ..येथे गावोगाव हून मोठ्या प्रमाणात भाजीपाला ट्रक्स .ट्रँकटर.. भरभरून येत असे .. शेतकरी बांधव .. भाजीपाला वाहून नेणारे ..भाजीपाला उतरविणारे मजूर .. दलाल .. वगैरे प्रकारच्या लोक आम्हाला भेटले .. आम्ही एखाद्याला थांबवून ' जरा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत असे म्हंटले की ती व्यक्ती थांबत असे ..मात्र पहिलाच प्रश्न ऐकून व्यक्ती ..एकदम बावचळून जाई .. मग.. आम्हाला काही समजत नाई असे उत्तर देवून निघून जाई..पहिला प्रश्न असा होता ..की ' तुम्हाला एड्स बद्दल माहित आहे काय ? ' हा प्रश्न विचारल्यावर समोरची व्यक्ती ..आम्ही त्याच्यावरच काहीतरी आरोप करतो आहोत अशा नजरेने आमच्याकडे पाही व माझा काही संबंध नाही अश्या आविर्भावाने निघून जाई ..काही जण तर आमची प्रश्नावली ऐकून आम्ही काहीतरी पाचकळ बोलतोय ..किवा त्यांची मस्करी करतोय असा चेहरा करत ..आमच्याकडे रागाने पाहून निघून जात ..एक दोन वेळा असा अनुभव आल्यावर आमच्या लक्षात आले की असे समूहाने फिरण्यपेक्षा एकेकटे फिरले पाहिजे ..कारण तीन चार तरुण वाटेत अडवून .. एकदम एकदम ' एड्स ' बद्दल काही विचारात आहेत हे पचनी पडण्यासारखे नव्हते ..तेव्हढा मोकळेपणा समाजात नाहीय ..लैंगिकतेशी संबंधित काहीही डायरेक्ट ' अश्लील ' या सदरात टाकले जाते आपल्याकडे ..मग ते प्रबोधन असो ..माहिती असो ! मग आम्ही एकेकटे फिरून मग नंतर दोन तासांनी सर्वांनी एके ठिकाणी गोळा व्हायचे ठरविले .. !

दोन तासात मी तीन जणांना पकडून त्यांची प्रश्नावली भरून घेतली .. आधी मी त्यांचा काम धंदा .. कुटुंबीय .. आर्थिक परिस्थिती ..असे जिव्हाळ्याचे प्रश्न विचारून मग मूळ मुद्द्यावर यायला शिकलो .... कोणालाही नाव विचारले नाही .. याचा परिणाम म्हणून ते जरा मोकळे पणी बोलले .. मुलीना तर आमच्या पेक्षा भयानक अनुभव आला .. मजूर बायका तोंडाला मदार लावून लाजत व काहीही सांगायला नकार देत ..किवा ' या बया..असे उद्गार काढून रागाने सर्व्हे करणाऱ्या मुलींकडे विचित्र नजरेने पाहात ..या पोरी पूर्ण वाया गेल्या ..कसे व्हायचे यांचे पुढे अश्या तोऱ्यात निघून जात असत ..मुलीनीही मग आमच्या सारखीच युक्ती केली एकेकटे फिरण्याची ..ही युक्ती थोडीफार कामी आली.. सुमारे दहा १२ दिवस आम्ही हे सर्व्हेचे काम केले ...सर्व स्तरांच्या स्त्री पुरुष्यांमध्ये फिरलो .. सायंकाळी मग एकत्र जमून आम्ही ..एकमेकांचे अनुभव ऐकून त्यातून बोध घेवून.. आमच्या बोलण्याच्या शैलीत बदल करत गेलो ... कॉलेजची मुले मात्र आमचे प्रश्न ऐकून चेकाळत होती .. थट्टा मस्करी करीत होती .. काही ठिकाणी एखाद्याला प्रश्न विचारताना भोवती बघे गोळा होत असत .. अशा वेळी चांगली उत्तरे देणारा बावचळून जाई कारण भोवती गोळा झालेले लोक त्याच्या कडे हसून पाहत असत ..या बघ्यांना मी दोन तीन वेळा इथे जमू नका .. असे सांगण्याचा प्रयत्न केला पण कोणी जाईना ..मग एक युक्ती केली ..भोवती बघे गोळा झाले की मी त्या बघ्यांना प्रश्न विचारू लागलो ..मग मात्र ते आपोआप सटकू लागले .. सुमारे बारा दिवस आमचे हे काम सुरु होते दिवसभरातून सुमारे सहा तास आम्ही काम केले .माझ्या बरोबर काही वेळा अमित ..कादर देखील होते ..या कालावधीत आम्ही वेगवेगळ्या वर्गातील स्त्री पुरुष्यांचे मिळून ४०० फॉर्म भरून घेतले .. मग त्या सर्व फॉर्म मधील उत्तरांची सरासरी काढली .. आणि त्यानुसार प्रत्येक बबतीत एकंदरीत टक्केवारी मिळाली ..आता सर्व तपशील माझ्याकडे नाही मात्र काही ठळक गोष्टी चांगल्या लक्षात आहेत .. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे कंडोम वापराबाबत असलेली उदासीनता ..गैरसमज ..आणि येथेही असलेले पुरुषी वर्चस्व .. कंडोम वापराने बहुधा लैंगिक तृप्तीचा अनुभव येत नाही असे बहुतेकांनी सांगितले .. मग तो कंडोम संरक्षण म्हणून वापरला जावो किवा गर्भ निरोधाचे साधन म्हणून .. अनेक जण तर मेडिकल स्टोर्स मध्ये जावून कंडोम कसा मागावा या चिंतेत दिसले .. बहुतेकांना कंडोम सुरक्षित पणे उत्तेजित लिंगावर कसा लावावा हे देखील माहित नव्हते .. त्यांची कंडोम लावायची पद्धत अधिक असुरक्षित होती ..कंडोम नाजूक असल्याने अजिबात नख न लागू देता फक्त हलक्या बोटांनी हाताळायचा असतो हे माहित नव्हते लोकांना .. काही जणांना कंडोम लावे पर्यंत धीर नव्हता .. कारण त्यावेळात उत्तेजना कमी होते असे त्यांचे म्हणणे होते .म्हणजे हे लोक संभोग पूर्वक्रीडेबाबत ( फोर प्ले ) पूर्ण अनिभिज्ञ होते.. काही जण जे विवाहित होते ते कंडोम लावण्या ऐवजी पत्नीच्या गर्भनिरोधाच्या शस्त्रक्रिये वर भर देत किवा स्त्रियांनी गर्भनिरोधक गोळ्या घ्यावात असे त्यांचे मत पडले म्हणजे येथे पुरुषी वर्चस्वाचा भाव होता ...!

हस्तमैथुना बाबत प्रश्न विचारल्यावर हे खूप मोठे पाप आहे किवा अत्यंत लज्जास्पद कर्म आहे असा अविर्भाव होई ..मात्र नीट खोदून विचारल्यावर बहुतेकांनी हस्तमैथुन करत असल्याचे मान्य केले .. त्यात काहीही लज्जास्पद नाहीय हे त्यांना पटवून द्यावे लागे ..अश्लील सिनेमे पाहण्याबाबत पुस्र्ष अग्रेसर आढळले .. त्याकाळी असे सिनेमे दाखविणारे व्ही .डी .ओ पार्लर असत .. लपत छपत जावून किवा मित्र मंडळीनी मिळून वर्गणी काढून गुप्त जागेत व्हीसीआर वर असे सिनेमे पहिल्याची अनेकांनी कबुली दिली .. स्त्रिया मात्र या बाबतीत मागासलेल्या आढळल्या ..कारण लैंगिक बाबतीत पुरुष्यांच्या तुलनेत स्त्रियांवर अधिक बंधने आहेत ..विवाह पूर्व लैंगिक संबंधांचा अनुभव आहे का ? या प्रश्नावर आधी नकार आणि मग लाजत लाजत होकार आलेला होता .. विवाहपूर्व लैगिक संबंध कोणाशी आले असे विचारताना बहुतेक उत्तरे ..ओळखीच्या व्यक्तीशी ..चुलत .मावस नाते संबंधात असे संबंध घडल्याची कबुली दिली गेली होती .. खूप कमी लोकांनी शरीर विक्रय करणाऱ्या महिलांकडे गेले असल्याची कबुली दिली .. अशी कबुली देणारे कंडोम वापराबाबत मात्र नकार देत होते ..याच प्रश्नाचे उत्तर मात्र १०० टक्के स्त्रियांनी विवाहपूर्व किवा विवाहबाह्य लैंगिक संबधांचा अजिबात अनुभव नाही असे दिले .. सरासरी काढताना हा विवाह पूर्व किवा विवाहबाह्य लैगिक संबंधांचा प्रश्न खूप वादग्रस्त ठरला .कारण बहुतेक पुरुष्यानी होकारात्मक उत्तरे दिली होती ..तर १०० टक्के स्त्रियांनी नकार दिला होता .. हे जरा विसंगतच होते . यावरून स्त्री च्या लैगिक स्वातंत्र्यावर किती मर्यादा आहेत हे स्पष्ट होते ..किवा समाज पुरुष्याना जरी विवाहपूर्व किवा विवाह बाह्य संबंधाना मान्यता देत असला तरी स्त्रियांना मात्र अजिबात या बाबत मान्यता नव्हती ..म्हणजे नैतिकतेचे सारे नियम फक्त स्त्रियांनाच लागू होते ..पुरुष्याना काहीही केले तरी मोकळीक होती ..पिवळ्या कव्हरची म्हणजे लैंगिकते बाबतची किवा अश्लील या सदरात मोडणारी पुस्तके वाचणारे आंबटशौकीन अनेक आढळले .. मात्र अशा पुस्तकातून लैंगिकते बद्दल शास्त्रीय माहिती मिळविण्याबाबत ते उदासीन होते .. उलट अशी पुस्तके वाचून लैंगिक संबंधा बाबत गैरसमज अधिक वाढत असल्याचे जाणवले .. भावना चेतवीणारी पुस्तके लिहिणारी हिंदी लेखक मंडळी ' मस्तराम ' ..' मुसाफिर ' अशी नावे धारण करून लोकप्रिय झालेली होती .. मराठीतील ' हैदोस ' नावाचे मासिक देखील अनेकांनी वाचल्याचे आढळले ..

( बाकी पुढील भागात )



======================================================

झाकली मुठ ...! (पर्व दुसरे -भाग २४ वा )


एकंदरीत आम्ही केलेला सर्व्हे असे दर्शवित होता की समाजात लैंगिकते बदल शास्त्रीय माहिती मिळणे गरजेचे आहे .. थोरांपासून ते तरुणवर्गाला देखील .. ब्लू फिल्म पाहून मिळणारे ज्ञान हे पूर्णतः गैरसमज पसरविणारे होते .. लैंगिक संबंधांची ओढ ही नैसर्गिक आहे ..त्यावर विजय मिळविणे सोपे काम नाही .. मानव सोडून अन्य प्राण्यांमध्ये ही प्रेरणा फक्त पुनरुत्पादनासाठी वापरली जाते ..मानव केवळ पुनरुत्पादनच नव्हे ..तरी मानसिक आनंद मिळविण्यासाठी या प्रेरणेचा वापर करतो ..लैंगिक भावनेचा योग्य तो निचरा होणे आवश्यक आहे ..अन्यथा अनेक प्रकारच्या मानसिक विकृती तयार होऊ शकतात ..नैतिक -अनैतिकतेच्या मर्यादा या समाजाने केव्हाच ओलांडल्या आहेत ...असे एकंदरीत चित्र होते .. या दरम्यान आम्ही ' सफेद गल्ली ' येथे शरीरविक्रय करणाऱ्या महिलांकडे येणाऱ्या ग्राहकांशी देखील बोललो .. बहुधा ८० टक्के लोक तेथे दारू ..चरस ..ताडी ..गांजा व इतर मादक पदार्थ सेवन करून येतात असा निष्कर्ष निघाला ..म्हणजे मादक पदार्थ सेवन केल्यावर चित्तवृत्ती सैल होतात .. लैंगिक भावना जास्त प्रमाणात जागृत होते .. व तशी हिम्मत देखील वाढते ...त्यामुळे असे मादक पदार्थ सेवन करणाऱ्या व्यक्तींकडून स्वतच्या सुरक्षीततेची काळजी कितपत घेतली जाईल या बाबत शंकाच आहे ..काही जण ब्लू फिल्म पाहून ..त्यातील प्रयोग घरी करणारे आढळले .. घरातील महिलेवर एखाद्या ब्लू फिल्म मधील नायिके सारखे वागण्याची अपेक्षा लादणे हे अन्यायकारक होते ..प्रणय क्रीडेबाबत शास्त्रीय माहितीचा अभाव सगळ्या वर्गात आढळला ..त्यामुळे लैंगिक तृप्तीच्या कल्पना देखील स्पष्ट नव्हत्या .. लैंगिक संबंधातील अत्त्युच्च आनंदाचा क्षण ( आर्गेझम ) पुरुष लवकर अनुभवतो .. स्त्री बाबत हा क्षण येण्यास विशिष्ट प्रकारे प्रणय करणे गरजेचे असते .. बहुतेक स्त्रियांना एकदाही हा अनुभव आलेला नव्हता .. किवा त्यांचा जोडीदार त्यांच्या या अत्त्युच्च क्षणाबाबत बेफिकीर आढळला .... काही ठिकाणी या संबंधाना ' उरकून घेणे ' इतकाच अर्थ उरला होता .. स्त्री च्या चित्तवृत्ती जागृत करण्यासाठी ज्या प्रमाणे पूर्वप्रणय( फोर प्ले ) आवश्यक आहे तसाच शास्त्रात पश्चातक्रीडा ( आफ्टर प्ले ) हा प्रकार देखील आहे ..ज्यात लैंगिक संबंध झाल्यावर आपल्या जोडीदाराशी मधुर संभाषण करून.. एक प्रकारे त्याने दिलेल्या सुखाबद्दल आभारप्रदर्शन करायचे असते ..बहुसंख्य लोक या बाबत मागासलेले आढळले .. लैंगिक संबंध झाले की लगेच जोडीदाराकडे पाठ फिरविणे हाच प्रकार आढळला ..अश्या वेळी योग्य प्रकारे लैंगिक तृप्ती न झाल्याने स्त्रियांमध्ये चीड चीड होणे ..वापरले गेल्याची .. अन्यायाची भावना बळावणे..निराशेची भावना येणे ..वगैरे प्रकार घडू शकतात हे कोणाच्याही गावी नव्हते !

या सर्व्हेची सरासरी काढून झाल्यावर खरोखर लैंगिक शिक्षण देणे महत्वाचे आहे हे लक्षात आले ..हा सर्व्हे करण्याआधी सर्व्हे करणाऱ्या मुलामुलींना विशिष्ट मानधन दिले जाईल असे ठरले होते ..मात्र सर्व्हे संपला तरी मुंबईहून सर्व्हे करून घेण्यासाठी आलेले संबंधित संस्थेचे प्रतिनिधी मानधन देण्याचे नाव घेईनात .. आम्ही मुंबईला गेल्यावर तुमचे सर्वांचे मानधन पाठवतो असे त्यांनी आम्हाला सांगितले ..मात्र एकदा ते मुंबईला गेले कि मानधन पाठवितील की नाही या बाबत काही खात्री नव्हती .. आम्ही सर्व्हे करणाऱ्या मुलामुलींनी खूप चर्चा केली .. नेमके काय करावे त कळेना .. पैसा हा घटक दुय्यम होता ..परंतु त्या लोकांनी आधी काबुल केल्याप्रमाणे त्यांचे वागणे नव्हते हे आम्हाला समजले .. उन्हात फिरून केलेल्या या कामातून बरेच शिकायला मिळाले होते आम्हाला तरी देखील ..पैसे नंतर देतो असे म्हणणे खचितच चीड आणणारे होते ..शिवाय ज्या संस्थेमार्फत हा सर्व्हे घेण्यात आला होता ..त्या संस्थेला नक्कीच या सर्व्हेचे पैसे मिळणार होते ..शेवटी ' उंगली तेढी ' करावी लागली ....इथे माझा टपोरीगिरी चा अनुभव कामी आला ..मी सरळ सर्वाना सांगितले की आपले मानधन मिळेपर्यंत आपण या प्रतिनिधीना मुंबईला जावू द्यायचे नाही ..ते ज्या हॉटेल मध्ये उतरले होते तेथेच त्यांना ओलीस ठेवायचे .. बाकीची मुले जरा घाबरत होती ..पण मी त्यांना धीर दिला व असे केल्याशिवाय पैसे मिळणे कठीण आहे हे सांगितल्यावर मुलेआणि मुलीही या ओलीस ठेवण्याच्या कल्पनेला तयार झाल्या .. त्याप्रमाणे मी त्या प्रतिनिधीना स्पष्ट सांगितले ..आमचा तुमच्यावर विश्वास नाही ...तुम्ही मुंबईला तुमच्या वरिष्ठांना कळवा की तुम्ही ताबडतोब पैसे पाठवा त्या शिवाय ही मंडळी आम्हाला मुंबईला येवू देणार नाहीत ..त्यांना हे अनपेक्षित होते .. ते जरा मुजोरी करू लागल्यावर मी माझी सिन्नरफाट्या ची भाषा वापरली मग ते जरा नरमले ..पैसे नक्की देतो वगैरे शपथा घेवू लागले ..आता आम्ही विश्वास ठेवण्यास तयार नव्हतो ..!

मग ठरल्याप्रमाणे त्या प्रतिनिधींनी हॉटेल सोडून मुंबईला निघून जावू नये म्हणून त्याच्यावर पहारा ठेवण्यात आला .. मी यात अग्रेसर होतो .. सरळ सरळ दमबाजी केली .. दोन दिवस आम्ही दोन तीन मुले तेथेच हॉटेल वर तळ ठोकून होतो .त्या प्रतिनिधींनी फोनाफोनी केली .. मग शेवटी त्यासंस्थेचे वरिष्ठ मुंबईहून नाशिकला आले ..त्यांनी सोबत पैसे आणले होते ..सर्व मुलामुलींचा हिशोब केला गेला ..ड्राफ्ट ने पैसे देण्याचे ठरले ..त्यानुसार मग सर्वाना पैसे मिळाल्यावर आम्ही त्या प्रतिनिधीना मुंबईला जावू दिले .. नंतर समजले कि त्या संस्थेने कोल्हापूर येथे देखील असा सर्व्हे केला होता व त्या सर्व्हे करणाऱ्या मुलांचे पैसे बुडविले होते .. म्हणजे आम्ही केले ते योग्यच होते ..सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सगळ्याच संस्था प्रामाणिक असतात असे नव्हे .. कागदोपत्री सर्व आलबेल दाखवून .. दानशूर व्यक्तींकडून किवा सरकार ..अथवा इतर संस्थांकडून पैसे काढायचे व ते योग्य ठिकाणी न वापरता हडप करायचे ही प्रवृत्ती आढळली ..या सर्व्हेच्या नंतर गौड सरांनी शरीर विक्रय करणाऱ्या महिलांचे संमेलन आयोजित करण्याचे ठरविले .. वेगवेगळ्या शहरात शरीर विक्रय व्यवसायात असलेल्या महिलांच्या समस्या समजाव्यात ..त्या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांचा समन्वय असावा ..असा या मागील हेतू होता .. !

( बाकी पुढील भागात )

======================================================

अति उपेक्षितांचे संमेलन ! (पर्व दुसरे - भाग २५ वा )


शरीरविक्रय करणाऱ्या महिलांचे संमेलन आयोजित करण्याचे ठरल्यावर डॉ . गौड यांनी सर्व तयारी सुरु केली ..दरम्यान आम्ही कार्यकर्ते आठवड्यातून दोन वेळा ' सफेद गल्ली ' , गंजमाळ , व नाशिक मधील इतर ठिकाणी शरीरविक्रय करणाऱ्या महिलांना भेटून त्यांना आरोग्याचे महत्व , कंडोम वापराचे फायदे ...वगैरे समजावून सांगून ..त्यांना मोफत कंडोम वाटपाचे काम देखील करत होतो ..या वस्त्यांमध्ये आमची चांगली ओळख झाली होती .. अनेकदा त्या महिला त्यांच्या व्यक्तिगत अथवा कौटुंबिक समस्या सांगत तेव्हा गहिवरून येई .. आम्ही त्यांना दिलासा देण्याशिवाय काहीही मदत करू शकत नव्हतो ..समाजव्यवस्थेमध्ये त्यांचे स्थान अतिउपेक्षित वर्गात मोडत होते .. त्यांच्या जीवनाबद्दल कोणालाही काहीही घेणे देणे नव्हते ..संमेलनासाठी इतर शहरातून देखील शरीर विक्रय करणाऱ्या महिला येणार होत्या ..गौड सरांनी त्या त्या शहरात अशा महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांशी संपर्क करून त्यांना निमंत्रणे दिली होती .. संमेलनाला यायचे म्हणजे या महिलांचे किमान एका दिवसाच्या व्यवसायाचे नुकसान होणार होते त्यामुळे जास्त महिला येवू शकणार नाहीत हे स्पष्ट झाले .. तरी देखील तीनचार शहरातून मिळून एकंदरीत १५ ते २० जणी येतील असा अंदाज होता .. गौड सरांनी त्या दृष्टीने आर्थिक निधी उभा केला होता .. नाशिक मधील त्र्यंबक रोडवर त्या वेळी नव्याने सुरु झालेले हॉटेल ' पंचवटी एलिट ' येथे संमेलन घेण्याचे ठरले होते ..या संमेलनातून अशा महिलांची मोठी चळवळ उभारून .. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना एकत्रित करण्याचा उद्देश होता आमचा ...या संमेलनाची माहिती देण्यासाठी एखादी पत्रकार परिषद आयोजित केली जावी असेही ठरले.. त्या दृष्टीने डॉ . गौड यांनी परिचित असलेल्या दोन तीन पत्रकारांना तशी माहिती दिल्यावर ..त्या पत्रकार बंधूंचे असे म्हणणे पडले की यासाठी सर्व दैनिकांच्या पत्रकारांना आधी एखादी पार्टी दिली तर नक्कीच हे काम चांगले होईल ..थोडक्यात पत्रकार बंधूना खायला प्यायला घातले तर ते या गौड सरांच्या कार्याला व या संमेलनाला प्रसिद्धी देणार होते .. मग तशीही एक पत्रकारांची पार्टी आयोजित करण्यात आली .. या पार्टीला माझ्या सोबत अजित , कादर , अभय , व व्यसनमुक्तीचे उपचार घेवून त्यावेळी व्यसनमुक्त असणारे तीन जण देखील उपस्थित असणार होते .. पार्टीत दारू असणार हे गृहीत होते ..त्यामुळे गौड सरांनी मला वेगळ्या सूचना दिल्या होत्या .. मी जास्तीत जास्त लक्ष आमच्या व्यसनमुक्त मित्रांवर ठेवावे असा त्यांचा कटाक्ष दिसला ..कारण अशा पार्टीत इतरांना पिताना पाहून आमच्या मित्रानाही मोह होऊ शकला असता .. 

व्यसनी व्यक्तीने व्यसनमुक्त राहत असताना ज्या समारंभात दारू असेल तेथे जाणे टाळणे उत्तम ..उगाच विषाची परीक्षा घेतल्यासारखे होते ..मी सर्व मित्रांना आधीच सावध करून ठेवले .. त्यानुसार मग ती ओली पत्रकार परिषद पार पडली .. समोरच्या टेबलवर छान सजविलेल्या डिशेस ..हॉटेलच्या हिरवळीवर लागलेले मंद संगीत .. समोर बियर अथवा व्हिस्की ने भरलेला ग्लास या वातावरणात सगळ्यांना डॉ . गौड यांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली .. शरीरविक्रय करणाऱ्या महिलांचे दारूण अनुभव सांगितले.. डोक्यात असलेल्या किक मुळे सर्व पत्रकार बंधू देखील खूप भावनाप्रधान झाले होते .. बिचाऱ्या शरीरविक्रय करणाऱ्या महिला किती अगतिक आहेत हे त्यांना चांगलेच कळले .. या पार्टीत अजिबात न घेणारे दोन तीन पत्रकार होते ..इतर पत्रकारांच्या दृष्टीने ते बावळट होते ..सर्वांनी सरांना.. त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या तसेच या कार्याला योग्य ती प्रसिद्धी देण्याचे आश्वासन दिले .. त्याप्रमाणे लवकरच स्थनिक दैनिकात ...शरीर विक्रय करणाऱ्या महिलांच्या समस्यांवर प्रकाशझोत टाकला गेला .. संमेलनाच्या आदल्या दिवशी सायंकाळपासून हॉटेल बुक केलेले होते ..बाहेरच्या गावाहून येणाऱ्या महिला आदल्या दिवशीच आल्या होत्या .. नागपूर येथील ' गंगा जमना ' या ठिकाणी असा मोठा व्यवसाय आहे ..तेथील पाच सहा महिला आणि त्यांच्या सोबत काम करणाऱ्या सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते .. सांगली हून देखील ' संग्राम ' या सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधी व तेथील शरीरविक्रय करणाऱ्या काही महिला उपस्थित झाल्या .. काही पत्रकार मित्र .. सरांचे शुभचिंतक ..नाशिकचे त्यावेळचे पोलीस सहआयुक्त ..या मंडळींच्या उपस्थितीत दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या एका हॉल मध्ये संमेलनाची सुरवात झाली .. सुरवातीला गौड सरांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले .मग 'एड्स ' या गंभीर समस्येची जाणीव करून दिली ..एड्स चा सर्वात जास्त धोका असलेल्या या महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे संमेलन आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले .. त्यानंतर गावोगावहून आलेले सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी बोलले ..सर्वांनी आपल्या बोलण्यात या महिलांचा उपेक्षित तरीही उपयुक्त असा उल्लेख केला ..शेवटी पाळी होती प्रत्यक्ष शरीरविक्रय करणाऱ्या महिलांची ..इतर लोक बोलत असताना मी सवयीनुसार या महिलांचे निरीक्षण करीत होतो ..सर्वांच्या चेहऱ्यावर थोडेसे बुजल्याचे भाव होते ..तरीही आपल्या सारख्या महिलांना येथे सन्मानाने वागवले जातेय याबद्दल समाधान दिसले .. बोलण्याची वेळ येताच मात्र त्या महिला स्तब्ध झाल्या .. संकोचल्या .. पाच मिनिटे झाली तरीही कोणीही तोंड उघडायला तयर नव्हत्या !

सरांनी त्यांना मोकळेपणी बोलण्याचे आवाहन केले ..एरवी सगळ्या व्यथा भडाभडा बोलणाऱ्या या महिला इथे मात्र तोंडाला कुलूप लावून होत्या .. शेवटी सांगली येथे काम करणाऱ्या ' संग्राम ' संस्थेच्या डॉ. मीना पुढे झाल्या त्यांनी या महिलांना धीर दिला .. आम्ही तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी येथे जमलो आहोत तेव्हा तुम्ही लाजून ..संकोचून किवा घाबरून जाता कामा नये वगैरे आवाहन केले तरीही त्या महिला ढिम्म होत्या ..मग मीना मँडमनी अतिशय धाडसी आणि सर्व पुरुषवर्गाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे विधान केले .. त्या म्हणाल्या ' बायानो तुम्ही लाजू नका ..तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नाही ..मी जरी विवाहित असले ..तुमच्या दृष्टीने गरती असले .. संसार करणारी असले ..तरी देखील आपल्यात एक साम्य नक्कीच आहे ते म्हणजे तुम्ही पोटासाठी .. रोज वेगवेगळ्या पुरुश्यांची मर्जी सांभाळता ..तुमचा देह हवा तेव्हा त्या पुरुष्यांच्या हवाली करता ..आणि मी देखील माझ्या संसारासाठी ..पोटासाठी ..सुरक्षिततेसाठी नियमित एका पुरुष्याची म्हणजे माझ्या नवऱ्याची मर्जी सांभाळते .. माझा देह त्याला हवा तेव्हा त्याच्या हवाली करते .. अनेकदा स्वतच्या मर्जीची .. मानसिक स्थितीची .. पर्वा न करता माल हे करावे लागते ' मीना मँडमचे हे बोलणे खूप परिणाम कारक ठरले .. मग त्या महिला बोलू लागल्या .. एकेकीने आपल्या अडचणी मांडल्या त्यांची सामुहिक व्यथा एकच होती कि आम्हाला समाजात खूप उपेक्षा सहन करावी लागते .. रंडी ..छिनाल .. हरामजादी असा उल्लेख आमच्या नशिबी आहे .. कोठेवाली घरमालकीण ..गल्लीतील गुंड .. पोलीस .. सगळे आमचे शोषण करतात .. आम्ही कोणाजवळ तक्रार करायला जावे .. दोन तीन जणींनी पुनर्वसनाचे प्रयत्न केले होते मात्र तेथेही जेव्हा तेथे यांच्या पूर्वायुष्याबद्दल समजले तेव्हा पुन्हा शोषण .. आमचे चारित्र्य सैल आहे असाच सर्वांचा समज झालाय ..आम्ही देखील एक माणूस आहोत ..आम्हाला एक मन आहे .. आमची स्वप्ने आहेत .. याची कोणालाच परवा नसते वगैरे !

( बाकी पुढील भागात )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें