लैंगिक अंधश्रद्धा ! ( पर्व दुसरे भाग १६ वा )
आपल्या देशात एच.आय .व्ही चा विषाणू झपाट्याने पसरण्याचे सगळ्यात मोठे कारण अज्ञान ..लैंगिक अंधश्रद्धा ..आरोग्याविषयी असलेली अनास्था हेच आहे असे सरांचे मत होते..स्त्री आणि पुरुष यांच्या मधील शरीर संबंधांचे आकर्षण नैसर्गिक आहे .. फार फार पूर्वी म्हणजे मानव विकसित होण्याच्या प्राथमिक अवस्थेत ..या आकर्षणाला बंधने नव्हती ..कोणीही.. कोणाशीही..शरीर संबंध ठेवू शकत होते ...मात्र लैंगिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलांची जवाबदारी निश्चित व्हावी म्हणून विवाह संस्था अस्तित्वात आली ..त्या बरोबरच अश्या संबंधांसाठी विवाह बंधन असावे हा नियम झाला ..विवाह बंधन नसताना केला गेलेला शरीर संबंध अनैतिक मानला जावू लागला ..शरीर संबंधांची शारीरिक ओढ तशीच राहिली .. त्यातूनच कदाचित हा व्यवसाय फोफावला असावा .. आपण कितीही बंधने घातली ..कितीही संस्कार ...केले तरी हे शरीर संबंधांचे आकर्षण इतके जास्त असते ही भावना जर दाबून ठेवली गेली तर काही मानसिक विकृती निर्माण होऊ शकतात...हस्त मैथुन हा यावर एक पर्याय असू शकतो ..मात्र त्याबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत समाजात ..जसे की हस्तमैथुन केल्याने .. लिंगाचा आकार बदलतो ..वीर्यनाश म्हणजे रक्तनाश .. नपुंसकता येते .. वगैरे ... वयात येणाऱ्या स्त्रीच्या मनावर देखील विवाह बंधनाचे संस्कार केले जातात ..तिचे स्त्रीत्व म्हणजे काचेचे भांडे .. एकदा तडा गेला की पुन्हा सांधता येत नाही ..म्हणजेच ..लग्न होईपर्यंत तिने कोणाशीही शरीर संबंध ठेवू नये याची दक्षता घेण्याचा प्रकार आहे हा ..या मागचा मूळ हेतू जरी चांगला असला तरी त्यातून स्त्री चे स्त्रीत्व म्हणजे खूप अनमोल मानले गेले ...इतके अनमोल की अजूनही काही समाजात लग्नानंतर स्त्री चे स्त्रीत्व अबाधित आहे नाही याची तपासणी केली जाते .. स्त्री योनीत असलेला ..कांद्याच्या पापुद्र्यासारखा पातळ पडदा जो गर्भाशयाच्या तोंडाशी असतो तो जर फाटला असेल तर ती स्त्री शरीत्र्यहीन मानली जाते ...खरे तर खेळताना ..इतर मेहनतीची कामे करताना ..हल्लीच्या जमान्यात स्त्री देखील सर्व क्षेत्रात पुरुष्यांच्या बरोबरीने कार्य करतेय तेव्हा ..सायकल चालवताना .. अपघाताने .. वगैरे देखील हे योनिपटल ( पडदा ) भंग होऊ शकते ..याचा एकदम स्त्रीच्या चारित्र्याशी संबंध जोडणे ही अंधश्रद्धाच आहे ... सर अनेक गोष्टींवर प्रकाश टाकत होते !
लैंगिक अंधश्रद्धा बाबत काही गोष्टी मी पूर्वी मित्रांकडून ऐकल्या होत्या ... ज्यात एक गोष्ट तर अगदी हास्यास्पद होती .. काही मुलांनी तर हा प्रयोग देखील केल्याचे मी एकले होते ..आम्ही त्यावेळी खूप हसलो होतो .. गुप्तरोगाची लागण झाल्यावर तो बरा होण्यासाठी खरे तर योग्य त्या तपासण्या करून वैद्यकीय उपचार नियमित घेवून पथ्ये पाळून तो बरा होतो ..नाशिक रोड मधील काही महाभागांना गुप्तरोग झाल्यास ... अश्या व्यक्तीने गाढवीणीशी संबंध केला तर ..ताबडतोब गुप्तरोग नाहीसा होतो असे समजले होते ..किती मोठा मूर्खपणा होता हा आणि असा मूर्खपणा करणारी मंडळी देखील अस्तित्वात आहेत .. कुवाऱ्या मुलीशी संबंध केल्यास देखील गुप्तरोग नाहीसा होतो अशीही एक अंधश्रद्धा आहे ..म्हणजे त्यातूनच कदाचित अल्पवयीन मुलींवर बलात्कार होत असावेत ही शक्यता देखील नाकारता येत नाही ...लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशिष्ट जमातीच्या स्त्रीशी संभोग केल्यास खूप धन प्राप्त होते हा देखील दिव्य शोध ...देखील अंधश्रद्धेचा एक भाग आहे ..हस्तमैथुन...अपत्यप्राप्ती .. गुप्तरोग .. स्त्रीत्व वगैरे अनेक गोष्टींबाबत शास्त्रीय माहिती फार थोड्या लोकांना असते आणि मग अश्या अंधश्रद्धा फोफावतात ... ज्याचे बहुतेक दुष्परिणाम बहुधा स्त्रीच्या वाट्याला येतात आपल्या देशात असलेले लैंगिक अज्ञान दूर करण्यासाठी खरे तर कुमारवयात प्रवेश केल्यापासून मुलामुलींना लैंगिक शिक्षण देण्याची गरज आहे ..ज्यात कुमारवयात प्रवेश करताना होणारे शारीरिक आणि मानसिक बदल ...मानवी शरीर रचना .. स्त्री व पुरुषांची वेगवेगळी वैशिष्ट्य पूर्ण शरीररचना असण्याचे नैसर्गिक कारण ..लैंगिक संबंधामधील जवाबदारीचे भान ...स्त्री कडे पाहण्याचा आदरणीय दृष्टीकोन ..गर्भधारणा ..वगैरे मुद्दे असले पाहिजेत तरच आपल्याला या ' एड्स ' च्या भयानक राक्षसाशी यशस्वी पणे लढता येईल !
एड्स चा विषाणू पसरण्याचे दुसरे प्रमुख कारण आहे ते रक्त संक्रमणातून .. म्हणजेच एच .आय .व्ही बाधित व्यक्तीचे रक्त जर दुसऱ्या निरोगी व्यक्तीला लावले गेले तर देखील हा विषाणू दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात फोफावतो .. या बाबतीत देखील अनेक कंगोरे आहेत ज्यात पुन्हा ..अर्थकारण ...अंधश्रद्धा सामील आहेत .. याबाबत सांगताना सरांनी ' रक्तपेढी ' किवा ' ब्लडबँक ' हा शब्दच मुळात अर्थकारण दाखवतो असे सांगितले ..बँक किवा पेढी म्हंटले की डोळ्यासमोर आधी येतो तो पैसा ..खरे तर एखाद्या व्यक्तीचा जीव वाचानिण्यासाठी म्हणून दान केले जाणारे रक्त हा अतिशय उच्च मानवी मूल्याचा एक भाग आहे ..म्हणूनच ' रक्तदान म्हणजे जीवन दान ' असे घोषवाक्य प्रचारात आहे ..मात्र देशात किती लोक रक्तदानाबाबत जागरूक आहेत ? बहुसंख्य लोक अजूनही रक्तदान करण्यास तयार होत नाहीत .. त्यामुळे खरे तर फार मोठे नुकसान होत नाही ..तरीदेखील लोक अगदी सख्या नात्याच्या व्यक्तीला रक्तगट जुळत असूनही आपले रक्त देण्यास तयार नसतात ..त्याऐवजी ते रक्तपेढीतून घेतले जावे असे त्यांना वाटते .. साहजिकच रक्त अनमोल ठरले .. आणि काही व्यावसायिक रक्तपेढ्या रक्तविक्रीतून पैसा कमवू लागल्या .. मग व्यावसायिक रक्तदाते निर्माण झाले .. सरकार कशाकशावर बंधने घालणार ? .व्यावसायिक रक्तदाता ही संकल्पना मी पूर्वीच ऐकली होती ..माझे काही व्यसनी मित्र केवळ पैसे मिळतात म्हणून रक्तदान करतात हे मला माहित होते .. दुर्मिळ रक्तगट असलेल्या काही व्यसनी मित्रांना तर रक्त देण्यासाठी खास रक्तपेढीकडून बोलाविणे यायचे ..आणि ते मित्र भरमसाठ पैसे घेवून ते रक्त अक्षरशः रक्तपेढीला विकत असत .. रक्तपेढी देखील असे भरमसाठ पैसे घेवून विकत घेतलेले रक्त भरमसाठ भावाने ज्याला रक्ताची गरज आहे अश्या व्यक्तीला विकत असत ..मुंबईत असताना मी देखील एकदा टर्कीत होतो तेव्हा ..एका ठिकाणी ५० रुपयात रक्त विकले होते .
( बाकी पुढील भागात )
======================================================
रक्तपिपासू ! ( पर्व दुसरे भाग १७ वा )
मुळात आपल्या देशात जी सारखी रक्ताची चणचण ..तुटवडा ..या बाबत ओरड सुरु असते .. त्याचे कारण रक्तदाना बाबतच्या अनेक अंधश्रद्धा आहेत ..अज्ञान आहे... त्याचा फायदा घेवून धूर्त लोकांनी रक्तपेढी हा एक नफ्याचा व्यवसाय बनविला आहे . अनधिकृत असलेल्या तसेच व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून सुरु केल्या गेलेल्या रक्तपेढ्यांच्या कारभाराबद्दल सरांनी सांगितलेले भीषण सत्य असे की.. . ..एखाद्या नेत्याचा वाढदिवस ..एखादा समारंभ ..वगैरेच्या कारणांनी या रक्तपेढ्या लोकांना रक्तदान करायला प्रेरित करतात ... असे दात्यांकडून मोफत गोळा केलेले रक्त प्रीजर्व्ह करून ठेवण्याला देखील मर्यादा आहेत ..२१ दिवस पर्यंत हे रक्त... रक्तपेढीत टिकते ..नंतर ते निरूपयोगी ठरते ..म्हणून रक्तपेढ्या काही लबाड डॉक्टर्सशी संधान बांधून असतात .. अशा संधान असलेल्या डॉक्टरला कळविले जाते की ' डॉक्टरसाहेब .. जरा २० बाटल्या स्टॉक मध्ये आहेत ..त्या खपवा ' ..मग तो ठराविक डॉक्टर ..त्याच्याकडे आलेल्या अशक्त... अँनिमिक... असलेल्या..रक्ताची गरज नसलेल्या पेशंटला रक्त चढवावे लागेल असे सांगून रक्तगट असलेली चिट्ठी.. ठरलेल्या रक्तपेढीच्या नावाने लिहून देतो ..आणि अशा प्रकारे पहाता पहाता ...त्या रक्तपेढी वाल्याच्या बाटल्या संपतात .. खरेतर औषधे ..गोळ्या ..योग्य सकस आहार ..हिरव्या पालेभाज्या ..दुध ..फळे यांच्या वापरामुळे देखील अशक्तपणा आणि अँनिमिया बरा होऊ शकतो ..मात्र आपल्या देशात असलेल्या आरोग्यविषयक अज्ञानामुळे .. काही लोकांना रक्त चढवून घेतले हे सांगायला देखील मोठेपणा वाटतो ..एखादा आजारी माणूस दवाखान्यातून उपचार घेवून बाहेर पडल्यावर फुशारकी मारून लोकांना सांगतो ' दोन बाटल्या रक्त चढविले ' ..त्याला हे माहितच नसते की आपल्या आजारात रक्त देण्याची गरज नसताना आपल्याला रक्त चढवून लुट झालीय .
खरेतर रक्ताची गरज शस्त्रक्रिया ..अपघात .. मोठा बॉम्बस्फोट ..युद्ध .. आणि ठराविक आजारात असते ..या पैकी शस्त्रक्रिया या बहुधा पूर्वनियोजित असतात ..अश्या वेळी नातलगांनीच जर शस्त्रक्रिया होणाऱ्या आपल्या माणसासाठी रक्त दिले तर अधिक योग्य राहील ..नियोजन करून असे रक्त आधीच घेवून ठेवता येईल .. अपघात ..युद्ध याबाबतीत जर जनतेमध्ये जागृती असेल तर ती गरज देखील तातडीने पूर्ण करता येईल ....आणी रक्तदाना बाबत जागरूक असणाऱ्या लोकांची जर राष्ट्रीय पातळीवर सूची किवा यादी बनविली तर वेळोवेळी त्यांचे रक्त देखील उपलब्ध होऊ शकेल .. थोडक्यात सांगायचे तर रक्ताचा तुटवडा भासणार नाही .काही रक्त पेढ्या रक्तातील घटक वेगळे करून ते औषधी कंपन्यांना विकतात . ..औषधी कंपन्या अशा रक्तदानातून मिळालेले रक्त घटक वापरून महागडी औषधे बनवितात ..जी कमाईचे साधन बनतात . दुर्दैवाचा भाग असा की देशातील बहुतेक स्त्रिया या अँनिमिक आहेत .. खेड्यातून राहणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत हे प्रमाण तर खूप मोठे आहे ..याचे कारण आरोग्य विषयक अज्ञान .. गरिबी .. खूप मेहनत आणि श्रम ..आहारातील पोषण तत्वांबाबतचे अज्ञान हे आहे ..आपल्या देशात स्त्रीला आहाराच्या बाबतीत देखील दुय्यम स्थान आहे किवा ते दुय्यम स्थान स्त्रीने समर्पणाच्या ..त्यागाच्या भावनेने स्वीकारले असावे असे ही म्हणता येईल ..घरातील स्त्री बहुधा सर्वात शेवटी जेवते .. कधी कधी एखादा पदार्थ तिला चाखायला देखील मिळत नाही ..कधी कधी घरात तयार केलेला स्वैपाक सगळा आधीच इतर सदस्यांनी खावून संपविला तर तिला .काहीतरी शिळेपाके खावून ..नुसताच वरणभात खावून ..किवा जे असेल त्यावर भागवावे लागते ..त्यामुळे अँनिमिक स्त्रियांचे प्रमाण वाढतेय ..काही रक्तपेढ्या तर योग्य तपासणी केल्याखेरीज रक्त पुरवठा करतात .. या सार्या अनागोंदी कारभारामुळे ..मध्यंतरी रक्त संक्रमणातून एच .आय .व्ही . ची लागण होण्याच्या अनेक घटना समोर आल्यावर सरकारने रक्तपेढ्यांवर काही बंधने घातली ..मात्र ही बंधने योग्य पद्धतीने पाळली जात आहेत कि नाहीत यावर कोण नियंत्रण ठेवणार ?
दानाच्या भावनेतून दिल्या जाणाऱ्या रक्ताचा असा व्यापार होतोय हि माहिती माझ्यासाठी नवीन होती .. मी त्या दिवसापासून व्यसनमुक्ती सोबतच सर्व्हिस ऑफ सोसायटी या डॉ . रमेश गौड यांच्या एड्स नियंत्रण व प्रबोधनाच्या कार्याशीही जोडला गेलो .. सकाळी माझे मुक्तांगण मध्ये उपचार घेवून आलेल्या मित्रांच्या फॉलोअप चे काम झाल्यावर आठवड्यातून तीन वेळा दुपारी डॉ. गौड यांच्याकडे जावू लागलो ..आणी रोज नवनवीन माहिती मिळू लागली ..नंतर एकदा सरांच्या सांगण्यावरून आम्ही नाशिक शहरातील त्या वेळी अस्तित्वात असणाऱ्या नऊ रक्तपेढ्यांच्या कारभाराची गुप्तपणे माहिती माहिती काढण्याच्या मोहिमेत देखील पुढाकार घेतला ..एकूण नऊ पैकी सात रक्तपेढ्या असे व्यसनी व्यक्तींचे रक्त विकत घेत असल्याचे आढळले .. स्टिंग ऑपरेशन सारखाच हा प्रकार होता ... नाशिक मधील गर्द ..दारू ..व इतर अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या आणि गरजेपोटी रक्त विकणाऱ्या व्यसनी मित्रांच्या भेटी घेवून .. ते कोण कोणत्या रक्तपेढीत रक्त विकतात याची माहिती मिळविली .. मगएकदा रक्त विकणाऱ्या १२ व्यसनी व्यक्तींची मी मुलाखत घेतली त्याचे रीतसर व्हिडीओ शुटींग देखील करण्यात आले . नाशिकमधील रक्तपेढ्यांच्या कारभारावर प्रकाश टाकणारी ती व्ही .डी .ओ कॅसेट मी नंतर गौड सरांच्या हवाली केली .. !
( बाकी पुढील भागात )
======================================================
' एड्स ' चा कैदी ! ( पर्व दुसरे - भाग १८ वा )
जशी जशी मी ' एड्स ' या आजाराबद्दल माहिती घेत गेलो तसा तसा गौड सरांच्या कामात गुंतत गेलो .. रक्त संक्रमणानंतर एच .आय .व्ही चा विषाणू संसर्ग होण्याचा मार्ग आहे तो म्हणजे दुषित सुयांद्वारे ..एच .आय व्ही बाधित व्यक्तीला इंजेक्शन देण्यासाठी वापरलेली सुई जर दुसऱ्या निरोगी व्यक्तीसाठी लगेच वापरली गेली तर ती दुसरी व्यक्ती देखील बाधित होते .. या बाबतीत जास्त धोका होता तो इंजेक्शन द्वारे मादक द्रव्ये सेवन करणाऱ्या लोकांना .. त्या काळात ब्राऊन शुगर जी सुरवातीच्या काळात महाराष्ट्रात पन्नीवर टाकून अथवा सिगारेट किवा चीलीमित टाकून ओढली जायची ती ब्राऊन शुगर अधिक नशा येण्यासाठी इंजेक्शन द्वारे शिरेत घेण्याचा प्रकार काही प्रयोगशील महाभागांनी सुरु केला होता .. हा प्रकार कसा करतात हे जेव्हा मी प्रत्यक्ष पहिले तेव्हा अक्षरशः अंगावर काटाच आला ..वाटले आपण खरोखर सुदैवी आहोत ..की असले प्रकार आपल्याला सुचले नाहीत .. एका चमच्यात ब्राऊन शुगर घेवून त्यात थोडा लिंबाचा रस किवा डीस्ट्रील वाँटर मिसळायचे मग त्या चमच्यातील ब्राऊन शुगर त्या द्रवात नीट विरघळली की कापसाने हलकेच त्यातील कचरा टिपून घ्यायचा ...नंतर एका सिरींजने हाताच्या शिरेतील रक्त अर्धी सिरींज भरून काढून घ्यायचे ..तसेच त्या सिरिंज मध्ये मग त्या चमच्यातील ब्राऊन शुगरचे द्रावण भरून घ्यायचे मग ते रक्त मिश्रित द्रावण पुन्हा सिरींज ने हाताच्या शिरेत टोचून घ्यायचे .. बापरे अतिशय भयंकर प्रकार होता हा ...नागालँड ..मणिपूर ..मिझोरम वगैरे दुर्गम भागात हे असे शिरेतून ब्राऊन शुगर अथवा ..मार्फिन ..नोर्फीन ..फोर्टविन ..व इतर मादक द्रव्यांची इंजेक्शन्स घेणाऱ्या लोकांचे प्रमाण भरपूर आहे असे समजले ..तसेच तेथे एच .आय .व्ही ची लागण होण्याचे प्रमाण देखील अश्या व्यसनी लोकांमध्ये जास्त आहे ..कारण तेथे अतिशय महाग मिळणारे हे मादक पदार्थ सामुहिक पद्धतीने सेवन केले जातात ..एकट्याने विकत घेणे बहुधा परवडत नाही म्हणून बहुधा दोन तीन जण मिळून वर्गणी काढून हे मादक पदार्थ खरेदी करतात व स्वाभाविक पणे त्या सिरींज मधील तो नशेचा डोस प्रत्येक जण थोडा थोडा घेतो ..अश्या वेळी एकच सुई दोन तीन लोकांना वापरली जाते .. प्रत्येक वेळी डीस्पोजेबल सुई किवा सिरींज वापरण्याचे भान त्यांना कुठून असणार ? .. त्या ठिकाणी सरकार व सामाजिक संस्थांतर्फे अश्या लोकांना मोफत डिस्पोजेबल सिरींज वाटतात ..म्हणजे तुम्ही नशा करा ..नाहीतरी कितीही समजावले तरी तुम्ही नशामुक्त राहणे कठीण जातेय तुम्हाला ..पण किमान आम्ही देत असलेली डिस्पोजेबल सिरींज वापरून नशा करा म्हणजे किमान तुम्ही एच .आय .व्ही पासून तरी वाचू शकाल ..
माझे मुक्तांगण चे काम करताना ..काही व्यसनी मित्रांना मी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात देखील दाखल करत असे ...तेथील मानसोपचार तज्ञ डॉ. मनोहर पवार साहेब या कामात मला मदत करत असत .. काही लोकांकडे पुण्याला जावून उपचार घेण्याइतके पैसे नसत .. मग त्यांना एखादा आठवडा शासकीय रुग्णालयात दाखल करून त्यांचा शारीरिक त्रास ( टर्की ) घालविण्यासाठी म्हणून मी असा पुढाकार घेत होतो ..असाच एकदा मी माझा मित्र कादर ....राजू नावाच्या एका व्यसनीला घेवून शासकीय रुग्णालयात गेलो होतो ..तेथे त्या दिवशी तळमजल्यावर च्या एका वार्ड कडे जाणाऱ्या पँसेज मध्ये बरीच गर्दी जमलेली दिसली .. दोन पोलीस गर्दीला नियंत्रित करत होते .. काय प्रकार आहे ते पाहायला जरा पुढे गेलो आम्ही ..तर आतून मोठ्याने ओरडल्याचा ..विव्हळल्याचा आवाज येत होता ..चौकशी केली तेव्हा समजले कि आतल्या एका स्पेशल खोलीत ..नाशिकच्या सेन्ट्रल जेल मधून आणलेला एक ' एड्स ' चा कैदी ठेवलाय ..तो दिसावा म्हणून गर्दी जमली होती सगळी ..आणि तो कैदी म्हणे आतून मोठ्याने विव्हळत होता ...मला कुतूहल आटोक्यात ठेवणे कठीणच होते ..मी त्यावेळी खादीचा रंगीत कुर्ता आणि जीन्स .. खांद्यावर शबनम पिशवी आणि वाढलेली दाढी अश्या पत्रकार भासणा-या वेषात होतो ..मी एक आयडिया केली .. तेथे उभ्या असलेल्या एका पोलिसाला पटवले ..त्याला सांगितले कि मी पत्रकार आहे ..मला त्या व्यक्तीला फक्त एकदोन प्रश्न विचारायचे आहेत तेव्हा ..कृपया मला त्या खोलीत जायला परवानगी द्या .. थोडेसे आढेवेढे घेत तो पोलीस तयार झाला .. मात्र त्याने फक्त मला एकट्यालाच आता जायला परवानगी दिली ...मी जरा बिचकतच त्या विव्हळण्याचा आवाज येणाऱ्या खोलीकडे गेलो ..हळूच दारातून आतमध्ये नजर टाकली .. पलंगावर एक काळा..अतिशय कृश म्हणजे अगदी हाडांचा सापळा झालेला माणूस झोपला होता .. तो माझ्याकडेच पाहत होता .. डोळे खोल गेलेले .. निर्जीव भासणारे .. त्याच्या एका हातात बेडी अडकवून ती बेडी पलंगाच्या दांडीला बांधलेली होती .. मी घाबरतच आत प्रवेश केला ..मला पाहून त्याचे विव्हळणे बंद झाले होते ..त्याच्या चेहऱ्यावर थोडे आश्चर्याचे भाव दिसले .. खोल गेलेल्या आवाजात मला म्हणाला . ' माझ्या जवळ येवू नका कोणी ' तरीही मी पुढे झालो व बेडशेजारी असलेल्या स्टूल वर बसलो ...तो नकारार्थी मन हलवत राहिला ..' का येवू नको मी जवळ ? ' माझ्या प्रश्नावर तो क्षीण हसला .. ' तुम्ही शिकलेली माणसे ..मी तुम्हाला काय सांगू ..मला एड्स झालेला आहे .. माझ्या जवळ आला तर तुम्हाला पण होईल ' तो हलकेच उद्गारला .. मी पटकन हात पुढे करून त्याचा निर्जीव वाटणा-या हाताचा तळवा माझ्या हातात घेतला .. म्हणालो ' असा नाही होत एड्स ' .. त्याने पटकन माझ्या हातून आपला हात सोडवून घेतला .. म्हणाला ..' दोन दिवसांपासून इथे आणलेय मला .. सगळे जण अगदी डॉक्टर ..नर्स .सगळेच मला हाड हाड करतात .. मला सारखे संडास होत आहेत ..पण कोणीही मला मदत करायला पुढे येत नाहीय ..नुसते दुरून अंगावर गोळ्या फेकतात..स्वतच्या हाताने पाणी घे म्हणतात ..मला इतका अशक्तपणा आहे की उठून देखील बसता येत नाही ... माझ्या पोटात दुखते म्हणून मी ओरडतो ..तर मला रागावतात ..काल तर एक डॉक्टर वार्डबॉय ला म्हणाला ' याचे नरडे दाबा रे कोणीतरी ..कुठून ही कटकट आलीय आपल्या डोक्याला ' तो त्याची व्यथा सांगत होता ..
मी हळू हळू त्याला बोलते केले .. त्याला धीर दिला ..तेव्हा त्याची कहाणी समजली ती अशी ..कोल्हापूर जवळच्या एका खेड्यात याचे राहणे होते ..घरी चारीठाव दारिद्र्य .. बाप दारुड्या .. तीन भावंडे ..एकदा असेच नशेत बापाने याला खूप बदडले म्हणून हा तिरमिरीत वयाच्या बाराव्या वर्षी घर सोडून निघाला ..थेट मुंबई गाठली ..मुंबईत मग हमाली ..बूटपोलिश ..गाड्या पुसणे ..लहान सहान चोऱ्या करीत मोठा झाला .. सगळी व्यसने लागली .. पुढे एका त्याच्या सारख्याच एका मवाली मात्र विवाहित मित्राच्या झोपडीत पेइंग गेस्ट म्हणून राहू लागला ( मुंबईत झोपडीत देखील पेइंग गेस्ट ठेवतात ....हे मला तेव्हा समजले )..एकदा ह रात्री मित्र बाहेर असताना दारूच्या नशेत झोपडीत आला ..मित्राची बायको एकटीच होती घरात ..नशेत याची नियत बिघडली ..मित्राच्या बायकोवर जबरदस्ती करू लागला ..तो ओरडली म्हणून रागाने तिच्या डोक्यात कोपऱ्यात पडलेला पाट्याचा दगड घातला याने आणि तसाच नशेत बाहेर पळून गेला .. धोबीघाटावर जाऊन नशेत झोपला .. सकाळी पोलिसांनीच उठवले याला आणि घातले तुरुंगात ..जन्मठेपची शिक्षा भोगत होता सेन्ट्रल जेल मध्ये तेव्हा ..साधारण आठवर्षे शिक्षा भोगून झाल्यावर अचानक तब्येत बिघडली .. वजन कमी होऊ लागले ..जुलाब सुरु झाले .. काही दिवस जेलच्या दवाखान्यात उपचार घेतले .. तपासण्या झाल्यावर ' एड्स ' बद्दल कळले .. आता इथे आणले होते .. सगळेच अतर्क्य होते .. त्याला असा आजार असल्याचे निदान झाल्यापासून त्याच्याशी इतका प्रेमाने ..माणुसकीने ..बोलणारा मी पहिलाच त्याला भेटलो होतो .. अर्थात मला शास्त्रीय माहिती असल्याने मी त्याच्याजवळ गेलो होतो ..अन्यथा मी देखील गैरसमजांमुळे त्याच्या पासून दूर राहिलो असतो .. त्याच्या छातीपर्यंत ब्लँकेट घातलेले होते ..मी ते वर उचलले आणि प्रचंड दुर्गंधी आली .. जुलाब केल्यानंतर वेळच्या वेळी त्याला स्वच्छ केले गेले नव्हते ..म्हणून अशी दुर्गंधी .. सुमारे एक तास आम्ही बोलत होतो ..त्याला तू लवकर बरा होशील अशी शुभेच्छा दिली तेव्हा म्हणाला ' शाप देताय काय राव मला " असा आजार होऊन कोणी बरा होतो का ? ..मला तर कधी मी मरतोय असे झालेय ' मी जायला निघालो तेव्हा त्याने त्याची आठवण म्हणून उशीखाली ठेवलेले जेल मध्ये असते ते एक रुपयांचे कुपन मला दिले ..भेट म्हणून ..ते कुपन आजही माझ्या नाशिकला असलेल्या जयविजय निपाणीकर ( सासणे) नावाच्या मित्राकडे आहे सुरक्षित.. पुढे पंधरा दिवसातच स्थानिक वर्तमानपत्रात तो कैदी गेल्याची बातमी आली !
( बाकी पुढील भागात )
======================================================
फुल ऐसे भी है ..जो खिले ही नही ! ( पर्व दुसरे -भाग १९ वा )
एकदा दुपारच्या वेळी मी , अमित , जयविजय , कादर , असे सगळे गौड सरांच्या कार्यालयात बसलेले असताना .. एक साधारणपणे २० वर्षे वयाची मुलगी सरांना भेटायला आली होती..दिसायला अतिशय सुंदर ..मोठे बोलके डोळे .. लांब केसांची वेणी घातलेली .. हसतमुख .. सरांच्या केबिन मध्ये ती सुमारे दोन तास बसली होती ..मध्ये एकदा मी काहीतरी निमित्ताने केबिन मध्ये गेलो तर .. ती मुलगी डोळे पुसताना दिसली ..म्हणजे बहुधा रडत असावी .. माझे कुतूहल जागृत झाले होते .. ती गेल्या नंतर ..सरांना आम्ही विचारले तिच्या बद्दल .. तेव्हा सर गंभीर झाले .. आम्हाला सांगावे कि नाही या विचारात होते बहुधा .. म्हणाले .. ' त्या मुलीबद्दल खरे तर मी तुम्हाला काही सांगणार नव्हतो ..पण ती यापुढे आपल्या कडे रोज येणार आहे ..आपल्यासोबत काम करणार आहे .. तिच्या बाबत तुम्हाला योग्य ती माहिती असावी म्हणून सांगतोय शेवटी ..पण एक अट अशी आहे कि ..मी जी माहिती सांगेन ..ती ऐकल्यानंतर ..त्या मुलीसोबत बोलताना ..वागताना ..कुठेही तिच्याबद्दल तुम्हाला मी काही सांगितले आहे हे तिला जाणवत कामा नये .. तसेच तिला अजिबात वेगळेपणाची वागणूक द्यायची नाही ' सरांनी आमचे कुतूहल अजूनच वाढवले होते . आम्ही सरांच्या म्हणण्याला संमती दिल्यावर सरांनी तिच्या बद्दल जे सांगितले ते ऐकून आम्ही काही वेळ बधिरच झालो होतो .
अनिता म्हणूयात आपण तिला ( तिचे खरे नाव इथे लिहित नाही ) अनिता नाशिक जवळच्या एका खेड्यात राहणारी .. लहानपणीच तिचे आई वडील वारले .. ही चिमुकली अनाथ झाली .. घरची गरिबी होतीच ..एका काकाने ..अनिताला अनाथ म्हणून नाशिकच्या अशोकस्तंभां जवळ असलेल्या ' महिला आधाराश्रमात ' आणून ठेवले .. अनिताची दोन वेळच्या जेवणाची राहण्याची आणि शिक्षणाची व्यवस्था झाली .. अनिता अभ्यासात हुशार होतीच .. पाहतापाहता ती दहावीला गेली .. तिने आधाराश्रम हेच आपले घर मानले होते ..मनमिळावू आणि मदत करण्याच्या स्वभावामुळे तिने सर्वाना आपलेसे केलेले होते .. दहावीची परीक्षा अनिता चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाली ..तिला पुढेही शिकायचे होते ..पण दहावी झाल्यावर अचानक एके दिवशी तिला आधार आश्रमात ठेवणारा तिचा काका उगवला .. त्याला अनिताच्या जवाबदारीची जाणीव झाली होती .. तो तिला आता घरी घेवून जातो म्हणू लागला ..आश्रमाच्या लोकांनी त्याला समजावून सांगितले ..अनिताला अजून पुढे शिकायचे आहे वगैरे ..पण तो काही ऐकायला तयार होईना ..म्हणाला मी हिला माझ्या घरी घेवून जातो .. शेवटी नाईलाजाने अनिताला आधारआश्रमाचा निरोप घ्यावा लागला .. घरी नेल्यावर ..काही दिवसातच काकाने अनिताच्या लग्नाचा घाट घातला .. अनिताला बिचारीला निवड ..पसंती .. होकार नकार ..कसलाच अधिकार नव्हता .. आपण अनाथ आहोत ..त्यामुळे आपल्याला असले चोचले चालणार नाहीत हे बहुधा तिने मनाने स्वीकारले असावे ..काकाने एक स्थळ पाहून अनिताचे लग्न लावून दिले .. अनिताही नवीन संसारासाठी सज्ज झाली .. ती आपला स्वतचा संसार मिळणार म्हणून मनातून हरखली होती .. लग्नानंतर सासरच्या मंडळींची मने जिंकण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले .. समर्पण भावनेने संसारात रमली अनिता ..मात्र एक वर्षातच तिच्या नवऱ्याची तब्येत खराब झाली .. सारखा ताप येवू लागला ..अशक्तपणा .. भूक कमी होत गेली .. आधी घरगुती उपाय झाले ..मग डॉक्टरी उपाय सुरु झाले ..पण गुण काही येईना ... दिवसेंदिवस त्याची तब्येत बिघडतच गेली ..अनिता मनोभावे त्याची सेवा करत होती ..अगदी शेवटच्या टप्प्यात तिच्या नवऱ्याची एच. आय व्ही चाचणी करण्यात आली आणि समजले कि तो बाधित झाला आहे .. खूप उशीर झाला होता .. त्याची प्रतिकार शक्ती पूर्ण कोलमडली होती .. शेवटी लवकरच तो गेला ..
तो गेल्याबरोबर सासरच्या मंडळीनी अनिताला पांढऱ्या पायाची ठरवले .. तिला टोमणे मारू लागले .. डॉक्टरांनी सावधगिरी म्हणून अनिताचीही तपासणी केली ..तेव्हा अनिताही बाधित झालेली आढळली ..नवऱ्याने सुखा ऐवजी अनिताच्या पदरात हे दान टाकले होते .. झाले अनिता मुळेच आपल्या मुलाला ' एड्स ' झाला अशी सासरच्या लोकांनी बोंब ठोकली .. तिला घराबाहेर काढले ..काकाकडे गेली तेव्हा काकानेही हात वर केले .. अनिता पुन्हा एकदा अनाथ झाली .. बिचारी शेवटी नाईलाजाने पुन्हा आधाराश्रमात आश्रयाला आली ..मात्र तिच्या बरोबर तिच्या आजाराची सगळी कागदपत्रे असलेली फाईल होती ..ती फाईल वाचून आधार आश्रमाने तिला तेथे ठेवून घेण्यास नकार दिला ..अनिता सैरभैर झाली होती .. कोणाच्या तरी मदतीने तिने त्या वेळी राज्याच्या आरोग्य मंत्री असलेल्या मा . पुष्पाताई हिरे यांच्या कडे धाव घेतली .. आरोग्यमंत्र्यांनी योग्य ती दखल घेवून ..तिला आधार आश्रमात ठेवण्यात यावे अशा सूचना दिल्यावर .. तिला आधाराश्रमात ठेवले गेले मात्र सावधगिरी म्हणून अनिताला म्हणून वेगळी खोली देण्यात आली ....मग अनिता आपल्या आजाराबद्दल सखोल माहिती घेण्यासाठी गौड सरांकडे आली होती ..सरांनी तिला धीर दिला .. तिने जर योग्य काळजी घेतली पथ्ये पाळली ..तर ती सर्वसामान्य जीवन जगू शकेल असा तिला आत्मविश्वास दिला ..मग अनिता रोज सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळात ..ऑफिसला येवू लागली .. आमच्यात चांगलीच मिसळली .. हळू हळू थट्टा मस्करीत रमू लागली ...पुढे शिक्षण घेण्यासाठी तिने अभ्यास सुरु केला .. मी या कार्यापासून दूर गेल्यावर अनिताचे काय झाले माहित नाही .. या गोष्टीला आता २० वर्षे झालीत ..
अनिता प्रकरणा नंतर लक्षात आले ..की यापुढे लग्न जमवताना आता पत्रिका जुळविण्यापेक्षा ..वधू वरांचे एच . आय . व्ही बाधित नसल्याचे प्रमाणपत्र जुळणे अधिक महत्वाचे आहे .. हा आजार फक्त ठराविक लोकांपुरता मर्यादित नसून ..तो हळू हळू सगळीकडे हात पाय पसरतोय ..पुढे अशा अनेक केसेस मी पहिल्या ज्यात नीट चौकशी न करता लग्न लावले गेले आणि मग नंतर या आजाराची लागण होऊन नवरा आणि बायको दोघानाही प्राण गमवावे लागले ..मध्यंतरी एका मध्यमवर्गीय कुटुंबाने सामुहिक आत्महत्या केली .. आईवडील दोघेही बाधित होते .. जगण्याची त्यांची उमेद संपली होती ..त्यांनी आपल्या मागे मुलांचे काय होणार या विचाराने स्वतः देखील विष घेतले आणि दोन निष्पाप मुलांना देखील विष पाजून सामुहिक आत्महत्या केली .
( बाकी पुढील भागात )
======================================================
गर्दुल्ल्यांच्या गमतीदार व्यथा ! ( पर्व दुसरे - भाग २० वा )
डॉ . गौड यांच्या कामाबरोबरच माझ्या व्यसनमुक्तीच्या कामाचा व्याप देखील वाढत चालला होता ..रोटरी क्लब च्या हॉल वर दर बुधवारी आणि शनिवारी फॉलोअपला येणाऱ्या ..तसेच व्यसनमुक्ती चा सल्ला घेण्यासाठी येणाऱ्या लोकांमध्ये हळू हळू वाढ होऊ लागली होती .. प्रत्येक मिटिंग ला सुमारे २० ते २५ लोक जमू लागले होते ...नाशिक शहरातील सगळ्या ब्राऊन शुगर विक्रेत्यांनी माझी धास्ती घेतली होती .. कारण सगळ्यांना ठावूक झाले होते की मी रोज सुरेंद्र पाटील साहेबाना भेटतो ..त्यांना भीती होती की हा आपले नाव पाटील साहेबाना सांगेल तर आपल्यावर रेड पडू शकते ..माझ्या संपर्कात या निमित्ताने बरेच नवे गर्दुल्ले देखील आले .. ज्यांचे एक एक प्रताप माझ्यापेक्षाही खतर नाक असत ...व्यसनी व्यक्तीचे लग्न लावून दिले की तो सुधारेल असा एक सर्व साधारण गैरसमज आहे .. त्यानुसार अनेक पालक ..मुलीच्या घरातील लोकांना अंधारात ठेवून ..आपल्या घरातील व्यसनीचे लग्न करण्याचा घाट घालतात ..अशाच एका राजू नावाच्या मुलाच्या लग्नात तर गम्मतच झाली होती ...झाले असे की राजू मुक्तांगण मध्ये उपचार घेवून घरी आला ..तो दोन वेळा मिटिंग ला देखील आला .. आता मनापासून व्यसनमुक्त राहणार असे म्हणू लागला ..व्यसनाधीनता हा आजार इतका सोपा नाही ..राजूच्या घरातील मंडळीनी ..पुन्हा राजू ने व्यसनाकडे वळू नये म्हणून लग्नाचे गा जर दाखवले होते ..खरे तर किमान एक वर्ष व्यसनमुक्तीचे घालवल्या नंतरच लग्नाचा विचार व्हावा असे आम्हाला ' मुक्तांगण ' मध्ये सांगितले जायचे ..तसे न करता राजू जेमतेम एक महिना चांगला राहिला ..ऑटो चालवू लागला ..आणि घरच्या मंडळीना त्याच्या सुखी संसाराचे वेध लागले .. मी जेव्हा राजू च्या आईला भेटायला गेलो तेव्हा ..त्यांना स्पष्ट कल्पना दिली कि इतक्यात असे काही ठरवू नका ..त्यांनी दुर्लक्ष केले ' अहो आता त्याचे वय वाढतेय ..लहान भावंडांची लग्ने देखील याच्यामुळे खोळंबली आहेत .. लग्न झाले की सगळे सुरळीत होईल अशी आमची खात्री आहे ' असे म्हणू लागले .. एकदाचे लग्न ठरले ..पत्रिका वाटून झाल्या ..आणी लग्नाच्या पंधरा दिवस आधी राजू ने गडबड केली .. फक्त एकदाच असे स्वतःला बजावत त्याने ..ब्राऊन शुगर ओढली ..पुन्हा अडकला .. नुकतीच सुरवात असल्याने ..ताबडतोब घरच्या मंडळीना संशय आला नव्हता ..राजूला हळद लागल्यावर खरी गम्मत झाली ..त्याला कोणी बाहेर जावू देईना .. दुसऱ्या दिवशी लग्न होते .. राजू ने कसे तरी एका मित्राकडून ब्राऊन शुगर मागवली होती ..दुसऱ्या दिवशी सकाळपासून राजू लग्नाच्या विधीत अडकला .. त्याला ' टर्की ' सुरु झाली मात्र ..विधी सोडून संडासात ब्राऊन शुगर ओढायला जाता येईना .. शेवटी अगदी लग्न लागण्याच्या पाच मिनिटे आधी राजू बाथरूमच्या बहाण्याने सटकला .. अंगावर लग्नाचा सूट ..कोट ..टाय .. डोक्याला मुंडावळ्या बांधलेल्या अश्या अवस्थेत तो संडासात शिरला .. त्याचा ब्राऊन शुगरचा कार्यक्रम सुरु झाला .. १५ मिनिटे झाली तरी स्वारी बाहेर येईना ...इकडे मुहूर्त टळून चालला म्हणून राजूचे वडील ..संडास बाहेर उभे राहून राजूला हाका मारू लागले ..त्यांची अस्वस्थता वाढली होती .. सगळ्या नातेवाईकात नाचक्की होण्याची वेळ येत होती म्हणून ...त्यांनी शेवटी राजूला रागवायला सुरवात केली .. वडिलांचा असा लकडा पाहून घाई घाईने राजूने पन्नी गुंडाळली ..बाकी सर्व खिश्यात ठेवले ..मात्र ब्राऊन शुगर ओढायचा पाईप त्याने कानाला लावला होता तो काढायला विसरला ..संडासचे दार उघडून बाहेर पडला ..घामाघूम झालेला . हाताला पन्नीची काजळी लागलेली .. नाकाला देखील थोडे काळे लागलेले ..आणि कानाला पाईप ..वडील काय समजायचे ते समजले ..त्यांना राग अनावर झाला ..मा ........द असे म्हणत त्यांनी तेथेच राजूच्या थोबाडीत लावली ..आई मध्ये पडली .. वेळ निभावून नेली कशीतरी .. नंतर महिन्याभरातच राजूची पत्नी माहेरी गेली .. घटस्फोट झाला .. ऐकायला जरी प्रसंग गमतीदार असला तरी ..राजूच्या आईवडिलांना ..भावंडाना त्याच्या नववधू च्या कुटुंबियांना किती प्रचंड मनस्ताप आणि आर्थिक फटका बसला असेल याची कल्पना न केलेली बरी .
एकदा माझ्याकडे नाशिक मधील एक वकील महोदय आले होते ..त्यांचा लहान भाऊ ब्राऊन शुगर चा व्यसनी आहे असे त्यांनी मला सांगितले .. पूर्वी म्हणे नागपूरला दोन तीन वेळा त्याला मेंटल हॉस्पिटल माच्ये ठेवला होता .. मात्र तो देखील माझ्या सारखाच बाहेर पडला काही काळ चांगला राहून पुन्हा व्यसन सुरु करीत असे ..त्याचे नाव अजित ..नाशिक शहरातील प्रतीष्ठीत कुटुंबातील मुलगा .. घरची आर्थिक स्थिती उत्तमच होती .. भावंडांमध्ये सगळ्यात लाहात अजित .. लाडाने बिघडलेला .. त्याच्या वकील बंधूनी मला ..मी अजितला एकदा भेटून त्याला ' मुक्तांगण ' मध्ये उपचार घेण्यास तयार करावे अशी विनंती केली ..आणि मी अजित ला त्यांनी मला भेटायला पाठवले आहे असे सांगू नये असेही ते म्हणाले . हे म्हणजे जरा अवघडच होते .. अनेक पालक व्यसनी व्यक्तीला इतके घाबरत असतात की त्याला उपचार देण्यासाठी पुढाकार घ्यायला पण त्यांची तयारी नसते ..याचे प्रमुख कारण असे की ..व्यसनाधीनता या आजाराच्या धूर्त पणाचा भाग म्हणून प्रत्येक व्यसनी आपल्या व्यसनांबद्दल ..आपल्या झालेल्या नुकसानाबद्दल .. आपल्या कुटुंबियांना दोष देत असतो ..तसेच अजितचे झाले होते ..त्यामुळे त्याला घरातील कोणी पुढाकार घेवून व्यसनमुक्ती बद्दल काही समजावून सांगणे म्हणजे संकटच होते .. कारण घरातील सगळे त्याने शत्रू पक्षात टाकले होते .. अजितचा भाऊ असा घाबरत असल्याने ..मलाच पुढाकार घेणे भाग होते .. शेवटी एकदा मी अजितच्या भावाने दिलेल्या पत्त्यावर मेनरोडला गेलो ..अजित ची चौकशी केली ..तो घरात कधी असतो याची माहिती मी काढलीच होती ..त्यानुसार तो घरीच सापडला ..त्याला माझी ओळख करून दिली ... तुझ्या बद्दल मला एका गर्दुल्ल्या कडून माहिती मिळाली असे खोटेच सांगितले ..मी देखील पूर्वी ब्राऊन शुगर चा व्यसनी होतो हे ऐकून अजितला आश्चर्य वाटले ..आपण बाहेर बोलू असे म्हणून त्याने मला घराबाहेर आणले .. तेथे सुंदर नारायण मंदिराच्या खालच्या बाजूला असलेल्या गोदावरी नदीच्या काठावर आम्ही जावून बसलो .. अजित उंच ..देखणा .. निमगोरा .. होता .. एकंदरीत व्यक्तिमत्व छाप पाडणारे असेच होते !
मी त्याला बोलता केल्यावर तो स्वतची माहिती सांगू लागला
माझ्या सारखाच अजित वयाच्या १३ व्या वर्षीपासूनच भरकटायला सुरवात झालेली ..आधी शाळेला दांड्या मारून सिनेमा पाहणे ..आभ्यासाकडे दुर्लक्ष ..मग हळू हळू सिगरेट ..दारू ..गांजा ..आणि शेवटी ब्राऊन शुगर असा प्रवास ..बारावीनंतर शिक्षण सोडले .. घरातून रोज भांडून पैसे घेणे आणि व्यसन करणे हाच एकमेव उद्योग झाला .. नागपूरला नातलगांकडे ठेवले ..तेथेही तेच सुरु केले .. दोन वेळा नागपूरच्या मेंटल हॉस्पिटल मध्ये दाखल झाल ..बाहेर पाडला कि दोन महिन्यात पुन्हा जैसे थे .. एकदा घरातील लोकांनी पैसे देण्यास साफ नकार दिला .. हवे ते तमाशे कर आम्ही अजिबात पैसे देणार नाही असे बजावले ..याचे डोके फिरले .. माझ्या मार्गांनी मी पैसे मिळवीन असे म्हणत ..अशोक स्तंभा जवळ विकास थेटर वर आला ..नवीन सिनेमा लागला होता म्हणून गर्दी होती खूप ..याने एक मध्यम वयीन स्त्री एकटी पाहून तिचे मंगळसूत्र लांबवले ..जीवाच्या आकांताने पळू लागला .. संध्याकाळी साधारण सहाची वेळ ..रस्त्यावर गर्दी होती .. नीट पळता आले नाही ..शेवटी पकडला गेला .. आधी लोकांनी मारहाण केली नंतर ..प्रकरण पोलिसात गेले .. तेथून दुसऱ्या दिवशी नाशिक च्या सब जेल मध्ये टाकले याला .. टर्की सुरु होती .. प्रचंड वेदनामय अवस्था ..घरातील लोकांनी पैसे दिले नाहीत म्हणून चोरी करावी लागली हा राग डोक्यात .. जेलमध्ये त्या काळी चहा मिळत नसे ..त्या ऐवजी कांजी नावाचा प्रकार होता ..म्हणजे भाताची पेज .. याला टर्कीत भूक लग्ने शक्यच नव्हते .. तेथे गर्दुल्ल्या लोकांना त्यांच्या पोटातील घाण...उलट्या होऊन लवकर बाहेर पडावी म्हणून कोणीतरी वार्डन ने मिठाचे गरम पाणी पाजण्याची पद्धत सुरु केली होती .. अजितला ते मिठाचे पाणी जबरदस्ती पाजले गेले ..आणि याला तेथेच ' फिट ' आली .. बेशुद्ध पडला .. ताबडतोब नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले गेले .. त्याला अर्धांगाचा झटका आल्याचे निदान झाले ..हा सुमारे दोन महिने कोमात होता ..शुद्धीवर आला तेव्हा हात पाय लुळे पडलेले .. मात्र ज्या क्षणी शुद्धीवर आला त्या क्षणी याला आधी काय आठवले ते सांगताना अजित ने सांगितले ..की ' मी डोळे उघडले ..समोर आई दिसली .. माझी श्रुशुषा करण्यासाठी ती दिवस रात्र दवाखान्यात थांबे .. शुद्धीवर आल्यावर मला आधी आपण टर्की त होतो हे आठवले ..आणि मी उसळी घेवून बेड वरून उठून ' माल' आणायला जावे म्हणून उठू लागलो ..तेव्हा लक्षात आले की माझे पाय लुळे झालेत .. खूप रडलो .. सुमारे सहा महिने हॉस्पिटल मध्ये बेड वर पडून होतो .. फ़िजिओथेरेपी ..औषधोपचारांनी पुन्हा बरा झालो .. हिंडूफिरू लागलो ..एकदा प्यायला कौय हरकत आहे म्हणून एकदा घेतली आणि पुन्हा अडकलो ...
( बाकी पुढील भागात )
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें