बुधवार, 17 जुलाई 2013

साधी माणसे ... !

साधी माणसे ... ! ( पर्व दुसरे भाग ३६ वा )


सामाजिक कृतज्ञता शिबिराला आलेले प्रमुख अतिथी ..आयोजक .. मार्गदर्शक आणि कार्यकर्ते सगळे परिवर्तनाच्या ध्येयाने प्रेरित झालेले होता ..त्या सर्वांमध्ये संघर्षाचा जोश होता ..सरकारी यंत्रणा ..लालफितीचा कारभार ..सामाजिक भेद ..गलिच्छ राजकारण .. या साऱ्या गोष्टींचा तिटकारा असूनही सर्व परिस्थितीत आपले कार्य नेटाने सुरु ठेवण्याचे बळ त्यांच्याकडे होते ..आपापल्या कार्यक्षेत्रात धरणे ..मोर्चे .. वगैरे मार्गाने ते त्यांच्या उद्दिष्टांसाठी झटत होते ... प्रमुख अतिथींच्यानंतर मग एक एक कार्यकर्ते आपली ओळख देत आपल्या कामाचे स्वरूप सांगू लागले ..मी जेव्हा व्यसनमुक्ती चे कार्य करतो असे सांगून स्वतः देखील अनेक वर्षे व्यसनात अडकलो होतो असे सांगितले तेव्हा सर्वाना आश्चर्य वाटलेले दिसले .. असे उघडपणे बहुधा कोणी सांगत नाहीत म्हणून असावे ..माझे बोलणे झाल्यावर आदिवासी महिलांमध्ये काम करणारी एक कार्यकर्ती आपले अनुभव सांगत होती .. तेथे व्यसानींचे प्रमाण खूप जास्त आहे .. जेमतेम मिळणाऱ्या पैश्यात देखील पुरुष दारू पिऊन महिलांना मारहाण करतात .. त्यांचे पैसे हिसकावून घेतात .. वगैरे .महिलांच्या विकासात सर्वात मोठा अडथळा घरातील पुरुषच आहेत असे सांगत त्यांनी . ...गावातील दारूच्या भट्ट्या महिलांना संघटीत करून ...आंदोलन करून ..पोलिसात ताक्रार करून बंद पाडल्या ..तर म्हणे हे लोक दुसऱ्या गावात जावून दारू प्यायला लागले .... त्यावेळी मला ' धिंड ' नावाची बहुधा शंकर पाटील यांची कथा आठवली ..त्यात गावातले निर्व्यसनी लोक व्यसनी व्यक्तींना धाक बसावा म्हणून ..दारू पिऊन आले कि त्यांची गाढवावरून धिंड काढायचे ठरवितात ..त्याप्रमाणे एक जण सायंकाळी जेव्हा पिऊन येतो तेव्हा .. सगळे गावकरी त्याच्या तोंडाला काळे फासून ..ढोल ताश्यांच्या गजरात त्याची गाढवावरून धिंड काढतात .. रात्री १२ वाजेपर्यंत हा तमाशा चालतो ..अर्थात तो दारुडा हे सगळे मुकाट सहन करत असतो ..तोंडाने असंबद्ध बडबड सुरूच असते त्याची .. शेवटी सगळे थकून भागून धिंड थांबवितात ..व त्या दारुड्याला त्याच्या घरी सोडतात ..नंतर रात्रीच परत दोन तासांनी सगळे गावकरी थकून झोपले असताना तो दारुडा परत पिऊन येतो व .. चला पुन्हा ' धिंड ' काढा म्हणतो .. म्हणजे ' निर्लज्जं सदा सुखी ' असाच प्रकार होता ... !



शिबिरात जेवणाची व्यवस्था भारतीय बैठक टाकून केली होती ..सतरंज्या घालून ..पत्रावळीत सगळे जेवले ..अगदी साधा पण चविष्ट असा बेत होता ..वांग्याची भाजी .. पोळी ..वरण भात .. प्रमुख अतिथी देखील कार्यकर्त्यांच्या मांडीला मांडी लावून खाली बसून जेवले .. हे विशेष.. मला हे सगळे लोक खूप आवडले ..नुसते परिवर्तन झाले पाहिजे अश्या बोंबा ठोकून परिवर्तन होत नाही ..तर त्यासाठी तळागाळात .. जावून काम करावे लागते .. लोकांची माने जिंकावी लागतात .. या विचारांनी ते अतिशय तळमळीने काम करत होते .. अतिशय साधी राहणी ...उच्च विचारसरणी ...खूप शिकायला मिळाले या शिबिरात मला .. नंतर पुन्हा दोन महिन्यांनी ' पिंपळनेर ' या गावी देखील ' विषमता निर्मुलन परिषद ' झाली तेथे देखील मी उपस्थित होतो .. त्यावेळी ' ओबीसी ' आरक्षणाचा मुद्दा एरणी वर होता .. त्या परिषदेत अनेकांनी आरक्षणाच्या बाजूने आपले विचार मांडले ..काही जण आर्थिक निकषावरील आरक्षणाच्या बाजूने बोलले ....काहींनी आरक्षण व्यक्तीला दुबळे करू शकते अशीही मते मांडली .. मात्र सगळे अगदी संयमित भाषेत चालले होते हे विशेष .. अरेरावी .. उद्धटपणा .. आरोप - प्रत्यारोप न करता शांतीपूर्ण वातावरणात चालले होते ... आपणच सर्वज्ञ आहोत असा आवेश नव्हता ..या सगळ्यांचे कार्य पाहून आपण उगाच व्यसनात इतकी वर्षे वाया घालविली याची मला खंत वाटली ....जगात करण्यासारखे खुपो खूप काही असते ..वेळ सत्कारणी लावण्यासाठी अनेक गोष्टी असतात आसपास .. फक्त तुमचा दृष्टीकोन सकारात्मक असला पाहिजे म्हणजे सगळे नीट होते ... 



नंतर एक शिबीर ओरंगाबाद येथे ' महात्मा गांधी मिशन ' या ठिकाणी झाले .. त्या शिबिरात एक बहुधा बोऱ्हाडे नावाचा एक सर्पमित्र आला होता .. त्याने सोबत एक छोटासा साप देखील आणला होता .. हा कार्यकर्ता अतिशय हुरहुन्नरी होता .. रस्त्यावर पोपट घेवून बसणारे जोतिषी ..भविष्य सांगत दारोदारी फिरणारे ..वगैरे लोकांची तो छान नक्कल करीत असे .. अगदी हुबेहूब .. त्याच्या जवळ असलेल्या साधारण फुटभर सापाची सर्वाना भीती वाटत होती ..मात्र तो अगदी निर्विकार पणे तो साप खिश्यात घेवून फिरत होता .. मला लहानपणा पासून सापांची भीती वाटत होती ..टी भीती काढून टाकायला म्हणून मी मुद्दाम तो साप हाताळला .. साप योग्य पद्धतीने कसा हाताळायचा हे त्यानेच मला शिकवले ..सापांबद्दल असलेल्या अनेक अंधश्रद्धा कशा निरर्थक आहेत हे त्याच्याकडूनच समजले ..सापाची भीती घालवायची असेल तर एकदा साप चावून घ्यायला हवा असे त्याचे म्हणणे होते .. मग मी देखील इरेला पडून साप हाताला कसा चावतो तो अनुभव घेतला ..अर्थात हा साप बिनविषारी होता .. त्या सापाने जरा चिडवताच मी पुढे केलेल्या हातावर झडप घातली .. आपले लहानखुरे दात रुताविले माझ्या मनगटात .. फक्त एक सेकंद जरा काहीतरी टोचल्या सारखे झाले .. नंतर आवेश संपताच सापाने स्वतःहून तोंड बाजूला केले ..अगदी जरासे रक्त आले होते .. पण एकदाचा साप चावण्याचा अनुभव घेवून झाला होता ..सापांबद्दल मनात असलेली भीती ..अढी नष्ट झालेली होती .. अर्थात हे मी एका तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली केले होते .. असे धाडसी प्रयोग करण्याचा माझा मुळचा स्वभाव असल्याने मला ते जमले !



( बाकी पुढील भागात )


===================================================

व्यस्त दिनक्रम ! (पर्व दुसरे -भाग ३७ वा ) 

औरंगाबादच्या शिबिरानंतर माझ्या कामाचा व्याप खूप वाढला होता .. सकाळी मी घरून ९ वाजता जो डबा घेवून निघे ते एकदम रात्री १० पर्यंत घरी येत असे .. रोटरी हॉल मध्ये देखील मिटींगला येणाऱ्या मित्रांची संख्या वाढली होती .. नेहमी प्रमाणे एकदा पाटील साहेबांकडे गेलो असता ..तेथे पोलीस उपयुक्त श्री . मकरंद रानडे साहेब बसलेले होते .. त्यांनी मला सांगितले कि आपण लवकरच नाशिक शहरातील वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालण्याचा प्रयत्न म्हणून नाशिक मध्ये एक तीन दिवसांचे ' व्यसनमुक्ती अभियान ' आयोजित करणार ' आहोत त्या कामी तुझी मदत लागेल आम्हाला ..मी आनंदाने होकार दर्शविला .. त्यांनी मला नाशिक मधील अवैध दारूचे अड्डे ..ब्राऊन शुगर विक्रेते यांच्या बद्दल माहिती विचारली ..मला अवैध दारूच्या अड्ड्यांची फारशी माहिती नव्हती ..उलट पोलिसांनाच त्या बाबत अधिक माहिती आहे असे मी सांगितले .. मात्र ब्राऊन शुगरचे सगळे विक्रेते मला ठावूक होते .. सुरवातीला जेव्हा ब्राऊन शुगर नाशिक मध्ये विकायला सुरवात झाली तेव्हा ..विक्रेते केवळ जास्तीत जास्त पैसा कमविण्याच्या हेतूने या व्यवसायात होते ..नंतर सुमारे दहा वर्षांनी अशी परिस्थिती आली होती की ब्राऊन शुगर विक्री करणारे बहुतेक विक्रेते हे स्वतः व्यसनी होते .. स्वतःचे व्यसन भागविण्यासाठी ते हे काम करू लागले होते .. अश्या लोकांना अटक करून केस करण्याऐवजी जर त्यांना ' मुक्तांगण ' मध्ये व्यसनमुक्तीचे उपचार दिले व त्यांना गर्द विक्री करू नये अशी ताकीद दिली तर अधिक योग्य होईल असे माझे मत मी त्यांना सांगितले ..रानडे साहेबानाही ते पटले .. त्यांनी मग मला सगळ्या विक्रेत्यांना भेटून जे व्यसनी आहेत त्यांना उपचारांसाठी प्रवृत्त करण्याची जवाबदारी दिली ...जर ते ऐकायला तयार नसतील तर ..मग रानडे साहेब त्यांच्या वर केस करून त्यांना जेल मध्ये पाठवायला तयार होते .. रानडे साहेब कडक शिस्तीचे अधिकारी असा त्यांचा नाव लौकिक होता ..नाशिकच्या बी.वाय के ., एच. पी.टी ., आर .वाय .के या कॉलेज परिसरात फिरणाऱ्या ...मुलींची छेड काढणे , दंगा करणे , वगैरे करणाऱ्या मुलांना दहशत बसावी म्हणून त्यांनी सतत कॉलेजला जावून तेथील मुलांचे ओळखपत्र तपासण्याची ..व ज्यांच्याकडे ओळखपत्रे नसतील अश्या लोकांवर कारवाई करण्याची यशस्वी मोहीम राबविली होती ..उघड्या मारुती जिप्सी मधून ते नेहमी मेनरोड ..महात्मा गांधी रोड ..कॉलेज रोड ..वगैरे महत्वाच्या आणि रहदारीच्या रस्त्यावरून राउंड घेत असत ..गुंडांना त्यांची चांगलीच दहशत बसली होती .


व्यसनमुक्ती अभियाना साठी त्यांनी पुण्याहून बाबा व मँडम या दोघानाही निमंत्रित करण्याचे ठरविले होते ... अभियानाला अजून एक महिना बाकी होता .. या अभियानाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचे असे त्यांनी मला विचारले असता मी माझ्या आधी नाशिक मध्ये व्यसनमुक्तीचे कार्य करणाऱ्या संजय या कार्यकर्त्याचे नाव सुचवले...त्याला त्यांनी संमती दर्शविली ..याच काळात एकदा कादर ने पुन्हा गडबड केली ... त्याने गुपचूप व्यसन सुरु केले जेमतेम दोन तीन वेळा तो पुन्हा ब्राऊन शुगर प्यायला ..घरातून पैसे चोरले ..भावाच्या ते लक्षात आले तेव्हा भावाने त्याला घरातून हाकलून दिले .. कादर माझ्याकडे येवून माफी मागू लागला ..त्याच्या घरी जावून मी मध्यस्ती करावी असे त्याचे म्हणणे होते ..अर्थात मला अशी मध्यस्ती करणे योग्य वाटले नाही ..कारण कादरचे दोघेही भाऊ माझ्या फारश्या ओळखीचे नव्हते .. पण कादरला त्यांनी घरातून बाहेर काढले होते व त्याने कुठे राहायचे हा मोठा प्रश्न होता ..कादर जरी पुन्हा प्यायला होता तरी त्याची व्यसनमुक्तीची इच्छा होतीच ... डॉ .गौड यांच्या एड्स निर्मूलनाच्या कार्यात माझ्या सोबत सामील असल्याने... मी डॉ . गौड यांना कादरची अडचण सांगितली ..त्यांना विनंती केली कि त्यांनी कादरला त्यांच्या sos च्या ऑफिसात राहायला परवानगी द्यावी ..तसेच त्याला त्यांच्याकडे पगारी कार्यकर्ता म्हणून कामाला ठेवावे .. म्हणजे कादरची राहण्याची व जेवणाच्या खर्चाची देखील सोय झाली असती ..कादर अतिशय हुशार आहे ..चांगला कार्यकर्ता आहे .. वगैरे डॉ . गौड यांना मान्यच होते परंतु ..कादरच्या व्यसनमुक्तीची मात्र त्यांना खात्री नव्हती ..त्यांचे ऑफिस आणि पँथालाँजीची लँबोरेटरी एकाच विभागात होती ..लँबोरेटरी मध्ये अनेक घातक अशी रसायने असत .. अँसीड्स असत .. कादरने त्या ठिकाणी निवासी म्हणून राहणे त्यांना धोक्याचे वाटत होते ..त्यांनी मला अशी अट घातली कि जर तू कादर सोबत त्या ठिकाणी रात्रीचा झोपणार असशील तर मी परवानगी देईन ..कादर वर एकट्यावर माझा विश्वास नाही ..कारण व्यसनी माणूस पैसे मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जावू शकतो .. लेबोरेटरीच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते ठीक नव्हते ..गौड सरांची अट मी ताबडतोब मान्य केली ..कारण त्यामुळे कादरच्या राहण्याची व्यवस्था होऊ शकली असती ..तसेच गौड सरांनी कादरला एक वेळचा म्हणजे रात्रीचा जेवणाचा डबा त्यांच्या खर्चाने लावून देण्याचे मान्य केले ..कादरच्या रात्रीच्या जेवणाची जवाबदारी मी घेण्याचे ठरविले .. मी घरी आईला उद्यापासून मी गौड सरांकडे झोपायला जाणार आहे असे सांगितल्यावर आईने त्याला हरकत घेतली .. आपले घर सोडून रात्रीचे असे दुसरीकडे मुक्कामाला राहणे तिला मान्य नव्हते .. मात्र माझ्या हट्टापुढे तिचे काही चालले नाही ..

लगेच दुसऱ्या दिवसापासून मी सकाळी नऊला घरातून बाहेर पडताना मी माझा सकाळचा व संध्याकाळचा देखील डबा घेवून बाहेर पडू लागलो .. दिवसभर फॉलोअप ..डॉ . गौड यांचे काम .. रात्री डॉ . गौड यांच्या लेबोरेटरीच्या एका छोट्याशा खोलीत मुक्काम ..सकाळी उठून पुन्हा सायकलवरून घरी येऊन अंघोळ वगैरे करून डबा घेवून बाहेर ..असे माझे व्यस्त रुटीन सुरु झाले ..एक प्रमुख अडचण अशी उरली की कादरला रात्रीचा एकवेळचा डबा डॉ . गौड यांनी लावून दिला होता त्याच्या दुपारच्या जेवणाची सोय म्हणून मी माझ्या घरून जो माझा दोन वेळचा मिळून डबा घेवून येत असे त्यात कादर व मी असे दुपारी जेवत होतो ..बहुधा तो डबा दुपारीच संपत असे ..मग कादरच्या रात्रीच्या डब्यात मी भागीदार होई ..अर्थात हे रात्रीचे जेवण आम्हाला पुरत नव्हते ...कादरने पुन्हा पिणे सुरु केले म्हणून त्याला घरातून हाकलून दिलेय वगैरे गोष्टी मी घरी सांगितल्या नाहीत कारण मग त्यावरून आई व भाऊ नसत्या जवाबदा-या घेवू नको असे म्हणाले असते .. मला मिळणारे मानधन तुटपुंजे होते त्यामुळे मी घरी काही पैसे देवू शकत नव्हतो .. अश्या वेळी कादर साठी म्हणून वेगळा जेवणाचा डबा मी घरी मागू शकत नव्हतो .. एकंदरीत पोटभर जेवणाची अडचण सोडता कादरचे व माझे गौड सरांच्या ऑफिसात राहणे सुरळीत सुरु झाले ..या मुळे माझी दगदग वाढली होती हे नक्की ..मात्र आपण कादरला मदत करतो आहोत या भावनेने या दगदगीचे काही वाटत नव्हते ...रोटरी क्लब हॉल येथे सोमवार पेठेतील एक संदीप नावाचा मुलगा मुक्तांगण मधून उपचार घेवून आल्यावर नियमित मिटिंगला येत असे ..तो पूर्वी दारू पीत असे .. त्याच्या मतदारसंघाचे नगरसेवक श्री .विजय साने यांना संदीप चांगला राहतोय हे समजल्यावर त्यांनी संदीपला भेटून माझी माहिती काढली व एकदा मला श्री . विजय साने यांनी भेटायला बोलाविले ..त्यांनी माझ्या कामाचे कौतुक करून नाशिक मध्ये देखील ' मुक्तांगण ' सारखे व्यसनमुक्ती केंद्र सुरु झाले पाहिजे असे सांगून त्यसाठी जर मी पुढाकार घेतला तर मदत करण्याची तयारी दर्शविली ..

( बाकी पुढील भागात )

===================================================


दिन ढल जाये हाये ...रात ना जाये ! (पर्व दुसरे -भाग ३८ वा )


घरचा विरोध असूनही...कादर आणि मी रात्रीचे डॉ . गौड यांच्या लेबोरेटरीत मुक्कामाला राहायला लागलो ... ... पहिल्या दिवशी रात्री आम्ही सुमारे पहाटे चार पर्यंत गप्पा मारत होतो .. तेथे गौड सरांकडे कामाला असलेला सोमनाथ नावाचा मुलगा देखील रात्रीचा राहत असे .. हा सोमनाथ घरचा खूप गरीब ..खानदेशातला .. अतिशय चुणचुणीत .. फारसा शिकलेला नसूनही ... लेबोरेटरी चा स्वागत विभाग लीलया सांभाळत असे ..लेबोरेटरीतील एका खोलीत आमची झोपायची व्यवस्था होऊ शकली होती ..तेथे झोपायला गादी मिळणे शक्य नव्हते ..तसेच उश्या देखील नव्हत्या .. गालीच्या वर झोपावे लागे .. उशी म्हणून आम्ही खुर्ची वर ठेवायचे रेग्झीनचे कुशन वापरत होतो ..कादर आणि मी आम्ही दोघेही अतिशय बोलके असल्याने ..रात्री उशिरा पर्यंत गप्पा मरणे रोजचे झाले .. सोबत सोमनाथचा टेप रेकोर्डर होता .. मी घरून आशा भोसले ..लता मंगेशकर ..सुधीर फडके .. अरुण दाते .. मोहम्मद रफी ..मुकेश ..किशोरकुमार ..अशा एकसे एक गाण्याच्या कॅसेटस नेल्या होत्या ..दिवसभर उन्हातान्हात फिरूनही ..रात्री झोप काही लवकर येत नसे ..कादर देखील माझ्यासारखाच खूप संवेदनशील होता ..एकमेकांच्या जुन्या आठवणी काढत वेळ कसा जाई ते समजत नसे ..अनघाची आठवण अपरिहार्यच .. व्यसनमुक्तीची तीन वर्षे पूर्ण झाली होती ... आता तब्येतही चांगली झालेली .. घरात ..समाजात ..गमावलेला मान - सन्मान पुन्हा मिळू लागला होता .. तरीही हे सगळे मिळवताना आपण अनघाला गमावले याची खंत वाटे .. तो एक क्षण ..ज्या वेळी अनघाचा मला फोन आला होता कि तुषार तू लवकर इथे निघून ये ..त्या क्षणी मी ताबडतोब जाऊ शकलो नव्हतो हे शल्य मनाला कायम टोचत राही ...त्या एका क्षणी दाखवलेल्या बेपर्वाईने मला अनघाला कायमचे गमवावे लागले ..दिवसभर कामात निघून गेला तरी रात्र मला व्याकूळ करत असे ...जुनी हिंदी गाणी ऐकत कादर आणि मी आमच्या गत जीवनातील आठवणीना उजाळा देत असू .. त्यात ' यार ..लेकीन अभी वो नही मिल सकेगी ' हे दारूण सत्य स्वीकारताना मनाची खूप तडफड होई ..देव ..नियती ..नशीब .. हे जे काही आहे ते किती निष्ठुर आहे असे वाटे ..प्रत्येकाला काहीतरी दुखः वाढून ठेवले आहे ..सगळ्या प्रकारच्या सुखात आकंठ बुडालेले असताना देखील ते काहीतरी न मिळाल्याचे ..गमावल्याचे .. दुखः नेमके उसळी मारून वर येते आणि माणसाला वाकुल्या दाखवते ..त्याच्या असहायतेची जाणीव करून देते .


व्यसनमुक्ती अभियानाची तयारी सुरु झाली होती ..मी सगळ्या गर्द विक्रेत्यांना व्यक्तिगत भेटून त्यांना गर्द विक्री बंद करण्यासाठी तसेच उपचार घेण्यासाठी प्रेरित करत होतो .. ते सारे स्वतः व्यसनी असल्याने ..स्वतचे व्यसन भागविण्यासाठी गर्द विक्रीचा व्यवसाय करत होते .. आता झटपट भरपूर पैसे मिळविण्याची चटक लागलेली ..त्यामुळे सहजासहजी असा धंदा बंद करणे त्यांना मानवणारे नव्हते ..एक दोन जण उपचारांसाठी मुक्तांगणला गेले ..बाकीचे हो ..नाही करत वेळ काढत होते .. मात्र ते सगळे मला अतिशय सन्मान देत असत ..मी त्यांच्या विभागात थांबला असे पर्यंत कोणीही गर्द विक्री करत नसत ..एखाद्या विभागात मी जास्त काळ चहा पाणी करत थांबलो की त्या विभागातील गर्द विक्रेते विक्री बंद ठेवत असत .. शेवटी गर्दुल्ले मित्र मला विनंती करत ' तुषार भाऊ ..तुम्ही इथे उभे आहात त्यामुळे आम्हाला गर्द मिळत नाहीय ..तुमचे काम झाले असेल तर तुम्ही लवकर जा ' ... मुकांगणला उपचार न घेता केवळ माझ्या समुपदेशना मुळे ...चांगला राहणारा अभय नियमित मिटींगला येत होता .. तो चांगला राहतो आहे म्हणून स्क्रीन प्रिंटींगचा व्यवसाय करणाऱ्या त्याच्या लहान भावाने मला आग्रहाने ..माझे ' व्हिजिटिंग कार्ड्स ' विनामुल्य छापून दिले होते ..एकदा मिटिंगला आलेल्या एका दारुड्याला मुक्तांगण मध्ये उपचार घेण्याचा खर्च परवडत नव्हता म्हणून ..मी त्याला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता ..नाशिकच्या शासकीय रुग्णालयात देखील एक ' व्यसनमुक्ती कक्ष ' होता .. डॉ . मनोहर पवार हे मानसोपचार तज्ञ या विभागाचे काम पाहत असत ..त्यांना व्यसनमुक्तीच्या कार्याची खूप आवड होती .. माझ्या बद्दल माहिती मिळाल्यावर त्यानी मला जमेल ती मदत करायचे ठरविले होते ..तर त्या दारुड्याला शासकीय रुग्णालयात भरती केल्यावर कदाचित दारूच्या ओढीने किवा टर्की मुळे तो तेथून पळून जाऊ नये म्हणून त्याच्यापाशी रात्री कोणीतरी थांबणे गरजेचे होते ..मी अभयला तशी विनंती केली ..अभय दोन रात्री त्याच्या जवळ थांबायला तयार झाला .. यात एक चूक अशी झाली की पहिल्या दिवशी अभय शासकीय रुग्णालयात त्या दारुड्या वर लक्ष ठेवायला म्हणून थांबलेला असताना ..सहज झोप येत नाही म्हणून मी व कादर रात्री दोन वाजता डॉ . गौड यांच्या ऑफिस मधून फेरफटका म्हणून शासकीय रुग्णालयात गेलो ..अभय देखिल जागाच होता .. पाच मिनिटे तेथे थांबलो होतो ..तितक्या वेळात अभय व कादरचे काहीतरी बोलणे झाले ..मी जवळ नव्हतो ..म्हणून मला ते नेमके काय बोलले ते समजले नाही .. दोन दिवसांनी अभय मिटिंग ला आला तेव्हा त्याचे डोळे लाल झालेले ..जीभ बोलताना जीभ अडखळत होती ..दारूचा वास तर येत नव्हता .. मग काय भानगड असावी ते समजेना .. मी अभय ला खोदून खोदून विचारले ' तू काय नशा केली आहेस ते खरे सांग ' पण तो काहीच कबुल करेना .. मी अभयवर चिडलो होतो ..तू काय केले आहेस ते सांगितल्या शिवाय माझ्याशी बोलू नकोस असे रागाने त्याला म्हणालो !

मी रागावलेला पाहून अभय माझ्यापासून जरा दूर .. एका बाकावर जाऊन बसला ..मग कादर भामट्या सारखा माझ्याजवळ येवून माझी माफी मागू लागला ..काय प्रकार आहे ते कळेना .. कादर म्हणाला तू अभयला रागावू नकोस ..यात माझी चूक आहे ..परवा रात्री आपण शासकीय रुग्णालयात अभयला भेटलो असताना ..अभय मला म्हणाला ..ज्याच्यासाठी मी जागरण करतोय तो पेशंट त्याला डॉक्टरनी झोपेचे इंजेक्शन दिल्याने मस्त झोपलाय .. मला जरा कंटाळा आलाय .. इथे दवाखान्यात असलेल्या औषधे . .गोळ्या यांच्या वासाने कसेतरी होतेय ..तेव्हा मी अभयला सहजच म्हणालो ..तुला झोपायचे असेल तर सिस्टरला एखादी झोपेची गोळी माग ..देतील सिस्टर .. मग कदाचित अभयने सिस्टर कडून एक झोपेची गोळी घेतली असेल ..त्याला आवडली म्हणून आज देखील त्याने बहुधा झोपेच्या गोळ्या खाल्ल्या असतील .. मी कादर वर चिडलो ..तुला हा आगावूपणा करायला कोणी सांगितला होता म्हणून त्याला खूप रागावलो ...एखाद्या व्यसनी दारू ..गर्दे ..गांजा ..अथवा इतर व्यसन बंद केले असताना ..त्याने पर्यायी म्हणून कोणत्याही प्रकारचे इतर मादक पदार्थ सेवन करता कामा नये ..कारण याची मुळची आहारी जाण्याची वृत्ती असल्याने ..तो त्या पर्यायी नशेच्या आहारी जाऊ शकतो ..तसेच काही दिवसातच त्याचे मूळ व्यसन देखील सुरु होते ...अनेक जण अशी पर्यायी नशा करण्याच्या प्रयत्नात पुन्हा पुन्हा त्याच चक्रात अडकतात ..अभयचे तसेच झाले होते ..सुमारे एक वर्षभर चांगला असलेला अभयने कादारच्या सांगण्यावरून एकदाच म्हणून झोपेची गोळी घेतली होती ..आणि त्याला झोपेच्या गोळ्यांची चटक लागली होती .. मग मी अभयला समजावून सांगितले ..त्याने माझी माफी मागून पुन्हा झोपेच्या गोळ्या खाणार नाही असे आश्वासन दिल्यावर माझे समाधान झाले .

( बाकी पुढील भागात )



===================================================

जय्यत तयारी ! (पर्व दुसरे -भाग ३९ वा ) 

व्यसनमुक्ती अभियानाचे श्री . मकरंद रानडे साहेब यांनी भलतेच मनावर घेतले होते . जास्तीत जास्त तरुणांनी .. कुमारवयीन मुलांनी यात सामील व्हावे अशी त्यांची इच्छा होती ..तसेच नाशिक शहरातील सर्व व्यसनी व्यक्तींनी देखील या अभियानात सहभागी होऊन व्यसनमुक्तीचा निर्धार करावा असे त्यांना वाटत होते ..त्यासाठी त्यांनी नाशिक शहरातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची एक बैठक आयोजित केली ..त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी व्यसनमुक्ती अभियानाच्या उद्घाटन सोहळ्या आधी काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेला सामील करावे म्हणून एकेकाला जवाबदा-या वाटून दिल्या ..या बैठकीला त्यांनी मलाही आमंत्रित केले होते ..एकदा मग त्यांनी रोटरी क्लब हॉल मध्ये मिटिंगला येणाऱ्या सर्व व्यसनी लोकांची माझ्याकडे असलेली यादी तपासली .. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही रोटरी क्लब हॉल मध्ये आठ -दहा जण मिटिंगला जमलो असताना ..अचानक पोलिसांच्या दोन मोठ्या निळ्या गाड्या आल्या ..त्यामागे रानडे साहेबांची जीप होती .. रानडे साहेबांबरोबर जीप मध्ये सुरेंद्र पाटील साहेब पण होते .. पटापट जीप मधून उतरून हे सरळ हॉल मध्ये आले .. मला काय प्रकार आहे ते समजेचना .. मग त्या दोन मोठ्या निळ्या गाड्यातून २० ते २५ गर्द्दुले उतरले त्यांच्या मागे चार पोलीस .. सगळी वरात हॉल मध्ये पोचली .. आमच्या मिटिंगचा ताबा रानडे साहेबांनी घेतला .. म्हणाले आपल्या शहरात होणाऱ्या व्यसनमुक्ती अभियानाचा जास्तीत जास्त व्यसनी लोकांनी लाभ घ्यावा म्हणून जे लोक मिटिंगला येत नाहीत अश्या गर्द्दुल्ल्याना आम्ही पकडून येथे मिटिंग साठी आणले आहे ..आपल्याला पकडून कुठे घेवून जात आहेत हे न समजल्यामुळे गांगरलेले ते गर्द्दुल्ले ..त्यांना व्यसनमुक्ती च्या मिटिंगला सक्तीने धरून आणले आहे हे समजल्यावर आनंदी झाले .. नाशिक शहरातील गर्द पिण्याची जी काही गुप्त ठिकाणे होती तेथे जाऊन पोलिसांनी त्यांना धरून आणले होते .. त्या मिटिंग मध्ये रानडे साहेबांनी सर्व गर्द्दुल्यांशी संवाद साधला .. व्यसनमुक्तीचे उपचार घेण्यात काय अडचणी आहेत ते विचारले ..बहुतेकांचे एकच उत्तर होते ..उपचार खर्च परवडत नाही ..घरचे लोक विश्वास ठेवत नाहीत .. या पूर्वी एकदोनदा उपचार घेतले आहेत तरीही पुन्हा व्यसन सुरु झाले म्हणून सुधारणेचा आत्मविश्वास नाही..व्यसन नाही मिळाले तर होणाऱ्या शारीरिक ..मानसिक त्रासाची ( टर्की ) भीती वाटते हे कारण तर सामायिक होते .. त्यांना सर्वाना उपचारांसाठी आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले साहेबांनी ..मात्र नियमित मिटिंगला येणाऱ्या लोकांनाच मदत मिळेल हे स्पष्ट केले ..


व्यसनमुक्ती अभियान एकूण तीन दिवस असणार होते .ही घटना मार्च १९९४ ची आहे ... २ , ३ ४ मार्च रोजी हे व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात येणार होते ..पहिल्या दिवशी सकाळी व्यसनमुक्ती शोभायात्रा .. नंतर अभियानाचे उद्घाटन .. प्रमुख अतिथी डॉ . अनिल अवचट व डॉ . अनिता अवचट यांचे मनोगत .. माझे मनोगत .. आणि शेवटी समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री . जोशी साहेब यांचे भाषण ...नंतर सायंकाळी व दुसऱ्या दिवशी विविध भागात पथनाट्ये ..आणि शेवटच्या दिवशी कालिदास नाट्यगृहात समारंभाचा समारोप ..असा भरगच्च कार्यक्रम ठरला होता ..या साठी मुक्तांगण मधून पथनाट्य करणारी टीम देखील येणार होती बाबा आणि मँडम सोबत .. अभियानाच्या आठ दिवस आधी भद्रकाली पोलीस स्टेशनला गेलो असताना रानडे साहेबांनी अभियानाचे उद्घाटन माझ्याच हस्ते व्हावे अशी इच्छा व्यक्त केली ..मला हे अनपेक्षित होते .. माझ्या आधी मुक्तांगण तर्फे व्यसनमुक्तीचे काम करणाऱ्या संजय निखाडेचे नाव मी सुचविले होते ..व त्यास त्यांनी पूर्वी मान्यता दिली होती ..मग अचानक हा बदल का ते समजेना ? तेव्हा पाटील साहेब व रानडे साहेबांनी मला सांगितले मी ' वर्तमानात तू मुकांगण चा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहेस .. तू हे काम वाढवले आहेस .. तेव्हा तुझी कार्यकर्ता म्हणून ओळख जास्तीत जास्त लोकांना व्हावी हा आमचा उद्देश आहे ..त्यामुळे मिटिंगला येणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढेल ..व नाशिकमधील व्यसनमुक्तीची चळवळ अधिक बळकट होईल म्हणून उद्घाटन तुझ्या हस्ते व्हावे अशी आमची इच्छा आहे ..मग मी संमती दिली ...अभियानाचे कापडी फलक तयार करून घेणे ..शोभायात्रेसाठी लागणाऱ्या घोषवाक्यांच्या पाट्या तयार करून घेणे ..या सर्व प्रकारच्या कामात रानडे साहेब माझा सल्ला घेत होते .. एकेकाळच्या गर्दुल्ल्याला पोलीस उपायुक्तांकडून मिळणारा इतका सन्मान भारावून टाकणारा होता ...

एक दिवस आधी मी भद्रकाली पोलीस स्टेशनला रात्री गेलो असताना तिथे प्लास्टिकचे काळ्या रंगाचे सुमारे १०० कँन बाहेरच्या आवारात ठेवलेले होते .. सगळीकडे गावठी दारूचा वास पसरला होता ..अभियानाचा एक भाग म्हणून पोलिसांनी गावठी दारूच्या अड्ड्यांवर धाड टाकून हे रसायन जप्त केलेय हे मग समजले ..इतकी दारू काय करायची या विवंचनेत होते सर्व पोलीस ..कारण इतकी दारू आत पोलीस स्टेशनला ठेवायला जागा नव्हती ..मग रानडे साहेबांनी सरळ ती दारू गटारात ओतून देण्याच्या सूचना दिल्या ..जवळच असलेल्या गटारात ती हजारो लिटर दारू ओतून देण्यास दोन तास लागले ..
अभियानाची सर्व जय्यत तयारी झालेली होती ..या अभियानात पोलीस घेत असलेला पुढाकारव सहभाग पाहून वाटले ..जर पोलिसांनी मनावर घेतले .. तर नक्कीच ते देशातील गुंडगिरी ..गुन्हेगारी ..अमली पदार्थ तस्करी ..अश्या सर्व समस्या नष्ट होण्यास वेळ लागणार नाही .. फक्त राजकीय हस्तक्षेप नसला पाहिजे !

( बाकी पुढील भागात )

===================================================

अभियानाची धमाल !  (पर्व दुसरे -भाग ४० वा )

आदल्या दिवशी संध्याकाळी मुक्तांगणची टीम नाशिकला आली ..बाबा आणि मँडम दोघे एकत्र नाशिकला पहिल्यांदाच आले होते .. तशा मँडम फॉलोअप साठी वर्षातून एकदा ..तर बाबा त्यांच्या व्याख्यानाच्या निमित्ताने येत असत ..यावेळी दोघेही एकत्र आले होते ..सोबत व्यसनमुक्तीचे शिलेदार घेवून .. श्रीरंग उमराणी सर ...प्रसाद चांदेकर ...दत्ता श्रीखंडे ...प्रसाद ढवळे..योगीन ..महेश ..देवेंद्र ..वगैरे माझे सर्व मित्र नाशिकला आलेले ..बंधू ( प्रसाद चांदेकर ) एकदम खुश होता .. पथनाट्यात काम करताना बंधू आणि माझी चांगली जोडी होती .. तो व्यसनी व्यक्तीचा रोल करीत असे तर मी त्याला बिघडवणा-या मित्राचा ..संध्याकाळी रोटरी क्लब हॉल वर मोठी मिटिंग झाली .. रोटरी क्लबचे सदस्य देखील हजर होते .. बाबा आणि मँडमचे सर्वांनी सन्मानाने स्वागत केले ..अनेक व्यसनी मित्र आणि त्यांचे पालक देखील आलेले मिटींगला .. सर्व मित्रांनी मला आनंदाने मिठ्या मारल्या ..माझे नाशिकचे काम बघून ..त्याची पावती दिली ...रोटरी क्लब हॉल मधून मग सगळे भद्रकाली पोलीस स्टेशनला आले .. सर्वांचे चहापाणी झाले .. बाबा आणि मँडम पाटील साहेबांच्या घरीच मुक्काम करणार होते..तर बाकीच्या टीमची व्यवस्था गंजमाळ जवळील हॉटेल ' रॉयल हेरीटेज ' मध्ये केलेली ..त्यादिवशी मी सर्व मित्रांबरोबर हॉटेल मध्येच थांबलो..कादरला देखील थांबण्याचा आग्रह केला मी ..मात्र तो काहीतरी कारण सांगून सटकला .. आज मी एकटा राहतो म्हणाला लेबोरेटरी मध्ये .. रात्री खूप वेळ गप्पा ..जोक्स चालले होते ..बंधू आणि काही जण मुक्तांगण चे निवासी कर्मचारी म्हणून कायम मुक्तांगण मध्येच रहात असत ..असे दोन दिवस बाहेर जायला मिळाल्यामुळे सगळे खुश होते ..त्यात सोबत मी ..मग हास्य विनोदाला उत आलेला ..आम्ही पूर्वी एकत्र उपचार घेतले होते ..तेव्हाचे सगळे मित्र .. एकमेकांशी अगदी ..साल्या ..गांडो .. वगैरेच्या भाषेत बोलणे .. रात्री बराच वेळ पर्यंत आमची मस्ती चालली होती . शेवटी उमराणी सरांनी उद्या कार्यक्रम आहे ...झोपा जरा ..अशी तंबी दिल्यावर झोपलो .


दुसऱ्या दिवशी मी पहाटेच उठून घरी जाऊन अंघोळ वगैरे उरकून सात वाजता पुन्हा हॉटेल वर पोचलो ..सकाळी आठ वाजता सर्वाना ' शालीमार चौक ' येथे जमायचे होते .. आम्ही सगळे तेथे पोचलो तर पोलिसांच्या खूप गाड्या .. हातात फलक घेतलेली शाळकरी मुले-मुली ...मिटिंगचे सदस्य ..विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी ..प्रतिष्ठित नागरिक वगैरे गर्दी जमलेली .. बाबा आणि मँडम पाटील साहेबांच्या घरून शालीमार चौकात येताच ...माईक वरून त्यांचे स्वागत झाले ..मग शोभायात्रेची सुरवात झाली ...शालीमार चौक ..ते सीबीएस ..अशोक स्तंभ मार्गे ..रविवार कारंजा ..मग मेनरोड वरून कार्यक्रम स्थळी अशी दोन तास शोभायात्रा चालली होती ..मुले व्यसनमुक्तीच्या घोषणा देत चालली होती ..मागे पुढे पोलिसांच्या गाड्या .. एका गाडीत बसून माईक वर ट्राफिकचे नियोजन करणारे पोलीस ..यात्रेत सतत घोषणा देण्यासाठी मुलांना उत्तेजन देणारे रानडे साहेब .. मस्त धमाल चालली होती ..सगळी शोभायात्रा शेवटी पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर पोचली ..तेथे भव्य स्टेज उभारलेले होते ..मध्येच एकदा मला कादर दिसला ..एक मिनिट माझ्याजवळ येवून आलोय असे सांगून पुन्हा गर्दीत गायब झाला .. तेवढा मिनिटभर मी जे कादरचे निरीक्षण केले ते काही ठीक वाटले नाही ..त्याचे डोळे बरेच काही सांगत होते ..त्याने नक्की सकाळी सकाळी 'ब्राऊन शुगर ' ओढलेली आढळली ..मी त्याला अधिक काही बोलण्याच्या आधीच तो गर्दीत मिसळला ..क्षणभर खिन्न वाटले ..पण तो प्रसंग त्याला काही बोलण्याचा नव्हता ..कार्यक्रमाच्या ठिकाणी समोर मैदानात तंबू उभारून खुर्च्या टाकलेल्या होत्या ..तेथे आमंत्रित आणि इतर नागरिक बसलेले होते आधीच .. माईक वरून शोभायात्रेचे स्वागत झाले ..मग सर्व मंडळी खुर्च्यांवर स्थानापन्न झाली .. आईला मी सकाळीच कार्यक्रमाला यायचे बजावले होते .. ती समोरच्या रांगेत बसलेली दिसली तेव्हा खूप आनंद झाला .. आपल्या बिघडलेल्या मुलाचे कौतुक तिने पहावे अशी माझी मनापासून इच्छा होती ..स्टेजवर चार खुर्च्या ठेवलेल्या ..एकीवर बाबा ..दुसरीवर मँडम ..तिसरीवर पोलीस आयुक्त ..आणि चौथ्या खुर्चीवर उपायुक्त रानडे साहेब बसतील असा हिशोब करून मी स्टेजच्या खालीच उभा राहिलो ..मात्र रानडे साहेबांनी मला स्टेजवर बोलावून बाबांच्या शेजारी बसविले .

कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि निवेदन स्वतः रानडे साहेब करणार होते .. त्यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून ..नाशिक शहरातील वाढत्या व्यसनाधीनतेला आळा बसावा म्हणून हा एक प्रयत्न असल्याचे सांगितले ..मग दीप प्रज्वलन करून अभियानाचे उद्घाटन करण्याची मला विनंती केली ..मला मिळणारा इतका सन्मान पाहून माझे डोळे पाणावले .. मी मेणबत्ती घेवून दीप प्रज्वलन करताना ..पत्रकारांच्या कँमे-याचे प्रकाश झोत चमकले ..तेव्हा खूप छान वाटले ..माझ्यानंतर बाबा ..मँडम यांनीही समईची एक एक ज्योत प्रज्वलित केली ..आधी बाबांचे भाषण झाले ..बाबांनी नाशिककरांचा व्यसनमुक्तीचा कार्यातील हा उत्स्फूर्त सहभाग पाहून भारावून गेल्याचे सांगितले .. समोर उपस्थित असलेल्या शाळकरी मुलांना ..तरुणांना .. नागरिकांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्व सांगत ..सर्वांनी मादक पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन केले .. तसेच प्रत्येकाने किमान एका व्यसनी व्यक्तीला व्यसनमुक्तीची प्रेरणा देण्याचे काम करावे अशी मागणी केली .. मँडम बहुधा अशा कार्यक्रमात बोलत नाहीत .. मी फक्त उपचार देण्याचे काम करते असे त्या म्हणत ..बोलण्याचे काम बाबांकडे सोपविले आहे असे त्या गमतीने सांगत ...त्यामुळे मँडम बोलल्या नाहीत ..नंतर माझी पाळी आली ..आपल्या गावात .. इतक्या मोठ्या जमावासमोर मी पहिल्यांदाच बोलत होते ..समोरच्या गर्दीकडे पाहताना डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते .. समोर बसलेल्या आईकडे पाहून म्हणालो की आजचा हा सन्मान केवळ आईने माझ्या व्यसनमुक्ती साठी केलेल्या प्रयत्नांचे फलित आहे ..सर्वांच्या नजर आईकडे वळल्या ..आईच्याही डोळ्यात पाणी आलेले .. मी आईला काहीतरी बोलण्याची विनंती केली ..पण ती इतकी हळवी झालेली की काही बोलणे शक्यच नव्हते ... अशा प्रसंगी ..शब्दांपेक्षा डोळेच जास्त बोलतात .. मी मला दिलेल्या सन्मानाबद्दल सर्व नाशिककरांचे आभार मानले .. माझ्या व्यसनमुक्तीसाठी मदत करणारे सुरेंद्र पाटील साहेब .. अभियानासाठी पुढाकार घेवून विशेष मेहनत घेणारे रानडे साहेब यांचा उल्लेख अपरिहार्य होता ...सुमारे दीड तास कार्यक्रम चालला .. ' हर नया दिन एक नई सुबह ..हर सांस मे जागी आशा ..दूर हटे .गम के बादल..अब नाही चाहिये कोई नशा ' या व्यसनमुक्तीच्या समूहगीताने मुक्तांगणच्या टीम ने कार्यक्रमाची सांगता केली .

( बाकी पुढील भागात )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें