सामाजिक कृतज्ञता निधी ! ( पर्व दुसरे - भाग ११ वा )
एकदाचा २६ जून हा आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ विरोधी दिन आम्ही मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र आणि लोकशाही मित्र यांच्या वतीने सुंदर रीतीने नाशिक मध्ये पथनाट्य व शोभायात्रा काढून साजरा केला ...पाटील साहेबांची यात खूप मोलाची मदत झाली होती ..तसेच लोकशाही मित्र चे सर्व कार्यकर्ते मनापासून झटले होते ...शालीमार चौकात झालेल्या पथनाट्याची मित्राने मोफत बनवून दिलेली व्ही.डी.ओ कॅसेट घेवून दुसऱ्याच दिवशी मी सगळ्या कार्यक्रमाचा आणि माझ्या फॉलोअपचा अहवाल देण्यासाठी मुक्तांगणला गेलो ...तेथे सर्वांनी माझे तोंडभरून कौतुक करावे ही अपेक्षा मनात होतीच ...बहुधा प्रत्येक व्यक्तीला आपण केलेल्या चांगल्या कामाबद्दल इतरांनी तोंडभरून कौतुक करावे अशी अपेक्षा असतेच ...मुक्तांगणला गेल्यावर सगळ्यात जास्त उत्स्फुर्तपणे बंधू ने माझे अभिनंदन केले .. लगेच उत्साहाने वार्ड मधील उपचार घेणाऱ्या मित्रांसाठी माझी व्हिडीओ कॅसेट दाखवण्यासाठी मँडम कडून परवानगी काढली व टी.व्ही हॉल मध्ये सर्वाना गोळा करून कॅसेट लावली सुद्धा .. कॅसेट सुरु झाल्यावर मी सर्व समुपदेशकांच्या केविन मध्ये जाऊन त्यांना कॅसेट पाहायला दोन वेळा आमंत्रित करून आलो .. मात्र बहुधा ते इतर कामात व्यस्त असल्याने येवू शकले नाहीत .. मँडम मात्र आवर्जून आल्या ... पाच मिनिटे हॉल मध्ये थांबल्या आणि मग माझ्याकडे एक कौतुकाची ..समाधानाची नजर टाकून परत गेल्या ...इतर समुपदेशक आले नाहीत या बद्दल माझ्या मनात उगाचच त्यांच्या बद्दल अढी बसली ... मी इतके मरमर करून कार्यक्रम केला ...दिवसरात्र एक करून तो एकट्याच्या बळावर यशस्वीपणे पार पाडला..आणि या समुपदेशकाना त्याचे काही कौतुक नाही ... असे अविवेकी विचार मनात येवू लागले ...स्वाभाविकच मग मला मिळणारे मानधन आणि त्यांना मिळणारे मानधन याची तुलना झाली मनात ... हे जेमतेम पाच सहा तास केबिन मध्ये बसून भरपूर मानधन घेतात ..आणि मी तिथे उन्हातानात सायकल वर फिरून काम करतो ...मलाही जास्त मानधन मिळायला हवे वगैरे नकारात्मक तुलना सुरु झाली ... मी बंधुजवळ हे बोलून दाखवले तेव्हा त्याने माझी समजूत काढली ..म्हणाला " अरे .. तू जे केलेस ते झोकून देवून केलेस ..त्यात तुला खूप आनंद मिळाला ..एक अनुभव मिळाला .. आणि मुख्य म्हणजे तुझ्यावर सोपविलेली जवाबदारी तू उत्तम पणे पार पाडलीस ही सार्थकतेची भावना बळावली... इतके तुझ्यासाठी पुरेसे नाही का ? .. शिवाय ज्यांनी तुझ्यावर ही जवाबदारी सोपविली होती त्या मँडम आल्या होत्या की कॅसेट पाहायला .. त्यांनी तुला नजरेने शाबासकी दिली हे जास्त महत्वाचे आहे .. बाकीचे समुपदेशक कदाचित दुसऱ्या महत्वाच्या कामात असावेत .. शिवाय तुषार ने केले म्हणजे चांगलेच असणार त्यात पहायचे ते काय ? किवां नंतरही पाहता येईल असा विचार असेल त्यांचा " बंधू जेव्हा मस्त मूड मध्ये असतो तेव्हा त्याचे समुपदेशन अतिशय सुंदर असते ... सगळे मुद्दे तो खूप छान उलगडून बोलतो .
नंतर मडमन भेटायला गेल्यावर मँडमनी एक आनंदाची बातमी सांगितली मला.... त्यांनी सांगितले की महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रात... पूर्णवेळ सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना ..' सामाजिक कृतज्ञता निधी ' या न्यासा मार्फत दरमहा एक निश्चित मदत म्हणून थोडे मानधन दिले जाते .. बाबा ( डॉ. अनिल अवचट ) देखील त्या न्यासाचे सदस्य आहेत .. या वर्षीपासून व्यसनमुक्तीचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून तुला ते मानधन मिळण्यासाठी बाबांनी न्यासा कडे तुझे नाव सुचविले आहे .. या न्यासाचे सध्या डॉ . श्रीराम लागू हे अध्यक्ष आहेत .. साताऱ्याचे बाबांचे मित्र डॉ . नरेंद्र दाभोलकर हे चिटणीस आहेत .. तर निळू फुले .. डॉ . बाबा आढाव .. प्रा . पुष्पा भावे .. विदर्भातील डँडी देशमुख ..वगैरे जेष्ठ मंडळी ... सदस्य आहेत .. तुला या पुढे दरमहा पाचशे रुपये वेगळे मानधन या न्यासातर्फे मिळेल .. त्यासाठी तुला तुझी सर्व माहिती असलेला एक फॉर्म भरायचा आहे ..तसेच एक प्रतिज्ञापत्र भरून द्यायचे आहे .. ज्यात तू कोणत्याही राजकीय संघटनेशी संबंधित नाहीस .. कोणत्याही धार्मिक अथवा जातीय संस्थेशी बांधील नाहीस वगैरे मुद्दे आहेत .. शिवाय तुला दर सहा महिन्यांनी तुझ्या कामाचा अहवाल या न्यासाकडे पाठवायचा आहे ...हा प्रस्ताव मला खूप आवडला म्हणजे आता मी व्यसनमुक्तीच्या कार्याने.. महाराष्ट्रातील जेष्ठ कार्यकर्ता मंडळींशी जोडला जाणार होतो .. तसेच मुक्तांगण कडून मिळणारे तीनशे आणि हे नवीन पाचशे असे एकूण माझे मानधन आठशे होणार होते .. मी फॉर्म भरून दिला .. ! पुढे मँडम नी माझी जवाबदारी अधिकच वाढल्याची जाणीव करून दिली ..आणि शुभेच्छा देवून निरोप दिला . आता मी फक्त मुक्तांगण च कार्यकर्ता नव्हतो तर एका सामाजिक बांधिलकीतून उभ्या राहिलेल्या प्रतिष्ठीत अशा ' सामाजिक कृतज्ञता निधी ' या न्यासाचा मानधन प्राप्त पूर्णवेळ कार्यकर्ता देखील होतो .. त्यावेळी श्रीमती मेधा पाटकर यांना देखील हे मानधन मिळत होते .
आनंदातच मी नाशिकला परतलो .. पाटील साहेबांकडे जेव्हा नेहमीसारखा भेटायला गेलो तेव्हा तेथे एक गोरे पस्तीशीचे ..टक्कल पडलेले रुबाबदार गृहस्थ बसलेले होते ..पाटील साहेबांनी मला थांबवून त्यांच्याशी ओळख करून दिली ..... ते डॉ . रमेश गौड होते .. नाशिकमधील ' सर्व्हिस ऑफ सोसायटी ' या संस्थेचे संस्थापक .. ' एड्स ' या महाभयंकर संकटा बद्दल प्रबोधन करण्याचे कार्य करत होते .. डॉ. गौड यांनी मला आपले व्हिजिटिंग कार्ड दिले व त्यांच्या ऑफिस मध्ये भेटायला बोलाविले .. त्यांना ' एड्स ' बद्दल जनजागृती करण्यासाठी पथनाट्य बसवायचे होते .
( बाकी पुढील भागात )
======================================================
"एड्स" चे भयावह वास्तव ! ( पर्व दुसरे -भाग १२ वा )
डॉ . रमेश गौड यांनी भेटायला बोलावल्या नुसार मी दुसऱ्या दिवशीच सकाळीच त्यांचा पत्ता शोधत कॅनडा कॉर्नर येथे असलेल्या त्यांच्या कार्यालयात गेलो .. एड्स बद्दल थोडे फार ऐकून होतो ..म्हणजे हेच की एड्स कोणत्या कारणांनी होतो ..बचाव करण्यासाठी काय करावे ...वगैरे . माझ्या मनात अनेक प्रश्न होते ... मुळात हा विषाणू आला कोठून ? ... इतके प्रगत शास्त्र इतक्या सूक्ष्म विषाणूला नष्ट का करू शकत नाही ? आणि मुख्य म्हणजे उपाय योजना नेमक्या काय केल्या जात आहेत ? ... भारतीय संस्कृतीला अध्यात्मिक बैठक आहे तरीही भारतात याचे वाढते प्रमाण ..हे देखील एक कोडेच होते माझ्या दृष्टीने .. आणि उपाय योजनांबाबत म्हणाल तर ..सरळ सरळ सगळे वेश्यांचे अड्डे बंद केले पाहिजेत सरकारने .. तसेच सक्तीने सर्वांची तपासणी करायची ..जे जे कोणी एड्स बाधित सापडतील त्यांना समाजापासून दूर ठेवायचे असे माझे मत होते ... डॉ . गौड यांनी प्रसन्न मुद्रेने माझे स्वागत केले .. ' उमिया अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर डॉ. गौड यांच्या ' सर्व्हिस ऑफ सोसायटी ' या संस्थेचे कार्यालय होते ..तेथेच त्यांची लेबोरेटरी देखील होती ..जेथे रक्त गट तपासण्यापासून ते इतर सर्व आजारांच्या तपासण्या होत होत्या .. सुरवातीला गौड सरांनी मला एड्स बाबत काय माहिती आहे असे विचारले तेव्हा ..मी त्यांना एक महाभयंकर असा जीवघेणा आजार आहे हे सांगितले .. तसेच माझ्या मनातील अनेक प्रश्न बोलून दाखवले .. उपाय योजनांबाबत देखील माझ्या कल्पना त्यांच्या समोर ठेवल्या .. बोलत असताना जेव्हा मी ' वेश्या ' हा शब्द वापरला तेव्हा त्यांनी मला थांबवले आणि सांगितले की ' वेश्या ' हा शब्द बहुधा घाणेरड्या अर्थाने किवा चरित्रहीन स्त्री करिता वापरला जातो ..तसेच हा शब्द इतका बदनाम आहे की चार चौघात त्याचा उच्चार करायला देखील लोक घाबरतात ...त्यामुळे ' वेश्या ' हा शब्द वापरू नकोस तर त्या ऐवजी ' कमर्शियल सेक्स वर्कर ' किवा मराठीत ' शरीर विक्रय करणाऱ्या महिला ' असा शब्द वापरलास तर अधिक चांगले .. मला आश्चर्यच वाटले .. मग त्यांनी पुढे समजावून सांगितले की तो एक पारंपारिक व्यवसाय आहे आणि जसे लोक विविध वस्तू विक्रींची दुकाने उघडतात .. काही लोक नृत्य ..गायन ..चित्रकला .. अभिनय .. किवा पोटापाण्याचा इतर व्यवसाय करतात ....तसाच शरीर तात्पुरते भाड्याने देण्याचा असा हा व्यवसाय आहे असे मानता येणार नाही का ? मी बुचकळ्यात पडलो ... एकंदरीत गौड सरांना या शरीर विक्रय करणाऱ्या महिलांचा बराच कळवला दिसला .. !
सर पुढे बोलत राहिले .. आज देशात एड्स च्या वाढत्या प्रमाणाला सर्वच जण या शरीरविक्रय करणाऱ्या महिलांना जवाबदार ठरवीत आहेत ..मात्र सगळे हे विसरले आहेत ... जर हा व्यवसाय अस्तित्वात नसता तर आपल्या आया बहिणींना रस्त्यावर फिरणे कठीण झाले असते .. रोटी ..कपडा आणि मकान या मूळ गरजांसारखीच शारीरिक भूक किवा लैंगिक तृप्ती ही देखील मानवी गरज आहे .. ही उर्मी दाबून ठेवून जगणे सर्व सामान्य माणसाना अतिशय कठीण किवा अशक्यप्राय आहे .... जे अध्यात्मिकते कडे वाटचाल करतात अश्या लोकांना देखील त्यांचा भावना असह्य होऊन त्यांचा तेजोभंग झाल्याची अनेक उदाहरणे पुराणात आहेत ..अश्या वेळी .. जे या सुखापासून वंचित आहेत त्यांची गरज भागविण्याची जर या महिला सोय करून देतात तर त्या बदफैली किवा वाईट कश्या ? सरांचा प्रश्न मला निरुत्तर करणारा होता .. मी त्यांना विचारले पण सर आपल्या संस्कृतीत ...भोगापेक्षा त्यागाला जास्त महत्व आहे त्याचे काय ? ' मी वापरलेल्या ' संस्कृती ' या शब्दावर गौड सर हसले .. म्हणाले संस्कृती हा खूप छान शब्द आहे ..मात्र तो शब्द फक्त आपल्या मनाच्या समाधानासाठी ठीक आहे ..प्रत्यक्ष व्यवहारात तसे जर पाळले गेले असते तर ..आपल्या देशात एड्स चे वाढते प्रमाण नोंदविले गेले नसते ..पुढे ते सांगू लागले की मी 'एड्स ' जनजागृती साठी व्याख्यान देतो ..अशी व्याख्याने आपल्या महाविद्यालयात आयोजित करा म्हणून जेव्हा मी एखाद्या प्राचार्याना भेटायला जातो तेव्हा ते लोक देखील ' संस्कृती ' हा शब्द माझ्यावर फेकतात व सरळ सरळ म्हणतात की आमच्या महाविद्यालयात असले प्रकार होत नाहीत ..आम्ही मुलांवर चांगले संस्कार करतो ..वगैरे ..मग मला त्यांना लैंगिकता ही कशी महत्वाची गरज आहे .. मानसिक आरोग्य राखण्यात देखील या गरचेचा मोठा सहभाग आहे .. ज्या लैंगिकतेला आपण नावे ठेवतो आहोत त्यातूनच आपणा सर्वांचा जन्म झाला आहे ... जे लोक काही कौटुंबिक अडचणी ..जवाबदा-या मुळे लग्न करू शकत नाहीत ..विधुर आहेत ..त्यांच्यासाठी लैंगिकता भागवण्याचे साधन उपलब्ध झाले नाही तर त्यांचे आणि पर्यायाने समाजाचेही स्वास्थ्य धोक्यात येईल .. आणि जर लैंगिकता ही महत्वाची गरज मानली तर मग सुरक्षित पद्धतीने लैंगिकतेचा आंनद घेण्यासाठी... खबरदारीचे मार्ग सुचविण्यात काय गैर आहे वगैरे काथ्याकुट करावा लागतो तेव्हा कुठे परवानगी मिळते .. काहीजण तर मला निरोपच देतात एकदम .. सर खूप महत्वाची माहिती सांगत होते .. मी ती माहिती ऐकण्यात मग्न होऊन गेलो ..त्यांनी सांगितलेली एकंदरीत माहिती ..आकडेवारी खूप भयावह होती .. !
त्यांचा या विषयावरील गाढा आभ्यास .. मुद्दे मांडण्याची हातोटी उत्कृष्टच होती .. मग मलाही सरांसमोर ' वेश्या ' हा शब्द उच्चारण्यास संकोच वाटू लागला ... शरीर विक्रय करणाऱ्या महिला त्या वस्तीत असण्याला कोणीतरी पुरुषच जवाबदार आहे हे पटू लागले .. देवदासी प्रथा .. दारिद्र्य .. प्रेमात झालेली फसवणूक .. वगैरे पद्धतीने बहुतेक महिला तेथे होत्या .. नाईलाजाने या व्यवसायात होत्या ... त्यांना सगळ्यांना देखील एक सुरक्षित घर हवे होते ... पती ..मुले ..संसार याची ओढ त्यांनाही होती .. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे हे ध्यानात आले माझ्या ..दुसऱ्या दिवशी गौड सरांचे एका महाविद्यालयात 'एड्स ' वर व्याख्यान होते ..तेथे त्यांनी मला देखील ऐकायला बोलाविले .. तेथे सर्व तरुण मुलेच होती ...त्यांनी मुलांना ' वेश्या ' हा शब्द कसा चुकीचा आहे हे पटवून देण्यासाठी एक छान उदाहरण दिले .. त्यांनी एका मुलाला पुढे बोलाविले आणि त्याला काही प्रश्न विचारले ... तुला कोण अभिनेत्री आवडते ? त्या मुलाने लाजत लाजत एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव सांगितले ..पुढे सर त्याला म्हणाले ..जर समजा तुला या तुझ्या आवडत्या अभिनेत्री सोबत शरीर संबंध करण्याचीस संधी दिली तर ..तू काय करशील .. तो मुलगा अधिकच लाजला ..इतर मुलेही चेकाळली आणि हसू लागली .. सरांनी नेटाने विचारल्यावर त्याने खाली मान घालून ... अशी संधी मिळाली तर मी नक्की शरीर संबंध करीन अशी होकारात्मक मान हलविली ...पुढे सर त्याला म्हणाले समजा परत एक तासानी तुला त्याच किवा दुसऱ्या सुंदर आवडत्या अभिनेत्री सोबत संबंध करण्यास सांगितले गेले तर ? ..तो मुलगा चालेल ..म्हणाला ..नंतर पुन्हा एक तासांनी अशी संधी मिळाली तर ? या प्रश्नावर तो मुलगा स्तब्ध झाला .. विचार करू लागला .. माणसाच्या काही शारीरिक मर्यादा असतात शरीर संबंध ठेवण्याच्या .. त्या नुसार लागोपाठ तीन तासात ...तीन वेळा शरीर संबंध ठेवणे सोपे काम नाही ..कारण नंतर उत्तेजना येणे कठीण असते .. सर त्याला म्हणाले तू कितीही नाही म्हणाला तरी ..जर तुझ्या डोक्यावर पिस्तुल टेकवून तुला कोणी तिसऱ्या वेळी ..चौथ्या वेळी ..पाचव्या वेळी तुला शरीर संबंध ठेवायला लावला तर .. तो मुलगा नाही नाही अशी मान हलवत राहिला .. सर मग पुढे म्हणाले .. जर आपल्या आवडत्या अभिनेत्री सोबत देखील तीन वेळा संबंध केल्यानंतर आपण नकार देवू ..मग जी स्त्री तिला निवडीला काहीही वाव नसताना दिवसातून किमान दहा ते बारा लोकांशी पोटासाठी .. जगण्यासाठी .. शरीर संबंध ठेवते तिची शारीरिक आणि मानसिक अवस्था काय होत असेल याची कल्पना करा .. या व्यवसायातील बहुतेक स्त्रिया नाईलाजाने तेथे आहेत .. वेगवेगळी व्यसने करणाऱ्या ..किवा काही वेळा विकृत असणाऱ्या... कोणत्याही व्यक्तीशी त्यांना केवळ तो पैसे देतो आहे म्हणून संबंध ठेवावे लागतात .. अश्या स्त्रियांना जरी आपण पुनर्वसनात काही मदत करू शकलो नाही तरी मनातून त्यांच्याबद्दल कणव असली पाहिजे ... वेश्या ..रांड .. रंडी ..वगैरे शब्द वापरून आपण त्यांचा एक प्रकारे अपमानच करतो आहोत .. सरांचे बरेचसे म्हणणे मला पटत होते .. मी खूप प्रभावित झालो होतो .
( बाकी पुढील भागात )
======================================================
सरकारी खाक्या ! (पर्व दुसरे - भाग १३ वा )
शरीर विक्रय करणाऱ्या महिला आधी एक मानव आहेत ..त्यांना देखील एक संवेदनशील मन असू शकते ..त्यांचा पोट भरण्याच्या व्यवसाय जरी अनैतिक मानला गेला असला तरी .. तो व्यवसाय समाजाची गरजही आहे ..वगैरे गोष्टी माझ्या मनावर चांगल्याच ठसल्या ..त्या दिवशीच्या गौड सरांच्या व्याख्यानाला त्यांच्यासोबत एक हसतमुख तरुण होता .. जरा अंगाने चांगलाच भरलेला .. त्याची सरांनी माझ्याशी ओळख करून दिली ...अमित श्रीवास्तव म्हणून हा तरुण .. अतिशय हुशार .. निर्व्यसनी .. मोठे बोलके डोळे .. उत्तर भारतीय असूनही जाणीवपूर्वक मराठी बोलणारा .. अमित मला प्रथम दर्शनीच आवडला .. हा बाहेरून कॉलेजचे शिक्षण करून ..आवड म्हणून गौड सरांच्या सामाजिक कार्यात सहभागी झाला होता .. त्याच्या डोळ्यात नेहमी एक निर्व्याज असा भाव असे .. मी पूर्वाश्रमीचा व्यसनी व्यक्ती आहे हे त्याला समजल्यावर त्याला माझ्याबद्दल खूप कुतूहल जाणवले असावे .. अनेक प्रश्न विचारले त्याने मला अमली पदार्थांबद्दल .. त्याची आणि माझी लवकरच चांगली गट्टी जमली .. गौड सरांनी सुरु केलेले ' एड्स ' विरोधी जनजागृतीचे कार्य अत्यंत मोलाचे होते यात वादच नाही ... मी नियमित त्यांना भेटायला जावू लागलो तेव्हा या कार्याच्या अनेक बाजू उलगडू लागल्या .. काही लोकांनी या आजाराला सर्वात आधी शरीर विक्रय करणाऱ्या महिलांना जवाबदार ठरविले ..मात्र ते हे विसरले की या महिलांना हा प्रसाद कोणत्यातरी ग्राहका कडूनच मिळाला होता .. लैंगिक संबंधांबाबत असलेल्या अज्ञानामुळे ..असुरक्षित लैंगिक संबंधामुळे तो विषाणू हळू हळू सगळीकडे पसरू लागला .. नाशिक मधील एका सरकारी आरोग्य अधिकाऱ्याला एकदा अचानक उपरती झाली आणि त्याने मागचा पुढचा विचार न करता .. नाशिक मध्ये शरीर विक्रय व्यवसाय चालणाऱ्या ' सफेद गल्ली ' या भागात पोलिसांसह धाड टाकली ..तेथील शरीर विक्री करणाऱ्या एकूण ७२ महिलांची रक्त तपासणी करण्यात आली ..त्या पैकी २९ महिला या एच .आय .व्ही बाधित निघाल्या .. ताबडतोब या अधिकाऱ्याने त्या महिलांची नावेही वस्तीत जाहीर करून टाकली ..लोकांनी सावधगिरी बाळगावी म्हणून .. मात्र तो हे विसरला की या महिलांचे पोटच या व्यवसायावर अवलंबून आहे .. त्यांची नावे उघड करून त्या अधिकाऱ्याने त्यांचे पोटच हिरावून घेतले ..कारण नंतर कोणीही ग्राहक त्या मुलींकडे जायला तयार होईना .. त्याच्यावर उपाशी राहायची वेळ आली ..शेवटी त्यापैकी अनेक वस्ती सोडून दिघून गेल्या .. किवा दुसऱ्या वस्तीत जावून व्यवसाय करू लागल्या ..एकीने तर आत्महत्याच केली .
सरांनी सांगितलेली ही माहिती धक्कादायक होती ..कारण खरे तर एखाद्या व्यक्तीच्या पूर्वपरवानगी खेरीज त्याची अशी रक्त तपासणी करण्यास कायद्याने बंदी आहे .. त्यामुळे सावधगिरीच्या सूचना आणि प्रबोधनच जास्त महत्वाचे आहे.. या आजाराबाबत काळजी घेतली जावी म्हणून सरकारी रुग्णालयातून मोफत ' निरोध ' देण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी कर्मचारी वर्गाच्या हलगर्जी पणामुळे ..कामचुकार पणामुळे अथवा ' निरोध ' या शब्दाला असलेल्या वलयामुळे म्हणा .. हे मोफत वाटपाचे काम योग्य प्रकारे झालेच नाही .. अनेक सरकारी रुग्णालयातून .. प्राथमिक आरोग्य केंद्रातून लाखो निरोध पडून राहिले .. अक्षरशः रस्त्यावर फेकले गेले...निरोध बनविण्याचे कंत्राट देताना देखील गैरव्यवहार झाले ... वगैरे माहिती हलगर्जी पणाचा उत्तम नमुना होती ..सध्या जसा लाखो टन गहू सरकारी गोदामातून सडून जातोय तसेच ... शिवाय समाजात असलेले अज्ञान ..गैरसमज ..लैंगिक अंधश्रद्धा ..असे अनेक कंगोरे होते या विषयाला .. बहुसंख्य लोकांना तर ' निरोध ' शास्त्रीय पद्धतीने कसा लावावा याचे देखील ज्ञान नाहीय आपल्या देशात .. हे सांगताना सरांनी आम्हाला एक निरोध हलक्या हातानी ..नख न लागू देता .. कसा चढवला जातो हे देखील प्रात्यक्षिक दाखविले ... तेव्हा माझ्या लक्षात आले की मी देखील या बाबत अनभिज्ञच होतो ..एच .आय .व्ही चा संसर्ग होण्याचे मार्ग निश्चित आहेत ... त्या बाबत योग्य ती काळजी घेवून आपण बिनधास्त अश्या रुग्णासोबत वावरू शकतो ...त्याला स्पर्श करू शकतो .. त्याच्यासोबत जेवू शकतो .. त्याचे कपडे देखील वापरू शकतो ..तरीही अज्ञानामुळे बाधित रुग्णाच्या वाट्याला तिरस्कार ..उपेक्षा .. येते त्याला एक प्रकारे वाळीतच टाकले जाते .. शरीर विक्री करणाऱ्या महिलाबाबत बोलताना सरांच्या बोलण्यात नेहमी ' फिल्ड ' हा शब्द येत असे .. त्या विशिष्ट वस्तीला ते ' फिल्ड ' म्हणजेच सामाजिक कार्य करण्याचे क्षेत्र अश्या अर्थाने संबोधत होते .. अश्या वस्तीला भेट देण्याचे माझे कुतूहल जागृत झाले होते .. पूर्वी मित्रांसोबत तेथून घाबरत घाबरत फेरफटका मारला होता मी .. पण त्या वेळी मनातले भाव वेगळे होते ..तारुण्यसुलभ भावना मनात होत्या ..
एकदा सरांनी आम्हाला ' फिल्ड ' मध्ये सोबत नेण्याचे ठरविले .. त्या आधी त्यांनी आम्हला सावधगिरीची महत्वाची सूचना दिली की तेथे उगाच कसले निरीक्षण करण्याच्या फंदात पडायचे नाही .. या स्त्रिया अतिशय चाणाक्ष असतात ..मुळातच स्त्री काही विशिष्ट बाबतीत चणाक्ष असतेच .. एखाद्याची ' नजर ' चांगली नाही हे ती उपजत प्रेरणेमुळे लगेच ओळखते फक्त प्रत्येकवेळी ती तसे बोलून दाखवत नाही किवा तुम्हाला जाणवू देत नाही.. मात्र योग्य तितके अंतर राखून असते .. ' फिल्ड ' मध्ये असणाऱ्या स्त्रिया तर त्यांच्या अनुभवातून अधिकच हुशार असतात .. तुम्ही कार्यकर्ता म्हणून तेथे जाता तेव्हा तुमचे मन अतिशय साफ असले पाहिजे .. त्या स्त्रिया कदाचित तुमची परीक्षा घेतील .. उगाचच पदर पाडणे .. हात उंचावून आळस देणे .. लक्ष वेधून घेणाऱ्या मादक हालचाली करणे वगैरे प्रकार करू शकतील त्या .. तेव्हा आपण लक्ष द्यायचे नाही .. एकदा का तुम्ही त्यांच्या परीक्षेत पास झालात कि मग त्या तुमच्यावर विश्वास ठेवतात .. स्वतची दुखः .. व्यथा मोकळेपणी तुमच्याजवळ बोलतात ..आपण खरोखर त्यांना मदत करू इच्छितो याची त्यांची खात्री पटते आणि त्या तुमचा आदरही करतात ..मग हा आदर टिकवण्याचे काम आपलेच असते . नाशिक शहरात असलेल्या ' फिल्ड मध्ये आम्हाला सरांनी नेण्याचे ठरविले होते ..
( बाकी पुढील भागात )
======================================================
त्या कोवळ्या फुलांचा... बाजार पहिला मी ! ( पर्व दुसरे- भाग १४ वा )
दुसऱ्या दिवशी दुपारी गौड सरांनी आम्हाला फिल्ड मध्ये नेले .. मी.. अमित ..गौड सर असे तिघेच होतो आम्ही .. माझ्या मनात प्रचंड कुतूहल होते .. या मुली सर्रास शिव्या देतात .. दारू पितात .. वेळप्रसंगी एखाद्याचा हात ओढून आपल्याकडे ' बसायला ' लावतात ..अश्या गोष्टी मी ऐकल्या होत्या .. लहानपणी रेल्वे क्वार्टर्स मध्य राहताना .. एक अशी बाई आम्ही नेहमी पाहत असू .. ती अंगाने जाडी होती ..सतत चेहरा रंगवलेला .. हातात एक ट्रांझिस्टर असे तिच्या .. तो कानाशी धरून ती रेल्वे स्टेशन वर फिरे .. तिचे राहणे रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या पार्सल विभागातील फलाटावर होते ..जेमतेम दोन तीन बारदाने लावून बनविलेले ते पाल म्हणजे तिची व्यवसायाची जागा होती ... असे आम्ही ऐकून होतो ... कुटुंबीयांसोबत जेव्हा आम्ही रेल्वे स्टेशन ओलांडून जात असताना ती बाई दिसली की आई आम्हाला तरातरा हात धरून ओढत असे .. तिच्या कडे पाहू नका असे सांगत असे .. अगदी लहान असताना ती बाई नेमकी काय व्यवसाय करते ते समजले नव्हते ..नंतर मोठा होऊन रेल्वे स्टेशन वर मवालीपणा करायला लागल्यावर समजले सगळे .. दिवसेंदिवस ती म्हातारी होत होती ..तरीही मेकअप मात्र केलेलाच असे .. एकदा रात्री १ वाजता आम्ही ' अनुराधा ' थेटर मध्ये सिनेमा पाहून परत येत असताना .. अचानक बाजूने आर्टिलरी सेंटरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून कोणीतरी अंधारात पळत येताना दिसले .. आम्ही थबकून पाहत होतो .. सिनेमा पाहून रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाणारी बरीच गर्दी पण थांबली .. अतिशय वेगाने .. धापा टाकत ही बाई अक्षरशः निर्वस्त्र पळत येत होती .. वेगाने ती आमच्या समोरून धावत पुढे गेली .. काय प्रकार आहे ते समजेना आम्हाला .. दुसऱ्या दिवशी आम्हाला आमच्या रेल्वे स्टेशनवर खाद्यपदार्थ विकणाऱ्या मित्रांनी आम्हाला जी माहिती सांगितली ती सुन्न करणारी होती .. त्या बाईला म्हणे आर्टिलरी सेंटर च्या काही जवानांनी जास्त पैश्याचे आमिष दाखवून आपल्या भागात नेले होते .. तेथे . अनेक लोकांनी सामुहिक पणे तिचा उपभोग घेतला होता ..तिने पैसे मागताच तिला मारहाण करून तिचे कपडे हिसकावून घेवून तिला हाकलले होते ..त्या दिवसानंतर ती बाई पुन्हा कधी रस्त्यावर रेडीओ घेवून फिरताना दिसली नाही .. फलाटावर एका कोपऱ्यात ती खिन्न बसून राही ..तिचे चाहते तिचा जुना नूर आठवून तिला खायला काहीतरी आणून देत असत .. पुढे एक दोन वर्षांनी ती गायबच झाली ..कोणी म्हणे तिने आत्महत्या केली ..कोणी सागे वेड लागून कुठेतरी निघून गेली .
गौड सरांसोबत त्या वस्तीत जाताना या सगळ्या गोष्टी झरझर मन:पटला वर तरळल्या ..शालीमार स्टॉप च्या मागील बाजूने एक पायवाट . कब्रस्तानाकडून होऊन ' सफेद गल्ली ' या वस्तीत जाते .. त्या वाटेने आम्ही गल्लीत शिरलो ..अगदी गालीच्या टोकालाच एक सार्वजनिक मुतारी होती ...काही आंबटशौकीन त्या मुतारीपाशी थांबून गल्लीतील बायका निरखीत होते ..बहुधा त्यांच्यात पुढे जाण्याची हिम्मत नव्हती ..किवा पुरेसे पैसे नव्हते .. हे नुसते नेत्रसुख घेणारे लोक आहेत असे सर आम्हाला हसून म्हणाले .. यांच्या मनावरील पांढरपेशे संस्कार यांना आत जाण्यापासून रोखून आहेत .. इथे उघडपणे प्रवेश करायला बहुधा लोक घाबरतात .. कोणी पहिले तर .पोलिसांची धाड आली तर वगैरे भीती असते ...असे आंबटशौकीन लोक पंचवटीत रामकुंड ..गंगाघाट .. वगैरे ठिकाणी नेहमी दिसतात .. तेथे गोदावरी नदीवर कपडे धुवायला आलेल्या स्त्रियांना निरखणे .. .. तीर्थस्थळ म्हणून रामकुंडात स्नानाला आलेल्या यात्रेकरू स्त्रियांना अंघोळ करताना पाहणे असे उद्योग चालत त्यांचे ... गौड सर आत्मविश्वासाने चालत होते .. त्यांना पाहून तेथे असलेल्या चहाच्या टपरीवाल्याने अदबीने नमस्कार गेला .. चहा घ्या असे म्हणाला .. नंतर येतो असे सांगून सर पुढे चालत राहिले .. एक छोटासा सीमेंटचा बनवलेला रस्ता आणि त्याच्या दोन्ही बाजूला वसलेली हि साधारण १०० घरांची वसाहत होती .. रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला भडक मेकअप करून बायका उभ्या होत्या ..काही बायका रस्त्याच्या कडेला कोंडाळे करून बसलेल्या ..वस्तीत शिरतातच सगळ्यात आधी जाणवला तो एक कुबट वास .. अगदी दाटीवाटीने ती झोपडीवजा घरे होती ...आम्ही बिचकतच निघालो होतो सरांच्या मागे .. आजूबाजूला नीट निरीक्षण करून पाहण्याची हिम्मत होत नव्हती माझी .. अर्थात मी दारू प्यायलो असतो तर मात्र मी नक्कीच बिनधास्त आत शिरलो असतो .. वेळप्रसंगी भांडलोही असतो ..आता मात्र सभ्य माणसासारखा चालत होतो ...
सरांना पाहून रस्त्यावर थट्टामस्करी करणाऱ्या दोन तीन जणी स्तब्ध झाल्या ..लाजून आत पळाल्या.. सरांना तेथे बहुतेक स्त्रिया ओळखत असाव्यात .. तसेच त्यांच्याबद्दल आदरही बाळगून होत्या हे जाणवले .. एका घरात सर वाकून आत शिरले .. त्यांच्यामागोमाग आम्हीही शिरलो .. तेथे अगदी छोट्याश्या जागेत पाच सहा जणी बसलेल्या होत्या .. खोलीचे दोन भाग करून एक भाग पडद्याने झाकलेला आढळला .. सरांना पाहून त्यापैकी एक ओरडली .. ' चलो बस हो गया ' मला समजेना टी हे कोणाला उद्देशून म्हणाली ते .. मग पाच मिनिटात पडद्या आडून एक राकट माणूस बाहेर पडला .. त्याच्या मागून एक अगदी कोवळ्या वयाची मुलगी ..म्हणजे हे पडद्याआड होते तर .. त्या माणसाने मुलीच्या हातात दहा रुपये बक्षिस म्हणून ठेवले .. निघून गेला ..ती मुलगी संकोचानेच बाजूला उभी राहिली .. ' कैसा चल रहा है ? ..मैने जो बताया वो सब करते है ना ? सरांचा प्रश्न बहुधा त्यांना कळला होता .. त्या सगळ्याच एकदम बोलू लागला ..एकाच कल्ला झाला .' .एक एक करके बोलो ' असे सांगितल्यावर मग एक म्हणाली ' डॉक्टर साहब ..आप जी कहेते है वो बहुत कठीण है .. हर आदमी बगैर कंडोम के बैठना चाहता है ..बोलते है ..के कंडोम लगानेसे मजा नाही आता .. या फिर अगर कंडोम के लिये जिद किया तो दुसरी के पास जाता है ... " माझ्या लक्षात आले की गौड सरांनी या स्त्रियांना त्यांच्या आरोग्याचे महत्व पटवून देवून प्रत्येक वेळी कंडोम लावायचा आग्रह करा ...असे सांगितले होते ..मात्र लैंगिक अंधश्रद्धेमुळे ...कंडोम ने मजा येत नाही वगैरे करणे सांगून लोक कंडोम लावू देत नसत त्यांना .. मला आश्चर्य वाटले ..म्हणजे या स्त्रिया नक्कीच योग्य ती काळजी घेण्याबाबत जागरूक होत्या .. मग एकमेकींच्या तक्रारी करणे सुरु झाले त्यांचे ..सर सगळ्यांना हसत उत्तरे देत होते ..एखादीला अधिकाराने रागावत देखील होते .. !
( बाकी पुढील भागात )
=====================================================
इन्ही लोगोने ले लीना दुपट्टा मेरा ! (पर्व दुसरे -भाग १५ वा )
त्या सगळ्या जणी त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी सरांना सांगत होत्या ..सरांच्या सोबत त्यांची औषधांची बँग होती ..त्यातून ते एकेकीला औषध काढून देत होते..बहुतेकींच्या तक्रारी ..अपचन .. अँसीडीटी .. डोकेदुखी .. अंगदुखी अश्या होत्या .. काही जणींना गुप्तरोगाची लागण झालेली होती .. तरीही ...अतिशय वेदनादायक अवस्था असताना ही त्या व्यवसाय करतात म्हणून सर त्यांना रागावले .. तेव्हा त्यांचा सरळ प्रश्न होता ' जर आम्ही व्यवसाय केला नाही ..तर पोट कसे भरणार ..घरमालकीणीला रोज पैसे द्यावे लागतात ' त्यांच्या मिळकती पैकी सुमारे तीस टक्के भाग घरमालकीण घेई .. उरलेल्या पैकी पन्नास टक्के जेवण... प्रसाधने यात खर्च होई ..कधी पोलिसांना पैसे द्यावे लागत .. काही जणी तर आपल्या कमाईतून पैसे साठवून ..दूर असलेल्या आपल्या घरी ते पैसे पाठवत असत .. घरच्या गरिबीला ठिगळे लावण्याचा त्यांचा हा प्रयत्न केविलवाणा होता .. ऐरवी रस्त्यावर बेफिकीरीने चालणारी .. बिनधास्त .. मादक इशारे करणारी .. भांडणास सज्ज असलेली .. ही स्त्री वास्तवात किती असहाय आहे ..दयनीय आहे ..याची जाणीव होत होती मला .. तितक्यात तेथे एक म्हातारी भिकारीण आली ... प्रत्येकीने त्या भिकारणीला भिक म्हणून काही पैसे दिले .. एखाद्या श्रीमंतांच्या वस्तीत देखील जितकी भिक मिळाली नसती तितकी भिक तिला या वस्तीत मिळाली ..कारण येथे माणुसकी होती .. तेथून निघून आम्ही दुसऱ्या घरात शिरलो ..तेथेही तीच परिस्थिती .. गी-हाईकाचा कंडोम लावायला नकार .. आरोग्याच्या तक्रारी ..दुसऱ्या ठिकाणी एक जण गरोदर होती ..दिवस भरत आलेले असावेत तिचे ... मला याबाबत जरा आश्चर्य वाटले कारण असा व्यवसाय करताना हिने काळजी का घेतली नाही ? त्या होणाऱ्या पोराचा बाप कोण ? त्याचे भविष्य काय ? वगैरे प्रश्न मनात आले .. मग समजले की येथे असणाऱ्या जवळजवळ प्रत्येक स्त्री ला एक दादला होता ..म्हणजे प्रत्यक्ष लग्न करून मिळालेला नाही तर ..त्या स्त्री ने जीव लावलेला..तिचे प्रेम बसलेला एक गुंड प्रवृत्तीचा माणूस ..किवा एखादे आवडते ..नेहमीचे गी-हाइक तिने दादला म्हणून निवडले असे ... या व्यक्तीशी ती स्त्री पत्नी सारखे वागे .. तो जरी हिच्यासोबत रहात नसला तरी ..तिने मनोमन त्याला आपला पती मानलेला असे .. त्याचे बाळ वाढविण्याची जवाबदारी तिनेच घेतलेली असे .. तो हिच्याकडे फुकट बसे ..बहुधा असा दादला दारुड्या ..व्यसनी असे ..तरी देखील ती स्त्री त्याच्यावर जीव लावून राही ..कदाचित स्वतची मातृत्वाची ..संसाराची ..वैवाहिक जीवनाची सारी स्वप्ने पूर्ण करण्याची ही धडपड असावी ... !
आणखी एका ठिकाणी एक तरुण मुलगी रडत बसलेली दिसली ... दिपाली तिचे नाव ..तिच्या कपाळावर टेंगुळ आलेले दिसत होते .. सरांनी तिला विचारले ' आज फिर मारा क्या तुम्हे ? क्यू मार खाती रहेती हो ? ' एकंदरीत सरांना तिच्या रडण्याचे कारण माहित असावे असे दिसले .. सरांनी मग सांगितले की हीचा दादला दारुड्या आहे ..दर दोन चार दिवसांनी तो येतो .दारूला पैसे मागतो .. दिले नाही तर भांडतो ..शिवीगाळ करतो ..मार झोड करतो हिला ..मात्र ही सगळे मुकाट सहन करते ..म्हणे त्याच्यावर प्रेम आहे हिचे .. मारझोड सहन करून ..कष्टाचे पैसे त्या दारुड्याला देवून .. रडून .. नशिबाला दोष देवून .. कायम असणारे तिचे प्रेम दिव्यच म्हणायचे ....तितक्यात एक जण कोल्ड्रिंक्स च्या बाटल्या घेवून आला आमच्यासाठी .. आम्ही मागीविले नसताना हे कसे आणले असा विचार माझ्या मनात आला .. सर म्हणाले या बायकांनी आपल्यासाठी मागवलेय हे कोल्ड्रिंक ..आपण जर नकार दिला तर त्यांना वाईट वाटेल .. आम्ही कोल्ड्रिंक घेतल्यावर सर पाकिटातून पैसे काढून त्याला देवू लागले तश्या त्या स्त्रिया सरांना विरोध करू लागल्या ..' हमारी तरफसे है ये डॉक्टरसाहब ..पैसे हम देंगे .. ' असा आग्रह करू लागल्या ..सर म्हणाले ' पिछली बार आपने पैसे दिये थे ..इस बार मेरी बारी है .. अगली बार फिर आप देना ' कोणतेही नाते नसताना चाललेला हा संवाद अतिशय आपुलकीचा होता ..या स्त्रिया बिचाऱ्या अक्षरशः जीव पणाला लावून त्यांचा व्यवसाय करत होत्या ..अश्या कष्टातून मिळवलेल्या पैश्यानी त्यांनी आपल्याला कोल्ड्रिंक पाजणे सरांना योग्य वाटत नव्हते .. तर ही माणसे इतकी आवर्जून आमची विचारपूस करतात ..सन्मानाने वागवतात .. वेळप्रसंगी औषधे देतात आम्हाला ..अश्या लोकांना आपल्या घरी आल्यावर पाहुणचार म्हणून काहीतरी दिलेच पाहिजे अशी त्यांची भावना ...!
सायंकाळचे पाच वाजत आले तसे सर म्हणाले आता आपण निघुयात ..यांची खरी धंद्याची वेळ होईल आता .. अश्या वेळी आपण येथे थांबलो तर त्यांना संकोच वाटेल .. आताचे यांचे रूप आणि धंद्याला उभे राहिल्यावर असणारे यांचे रूप यात जमीन अस्मानाचा फरक असतो ...त्यांना तश्या अवस्थेत आपण पाहू नये अशी त्यांची इच्छा असते .. आम्ही जायला निघालो तश्या सगळ्या जणी भोवती जमल्या पुन्हा या असे आमंत्रण देवू लागल्या .. आता या पुढे नक्की कंडोम चा आग्रह धरू असे म्हणू लागल्या .. आम्ही जड अंतकरणाने गल्लीच्या बाहेर पडलो ..वाटेत सर सांगू लागले ..या सर्व मजबुरीने या धंद्यात आहेत .. कोणत्याही स्त्री ला मनापासून हे आवडत नाही ..प्रत्येकीला आपल्याला घर संसार असावा असे वाटते ...दुर्दैवाने त्यांना हे मिळू शकले नाहीय .. या पैकी काही जणी प्रियकराबरोबर लग्न करायला म्हणून घरून पळून आलेल्या आहेत ..वाटेत प्रियकराने सोडून दिल्यावर भरकटत येथे पोचल्या ... आता घरचे दरवाजे बंद झालेत त्यांच्यासाठी .. शिवाय घरी परत गेल्या तर गावकरी सगळ्या कुटुंबाला वाळीत टाकतील भीती आहे ..काही जणींना घराच्या दारिद्र्यामुळे आईबापानी विकले आहे ..काहीजणी देवदासी प्रथेच्या बळी आहेत .. एकंदरीत सारा समाजच जवाबदार आहे त्यांच्या या अवस्थेसाठी ..!
( बाकी पुढील भागात )
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें