शनिवार, 25 मई 2013

प्रशिक्षण


दिल्लीचे प्रशिक्षण ! (पर्व दुसरे -भाग सहावा )


दिल्लीला प्रशिक्षणासाठी माझी व मिलिंद या माझ्या मित्राची निवड झाली म्हणून आम्ही खूप आनंदात होतो ..मिलिंद मुळचा साताऱ्याचा ..त्याला दारूचे व्यसन होते ..माझ्यासोबतच तो मुक्तांगण मध्ये दाखल होता .. अंगाने किरकोळ होता ..बाकी अस्सल सातारी ...बोलण्यास तिखट ..त्यानेही व्यसनमुक्तीचे दीड वर्ष पूर्ण केले होते व तो अजूनही मुक्तांगण मध्येच निवासी कार्यकर्ता म्हणून राहत होता ..दोन दिवस आधी मी मुक्तांगण मध्ये गेलो ...दिल्लीला जाण्याची आमची सगळी तयारी झाल्यावर जाण्याच्या आदल्या दिवशी मँडम ने आम्हाला भेटायला बोलाविले ....आम्हाला एकंदरीत प्रशिक्षणाचे स्वरूप सांगितले ..जास्तीत जास्त माहिती घ्या ..मुक्तांगणचे नाव मोठे करा ...आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहोत हे विसरू नका ..वगैरे सूचना दिल्या ..शेवटी तेथे पंधरा दिवस खर्च करायला म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये दिले ..संस्थेचे पैसे आहेत हे ..या पैश्यांचा नीट हिशोब ठेवा असा बजावले ..अगदी शेवटी त्यांनी स्वतच्या पर्स मधून पाचशे रुपये काढून आम्हाला दिले व म्हणाल्या हे पैसे माझ्यातर्फे तुम्हाला खर्च करायला देत आहे ..याचा हिशोब नाही दिलात तरी चालेल ...त्यांचे बोलणे ऐकून आमच्या डोळ्यात पाणीच आले ..किती सूक्ष्म विचार केला होता त्यांनी ... मुलांना व्यक्तिगत खर्च करायला पैसे द्यायला हवेत हे समजून घेवून ..स्वतःजवळचे पैसे त्यांनी आम्हाला दिले होते तसेच त्या पैश्यांचा हिशोब दिला नाहीत तरी चालेल असे सांगून आमच्यासारख्या व्यसानींवर गाढ विश्वास दर्शविला होता ...आमचे रेल्वेचे जाण्यायेण्याचे आरक्षण आधीच करून ठेवले होते संस्थेतर्फे ...दुसऱ्या दिवशी सर्वांचा निरोप घेवून आम्ही निघालो ..माझी आत्या पूर्वी दिल्लीला राहत होती ..त्यामुळे पूर्वी माझे दिल्लीला दोन तीन वेळा गेलो होतो ..दिल्ली दर्शन करून झाले होते पूर्वीच .. यावेळी मात्र जाण्याचे कारण वेगळे होते .


आम्ही दिल्लीत प्रशिक्षणाच्या आदल्या दिवशी रात्रीच पोचलो ..स्टेशनजवळच एका होटेल मध्ये रात्री मुक्काम करून ..दुसऱ्या दिवशी सकाळी ' नँशनल युथ सेंटर '... रिंग रोड . या पत्त्यावर पोचलो ...तेथेच आमची सर्व प्रशिक्षणार्थी लोकांची राहायची सोय होती ..प्रशिक्षण देखील तेथेच होणार होते ..मध्यप्रदेश ..महाराष्ट्र ..राजस्थान ..गुजरात .. हरियाणा ..दिल्ली ..उत्तरप्रदेश या ठिकाणाहून मिळून सुमारे २० जण प्रशिक्षणासाठी आलेले होते .. एकमेकांच्या ओळखी झाल्यावर लक्षात आले की ते सगळे लोक ' मुक्तांगण ' बद्दल ऐकून होते ..तसेच सर्वात जास्त पेशंटची संख्या आणि यशस्वी केंद्र म्हणून मुक्तांगणचा दबदबा होता ...छान सोय केली होती सर्वांची राहण्या -जेवण्याची .. व्यसनाधीनता या आजाराबद्दल आणि उपचारांबद्दल वेगवेगळ्या तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन मिळणार होते आम्हाला .. राहून राहून एक प्रश्न मनात येत होता ... गुजरात मध्ये दारूबंदी असूनही तेथे व्यसनमुक्ती केंद्र कसे ? सरकार देखील या केंद्राला मंजुरी देवून अनुदान देतेय ..म्हणजे दारूबंदी फक्त कागदोपत्री आहे हे सरकारला देखील मान्य आहे तर .. एकीकडे दारूचे नवीन परवाने द्यायचे ...दारू उत्पादकांना हव्या त्या सवलती देवून मदत करायची आणि दुसरीकडे व्यसनमुक्ती केंद्राना अनुदान द्यायचे हे गौडबंगालच होते ...खरे तर खरोखर केंद्र सरकारने मनावर घेतले तर दारू आणि इतर मादक पदार्थ बंद करणे नक्कीच शक्य झाले असते ... अगदी १०० टक्के नाही तरी बराच फरक पडला असता .. तेथे वारंवार एक गोष्ट सांगितली गेली जोपर्यंत प्रत्यक्ष व्यसनी व्यक्ती मनावर घेत नाही तोवर त्याला व्यसनमुक्त राहणे शक्य नसते ..हे मात्र पटले ..परंतु त्याच्या परवानगी खेरीज त्याला व्यसनमुक्ती केंद्रात सक्तीने दाखल करण्यास मनाई असते हा मुद्दा पटला नाही ... कारण दारू पिणाऱ्या व्यक्तीला स्वतचे भले बुरे समजत असते तर तो मुळात व्यसनी झालाच नसता ..अनेक जण मला असे माहित आहेत की दारू अथवा अन्य व्यसनांमुळे त्याचे व त्याच्या कुटुंबियांचे अतोनात नुकसान होतेय .. अगदी जीव जायची पाळी आलीय ..तरीही व्यसानीच्या मानसिक व शारीरिक गुलामीमुळे तो व्यसनमुक्ती केंद्रात स्वतःहून जाण्यास तयार होत नाहीय .. पालकदेखील हतबल झालेत अश्या वेळेस देखील आपण त्याच्या उपचार घेण्याच्या इच्छेची वाट पाहायची का ?


प्रशिक्षणाला आलेल्या काहीजणांना तर व्यसनाधीनता हा एक मनोशारीरिक आजार आहे याची देखील कल्पना नव्हती असे दिसले .. त्यांच्याकडे काहीच थेरेपीज होत नसत ..दिवसभरातून फक्त एकदा योगाभ्यास करायचा आणि दिवसभर टी.व्ही . कँरम व इतर मनोरंजन करायचे असा दिनक्रम होता उपचार घेणाऱ्या व्यसनी लोकांसाठी ... मला मुक्तांगणचा आणि बाबा व मँडम चा खूप अभिमान वाटला की त्यांनी व्यसनाधीनता हा व्यक्तिमत्वाला जडलेला आजार आहे हे ओळखून व्यसनी व्यक्तीच्या सर्वांगीण बदलासाठी योग्य असे उपचार देण्याची व्यवस्था केली होती ...समूह उपचार ..व्यक्तिगत समुपदेशन ...पालकांचे समुपदेशन ..पाठपुरावा अशा सर्व अंगाने उपचार देवून मुक्तांगण व्यसनी व्यक्तीला केवळ व्यसनमुक्तीच नव्हे तर एक आदर्श व्यक्ती म्हणून जगण्यास प्रेरणा देत होते ....अल्कोहोलिक्स अँनॉनिमस या संघटनेच्या सुधारणेच्या १२ पायऱ्यांवर आधारित असेच उपचार मुक्तांगण देत होते .. ज्यात व्यसनमुक्ती व आत्मिक विकास .. समाधान ..प्रसन्नता .. नैतिक मूल्याधिष्ठित अशी जीवनपद्धती अंगीकारण्यास मदत केली जाई ...प्रशिक्षणाच्या दरम्यान आम्हाला एकदोन ठिकाणी जनजागृती कार्यक्रम करण्यास देखील नेले होते ..जनजागृती कार्यक्रम म्हणजे एका सुसज्ज व्हँन मधून एखाद्या झोपडपट्टीत जावून ..व्यसनाधीनतेमुळे होणारे दुष्परिणाम दर्शविणारी फिल्म दाखवणे ... त्याच दरम्यान एकदा मिलिंद व मी सायंकाळी लाल किल्ला पाहायला गेलो असताना तेथे बाहेर उभ्या असलेल्या बसेसच्या खाली अनेक गर्दुल्ले मला ब्राऊन शुगर ओढताना दिसले ..माझे कुतूहल जागृत झाले .. दिल्लीत माल किती रुपयांना मिळतो ..कसा असतो वगैरे प्रश्न त्या मुलांना विचारावेसे वाटले ..मी मिलिंदला तसे म्हंटले तर तो घाबरला ..त्याला वाटले मला आँब्सेशन आले की काय ... तो मला त्या मुलांशी बोलण्यास मनाई करू लागला व परत युथ सेंटरला जाण्याची घाई करू लागला .. कदाचित त्याला वाटले असावे की न जाणो तुषार या मुलांमध्येच पीत बसला तर ?.. तो माझी किती काळजी घेतोय या विचाराने बरेही वाटले ...


( बाकी पुढील भागात )

=====================================================

सरकारी दृष्टीकोन ! ( पर्व दुसरे - भाग सातवा )



मिलिंदने मला लाल किल्ल्याजवळ अजिबात थांबू दिले नाही जवळ जवळ हात धरूनच बसची वगैरे वाट न पाहता ऑटोत बसवले आणि आम्ही युथ सेंटरला परतलो . या प्रशिक्षणाच्या दरम्यान शेवटच्या दोन दिवशी दिल्लीतील काही व्यसनमुक्ती केंद्राना भेटी देण्यास आम्हाला सर्वाना नेले .. त्यातील मा . किरण बेदी यांचे ' जिवनज्योती ' हे केंद्र देखील पहिले .. पोलीस मुख्यालयाच्या वरच्या मजल्यावर हे केंद्र होते .. दिल्लीत जेव्हा ब्राऊन शुगरने थैमान घातले तेव्हा गुन्हेगारी वाढली .. त्या वेळी व्यसनाधीनता आणि पर्यायाने गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी म्हणून हे केंद्र सुरु केले गेले .. किरण बेदी यांनी वेळीच संकट ओळखून शक्य ती उपाय योजना केली होती ..तसेच व्यसनी व्यक्तीकडे एक गुन्हेगार म्हणून न पाहता आजारी व्यक्ती म्हणून पाहण्याचा व आवश्यक ते उपचार देण्याचा दृष्टीकोन बाळगला होता .. किरण बेदी स्वतः या केद्रात लक्ष घालतात असे कळले .. त्यांच्या या संवेदनशीलतेमुळे त्यांच्या बद्दलचा आदर वाढला ..पुढे त्यांनी तिहार जेल मध्ये देखील हाच दृष्टीकोन बाळगून गुन्हेगारांना पुन्हा माणसात आणण्यासाठी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत ... शेवटच्या दोन दिवसात जरा गम्मत झाली ..युथ सेंटरला आमचे प्रशिक्षण संपल्यानंतर एक दुसरे प्रशिक्षण होणार होते वेगळ्या विषयाचे ..त्यासाठी दोन दिवस आधीच भोपाळहून दोन मुली आल्या होत्या ..व त्यांनी देखील दोन दिवस आमच्यासोबत आमच्या सेशन मध्ये भाग घेतला ..गंमतीचा भाग असा की इतके दिवस सर्वाना जरा रुक्ष वाटणारे प्रशिक्षण या दोन मुलींच्या प्रवेशाने एकदम छान वाटू लागले ..सर्वांची विनोदबुद्धी जागृत झाली ...हलके फुलके विनोद होऊ लागले .. एरवी कोणताही प्रश्न न विचारता चूप बसणारे सदस्य देखील ... आपल्या चौकसपणाचा प्रत्यय देवू लागले ...याच काळात एक तद्दन फालतू अंधश्रद्धा देखील समजली .. आमच्या सोबत लखनौ येथील व्यसनमुक्ती केंद्राचे दोन सदस्य होते .. प्रशिक्षणाच्या चौथ्या दिवशी त्या पैकी एकाने अंघोळ करून बाहेर व्हरांड्यात वाळत घातलेली त्याची अंडरवेअर व बनियान हे कपडे वा-याने उडून गेले ..आम्ही खाली शोध घेतला पण काही ते कपडे सापडले नाहीत ... आता नवीन अंडरवर व बनियान घ्यावे लागणार होते ..मात्र सतत तीन दिवस त्यांना काही बाजारात जाता आले नाही ..आश्चर्य म्हणजे ज्याचे कपडे हरवले होते त्या वल्लीने तीन दिवस अंघोळच केली नाही ..जेव्हा मी त्याला अंघोळ न करण्याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला ... ' हम नहाते समय सारा कपडा निकलते नही है ... और अगर अभी जो अंडरवेअर पहेना है वो गिली हो गई तो मुसिबत हो जायेगी .. बडा पाप होता है ' म्हणजे अंघोळ करताना स्वतचे शरीर अनावृत्त पाहणे हे त्याच्या दृष्टीने पाप होते .. लहान पणापासून त्याने स्वतःला असे अनावृत्त कधी पहिले नव्हते .. बापरे ... म्हणजे हा याच्या शरीराच्या सर्व अंगांची स्वच्छता कशी करत असणार ? शेवटी जेव्हा नवी अंडरवेअर बाजारातून विकत आणली तेव्हाच त्याने अंघोळ केली ... .


आम्हाला सर्वाना या दरम्यान व्यसनमुक्ती या विषयावर एक चित्र काढण्यास सांगितले गेले .. चित्रकलेत मला अजिबात गती नाही ..येथे कलेपेक्षा चित्राच्या कल्पनेला आणि त्यातून दिल्या जाणाऱ्या व्यसनमुक्तीच्या संदेशाला जास्त महत्व होते .. आमच्या सोबत पटना येथून रेडक्रॉस सोसायटी तर्फे प्रशिक्षणाला आलेला राजेश म्हणून एक उत्साही तरुण होता त्याची चित्रकला छान होती ..मग सर्व जण माझे चित्र काढून दे म्हणून त्याच्या मागे लागले ..बिचा-याने कसलीही कुर कुर न करता आम्हाला आमच्या कल्पनेनुसार चित्रे काढून दिली ..मी भारत देशाचा नकाशा काढून त्यातून दोन हात बाहेर आले आहेत ..आणि एका पाठमोऱ्या तरुणाला ते हात आपल्या मिठीत घेत आहेत असे चित्र काढायला सांगितले .. चित्राच्या वर एक वाक्य लिहिले होते .. ' देश को आपकी जरुरत है " म्हणजे व्यसनाधीन झालेल्या तरुणांना हा संदेश होता की तुम्ही कुचकामी नाही आहात ..तर देशाला तुमची गरज आहे .. व्यसनमुक्त होऊन आपले कर्तव्या बजावा ... मिलिंद ने असे चित्र सांगितले की जमिनीवर एक जाळे पसरले आहे .. त्या जाळ्यात .दारू ..चरस ..गांजा ..ब्राऊन शुगर वगैरे मादक पदार्थ ठेवले आहेत ... वरून आकाशातून एक पक्षांचा थवा उडतोय .. त्या पक्षांची तोंडे माणसांची काढली होती .. आणि त्या चित्रा वर लिहिले होते ' ये जाल हमारी बरबादी है ' .. मिलिंदच्या चित्राला पहिले तर माझ्या तिसरे बक्षिस मिळाले ..बक्षिस म्हणजे आम्हाला रविंद्रनाथ टागोरांची दोन पुस्तके भेट मिळाली .. आता त्यांची नावे आठवत नाहीत ... .


एकंदरीत प्रशिक्षण छानच झाले .. उपचारांबद्दल तसेच समुपदेशना बद्दल बरीच नवी माहिती मिळाली ..मुक्तांगण अगदी योग्य पद्धतीने उपचार देते याची खात्री पटली मला ...अगदी शेवटच्या समारोपाच्या दिवशी सर्वाना आपले मनोगत व्यक्त करायला सांगितले गेले ..त्या भोपाळ च्या मुली होत्याच ..मग काय सर्वांच्या बोलण्याला बहार आला होता .. हे प्रशिक्षण घेवून कृतकृत्य झालो .. आयुष्यातील सर्वात चांगले क्षण .. आता सारा देश व्यसनमुक्त करू .. असल्या आशयाचे सर्व बोलू लागले .. एक दोघांनी राहण्याच्या व्यवस्थेबाबत तक्रार केली .. अंडरवेअर हरवलेल्या व्यक्तीने कपडे सुखानेकी अच्छी व्यवस्था होनी चाहिये असे सुचवले .. मी सर्वाना हलके चिमटे काढत बोललो .. मग गाणी म्हणणे झाले .. अर्थात गाण्यात मी बाजी मारली .. प्रसंगाला साजेसे असे गाणे म्हंटले...गाण्याला वन्स मोअर मिळाला .. हेमंतकुमारचे ' ना तुम हमे जानो ..ना हम तुम्हे जाने ..' हे गाणे म्हंटले होते .. शेवटी प्रमाणपत्रे वाटप झाले . प्रशिक्षण घेतल्यावर व्यसनमुक्ती कार्यकर्ता म्हणून काम करण्यास एक वेगळा आत्मविश्वास मिळाला ..अर्थात प्रमाणपत्रामुळे व्यक्तिमत्वाचे थोडे वजनही वाढले .. त्याचा अहंकार होऊ द्यायचा नव्हता ही जवाबदारी माझी होती . 


( बाकी पुढील भागात )

=====================================================

रोटरी क्लब हॉल …. गंजमाळ ! (पर्व दुसरे - भाग आठवा ) 



प्रशिक्षण यशस्वी पणे पूर्ण करून मिलिंद आणि मी मुक्तांगणला परतल्यावर … आमचा आत्मविश्वास वाढलेला होता … अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे व्यसनमुक्ती खूप अनमोल गोष्ट आहे हे देखील लक्षात आली होती ….माझ्या अनेक क्षमता केवळ व्यसनामुळे मी वापरू शकत नव्हतो … सर्व व्यक्तिमत्वच व्यसनामुळे शून्य झाले होते ..... आता नव्याने सर्व क्षमता वापरून जीवन उभे करायचे आव्हान होते माझ्यापुढे … नाशिकला परत जाताना मला सांगितले गेले की आता नाशिकमध्ये सर्व डिस्चार्ज झालेल्या मित्रांना आठवड्यातून एकदोन वेळा भेटण्यासाठी एखादी चांगली जागा आपल्याला मिळवायची आहे…. त्यासाठी नाशिकच्या रोटरी क्लबचे सदस्यांनी उत्सुकता दाखविली आहे … नशिकच्या रोटरी क्लबच्या स्थानिक सदस्यांना भेटून पुढची कार्यवाही मला करायची होती … त्या नुसार…. मी रोटरीचे स्थानिक अध्यक्ष श्री . भालचंद्र गाडगीळ यांना भेटलो …. साधारण सत्तरीचे असणारे गाडगीळ साहेब पूर्वी उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते असे समजले होते मला … जरा भीत भीतच त्यांना भेटलो … खरे तर हे रोटरी क्लब …… लायन्स क्लब … जेसीज वगैरे समूहांच्या बाबतीत माझा असलेला गैरसमज गाडगीळ साहेबांच्या भेटीमुळे दूर झाला ……हे सगळे पैसेवाले लोक उगाचच टाईमपास करण्यासाठी …… तसेच आपण काहीतरी सामाजिक कार्य करतो आहोत असे स्वतचे समाधान करून घेण्यासाठी म्हणून…असल्या संस्थामधून सदस्य होऊन … एखाद्या …… सामाजिक समस्येसाठी काहीतरी किरकोळ मदत करतात …. मात्र मारे फोटोबिटो काढून त्या मदतीची वर्तमानपत्रातून जाहिरात करतात आणि स्वतःचीच पाठ थोपटून घेतात …असा माझा समज होता ……. शिवाय हे लोक स्वतच्या नावापुढे लायन श्री. ………रोटरी श्री . ……. असे जे बिरुद लावतात … त्याचीही मला गम्मत वाटत असे … थोडक्यात काय तर काम कमी आणि गवगवा जास्त करतात असे मला वाटे …

गाडगीळ साहेबाना भेटल्यावर माझा गैरसमज दूर झाला … सगळ्यात महत्वाचे हे की वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी लोकांना देखील समाजासाठी आपण काहीतरी करावे असे वाटणे ही मोठी गोष्ट आहे …. शिवाय हे लोक राजकीय संघटनांपासून स्वतःला दूर ठेवतात हि एक चांगली बाब होती … ते जे कार्यक्रमाचे फोटो वगैरे काढतात आणि वर्तमानपत्रात छापून आणतात ते सारे त्यांच्या वार्षिक अहवालासाठी गरजेचे असते म्हणून कारण जे सदस्य क्लब ची नियमित वर्गणी भरतात त्यांना आपण दिलेल्या पैश्यांचा योग्य विनियोग होतोय याची खात्री पटवण्यासाठी हे फोटो काढणे असते …. तसेच आठवड्यातून किमान एक तास तरी आपण सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक समस्या सोडवण्यासाठी थोडाफार हातभार लावला पाहिजे ही त्यांची इच्छा असते … अशी माहिती मला गाडगीळ साहेबांकडून मिळाली … हे समजल्यावर अश्या संस्थांबद्दल असलेला माझा सुप्त राग कमी होऊन आदर वाटू लागला . गाडगीळ साहेब अतिशय मोकळेपणे माझ्याशी बोलले … पूर्वी मी देखील व्यसनात अडकलेला होतो हे एकून तर त्यांना माझे अधिकच कौतुक वाटले असावे असे जाणवले … नाशिक मध्ये गंजमाळ भागात रोटरी क्लबच्या तर्फे एक हॉल बांधण्याचे काम सुरु होते … व ते आता पूर्णत्वाला पोचले होते … या हॉलचा उपयोग … रोटरी क्लबच्या मिटींग्स … सदस्यांच्या कडील समारंभ वगैरेंसाठी वापरला जाणार होता …. तसेच काही सामाजिक उपक्रमांसाठी देखील हा हॉल विनामुल्य उपलब्ध करून देण्याचे ठरले होते …त्या नुसार गाडगीळ साहेबांनी मुक्तांगण मध्ये उपचार घेवून परतलेल्या नाशिकच्या लोकांसाठी …. पाठपुरावा मिटींग्स व व्यसनमुक्ती सल्ला केंद्र म्हणून उपयोग करण्यासाठी रोटरी हॉल आठवड्यातून दोन वेळा देण्याचे मान्य केले … नंतर रोटरी क्लबचे चिटणीस म्हणून काम करणाऱ्या श्री. खुशालभाई पोद्दार यान देखील भेटलो …. ते देखील अतिशय मनमिळावू आणि हसतमुख होते त्यांनीही शक्य ती सगळी मदत करण्याची खात्री दिली मला . 

रोटरी क्लब हॉल वर मुक्तांगण चे ' व्यसनमुक्ती सल्ला व पाठपुरावा केंद्र ' सुरु होणार असल्याची बातमी मी दैनिक गावकरी …दैनिक देशदूत …सकाळ वगैरे वर्तमानपत्रात दिली… आणि एकदाचे पाठपुरावा केंद्र सुरु झाले … वर्तमानपत्रात बातमी वाचून अनेक पालक चौकशी करण्यासाठी येवू लागले …. बुधवार व शनिवार असे आठवड्यातून दोन दिवस सायंकाळी ७ ते ९ अशी सल्ला केंद्राची वेळ असणार होती … आता या वेळात मला नियमित हॉल वर उपस्थित लागणार होते . मी ज्या ज्या ठिकाणी होम व्हीजीटस केल्या होत्या तेथे ही माहीती दिली …. व्यसनमुक्ती सल्ला केंद्राचे कामकाज पाहणारा कार्यकर्ता म्हणून माझेही नाव वर्तमान पत्रात छापुन आले होते …पहिल्याच बुधवारी एक पालक सल्ला घेण्यासाठी आले … ते रविवार कारंजा भागात राहणारे होते … त्यांचा भाचा हा दारूच्या आहारी गेला होता …. तो स्वतः व्यसनी झाल्याचे मान्य करतच नव्हता आणि कोठेही उपचार घेण्यास देखील तयार नव्हता … मी त्याला त्याच्या घरी जावून भेटावे आणि त्याला उपचार घेण्यास तयार करावे अशी त्याच्या मामांची इच्छा होती … शिवाय त्याला मामा पुढाकार घेत आहेत हे देखील कळता कामा नये असे त्यांचे म्हणणे होते …. नाहीतर नंतर तो त्यांच्यावर रागावेल किवा आपण व्यसनी असल्याचे इतरांना सांगितले म्हणून भांडेल अशी भीती त्यांना वाटत होती … हे जरा अवघड काम होते … खरेतर मामा त्याच्या भल्याचाच विचार करत होते … तरीसुद्धा त्यांना भीती वाटत होती व्यसनी व्यक्तीची नातलागांमध्ये किती दहशत असते हे जाणवले मला … मला त्यांची समजूत घालावी लागली कि नातलग जर असे व्यसनी व्यक्तीला घाबरले तर तो सुधारण्याची शक्यता खूप कमी असते … त्याला घाबरण्यापेक्षा आम्ही तुला मदत करत आहोत आणि ते तुझ्या भल्याचे आहे असे त्याच्या मनात ठसविले पाहिजे … तसेच कितीही भांडलास … रागावलास तरी आम्ही तुला असे बरबाद होऊ देणार नाही हे त्याला गोडीगुलाबीने किवा जरा ठासून सांगितले पाहिजे वगैरे … तरी ते मामा घाबरतच होते शेवटी मी त्यांना तुम्ही मला किमान त्या भाच्याकडे घेवून तरी चला असा आग्रह केला … ते कसेतरी तयार झाले रात्री नऊ वाजता मी त्यांच्या सोबत सिडको येथे राहणाऱ्या त्यांच्या भाच्याकडे गेलो … त्याचे वडील गेलेले होते … घरात आई , लहान भाऊ व लहान बहिण होती … हे महाशय अजून घरी परतले नव्हते … जर वेळ ओळख वगैरेत गेला … खूप हुशार आहे … स्वभावाने पण खूप चांगला आहे परंतु व्यसनामुळे बिघडला वगैरे नेहमीचेच बोलत होते नातलग … सुमारे अर्ध्या तासाने तो घरी आला … मीच पुढाकार घेवून त्याला माझी ओळख करून दिली व मोकळेपणी गप्पा मारू म्हणत त्याला गच्चीवर घेवून गेलो … किरकोळ शरीरयष्टी… गोरा… मध्यम उंची …डोळ्यावर चष्मा … त्याचे नाव अभय होते … मी त्याला माझ्या व्यसनाच्या पूर्व इतिहासाबद्दल थोडक्यात सांगितले … त्याच्याशी एकदम दोस्तीखात्यात बोललो ते त्याला आवडलेले दिसले … त्याला सरळ म्हणालो की तुला जर आता दारू पिणे हि तुझी समस्या आहे असे वाटत असेल … तर मी तुला नक्की मदत करीन … माझे बोलणे बहुतेक प्रभावी असावे … कारण त्याने त्याला दारूची समस्या असल्याचे कबुल केले … तसेच येत्या शनिवारी रोटरी हॉल वर येण्याचे मान्य केले … पुढे त्याला हे देखील सांगितले कि जमले तर शनिवारी मला भेटायला येताना दारू न पिता ये … त्याने ते देखील मान्य केले . 

( बाकी पुढील भागात )

======================================================

मादक द्रव्ये विरोधी दिन ! ( पर्व दुसरे - भाग नववा )



अभय खरोखरच शनिवारी रोटरी हॉल वर मिटिंगला आला शिवाय त्याने दोन दिवसांपासून दारू प्यायली नाही हे देखील सांगितले… मला खूप आनंद झाला…. व्यसनमुक्ती सल्ला केंद्र सुरु झाल्यावर माझ्याकडे आलेली पहिलीच केस होती अभयची … सुरवात तर चागली झाली होती म्हणायची… सल्ला केंद्रावर दर बुधवार आणि शनिवारी किमान चार पाच जण तरी येवू लागले नियमित हे चांगली बाब होती … मेरीतील लोकशाही मित्र मंडळाचे काम देखील छान सुरु झाले होते …. मी लोकशाही मित्र च्या वार्ता फलकावर नियमित काहीतरी लिहू लागलो होतो … शिवाय उन्हाळ्यात बस थांब्यावर थांबलेल्या तसेच रस्त्यावरून ये जा करणाऱ्या लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून लोकशाही मित्र तर्फे आम्ही वर्गणी काढून दोन मोठे रांजण आणले होते …. त्यात रोज ताजे पाणी भरून आम्ही ' पाणपोई ' देखील सुरु केली होती …… सुरवातीला रांजणात पाणी रोज कोण भरणार हो प्रश्न होता …थोडे दुरून म्हणजे जवळजवळ २०० फुटावर असलेल्या नळाचे पाणी बादलीने भरून रांजणात आणून टाकायचे काम आधी मी एकट्यानेच सुरु केले … मी कोणताही संकोच न ठेवता …. हे पाणक्याचे काम चार पाच दिवस नेमाने केल्यावर इतर तरुण सदस्यांना हुरूप आला … ते देखील मला मदत करू लागले ….माझे पूर्वायुष्य विसरून पूर्णपणे नवीन जीवन सुरु करण्याच्या प्रयत्नात होतो मी … त्याकाळात मी दाढी वाढवली होती …. अर्थात ही दाढी प्रेमभंग झाला म्हणून नव्हती … तर काहीतरी वेगळेपण म्हणून वाढवली होती …. जीन्स , खादीचा झब्बा , गळ्यात शबनम पिशवी आणि पायात कोल्हापुरी चपला असा … माझा एखाद्या पत्रकारासारखा वेश असे … प्रथम दर्शनी छाप पाडणारा हा वेश माझ्या कामाच्या स्वरूपाला साजेसा होता … अनघाची कधी कधी तीव्रतेने आठवण होई …तेव्हा मन काही काळ उदास होत असे … वाटे कसेही करून तिची भेट घ्यावी … तर कधी कधी मनात खूप वाईट असे विचार देखील येत असत …ते इथे सांगण्यासारखे नाहीत … कारण ते विचार ज्याचे आपल्या प्रेयसीशी लग्न होऊ शकले नाही त्या प्रत्येकाच्या मनात येत असावेत … त्यात कसेही करून ती आपली व्हावी हाच निष्कर्ष असे …मानवी मन हा एक सदैव अभ्यासाचा विषय राहिला आहे … मनात येणारे विचार … कधी कधी खूप विध्वंसक असतात … तटस्थपणे त्या विचारांचे परीक्षण न करता त्यात वाहवत गेले तर …कोणाचेच भले होत नाही …जाऊ दे अनघा जेथे कुठे असेल तेथे ती सुखी राहो … आनंदी राहो … हा विचार करून मी मनाला समजावत असे. 

पाटील साहेबांशी आता माझ्या छान गप्पा होत असत … ते जेव्हा एकटे असतील तेव्हा मला बसवून घेत …सामाजिक समस्या … गुन्हेगारी … वाढती व्यसनाधीनता वगैरे सगळे विषय असत त्यांच्या बोलण्यात … अतिशय संवेदनशील मनाचा हा गृहस्थ पोलिस दलात कसा रमला हे कोडेच होते … कधी कधी त्यांच्या बोलण्यातून जाणवत असे की पोलिसांनी मनात आणले तर ते बरेच काही करू शकतात मात्र … त्यांच्या कामात असणारा राजकीय हस्तक्षेप हि मोठी अडचण होती . एकदा पाटील साहेबांनी मला सांगितले पुढच्या महिन्यात म्हणजे २६ जून या दिवशी आंतरराष्ट्रीय मादक द्रव्ये विरोधी दिन आहे … जागतिक आरोग्य संघटनेच्या सुचने नुसार … या दिवशी मादक द्रव्यांचे दुष्परिणाम जास्ती जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी … चर्चा सत्रे … व्याख्याने … पथनाट्ये… शोभायात्रा काढून हा दिवस पाळायचा असतो …. तू देखील येथे नाशिकमध्ये या दिवशी मुक्तांगण तर्फे काहीतरी जन जागृती कार्यक्रम करावेस असा तुला बाबांनी निरोप दिला आहे …. पाटील साहेब त्यासाठी लागणारे पैसे व इतर सहकार्य करण्यास तयार होते … मी संध्याकाळी लोकशाही मित्र च्या मित्रांसोबत चर्चा केली …. सर्वांनी ती कल्पना उचलून धरली … मग आम्ही एक पथनाट्य बसवायचे ठरवले … तसेच एक छोटीशी शोभायात्रा देखील काढायचे ठरले … त्या नुसार मी काही तरुणांना हाताशी धरून पथनाट्य बसविण्यास सुरवात केली …. मी इतर सर्व व्यवस्था पाहणार होतो म्हणून पथनाट्यात भूमिका करणार नव्हतो … एक तरुण मुलगा मित्रांच्या नादाने कसा व्यसनात अडकत जातो … सुरवातीला आनंद देणारे व्यसन नंतर त्याच्या आयुष्यात कसा विध्वंस घडवते … आणि शेवटी व्यसनमुक्ती केंद्रात जावून तो उपचार घेतो … अशी मध्यवर्ती कल्पना होती पथनाट्याची …. यात व्यसनी तरुण… त्याचे आईवडील… बहिण … मित्र अश्या चार पाच भूमिका होत्या …. आईची भूमिका करण्यासाठी प्रशांतची आई तयार झाली … इतर भूमिकांसाठी देखील मुले मिळाली … प्रश्न होता बहिणीच्या भूमिकेचा त्यासाठी एखादी तरुण मुलगी तयार व्हायला हवी होती … शेवटी वैजयंती नावाची एक कॉलेजची तरुणी तयार झाली ……फ़क्त तिच्या वडिलांची एक अट होती ती अशी की वैजयंतीला… पथनाट्याची तालीम व इतर वेळी सुरक्षित सोबत हवी … मी ती जवाबदारी स्वीकारली …. हे नाजूक काम होते … पथनाट्यात काम करणाऱ्या … लोकशाही मित्रच्या कार्यकर्त्यांनी काही चूक करू नये … तसेच वैजयंतीला कोणताही त्रास होऊ नये म्हणून बारीक लक्ष ठेवावे लागणार होते … 

शेवटी एकदाचे पथनाट्य बसले … पाटील साहेबांनी वेळोवेळी मला मदत केली …शोभायात्रेसाठी लागणारे कापडी फलक …. रंगविण्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ त्यांनी विनासायास पुरवले सिन्नर फाटा … शालीमार चौक … मेरी … भद्रकाली … आणि त्र्यंबकेश्वर अश्या पाच ठिकाणी पथनाट्ये सादर करायचे ठरले … त्र्यंबकेश्वर यासाठी की त्र्यंबकेश्वर येथे ब्राउन शुगरच्या तसेच दारू , भांग , गांजा वगैरेच्या व्यसनींचे प्रमाण लक्षणीय होते … या निमित्ताने आम्ही मेरी परीसरातील नागरिकांसाठी एक निबंध स्पर्धा देखील आयोजित केली होती … विषय होता … ' व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम ' बक्षीस म्हणून रोख रक्कम जाहीर केली होती …एकंदरीत जय्यत तयारी झाली होती । या काळात मी खूपच व्यस्त झालो होतो …. दिवस अगदी भुर्रकन संपे … पथनाट्यातील कलाकारांचे मूड सांभाळणे … बाकी कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवणे … व इतर सर्व कामे पाहणे यात कधी कधी माझी चीड चीड होई… वैताग येई सगळ्याचा … त्यावेळी अनघाची तीव्रतेने आठवण येई … सारे त्रास … सगळ्या व्यथा … उमाळे … मोकळेपणी व्यक्त करण्यासाठी एखादे हक्काचे ठिकाण असणे किती छान असते … ते आपल्याला नाही याची खंत वाटे … ' आपके पहेलु में आ कर रो दिये … दास्ताने गम सुनाकर रो दिये ' हे गाणे ऐकत वेळ निभावून नेत होतो . 

( बाकी पुढील भागात )

======================================================

२६ जून १९९२ ! (पर्व दुसरे - भाग दहावा ) 



एकाच दिवसात शोभायात्रा … आणि एकंदर पाच पथनाट्ये करणे थोडे अवघडच होते … कारण पथनाट्याची ठिकाणे एकमेकांपासून जवळ नव्हती …. म्हणून दि. २५ रोजी दोन आणि २६ जून रोजी तीन पथनाट्ये करावीत असे आम्ही ठरवले होते त्या नुसार दि . २५ जून रोजी … त्रंबकेश्वर यथे सायंकाळी पाच वाजता …. कुशावर्त चौक येथे आम्ही पहिले पथनाट्य सदर केले … मुक्तांगण मध्ये उपचार घेवून चांगल्या राहणाऱ्या काही मुलांच्या पालकांनी आम्हाला त्यासाठी मदत केली … पथनाट्या सुरु असताना नेमका पाउस आला … रिमझिम असा पाउस सुरु असताना … आम्ही भिजत नेटाने पथनाट्य करत होतो …त्यामुळे जमलेले लोक देखील पावसात भिजतच पथनाट्य पाहत होते … ते संपल्यावर लगेच पुन्हा सगळे बसने नाशिकला आलो …. भद्रकाली मध्ये दुसरे पथनाट्य होते … भद्रकाली मध्ये जुन्या थांब्याच्या समोरच्या मोकळ्या जागेत आम्ही हे पथनाट्य सदर केले होते…. दारू … मटका … व इतर सगळे कुप्रकार सर्रास चालतात अश्या भागात आमचे पथनाट्य असल्याने … पाटील साहेबांनी आमच्या सोबत दोन पोलिस दिले होते … खूप गर्दी जमली होती भोवताली … सगळ्या लोकांना गोलाकार उभे करण्यासाठी लोकशाही मित्रचे कार्यकर्ते आणि पोलिसांची चांगली मदत झाली … आमच्या सोबतचा एक कार्यकर्ता ढोलकी चांगली वाजवत असे ।त्यने आध ढोलकी वाजवून लोकांना आकर्षित करायचे… आम्ही व्यसनमुक्तीपार घोषणा देवून पथनाट्य सदर करीत असू …. घोषणा … सुरवातीचे निवेदन … शेवटी समारोपचे बोलण्याची जवाबदारी मी घेतली होती …. गर्दीत वाहनांचा आवाज बघ्यांचा गलबला …. या सर्वांच्या वरताण करणारा आवाज पाहिजे म्हणून मी मोठ्याने बोलत होतो … भद्रकालीचा प्रयोग फारच सुंदर झाला … नंतर आम्ही सर्व कलाकार व कार्यकर्ते … भद्रकाली पोलिस स्टेशनला पाटील साहेबाना भेटण्यास गेलो … त्यांना त्यांच्या माणसांकडून प्रयोग सुंदर झाल्याची माहिती आधीच मिळालेली दिसली …. सर्व कलाकारांचे अभिनंदन करून त्यांनी आमच्यासाठी चहा मागवला …. चहा घेत असतानाच … एक उघडी पोलिस जीप तेथे आली … सगळे पोलिस पटापट सलाम मारू लागले …. एक तरुण गोरेपान … साधारण सहा फुटांच्या वर उंची असलेले एक रुबाबदार पोलिस जीपमध्ये बसलेले होते …. पटकन तडफदार पणे उडी मारून ते जीपच्या बाहेर पडून सरळ पाटील साहेबांच्या केबिन मध्ये शिरले … पाटील साहेबानीही उठून साल्युट केला … ते खुर्चीवर बसल्यावर पाटील साहेबांनी त्यांच्याशी माझी ओळख करून दिली … ते नव्याने बदलून आलेले सहायक पोलिस आयुक्त श्री . मकरंद रानडे साहेब होते …. वय साधारण तिशीचे … अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व …. पाटील साहेबांनी माझी ओळख करून देताना मी पूर्वीचा ब्राउन शुगरचा व्यसनी असून आता मुक्तांगण तर्फे येथे व्यसनमुक्तीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो असे सांगितल्यावर त्यांना जर आश्चर्य वाटले … आमच्या कामाला त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या… मला एकदा निवांत भेटू असे सांगितले !

२ ६ जून ला सकाळपासूनच माझी धावपळ सुरु होती …आम्ही सकाळी दहा वाजता नाशिकरोड च्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन शोभायात्रेची सुरवात करणार होतो …. सुमारे पंचवीस जणांचा आमच्या समूह हातात कापडी फलक घेवून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून …. मादक पदार्थविरोधी घोषणा देत …सिन्नर फाटा येथे पोचला … माझे बालपण …. व्यसनाधीनतेचा बराच काळ सिन्नरफाटा येथे गेल्याने …. तेथील माझे बरेच व्यसनी मित्र जमले होते …सर्वाना मला व्यसनमुक्त पाहून नवल वाटत होते … तेथील प्रयोग देखील छान झाला … मग परत आम्ही बसने मेरी ला आलो …तेथे बसथांब्यावर पथनाट्य केले … सर्व स्थानिक कलाकार पथनाट्यात होते त्यामुळे त्यांचे नातलग मित्र अशी बरीच गर्दी होती …सायंकाळी देखील एक शोभायात्रा पंचवटी कारंजा ते शालीमारचौक अशी काढणार होतो … पाटील साहेबांनी सायंकाळच्या शोभायात्रेसाठी आमच्या सोबत बंदोबस्त म्हणून पोलिसांची मोठी निळी गाडी दिली होती …. आम्ही पुढे आणि गाडी मागे असा सर्व लवाजमा घोषणा देत मेनरोड वरून शालीमारला पोचला … तेथे शेवटचे पथनाट्य होते … शालीमार चौक नेहमी गर्दीने फुललेला असतो … हा प्रयोग देखील छान झाला . विशेष म्हणजे मेरी तील एका व्ही डी ओ शुटींग करणाऱ्या मित्राने आमच्या शालीमार चौकातील प्रयोगाची मोफत व्हि.डी .ओ शुटींग करून दिली . एकंदरीत सर्व कार्यक्रम निर्विघ्न पार पडला . या कार्यक्रमानंतर अनेक व्यसनी लोक व्यसनमुक्ती सल्ला केंद्रावर बुधवारी आणि शनिवारी चौकशीसाठी जमू लागले …

( बाकी पुढील भागात )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें