मंगलवार, 7 मई 2013

व्यसनमुक्ती कार्यकर्ता

माझा वाढदिवस !  ( पर्व दुसरे ..भाग पहिला )


' प्रिय तुषार , हार्दिक अभिनंदन ...पाहता पाहता तुझे व्यसनमुक्तीचे १ वर्ष पूर्ण होतेय .. कळविण्यास खूप आनंद होतोय की येत्या २६ जानेवारी रोजी ..नेहमी प्रमाणे ..मुक्तांगण मध्ये उपचार घेवून जीवनाची नव्याने सुरवात करणाऱ्या सर्व मित्रांचा ' भेटी गाठी ' हा कार्यक्रम सकाळी ९ वाजता ..मुक्तांगण येथे आयोजित केला आहे ..त्याच प्रमाणे व्यसनमुक्तीच्या वाढदिवसाचा देखील समारंभ होणार आहे ...तू व्यसनमुक्तीच्या मार्गावर यशस्वी पणे वाटचाल करीत आहेस .. यात ..तुझ्या कुटुंबियांचा देखील मोठा वाटा आहे .. तेव्हा या प्रसंगी तू आपल्या कुटुंबियांसमवेत मुक्तांगणला यावे ..हे आग्रहाचे निमंत्रण आहे ! ' ..पत्राच्या खाली डॉ . अनिता अवचट अशी मँडमची सही ... वाचून क्षणभर माझा स्वतच्या डोळ्यावर विश्वास बसेना ...चक्क मी व्यसनमुक्तीचा ..पुनर्जन्माचा वाढदिवस साजरा करणार होतो .. मुक्तांगण मधून परत आल्यावर .. मी निर्धाराने व्यसनमुक्त राहण्यास सुरवात केली होती .... अकोल्याहून परत आल्यावर मी ' क्राँम्पटन ग्रीव्हज ' या कंपनीत तात्पुरती ठेकेदारीवर नोकरी स्वीकारली होती .. ५० रुपये रोज असा पगार होता माझा ..अकुशल कामगार म्हणून माझी नेमणूक झाली होती .. जरी अकुशल कामगार म्हणून नेमणूक असली तरी ..आठवडाभरातच मी तेथे वरिष्ठांची मने जिंकून घेतली होती ..त्यामुळे मला मग स्टोअर किपरचा सहायक म्हणून काम दिले गेले ...५ ऑक्टो.१९९१ ला मी ' न्यूआँन ' घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला..त्याला तीन महिने उलटून गेले होते ..जुन्या मित्रांना अजिबात भेटत नव्हतो ..पहाटे ४.३० ला उठून तयार होऊन ...बसने पंचवटी पर्यंत आणि मग तेथून बसने सातपूरला कंपनीत नोकरीवर ..दुपारी तेथून २ ला सुटी झाली की चार वाजेपर्यंत घरी .. सायंकाळी ' मेरी ' च्या वाचनालयात एक चक्कर .. मग जरावेळ तेथीलच एक कटिंग सलून मध्ये नवीन मित्रांबरोबर टाईम पास ..रात्री ९ च्या आत घरी ..असे माझे रुटीन सुरु झाले होते . घरात देखील आता छान वातावरण झाले होते .. माझे सुरळीत सुरु असलेले पाहून सर्वांनाच आनंद झाला होता ..पुण्याला जायला अजून ४ दिवस बाकी होते ..आई देखील माझ्या वाढदिवस समारंभाला येणार होती ...मात्र ती एक दिवस आधीच पुण्याला एका नातलगांच्या कडे जाणार होती ..!


मुक्तांगणचा योगा हॉल छान फुलांनी सजविलेला होता .. भिंतीवर ' भेटी गाठी ' असे झेंडूच्या फुलांनी लिहिले होते ..फळ्यावर हार्दिक अभिनंदन म्हणून व्यसनमुक्तीचा वाढदिवस साजरा करणाऱ्यांची नावे लिहिली होती ..त्यात असलेले माझे नाव मी पुन्हा पुन्हा वाचत होतो ...छान वाटत होते .. त्या दिवशी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पूर्वी ठाणे मेंटल हॉस्पिटलचे अधीक्षक असलेले डॉ . पा. ठ. लव्हात्रे यांना बोलाविले होते .. लव्हात्रे साहेब आता पुण्याला अधीक्षक म्हणून बदलून आलेले होते ..माझ्या व्यसनमुक्तीच्या वाढदिवसाला त्यांचे उपस्थित असणे आणि त्याच्या हातून मी व्यसनमुक्तीचे मेडल स्वीकारणे हा सुंदर योग होता ..कारण पूर्वी मी ठाण्याला असताना त्यांनी मला खूप मदत केली होती .. मी व्यसनमुक्त व्हावे यासाठी मनापासून प्रयत्न केले होते ..मात्र मीच पुन्हा पुन्हा चुका केल्या होत्या . ..नेहमी प्रमाणे कार्यक्रम सुरु झाल्यावर ' हर नया दिन ' हे व्यसनमुक्ती गीत झाले ..नंतर बाबांनी सर्वाना प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली .. वाढदिवसाच्या समारंभाचे महत्व सांगितले .. मग व्यसनमुक्तीचा वाढदिवस साजरा करण्याऱ्या २० जणांची नावे वाचून दाखविली गेली .. सर्वानी टाळ्या वाजविल्या ..आई देखील मागे खुर्ची वर इतर नातलगांबरोबर बसली होती .. मँडम देखील उपस्थित होत्या ..आता त्यांची तब्येत चांगली दिसत होती ..त्या नियमित मुक्तांगण मध्ये येत होत्या ... एकेकाला बोलावून आपले मनोगत व्यक्त करण्यास सांगितले गेले ..माझे मनोगत व्यक्त करताना आधी मला काही सुचतच नव्हते .. नुसतेच सर्वांचे आभार मानले .. डोळे भरून आले होते माझे ... नंतर जेव्हा मँडम कडे पहिले तेव्हा त्यांनी इशाऱ्याने अजून बोल असे सुचविल्यावर घडाघडा बोलू लागलो .. थोडक्यात माझी व्यसनाची पार्श्वभूमी ..झालेले नुकसान ..व्यसनमुक्तीसाठी केलेले प्रयत्न .. मला केली गेलेली मदत वगैरे बोललो ..शेवटी बाबांनी मला प्रश्न विचारला ' तुषार ..तुझ्या या व्यसनमुक्तीच्या वाढदिवसाचे श्रेय तू कोणाला देणार ? ' मी जरा गांगरलो ... व्यसनाधीनता हा एक मनो -शारीरिक आजार आहे हे मला मुक्तांगणमध्ये आल्यावरच समजले होते ..तसेच व्यसनमुक्तीचे शास्त्रीय उपचार देखील येथेच मिळाले होते ..परंतु त्या आधी अनेकांनी मला त्यांच्या परीने मदत करण्याचा प्रयत्न केला होता .. त्या सर्वांचे योगदान देखील महत्वाचे होते .. मी सांगितले की ..माझे नातलग ..माझे हितचिंतक ..मेंटल हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ . लव्हात्रे साहेब ..तेथील कर्मचारी वर्ग .. मुक्तांगण मधील सारे समुपदेशक .. माझे निवासी कर्मचारी मित्र ..या सगळ्यांचा सहभाग आहे माझ्या व्यसनमुक्तीत .. माझे हे उत्तर सर्वाना खूप आवडले ..लव्हात्रे साहेबांनी माझी पाठ थोपटली ..


कार्यक्रम संपल्यावर सर्वांची जेवणे झाली ..त्या दिवशी आलेल्या पाहुण्यांसाठी आणि उपचार घेणाऱ्या मित्रांसाठी खास जेवण असते .. जेवण झाल्यावर आई पुण्यातच असणाऱ्या माझ्या चुलत बहिणीकडे गेली ..मी अजून दोन दिवस मुक्तांगणमध्येच थांबणार होतो ..कारण मी माहेरी आलो होतो .. दुसऱ्या दिवशी सकाळी मँडम आल्यावर त्यांनी मला भेटायला बोलाविले .. माझे अभिनंदन करून मग म्हणाल्या ..तू छान व्यसनमुक्त राहतो आहेस .. त्यावरून आता आम्हाला असे वाटते आहे की तू या व्यसनमुक्तीच्या कार्याला देखील थोडा हातभार लावला पाहिजे ..जेणेकरून तुझी व्यसनमुक्ती अजून बळकट होईल .. आणि इतरांनाही मदत होईल .. पूर्वी नाशिकमधून आपल्याकडे उपचार घेऊन परत घरी गेलेल्या मित्रांचा पाठपुरावा करण्याचे काम करायला तुला आवडेल का ? ..मी आनंदाने हिकार दिला .. मग त्या म्हणाल्या ..नाशिक मध्ये भद्रकाली भागाचे पोलीस निरीक्षक श्री . सुरेंद्र पाटील हे बाबांचे चांगले मित्र आहेत ..ते देखील या कार्यात मदत करतात .. तू परत गेल्यावर त्यांची भेट घे .. मी त्यांना सांगते तुझ्या बद्दल फोन करून .. तू रोज सुरेंद्र पाटील साहेबाना भेटायचे आणि दिवसभर केलेल्या कामाचा थोडक्यात अहवाल द्यायचा त्यांना .. तसेच महिन्यातून एकदा महिन्याभराचा अहवाल लिहून मुक्तांगणला पाठवायचा .. या कामाचे मानधन म्हणून तुला महिना तीनशे रुपये मिळतील ..मात्र ही रक्कम तुला एकदम हातात मिळणार नाही ..तर रोज सकाळी सुरेंद्र पाटील साहेब तुला १० रुपये देतील तसेच पाठपुरावा करायला तुला फिरावे लागेल त्यासाठी एक सायकल देखील ते तुला उपलब्ध करून देतील .. . तू हे काम सांभाळून एखादी नोकरी देखील करू शकतोस म्हणजे आर्थिक दृष्ट्या अधिक स्वावलंबी होशील ..म्हणजे आता मी मुक्तांगणचा अधिकृत कार्यकर्ता होणार होतो तर .. मला हा प्रस्ताव खूप आवडला .. फक्त ते पोलीस निरीक्षक सुरेंद्र पाटील यांना रोज भेटण्याचे काही पटले नाही .. पण त्यामागे मँडमचा हेतू असा होता ..की मी सतत त्यांना भेटलो की माझी व्यसनमुक्ती बळकट राहण्यास मदत झाली असती मला .. मी गुपचूप जरी पुन्हा व्यसन सुरु केले असते तर पोलीस निरीक्षक असल्याने त्यांना ते आधी समजले असते .. या कामाच्या निमित्ताने माझा व्यसनी व्यक्तींसोबत वारंवार संपर्क होणार होता .. त्यातून मला काही धोका होऊ नये ..माझी स्लीप होऊ नये म्हणून सुरेंद्र पाटील यांना मध्ये घातले होते त्यांनी .
======================================================

सामाजिक कार्यकर्ता ! ( पर्व दुसरे ..भाग दुसरा )



मुक्तांगण मध्ये रहात असतानाच खरे तर मला तेथेच कार्यकर्ता म्हणून राहायचे होते ..परंतु त्यावेळी मँडम ने माझ्या पुनर्वसनाची वेगळी योजना बनविली होती ..मी खरे तर त्यांच्याकडे माझ्या मनातील इच्छा बोलून दाखवायला हवी होती ..परंतु कदाचित आपल्याला नकार दिला जाईल अशी भीती मनात होती .. ऐरवी एक व्यसनी खूप बोलका असू शकतो ..मात्र योग्य वेळी ..योग्य व्यक्तीजवळ तो मनातले व्यक्त करू शकत नाही हा देखील त्याचा कमकुवतपणा असतो ..समोरची व्यक्ती काय म्हणेल हे तो स्वतच गृहीत धरतो व बोलणे टाळतो .. आता मुक्तांगणचा कार्यकर्ता म्हणून नाशिक मध्ये पाठपुरावा करण्याचे काम मला दिले गेल्यावर मला खूप आनंद झाला होता .. माझ्या मनासारखे घडले होते ..मँडम म्हणाल्या .. ' इतके दिवस फक्त स्वतः व्यसनमुक्त राहण्याची जवाबदारी होती तुझी ..आता त्या सोबतच इतरांना व्यसनमुक्तीसाठी मदत करण्याची देखील जवाबदारी आहे तुझ्यावर त्यामुळे तू तुझ्या वागण्यात ..बोलण्यात ..आकलन शक्तीत बदल करणे गरजेचे आहे ..अनेक प्रकारची पथ्ये पाळावी लागतील तुला .. सामाजिक कार्यकर्ता म्हंटले की समाज त्याच्याकडे एका वेगळ्या आदर्शवादी दृष्टीकोनातून पाहतो ..आपण लोकांचा भ्रमनिरास करता काम नये .. आता तू मुक्तांगणचे प्रतिनिधित्व करणार आहेस... तुझ्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत .. अशा सूचना देत मँडमनी मला ... नाशिकहून मुक्तांगण मध्ये गेल्या ५ वर्षात दाखल होऊन उपचार घेवून आपल्या घरी परत गेलेल्या सुमारे ३०० लोकांची नावे आणि पत्ते असलेली छापील यादी दाखवली ... 


आता नाशिकला गेल्याबरोबर या यादीतील रोज किमान ५ लोकांच्या घरी तू जावून आता ते कसे आहेत ? पुन्हा व्यसन तर करत नाहीत ? याबाबतची माहिती घेवून त्याचा अहवाल बनवायचा आहे ..महिनाभरात तू अशा प्रकारे सुमारे १०० ते दीडशे लोकांना भेटशील .. दर महिन्याला हा अहवाल आम्हाला पाठवायचा आहे तसेच ..दोन महिन्यातून किमान एकदा तरी प्रत्यक्ष मुक्तांगणला भेट द्यायची आहे .. तुझे जाण्यायेण्याच्या भाड्याचे पैसे पाटील साहेब तुला देतील ..हे अगदी सोपे काम होते माझ्या दृष्टीने ..पुढे मँडमनी एक अतिशय सावधगिरीची सूचना दिली ..ती अशी की ..तू ज्या व्यसनी व्यक्तीच्या घरी त्याला भेटायला जाशील तेथे तो व्यसनी व्यक्ती घरी नसेल तर जास्त वेळ थांबायचे नाही अजिबात ..मला हे जरा विचित्र वाटले .. असे का ? म्हणून विचारले तर म्हणाल्या ...व्यसनी व्यक्तीचे पालक त्याच्या व्यसनाला इतके कंटाळलेले असतात की आपल्या माणसाला कोणी व्यसनमुक्तीसाठी मदत करू इच्छितो आहे असे म्हंटल्यावर ते अशा माणसाला खूप मान देतात ..आपली दुखः मनमोकळे पणे त्या मदत करणाऱ्या माणसाजवळ सांगतात ..त्याच्यावर प्रचंड विश्वास ठेवतात ..या बाबतीत घरातील स्त्रिया अधिक हळव्या असतात .. तू तरुण आहेस .. शिवाय स्वतच्या भावनांवर तुझे पूर्ण नियंत्रण नाहीय .. भावनेच्या भरात तुझ्याकडून कोणतीही चूक होऊ नये म्हणून ही काळजी घ्यायची ..समजले ना ? असे मनात मँडमनी माझ्याकडे रोखून पहिले ..त्यांचा मुद्दा थोडाफार लक्षात आला होता ....पुढे त्या म्हणाल्या दुसरे असे की व्यसनी व्यक्ती हा त्याच्या मनावर झालेल्या व्यसनांचा दुष्परिणाम म्हणून संशयी स्वभावाचा होतो ..त्याच्या अनुपस्थितीत असा कोणी दुसरा माणूस घरी येवून गेला तर ..घरातील लोकांनी त्याला आपल्या चुगल्या सांगितल्या असतील .. त्यानेच घरच्या लोकांना फितवले असेल माझ्याविरुद्ध ....वगैरे प्रकारचे संशय त्याला येवू शकतात व त्यामुळे तो तुला चांगले सहकार्य करणार नाही . तुला आता जे काम सोपवतो आहोत ते काम पूर्वी नाशिक मध्ये संजय नावाचा कार्यकर्ता करत असे ..त्याची देखील तुला मदत घेता येईल ...मँडमनी अजून एक काम सांगितले ते असे की दर महिन्याला नाशिकमधील उपचार घेवून ..पुन्हा व्यसन सुरु झालेल्या किमान पाच लोकांचा एक वेगळा अहवाल मला दाखवायचा ..या अहवालात ..ती व्यक्ती पुन्हा व्यसन सुरु करण्याची तुला वाटणारी कारणे .. त्याच्या कुटुंबियांची ..पालकांची तुला जाणवलेली मानसिकता .. आणि त्याला व्यसनमुक्त ठेवण्यासाठी नेमकी कोणती मदत करता येईल याबद्दलचे तुझे मत ..हे असेल . आणि सर्वात महत्वाचे हे की हे काम करून तू कुणावर उपकार करत नाहीस हे सतत लक्षात ठेव .. सर्व करत असताना तू तुझ्या घरातील जवाबदा-या देखील योग्य रीतीने पार पडल्या पाहिजेत .. तुझ्या सुरक्षित भविष्यासाठी चांगली नोकरी शोधणे .. बँकेत पैसा साठविणे ... घरच्या लोकांना तू दिलेला त्रास भरून काढण्यासाठी त्यांना आवश्यक वेळ देणे ....वगैरे सांगून मँडमनी ..तीनशे लोकांचे नाव पत्ते असलेली यादी माझ्याकडे देवून मला निरोप दिला .


नाशिकला गेल्यावर मी ही बातमी आईला आणि भावाला सांगितली तेव्हा त्यांना प्रथम ही भीती वाटली की म्हणजे हा पुन्हा त्या व्यसनी व्यक्तींना भेटणार ..कदाचित याचे व्यसन परत सुरु झाले तर ? पुढे पोलीस निरीक्षक सुरेंद्र पाटील यांना रोज भेटावे लागणार हे ऐकून त्यांना जरा धीर आला .. सुरेंद्र पाटील यांना भेटायला जाताना मी जरा मनात घाबरलोच होतो .. भद्रकाली परिसर म्हणजे जेथे सर्व वाईट धंदे चालतात असा परिसर होता ..हिंदू -मुस्लीम अशी मिश्र वस्ती ..अतिशय संवेदनशील असा हा परिसर ..या ठिकाणी पोलीस निरीक्षक असणारी व्यक्ती नक्कीच कडक असणार अशी माझी खात्री होती .. मी सकाळी ११ वाजता सुरेंद्र पाटील यांना भेटायला पोचलो .. त्यांच्या प्रशस्त केबिन मध्ये ते दोनचार लोकांसोबत बोलत होते .. मी बाहेरच्या शिपायाला तसा निरोप दिला .. त्याने आत माझा निरोप दिल्या बरोबर लगेच ..साहेबांनी मला आत बोलाविले ..मी बिचकत आत गेलो ..प्रसन्न हसून त्यांनी मला बसायला सांगितले . त्यांच्या टेबलसमोर ..आठ दहा खुर्च्या ठेवलेल्या होत्या ..मागे एका खुर्चीवर बसलो .. त्यांच्या समोर चार पाच माणसे बसलेली होती ..त्याच्या सोबत साहेबांची चर्चा सुरु होती ..ते लोक कसल्यातरी मिरवणुकीची परवानगी मागायला आलेले होते .. मी बसल्या बसल्या पाटील साहेबांचे आणि केबिनचे निरीक्षण करत होतो .. एका भिंतीवर गुन्हे आलेख असा तक्ता होता ... तसेच नेहरू ..गांधी ..शिवाजीमहाराज .. डॉ .बाबासाहेब आंबेडकर ..लोकमान्य टिळक वगैरे थोर व्यक्तींचे फोटो टांगलेले होते ..प्रत्येक फोटोवर तो फोटो पोलीस स्टेशनला भेट देणाऱ्या मंडळाचे किंवा व्यक्तीचे नाव आवर्जून लिहिले होते ...पाटील साहेबांचा रंग सावळा ..मध्यम बांधा .. सधारण पन्नाशीचे ... बाहेर न सुटलेले पोट म्हणजे त्यांच्या शरीर स्वास्थ्याची ग्वाही होती .. सगळ्यात प्रभावी गोष्ट म्हणजे त्यांच्या मोठ्या झुबकेदार मिशा ..आणि भेदक डोळे ..त्या माणसांना निरोप दिल्यावर ..पाटील साहेब माझ्याशी बोलू लागले .. मँडनी मला फोन करून सांगितले आहे तुझ्या बद्दल .. तू संध्याकाळी परत ये तेव्हा मी तुला सायकल देतो एक .. मग त्यांनी एका शिपायाला बोलाविले व त्याला माझ्याकडे बोट करून सांगितले की हे तुषार नातू ..मुक्तांगण चे कार्यकर्ते आहेत .. त्या शिपायाने मला अदबीने नमस्कार केला .. पुढे त्याला सांगितले की याच्या नावाची एक डायरी बनवायला सांगा ठाणे अंमलदार यांना ..त्या डायरीत रोजची तारीख टाकून यांना आपण दहा रुपये द्यायचे आहेत ..पैसे दिले की घेतल्याची यांची सही घ्या .. मी नसलो तरी यांचे काम अडता कामा नये .. ! शिपाई साहेबाना कडक सँल्यूट मारून निघून गेला ..असे जाता येत कडक सँल्यूट मारण्याची गम्मत वाटली मला ...मग साहेबांनी माझी व्यक्तिगत चौकशी केली..आणि मला शुभेच्छा देवून ..संध्याकाळी सायकल घ्यायला बोलाविले .

( बाकी पुढील भागात )

========================================================================




पहिला पाठपुरावा ! (  पर्व दुसरे -भाग तिसरा )




संध्याकाळी पाच वाजता मी जेव्हा भद्रकाली पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा तेथे बाहेर पटांगणात पोलीस व्हॉलीबॉल खेळत होते ... सुरेंद्र पाटील साहेब देखील त्यांच्यात होते ..मला वयाच्या पन्नाशीत देखील असे चपळपणे व्हॉलीबॉल खेळणारे पाटील साहेब पाहून नवल वाटले ...जरावेळ तिथेच उभा राहिलो ..त्यांचा खेळ थांबल्यावर ..साहेबांनी मला जवळ बोलाविले ..म्हणाले ..तू पण हवे तर उद्यापासून येत जा खेळायला ..मग त्यांनी पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस नेले तेथे खूप जुन्या सायकली ..मोटारसायकली ..लुना ..स्कुटर वगैरे ठेवलेल्या होत्या .. सुमारे २०० तरी वाहने असावीत ..तुला यातील हवी ती सायकल निवड असे पाटील साहेब म्हणाले .. मी जरा गोंधळलो ..कारण तेथे ठेवलेली वाहने अनेक दिवस एकाच जागी पडून राहिल्याने जुनाट दिसत होती ...काही तर गंजलेल्या अवस्थेत ...माझी मनस्थिती पाटील साहेबांनी ओळखली असावी ...ते म्हणाले ' या पैकी काही वाहने चोराकडून जप्त केलेली आहेत ..काही बेवारशी सापडलेली ..तर काही गुन्हा करण्यासाठी वापरलेली आहेत .. केसचा निकाल लागेपर्यंत ती अशी ताब्यात ठेवावी लागतात .. तर काही वेळा केसचा निकाल लागला तरी कोणी ताबा घ्यायला न आल्याने ... अनेक दिवस वापर नसल्याने ती जुनी होतात ... खराब होतात ..पण त्याला आमचा नाईलाज आहे ..कधी कधी तर यातील काही वाहने आम्हाला ठेवायला जागा नाही म्हणून भंगार मध्ये काढावी लागतात ' ...त्यांचे म्हणणे ऐकून मनात विचार आला...देशात न्याय जर पटकन मिळाला तर किती बरे होईल ?..वर्षानुवर्षे केस कोर्टात रखडते..कधी कधी रखडवली जाते ..वेळेचा अपव्यय ..पैशांचा अपव्यय ..सरकारी यंत्रणा वेठीला धरली जाते ..प्रचंड लोकसंख्या हीच मोठी समस्या ..इतक्या मोठ्या लोकसंख्येस पुरेसे पोलीस बळ ..न्यायालये ..तपास यंत्रणा कशी पुरणार ? म्हणूनच कदाचित बहुधा पोलीस स्टेशनला .पोलीस एफ .आय ..आर ..नोंदविण्यास टाळाटाळ करत असावेत ...शिवाय अजून एक गोष्ट जाणवली ती अशी की .. चोरी झालेल्या केस मध्ये जर मुद्देमाल सापडला नाही तर ...चोराला शिक्षा होऊन देखील शेवटी ज्याची चोरी झाली त्याला त्याचा मुद्देमाल ..पैसे अथवा इतर चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळवून देण्याची काहीच निश्चित यंत्रणा नाहीय ..हमी नाहीय ,..त्याने फक्त चोर पकडला गेला याच समाधानात राहायचे ....कदाचित म्हणूनच गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढत असावे .


एक रेसर वाटणारी छोटी सायकल माझ्या मनात भरली ..मात्र तिची दोन्ही चाके बसली होती ..म्हणजे अनेक दिवस पडून राहिल्याने टायर ..ट्यूब . वगैरे खराब झाली असणार ..मी त्या सायकल कडे बोट दाखवताच ..पाटील साहेबांनी एका शिपायाला ती सायकल बाहेर काढून ..दुरुस्त करून घ्यायला सांगितले .. ' साहेब ..पण जर मला रस्त्यात कोणी अडवून ..ही सायकल माझी आहे असे म्हणाले तर ....? ' मी शंका काढली ..त्यावर पाटील साहेब मिशीत हसले ..' त्याला घेवून ये माझ्याकडे तू ..आपण पाहू काय करायचे ते ... तू अजिबात काळजी करू नकोस त्याची ' असे आश्वासन मिळाल्यावर मी निश्चिंत झालो ...मग त्यांनी मला अंमलदाराकडे जावून दहा रुपये घेण्यास सांगितले ... उद्यापासून काम सुरु कर .. काही अडचण आली तर ..निसंकोच पणे सांग असा धीर देखील दिला ... भरघोस मिश्यांमुळे काहीसे उग्र ..कडक वाटणारे पाटील साहेब मनाने अतिशय प्रेमळ आहेत हे जाणवले ..दुसऱ्या दिवशी मी जेव्हा पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा माझी सायकल मस्त घासूनपुसून चकचकीत झालेली होती ...नवीन टायर .. ट्यूब लावलेली होती ..तसेच सायकलला नवीन कुलूप देखील लावलेले होते ...मग जेव्हा दहा रुपये घ्यायला अंमलदाराकडे गेलो ...त्याने माझ्या नावाने बनविलेल्या एका छोट्या डायरीत ..नोंद करून मला दहा रुपये दिले ..देताना गमतीने म्हणाला ..पोलिसांकडूनच तुला हप्ता चालू झालाय....भाग्यवान आहेस .


माझ्या जवळ मँडमने जी नाशिक मधून मुक्तांगणला दाखल होऊन गेलेल्या लोकांच्या नाव पत्त्यांची यादी दिली होती त्यात जवळ राहणारा म्हणून पंचवटीत एका ठिकाणी जायचे ठरवले ..त्याचे नाव गंगाराम होते ... दारूचे व्यसन होते त्याला ..मी पत्ता शोधात जेव्हा घरी पोचलो तेव्हा ..घराचे दार उघडेच होते ..अर्धवट लोटलेले ..मी आवाज दिला तर आतून ' कोण आहे ' असा करडा आवाज आला ..मी दार लोटून आत गेलो ..काहीसा अंधार वाटत होता घरात ..कारण त्या खोलीला खिडकी नव्हती ..पलंगावर एक व्यक्ती झोपलेली होती ..मी गंगाराम कोण असे विचारताच ती व्यक्ती उठून बसली ..अर्धवट वाढलेली दाढी .. पायजमा.. शर्ट..कृश देहयष्टी ..त्याने बाजूला असलेल्या मळकट खुर्चीवर बसायला सांगितले मला .. त्याने तोंड उघडताच दारूचा भपकारा आला .म्हणजे स्वारी सकाळी सकाळी लावून होती तर ..दारिद्र्य लपत नव्हते घराचे .. मी माझी ओळख करून दिली ..मुक्तांगण मधून आलोय हे ऐकून त्याचे डोळे चमकले ..अदबीने त्याने हात जोडून अभिवादन केले .. ' दारू परत सुरु झाली की काय ? असे विचारताच म्हणाला ' काय सांगणार राव ...टेन्शनच इतके आहे मला ...दोन पोरींचे शिक्षण ..लग्न ..करायचे आहे .. मला काही कामधंदा मिळत नाही ...ख-याची दुनिया राहिली नाही ..वगैरे रामायण सांगू लागला ..' ..' अहो पण ..दारुने तुमचे प्रश्न सुटतात का ? असे विचारल्यावर जरा खजील झाला ..मग त्याने घरातील लोकांच्या तक्रारी करणे सुरु केले ..बायको बेताल वागते ..पोरी माझे ऐकत नाहीत ... मला त्याची दया देखील येत होती आणि त्याच्या गेलेल्या आत्मविश्वासा बद्दल वाईट देखील वाटत होते .. घरात त्यावेळी कोणीच नव्हते .. आमचे बोलणे सुरु असतानाच ..एक मध्यम वयीन बाई घरात आली .. मला पाहून जरा थबकली ..मी तिला माझी ओळख करून दिली ..तेव्हा क्षीण हसली ..म्हणाली '' अहो काही फायदा झाला नाही यांना मुक्तांगण मध्ये ठेवून .. यांचे पिणे परत सुरु झालेय ..आणि त्रास देणे देखील सुरूच आहे ..बोलता बोलता तिने भिंतीवरच्या फळी वरून एक छोटा स्टीलच डबा काढला आणि त्यात हात घातल्यावर एकदम धक्का बसल्यासारखा चेहरा करून ती गंगाराम वर ओरडली ' यातले पैसे कुठे गेले ? ..पोरीला पुस्तके आणायची म्हणून ठेवले होते पन्नास रुपये .. ' गंगाराम तोऱ्यात म्हणाला मला काय विचारतेस .मी काय चोर आहे ? तिचा पारा चढला आणि ती त्याला रागावू लागली ... तुम्हाला पोरीच्या शिक्षणाची देखील काळजी नाही ..एक पैसा कमवत नाही ..मात्र राजासारखा रुबाब दाखवता आम्हाला वगैरे बडबडू लागली ..यार गंगाराम देखील चिडला आणि त्याने सरळ सरळ तला शिव्या देण्यास सुरवात केली ... तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू लागला .. त्याने तिला उंडगी ..चवचाल .. वगैरे म्हणताच ती हबकली ..परक्या व्यक्ती समोर नवऱ्याने असा अपमान केलेला तिला सहन झाले नाही ..ती रडू लागली ..मी खूप संकोचलो होतो ..काय करावे ते समजेना ...रडता रडता मला सांगू लागली ..हा माणूस एक पैसा कमावत नाही ..घर चालविण्यासाठी मी चार घरी धुणे भांडी करते ..त्यासाठी घराबाहेर जावे लागते तर ..हा माझ्यावर शक् घेतो .. पोरी आहेत म्हणून मी जिवंत आहे ..नाहीतर केव्हाच जीव दिला असता वगैरे .....शेवटी मी उद्या येतो असे सांगून तेथून सटकलो .

( बाकी पुढील भागात )

========================================================================


भीषण वास्तव ! ( पर्व दुसरे - भाग चौथा )



गंगारामच्या घरून बाहेर पडल्यावर ...दुसऱ्या ऐक जवळच्या पत्त्यावर गेलो ..तेथे घरात एक म्हातारी बाई होती ..येथेही दारिद्र्य ठाण मांडून बसलेले ... म्हातारीला बहुतेक कमी दिसत असावे ... घरात कोणी आहे का असे विचारल्यावर ..ती सावकाश डोळ्यासमोर हात धरून बाहेर आली ..मला निरखून पहिले ओळख पटेना तिला ..मी माझी ओळख सांगितल्यावर मला आत बोलाविले ... अरुण घरात आहे का असे विचारल्यावर ...म्हणाली ..आताच बाहेर गेलाय कटकट करून .. आता तो कसा राहतो असे विचारले तसा तिचा बांध फुटला ... मला म्हातारीला मरणही येत नाही ..अशी सुरवात करून तिने सगळी कर्म कथा सांगितली ...उशिरा झालेला ..एकुलता एक मुलगा म्हणून लाडात वाढलेला .. बाप सरकारी नोकरीत ..मात्र बापाला दारूचे व्यसन ... पुढे बाप दारूमुळे लवकर गेला ..तेव्हा त्याच्या जागी आईला नोकरी लागली ..पोराला मोठे केले मात्र बापाचा ठसा त्याच्यावरही होता ..फरक इतकाच की बाप दारू पीत असे ..याने दारूसोबत चरस ..गांजा आणि शेवटी ब्राऊन शुगर देखील जवळ केलेली..दहावीत चार वेळा नापास झाल्यावर शिक्षणाला रामराम केलेला ..म्हातारी सेवानिवृत्त झाली तरी याचे काही कामधंदा करण्याचे चिन्ह नाही ...मग आईच्या पेन्शनच्या पैश्यावर याचे व्यसन सुरूच ..रोजचे किमान १०० रुपये तरी घेणारच भांडून ...आईने कुठून तरी ' मुक्तांगण ' ची माहिती घेवून याला भरती केले ..उपचार घेवून परत आल्यावर जेमतेम एक आठवडा चांगला राहिला आणि पुन्हा हळू हळू पिणे सुरु केले ...म्हातारी कळवळून सारे सांगत होती ...सगळ्या दारूच्या धंदेवाल्यांना ..दारू उत्पादकांना ..दारू विक्रीचे परवाने देवून ... महसूल घेणाऱ्या सरकारला....ब्राऊन शुगर विकणाऱ्यांना शिव्याशाप देणे सुरु होते तिचे ... तळपट होईल मेल्यांचे .. माझे म्हातारीचे शाप भोवतील ..वगैरे ...मी सुन्न होऊन बाहेर पडलो . 


त्या दिवशी एकूण पाच घरी गेलो त्या पैकी चार ठिकाणी पुन्हा व्यसन सुरु झालेय असा निष्कर्ष ...मात्र एका ठिकाणी एकदम आनंदी वातावरण होते ... सुरेशचे व्यसन बंद होते ... तो घरीच भेटला .. सगळे ' मुक्तांगण ' ला दुवा देत होते ...सुरेश पाच महिन्यापासून चांगला राहत होता .. उपचार घेवून आल्या पासून त्याने जुन्या व्यसनी मित्रांना भेटणे बंद केले होते ..एका खाजगी कंपनीत नोकरी मिळाली ..नोकरी आणि घर इतकेच विश्व होते त्याचे .. अगदीच बोअर झालो तर ' काळाराम ' मंदिरात जावून बसतो म्हणाला ... त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता .. त्याच्या व्यसनमुक्त राहण्याचे नेमके कारण म्हणजे त्याने ..जुन्या व्यसनी मित्रांना भेटणे टाळले होते ..तसेच तो मिळाली ती नोकरी आनंदाने करत होता ..फावला वेळ मंदिरात घालवत होता ..ज्या ठिकाणी व्यसन पुन्हा सुरु झाले होते त्यांच्या बाबतीत नेमके उलटे होते ..त्यांनी सर्व जुन्या व्यसनी मित्रांना पुन्हा जवळ केले होते .. मनासारखा कामधंदा मिळत नाही म्हणून रिकामे राहिले .. आणि बोअर झाले ..कंटाळा आला ..टेन्शन आले म्हणून पुन्हा फक्त एकदा ..आजच्या दिवस म्हणत व्यसन सुरु झाले .मला यातून खूप शिकायला मिळाले ... पहिल्या चार घरी भेट दिल्यावर मी थोडा निराश झालो होतो ...पण शेवटच्या घरी असलेला आनंद पाहून माझा उत्साह परत आला होता .मँडम ने दिलेल्या सुचनेप्रमाणे मी अहवाल लिहू लागलो ...म्हातारीच्या इच्छेप्रमाणे जर खरोखरच सर्व दारूची दुकाने ..कारखाने .. मादक द्रव्यांचे अड्डे बंद झाले तर किती छान होईल असे वाटले ..मात्र ते कसे शक्य होईल ? ... दारूविक्रीतून मिळणारा अब्जावधी रुपयांचा महसूल सरकार सोडेल काय ? मादक द्रव्यांच्या व्यापारातून आणि विक्रीतून मिळणारा भरमसाठ नफा सोडून एखादा चांगला प्रामाणिक व्यवसाय ते अड्डेवाले करतील काय ? स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी साधून जर व्यावसायिकांनी एखादा व्यवसाय केला तर ..किती बरे होईल ? मग मला आठवले ..या गोष्टी करणे आपल्या हाती नाही .. त्यावर व्यर्थ विचार करण्यात अर्थ नाही ..मुक्तांगण च्या प्रार्थनेत सांगितले होते ' जे शक्य साध्य आहे ..निर्धार दे कराया...मज काय शक्य आहे आहे अशक्य काय ..माझे मला कळाया ..दे बुद्धी देवराया ..' मी व्यसन करायचे की नाही हे ठरविणे आणि ते पाळणे .. व्यसनांच्या दुष्परिणामांच्या बाबतीत जनजागृती करणे .. स्वतः व्यसनमुक्त राहून इतर व्यसनी लोकांना व्यसनमुक्त राहण्यासाठी वैचारिक मदत करणे .. माझ्या उदाहरणातून ' व्यसनमुक्त होणे शक्य आहे ' असा आत्मविश्वास देणे हे मला शक्य होते... तेच करायचे होते .


दिवसभर फॉलोअप करणे आणि सायंकाळी मेरीच्या लायब्ररीत जावून पुस्तके बदलून आणणे .. तिथेच बाजारात एखाद्या पानटपरीवर सिगरेट ओढून थोडा वेळ मेरीतील तरुणांशी गप्पा मारणे .. रात्री नऊ च्या सुमारास घरी येवून जेवण करून जरा वेळ टी. व्ही. आणि मग झोप अशी माझी दिनचर्या सुरु झाली ..त्याच काळात ..मेरीतील तरुणांशी माझी चांगली मैत्री जमली होती .. तेथे मी व्यसनमुक्ती ..माझे अनुभव ... देशातील अराजक .. वेगवेगळ्या सामाजिक समस्या ..अंधश्रद्धा .. लबाड राजकारणी ...वगैरे विषयांवर गप्पा मारत होतो ..मेरी मध्ये साधारण २ वर्षापुर्वी एक शिवसेनेची शाखा सुरु झाली होती ..त्याचा अध्यक्ष म्हणून एक दिनेश नावाचा तरुण होता .. हा उत्कृष्ट असा मँकेंनिक होता .. दुचाकी वाहने दुरुस्त करण्याचा व्यवसाय ..पुढे दारूच्या आहारी गेला ..कंगाल झाला ...मात्र त्याचा तोरा कायम होता .. तो नेहमी रात्री पिवून आला की मेरीत..पानटपरीवर असलेल्या लोकांना ..बाजारपेठेत आलेल्या लोकांना दमबाजी करत असे .. त्याच्या मागे शिवसेनेचा शिक्का होता म्हणून त्याला घाबरून असत लोक ..मी पूर्वी शिवसेनेच्या सिन्नरफाटा शाखेचा सेक्रेटरी होतोच .. आमची तोंड ओळख झाली होती मेरीतच ... खरे तर मी आणि दिनेश दोघेही शिवसेनेचे नाव घेत असलो तरी ..आम्ही व्यसने करून शिवाजी महाराजांचे नाव बदनामच केले होते .. आता व्यसनमुक्त राहताना मला ते पटले होते ..दिनेशचे व्यसन अजून सुरुच होते ..व्यसनामुळे आलेला बेदरकारपणा .. शिवसेनेचे वलय यांची त्याला खूप गुर्मी असावी असे त्याच्या वागण्या बोलण्यातून जाणवत असे ..एकदा असाच संध्याकाळच्या वेळी मी मेरीतील एका पानटपरीवर उभा असताना ..तिथे दिनेश दारू पिवून आला ..आल्याआल्या त्याने पानटपरीवाल्या कडून एक सिगरेट मागून घेतली फुकट .. नंतर तो उगाचच आसपास च्या लोकांना शिवीगाळ करू लागला .. एक एक करून लोक सटकले तेथून ..मी अश्याना कधीच घाबरत नव्हतो ..तसेच दिनेशशी माझी तोंड ओळख असल्याने .. तेथेच उभा राहिलो ..दिनेशचे माझ्याकडे लक्ष गेले तसे त्याने माझ्याकडे पाहून बडबड सुरु केली ..उगाचच ' आपून यहा कें दादा है .. टांगे तोड दुंगा ..' .वगैरे सुरु होते त्याचे ..मी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होतो ....शेवटी त्याने माझा हात धरून ओढला आणि माझी सटकली .. ' तेरी ....... साले ..... वगैरे शिव्या घालत मी त्याच्यावर तुटून पडलो ...त्याला हे अपेक्षित नव्हतेच ..खूप ठोकला मी त्याला ..आजूबाजूला गर्दी जमली .. दिनेशला असा सव्वाशेर यापूर्वी मिळाला नव्हता ... त्याचे तोंडबिंड फुटले मग उठून ' देख लुंगा तेरेको ..इधर रुक तू ..अभी मै लडके लेकर आता हू ' असा दम देत तो तेथून पळाला ' 

( बाकी पुढील भागात )


===================================================================


लोकशाही मित्र ! ( पर्व दुसरे -भाग पाचवा )


मार खावून ..थांब आता तुला मारायला मुले घेवून येतो असे म्हणून दिनेश जो पळाला तो परत आलाच नाही ... मारामारी पाहायला जमलेल्या गर्दीतील तीनचार तरुण मला म्हणाले ..बरे झाले याला तुम्ही ठोकले ते ..खूप त्रास होता याचा सगळ्या वसाहतीला .. तुम्ही काही घाबरू नका ..आम्ही आहोत तुमच्या सोबत ..खरे तर मी अजिबात घाबरलो नव्हतो ..माला माहित होते दिनेश जरी पूर्वी दादा वगैरे असला तरी आता तो एक दारुड्या होता ..दारुड्या साठी मारामारी करायला कोणीही मुले आली नसती ..आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत दिनेशची वाट पहिली ..तेथेच गप्पा सुरु झाल्या की आपण सर्व तरुणांनी मिळून एखादे चांगले मंडळ किवा संस्था सुरु केली पाहिजे ज्या योगे आपल्याला काही सामाजिक कामे करता येतील ..विचार चांगलाच होता .. मात्र आपली संस्था कोणत्याही राजकीय संघटनेशी निगडीत राहणार नाही अशी माझी पहिली अट होती ..सर्वानी ते मान्य केले ..मग दुसऱ्या दिवशी आपण सर्वात आधी संस्थेचा एक वार्ताफलक बनवून घ्यायचा असे ठरले ..संस्थेचे नाव काय असावे यावर बराच खल झाला ..बहुतेकांना एखादे खतरनाक नाव असावे असे वाटत होते ..म्हणजे ज्यावरून संस्थेचा दबदबा राहील ..छावा ..टायगर ..बेधडक ..वगैरे नावे सुचविली गेली ..मात्र मला असा संघटनेचा दबदबा वगैरे व्हायला नको होता ..त्या ऐवजी लोकांना जवळचे वाटेल ..आपुलकी वाटेल ..विश्वास वाटेल ..असे नाव द्यायला हवे होते . ..घटनेवर आधारित असलेल्या लोकशाही राज्य पद्धतीचा राजकारणी लोकांनी कसा खेळखंडोबा केलाय... लोकांना जाती -धर्माच्या ..भाषा प्रांताच्या नावाखाली कसे विभागले आहे आणि लोकांमध्ये दुही निर्माण करून राजकीय नेते ..गल्लाभरू पुढारी....जनतेला कसे लुटत आहेत ..हे सगळे लोकांच्या ध्यानात आणून देवून ..खरी लोकशाही प्रस्थापित व्हावी ..जनता जागृत व्हावी .. सामाजिक सलोखा कायम राहून ..सर्वानी देशाच्या विकासाचा ...प्रगतीचा .. एकतेचा ..न्यायाचा विचार पुढे न्यायचा आहे ..म्हणून संस्थेचे नाव ' लोकशाही मित्र ' असे ठेवावे असे मी सुचविले ..आणि ते मान्य देखील झाले ..वार्ता फलकासाठी वर्गणी जमविणे उद्यापासून सुरु करू असे ठरवून ती दिनेश ची वाट पाहत चाललेली आमची बैठक संपली .

दुसऱ्या दिवशी मी नंदू नावाच्या मुलाच्या कटिंग सलून मध्ये नेहमी सायंकाळी टाईम पास करत असे त्या ठिकाणी आम्ही एक वर्गणी साठी पेटी बनवून ठेवली ..एका कार्डशीट वर लोकांसाठी एक आवाहन लिहून मी नंदूच्या सलून मध्ये चिकटवले ..ज्यात वर ' आज देशाला अश्या तरुणांची गरज आहे जे भान राखून योजना आखतील आणि बेभान होऊन त्या अमलात आणतील ' हे बाबा आमटे यांचे वाक्य लिहिले ..खाली ' लोकशाही मित्र ' संस्था सुरु करण्याचा मनोदय ... उद्दिष्ट्ये वगैरे थोडक्यात लिहून .. वार्ता फलकासाठी वर्गणी दानपेटीत टाकावी असे आवाहन केले ..खरे तर एकदोघे जण वार्ताफालक आम्ही बनवून देतो म्हणत होते परंतु यात जास्तीत जास्त लोकांचा सहभाग हवा म्हणून मी ते नाकारून वर्गणी काढण्याचे ठरविले होते .. फक्त एक रुपया प्रत्येकी द्यावा असे आवाहन केले होते ...दोन दिवसातच वार्ताफलक तयार होईल इतके पैसे जमले ...वर्ताफालाकासाठी चांगल्या दर्जाचा पत्रा ..रंग .. पेंटरची बिदागी ..वगैरे सगळे मिळून त्यावेळी एकूण १६० रुपये इतका खर्च आला .. फलकावर वर ' लोकशाही मित्र ' असे लिहिले होते आणि वरच्या एका कोपऱ्यात..एकता ..मध्ये न्याय ..आणि दुसऱ्या कोपऱ्यात प्रबोधन असे रंगवून वार्ता फलक तयार झाला ..मग तो वार्ताफलक आम्ही मेरीच्या बसस्टॉप वर ठेवू लागलो ..त्यावर मी रोज काहीतरी प्रबोधनात्मक लिहीत असे ....लोकांना ते हळू हळू आवडू लागले होते .. रस्त्यावरून येणारे जाणारे ..बसची वाट पाहत थांबलेले .. वगैरे लोक फलक वाचत असत ....अजून जरी संस्थेची नोंदणी झालेली नव्हती तरी संस्थेचे नाव प्रसिद्ध होत गेले ..

सकाळी भद्रकाली पोलीसस्टेशनला जावून दहा रुपये घेवून ...सायकलवरून पाठपुरावा करण्यासाठी पाच सहा जणांच्या घरी चक्कर टाकणे ..पुन्हा व्यसन सुरु केले असेल अश्या लोकांच्या कुटुंबियांना त्यांना पुन्हा उपचार देण्याविषयी सुचविणे ..जे चांगले असतील त्यांचा उत्साह वाढविणे .. दुपारी घरी येवून जेवून मग सायंकाळी चार वाजता ..मेरीत स्थानिक मित्रांना भेटणे ..लोकशाही मित्र च्या योजनांवर चर्चा करणे वगैरे सुरु झाले ...एक महिन्यानंतर जेव्हा मी फॉलोअपचा रिपोर्ट तयार करून मुक्तांगणला गेलो तेव्हा सोबत लोकशाही मित्र च्या फलकावर लिहिलेले काही मसुदे देखील मँडमना दाखवायला नेले ...मँडमनी अहवाल वाचून समाधान व्यक्त केले ..छान काम सुरु आहे अशी पसंतीची पावती दिली तेव्हा खूप आनंद झाला .. लोकशाही मित्र बद्दल देखील कौतुक केले मात्र एक सावधगिरीची सूचना दिली की कोणताही संघर्ष ... राजकीय संबंध .. भांडणे यात पडू नकोस ..कारण तुझ्या सारख्या भावनिक संतुलन साध्य करणे कठीण असलेल्या व्यक्तीला हे सगळे मानवत नाही आणि त्यातून पुन्हा व्यसन सुरु होण्याचा धोका असतो ....त्यांची सूचना रास्त होती ... त्याच वेळी मँडमनी मला तुझी दिल्लीला केंद्र सरकारतर्फे होणाऱ्या ' व्यसनमुक्ती समुपदेशन ' या बद्दलच्या प्रशिक्षणा साठी आम्ही मुक्तांगण तर्फे निवड केली आहे ..तू आणि मिलिंद असे दोघे या प्रशिक्षणा साठी जायचे आहे अशी आनंदाची बातमी दिली . १२ मार्च १९९२ ते १७ मार्च १९९२ असे पंधरा दिवस हे प्रशिक्षण होते .. म्हणजे अजून जेमतेम १० दिवस बाकी होते ...मी आनंदाने घरी परतलो .. त्याच काळात होळी येणार होती ... होळीला लाकडे गोवऱ्या वगैरे जाळण्याऐवजी परिसरातील कचरा जाळून ..कचराकुंडी सफाई वगैरे करून आधुनिक पद्धतीने होळी साजरी करावी असे ' लोकशाही मित्र ' ने ठरवले होते ...त्याबद्दलचे आवाहन देखील फलकावर लिहून झाले होते .. नेमका मी त्या काळात दिल्लीला असणार होतो म्हणून ' लोकशाही मित्र ' ची मुले जरा नाराज झाली ..प्रशांत .. संतोष ..विजय ..सलीम ..धनंजय ..किशोर असा आमचा आठदहा जणांचा छान समूह जमला होता ..यात सर्व जातीधर्माचे मित्र होते ..कोणताही भेद नव्हता ..सर्वांची समजूत घालावी लागली की मी नसलो तरी तुम्ही होळी आपण ठरवलेल्या पद्धतीने साजरी करा ..जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घ्या ...माझे असणे महत्वाचे नाहीय तर विचार पुढे नेणे जास्त गरजेचे आहे .

( बाकी पुढील भागात )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें