शनिवार, 18 जनवरी 2014

चलो एक बार फिरसे ..


चलो एक बार फिरसे...अजनबी बन जाये हम दोंनो!(पर्वदुसरे-भाग१३६ वा)


सीमंतीपूजन आटोपून जेवणाची तयारी सुरु झाल्यावर मी निराश झालो ..आता काही अनघाशी भेट होऊ शकत नाही असे वाटून ..सिगरेट ओढायला बाहेर निघून गेलो ..परत आल्यावर पाहतो तर अनघा कुठे दिसेना ..बहुतेक परत घरी गेली असावी ..विमनस्क बसून राहिलो एका खुर्चीवर ..मला परत आलेला पाहताच सुमित जवळ आला ..मानसीही होती त्याच्या मागे ..माझ्या बाजूच्याखुर्चीवर दोघेही बसले ..मानसी म्हणाली अहो ..सीमंतीपूजनाच्या वेळी ..मुलाचे मामा कुठे गेलेत म्हणून विचारात होते गुरुजी ...तुम्ही का आला नाहीत पुढे ..मला त्या वेळी एक जण आला होता बोलवायला परंतु मी नकार दिला होता ..त्यावेळी माझा मोठा भावू पुढे झाला होता पूजेसाठी ...माझ्या नकाराचे कारण सरळ होते ..एकतर न्यूनगंडांमुळे मी पुढे झालो नव्हतो ...दुसरे महत्वाचे कारण असे की अनघाने माझ्या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले मनाला खूप लागले होते ..त्यामुळे माझा आत्मविश्वास खच्ची झाल्यासारखा वाटत होते ...' सुहास होता की मामा म्हणून ' असे मानसीला म्हणालो ..' अहो पण ..असे दूर दूर का होतात तुम्ही ' सगळ्यांमध्ये मिसळला का नाहीत ? ' मानसीने माझे वर्तनातील बदल बरोबर ओळखला होता ..स्त्रियांना पुरुषांची नजर ओळखण्याचे सहावे इंद्रिय असते असे म्हणतात ..तसेच आपल्या नवऱ्याचा मूड ओळखण्याचे ...कोणीतरी एखादा टोमणा नेमका आपल्याला मारत आहे हे समजण्याचे ...नवऱ्याची एखाद्या स्त्री शी संशयास्पद जवळीक होत असल्याचे ओळखण्याचे ...वगैरे कितीतरी अदृश्य इंद्रिये असावीत असे मला नेहमी वाटत आलेय ...कदाचित त्यांचे संसारातील समर्पण..समरसता ....आत्मीयता यास कारणीभूत असावी ...मानसी काहीतरी अवांतर गोष्टी मला सांगत होती ..मी नुसताच हम्म ..हम्म ..करत बसलो ....पत्नीला आपल्या पतीला सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात ...अर्थात अनेकदा पतीला त्यात काडीचाही रस नसतो ...किवा त्याच्या मते त्या फालतू गोष्टी असतात ....कोणीतरी नवीन दागिना बनवला ....कोणाचे तरी नवरयाशी पटत नाही ....कोणीतरी स्त्री स्वतःला फार शहाणी समजते ...वगैरे !

शेवटी मानसीनेच विषय काढला ..' अहो अनघा आली होती असे कोणातरी म्हणत होते ..तुम्ही बोललात का ? खरेतर संपूर्ण समारंभात मानसीचे माझ्याकडे चांगलेच लक्ष होते ..सुमित माझ्याजवळ होता ..म्हणून ती सारखी माझ्याकडे पाहत होती ..मी कोणाशीही बोललेला नाहीय हे तिला ठावूक असायला हवे होते ..तरीही तिने अतिशय निरागसपणे प्रश्न विचारला ' हो आली होती ..नाही बोललो तिच्याशी मी ' असे तुटक उत्तर दिले ..यावर ती हळहळली ..अहो बोलायचे होते एखादा शब्द ..असे मत व्यक्त केले ..मी अनघाशी बोलण्यात पुढाकार न घेण्याची दोन करणे होती ..पहिले म्हणजे ..अनघाने जर मला योग्य प्रतिसाद दिला नसता तर ..अपमान झाल्यासारखे वाटले असते ..दुसरे कारण असे की आता आम्ही दोघेही विवाहित होतो .. एकमेकांसाठी परके ..आम्हाला दोघांना ओळखणाऱ्या कोणी आम्हाला बोलताना पहिले असते तर ..माझ्यापेक्षा जास्त अनघालाच ते त्रासदायक होऊ शकत होते ....कदाचित म्हणूनच अनघाने देखील मला ओळख दाखवली नसावी ..माझा मूड पाहून मानसीने बोलणे थांबवले ..म्हणाली उद्या अनघा लग्नाला येईलच ..तेव्हा तिची न माझी ओळख करून द्या तुम्ही ..मला बोलायचे आहे तिच्याशी ! मी नुसतीच मान हलवली...मानसी निघून गेली ...सहज म्हणून कार्यालयात फिरत होतो ....आडबाजूच्या एका खोलीत भाच्याचे सारे मित्र बहुधा पार्टीच्या मूड मध्ये होते .. तिकडे एक चक्कर मारली ..मोठा भावू तेथे बाहेरच उभा होता ..बहुधा त्यांच्यात मी मिसळत तर नाहीय याच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी ..मी त्या खोलीत जाताच माझे प्रताप माहित असलेल्या भाच्याच्या मित्रांनी मला आग्रह सुरु केला .. " मामू आवो .. बैठो ..म्हणत एकाने माझा हात धरला ..रंग चढला होता मैफिलीचा ..मी नम्रपणे नकार दिला ..' आपका चलने दो ..मै ऐसाही आया ' असे उत्तर देवून त्यांच्यात सामील होण्याच्या शक्यता फेटाळून लावल्या ' अरे वा ..सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली ' असा टोमणा मारला एकाने ..मी त्यांना नकार दिलेला पाहून भावाने समाधानाने मान हलवली आणि तो निघून गेला ..दोन तीन जणांना जास्त झालेली होती ..ते काहीतरी फालतू जोक करून मोठ्यामोठ्याने टाळ्या देवून हसत होते ..मला तेथे कसे तरीच झाले ..आपण मैफिलीत सामील नसताना ..सामील असणाऱ्यांचे वर्तन आपल्याला वेडेपणा वाटतो ..असह्य होते ..तेथून निघून झोपण्याच्या व्यवस्थेकडे गेलो ..विचार करत पडून राहिलो .

लग्नाच्या दिवशी पहाटेपासूनच धावपळ सुरु झाली सर्वांची ...मी तयार होऊन दाराजवळच अनघाची वाट पाहत होतो ...आज तर जास्तीच सुंदर दिसत होती ..तिच्या अंगावर बरेच दागिने दिसले ..एकंदरीत सुखात असावी हे समजले ..आपली प्रिय व्यक्ती सुखात असावी असे प्रत्येकाला वाटत असते ..मात्र तिला सुखात ठेवणारा कोणी दुसरा आहे हे पचवणे जरा जडच जाते ...वरात निघाली तेव्हा मी उत्साहाने नाचणाऱ्या मंडळीत सामील झालो ..अनघाची छोटीशी मुलगी देखील पुढाकार घेवून नाचत होती ..तिच्याशी बोललो ..तिचे नाव विचारले ..तिने सांगितलेले नाव ऐकून बरे वाटले ..आम्ही पूर्वी ठरवलेल्या नावांपैकीच एक नाव ठेवले होते अनघाने तिचे...कितवीत आहेस हे विचारले ..सहावीत आहे असे समजले ..ती इतकी सेम अनघासारखी दिसत होती की आश्चर्य वाटले ..लग्न लागल्यावर मानसी माझ्याजवळ आली ..म्हणाली ' अहो ..बोललात का ? अनघाशी ' ..माझ्या कडेवर सुमित होता मी नकारार्थी मान हलवली ..तितक्यात अनघा समोरून येताना दिसली ..मानसीने आग्रह केला तिच्याशी बोलण्याचा ....अगदी समोर येताच मी स्मित केले ..तिनेही स्मित करून प्रतिसाद दिला ...पुढे निघून गेली ..आता थोडा धीर आला होता मला ...मानसी सारखी तुम्ही पुढाकार घेवून बोला ..माझ्याशी ओळख करून द्या असे म्हणत होती ..पुन्हा अनघा जवळ येताच तिला हाक मारली ..चक्क ती थांबून हसली ..जवळ आली ...' ही माझी पत्नी मानसी असे सांगितले ..तर मानसीला... ही अनघा ..तुला सांगितलेच आहे त्या बद्दल ...असे म्हणालो ... दोघीही अतिशय मोकळेपणी बोलू लागल्या ..तितक्यात कुठून कोण जाणे अनघाची आई आमच्याजवळ आली ...बहुधा आमच्यावर लक्ष ठेवून असावी ..अनघाच्या आईला अभिवादन करून तिचीही मानसीशी ओळख करून दिली ..अनघाने माझ्या कडेवरच्या सुमितचा गालगुच्चा घेतला ..छान आहे म्हणाली ...तुझी मुलगी सेम तुझ्यासारखी दिसते असे तिला म्हणालो ..मुलगा पण आहे एक ..तो खेळतोय तिकडे असे सांगितले ..ती नागपूर जवळच एका गावात राहतेय असे सांगितले तिने ..या कधीतरी आमच्या गावी असे निमंत्रण दिले मानसीला ....छान वाटले तुला भेटून ..असेच चालू दे ..असे मला म्हणाली ..कदाचित तिला म्हणायचे असावे ..या पूर्वी जर असा व्यसनमुक्त राहिला असतास तर ...कदाचित आपण एकत्र असतो .

( बाकी पुढील भागात )

====================================================================

दिल तो बच्चा है जी ... ! ( पर्व दुसरे -भाग १३७ वा )

जेमतेम दोन मिनिटांची अनघाची भेट घडली ..तिची आई मध्येच आल्याने ...मानसी समोर असल्याने फारसे बोलणे झालेच नाही ...फक्त ख्याली खुशाली कळली एकमेकांना ..लगेचच अनघा निघून गेली ...तिची माफी मागायची होती ..तसेच त्या वेळी नेमका मी कसा मजबूर होतो ते अनघाला सांगायचे होते ..सगळे तसेच राहिले ..ती निघून गेल्यावर माझी रुखरुख अधिकच वाढली ....वाटले तिच्याशी एकटीशी बोलायची संधी मिळायला हवी होती ...मनाचे हे असेच असते ..आधी ती भेटवी म्हणून मन तडफडत होते ..नंतर निट भेट झाली नाही म्हणून मन कळवळले ...पुन्हा कधीतरी भेटू अशी आशा मनात जागली ....अनघा निघून जाताच मी हरवल्यासारखा झालो ...कालच्या पेक्षा अधिकच बैचैन ..हळवा..अवस्थ ! अनघा गेल्यावर मानसी पुन्हा एकदा हळहळली ..म्हणाली तुमची दोघांची जोडी छान झाली असती ...तुम्ही उगाच व्यसनाच्या नादी लागून अनघाला गमावलेत ... मनातून मानसीचे नवल वाटत होते ...किती सहजपणे तिने माझा भूतकाळ स्विकारला होता ....लग्न उरकून सगळे पुन्हा बहिणीकडे परतले ..दुसऱ्या दिवशी दुपारी मला परत निघायचे होते नागपूरला ..रात्री मानसी ' मैत्री ' बद्दल माहिती विचारात होती ...आम्हाला कधी राहायला येता येईल नागपूरला ? तुम्हाला पगार कधी मिळणार ? असे प्रश्न विचारात होती . ..मात्र सध्या तरी केंद्र प्राथमिक अवस्थेत असल्याने ते इतक्यात शक्य होणार नाही हे तिला समजावले ...मानसीचे मनात खूप कौतुक वाटत होते ...माझ्या व्यसनाधीनते मुळे झालेला सगळा त्रास ती हसतमुखाने पचवत होती ...मला कोणताही दोष न देता ...जे समोर आहे त्याला कोणतीही तक्रार न करता सामोरी जात होती ...तर माझे मन अतिशय चंचल ...हळवे ..भावनेच्या भरात वाहून जाणारे ..मानसीला ही ताकद कुठून मिळत असेल ..स्वतःला समजावण्याची ...दुख: पचवण्याची ...बहुधा लहानपणापासून मुलीना जे मर्यादा पाळण्याचे संस्कार दिले जातात त्यातून तर ही ताकद मिळत नसावी ..मनाविरुद्ध घडले तरी सहन करण्याची ..मनाला लगाम घालण्याची ..केवळ स्वतःचा नव्हे तर ..कुटुंबाचा ..समाजाचा ..परिस्थितीचा विचार करून....मनाला समजावण्याची ...मनाविरुद्ध घडत असलेल्या गोष्टीना सामोरे जाण्याची ..!

दुसऱ्या दिवशी सुखरूप नागपूरला परतलो ...पुन्हा तेच फार्महाउस मधील रुटीन सुरु झाले ...सध्या सेंटर मध्ये जेमतेम पाच जण उपचारांसाठी दाखल होते ..सर्वांची फी देखील नियमित येत नव्हती ..त्यात निवासी कर्मचारी म्हणून मी ..अँगी ..इरफान ..आणि रवीचा एक स्थानिक मित्र आम्ही चौघे फुकट राहत होतो ..सगळा खर्च भागवणे जडच है रविला ..अनेकदा त्याला सेंटरच्या गरजा भागवण्यासाठी घरून पैसे घ्यावे लागत ...आम्ही दोघे एकत्र असताना ....कारभार कसा वाढवता येईल यावर चर्चा करत असू ..रवीने स्थानिक वर्तमान पत्र दैनिक ' लोकमत ' मध्ये तीन चार लेख लिहिले होते आजाराबद्दल ..त्यामुळे हळूहळू काम वाढेल अशी आशा होती ..मात्र हा आजार कसा आणि केव्हा बरा होतो ..याची काहीच खात्री देता यात नसल्याने जेव्हा काही लोक सुधारणेची गँरटी मागत तेव्हा आमचा नाईलाज होई ...आपण एक शास्त्रीय प्रयत्न करणार आहोत ..त्याचा फायदा कोणाला... कसा ....कधी होईल याची खात्री देता येत नाही असे पालकांना समजावणे जड जाई ...व्यसनी व्यक्तीला सतत उपचार देवून व्यसनमुक्तीस प्रेरित करणे ..त्याच्या व्यसनमुक्तीस पोषक अशी मनोवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करणे .. तो भविष्यात करू शकणाऱ्या नुकसानापासून त्याचा आणि कुटुंबियांचा बचाव करणे हेच आपल्या हाती असते ...एक व्यसनी व्यक्ती व्यसन करण्याच्या काळात स्वतः सहित किमान चाळीस लोकांचे प्रत्यक्ष किवा अप्रत्यक्ष नुकसान करत असतो ...व्यसनामुळे लाखो रुपयांचा चुराडा करत असतो ...शिवाय कुटुंबियांचे मनस्वास्थ बिघडते ते वेगळेच....अश्या व्यक्तीला जर उपचार दिले नाहीत तर ती खात्रीने मरणार..दिवसेंदिवस अधिक अधिक नुकसान करणार ...त्या पेक्षा उपचारांसाठी थोडाफार खर्च केलेला परवडतो ..शिवाय समुपदेशन ..पालकांचा उपचारातील सततचा सहभाग ..व्यसनी व्यक्तीची व्यसनापासून कायमचे दूर राहण्याची इच्छा या गोष्टी जुळून आल्या तर यश मिळतेच ...फक्त काही केसेस मध्ये जास्त वेळा ..जास्त काळ उपचार द्यावे लागतात ..अथक ! 

या आजारातील सर्वात महत्वाची समस्या अशी असते की ..प्रत्यक्ष व्यसनी व्यक्तीला जरी व्यसन सोडावेसे वाटत असले तरी बहुतेक जण अहंकारामुळे उपचार घेण्यास तयार होती नाही ..माझे मी सोडून देईन .. काहीतरी चमत्कार होऊन माझे व्यसन बंद होईल कायमचे या भ्रमात तो अधिक अधिक खोलात जात राहतो ..अश्या वेळी जबरदस्तीने उपचार देणे केव्हाही योग्य ..कारण जबरदस्तीने का होईने उपचार केंद्रात आणल्यावर व्यासानीचे व्यसन बंद होते ..शिवाय उपचारांच्या काळात त्याला व्यसनाधीनतेचे भयानक दुष्परिणाम शुद्धीवर असताना समजावता येतात ..योगाभ्यास ..प्राणायाम ..समुपदेशांना द्वारे ..कायमचे व्यसनमुक्त राहण्याची प्रेरणा देता येते ..मात्र व्यसनी व्यक्तीला जबरदस्तीने उपचारांसाठी घेवून येणार कोण ? कुटुंबीय तर त्याला घाबरत असतात ..नंतर तो बदल घेईल ..आम्हाला दोष देईल ..वगैरे भीती कुटुंबियांच्या मनात असते ..अशा वेळी बाहेरच्या लोकांनी मदत करावी अशी त्यांची अपेक्षा असते ..माझ्या अनुभवातून व्यसनी व्यक्तीच्या बाबतीत ' वाघ म्हंटले तरी खातो ..वाघोबा म्हंटले तरी खातो .. वाघ्या का म्हणू नये ' हे मी शिकलो होतो ..त्यामुळे आपण अशा व्यसनी व्यक्तीला कुटुंबियांच्या संमतीने घरातून उचलून ..उपचारांना आणू शकतो याची मला खात्री होती ..वेळ प्रसंगी त्या व्यसनीशी खोटे बोलावे लागते ..त्याला घाबरावावे लागते ..वगैरे आम्ही जाणून होते ..एकदा चौकशीला एक केस आली ..मुलगा बी .कॉम झालेला वय वर्षे २४ ..दोन भावू इंजिनियरिंग करत आहेत ..आईवडील दोघेही नोकरी करणारे..व्यसानीने प्रत्येक वेळा कुटुंबियांचा विश्वास घात केलेला ..शेवटी आम्ही जन्माला घातले आहे तर तुला पोसायलाच हवे ..मात्र तुझा त्रास घरात नको ..या विचाराने कुटुंबीयांनी त्याला एका लॉज मध्ये महिना रूमचे भाडे भरून ठेवलेले ..तिथेच राहा दारू पी ..जुगार खेळ ..हवा तो गोंधळ घाल ..महिन्याला आम्ही ठराविक रक्कम तुला देवू असे ठरलेले ..त्या नुसार तो व्यसनी दर महिन्याला त्याचे पैसे घेण्यापुरता घरी येई ..शिवाय ते पैसे संपले की बाहेर उधाऱ्या करून ठेवी ..त्या घरच्यांना फेडाव्या लागत..त्याच्या पालकांना आम्ही त्याला जबरदस्तीने उपचारांना घेवून येवू असे सांगितले ....उपचारांना जबरदस्तीने घेवून येण्याची ही आमची पहिलीच वेळ होती ..ही ' पालखी ' कशी आणावी यावर आमची बरीच चर्चा झाली ..दोन दिवसांनी तो घरी पैसे घ्यायला येणार होते ..तेव्हा त्याला तेथूनच उचलायचे असे ठरले ..त्याला घाबरवण्यासाठी म्हणून आपण पोलीस आहोत असे सांगण्याचे ठरले ! 

( बाकी पुढील भागात )

========================================================================

पहिली पालखी ! ( पर्व दुसरे - भाग १३८ वा )

मुक्तांगण मध्ये असताना ..एखाद्या व्यसनी व्यक्तीला तो स्वतःहून उपचार घेण्यासठी येत नाही असे लक्षात आल्यावर ..त्याचे पालक किवा मित्र खूप दारू पाजून शुद्धीवर नसताना उचलून घेवून येत असत ..त्याला ' पालखी ' आणली असे गमतीने म्हंटले जायचे ..मात्र बहुधा ' मुक्तांगण ' चे कार्यकर्ते यात पुढाकार घेत नसत ..व्यसनीचे पालक अथवा मित्रमंडळी हे काम करत असत ....असे जबरदस्ती उपचार देवून नक्की फायदा होतो का ? अशी अनेकांच्या मनात शंका असे ..बहुधा असे समजले जाते की व्यसनी जो पर्यंत स्वतः मनापासून ठरवत नाही तोवर असे जबरदस्ती उपचार देवून फायदा होत नाही ..मात्र हा आजार इतका भयानक आहे ..की फार थोड्या लोकांना स्वतचे होणारे नुकसान जाणवते व ते स्वतःहून व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेण्यासाठी येतात ..बहुतेक लोकांना ..कुटुंबियांचा दबाव ..एखादे मोठे संकट ..झालेले एकादे नुकसान यामुळेच व्यसनमुक्तीचे उपचार घेण्याची इच्छा होते ...अशीही उदाहरणे मला माहित आहेत की ..फारसे नुकसान होत नाही तो पर्यंत व्यसनी उपचार घेण्यास तयार होत नाही ..त्याचा अहंकार त्याला शेवट पर्यंत असे भासवतो की तो स्वतःहून व्यसन सोडणार आहे ..व्यसनमुक्ती केंद्राची गरज नाही ..काही व्यसानींचे कुटुंबीय व्यसनी व्यक्तीपुढे इतके हतबल झालेले असतात की त्यांना व्यसनी व्यक्तीला कसेही करून उपचारांसाठी दाखल करायचे असते ..मात्र तो स्वतःहून तयार होत नसतो ..अश्या वेळी मदत घेणे अनिवार्य ठरते ..त्याला स्वतःहून उपचारानां जाण्याची प्रेरणा होईपर्यंत नुसते पाहत बसता येत नाही ..कारण त्याने सर्वाना जीव नकोसा केलेला असतो ...म्हणून आम्ही पालकांना मदत म्हणून अशी ' पालखी 'आणण्याची तयारी दर्शवली होती ....जबरदस्ती उचलून आणताना तो आरडा ओरडा करून तमाशा करू शकतो ..याची आम्हाला जाणीव होती ..अश्या वेळी त्याला चारचाकी गाडीतून खिडक्या बंद करून घेवून आणणे अधिक सोपे झाले असते ..आम्ही ज्याला उचलून आणणार होतो त्याचे नाव हरीश .. ' मैत्री ' कडे स्वतःची गाडी नव्हती ..म्हणून आम्ही हरीषच्या पालकांचीच चारचाकी गाडी वापरण्याचे ठरवले ..ठरल्या नुसार हरीष घरी येण्याआधी रवी ..इरफान आणि अँगी त्याच्या घरी जावून बसले ....मी सेंटरला कोणीतरी हवे म्हणून थांबलो होतो ..

सुमारे दोन तासाने जेव्हा सेंटरला गाडी आली तेव्हा मी कुतूहलाने कोणाची पालखी आणली ते पाहू लागलो ..एक साधारण पाच फुट उंचीचा ..चष्मा असलेला तरुण गाडीतून खाली उतरला ..मध्यम बांध्याचा ..चेहऱ्यावरून अतिशय तरतरीत वाटत होता ..त्याला शुद्धीवर असतानाच उचलून आणले होते ..त्याला उचलताना कशी गम्मत झाली ते रवीने सांगितले ..तो बरोबर सांगितलेल्या वेळेस आला ..त्याचे वडील म्हणालेच होते की वेळेचा अतिशय पक्का आहे ...घरी आला तेव्हा हे लोक घरात बसलेले ..त्याने यांच्याकडे दुर्लक्ष करून सरळ वडिलांकडे पैश्यांची मागणी सुरु केली ..वडील म्हणाले हे लोक तुझी चौकशी करत घरी आले आहेत ..तर यांच्याकडे पाहून म्हणाला मी यांना ओळखत नाही ..मला अनोळखी लोकांशी बोलायला वेळ नाही ...प्रकरण एकंदरीत विक्षिप्त होते हे रवीने ओळखले ..मग रविनेच बोलायला सुरवात केली ..म्हणाला आम्ही साध्या वेषांतील पोलीस आहोत ....तुझ्या बद्दल एक तक्रार आली आहे आमच्याकडे ...हे ऐकल्यावर तो म्हणाला चोरीची तक्रार असेल तर मला मान्य आहे ..बाकी की कोणत्या भानगडीत नसतो मी ..त्याने चक्क एका झटक्यात मी चोरी करतो हे काबुल करून टाकले ..यांना वाटले होते पोलीस आहोत सांगितल्यावर हा गडी घाबरेल ..गयावया करेल ..मात्र हा सरळ चोरी करतो असे कबुल करत होता ..मग त्याचे वडील रविला सांगू लागले ..अहो साहेब ..आमचा मुलगा तसा खूप चांगला आहे ..हुशार आहे ..मात्र दारूच्या नादाने जरा बिघडलाय..तुम्ही त्याला जेलमध्ये नका टाकू ..हवे तर त्याला एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रात ठेवा ..यावर तो म्हणू लागला ..व्यसनमुक्ती केंद्रात जायची मला गरज नाही ..जगात मी काही एकटा दारू पीत नाही ..तुम्हाला दारूवर आक्षेप असेल तर ..आधी सरकारला दारूबंदी करायला लावा ...हे पाणी वेगळेच होते ..हा पठ्ठ्या अजिबात व्यसनी आहोत हे कबुल करायला तयार नव्हता ..मग रवीने त्याच्या पुढे दोन पर्याय ठेवले ..पहिला असा की ...आम्ही तुझी तक्रार आहे म्हणून तुला जेल मध्ये टाकणार ..जर तुला जेलमध्ये जायचे नसेल ..तर एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रात भरती व्हावे लागेल ..अशा वेळी एखाद्याने जेलच्या भीतीने व्यसनमुक्ती केंद्रात जाणे केव्हाही पसंत केले असते ..परंतु हा म्हणाला ..' चालेल तुम्ही मला जेल मध्ये टाका ..मला एकदा पहायचेच होते जेल कसे असते ते ..व्यसनमुक्ती केंद्रात नको ' ...आमचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले ..शेवटी रवी म्हणाला चल बस गाडीत ..पोलीस स्टेशनला जावू ..मग ठरवू काय करायचे ते ..हा चालेल म्हणत सरळ गाडीत बसला ..

गाडी जेव्हा शहर सोडून हायवेला लागली तेव्हा म्हणाला ..तुम्ही मला पोलीस स्टेशनलाच नेताय ना ? की भलतीकडे कुठे नेत आहात ..रवीने त्याला जरा इकडे दुसर काम आहे ..ते करून आपण पोलीस स्टेशनला जाणार आहोत असे सांगून त्याला चूप बसवले ..गाडी जेव्हा ' मैत्री ' च्या आवारात पोचली तेव्हा ..म्हणाला ' म्हणजे तुम्ही केलाच माझा घात ...शेवटी आणलेच व्यसनमुक्ती केंद्रात ..हा आयुष्यातला पहिला व्यसनी मला भेटला होता ..जो पोलीस स्टेशनला जायला उत्सुक होता ..गाडीतून खाली उतरल्यावर आम्ही त्याला घेवून वार्डात हाँल मध्ये गेलो ..तर हा म्हणाला माझे वडील मूर्ख आहेत ..तुम्ही त्यांच्या नादी लागू नका ...माझे जीवन मी कसे जगावे ते स्वातंत्र्य मला पाहिजे ...मी माझ्या पद्धतीनेच जगणार ...त्यावर मी त्याला म्हणालो ..' अरे ठीक आहे तुझे जीवन तुझ्या पद्धतीने जगायचे आहे तुला ..मग स्वतच्या पैश्यानी स्वातंत्र्य उपभोग हवे तेव्हढे ...घरून कशाला पैसे घेतोस ? ' तो उत्तरला ..' मुले जो पर्यंत स्वतच्या पायावर उभे राहत नाहीत तो पर्यंत आईवडिलांनी त्यांना पोसलेच पाहिजे ..पालकांचे कर्तव्य असते ते ' हे उत्तर ऐकून मी सर्द झालो ' अरे गाढवा ..आता तू २४ वर्षांचा झाला तरी अजून स्वतच्या पायावर उभा नाहीस ..काय उभा जन्म त्यांच्यावर अवलंबून राहणार आहेस का ? ' .. ' त्यात काय झाले ..मी जर अपंग ..किवा लुळा पांगळा असतो तर त्यांना मला पोसावेच लागले असते ' हा प्राणी पटापट उत्तरे देत होता ...त्याची मूर्खपणाची उत्तरे ऐकून माझी सटकली ..' ऐ शहाण्या ..आता जरा शांत बस ..नाहीतर फटके खाशील ' तो पुन्हा त्याच सुरात म्हणाला ' तुम्ही चर्चा करत आहात माझ्याशी ..असे एकदम हमरातुमरी वर येणे ठीक नाही ..हिंसेने प्रश्न सुटत नसतात ' त्याचे हे उत्तर ऐकून सगळे हसू लगले ..एकंदरीत हे प्रकरण आम्हाला उपचार देताना बरेच जड जाणार होते हे जाणवले .

( बाकी पुढील भागात )

====================================================================

निर्दोष मुक्तता ! ( पर्व दुसरे -भाग १३९ वा )

अजब तत्वज्ञान असलेला हरीश प्रत्येक प्रश्नाला एकाच शांत ..सहज ..आणि उर्मट वाटेल अश्या स्वरात पटापट मुर्खासारखी उत्तरे देत होता ...आपण येथे अडकलोय ..या लोकांनी आपल्याला येथे उपचारांसाठी आणलेय असे लक्षात आल्यावर त्याने ते देखील स्वीकारले ..म्हणाला ' मला काय ? ..दोन वेळचे फुकटचे खाण्याशी मतलब ..करा तुम्ही तुम्हाला हवे ते ' याचे बोलणे गंभीरतेने घेतले तर हा रोज आपल्या हातून मार खाईल हे मला उमगले ...कदाचित हळू हळू निवळेल गडी असा सर्वांनी विचार केला ..त्याने जवळपास एक आठवडा तरी आंघोळ केली नसावी असे वाटत होते त्याच्याकडे पाहून ...नखे वाढलेली ..मळलेले कपडे ..त्याचा अवतार पाहून एक म्हणाला ' क्यों बे ..चारपाच दिनोसे नहाया नही लगता है ? ' त्याचे उत्तर तयारच होते ' आपका अंदाजा गलत है ..पंधरा दिनोसे नही नहाया मै ...और दात भी नही मांजे...जिस शरीर को आखिर में जलाना हो ..मिट्टी में मिलना हो ..उसके बारे में मै जादा लोड नाही लेता ' हे उत्तर ऐकून मी त्याला ' चल ताबडतोब अंघोळीला जा म्हणून बाथरूमकडे हाकलले....आता उपचार घेणाऱ्या लोकांमध्ये एकाची भर पडली होती ....शहरापासून इतक्या दूर फार्महाऊस वर ...स्वैपाकाची सोय म्हणून सेन्टरच्या बाहेरच्या बाजूने असलेली एक छोटीशी खोली वापरात घेतली होती..मातीच्या भिंती ..आणि टीन टाकलेले होते त्या खोलीवर ..पूर्वी जनावरांचा चारा वगैरे साठवण्यासाठी त्या खोलीचा उपयोग होत असे ..आम्हाला कोणालाच चपात्या करता येत नव्हत्या ..त्यामुळे बहुतेक वेळी आम्ही भाताचेच विविध प्रकार करत असू जेवणासाठी ..साधा भात ..मसाले भात ..खिचडी ..मसाला खिचडी ..त्या सोबत वरण ..भाजी ....असे जेवण असे ...रवी कधी कधी हॉटेल मधून किवा घरून चपात्या आणत असे ..

पाहता पाहता मला दोन महिने उलटले होते नागपूरला येवून ..माझी केसची तारीख म्हणून मी दोन दिवसांसाठी नाशिकला जाऊन आलो ...कोर्टात मानसी आणि सुमित सोबत होते ..सरकारी वकील मानसीला विविध प्रश्न विचारत होते ..ती खूप गोंधळली ..रडू लागली ...मी खरेतर आधीच मँजिस्ट्रेटकडे माझ्या व्यसनांचा ..त्यामुळे कुटुंबियांना होत असणा-या त्रासाचा कबुलीजबाब दिला होता ..तरीही एक प्रक्रिया म्हणून सरकारी वकील केस लढवत होते ..एक तासभर जेवणाची सुट्टी झाली तेव्हा ..त्या महिला सरकारी वकिलाला मानसी व मी जावून भेटलो ..त्यांना सगळी परिस्थिती सांगितली ..मानसीने आता माझी काही तक्रार नाही नवऱ्याबाबत असे सांगितले ..तरीही तुम्ही नव-याच्या दबावाने तर बोलत नाही ना ? अशी शंका आलीच त्यांना ..खूप गयावया केली तेव्हा त्यांनी कोर्टात केस मिटवून टाकू असे आश्वासन दिले ..एकदाचा निर्दोष सुटलो ४९८ च्या केस मधून ...त्या दोन दिवसात एकटा घराबाहेर पडलोच नाही ...सुमित एकदम खुश होता ..बर्याच दिवसांनी त्याला नॉर्मल बाबा अनुभवायला मिळाले होते ..सतत माझ्या अवतीभोवती असे तो ..मी चपात्या कशा करायच्या हे देखील आईकडून शिकून घेतले ...नेहमी भाताचे प्रकार खाणे जीवावर आले होते आमच्या ...मानसीला आईने घरात एकटी कंटाळते म्हणून माँटेसरी टीचरच्या कोर्सला घातले होते असे समजले ...एकंदरीत ठीकच होते सगळे ...पुन्हा नागपूरला परतल्यावर मी चपात्या बनवणे सुरु केले ..त्यामुळे सगळे खुश झाले ..अँगी व इरफानला देखील चपात्या बनवायला शिकले माझ्याकडून ..आता चारी ठाव व्यवस्थित स्वैपाक होऊ लागला सेंटरला ..रवीने लोकमत मध्ये लिहिलेले चार लेख वाचून लोकमत च्या एक पत्रकार वर्षा पाटील यांनी रवीची भेट घेवून ..खूप चांगले काम आहे तुमचे ..नक्की हे काम वाढवण्यास मी मदत करेन असे सांगितले..त्यांनी एकदा सेंटरला देखील भेट दिली ...त्याच काळात नागपूर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त श्री . जाधव साहेब यांच्याशी आमची ओळख झाली ..जाधव साहेब व्यसनमुक्तीच्या कामात खूप रस घेणारे होते ...गुन्हे शाखेशी संबंध असल्याने ...व्यसनाधीनते मुळे गुन्हेगारीत प्रचंड वाढ होतेय असे त्यांचे मत होते ...व्यसनाधीनते बद्दल जास्तीत जास्त जनजागृती झाली पाहिजे ..शाळा कॉलेजेस मधील विद्यार्थ्यांना ..व्यसनांचे दुष्परिणाम सांगितले पाहिजेत या हेतूने त्यांनी ..नागपूर पोलीस आयुक्तालय व मैत्री व्यसनमुक्ती केंद्र यांच्या मार्फत अशी जनजागृती करण्यास पुढाकार घेतला ..सुमारे नागपूर मधील सुमारे तीस शाळा कॉलेजेस मधून जनजागृती कार्यक्रम घेण्याचे ठरवले .

आम्ही मुक्तांगण मध्ये असताना करत असलेले पथनाट्य येथेही करायचे ठरवले ..रवी ..मी आणि आणखीन दोन जण मिळून आम्ही पथनाट्य बसवले ..अर्थातच प्रमुख व्यसनीची भूमिका मी करत होतो ...मंगरूळहून आम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणी नेण्यासाठी पोलिसांची मोठी निळी गाडी येत असे .त्यात बसून आम्ही ..शहरात माध्यमिक शाळा व कॉलेजेसमध्ये जावून पथनाट्य करत असू ...त्या निमित्ताने ' मैत्री ' चा गवगवा होऊन उपचार घेणाऱ्या मित्रात जरा भर पडू लागली ..त्या वर्षी २६ जून या आंतरराष्ट्रीय अमली विरोधी पदार्थ दिनानिमित्त नागपूरमधील मोमीनपुरा या वस्तीत एक छान जनजागृती कार्यक्रम झाला...मी भाषण केले ते सर्वाना खूप आवडले ..नागपूर च्या उन्हाळ्याशी जुळवून घेताना एकदोन वेळा आजारी पडलो ...हळू हळू नागपूर मध्ये चांगलाच रमू लागलो..पुन्हा एकदा एकाला पालखी करून आणायचे ठरले ..हा २१ वर्षाचा मुलगा ..चरस व गांजाचा व्यसनी होता ..थोडासा गुन्हेगारी जगताशी संबंधित ...खूप धिप्पाड ....जाडजूड ..त्याला उचलून आणणे सोपे काम नव्हते ...त्यासाठी जाधव साहेबांची मदत मागितली ..त्यांनी साध्या वेशातील चार पोलीस आमच्या सोबत दिले ..पोलिसांची गाडी घेवून आम्ही त्याला उचलून आणले ..पुढे गरज पडली तर केव्हाही पोलीस आपल्या मदतीस देतो असे जाधव साहेबांनी आश्वासन दिले ..त्यामुळे बरेचसे काम सोपे झाले ..नासिक मध्ये जसे सुरेंद्र पाटील साहेब ..रानडे साहेब मला मदत करत असत तसेच इथे मैत्रीस जाधव साहेब मदत करू लागले .

( बाकी पुढील भागात )

=======================================================================

भांडणे ..कटकटी ..इगो क्लँशेस ! ( पर्व दुसरे - भाग १४० वा )

' मैत्री ' मध्ये सर्व सुरळीत चालले होते ...नागपूरला येऊन सहा महिने होऊन गेलेले ...आम्ही केलेल्या जनजागृती कार्यक्रमांमुळे सेंटरला उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढू लागलेली ...पथनाट्यात सहभाग ..भाषणात ..समूह उपचार ..पालकांचे समुपदेशन ..व्यक्तिगत समुपदेशन सगळ्या गोष्टी मी छान करत होतो ...त्यामुळे साहजिकच रवीचे आणि माझे चांगलेच जमले होते ..परंतु कदाचित याच मुळे माझे इतर सहकाऱ्यांशी खटके उडू लागले ....इगो क्लँशेस वाढू लागले ...सगळेच पूर्वाश्रमीचे व्यसनी ..प्रचंड अहंकारी ...एकमेकांच्या चुका शोधण्यात वाकबगार ...शिवाय मला मिळत गेलेले महत्व पाहून इतर इतर सहकाऱ्याना उपेक्षितपणाची भावना निर्माण झालेली ..एकदोन वेळा इरफान शी माझे भांडण झाले ..कडाक्याचे ...एकदा मी हॉल बाहेरच्या व्हरांड्यात उपचारी मित्रांचा योगाभ्यास संपवून ' शवासन ' घेत होतो ....डोळे बंद करून सर्व शरीर शिथिल करा ...शरीराचा एकेक भाग हळू हळू शिथिल होतोय ..विश्रांती घेतोय ..अश्या सूचना मी देता होतो .. ..त्याचवेळी बाजूच्या किचन मध्ये इरफान सर्वांसाठी चहा करत होता ....आम्ही पाळलेला टाँमी नावाचा कुत्रा तनेमका तेव्हा तेथे किचन मध्ये गेला ..त्याने कशात तरी तोंड घातले ..झाले इरफानची सटकली ...त्याने कुत्र्याला जोरात लाथ घातली ..ते जोरजोरात केकाटू लागले ....किचन मधून पळून बाहेर व्हरांड्याकडे धावू लागले ....कुत्र्याला लाथ घालूनही समाधान न झालेला इरफान त्याच्या पाठोपाठ बाहेर पळत आला ..त्याने हातातील कुठले तरी भांडे धावत्या कुत्र्याच्या दिशेने फेकून मारले ..ते भांडे कुत्र्याला न लागता ...व्हरांड्याच्या भिंतीवर आपटून ...योगाभ्यास करणाऱ्या लोकांच्या मध्ये पडले ...कोणाला तरी लागले ...' शवासन ' सोडून सगळे घाबरून उठून बसले...इरफानच्या शिव्यांचा पट्टा सुरु होता जोरजोरात ..याने इतका तमाशा करण्याची काय गरज आहे म्हणून मी देखील चिडलो ..इरफानला रागावू लागलो ..तो दुरुत्तरे करू लागला ...दोघेही एकमेकांना भिडलो ....सुदैवाने आम्हाला इतरांनी दूर केले ..सोडवले ..परंतु प्रकरण धुमसत राहिले ...

नंतर परत तीनचार दिवसांनी ..इरफानची स्वैपाकाची पाळी असताना ..त्याने आज पोळ्या करणार नाही असे जाहीर केले ..नुसता भात आणि वरण करणार असे सांगितले ...त्याला कंटाळा आला होता पोळ्या करण्याचा ..आम्ही चारपाच जण त्यावेळी नुकतेच बाहेरून पथनाट्य करून आलेलो ...हरकत नाही पोळ्या नसतील तर नुसता वरण भात खाऊ असे मान्य केले .. इरफानने नेहमी प्रमाणे चार वाट्या तांदळाचा भात लावला ....पोळ्या नाहीत तेव्हा तांदूळ जरा जास्त घे ..असे मी इरफानला सांगू लागलो ..' तू मेरेको मत सिखा ..मै करता हु बराबर ..' असे इरफान उर्मट उत्तर ...' अरे ..क्या बराबर करेगा तू ? रोटी नही तो चावल जादा लागणं पडेगा तेरेको ' असा मी आग्रह करू लागलो ..इरफान त्याच वेळी हातात भाजी चिरायची सुरी घेवून माझ्याशी वाद घालत होता ..' तू अपने आप को बहोत शाना समझता है ..मै तेरेको नाही गिनता ...अपने मर्जी से करुंगा भात ' वैगरे सुरु केले इरफान ने ...मी जास्त भात लाव असे सर्वांचा विचार करून त्याला सांगत होतो ...कोणी अर्धपोटी राहू नये हा प्रामाणिक हेतू होता माझा ..मात्र इरफान हट्टाला पेटलेला ..शेवटी प्रकरण शिवीगाळी वर आले ....इरफान माझ्या अंगावर धावून आला ..त्याच्या हातात ती भाजी कापण्याची सुरी ..मी सावधच होतो ..त्याला भिडलो ...त्याने सुरीचा वापर करू नये म्हणून सुरीचे पाते हाताने मुठीत घट्ट पकडले ..तो सुरी सोडवण्यासाठी झटू लागला ..त्या झटापटीट माझ्या हातातील सुरीचे पाते मला जखम करू शकत होते म्हणून मी ते पाते मुठीतच वाकवून तोडून टाकले ..मग निर्धास्त झालो ..तोवर इतरानी आम्हाला सोडवले ..रात्री रविला सगळी घटना समजली ..त्याने इरफानला समजावले ..मात्र कोणाला नीट रागावणे रविला जमत नाही ..इरफान तात्पुरता शांत झाला ..मात्र त्याने माझ्या कुरापती काढणे बंद केले नाही ..मी मारामारी ..शिवीगाळ ...यात चांगलाच तरबेज आहे ....भिडलो तर मी नक्कीच सहजपणे एकदोन जण नक्कीच लोळवू शकतो ...परंतु हे सगळे उपचार घेणाऱ्या मित्रांसमोर होत असलेले मला पसंत नव्हते ..त्याचा त्याच्या मनावर विपरीत परिणाम होतो ...त्यांना शिकवणारेच जर असे भांडत असतील तर ते काय शिकणार आमच्या कडून ? ..अँगी तसा शांत प्रवृत्तीचा त्यानेही इरफानला समजावले ..परंतु इरफानच्या वागण्यात फारसा बदल झाला नाही .

पुढे उपचार घेणारे मित्र वाढले ' मंगरूळ ' मधील जागा सोडून आम्ही नागपूर शहरात अमरावती रोड वर ..' भरतनगर ' या ठिकाणी थोडी मोठी जागा भाड्याने मिळवली ..हा एक चार खोल्यांचा बंगला होता ..एका वेळी किमान २० जण उपचार घेवू शकतील अशी ही जागा होती ..मंगरूळ हून सेंटर नव्या जागेत शिफ्ट झाले ..आम्ही सगळे कार्यकर्ते जरी व्यसनमुक्त असलो तरी ' ड्राय ड्रंक ' अवस्थेत होतो ..म्हणजे ..अहंकार ..हट्टीपणा ..बेजवाबदारपणा ..तसाच होता ..रोज आमच्या काहीतरी कटकटी होत असत ..रवी शांत स्वभावाचा असल्याने त्याला अनेकदा तक्रारी करूनही तो ठोस अशी कारवाई कोणावर करत नसे ...शिवाय जरी उपचार घेणारे मित्र वाढले तरी ..आर्थिक बाजूत हवी तशी सुधारणा होत नव्हती ...अनेक पालक वेळच्या वेळी उपचार खर्चाचे पैसे देत नसत..काही जण नंतर पैसे देतो म्हणून चक्क पैसे बुडवत असत ....उपचार खर्च वेळच्या वेळी घेण्याबाबत रविला कडक धोरण स्वीकारता येत नव्हते ...कसाबसा खर्च भागत होता..कार्यकर्त्यांना मानधन देण्याची रवीची इच्छा असूनही त्याला ते शक्य होत नव्हते ..सेंटरला अनुदान मिळावे यासाठी आमचे सरकार दरबारी प्रयत्न सुरु होते ..परंतु तेथेही टक्केवारी ..भ्रष्टाचार ..चालतो ..प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची डाळ शिजणे कठीणच असते ..एकदोन वेळा नाशिकला जावून आलो ..मानसीचा सारखा आग्रह चाललेला होता ..आम्हाला तेथे राहायला घेवून चला म्हणून ..मला मानधन मिळत नसल्याने ते शक्य नव्हते ....मला मानधन देण्याची रवीची इच्छा असूनही सगळा खर्च भागवणे दिवसेंदिवस अवघड होत चालले होते ..त्यामुळे मी देखील रविला काही पैसे मागणे टाळत होतो ..सगळी परिस्थिती पाहून मला रविला अजून त्रासात टाकणे योग्य वाटले नाही .

( बाकी पुढील भागात )

सोमवार, 13 जनवरी 2014

नया दौर जिंदगीका....!!!


धडकी ..धास्ती ..वगैरे ! ( पर्व दुसरे - भाग १३१ वा )


तीन चार दिवस मी अतिशय अवस्थेत काढले ..माझा आत्मविश्वास पूर्णपणे संपल्या सारखा झाला ..ओळखीच्या लोकांशी मी रस्त्यात दिसल्यावर बोलणे टाळू लागलो ..रस्त्याने जाता येत प्रत्येक जण आपल्याकडेच पाहतोय असा भास होई ..,,एखाद्याशी बोलताना ..सारखे वाटत राही की ..हा जरी आपल्याशी सर्व साधारण गप्पा मारत असला तरी ..तरी मनातून आपली लायकी ओळखून आहे ..आपला तिरस्कार करतो ..आपल्या बद्दल याच्या मनात घृणा आहे ...वगैरे ..खरेतर हे सगळे माझ्या मनाचे खेळ होते हे देखील मला समजत होते ..मात्र ते असे थांबवावेत हे काही केल्या कळात नसे ..रात्री झोपायची भीतीच वाटे ....एकसे ..एक भीतीदायक स्वप्ने पडत असत ..प्रत्येक वेळी त्याचा शेवट .. शरीराला दरदरून घाम सुटलाय ..छातीचा भाता धपापतोय ..घसा कोरडा झालेला ..अश्या अवस्थेत जाग येण्यात होई ..मी रस्त्याने उघडा फिरतोय ..एखाद्या उंच सुळक्यावर अडकलोय ..समुद्रात पडलोय ..हातापायातले बळ नष्ट झालेय ...बुडतोय ..अश्या प्रकारचे स्वप्ने असत . अश्या वेळी जीवनावर श्रद्धा ठेवून ..मनातील अवस्थता ..नेमक्या भावना ..आपल्या समुपदेशकाशी ..जवळच्या व्यक्तीशी ..एखाद्या शुभचिंतक मित्राशी ..हे सगळे बोलून दाखवले पाहिजे ..तसेच नियमित ध्यान ..प्राणायाम ..योगाभ्यास करून मनाला प्रसन्नता ..संतुलन ..देण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत ..मन संगीत ..मनोरंजन ..विविध कला प्रकारांचा आनंद ..वगैरे गोष्टींमध्ये गुंतवून ठेवले पाहिजे ..असे मुक्तांगण मध्ये शिकवले गेले होते ..मात्र ते त्या वेळी मला सुचले नाही ...किवा सुचले तरी त्या गोष्टीना मी महत्व दिले नाही ...प्रत्येक व्यसनी व्यक्तीला व्यसनमुक्तीच्या अवस्थेत किवा व्यसनमुक्ती केंद्रातून उपचार घेवून आल्यावर अश्या प्रक्ररचे भास होतातच असे नाही .... काहीना नियमित आळस वाटणे ..कोणत्याही कामात रस नसणे ..नोकरीवर जाण्याची इच्छा नसणे ..सारखी चिडचिड होणे ...आपल्यावर अन्याय झालाय असे वाटणे ..वगैरे गोष्टी होऊ शकतात ...व्यसनी मित्रांशी भेटण्याची इच्छा होणे ..वगैरे प्रकार होऊ शकतात ..माझ्या बाबतीत घडणारे प्रकार हे ' स्किझोफ्रेनिया ' या मानसिक विकाराची लक्षणे देखील असू शकत होती ..मात्र सुदैवाने तसे घडले नाही .

. जेल मध्ये जाण्यापूर्वी घडलेल्या घटना अतिशय गंभीर स्वरूपाच्या होत्या ..जेलमध्ये असताना कित्येकदा त्या घटनांची उजळणी मी मनातल्या मनात करून ..स्वतःची अपराधीपणाची भावना मोठी करून ठेवली होती ..स्वतःच स्वतःची मनातल्या मनात अनेकदा निर्भत्सना केली होती ..त्याचा परिपाक म्हणून ..बाहेर पडल्यावर मला असे भास होणे सुरु झाले होते ..याचे मूळ माझ्या अंतर्मनातच होते ..कुचकामी पणाची ...वैफल्याची ..निराशेची ..अपराधीपणाची ..नाकारलेपणाची ....दारूण पराभवाची ..अश्या साऱ्या नकारात्मक भावना माझ्या मनात ठाण मांडून बसलेल्या होत्या ...परिणामी रात्रीची झोप पुरेशी होईनाशी झाली ..कशातच मन रमेनासे झाले ..आपण मुक्तांगण उगाच सोडले असे वाटू लागले ....एकदोन वेळा मुक्तांगण मध्ये फोन करून सारे सारे सांगून ..मुक्ता मँडमची माफी मागून ..परत मुक्तांगणला जावून रहावे असेही वाटले ..परंतु मनातील सुप्त अहंकार तसे करू देत नव्हता..सुप्त अहंकार किवा मदत घेण्याची तयारी नसणे ही प्रत्येक व्यसनीची समस्या असते ..आपण स्वतः सगळे काही नीट करू ..सगळे काही आपोआप नीट होईल ..अथवा मदत घेण्यात वाटणारा कमीपणा ..या सर्व गोष्टींमुळे मी अधिकच पराभूत होत होतो ... नेमकी मदत घेणे मी टाळले होते ..एरवी मी अतिशय बोलका आहे ..परंतु मनातल्या नेमक्या गोष्टी कोणाजवळ मनमोकळे पणाने बोलणे कटाक्षाने टाळतो ..त्या मुळे माझेच नुकसान होते...' ओपन माइंडेडनेस ' हा सुधारणेच्या काळात अतिशय महत्वाचा असतो ..मनातली सारी खळबळ ..अवस्थता समुपदेशकाकडे बाहेर काढून ... समुपदेशक सांगेल त्या सूचनांचा स्वीकार करणारा मनमोकळेपणा इथे अभिप्रेत असतो ..इथे जर ..तर ..न लावता मदत घेणे गरजेचे असते .अर्थात हे सगळे मला आता नीट कळतेय ..त्यावेळी अहंकारामुळे मी सारे संघर्ष मनातल्या मनात विनाकारण जपून ठेवले होते .

मानसी चार दिवसांनी सुमितसह परत आल्यावर आई मी व मानसी पुन्हा आधीच्या घरात राहायला गेलो ..भावाने मला सांगितले जरी तुझा मित्र तुला जामीन मिळवून देणार असला ..तरी तू त्याचा जामीन न घेता ..माझा मित्र तुझा जामीन करेल ..म्हणजे तू जरा गडबड केलीस की आम्हाला लगेच जामीन काढून घेता येईल ..तुला पुन्हा जेल मध्ये पाठवता येईल ..त्या नुसार आठ दिवसांनी कोर्टात जावून माझा पर्सनल बाँड रद्द करून ..शेख वकिलांच्या मदतीनेच.. माझ्या भावाच्या मित्राने मला जामीन दिला ..तसेच भावाने आईला आणि सर्व कुटुंबियांना सक्त ताकीद दिली ..याने एकदा जरी व्यसन केले आहे असे तुम्हाला समजले तर तुम्ही ते न लपवता ताबडतोब मला सांगा ..या पुढे व्यसनाच्या बाबतीत अजिबात तडजोड नाही ..इतर बाबतीत लाड केलेत तर हरकत नाही ..मात्र व्यसन अजिबात चालणार नाही ..प्रथमच भावाने इतका कडक पवित्रा घेतला होता ...जामिनावर असल्याने मी देखील भावाशी भांडू शकत नव्हतो ..नाहीतर परत जेल मध्ये जावे लागले असते ..अगदीच जायबंदी झालो होतो ..हतबलता काय ते अनुभवत होतो ..मानसी परत आल्यावर मी तिला जेलमधील घटना सांगत असताना.. ती खूप रडली ..म्हणाली दुसरा काही पर्यायच नव्हता शिल्लक ..तुम्ही जरी मला त्रास दिला नाहीत ..तरी तुमच्या व्यसनांचा ..अशा बेजावाबदार वागण्याचा मलाही त्रास होतोच ..घरातले सगळे वातवरण बिघडते ..सुहास भावोजी ..वाहिनी ..आणि सर्वांनी मला सांगितले होते की तुषारला जर सुधारावायचे असेल तर ..आता कडक पवित्र घेतलाच पाहिजे ..त्यासाठी भले खोटी केस करावी लागली तरी चालेल ..त्याच्या भल्यासाठी आपण हे करतोय ..त्यामुळे मला खोटी तक्रार द्यावी लागली ..तिलाही अपराधीपणा वाटत होता ..तिला दोष न देता मी तिला धीर दिला ..आपली प्रिय व्यक्ती आपल्यामुळे असहाय झालीय ..आपल्यामुळे तिचे जीवन जगणे कठीण होतेय ....ही जाणीव प्रत्येक व्यसनीला होणे आवश्यक असते .

( बाकी पुढील भागात )

====================================================================

नागपूरकडे प्रयाण ! ( पर्व दुसरे -भाग १३२ वा )

सुमारे पंधरा दिवस अशा घाबरलेल्या मनस्थितीत काढले ..व्यसनाची वारंवार आठवण येत होतो ..मात्र भावाला समजले तर तो जामीन काढून घेईल या भीतीने व्यसन करणे टाळत होतो ...तो दिवसातून एकदा तरी माझ्या ऑफिसमध्ये किवा घरी चक्कर मारून जात असे ..मुख्य हेतू हाच की माझे कसे चाललेय ते प्रत्यक्ष पाहणे ..ब्राऊन शुगर घेत ल्यावर त्याला माझ्या डोळ्यांच्या बाहुल्यांवरून समजलेच असते ..दारू प्यायलो असतो तर ..दारूचा वास आला असता ... व्यसनाने खूप पूर्वी दिलेला आनंद असा सहजा सहजी विसरता येत नाही ...नंतर व्यसनामुळे कितीही त्रास झाला असला तरीही ..व्यसनाची इच्छा होणारच नाही असे अजिबात नसते ..व्यसनमुक्तीच्या उपचारात व्यसन करण्याची इच्छा आणि ते करण्याची कृती या मधील अंतर वाढवण्यास शिकवले जाते ...तसेच कितीही इच्छा झाली तरीही ..व्यसन माझ्यासाठी ..माझ्या भविष्यासाठी ..कुटुंबियांसाठी या पूर्वी किती घातक ठरलेय याची स्वतःला वारंवार आठवण करून द्यावी लागते ..त्यासाठी मन स्थिर असावे लागते ...मनमोकळे पणे बोलणे ..मदत घेणे ..मनातील कलह ..गुंते ..नष्ट करण्यासाठी स्वताच पुढाकार घ्यावा लागतो ..या बाबतीत मात्र मी काहीच करत नव्हतो ..केवळ धास्तीमुळे व्यसन करणे टाळत होतो ..एकदा पाठ दुखतेय असे कारण सांगून मी राजरोस स्पाज्मो प्राँक्सिव्हानच्या दोन गोळ्या खाल्ल्याच ....तोवर स्पाज्मो च्या दुष्परिणामांबद्दल फारसा गवगवा झाला नव्हता ....आई व मानसीला ते पाठदुखीचे औषध आहे असेच वाटले ..त्या दिवशी रात्री छान झोप लागली ..स्वप्ने वगैरे पडली नाहीत ..शिवाय कोणाला समजलेही नाही ....व्यसनापासून दूर राहत असताना व्यसनी कोणाला समजू नये म्हणून ..झोपेच्या गोळ्या ..दारू ऐवजी ताडी किवा गांजा ओढणे ..ब्राउन शुगर ऐवजी दुसरे स्वस्त व्यसन करणे ..अशी पर्यायी व्यसने शोधण्याचा धोका असतोच ...मग दर दोन दिवसाआड पाठ दुखीच्या निमित्ताने मी स्पाज्मोच्या गोळ्या खात गेलो ...पगार झाल्यावर जास्त पैसे मिळाले म्हणून घरी येतानाच ब्राऊन शुगर विकत घेवून ठेवली ....भावू घरी येवून भेटून गेल्यावर ..सगळे झोपल्यावर ती गुपचूप संडासात जावून ओढली ..असे चक्र हळू हळू पुन्हा सुरु झाले .. पुन्हा जेल मध्ये जाण्याच्या भीतीने ..जरा जपूनच चालले होते सगळे ....पैशांसाठी भांडणे ..घरात कटकटी वगैरे टाळत होतो ..पैसे नसतील तेव्हा चुपचाप टर्की सहन करत होतो ..

मनातून हे सगळे कायमचे बंद व्हावे अशीही इच्छा होती ..तरीही इच्छेला आत्मशक्तीचे पाठबळ मिळत नव्हते ....आपण पूर्वी व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातच कार्य करण्याचा घेतलेला निर्णय सोडून उगाच नाशिकला परतलो असे वाटत होते ....एक दोनदा नाटकीपणे मुक्ता मँडमना फोन केला ..मात्र त्यांना खरे काय चाललेय ते अजिबात सांगितले नाही ..सगळे काही ठीक आहे असेच भासवले ..मानसीला मात्र माझी गडबड परत सुरु झाल्याचा संशय होताच ..ती अधूनमधून मला सावध करत गेली ...असे सुमारे तीनचार महिने सुरु राहिले ..पुढे पुढे बाहेर पडावे वाटेनासे झाले ..कामावर दांड्या मारून घरात निराशेत झोपून राही ..परंतु कुटुंबियांना सगळे खरे खरे सांगून मदत मागत नव्हतो ..शेवटी मानसीनेच एकदा पुढाकार घेवून मुक्ता मँडमना फोन केला ..सविस्तर नाही तरी त्यांना मानसीने ..माझे व्यसन पुन्हा सुरु झाल्याचे सांगितले ..यावर त्यांनी त्याला मला फोन करायला सांग असा तिला निरोप दिला ..मात्र मी आज ..उद्या ..असे करत ते टाळत गेलो ..तिने पुन्हा एकदा फोन केला ..तेव्हा मुक्ता मँडमने तिच्या जवळ रवी पाध्येचा नंबर दिला ..म्हणाल्या ..हा रवी तुषारचा मित्र आहे ..इथे ते सोबतच राहत होते मुक्तांगणला..त्याने नागपुरात स्वतचे व्यसनमुक्ती केंद्र सुरु केलेय . गेल्याच आठवड्यात तो मुक्तांगणला भेटीसाठी आला होता ....तेव्हा तो तुषार बाबत चौकशी करत होता.. ..त्याला त्याच्या व्यसनमुक्ती केंद्रासाठी अनुभवी कार्यकर्त्यांची मदत हवी आहे ..तू त्याला फोन करायला सांग तुषारला..सायंकाळी घरी आल्यवर मानसीने मला रवी पाध्ये बद्दल सांगितले ....मी तेथे फोन करावा असे सुचवले ..हा पर्याय मला आवडला ..मुक्तांगण मध्ये वारंवार अँडमीट होणे तसेही लज्जास्पद वाटू लागले होते ..तसेच तेथे सगळे समुपदेशक माझे मित्रच असल्याने मी गंभीरतेने उपचार घेत नव्हतो ...एखाद्या व्यक्तीला वारंवार उपचार घेवून फायदा होत नसेल ..किवा ती व्यक्ती उपचारांना योग्य सहकार्य करत नसेल ..तर दुसरया व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करून पहावे असे सुचवले जाते मुक्तांगणकडून ..त्या नुसार मुक्ता मँडमनी..मानसीला रवी पाध्येचे नाव सुचवले होते .. .थोडक्यात सांगायचे तर मी मुक्तांगण मध्ये ब्लँक लिस्टेड झालो होतो ..प्रत्येक व्यसनमुक्ती केंद्रात अशा नफ्फड लोकांची यादी असते ..उपचारात योग्य सहकार्य न करणारे ..अनेकदा संधी देवून देखील न सुधारणारे ..उपचारांच्या काळात मस्ती ..गोंधळ करणारे ..स्वतःला अति शहाणे समजणारे ..वगैरे प्रकारचे लोक या ब्लँक लिस्ट मध्ये असतात ....माझ्या मागच्या मुक्तांगणच्या उपचारांच्या वेळीच ..मला जास्त दिवस राहावे असे सुचविण्यात आले होते ते मी ऐकले नव्हते ..त्या वेळी अशी गम्मत झाली होती की ..बाबांना फोन करून जेव्हा मी मुक्तांगण मध्ये दाखल झालो होतो ..तेव्हा तेथे समुपदेशक म्हणून काम करणाऱ्या माझ्या मित्राने येवून सांगितले होते की वर स्टाफ मिटिंग मध्ये ..तुझी फाईल समुपदेशक म्हणून स्वीकारण्यास कोणीही समुपदेशक तयार होत नाहीय ..तुला समुपदेशन करण्याची कोणाचीही तयारी नाहीय ..तूला समुपदेशन करणे म्हणजे दगडावर डोके आपटून डोके फोडून घेण्यासारखे आहे असे सर्वांचे मत आहे ..एकंदरीत आता मुक्तांगण मध्ये मी उपचार घेऊ नये असे मत दिसले मुक्तामँडमचे म्हणून त्यांनी मानसीला रवी पाध्येचा नंबर दिला होता ..

रवी पाध्ये हा अल्कोहोलिक होता ...१९९७ साली मी मुक्तांगण मध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत असताना माझ्या समोरच तो उपचारांसाठी दाखल झाला होता..३५ दिवसांचा उपचार पूर्ण करून स्वखुशीने आफ्टर केअर मध्ये राहिला होता ..हळू हळू त्याने बंधूला वार्डात मदत करायला सुरवात केली होती ..,,त्याचे कौशल्य पाहून त्याला कार्यकर्ता म्हणून मानधन देखील सुरु झाले होते ..हा रवी गोरापान ..उंच ..हसरा ..मितभाषी आणि एकदम टापटीप राहणारा कार्यकर्ता म्हणून मुक्तांगण मध्ये लवकरच सगळ्यांचा आवडता झाला होता ..कोणाशीही त्याचे भांडण नसे ..अतिशय समजूतदार अशी याची छबी होती ...मी आफ्टर केअर इन्चार्ज असताना तो वार्ड मध्ये इन्चार्ज म्हणून बंधुसोबत काम करत असे ..रात्री आम्ही सगळे कार्यकर्ते आफ्टर केअर मध्ये एकत्रच झोपत असू ..त्याचा पलंग अनेक दिवस माझ्या शेजारी होता ..त्यामुळे तो माझाही चांगला मित्र होताच ..मानसीने मला त्याचा फोन नंबर देवून मुक्ता मँडमचा निरोप सांगितल्यावर मी दुसर्याच दिवशी रविला फोन केला ..मला आठवतेय ती१४ एप्रिल २००२ अशी तारीख होती ..सकाळी मी रवीला फोन केला ....मी बोलतोय हे समजल्यावर त्याला आनंद झाला ..म्हणाला ..कसे चाललेय तुमचे तुषारभाऊ ..अनुभवाने आणि वयानेही मी त्याच्यापेक्षा मोठा असल्याने तो मला तुषारभाऊ असे संबोधत असे ..एरवी देखील रवी कोणालाही पटकन अरे तुरे करत नाही ..सर्वाना सन्मानानेच बोलतो ..मी रविला माझे व्यसन परत सुरु झाल्याचे सांगितले ..त्यावर त्याने मला इथे नागपूरला येत का ? असे विचारले ..मी ताबडतोब होकार दिला ..

( बाकी पुढील भागात )

====================================================================

शून्य मैल ! ( पर्व दुसरे - भाग १३३ वा )

रवी पाध्येशी बोलणे झाल्यावर मी जास्त विचार करत बसलो नाही ..काळजी होती प्रपंचाची ..नाहीतरी मी कुठे प्रपंच नेटका करत होतो ...रवीच्या नवीन सेंटर वर नव्याने सुरवात करावी हे मनाशी योजले ..सुरवातीला काही दिवस संघर्ष करावा लागेल ..नाशिक पासून इतक्या दूर कधी मला नव्याने जीवन सुरु करण्याची संधी उपलब्ध होईल असे वाटले नव्हते ...लहानपणी एकदा वडिलांची बदली नागपूरला होता आहे असे ऐकले होते ..त्यावेळी वडिलांनी प्रमोशन मिळत असूनही बदली नाकारल्याचे आठवतेय ..खूप उन्हाळा असतो ..एकदम गरम वातावरण आहे ..बकाल शहर आहे ..असे काहीतरी वडील बोलत असत नागपूरबद्दल हे आठवले ..त्या वेळीच बालमनात नागपूरबद्दल तेथे कधीच राहायला जायचे नाही अशी अढी बसली असावी ..नागपूरचा विषय निघाला की ..उन्हाळा ..बकाल शहर वगैरे गोष्टी आठवत ..वडिलांचे असे मत बनण्यास एक कारण होते ..त्यांचा रेल्वेतील एका मित्राला सरकारी कामासाठी म्हणून एका आठवड्यासाठी नागपूरला पाठवले गेले असताना ..त्यावेळी नेमका उन्हाळा असल्याने त्याने योग्य काळजी न घेतल्याने त्याला सनस्ट्रोक होऊन तो गेला होता ...सायंकाळीच मी नागपूरला निघण्याचे ठरवले ..तसे रविला सांगितले ..तसेही आता नाशिकमध्ये राहणे मला अवघड होत चालले होते ...अगदी सुरवातीला मुक्तांगण मध्ये उपचार घेवून परतल्यावर ..मी तीन वर्षे व्यसनमुक्त असताना ..मुक्तांगणचा कार्यकर्ता म्हणून चांगला लौकिक मिळवला होता ....नंतर होत गेलेल्या रीलँप्स मुळे मीच तो लौकिक धुळीस मिळवला होता .. शेवटच्या जेलच्या घटनेनंतर तर मला बाहेर फिरण्याची देखील लाज वाटू लागली होती ..उगाच इथे कुढत जगण्यापेक्षा जावू नागपूरला ..उन्हाळा असेल ..गरम वातावरण असेल ..बकाल शहर असेल ..तरीही जावूच हा निर्धार पक्का केला ...आईने सांगितले मी तू मानसी व सुमितची काळजी करू नकोस ..आम्ही त्यांची काळजी घेवू ..तू फक्त सध्या तुझ्या सुधारणेकडे लक्ष दे ..हे व्यसनाचे जोखड कायमचे झुगारून दे मनावरून ...चार पैसे कमी मिळवलेस तरी हरकत नाही ..आम्हाला तुझ्याकडून आर्थिक संपन्नतेची नाही तर ..व्यसनमुक्तीची अपेक्षा आहे ..प्रत्येक व्यसनीच्या घरी हेच सांगत असावेत ..जास्त पैसे कमावले नाहीस तरी चालेल ..मात्र व्यसनमुक्त रहा ..अर्थात आम्हा व्यसनी मंडळीना कुटुंबियांच्या भावना समजत नाहीत ..आमच्या जीवनाच्या बिघडलेल्या गाडीची इतर लोकांच्या चांगल्या जीवनाशी तुलना करून ....स्वतःच मनात खंत ..अपराधीपणा ..निराशा अशा भावना जोपासत असतो ...पुन्हा पुन्हा त्याच चुका करत जातो .

दुपारी आईकडून पैसे घेवून ब्राऊन शुगरच्या दोन पुड्या आणि एक संत्राची क्वार्टर घेवून ठेवली ..गाडीत प्यायला म्हणून ...शेवटचे म्हणून ...व्यसनी मंडळींचे हे शेवटचे असतेच नेहमीचे ..खरे तर असे शेवटचे म्हणत अनेकदा परत परत तेच केलेलं असते ..आताही आम्ही जेव्हा एखाद्या व्यासानीला उपचारांसाठी घेवून येतो तेव्हा ..तो मला एकदा व्यसन करून द्या ..शेवटचे ..असे विनवत असतो .. ..सायंकाळी सेवाग्राम एक्प्रेसने निघालो ..भावू स्टेशनवर सोडण्यासाठी आला होता ..त्यानेही मानसी व सुमितची काळजी करू नकोस ..तू फक्त स्वतच्या सुधारणेकडे लक्ष दे असे बजावले ..घरून निघताना ..मानसीच्या डोळ्यातील पाणी पाहून जीव कळवळला ..तिच्या कडेवरचा सुमित नेमके काय चाललेय हे न समजल्याने मी पण बाबांबरोबर जातो म्हणून रडत होता ..मनावर दगड ठेवून निघालो घरातून ...गाडीत स्टेशनवरून हलल्याबरोबर ..संडास मध्ये शिरलो ..एक ब्राऊन शुगरची पुडी आणि अर्धी क्वार्टर लावली ..मग बर्थवर येवून बसलो ..मनात सगळ्या भूतकाळाला उजळणी देत ..अनघा लग्न होऊन नागपूरजवळच कोठे तरी राहते हे माहित होते ..नागपूरला कधीतरी ती रस्त्यात दिसेल ..भेटेल असे उगाच वाटत राहिले ..मानसीशी लग्न झाल्यावर ..मानसीने मला खूप प्रेम दिले होते ..पत्नी धर्म अगदी उत्तम निभावला होता ..उलट मीच पती म्हणून योग्य जवाबदारी निभावयास कमी पडलो होतो ..तरीही अनघाची आठवण येतच असे...अनघाशी जर आपले वेळीच लग्न झाले असते तर ..आपले जीवन नक्कीच वेगळे असते ..यापेक्षा चांगले असते असे वाटे ..व्यसनमुक्तीच्या वाटेवर ..हे जर ...तर..किवा IF ..But ..न लावता चालता यायला हवे ..जे समोर आहे त्यात समाधान मानून जगायला शिकले पाहिजे ..माझी असमाधानी वृत्तीच नेहमी माझा घात करत आली आहे ..जे मिळाले आहे ..मिळते आहे ..त्यापेक्षा अजून काहीतरी ...जे मला हवे होते ..जे मिळू शकले नाही ..जे कदाचित कधीच मिळणार नाही ..याबद्दल जास्त खेद वाटत राहतो ..त्या मुळे जे समोर आहे त्याची किंमत रहात नाही ...गाडीत उलट सुलट विचार करत जागाच होतो रात्रभर 

सकाळी सात वाजता अजनी स्टेशनवर उतरलो ...रवी आणि त्याचे तीन मित्र मला घ्यायला आले होते स्टेशनवर ..त्या मित्रांना रवीने माझ्या बद्दल खूप काही तरी चांगले सांगितलेले जाणवले ..कारण ते सगळे खूप आदराने माझ्याशी बोलत होते ..रवीचे हे एक वैशिष्ट्य आहे ..तो बहुधा कोणाबद्दल वाईट बोलत नाही ..त्याला माहित असले तरी.. ..अगदी जवळच्या ...मोजक्याच लोकांजवळ तो एखाद्या बद्दल असलेले खरे मत मांडतो बहुधा सर्वांबद्दल चांगलेच बोलतो ...मला रवीने आनंदाने मिठी मारून माझे स्वागत केले ..म्हणाला तुषारभाऊ मुक्तांगण मध्ये असतना पेक्षा आता तब्येत जास्त खराब झालीय तुमची ..मी नुसताच हसलो ..स्टेशनवरून रवीच्या घरी शंकर नगर येथे गेलो ...रवी मुक्तांगणला असताना एकदा त्याचे आईवडील त्याला भेटायला आले असताना त्यांना पहिले होते ..मात्र ओळख नव्हती ..रवीने माझी ओळख करून दिली त्यांच्याशी ..चहा ..नाश्ता वगैरे करून आम्ही सेंटरवर निघालो ..सेंटर वर अँग्नेलो देखील आहे हे रवीने सांगितले ..मला रविचे व्यासानुक्ती केंद्र कसे आहे हे पाहण्याचे कुतूहल होते ..नागपूरपासून सुमारे ३४ किलोमीटर वर सेंटर आहे असे त्याने सांगितले ..एका ' मंगरूळ ' नावाच्या खेडेगावात ..एका मित्राच्या मदतीने ..भाड्याची जागा मिळाली होती ...आम्ही सगळे बाईक वर तेथे जाण्यास निघालो होतो ..एप्रिल महिना असल्याने उन खूप तापले होते ..अगदी सकाळी १० वाजताच ..खूप गरम होत होते ..रवीने मला एक पांढरा कपडा दिला डोक्याला गुंडाळायला ..म्हणाला ..हे इथे आवश्यक असते ..उन्हापासून बचाव करायला ..मला गम्मत वाटली ..तो कपडा डोक्याला नेमका कसा बांधायचा हे देखील शिकवले त्याने ..वाटेत मी रविला सांगितले ..माझे व्यसन सुरु होते ..त्यामुळे आता मला दोन तीन दिवस टर्की चा त्रास होईल ..स्पाज्मो प्राँक्सिव्हानच्या गोळ्या घे वाटेत ...मात्र आम्ही शहराच्या बरेच पुढे आल्याने एका छोट्याशा मेडिकल स्टोर्स मध्ये ..नुसत्या सध्या प्राक्सिव्हान मिळाल्या ..टर्की कमी होण्यास याचा फारसा फायदा होणार नव्हता ..सुमारे तासभराने आम्ही सेंटर वर पोचलो ..साधारण सातशे स्क्वेअरफुटांचा एक हॉल..बाहेर पडवी ..असे ते शेतातील फार्महाऊस सारखे होते ..वर छत टिनाचे ..सेंटरवर अँगी आणि इरफान हे मुक्तांगणचे जुने मित्र भेटले !

( बाकी पुढील भागात )

===========================================================

नवी सुरवात ...! ( पर्व दुसरे - भाग १३४ वा )

रवीने मुक्तांगणला उपचार घेवून तिथेच सुमारे तीन वर्षे आफ्टर केअर मध्ये वास्तव्य केले होते ...मुक्तांगणचा निवासी कर्मचारी म्हणून काम करत असताना ..त्याची तेथे नागपूरहून मुक्तांगण मध्ये समुपदेशकाच्या प्रशिक्षणासाठी आलेल्या एका मुलीची ओळख झाली ...मने जुळली .. त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला ..मी जेव्हा सन २००० जुलै मध्ये मुक्तांगण सोडले ..त्याच सुमारास रवीने देखील नव्याने नागपूरला जीवनाची सुरवात करावी या हेतूने ..सर्व संमतीने मुक्तांगण सोडले होते ..मुळचा नागपूरचाच असल्याने मुक्तांगण मध्ये यशस्वी उपचार घेवून तसेच व्यसनमुक्तीचा कार्यकर्ता म्हणून पुरेसे अनुभव घेवून तीन वर्षांनी त्याने ..पुन्हा नागपूरला येण्याचा निर्णय घेतला होता ...नागपूरला आल्यावर शासकीय अनुदान मिळणाऱ्या एका व्यसनमुक्ती केंद्रात त्याने समुपदेशक म्हणून नोकरी पत्करली ..त्याची होणारी पत्नी देखील तेथेच काम करत असे ...दरम्यान त्यांनी लग्नही केले ....नागपूरच्या अनुदानित व्यसनमुक्ती केंद्रात करताना त्याला आलेले अनुभव भयंकर होते ....केवळ शासनाचे अनुदान मिळते म्हणून व्यसनमुक्ती केंद्र सुरु करणारे अनेक लोक आहेत..ज्यांना व्यसनाधीनता या आजाराची शास्त्रीय माहिती नसते ..उपचार पद्धती नेमकी कशी असली पाहिजे याचेही ज्ञान नसते ..उपचार घेण्यासाठी दाखल झालेला व्यसनी सुधारावा याची कळकळही नसते ...फक्त शासनाचे अनुदान मिळवावे या हेतूने सुरु केलेल्या त्या व्यसनमुक्ती केंद्रात ..दाखल झालेल्या व्यसनी व्यक्तीला ..केवळ काही दिवस व्यसन मिळणार नाही अशा ठिकाणी डांबून ठेवणे असाच प्रकार होता ...समूह उपचार ..व्यक्तिगत समुपदेशन ..पालकांचे समुपदेशन ..वैवाहिक समुपदेशन ..अशी व्यसनमुक्तीस सर्वांगीण मदत करू शकणारी शास्त्रीय उपचार पद्धती नव्हती .... ..अनेकदा तर अनुदान मिळावे म्हणून खोटे अहवाल तयार केले जात ....शासनाकडून तपासणी करण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना पैसे वाटून ते अहवाल अधिकृत करून घेतले जात असत ....मुक्तांगण सारख्या समर्पित हेतून काम करणाऱ्या संस्थेत काम केले असल्याने ...रविला ते सारे खटकले ..त्याचे नियमित संचालकांशी खटके उडू लागले ..अशी व्यसनमुक्ती केंद्रे व्यसनमुक्तीच्या नावावर समाजाच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक करण्याचे काम करत असतात ...शेवटी अति झाल्यावर रवीने मुक्तांगण सारखे सर्वांगीण उपचार देवू शकणारे व्यसनमुक्ती केंद्र सुरु करायचे ठरवले..योगायोगाने त्याच्या पत्नींने पूर्वीच ' मैत्री बहुउद्देशीय संस्था ' या नावाने एक सामाजिक संस्थेची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करून ठेवली होती ..त्या संस्थे मार्फत ' मैत्री व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र हा प्रकल्प ' राबवण्याचे उभयतांनी मनावर घेतले ..पुरेसा पैसा हाताशी नव्हता ..तसेच साधन सामुग्रीची कमतरता देखील होतीच ..परंतु सगळे काही ठीक होईल या विश्वासाने काम सुरु करण्याचे ठरले ..कुटुंबियांची मदत ..मित्र मंडळींची मदत ..तसेच रवी ज्या संस्थेत काम करत असे ...तेथील रवीच्या मदतीने व्यसनमुक्त राहणाऱ्या चार मित्रांच्या मदतीने शेवटी फेब्रुवारी २००२ मध्ये ' मैत्री व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र ' या प्रकल्पाची सुरवात नागपूरजवळ असलेल्या ' मंगरूळ ' नावाच्या खेडेगावात मित्राच्या शेतातील फार्म हाउसवर झाली होती .

अनुभवी कार्यकर्ते म्हणून जमवाजमव सुरु करताना ..रविला पूर्वी मुक्तांगण मध्ये असलेला अँगी व लवकरच इरफान सामील झाला ..हे दोघेही माझ्या सारखेच ' नफ्फड ' म्हणजे वारंवार रीलँप्स होणारे ..त्यानाही मदतीची गरज होतीच म्हणून रवीकडे आलेले ..मी नंतर दोनच महिन्यात तेथे सामील झालो ..मी गेलो तेव्हा तेथे उपचार घेणारे जेमतेम पाच जण होते ..सगळे ' अल्कोहोलीक ' अँगी व इरफान जरी अनेकदा मुक्तांगण मध्ये असले तरी ..त्यांनी मुक्तांगण मध्ये समूह उपचार घेणे ...योगाभ्यास घेणे..पथनाट्यात काम करणे ..वगैरे कामात रस घेतला नव्हता ..ते इतर व्यवस्थापन करण्यात अनुभवी होते ..म्हणजे देखरेख ..किचन मधील काम ..सुरक्षा व्यवस्था ..विजेची कामे ..फिटिंगची कामे ..वगैरे ..मी मुक्तांगणला असताना कुतूहल म्हणून किवा शिकायची आवड म्हणून व्यसनमुक्ती केंद्राशी संबंधित उपचारांच्या सर्व बाबी शिकलो होतो ..माझ्या प्रवेशानंतर कार्यकर्त्यांची योग्य सांगड घातली गेली ... परिपूर्ण अशी टीम तयार झाली ..मंगरूळ पासून सुमारे एक किलोमीटर असलेल्या शेतात ..केंद्राच्या परिसर अतिशय शांत ..निसर्गरम्य असा होता ..वीज व पाण्याची थोडी असुविधा होती ..कारण तेथे शेतात असलेली विजेचा ट्रान्स्फार्मर दर एक दोन महिन्यांनी नादुरुस्त होई ..किवा चोरीला जाई ..मग तो नवीन बसेपर्यंत अंधारात राहावे लागे ..शिवाय लोड शेडींग होतेच ..उन्हाळ्यात तर खूपच वांधे होत असत ..वर घातलेले टीनाचे पत्रे ..गरम होऊन आत मध्ये तापलेल्या भट्टीसारखे वातावरण निर्माण होई ..वीज असताना कुलर मदतीला असे ..मात्र वीज नसली की भट्टी ..पाण्यासाठी एक विहीर होती ..त्याचा जुना पंप जेव्हा नादुरुस्त होई ..तेव्हा त्याला सुरु करण्यासाठी खटाटोप करावा लागे ..नाहीतर मग बाद्ल्यांनी विहिरीतून पाणी काढून अंघोळ ..पिण्याचे पाणी ..वापरण्याचे पाणी वगैरे गरजा भागवल्या जात ..सेंटरच्या हॉल मध्ये एक संडास कम बाथरूम होते ..बहुधा तेथे कोणी जात नसत ..सकाळच्या वेळी बाजूच्या डोंगरावर उघड्यावर काम उरकले जाई ..विहिरीतून पंप सुरु करून पाण्याचा चार इंची फवारा बाहेरच्या अंगणात अंगावर घेवून एकत्रच अंघोळ ....तेथील आमचे जीवन ' सत्ते पे सत्ता ' मधील फार्म हाउस सारखे होते ..आम्ही सर्व बहुधा फक्त एखाद्या शाँर्टसवर वावरत असू ..निसर्गाच्या सानिध्यात ..मला सुरवातीला चार दिवस टर्की झाली ..नंतर मी देखील कामाला लागलो ..तेथे नियमित समूह उपचार ..योग्याभ्यास वगैरे घेणे सुरु केले ...रवी दिवसभर शहरातील कामे करत असे ..म्हणजे पालकांना त्याच्या घरी जाऊन भेटणे ..किराणा सामान ..भाजी वगैर खरेदी ..त्याच्या जवळ त्यावेळी सेलफोन नव्हता ..त्याच्या घरी असलेल्या फोन वरूनच सर्व कारभार चाले ..रात्री तो मुक्कामाला सेंटरला येई.. तो पर्यंत दिवसभर कारभार आम्ही सांभाळत असू ..अनेकदा रवीच्या सेंटर ते नागपूर अशा दोन तीन चकरा होत असत मोटार सायकलवर ..मनापासून कष्ट करत होता तो ..केंद्राच्या उभारणीसाठी ..तुटपुंज्या आर्थिक बळावर सुरु असलेले त्याचे प्रयत्न कौतुकास्पद होते ..त्याच्या जवळ त्यावेळी सेलफोन नव्हता ..त्याच्या घरी असलेल्या फोन वरूनच सर्व कारभार चाले ..

माझ्या ४९८ च्या केसची भावाने तीन महिन्यानंतरची तारीख घेतली होती ..तेव्हा मला नाशिकला जावे लागले असते ..हळू हळू मी नवीन ठिकाणी रुळत चाललो होतो ..नवीन वातावरणाशी जुळवून घेत होतो ..मनोरंजन म्हणून त्यावेळी तेथे ..कँरम बोर्ड .. एक रेडीओ उपलब्ध होता ...समोरच्या शेतात एक मोठे पिंपळाचे झाड होते ...त्याच्या सावलीत बसून निसर्ग निरखत राहायचे ..पहाटे क्षितिजावर हळू हळू पसरत जाणारी लाली ..' तेजोनिधी लोहगोल ' या गाण्याची आठवण करून देई ....सकाळ ..दुपार ..सायंकाळ ...रात्र ..निसर्गाच्या विविध छटा ..विविध रंग ..एप्रिल ...मे ...मधील रखरखीत उन ..रात्री २ पर्यंत असलेल्या झळा ..नंतर पहाटे एकदोन तास जाणवणारा सुखद गारवा ....तब्येत सुधारत चालली होती माझी ..एकदा आईचा रवीकडे फोन आला ..मे महिन्यात माझा भाचा आनंद याचे लग्न ठरले होते अकोल्याला ..तेथे लग्नाला नाशिकची सगळी मंडळी येणार होती ..मला नागपूरहून जायचे होते ..दोन दिवसांसाठी सर्वांची भेट होणार होती ..मुख्य म्हणजे भाच्याची होणारी पत्नी ही अनघाच्या दूरच्या नात्यात होती ..त्या निमित्ताने अनघा नक्की लग्नाला येईल अशी मला खात्री होती ..तिला नक्की भेटता येणार होते ..आईचा निरोप येताच मी स्वप्न रंजन करू लागलो ..सुमारे एक तपानंतर ...अनघाला पाहायला मिळाले असते ...जमले तर बोलता आले असते ..ती माझ्याशी बोलेल का ? सुरवात कशी होईल ? ..नाहीच बोलली तर ? वगैरे प्रश्न मनात होतेच .

( बाकी पुढील भागात )

===============================================================

दिल ढूंढता ....है फिर वोही ! ( पर्व दुसरे - भाग १३५ वा )

अकोल्याला लग्नात अनघा भेटेल या विचाराने मनाचा ताबा घेतल्यावर ..मन उलट सुलट विचार करू लागले ..तिला शेवटचे पाहून १२ वर्षे उलटून गेली होती ...तिचे लग्न झालेय ....नवरा छान सरकारी नोकरीत आहे वगैरे माहिती आधीच मिळाली होती ..एकंदरीत ती सुखात होती ...नंतर झालेली माझी वाताहत पाहता तिचे लग्न झाले हे बरेच झाले असे सर्वाना वाटत असेल ..त्यावेळी तिच्या कुटुंबीयांनी आम्हाला दूर करण्यासाठी घेतलेला कठोर निर्णय ..तिच्या भल्याचाच होता ..असे एकंदरीत चित्र तयार झाले होते ..पण जर तसे घडले नसते ..तर कदाचित मी लवकर सुधारलो असतो ..इतक्या टोकाला जावून व्यसने केली नसती ..असे मला वाटत असे ...शेवटी नियती की काय जे असते ते आडवे आलेच होते माझ्या मार्गात ....तुम्ही विश्वास ठेवा ..नका ठेवू ..टीका करा किवा समर्थन करा ..नियती तिचे काम करणारच ..तिचे तडाखे खावे लागणारच ...तिच्या प्रत्येक जण फेऱ्यात सापडणारच ..अशा वेळी मानव खरोखरच किती असहाय असतो हे मी अनुभवले होते ....जर कर्मे चांगली ठेवली तर नियती तिच्या मर्जीने हवी तशी ..हवी तेव्हा सूट देणार ...आहे तसा स्विकार करून पुढे हसतमुखाने पुढे चालत रहायचे ..किवा उभा जन्म रडत ....कुढत ..रहायाचे ही निवड मात्र आपल्या हाती असते...काही लोक ..निसर्गापुढे स्वतःच्या मर्यादा ओळखून ..सगळे स्वीकारून हसतमुखाने जगतात ..त्यांच्या व्यथा ..संकटे ..सारे पचवण्याची ताकद श्रद्धेच्या मार्गाने देवाकडून मिळवतात ...नाहीतर काही देवाला शिव्या घालत ... तिरस्काराची तिडीक मस्तकात घेवून तो तिरस्कारच जगण्याचा आधार बनवून जगात रहातात ..त्याच विखाराला जीवन उर्जा बनवून ..तुच्छतेने जगतात ..सगळ्यांकडे पाठ फिरवून अंगार वाटत फिरतात ...माझ्या सारखे व्यसनी ..एखाद्या व्यसनाला जीवनाचा आधार बनवून ..भ्रमात ..तात्पुरत्या धुंदीत ...रडत ..भेकत ..बंडखोरीचा झेंडा फडकावून ..स्वतःलाच जिंकण्याच्या कैफात ..स्वतःलाच नष्ट करत राहतात . 

अकोल्याला लग्नघरी पोचल्यावर मी शांत शांतच होतो ...नाशिकची सगळी मंडळी आलेली होती आधीच ..सुमित मला लगेच बिलगला ..सुमारे महिनाभरानंतर त्याला भेटत होतो...मानसीच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता ....धावपळीत कोणाशी काही बोलणे झाले नाही ..सायंकाळी सगळे कार्यालयात गेलो ..आज रात्री सीमंतीपूजन होते ...कार्यालयात महिलावर्ग नटूनथटून मिरवत होता ...तर पुरुषमंडळी कडेच्या ठेवणीतले कपडे घालून खुर्च्यांवर बसून सगळी गम्मत पाहत बसलेले ...मी उगाचच सारखा कार्यालयाच्या दारापाशी जावून बाहेर डोकावत होतो ..अजून अनघा आलेली नव्हती ..माझी घालमेल चाललेली ...अनघा दिसताच पुढे जावून तिच्याशी बोलावे का ? की नुसतेच स्मित करावे .. ओळखच देवू नये स्वतःहून ....मी समोर दिसल्यावर नेमक्या काय प्रतिक्रिया असतील तिच्या ..या बाबत मन साशंक होते ....आधार म्हणून सुमितला कडेवर घेतले होते ...अशा वेळी एखादा मित्र जवळ असला की बरे असते ..त्याच्याशी काहीतरी बोलून..स्वतःला धीर देता येतो ..सुमितला कडेवर घेतल्यामुळे का कोणजाणे मला थोडे सुरक्षित वाटत होते ..असाच अर्धातास गेला ..बाहेर अंधारून आले होते ..पूजेचे विधी सुरु झाले ..आता अनघा आज तरी येत नाही ..असे वाटून निराशेने कार्यालयाबाहेर चक्कर मारून यावे म्हणून निघालो ..गेट जवळच अनघाची आई दिसली ..तिच्या मागे अनघा ....छान भरजरी साडी नेसून ....गळ्यात दागिने घालून ..त्यांच्या मागे एक साधारण १० वर्षांची मुलगी ..अगदी सेम अनघासारखी दिसणारी..तसेच डोळे ..तशीच गोरी ..हे सगळे एकदम अचानक समोर दिसल्यावर ..मी गडबडलो ..घाईने पुढे निघून गेलो ...चक्क मी त्यांच्या नजरेला नजर देणे टाळले होते ..अनघाची आई दिसताच ..माझा आत्मविश्वास पळाला होता...नंतर अनघा दिसताच शरीराला कंप सुटला होता ..मनात योजलेले सगळे विसरून गेलो ...सुमितला घेवून तसाच पुढे गेलो ... रस्त्यावर एक चक्कर मारली ..छाती खूप धडधडत होती ..खूप धीट ..वगैरे असणारा मी गोंधळलो होतो ..चक्क घाबरल्या सारखे झाले होते ..इतक्या वर्षांनी अनघा दिसली होती ..तशीच तजेलदार ...प्रसन्न ..काळजात घालमेल होणे म्हणजे काय ते अनुभवत होतो .

सीमंती पूजनात सुरु असताना .. बायकांच्या गर्दीत सारखा अनघाकडे नजर लावून होतो ..तिने ..तिच्या आईने ..मला महिले होते हा नक्की ...मात्र त्यांनी काहीच प्रतिक्रिया दाखवल्या नव्हत्या चेहऱ्यावर ..निर्विकारपणे पुढे निघून गेल्या होत्या ...कदाचित मी त्यांच्यासमोर अनपेक्षितपणे गेल्याने ...मेंदूकडून काही सूचना येवून प्रतिक्रिया देण्याचा आतच मी पुढे निघून गेलो होतो ..अनघा आत हॉल मध्ये स्थिरावल्यावर ..गर्दीत मला शोधेल अशी मला आशा वाटत होती ..म्हणून तिला मी पटकन दिसावा अशा जागी बसलो होतो ...तिची नजर पकडण्याच्या टप्प्यावर ..मात्र तसे काही वाटले नाही ..ती सहजपणे सर्व स्त्रियांच्यात मिसळली होती ..गप्पा ..हसणे सुरु होते ..मी तिला निवांत निरखत होतो ..लग्नानंतरही फारसा बदल झालेला नव्हता तिच्या शरीरयष्टीत ..तशीच दिसत होती ..चेहऱ्या वरचे तेज वाढलेलेच वाटले ...सेम तिच्यासारखी दिसणारी तिची मुलगी ..समवयस्क मुलींबरोबर खेळण्यात दंग झालेली ...मानसी आणि अनघा त्या बसलेल्या स्त्रियांच्या गर्दीत एकमेकींपासून अवघ्या १० फुट अंतरावर होत्या ..मानसी अधून मधून सुमित माझ्याकडेवर शांत बसलेला आहे ना याची खात्री करून घेत होती..अनघाला आणि मला ओळखणारा भाच्याचा एक मित्र माझ्याजवळ येवून बसला ..त्याने माझ्या मनात काय चालले आहे हे ओळखले असावे ..' मामू ..काय गडबड है ? ' असे म्हणत माझ्याशी त्याने हात मिळवला ..मी उसने अवसान आणून हसलो ..डोळे सतत अनघाकडे लागलेले ..ती मात्र अनभिज्ञ असल्यासारखी ...सहजसुंदर !सुमारे दीड तासात एकदाही तिने माझ्याकडे पहिले नव्हते ..इतकी सहजपणे कशी वागू शकते ही ..याचे आश्चर्य वाटले मनात ..मला पाहून काहीच घालमेल झाली नसावी का हिची ? ..की स्त्रिया असे मनातले भाव सहजासहजी लपवण्यात जास्ती वाकबगार असतात ? ..कदाचित आता आपण विवाहित आहोत ..हे भान अनघाला सोडता येत नव्हते ..कदाचित तुषारकडे बघितले ..नजरानजर झाली तर ..स्वतःला सावरणे कठीण जाईन हे तिला माहित होते ..किवा आता मी तिच्या साठी चक्क परका झालो होतो !

( बाकी पुढील भागात )

मंगलवार, 7 जनवरी 2014

रेड अलर्ट ...!


रेड अलर्ट ...! ( पर्व दुसरे -भाग १२६ वा )


दुसर्यांदा पार्टी लागली नाही म्हणून माझा जेलमधील मुक्काम अजून पंधरा दिवसांनी वाढला होता ...एव्हाना माझी दाढी भरपूर वाढली होती ..एकदा सकाळी उन्हात बसलेला असताना एक वार्डन जवळ आला ..म्हणाला ' चलो ..उधार बार्बर आया है ..दाढी कटवा लो अपनी ' दाढी न काढण्याचे काहीही कारण नव्हते ..तसेच वाढवण्याचे देखील काहीच कारण नव्हते ..मात्र का कोणजाणे दाढी काढू नये असे वाटत होते ..त्या वार्डनला नंतर येतो सांगितले ..तर त्याने हात धरूनच मला बराकीच्या मागच्या बाजूला नेले ..तेथे रांगेत अनेक कैदी उभे ..दोन वार्डनच्याच वेशातील माणसे ..रांगेत उभ्या असलेल्या कैद्यांना हातातील दाढीच्या ब्रशने साबू लावत होते ..तर एक जण हातात वस्तरा घेवून तोंडावर साबू लावलेल्या एकेका कैद्याची पटापट दाढी करत होता ..ते काम इतके झटपट चालले होते की मला खरोकर आश्चर्य वाटले ...माझ्या तोंडाला साबू लावायला एक वार्डन आला ....मी उगाच नकार देण्यास काहीतरी कारण म्हणून सांगितले ' मेरेको तिरुपती जाना है ..वहापर दाढी उतारुंगा ..आधी तो रागावून काहीतरी ओरडणार होता ..पण तिरुपतीचे नाव ऐकल्यावर चूप बसला ..' सच्ची ' ? खात्री करून घेण्यासाठी त्याने विचारले ..त्यावर मी गळ्याला हात लावला ..त्याने ताबडतोब मला रांगेतून बाजूला जायला सांगितले ..चला ..सुटलो होतो दाढी करण्यातून ..गम्मत वाटली ती त्याच्या श्रद्धेची ...तिरुपतीचे नाव घेतल्यावर त्याने सहजपणे माझ्यावर विश्वास ठेवला होता ..जेलमध्ये बहुतेक कैदी अतिशय श्रद्धाळू होते ....तसेच सर्वधर्म समभाव बाळगणारे श्रद्धाळू ...अजमेरचे ' ख्वाजा गरीब नवाज ' आणि शिर्डीचे ' साईबाबा ' ही प्रमुख दैवते..त्याशिवाय ..हाजी मलंग ..सैलानी बाबा ..गजानन महाराज ..बालाजी ..वगैरे दैवते होतीच ...या सर्वांची श्रद्धा कदाचित अपराधीपणाच्या भावनेतून निर्माण झाली असावी असे वाटले ...बाहेरच्या जगात पोट भरण्यासाठी किवां उदरनिर्वाहासाठी चोऱ्या ..गुन्हेगारी ..दरोडे ..लुटमार ..असे प्रकार करणे ..मग मनाची बोच कमी करण्यासाठी एखाद्या दैवताचा आधार घेणे अशी श्रद्धा वाटली ...जितक्या भाविकपणे हे कैदी भजनात सामील होत असत तितक्याच निर्दयपणे कदाचित गुन्हे करीत असावेत ...कदाचित त्यांच्या मनात जिवंत असलेली श्रद्धाच कधीकाळी त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त देखील करेल असे वाटले ... श्रद्धेचे बीज फक्त रुजण्याची गरज असते ...भले ती श्रद्धा नैतिकतेची असो ..एखाद्या देवा धर्माची असो ..अथवा एखाद्या सदूविचारावरची असो असो ...पुढे कालांतराने नक्की सन्मार्ग मिळणार ..मात्र जर ती श्रद्धा अहंकार ..पैसा ..स्वार्थ ..सत्ता ..अशी स्वकेंद्रित असेल तर पुढे त्याचीही कटू फळे मिळणार !

एकदा दुपारी आमच्या बराकीत संडास धुण्यास येणारा एक कैदी ..माझ्याकडे माचीस मागायला आला ..त्याला माचीस दिली ..तो माझ्या शेजारीच बसला ..निवांत बिडी पेटवली त्याने ..सहज कुतूहल म्हणून मी त्याची चौकशी करू लागलो ...रेल्वे गाडीत चोऱ्या करणारा होता ...एक वर्षाची शिक्षा झालेली ..म्हणाला बस अब सिर्फ दो महिने बाकी है मेरे छुटने को ..ये कुंडी काम करके सजा मे एक महिने की मोह्लात मिल गई ..ही माहिती मला नवीन होती ..म्हणजे येथेही संडास धुण्याचे काम हलक्या दर्जाचे समजले जात होते ..बहुधा कोणी कैदी हे काम करण्यास तयार नसत ..त्या ऐवजी ..टेलरकाम ..विणकाम ..शेती ..सुतारकाम ..वगैरे कामांना पसंती होती ..म्हणून जे कैदी संडास धुण्याचे काम करतील त्यांना त्यांच्या शिक्षेत ठराविक दिवसांची सूट दिली जाई ..तसेच जेलमध्ये रक्तदान शिबिरात भाग घेणाऱ्या कैद्यांना देखील पंधरा दिवसाची सुट मिळे शिक्षेत ..त्याच प्रमाणे चांगली वागणूक ..पंधरा ऑगस्ट ..२६ जानेवारी या निमिताने देखील शिक्षेत काही दिवस सूट दिली जाई ..एकाने सांगितले की विपश्यना शिबिरात सामील होणार्या कैद्यांना सुद्धा जेव्हा शिक्षेत सूट मिळेल असे आमिष दाखवले तेव्हा विपश्यना शिबिरात गर्दी वाढली ..जेलबाबतच्या माझ्या सामान्य ज्ञानात चांगलीच भर टाकली त्या कुंडी काम करणा-याने . ( जेलमध्ये संडास धुण्याच्या कामाला कुंडीकाम म्हणतात ) पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कैद्याला सक्तीने लाल रंगाची टोपी घालायला लावतात ..सर्व त्याला ' लालटोपी ' या नावानेच हाक मारतात ..वैगरे बरीच बडबड करत होता तो कैदी ...जाताना तो मी त्याच्याशी आपुलकीने बोललो म्हणून मला दोन बिड्या देखील देवून गेला .

आता जेलमध्ये मला चाळीस दिवस झाले होते येवून ..घरी काय चालले आहे याबद्दल काहीच बातमी नव्हती ..तसेच पुढे काय ? हा प्रश्न होताच ..माझ्या विचार करण्यावर काहीच अवलंबून नव्हते ..सर्व सूत्र परिस्थितीच्या हाती गेलेली ..मुकाटपणे सामोरे जाण्यास भाग पडले होते ....असाच काहीबाही विचार करत ..पश्चाताप करत ..थंडीत कुडकुडत पोटाशी पाय घेवून झोपलो असताना ..अचानक जेलचा मोठा भोंगा वाजू लागला ..तो आवाज एकताच सगळे कैदी धडपडून उठले ..अनुभवी कैदी ..पटकन एकाचा हात धरून गिनती करण्याच्या वेळे सारखे खाली जोडीने खाली बसले ..मी देखील एकाचा हात धरून खाली बसलो ..कोणीतरी पळाले असावे ..पळण्याचा प्रयत्न केला असावा ..अथवा कोणत्यातरी बराकीत मारामारी झाली असावी ..असा अंदाज व्यक्त केला जात होता ..हा मोठा भोंगा वाजला की ' रेडअँलर्ट 'मानला जाई ..अश्या वेळी सर्व बाराकीतील कैद्यांनी एकाचा हात धरून रांगेने बसायचे असते ..नाहीतर वार्डन बेफामपणे सपासप काठ्या चालवतात कैद्यांवर ..सुमारे पाच मिनिटे भोंगा वाजत होता ...मग आमच्या बराकीत चार शिपाई आले ..त्यांनी सगळे कैदी मोजले ..समाधान झाल्यावर ते निघून गेले ....तोपर्यंत सगळे कैदी जीव मुठीत धरून बसलेले ..एकंदरीत ' रेडअँलर्ट ' बाबत बरीच दशहत आहे हे जाणवले ..दुसऱ्या दिवशी सकाळी समजले की एका कैद्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता ..त्याला लगेच पकडले गेले ..आता तो ' लालटोपी ' म्हणवणार होता .

( बाकी पुढील भागात )

======================================================================

श्री ४२० ! ( पर्व दुसरे - भाग १२७ वा )


मला पक्के आठवतेय २३ डिसेंबर तारीख होती ..दुस-या दिवशी म्हणजे २४ डिसेंबरला मला कोर्टात नेले जाणार होते ..उद्या जर पार्टी लागली तर कसेही करून सुटका करून घ्यायची असे ठरवत होतो ...सकाळचे जेवण करून बराकीत बसलो असताना ..बाजूच्या सर्कल मधून एक वार्डन मला बोलवायला आला ..म्हणाला हमारे बराकमे आपको बुलाया है ..मला कशासाठी ते समजेना ..मग म्हणाला ..तू बहोत अच्छा गाना गाता है इसलिये बुलाया है ..मी काहीतरी कारण सांगून टाळणार होतो ..पण आमच्या बराकीचा वार्डन पण मागे लागला जावून ये म्हणून ...मग निघालो त्या वार्डन सोबत ..मला खास गाणी म्हणण्यासाठी बोलावणारी मंडळी कोण आहे हे पाहण्याचे कुतूहल होतेच ..बहुतेक चांगली रंगदार पार्टी असणार कारण आमच्या बराकीचा वार्डन देखील खूप आग्रह करत होता ....आमच्या सर्कलच्या बाजूच्याच सर्कल मध्ये मला नेले गेले ..येथे तीन बराकी होत्या ..दुपारची बंदी झालेली होती तरीही ..या सर्कल मध्ये अजून कैदी बाहेरच होते ..मस्त निवांत ..दोन तीन निग्रो कैदी देखील दिसले ..हे निग्रो बहुधा मादक द्रव्यांच्या तस्करीत पकडले गेले असावेत ..त्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था भारतीय कैद्यांपेक्षा जरा वेगळी असते किवा अधिक चांगली असते ..म्हणजे हे सर्कल स्पेशल व्यक्तींचे होते असे वाटले ..एका बराकीत आम्ही गेलो ..तेथे जाताच माझ्या भोवती चारपाच जण जमले ..मला नाव वगैरे विचारले ...त्यांच्यातील एक जण म्हणाला रोज रातको बाजुके सर्कलमेसे अच्छे गाने की आवाज आती है ..तो हमने पूछकर जानकारी ली और तेरेको यहां बुलाया ...मग एकाने मला बिस्किटाचा पुडा खायला दिला ..कोणती केस वगैरे विचारले ...जामीन करायचा असेल तर सांग असेही म्हणाला ..हे सगळे कैदी एकदम झकपक कपड्यात होते ..काहींच्या अंगाला तर परफ्युमचा देखील वास होता .येथे गाद्या देखील होत्या झोपण्यासाठी ...बराकीत एका कोपऱ्यात कँरम उभा करून ठेवलेला ..दोन जण बुद्धिबळाचा डाव मांडून बसलेले दिसले ..एकंदरीत सगळे हाय -फाय काम होते तर ..

त्या लोकांनी मला पाच सहा गाणी म्हणायला लावली ....एकाने चलो खाना खायेंगे असेल म्हणताच सगळे जेवायला बसले ...मोठे मोठे टिफिन उघडले गेले ..त्यात मटण..पुलाव ..असे मस्त जेवण ...मलाही जेवायचा आग्रह झाला ..माझे जेवण झाले असल्याने मी नकार दिला ...तो पर्यंत पर्यंत दुपारचे दोन वाजत आलेले ..त्यांचे जेवण आटोपल्यानंतर ..पुन्हा एक दोन गाणी म्हंटली मी ..मला दोन बिडी बंडल ..बिस्किटांचा एक पुडा देवून त्यांनी निरोप दिला ..म्हणाले २५ तारीख को नाताल है ..उस दिन यहां आनां...मस्त पार्टी करेंगे रातको ..हम तेरे वार्डनको बोलते है ..तू चाहे तो तेरी ट्रान्स्फर कर लेंगे इस बराक मे ..मी नुसतीच होकारार्थी मन हलवत निघालो ..माझ्या बराकीत आल्यावर ..आमच्या वार्डनने आदबीने मला स्वतःजवळ बसवून ..तेथे काय काय केले याची चौकशी केली ..म्हणाला वो तेरेको जामीन भी दिलवा सकते है ..हे लोक नेमके कोण आहेत ? ..कोणत्या गुन्ह्यात जेलमध्ये आहेत असे वार्डनला विचारल्यावर म्हणाला चारसोबीस है सब ..मग त्याने सांगितले की जेलमध्ये सगळ्यात जास्त वट असते ती भाई लोकांची ..नंतर नंबर लागतो तो या चारसोबीस लोकांचा ..आणि सगळ्यात शेवटी किवा खालचा दर्जा म्हणजे इतर गुन्हेगार ..मला आश्चर्य वाटले ..चारसोबीस म्हणजे ..खोटे चेक देणारे ..मोठ्या रकमेचा अपहर करणारे ..पतसंस्था काढून असंख्य सभासदाचे पैसे हडप करणारे ..सहकारी बँकां बुडवणारे .. करणारे वगैरे आर्थिक गुन्हे केलेली मंडळी होती ती ...सध्या असे फसवणूक करणारे लोक वाढत चालले आहेत ..जास्त व्याजाचे आमिष दाखवून पतसंस्थेत भरपूर सभासद जमवायचे आणि नंतर एकदोन वर्षात सगळा कारभार गुंडाळून पोबारा करायचा किवा पतसंस्था बुडीत ..कर्जबाजारी ....दिवाळखोर जाहीर करून पैसे हडप करायचे ...जर पकडले गेलेच तर पैश्यांच्या जोरावर जेलमध्येही राजेशाही थाटात राहायचे ..कायद्याच्या पळवाटा शोधून सहीसलामत सुटायचे किवा अगदी नगण्य अशी शिक्षा भोगायची ..यांना जरी पोलिसांनी पकडले ..केस केली ..शिक्षा झाली ..तरी देखील त्यांनी ज्या सभासदांचे पैसे खाल्ले असतील किवा बुडवले असतील त्यांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्याची कोणतीच सोय नाही कायद्यात ..खरे तर हे गोड बोलून गळा कापणारे गुन्हेगार जास्त नालायक असतात ..चोरी ..दरोडे ..वगैरे घालणारी मंडळी तरी ओळखीच्या लोकांकडे चोरी करत नाहीत किवा.. राजरोस चोऱ्या करत नाहीत ..ही मंडळी मात्र राजरोस गोड बोलून ..भूलथापा देवून ..समाजात प्रतिष्ठीत म्हणून वावरत असताना प्रचंड रकमेचे आर्थिक घोटाळे करतात ..पैसा दाबून ठेवतात ....सर्वसामान्य मंडळीनी कष्टाची पै पै जमवून साठवलेली आयुष्यभराची पुंजी साफ करतात ..माझ्या माहितीत एक प्रकरण असे होते ..ज्याने मुलींच्या लग्नासाठी ...असेच जास्त व्याज मिळेल या आशेने एका पतसंस्थेत सेवानिवृत्तीचा मिळालेला सगळा पैसा गुंतवला होता ..ती पतसंस्था बुडाली ..सगळे पैसे गेले बिचारयाचे ..त्याने शेवटी आत्महत्या केली होती ..

त्या चारसोबीस लोकांनी जरी मला खूप चांगले वागवले होते ...बिड्या बिस्किटे दिली होती ..तरीही २५ तारखेला त्यांच्या बराकीत जावू नये असे वाटत होते ...आमच्या बराकीचा वार्डन मात्र आग्रह करत म्हणाला अगर तू २५ को वहा नाही जायेगा तो वो लोग मेरेको गुस्सा करेंगे ..म्हणजे पैश्यांच्या जोरावर त्यांनी येथल्या वार्डनवर देखील वचक ठेवलेला होता ..दुसऱ्या दिवशी कोर्टात जायला म्हणून लाल गेट जवळ बसलो होतो आम्ही रांगेत ..त्याच वेळी खबर आली की आज पार्टी लागली आहे ..कोर्टात हजर होता येईल ..एका मोठ्या निळ्या गाडीत बसवून आम्हाला सगळ्याने बंदोबस्तात कोर्टात आणले गेले ..आमच्या हातात दोन दोन कैदी मिळून बेड्या अडकवल्या होत्या ..कोर्टाच्या आवारात गाडी थांबल्यावर ..जेव्हा खाली उतरवण्यात आले तेव्हा ..कोणी ओळखीचे आपल्याला अशी बेडी लावलेल्या अवस्थेत पाहिलं की काय याची भीती वाटत होती ..!

( बाकी पुढील भागात )

===================================================================

पर्सनल बाँड ! ( पर्व दुसरे -भाग १२८ वा )

गाडीत पार्टी म्हणून आमच्यासोबत एकूण सहा शिपाई होते ..दहा कैद्यांना कोर्टात न्यायची ..केस असेल त्या कोर्टात न्यायमुर्तींसमोर त्यांना सादर करायची ..पुन्हा सुरक्षित जेलमध्ये पोचवायची या सहा शिपायांची जवाबदारी होती ..सगळ्याच गुन्हेगारांना एकाच न्यायधीशा समोर न्यायचे नव्हते ..जशी केस असेल त्या प्रमाणे एकाच आवारात वेगवेगळ्या ठिकाणी जायचे होते ..त्याप्रमाणे त्याशिपायांनी आधी चार कैद्यांना गाडीतून खाली उतरवले ..त्यांच्या हाताला जाड दोऱ्या बांधून त्यांना चार शिपायांनी कोर्टात नेले ..तो पर्यंत आम्हाला सहा जणांना गाडीतच ठेवले गेले ..आमच्या प्रत्येकाच्या हाताला बेडी अडकवून ती बेडी गाडीच्या खिडकीच्या गजांना लावली गेली ..बेडी अडकवताना शिपाई जरा निष्काळजीच वाटले कारण त्यांनी आमच्या हातात असलेली बेडी मनगटावर नीट चपखल बसली आहे किवा नाही याची काळजी घेतली नाही ..मी आणि दुसरा एक कैदी यांची मनगटाची बेडी जरा ढिली होती ..त्या कैद्याने हळूच बेडीतून हात बाहेर काढून मला दाखवला ..मी प्रयत्न केला तर माझाही हात बेडीतून सहज बाहेर निघाला ..आम्ही दोघेही खूप हसलो ..अर्थात गाडीच्या खाली दोन शिपाई आमच्या पहाऱ्यावर उभे होते ..बेडीतून असा तळहातच्या अलगद बाहेर निघू शकतो याची मला गम्मतच वाटली ..क्षणभर आपण पळून जावू शकतो हा विचारही मनात आला ..परंतु जेलमध्ये आता पन्नास दिवस राहिलोच होतो ..कदाचित आज माझी सुटका होऊ शकली असती ..अश्या वेळी पळून जाण्याचा मूर्खपणा खूपच अंगाशी आला असता ... पळून मला घरीही जाता आले नसते ... बाहेरही सतत पोलिसांचा ससेमिरा पाठीशी लागला असता ..गाडीजवळ बघ्यांची गर्दी झाली ..अनेकांना जेलमधील कैदी कसे असतात हे पाहण्याचे कुतूहल ...बरेच लोक आमच्या गाडीपाशी गोळा झालेले ..त्यात एकदोन कैद्यांचे नातलगदेखील होते ..ज्यांना आज आपल्या माणसाला कोर्टात आणणार आहेत हे माहित होते असे नातलग ..खिडकीशी उभे राहून आतील कैद्याशी बोलू लागले ..तसे गाडीबाहेर उभ्या असलेल्या पोलिसांनी त्यांना हाकलले ..जरा वेळाने ते नातलग परत आले खिडकीशी ..निर्धास्तपणे बोलू लागले .बहुतेक बाहेरच्या पोलिसांशी सेटिंग झाले असावे ..सुमारे तासभर गाडीतच बसून होतो ...आधी नेलेले कैदी परत आणल्या गेल्यावर मग माझा आणि एकाचा नंबर लागला ...!

कोर्टात काय बोलायचे हे मी ठरवून टाकले होते ..सगळे खरे खरे सांगायचे ..मी पत्नीला मारहाण वगैरे करत नव्हतो ..ना तिच्याकडे माहेरहून पैसे आण असा तगादा लावत होतो . ..मात्र माझ्या व्यसनामुळे घरातील सगळ्याच मंडळीना माझा त्रास होत होता ..विशेषतः आईकडून पैसे उकळत होतो ...मग तिने कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला वगैरे ...मला एका महिला न्यायमूर्तीसमोर उभे करण्यात आले..मागच्या वेळी बहुधा यांच्याच समोर मला उभे केले गेले होते . .. समोरचे पेपर्स चाळून त्यांनी माझ्याकडे पाहत विचारले ..पत्नीला का मारहाण करतोस ? ..मँडम आपल्या सगळ्या प्रश्नांची मी खरी खरी उत्तरे देतो ..फक्त त्यापूर्वी मला काही सांगायची परवानगी मिळावी असे नम्रपणे म्हणालो ..त्यावर त्यांनी सांग असा हाताने इशारा केला ..मी पटापट बोलू लागलो ..अस्खलीत मराठीत ..माझा व्यसनाचा इतिहास सांगितला ..उपचार घेवूनही वारंवार व्यसन कसे सुरु होत गेले ते सांगितले ..कुटुंबियांना त्याचा कसा त्रास होत होता हे नमूद केले .. म्हणालो ..माझ्या व्यसनाला कंटाळून शेवटी कुटुंबीयांनी असे पाउल उचलले आहे ..मात्र माझ्यावर केलेली केस खोटी आहे ..बहुतेक कसेही करून मला जेलमध्ये पाठवण्यासाठी कुटुंबियांना खोटी केस करावी लागली आहे ..कारण नुसता व्यसन करून त्रास देतो या सबबीवर मला जेलमध्ये पाठवता आले नसते ..त्यासाठी पत्नीला मारहाण ..तिच्याकडे पैसे आण म्हणून तगादा ..वगैरे गोष्टी खोट्या सांगाव्या लागल्या कुटुंबियांना ...माझे बोलणे मँडम लक्षपूर्वक ऐकत होत्या ..माझ्या बोलण्याची छाप त्यांच्यावर पडत होती हे त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवत होते ..त्यांनी पुन्हा समोरच्या कागदपत्रांवर नजर टाकली..म्हणाल्या ..बरोबर आहे तू म्हणतोस ते ..कारण ४९८ केस बहुधा एकट्या पतीवर लावली जात नाही ..तर पती .त्याचे कुटुंबीय वगैरे सर्वाना त्यात आरोपी केलेले असते ..येथे मात्र फक्त तू एकटा आरोपी आहेस ..तुझ्या कुटुंबीयांबद्दल ..म्हणजे तुझी आई ..भाऊ वगैरेंबद्दल तुझ्या पत्नीची काहीही तक्रार नाहीय ..उलट तू मारहाण करतोस याचे साक्षीदार म्हणून तुझ्या भावाची सही आहे .. सगळे कुटुंबीय ..तुझी पत्नी विरुद्ध तू अशी केस दिसतेय ...मग पुढे म्हणाल्या ..बरेच दिवस तू जेलमध्ये राहिला आहेस ..तू जामीन घेतला नाहीस का ? .यावर मी क्षीण हसलो ..मँडम कुटुंबियांनीच केस केलेली आहे ..कोण जामीन करणार मला ? ...त्या म्हणाल्या ..तुझे मित्र वगैरे आले नाहीत का जामीन करायला ...हा प्रश्न अतिशय बालिश वाटला मला ..व्यसनीचे मित्रही सगळे त्याच्यासारखेच व्यसनी असतात ..ते त्यांच्या व्यसनाला वैतागलेले असतात ..ते कुठून जामीन देणार ? ..मी असे म्हणताच ..त्या मोकळेपणी हसल्या ..म्हणाल्या बोलतोस तर खूप हुशारीने ..मग व्यसन करू नये ही साधी गोष्ट कशी समजत नाही तुला ? यावर मी नुसतीच मान खाली घातली ..पुढे त्या म्हणाल्या तू जर पुन्हा असे वागणार नाही असे कबुल करत असशील तर मी तुला पर्सनल बाँडवर सोडू शकते ..मात्र नंतर तुला एका आठवड्यात जामीन आणावा लागेल ..मी चालेल अशी मान हलवली ..नंतर काय झाले कोण जाणे ..त्या म्हणाल्या ...आता नको ..मी पुढच्या तारखेला तुला सोडते पर्सनल बाँडवर ..असे म्हणत त्यांनी मला जायला सांगितले ..माझ्या मागे उभ्या असलेल्या शिपायाने पुन्हा माझा हात धरला ..आम्ही बाहेर पडलो ..मी सगळी हुशारी पणाला लावून खरे तेच सांगितले होते ..माझ्या बोलण्याची छाप पडलीही होती मँडमवर ...मात्र अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी आपला निर्णय बदलला होता मला पर्सनल बाँडवर सोडण्याचा ..पुढच्या वेळी सोडते असे सांगून माझी बोळवण केली होती ....म्हणजे अजून पंधरा दिवस जेलमध्ये काढावे लागणार होते ..आणि पुढच्या वेळी पार्टी लागली नाही तर जास्ती दिवसही रहावे लागले असते .

जड पावले आणि निराश अंत:करणाने पुन्हा गाडीजवळ परतलो ..गाडीत बसलो ..अजून दोन कैदी कोर्टात न्यायचे बाकी होते ..उदास चेहऱ्याने बसून राहिलो ..तितक्यात खिडकीच्या बाहेरून आवाज आला ' तुषार सर ...ओ तुषार सर ...' मला कोणीतरी हाक मारत होते ..मी खिडकीच्या बाहेर पहिले तर माझा गर्दुल्ला मित्र मकसूद होता ..हा बागवानपुरा येथे रहाणारा ..त्याला पूर्वी मी मुक्तांगणला दाखल होण्यासाठी मदत केली होती ..तसेच रानडे साहेबांनी जमवलेल्या निधीतून उपचारखर्चासाठी काही पैसेही मिळवून दिले होते ..त्यानंतर माझी रीलँप्स झाल्यावर ..त्याच्या सोबत अनेक वेळा ब्राऊन शुगर देखील ओढली होती मी ...तरीही पूर्वीच्या आदराने तो मला ' सर ' असेच संबोधत असे ..मकसूद अतिशय चांगले मराठी बोलणारा ..त्याचे वडील पूर्वी कोर्टातच नोकरीला होते ..वडील रिटायर झाल्यावर हा ब्राऊन शुगरचे व्यसन भागवण्यासाठी कोर्टातच ..आरोपींना वकील मिळवून देणे ..कोणाचे काही अँग्रीमेंटचे काम असेल तर त्यासाठी त्याला मदत करणे ...वगैरे कामे करून व्यसनासाठी पैसे मिळवीत असे ...थोडक्यात एजंट म्हणून तो कोर्टात कामे करीत असे ..त्यातून त्याचे व्यसन भागवण्यासाठी पैसे मिळत होते ..चोरी ..लबाड्या यापासून तो दूरच राहत होता ..कोर्टाच्या आवारात रेंगाळताना त्याने मला पोलिसांनी आणून गाडीत बसवताना पहिले होते .. मग खिडकीशी आला होता ..मी त्याला खिडकीतूनच थोडक्यात सगळे सांगितले ..त्यावर तो म्हणाला ' सर तुम्हाला जामीन हवाय का ? ' मी उत्तरलो ' अरे मकसूद पण कोण देणार मला जामीन ? माझ्याकडे पैसेही नाहीत वकिलाला द्यायला ..' यावर म्हणाला ' पैसे कोण मागतोय तुमच्याकडे ..तुम्ही फक्त सांगा जामीन घ्यायचा असेल तर ..मी करतो वकिलाचा बंदोबस्त ' ही चांगली संधी चालून आली होती ..चालेल असे म्हणालो ..' मी आलोच पाच मिनिटात ' असे म्हणून मकसूद निघून गेला !

( बाकी पुढील भागात )

=======================================================================

जेलमधून घरी ! ( पर्व दुसरे - भाग १२९ वा )

पाच मिनिटात आलो असे सांगून गेलेला मकसूद खरोखरच पाच मिनिटात आला ..त्याच्या सोबत एक काळा कोट घातलेला तरुण वकील होता ..मकसूदने त्याची ओळख करून दिली ..' हे शेख साहेब ..वकील आहेत ..सर तुमचे काम करण्यास तयार आहेत हे ' ..मग माझी ओळख त्या वकिलाला करून देताना म्हणाला .. ' ये हमारे तुषार सर ..नशमुक्ती का काम करते थे ..जरा फँमिली मँटरमे फंसे है जेलमें.... ' .....' अभी क्या बोली मँडम आपको ? ' त्या वकिलाने एकदम विषयालाच हात घातला ...मी त्यांना पर्सनल बॉंड बद्दल न्यायमूर्ती मँडम जे म्हणाल्या ते सांगितले ...आम्ही येतो मँडमकडे जाऊन असे म्हणत तो दोघेही कोर्टात गेले .....सुमारे दहा मिनिटे मी अधिरतेने वाट पाहत होतो ...शेवटी ते दोघे हसतमुखाने परत आले ..म्हणाले ' आप को फिरसे बुलाया है मँडमने ' ..शेख साहेबांनी माझ्या सोबत पहाऱ्यावर असलेल्या शिपायाला एका कागदावर लिहून आणलेले काहीतरी दाखवले ...मला गाडीखाली उतरवून पुन्हा कोर्टात उभे केले गेले ..या वेळी मँडम माझ्याकडे प्रसन्न मुद्रेने पाहत होत्या ..म्हणाल्या ' आधीच का वकील दिला नाही ? ' त्यावर मी क्षीण हसून म्हणालो ..' मँडम हे सगळे अचानक घडले ..मला वकील मिळेल अशी आशा नव्हती ..माझा मित्र अचानक भेटला ..त्यामुळे सगळे जमून आलेय ..' समोरच्या कागदावर काहीतरी खरडले त्यांनी ...' हे पहा ..वकील आहेत आता तुझ्याकडे ..तरीही मी तुला आता जामीन न करता ..पर्सनल बाँड वर सोडतेय ..म्हणजे तू आठ दिवसात पुन्हा कोर्टात हजर राहून जामीन घेवून यायचा आहेस ....त्याकाळात तू चांगल्या वर्तवणूकीची हमी म्हणून इथे सही कर ..या आठ दिवसात जर तू घरी काही भांडण किवा गडबड केलीस..कुटुंबियांकडून तशी तक्रार आली ..तर तुला पुन्हा जेलमध्ये डांबण्यात येईल ..आणि त्यावेळी अजिबात जामीन देखील देणार नाही मी ' .....मँडमने मला दम दिला ..मी आनंदाने मान हलवली ...शिपायाने पुढे केलेल्या कागदावर सही केली ...' जा आता ...पुन्हा व्यसने करू नकोस ' असे म्हणत मँडमने मला निरोप दिला ...हसतमुखाने मी शिपायासोबत बाहेर पडलो ...' या मँडम खूप कडक आहेत ..पण तू मात्र गुंडाळलेस त्यांना बरोबर ' ..असे म्हणत शिपायाने माझ्या पाठीवर थाप मारली ..त्याला काय माहित की हा सगळे खरे खरे सांगितल्याचा महिमा होता ..तुम्ही जेव्हा जे काही असेल ते अगदी खरे खरे बोलता ..तेव्हा तुमच्या सोबत तुमची आत्मिक शक्ती असते ...ही आत्मिक शक्ती तुमच्या शरीर भाषेतून प्रकटते ..त्या लहरींचा परिणाम नक्कीच समोरच्या व्यक्तीवर होतो ..पुढे होणाऱ्या परिणामांची तमा न बाळगता खरे बोलणे केव्हाही चांगले ...' सत्य ' या शक्तीची ताकद अतुलनीय असते ...माणसे उगाचच खोटे बोलून स्वतःमधील ही शक्ती क्षीण करतात .

बाहेर पडल्यावर मकसूद म्हणाला ..' सर आता जेलमध्ये गेल्यावर पटापट तयारी करून ..तुमचे सामान नीट घेवून ..लाल गेटजवळ या ..आता साडेचार वाजले आहेत ...सहाच्या आत तुम्ही गेटच्या बाहेर पडू शकाल ..उशीर झाला तर आजची सुटका उद्यावर लांबेल ' ही माहिती मला नवीन होती ...जेलमध्ये प्रवेश व सुटकेच्या वेळा ठरलेल्या असतात ..एकदा सायंकाळची बंदी होऊन ..गिनती झाली की बहुधा कोणी जेलमध्ये जावू शकत नाही किवा जेलच्या बाहेर पडू शकत नाही..अगदी आणीबाणी असल्यासच हा नियम मोडला जातो ..मी गाडीत बसताना मकसूदचे आणि शेख साहेबांचे आभार मानले ..माझ्याकडे एकही पैसा नसताना शेख साहेब माझ्यासाठी जामीन करायला तयार झाले होते ....जरी मी पैसे नंतर देईन असे गृहीत असले ..तरी एका भणंग गर्दुल्ल्यावर विश्वास ठेवणे ही सोपी बाब नव्हती ...मकसूद तर अगदी परमेश्वरासारखाच ऐन वेळी मदतीला आला होता ..पूर्वी कधीतरी मी त्याला केलेल्या मदतीला स्मरून ..त्याने मला निस्वार्थीपणे मदत केली होती ...चांगले कर्म करत रहा ..नक्कीच त्याचे फळ तुम्हाला कधीतरी मिळतेच ..तसेच वाईट कर्म केले तर ..त्याच्याही फळ भोगावे लागतेच ..फक्त फळ कोणत्या स्वरुपात मिळेल ..कधी मिळेल ..हे मात्र निसर्ग ठरवतो ..आपल्या हाती फक्त कर्म करीत राहणे इतकेच असते ..कर्माचे फळ विशिष्ट पद्धतीनेच मिळावे हा अट्टाहास नको ..अथवा वाईट कर्माचे फळ इतके जास्तच का ? अशी उलटतपासणीही नको ...' क्रिया -प्रतिक्रियेच्या ' न्यूटनने सांगितलेल्या सिद्धांताची प्रचीती आली होती...निसर्ग नियमांना निसर्ग देखील बांधील असतो फळ मिळणारच हे नक्की ...म्हणून कर्म करताना सावधगिरी बाळगायला हवी .. ' कर्मण्ये वाधिकारस्ते ' चा नवा अर्थ मला उमगला होता ..अर्थात मला समजलेले सगळे अंमलात आणणे मला लगेच शक्य होईल असेही नव्हते ..अजूनही अज्ञान बाकी होते ..बरेच काही शिकायचे बाकी होते .

गाडी जेलच्या प्रवेशद्वारा जवळ पोचताच मी अधिरतेने खाली उतरलो ..माझ्या सुटकेची ऑर्डर असलेला कागद सोबतच्या शिपायांनी गेटजवळ असलेल्या जमादाराकडे सुपूर्द केला .. त्या जमादाराने मला .....ताबडतोब बराकीतून तुझे सामान घेवून परत गेट जवळ ये अशी सूचना देवून एक शिपाई दिला माझ्यासोबत ..मी बराकीत येवून माझी सतरंजी ..कांबळ..थाळी ..पाँट असे मौल्यवान सामान घेवून निघालो ..काल चारशेवीस मंडळीनी दिलेल्या दोन बिडी बंडालापैकी एक अर्धा संपला होता ...त्यातील उरलेल्या बिड्या मी सोबतच्या कैद्यांना वाटून टाकल्या ..एक सीलबंद बंडल मात्र स्वतःजवळ ठेवला ..गेटजवळ आल्यावर मला तेथे बाजूला असलेल्या कार्यालयात नेण्यात आले ....माझ्या अंगावरच्या सगळ्या खुणा पडताळून ..बाहेर सोडला जाणारा कैदी तुषार नातूच आहे याची खात्री करून घेतली गेली .. मला जेलकडून मिळालेले सामान परत करताना उशीची अडचण आलीच ..माझी उशी पूर्वीच कोणीतरी चोरून हंडीत जाळली होती ..त्या बद्दल शिपायाने मला फटकारले ..एक हलकासा दडा मारला पायावर ..एकदाचा बाहेर पडलो लालगेटच्या ...चालत जेलरोडवर आलो ..घरी जायला भाड्याचे पैसे नव्हतेच खिश्यात ..तसेच मानसी सध्या कुठे आहे ? आईची तब्येत कशी आहे ? वगैरे प्रश्न होतेच ..घरी गेल्यावर भावाच्या प्रतिक्रिया काय असतील याची चिंता ..जेलरोड वर एका पानपट्टी वर जाऊन माझ्याजवळील सीलबंद बिडीबंडल त्याला देवून त्याच्याकडून चार रुपये मिळवले ...तेथल्याच फोन वरून भावाला फोन लावला ..माझा आवाज ऐकून भाऊ जागच्या जागी उडालाच असावा ..' तू कसा काय फोन करतोस ..तुला कोणी फोन दिला ' वगैरे घाब-या स्वरात विचारू लागला ..हे भूत आता पुन्हा घरी हजर होणार ..ही भीती डोकावत होती त्याच्या बोलण्यात ..' मला आज कोर्टात नेल्यावर एका मित्राने जामीन देण्याची तयारी दाखवली होती ..मात्र सध्या पर्सनल बाँडवर सोडले आहे मला ' असे मी सांगितले ..माझ्या बोलण्यातील नरमाई त्याला जाणवली असावी ..म्हणाला ठीक आहे तू आता इकडे तिकडे न भटकता ताबडतोब इथे घरी ये ....जवळ पैसे नसतील तर स्पेशल ऑटो करून ये ..जर तासाभरात तू घरी आलास तरच तुला घरात प्रवेश आहे . 

( बाकी पुढील भागात )

=======================================================================

कर्णपिशाच्च ? ? ( पर्व दुसरे - भाग १३० वा )

इकडेतिकडे न भटकता तासाभरात घरी आला तरच तुला घरात प्रवेश आहे ..या भावाच्या बोलण्यातला गर्भितार्थ असा होता..कुठे दारूच्या ..गांजाच्या ..ब्राऊन शुगरच्या अड्ड्यावर न जाता ..व्यसनी मित्रांना न भेटता सरळ घरी ये ..त्याला हे देखील माहित होते की आता याने व्यसन केलेले नाहीय म्हणून चांगला बोलतोय ..जर गडबड केली तर याचे डोके फिरेल ..विचार बदलतील ...पुन्हा धमक्या देणे सुरु करेल ..खुन्नसबाजीची भाषा करेल ..भावाची सूचना समजून मी जेलरोड वरूनच स्पेशल ऑटो केला ..सरळ ' आदर्श गोकुळ ' सोसायटीच्या गेटजवळ उतरलो ....भावू बाल्कनीतच उभा होता ..त्याने किती पैसे विचारून ..ऑटोवाल्याला पैसे दिले ...सोबत अंगावरचे कपडे हेच सामान होते ..सोसायटीत शिरताना ...अंधार असूनही असे वाटले की आसपासच्या घरांच्या खिडक्यातून लोक आपल्याला पाहत आहेत ..मान खाली घालून पटकन जिना चढलो ..दारातच वहिनीनी सुहास्य मुद्रेने स्वागत केले ....म्हणाल्या ' काय अवतार झालाय हो तुमचा ' ..जरा बरे वाटले ....आई देखील आतल्या खोलीतून उठून बाहेर आली ..खूप अशक्तपणा वाटत होत्या तिच्या चेहऱ्यावर ..मानसी कुठेय ? मी विचारलेच...तिला तिचा भाऊ माहेरी घेवून गेलाय काही दिवस ..असे वहिनींचे उत्तर मला समाधान कारक वाटले नाही ....संशय आला ..मानसी कायमची तर माहेरी गेली नसावी ? कधी गेली ? केव्हा येणार ? वगैरे प्रश्न विचारू लागलो तर ..आई म्हणाली आधी तू स्वच्छ अंघोळ कर ..चांगले कपडे घाल मग बोलू आपण ...पुतण्या मोहित व पुतणी रसिका माझ्याकडे कुतूहलाने पाहत होते ...जेलमध्ये जावून आलेला माणूस कसा दिसतो ..असे बालसुलभ कुतूहल होते त्यात ..मग जरा वेळाने ते देखील जवळ येवून बिलगले .. पाणी गरम करायला ठेवलेलेच होते ..मस्त घासणीने अंग घासून अंघोळ केली ..

वहिनींच्या सुचनेप्रमाणे कपडे बाजूच्याच गरम पाण्याच्या बादलीत भिजायला ठेवले ..अंघोळ करून जरा प्रसन्न वाटले ..आई म्हणाली ...उद्या सकाळी दाढी कटिंग करून घे आधी ...माझ्या मनात मानसीचेच विचार चालू होते ....तेव्हढ्यात फोन वाजला ..वहिनीनी फोन घेतला ..पलीकडून बोलणार्या व्यक्तीला म्हणाल्या ' हो ..आले आहेत भावजी इतक्यातच '....बोल तूच ' माझ्या हाती फोन दिला ..कसे आहात तुम्ही ? मानसीचा आवाज ऐकून मस्तच वाटले ..मानसी सांगू लागली ..अहो उगाच आसपासच्या लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यापेक्षा मी काही दिवस इकडे माहेरी आले निघून ..शिवाय तुम्ही नक्की कधी येणार हे माहित नव्हते ...मी न विचारताच ती माहेरी जाण्याबद्दल सफाई देत होती ..बहुधा मी जेलमधून बाहेर पडल्यावर भावाला येतोय असा फोन केल्या बरोबर त्याने मानसीच्या माहेरी मी सुटलोय असे कळवले होते ..वाटले किती काळजी घेतात हे लोक आपली ..आपण भले बाहेरच्या लोकांशी चांगले वागतो ..मात्र कुटुंबियांच्या भावना समजून घेता येत नाहीत आपल्याला ..मी येतेच तीनचार दिवसात असे सांगून मानसीने फोन ठेवला ..चला मुख्य धोका टळला होता ..मानसी या प्रकरणानंतर मला सोडून कायमची जातेय की काय ..अशी अंतर्मनातील भीती संपली . 

जेवताना भाऊ म्हणाला ' उद्या सकाळी दाढी ..कटिंग करून घे ..एक दिवस आराम कर .. परवापासून तुला पुन्हा अनिलसाहेबांकडे नोकरीला बोलावले आहे...माझे सगळे लोचे भावाने अनिल साहेबाना सांगितले असतील कारण ते जवळचे मित्र होते ..इतके प्रकार करूनही अनिल साहेब पुन्हा मला नोकरीवर ठेवतील अशी आशा नव्हती ..ती भीती देखील संपली ...रात्री झोपताना बराच वेळ भविष्यकाळात कसे चांगले वागायचे असा विचार करत होतो ..आपल्याला पोलिसांनी ऑटोत बसवून नेताना कोणी पहिले असेल ? ते लोक भेटल्यावर विचारतील ? त्यांना काय सांगावे ? असे प्रश्न मनात होतेच ..दुसऱ्या दिवशी साडेपाचलाच उठून तयार होऊन बसलो ...वहिनीनी मला जरा तुमचे कपडे भिजवलेली बादली बघून या ..असे सांगितल्यावरून पाहायला गेलो ..तर त्या बादलीत पाण्यावर मेलेल्या पांढऱ्या ऊवाचा अक्षरशः थर जमलेला ..मी दर एक दिवसाआड काळजी पूर्वक शोधून काढून ..मारून देखील कपड्याच्या शिवणीत ..शोधायला अवघड अशा जागी लपून बसलेल्या त्या उवा गरम पाण्यात कपडे टाकताच सगळ्या मरून पाण्यावर तरंगत होत्या ..कसेसेच झाले ते पाहून ..जेलमध्ये ऊ सापडली की आपण किती आवेशाने ती पकडून नखावर चिरडून मारत असू ते आठवले ..दाढी कटिंग करायला नेहमीच्या दुकानात न जाता पायी चालत जरा दूर पंचवटीत गेलो ..आपल्या जेल प्रकरणाचा सगळी कडे बभ्रा झाला असेल ..नेहमीच्या दुकानात गेलो तर चार प्रश्नांना तोंड द्यायला नको म्हणून दूरच्या दुकानात गेलो ..का कोण जाणे..रस्त्याने चालताना सगळे लोक आपल्याकडेच बघत आहेत असे वाटत होते ...खाली मान घालूनच चालत होतो ..बहुतेक माझा आत्मविश्वास कोलमडल्या सारखा झाला होता ..इतक्या वर्षांच्या व्यसनाच्या इतिहासात मला प्रथमच असे वाटू लागले होते ..दिवसभर घरीच वेळ घालवला ..बाहेर कुठेच जावेसे वाटेना ...रात्री झोपेचा प्रयत्न करताना ...' लाज कशी वाटली नाही तुला आईची पाटली चोरताना ' ..असे कोणीतरी बोलल्या सारखा भास झाला ..उठून आजूबाजूला पहिले तर कोणीच नव्हते ..पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागलो ....' एखादा असता तर त्याने सरळ आत्महत्या केली असती इतका त्रास देण्यापेक्षा ' ..पुन्हा कोणीतरी बोलले ..मी समजलो ..हे बहुतेक मला ' हँलुस्नेशन ' सारखे होत होते ..तोंडावर गच्च पांघरूण घेवून मनात अथर्वशीर्ष म्हणत पडून राहिलो ..केव्हातरी झोप लागली असावी . 

सकाळी आटोपून अनिल साहेबांकडे गेलो ..मला कोणीही काहीही प्रश्न विचारले नाहीत ..बरे वाटले ..इतके दिवस कुठे होतात ..बरीच सुटी घेतली वगैरे प्रश्न मला त्रासदायक झाले असते ..अनिल साहेब देखील पूर्वीसारखेच बोलले ..सगळे जाणीवपूर्वक माझ्याशी चांगले वागत आहेत असे वाटत राहिले ..मनात गहिवरून आले ..तरीही मनातून सर्वाना माझ्या बद्दल काय वाटत असेल असा विचार वारंवार मनात येवू लागला ..कसातरी दिवस पार पाडून ..सरळ घरी येवून पलंगावर पडून राहिलो ..पुन्हा तेच आवाज ..मला रागावणारे ..निंदा करणारे ..निर्भत्सना करणारे ..नुसता कल्लोळ ..जेवणाला बोलावल्यावर उठून जेवण करून झोपण्याचा प्रयत्न करू लागलो ....माझ्या अंगावर एकही कपडा नव्हता ..अगदी दिगंबर अवस्थेत मी रस्त्याने चालत होतो .येणारे जाणारे सगळे ..माझ्याकडे पाहून हसत होते ....बोटे दाखवत होते ....मी शरमेने मान खाली घालून लोकांच्या नजरेपासून स्वतःला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो ..अंगाला भीतीने दरदरून घाम सुटलेला ..छातीतील धडधड नगारा वाजवल्या सारखी कर्कश्य ..घशाला कोरड पडली होती ..कोणीतरी छातीवर बसून गळा आवळतेय ..वाकुल्या दाखवतेय ..सर्व शक्तीनिशी छातीवर बसलेल्या त्या अदृश्याला झुगारून दिले अंगावरून ..धडपडत उठून बसलो ..आसपास कोणीच नाही ..मंद जळणारा निळसर नाईट लँम्प आणि त्या खाली असलेले ...अंधुक दिसणारे भिंतीवरचे घड्याळ फक्त जागे ...बाकी सर्व गाढ झोपलेले ....घड्याळात पहाटेचे चार वाजलेले.. पाणी पिवून पुन्हा पलंगावर आलो ..बापरे अतिशय भयानक स्वप्न होते ते ..पुन्हा झोपलो तर ते स्वप्न पुन्हा पडेल या भीतीने जागा राहण्याचा प्रयत्न करू लागलो ...!

( बाकी पुढील भागात )