गुरुवार, 8 अगस्त 2013

सुधारणेचे पर्व

अतृप्ता !( पर्व दुसरे -भाग ५१ वा )


सुमारे महिनाभर शीतल आमच्याकडे रहात होती ...दरम्यान कादर मुक्तांगण मधून परत आलेला होता .. माझे पिणे सुरु होतेच ...त्यामुळे त्याचेही पिणे सुरूच झाले ...प्रामाणिकपणे व्यसनमुक्त राहायचे असेल तर ..सर्वात आधी पिणाऱ्या मित्रांपासून दूर राहायला पाहिजे .. ते न पाळल्यामुळे अनेकजण पुन्हा पुन्हा त्याच जाळ्यात अडकतात ..माझे मित्र वेळोवेळी बदलत गेले ..मात्र नवीन होणारे मित्र देखील बहुधा व्यसनीच मिळाले ..त्यातील ठराविक लोकांसोबत अनेकवेळा माझी रीलँप्स झाली आहे ...कादरचे देखील तसेच होत असावे ..तो उपचार घेवून परत आल्यावर माझे व्यसन सुरु असल्याने ..त्याचेही सुरु झाले ..कादरला शीतल बद्दल माहिती समजली तेव्हा .. त्याने मला तिला घरात राहू दिलेस म्हणून वेड्यात काढले ..मग शीतल आणि कादरची देखील ओळख झाली ..शीतलला नेमकी काय मदत करून यातून बाहेर काढावे हे समजत नव्हते .. ती मुलगी असल्याने काम जरा अवघड होते ..तसेच घरातून बाहेर काढलेली व्यसनी मुलगी म्हणून अधिकच अवघड .. त्यातच तिला लहान वयातच शरीरसुखाची ओळख झालेली ..इतकेच नव्हे तर चटक लागलेली ..ती माझ्याशी अत्यंत मोकळेपणे बोलत असे ..एकदा बोलताना ती म्हणाली ..माझे सेक्स बाबत कधी समाधानच होत नाही ..म्हणजे ती मी गौड सरांकडून ऐकलेल्या ' निम्फोमँनिक ' या प्रकारातील होती ... शरीर सुखातील अत्त्युच्च आनंदाचा क्षण ( ऑरगेझम ) अश्या प्रकारच्या स्त्रियांच्या वाट्याला फार थोड्या वेळा येतो .. तो क्षण गाठण्याची त्यांची शारीरिक क्षमता इतर स्त्रियांच्या पेक्षा वेगळी असावी ..अथवा त्यांच्या मनातील अतृप्तीचा भाव इतका जास्त खोलवर असतो की ..सतत जाणवणारी वेगवेगळ्या बाबतीतली अतृप्ती त्या शरीर सुखात शोधण्याचा प्रयत्न करतात ...त्यांच्या मनातील अतृप्तीचा भाव केवळ शरीर सुखाशी संबधित नसून ..त्यांच्या मानसिकतेशी देखील संबधित असू शकतो .. कुटुंबियांकडून न मिळालेले प्रेम ..गरिबीमुळे सततची वंचना .. विश्वासघात .. प्रेमप्रकरणातील अपयश ..वगैरे सगळ्या प्रकारचे असमाधान ..शरीर सुखाद्वारे शोधले जाते ..


शीतलचे घरात राहणे आईला मनापासून आवडत नव्हते ..अर्थात माझ्या हट्टापुढे आईचे काही चालत नसे .. कसेही करून हिला लवकरात लवकर मार्गी लावले पाहिजे असे आईला वाटे .. एकदोन वेळा मला जाणवले की शीतल माझ्याकडे आकर्षित झालीय ..विभिन्नलिंगी समुपदेशानात हा धोका नेहमी असतो .. समुपदेशन केले जाणारी व्यक्ती भिन्नलिंगी असेल तर समुपदेशाकाबद्दल तिच्या मनात आकर्षण निर्माण होत असावे ..कारण समुपदेशक त्या व्यक्तीला दोष न देता तिला तिच्या चुका दाखवून देतो .. चांगल्या प्रकारे समजून घेतो ... शीतलला एक दोन वेळा मी तू एखादा चांगला मुलगा पाहून लग्न करून टाक असे मी सुचविले तेव्हा तिने ' तू करतोस का माझ्याशी लग्न ? असे पटकन विचारले .. मी अनघावर जीवापाड प्रेम करत होतो ..आणि आता तिचे लग्न झाले आहे ..तिच्याशिवाय मी कोणाशीच लग्न करणार नाही असे मी तिला सांगितले ..तू एखादी नोकरी कर असे सांगितल्यावर म्हणाली..माझे शिक्षण अर्धवट आहे ..मला कोण देणार नोकरी ..अर्थात हे देखील खरे होते ..तिला फार फार तर धुणी भांडी करण्याचे काम मिळाले असते .. मी एड्स च्या क्षेत्रात काम करतो हे तिला सांगितले होते .. शरीरविक्रय करणाऱ्या अनेक महिला व त्यांच्या आँटी माझ्या ओळखीच्या आहेत हे तिला माहित झाल्यावर एकदा म्हणाली ..तू एखाद्या आँटीशी माझी ओळख करून दे ..मी सरळ सरळ शरीर विक्रय करण्याचा व्यवसाय करते ...केवळ दारू साठी शरीर ऑटोवाल्यांच्या हवाली करण्यावजी राजरोस धंदा करीन .. मला हे अनेपेक्षित होते ..तिला मी त्यातील धोके .. समाजाचा अश्या महिलेकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टीकोन वगैरे बाबी समजावून सांगितल्या .

एकदा कादर ..शीतल ..आणि मी तिघेही भद्रकालीत गेलो असताना शरीरविक्रय करणाऱ्या महिलांची एक घरवाली ( बाँस) आम्हाला वाटेत भेटली ..तिचे घर तेथून जवळच होते म्हणून चहा घेवून जा म्हणाली .. खूप आग्रह केला म्हणून आम्ही गेलो .. शीतल एका मित्राची बहिण आहे असे तिला सांगितले .. तिच्या सराईत नजरेने काय ते जोखले असावे .. त्या निमित्ताने शीतलला तिचे घर माहित झाले .. दोनच दिवसांनी ..मी बाहेर गेलो असताना शीतल पुन्हा सायंकाळी फिरायला म्हणून बाहेर पडली ..रातभर गायब होती ..थेट दुपारी परत आली ..खूप थकलेली ..मरगळलेली .. माझ्याशी ती खोटे बोलत नसे ..म्हणाली त्या दिवशी भेटलेल्या बाईकडे गेले होते काल .तिला सांगितले कि मला या व्यवसायात यायचे आहे ..तिने आधी खूप समजावले मग तयार झाली .. काळ तिने गाठून दिलेल्या एकासोबत लॉजवर मुक्कामाला गेले होते ..दोनशे रुपये मिळाले ..मी हतबल झालो होतो .. आपल्या समोर पाहता पाहता ही मुलगी शरीरविक्रय करण्याच्या व्यवसायात शिरली ..आपण काहीही करू शकलो नाही ..कदाचित आपले ब्राऊन शुगर पिणे सुरु नसते तर नक्की हिला काहीतरी ठोस मदत करता आली असती ही खंत कायमची मनात बसली ..एव्हाना आईने पुन्हा मँडमना फोन करून माझे पिणे सुरु झाले असावे असे सांगितले होते .. एकदा मँडमचा पुण्याला बोलाविले आहे असा निरोप आला..दोन दिवसात परत येतो ..तो पर्यंत शीतलला आपल्याच घरी राहू दे असे आईला सांगून पुण्याला गेलो .. पुण्याला गेल्यावर मँडमनी तू आता काही दिवस येथेच रहा असे संगितले ..माझा नाईलाज होता .. तिकडे शीतलचे काय झाले असेल ही काळजी वाटत होती काही दिवस.. नंतर नंतर विसरलो ...सुमारे सहा महिने मुक्तांगणला राहून परत आल्यावर आईने सांगितले कि तू गेल्यानंतर शीतल दोन तीन दिवसातच मैत्रिणीकडे राहायला जाते असे सांगून निघून गेली होती .. पुढे पुन्हा व्यसन सुरु झाले तेव्हा एकदा टर्कीत पंचवटीच्या घाटावर फिरत असताना ..एका लॉजच्या बाल्कनीत शीतल उभी दिसली ..अंगावर भारीपैकी गाऊन होता .. तिला मी हाक मारली ..तेथेच थांब असा इशारा करून लॉजच्या खाली रस्त्यावर येवून मला भेटली .. आता ती राजरोस शरीरविक्रय करण्याचा व्यवसाय करत आहे हे समजले ..माझी अवस्था पाहून मी टर्कीत आहे हे तिने ओळखले ...पुन्हा पुन्हा ब्राऊन शुगर का पितोस ? त्यापेक्षा तुझा लग्न न करण्याचा तसेच अनघाचा विचार सोडून दे ..लग्न कर तर मार्गी लागशील असा पोक्त सल्ला देवून मला ब्राऊन शुगर पिण्या करिता पाचशे रुपये काढून दिले ...या गोष्टीला आता सुमारे सतरा वर्षे उलटून गेलीत नंतर तिची काहीच खबर नाही . अजूनही तिची आठवण झाली की स्वतच्या त्यावेळच्या असहायतेची व्यसनाधीनतेची खंत वाटते .

( बाकी पुढील भागात )


====================================================

निर्लज्ज ???? (पर्व दुसरे -भाग ५२ वा )


व्यसनमुक्ती केंद्रात वारंवार उपचारांसाठी वारंवार दाखल होणार-या लोकांच्या बाबतीत एक धोका असतो ..तो म्हणजे निर्ढावलेपणाचा... तिसऱ्यांदा जेव्हा मी ' मुक्तांगण ' ला गेलो ..तेव्हा माझ्या बाबतीत तसेच घडले .. सुरवातीला काही दिवस ..आपण काहीतरी चूक केली आहे याची जाणीव राहिली ..मला या वेळी देखील ' आफ्टर केअर ' या दीर्घ काळ राहणाऱ्या तसेच निवासी कर्मचारीराहतात त्या विभागात ठेवले होते ..तेथे राहणारे सर्व जण बहुधा माझे जुने मित्रच असल्याने ..सहजपणे मी तेथे स्थिरावलो .. मी तेथे गेल्यावर दोनच दिवसात नेमक्या मँडम त्यांच्या उपचारांसाठी मुंबईला गेल्या काही दिवस ...त्यामुळे लगेच मँडमची भेट होऊ शकली नाही ...इतर कोणाजवळ की मोकळेपणी बोलू शकलो नाही .. किवा समुपदेशकाला देखील स्वतःहून काही बोललो नाही .. इतक्यात नाशिकला परत जाता येणार नाही हे समजल्यावर शीतलचे काय झाले असेल हा विचार देखील सोडून दिला ..पहिल्यांदा जेव्हा उपचारांसाठी दाखल झालो होतो तेव्हा ..माझ्या पुढे अनघा ..करिअर ...संसार वगैरे ध्येय होते ..या वेळी मात्र तसे काहीच ध्येय डोळ्यासमोर नव्हते .. लग्न करायचे नाही हे ठरवलेलेच होते ..शिवाय या व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातच सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करण्याचे देखील पक्के झालेले ..साहजिकच भविष्याच्या दृष्टीने मी फारसा गंभीर नव्हतो ..

जवाबदा-या घ्यायच्याच नाहीत हे एकदा मनात पक्के ठसले की असे होते ..कदाचित ही माझी पळवाट होती हे आता जाणवतेय... आठवड्यातून एखादा ' समूह उपचार ' घेणे .. पेंडसे सर योगाभ्यास घ्यायला येणार नाहीत तेव्हा योग्याभ्यास घेणे ..संगीत उपचारात सक्रीय सहभाग ...शिवाय रोजची एखाद्या ठकाणी झाडू मारण्याची ड्युटी ...इतक्याच सकारात्मक बाजू होत्या ..बाकी दिवसभर टिंगल टवाळ्या करणे ..एकमेकांच्या मस्क-या करणे ..'बुद्धिबळ ..कँरम खेळणे असे माझे उद्योग चालत ..माझ्या सारखेच तीनचार खुशालचेंडू होतेच माझ्या सोबतीला ..आतून खूप अवस्थ असणारा माणूस आपली अवस्थता लपविण्यासाठी कधी कधी एकदम निर्धास्त ..बिनधास्त असल्याचे सोंग घेतो तसे माझे झाले होते ...माझी विनोदबुद्धी चांगली असल्याने ..माझ्या विनोदाला लोक हसतात म्हणून मी सारखा विनोद करण्याचा मागे राही ..वरकरणी सारे काही आलबेल आहे दाखविण्याच्या नादात मी उगाचच माझ्या आयुष्याचे मौल्यवान दिवस बळी देत होतो हे मला समजले नाही ..म्हणजे वयाच्या मानाने माझी समज वाढण्याएवजी कमीच झाली होती ...एकप्रकारे मी ' कम्फोर्ट झोन ' व ' ड्राय ड्रंक ' अवस्थेत जास्तीत जास्त वेळ असे... याचा अर्थ असा की दारू न पिता अथवा कोणतेही मादक द्रव्य सेवन न करता देखील दारुड्या व्यक्तीसारखेच बेजवाबदार ..बेभरवश्याचे वर्तन करणे ..मनातील नकारात्मक भावना अनियंत्रित असणे ..फक्त व्यसन केले नाही मात्र वर्तन अगदी व्यसनी व्यक्तीसारखेच .... कोणताही सकारात्मक बदल नाही वर्तनात ...अन्न , वस्त्र , निवारा या जीवनावश्यक गोष्टी विनासायास मिळत आहेत ना ? मग उगाच बाकीची चिंता करायची नाही असा दृष्टीकोन .. अन्य प्राण्यांच्यापेक्षा अधिक क्षमता दिलेल्या असूनही त्या क्षमतांचा योग्य पद्धतीने वापर न करता ..आला दिवस ढकलणे ...शिवाय तीन वर्षे चांगला होतो हे तुणतुणे होतेच माझे .

मला जुने मित्र जरा ' सिरीयस ' राहायला सांगत तेव्हा त्यांच्या राग येई ..त्यातील काही अनेक वर्षे पुनर्वसनाच्या प्रक्रियेत होते .. तुम्ही बाहेर पडून चांगले राहून दाखवा असे मी त्यांना म्हणे .. मी बाहेर तीन वर्षे चांगला राहिलो होतो हा अहंकार काही कमी झाला नव्हता ....तेथे दत्ता श्रीखंडे ..प्रसाद ढवळे.. सोमनाथ पुरंदरे ..अंकुश दरवेश ..बाबा शेख ..गुरुजी .. रमेश हुले अशी मंडळी देखील होती ..जे माझ्या नंतर उपचार घेण्यास आले ..यशस्वीपणे उपचार घेवून प्रामाणिक पणे काम करू लागले...पाहता पाहता जीवनात स्थिरावले ... अश्या मोजक्या मंडळींचा आदर्श समोर न ठेवता मी जे वारंवार उपचार घेण्यास येतात त्यांच्यात जास्त रमत असे ..दत्ता श्रीखंडेची सुधारणा तर अगदी आश्चर्यजनक होती .. तो पहिल्यांदा उपचार घेवून गेल्यावर लगेच काही दिवसांनी परत उपचारांना आला ...या वेळी त्याला प्रामाणिकपणे व्यसनमुक्त राहायचे होते ..उपचारांसाठी दाखल झाल्याबरोबर ..त्याने निवासी कर्मचार्यांना सांगितले ..की मी येताना सोबत खूप ब्राऊन शुगर आणली होती ..ती सगळी काही मला संपवता आली नाहीय ..मेंटल हॉस्पिटलच्या बाहेरच्या भिंतीजवळ मी ती उरलेली ब्राऊन शुगर लपवलेली आहे .. मागच्या वेळी असेच झाले होते .. उपचार घेवून बाहेर पडताच मी लपवलेली ब्राऊन शुगर प्यायलो होतो .. आता मला प्रामाणिकपणे व्यसनमुक्त राहायचे आहे ..तेव्हा तुम्ही ती लपवलेली ब्राऊन शुगर तेथून काढून नष्ट करा ...बापरे किती हा प्रामाणिकपणा ... मी एकतर जवळची सगळी ब्राऊन शुगर संपल्याशिवाय अँडमिट झालोच नसतो ..आणि ब्राऊन शुगर लपवून ठेवल्याचे अजिबात सांगितले नसते कोणाला ..उपचार घेवून बाहेर पडल्यावर ' फक्त एकदाच ' म्हणून पुन्हा प्यायलो असतो .

( बाकी पुढील भागात )


=============================================

अतिशहाणा ..त्याचा ......!  (  पर्व दुसरे -  भाग ५३ वा )


व्यसनाधीनतेत अडकलेल्या माणसांचा बुद्ध्यांक हा सर्वसामान्य माणसापेक्षा जास्तच असतो असे संशोधन आहे .. मात्र त्याची ही अतिरिक्त बुद्धिमत्ता तो व्यसनात अडकल्यावर स्वतःलाच उल्लू बनविण्यासाठी वापरतो हे देखील तितकेच खरे आहे .. आपण व्यसनाधीनता या अतिशय भयंकर आजारात अडकलो आहोत हे मान्य करण्याच्या आड त्याची बुद्धिमता नेहमी येत असते ..एकदा या आजारात अडकलेल्या व्यक्तीला आयुष्यात कधीही .. थोडेसे ..एकदाच....कधी कधी .. वगैरे व्यसन करता येणार नाही हे शास्त्रीय सत्य आहे ...मात्र तरीही व्यसनी व्यक्ती सहजा सहजी व्यसनापुढे आपली हार मान्य करीत नाही ..तो महिना पंधरा दिवसातून एकदा पिणाऱ्या किवा रोज रात्री फक्त एकाच पेग घेवून थांबू शकणाऱ्या व्यक्तीची बरोबरी करण्याचा प्रयत्न करत असतो ..आणि एकदा तोंडाला लागली की जो पर्यंत एखादे मोठे नुकसान होत नाही किवा उपचार घेत नाही तो पर्यंत व्यसन थांबत नाही ..हे वारंवार अनुभवाला येवून देखील तो हे स्वीकारत नाही ..पुन्हा पुन्हा प्रयोग करीत राहतो ..तसेच प्रत्येक वेळी आपल्या अपयशाला नवीन नवीन समर्थने जोडतो ...म्हणूनच व्यसनमुक्ती केंद्रात स्वतची अक्कल चालविणे थांबवा असे सांगितले जाते ..तुम्ही जीवनाच्या इतर क्षेत्रात खूप हुशार असाल .. अगदी अनेक बाबतीत तुम्ही प्राविण्य मिळविले असेल ..तरीही त्या बुद्धिमत्तेचा किवा कौशल्याचा उपयोग तुम्हाला व्यसन कायमचे थांबविण्यासाठी करता आला नाही हे निखळ सत्य असते ...ते स्वीकारण्यासाठी पुन्हा पुन्हा आपल्या बुद्धिमत्तेचा शिक्षणाचा .. सत्तेचा ..मान सन्मानाचा ..पैश्यांचा ..शारीरिक क्षमतेचा .. जाती धर्माचा अहंकार दूर ठेवावा लागतो . जे लोक व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेताना स्वतःला शून्य मानून ..जेव्हा सारे प्रामाणिकपणे शिकतात ..तेव्हाच त्यांना उपचारांचा फायदा होतो ..अन्यथा वारंवार व्यसनमुक्ती केंद्राचा वाऱ्या करणे भाग पडते .

माझ्यासारखे अतिशहाणे वारंवार व्यसनमुक्ती केंद्रात उपचारांना दाखल होतात .. म्हणूनच या क्षेत्रात ' रिकव्हरी रेट ' कमीच आढळतो ...आमच्या सारखे अतिशहाणे आपल्या अशा प्रवृत्तीमुळे केवळ स्वत:चेच नुकसान करतात असे नाही.. तर आमच्या सारख्या लोकांमुळे व्यसनमुक्ती केंद्र बदनाम होते..तसेच सर्वसामान्य माणसांचा उपचारांवरील विश्वास डळमळीत होऊन ..काही फायदा होत नाही व्यसनमुक्ती केंद्रात ठेवून असा समज दृढ होतो ..व उपचार घेवू इच्छिणारे संभाव्य लोक देखील उपचार घेणे टाळतात ...पालकांचा देखील एक सर्वसाधारण गैरसमज असतो ..की व्यसनमुक्ती केंद्रात एकदा दाखल केले ..आता आपला माणूस एकदम सुधारुनच बाहेर पडेल ... तसे घडले नाही तर पुन्हा उपचार देण्याचे टाळतात ..हे सर्व माझ्या खूप उशिरा लक्षात आले .. अल्कोहोलिक्स अँनाँनिमसच्या मिटिंग बाबत देखील लोकांचा असाच गैरसमज होतो ..खरे तर केवळ एकदाच उपचार घेवून बरे झाले अशीही अनेक उदाहरणे आहेत ..परंतु हे प्रमाण जरा तुलनेत कमीच आढळते ..काही लोकांना पुन्हा पुन्हा उपचारांची गरज असते ..अर्थात याला जवाबदार केवळ व्यसनी व्यक्तीच असते .

स्वतःशी व्यसनाच्या बाबतीत कमालीचे प्रामाणिक राहावे लागते .. दत्ता श्रीखंडे अश्या प्रामाणिक पणाचे उत्तम उदाहरण होते .. व्यसनामुळे पाकीटमारी करू लागलेल्या ..मुंबईत पाच पोलीस स्टेशनच्या विभागात तडीपार असलेला ..मराठी अशुद्ध बोलणा-या दत्ताने मुक्तांगण मध्ये दीर्घकाळ राहायचे ठरवले .. आधी किचनमध्ये लहान सहान कामे केली ..नंतर स्वैपाक शिकला व मुक्तांगणच्या किचन विभागाचा प्रमुख म्हणून काम सांभाळू लागला .. हे करत असताना ..तो वेगवेगळे समूह उपचार घेणे देखील शिकला .. मग मुक्तांगणच्या बाहेर खोली घेवून राहू लागला .. भविष्यात लग्न ..संसार या जवाबदा-या घेण्यासाठी मुक्तांगणचे काम सांभाळून विश्रांतवाडी येथे सायंकाळी न लाजता फुटपाथ वर बनियन ..अंडरवेअर ..हात रुमाल ..घरगुती उपयोगाच्या किरकोळ वस्तू विक्रीचे काम सुरु केले ..केले .. पुढे मुक्तांगणच्या पुढाकाराने लग्न केले ..आज दत्ता आपली दोन मुले व पत्नीसोबत स्वतःच्या मालकीच्या घरात रहातो .. उरलेले अर्धवट शिक्षण देखील बाहेरून पूर्ण केले .. दत्ताच्या जीवनावर एक लघुपट देखील निघाला आहे ..आता तो अस्खलित मराठीत व्याख्याने देतो मुक्तांगण तर्फे ..त्याने केवळ व्यसनमुक्तीच साध्य केली असे नाही तर ..स्वतचा सगळा काळाकुट्ट भूतकाळ पुसून टाकला ..या सर्व प्रक्रियेत त्याने नियमित मँडम ..बाबा ..इतर समुपदेशक यांचा सल्ला घेतला इतकेच नव्हे तर तो सल्ला प्रामाणिकपणे पाळला ..स्वतची अतिरिक्त अक्कल वापरली नाही उगाच ...हेच खरे दत्ताच्या सुधारणेचे रहस्य असावे .

( बाकी पुढील भागात )


======================================

मूल्यमापन ..स्टाफ मिटिंग ! ( पर्व दुसरे  - भाग ५४ वा )


मुक्तांगण मध्ये महिन्यातून एकदा डॉ .आनंद नाडकर्णी सर आल्यावर ..सर्व कार्यकर्त्यांची स्टाफ मिटिंग आयोजित केली जाई ..एकंदरीत सर्व कसे चालले आहे .. ' रिकव्हरी रेट ' वाढविण्याच्या दृष्टीकोनातून उपचार पद्धतीत काय बदल केले जावेत ..उपचारांसाठी वारंवार दाखल होणाऱ्या मित्रांच्या बाबतीत नेमकी कोणती मदत केली म्हणजे त्यांना फायदाहोऊ शकेल ..या बाबतची चर्चा .. कार्यकर्त्यांमधील गैरसमज ..कुरबुरी ..भांडणे .. सोडविणे ..तसेच डिस्चार्जच्या वेळी उपचार घेणाऱ्या मित्रांकडून भरून घेतलेल्या ' फीडबँक ' फॉर्मचे मूल्यमापन करून उपचार पद्धतीत ..तसेच राहणे ..जेवण ..एकंदरीत वातावरण या बाबत उपचारी मित्राने केलेल्या सूचना ..राबविता येतील काय याची चाचपणी .. मुक्तांगण मधील वातावरण सतत सकारात्मक आणी खेळीमेळीचे राहावे यासाठी काय करता येईल वगैरे ...असा व्यापक हेतू असे या मिटिंगचा. शक्य असेल ते आवश्यक बदल केले देखील जात ..एकदा एका स्टाफ मिटिंग मध्ये' कार्य कर्त्यांची वारंवार होणारी रीलँप्स व उपाय ' हा विषय होता चर्चेला . या क्षेत्रात जरी अनेक निर्व्यसनी असलेले व कळकळीचे कार्यकर्ते आहेत ..तरी देखील जे प्रत्यक्ष व्यसनाधीनतेच्या अनुभवातून गेले आहेत त्याच्या अनुभवांचा उपचार पद्धती अधिक परिणामकारक करण्यास उपयोग होतो हे खरे आहे .. म्क्तांगण मध्ये त्या वेळी आयुष्यात कधीही व्यसन न केलेले ..मात्र समाजकार्याचे ..समुपदेशनाचे.. पद्धतशीर प्रशिक्षण घेतलेले कार्यकर्ते अगदी बोटावर मोजण्या इतपतच होते .. अधिक लोक माझ्यासारखे पुनर्वसनाच्या प्रक्रियेत कार्यकर्ते बनलेले असेच होते ..हे पुनर्वसनाच्या प्रक्रियेत असलेले कार्यकर्त बहुधा भावनिक दृष्ट्या स्थिर नसत ..तसेच त्यांची रीलँप्स होण्याची टांगती तलवार नेहमी व्यवस्थापनाच्या डोक्यावर असे .. म्हणजे चांगले कार्य करणारे ..जीव ओतून काम करणारे ..मात्र बेभरवश्याचे असेच त्यांचे वर्णन करता येईल .

अश्या कार्यकर्त्यांमध्ये मी ..बंधू .. अँगी ..आणि अजून तीनचार जण होते .. यांची होणारी रीलँप्स टाळण्यासाठी नेमके काय करता येईल अशी चर्चा सुरु झाली ..खरे तर आम्ही रीलँप्स होण्यास पूर्णपणे आम्हीच जवाबदार होतो ..अस्थिर भावना ..अहंकार ..आणि व्यसनासमोर हार न पत्करण्याची आमची घातक वृत्ती बदलण्यासाठी आम्हीच अधिक प्रयत्न करणे आवश्यक होते ..हे प्रकार वारंवार घडू नयेत या साठी चर्चा सुरु झाली . एकाने प्रस्ताव मांडला की अश्या कार्यकर्त्यांना रीलँप्स झाल्यावर पुन्हा कार्यकर्ता म्हणून काम देवू नये ..सरळ हाकलून लावावे ..कारण या कार्यकर्त्यामुळे संस्थेचे नाव खराब होते .तसेच वार्ड मध्ये उपचार घेणाऱ्या मित्रांवर देखील याचा नकारात्मक परिणाम होतो ..कामावरून काढून टाकण्याचा पस्ताव अर्थातच मँडम ..नाडकर्णी सर यांच्याकडून धुडकावला गेला ..कारण रीँलँप्स हा या आजाराचा एक अंतर्भूत भाग आहे .. हे कार्यकर्त एरवी अतिशय तळमळीने काम करतात ..हुरहुन्नरी आहेत ... अवघड कामे करण्यात पुढाकार घेतात ही आमच्या लोकांची जमेची बाजू होती ..यांना जर या क्षेत्रात कार्य करण्याची इच्छा असेल तर त्यांना काढून टाकणे म्हणजे तो अन्याय होईल असे मँडमचे मत होते ..तरीही यांनी पुन्हा व्यसनाकडे वळू नये यासाठी काहीतरी कडक उपाय योजले पाहिजेत असे बहुमत होते ..शेवटी ठरले की रीँलँप्स झाल्यावर अश्या कार्यकर्त्यांना सहा महिने पगार देता कामा नये .. त्यांना त्यामुळे धडा मिळेल ..पगार बंद होईन या भीतीने त्यांचा निर्लज्जपणा कमी होऊ शकेल ..नुकताच बंधू देखील त्या वेळी रीँलँप्स झालेला होता .. झाले असे की बंधूचा एक मुंबईचा जुना मित्र ..उपचार घेण्यासाठी दाखल होण्यासाठी आला होता ..बंधू त्या वेळी समुपदेशक म्हणून काम करत होता ..हा मित्र दाखल होण्याआधी बंधूला त्याच्या केबिन मध्ये जावून भेटला .. त्यांचे बोलणे सुरु झाले ..जुन्या आठवणी जागृत झाल्या ..आणि दोघेही त्यात वहात गेले ..साधारण तासाभरातच बंधूचे मन.. एकदाच ..आजच्या दिवस ..व्यसन केल्यास काय हरकत आहे ..या विचाराने व्यापले गेले ..परिणाम म्हणून बंधू त्या मित्रासोबत मुक्तांगण मधून चक्क पळून गेला व बाहेर जावून व्यसन केले ... हे ऐकण्यास जरी गमतीशीर वाटले तरी यातून आजाराचा भयानकपण लक्षात येवू शकेल ...सहा महिने पगार बंद ठेवण्याच्या या निर्णयामुळे आता आम्ही लोक ' बिनपगारी फुल अधिकारी ' या वर्गात मोडू लागलो .

मग दुसरी समस्या अशी पुढे आली की ' आफ्टर केअर ' विभागात राहणारे जास्त काळ मुक्तांगण मध्ये वास्तव्य करू इच्छिणारे पेशंट व निवासी कार्यकर्ते यांच्या भाषेबाबत ..आमची सर्वांची आपसात बोलण्याची भाषा अगदी ' टपोरी ' या सदरात मोडणारी होती ..तसेच बोलताना वाक्यात एकतरी शिवी हटकून यायचीच ..अनेकदा अश्या शिव्या केवळ वाक्याला धार येण्यासाठी किवा योग्य भावना प्रदर्शित करण्यासाठी वापरल्या जात .. कोणाला दुखावणे हा हेतू नसे ..तरीही हे योग्य नाही असे अनेकांचे मत होते ..सुधारणा म्हणजे आपल्या विचारात ..भावनात आणि वर्तनात सातत्याने सकारात्मक बदल केले पाहिजेत .. मग अश्या वारंवार शिव्या देणाऱ्या मित्रांना देखील आळा बसावा म्हणून एका शिवीला ५० रु. दंड ठरला ..याने काही दिवस फरक पडला वातावरणात ..बोलणे एकदम मिळमिळीत होऊ लागले ..संवादातील मजा कमी झाली आमच्या ..बंडखोरी हा आमच्या लोकांचा गुणधर्म असल्याने हा नियम देखील मोडल्या जावू लागला ..एक जण तर घरचा अतिशय श्रीमंत होता ..शिव्या देणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवायची जवाबदारी दिलेल्या निरीक्षक कार्यकर्त्यासमोर तो मुद्दाम खूप शिव्या घालायचा .. अगदी इतका की त्या कार्यकर्त्याला त्याच्या शिव्यांचा हिशोब ठेवणे जड जाई..दहा वाक्यांच्या संवादात याने चार शिव्या दिल्या की पाच असा हिशोबात गोंधळ होऊ लागला ..या वरून खूप गम्मत उडाली ..  

============================================


जवाबदार कोण ????  (  पर्व दुसरे -भाग ५५ )


अनेक व्यसनी व्यक्तींना प्रामाणिकपणे असे वाटत असते की आपल्या व्यसन सुरु होण्यास .. आपल्या घरची परिस्थिती ..सभोवतालचे वातावरण... मित्रमंडळी ..आपल्यावर झालेल्या अन्याय .. एखादे नैसर्गिक व्यंग .. प्रेमभंग .. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू .. वगैरे जवाबदार आहे ..त्या मुळेच आपले व्यसन सुरु झालेय ..असे वाटते . काही अंशी हे खरे ही असेल ..मात्र एकदा व्यसन सुरु झाल्यावर त्यात वहावत जाणे .. व्यसनामुळे आपल्या जीवनाचे नुकसान होते आहे हे माहित होऊनही पुढे व्यसन करत राहणे ..व्यसनमुक्तीच्या उपचारानंतर पुन्हा व्यसन करणे ..किवा स्वतः मध्ये सकारात्मक बदल करून व्यसनमुक्त राहणे या गोष्टींसाठी मात्र व्यसनी स्वतच जवाबदार असतो . एकदा स्टाफ मिटिंग मघ्ये वारंवार उपचारांसाठी दाखल होणारी एका गर्दुल्ल्याची केस चर्चेसाठी आली .. मुंबईतील कामाठीपुरा या बदमान वस्तीत तो रहात असे ..लहानपणीच त्याचे वडील अपघातात गेले ..मग दोन लहान मुलांना संभाळण्यासाठी आईने काही ठिकाणी मजुरी वगैरे केली ..मात्र शेवटी त्याची आई शरीरविक्रय करण्याच्या व्यवसायात शिरली ..तिच्या राहत्या घरातच ग्राहक मंडळी येत असत .. त्या पैकी काही जण या छोट्या मुलाला दारूची बाटली ..सिगरेट वगैरे आणायला पाठवत असत ..त्यातूनच तो लहान वयात दारू प्यायला शिकला .. नंतर गर्दचे व्यसन करू लागला ..पुढे उपचारांसाठी वारंवार मुक्तांगण मध्ये दाखल होऊ लागला ..त्याचे म्हणणे होते ..की लहानपणी जर माझे वडील वारले नसते तर आईला असा व्यवसाय करावा लागला नसता .. मग मी देखील व्यसनी झालो नसतो . निसर्गाने माझ्यावर अन्याय केलाय त्यामुळेच माझे व्यसन सुरु झाले . चर्चेच्या वेळी ही केस समोर आली तेव्हा अनेकांनी आपापली मते मांडली ..त्याचे व्यसन सुरु होण्यास त्याच्या घरची परिस्थिती ..आसपासचे वातावरण जवाबदार होते हे नाकारणे कठीण होते ...मात्र एकदा व्यसनाधीनता हा एक आजार आहे हे समजल्यावर देखील वारंवार त्या मोहाला बळी पडण्यास व्यसनी स्वतच जवाबदार होता ... तसेच परिस्थिती कितीही कठीण असो मात्र व्यसन करून परिस्थितीत काही फरक पडला नव्हता ..उलट व्यसनामुळे त्या मुलाचे जीवन उध्वस्त होत होते .. परिस्थिती अजूनच बिकट होण्यास वारंवार सुरु होणारे व्यसन जवाबदार होते.. परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःला बदलणे सोपे होते ... हे मान्य केल्याखेरीज त्या मुलामध्ये सुधारणा होणे कठीण आहे असा निष्कर्ष काढला चर्चेतून सर्वांनी .

म्हणजे माझे व्यसन सुरु होण्यास कोणीही जवाबदार असले तरी माझ्या सुधारणे साठी मात्र जवाबदारी मी स्वतः घ्यायला पाहिजे . परिस्थिती बदलण्याची वाट न पाहता स्वतःला बदलले पाहिजे हेच खरे ... स्टाफ मिटिंग मध्ये माझ्या सारख्या वारंवार रीलप्स होणाऱ्या कार्यकर्त्याला सहा महिने पगार देवू नये ..असे ठरल्यावर ..मला आपले नुकसान होणार आहे हे समजलेच नव्हते .. कारण अन्न ..वस्त्र ..निवारा ..या मूळ गरजा भागात आहेत मग उगाच काळजी करायची नाही ..असा घातक विचार मनात रुजलेला होता ..तेथेच कार्यकर्ता म्हणून सेटल झालेल्या विजयचे आता लग्न झाले होते व त्याने संसाराला हातभार म्हणून मुक्तांगण च्या कामा व्यतिरिक्त आसपासच्या सोसायट्यांच्या बिल्डींगच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचे कंत्राट घेतले होते ..त्यासाठी तो मदतनीस म्हणून मुक्तांगणच्या ' आफ्टर केअर ' विभागातील मुलांची मदत घेत असे ...बदल्यात त्यानाही काही पैसे मिळत .. आधी टाकीतील पाणी रिकामे करून मग खराटा ..तारेचा ब्रश .यांचा वापर करून टाकीच्या तळाला जमा झालेले शेवाळ .. कचरा ..टाकीच्या भिंतीवरील शेवाळ ..वगैरे साफ करून ..मग सगळी टाकी साबणाच्या पाण्याने धवून स्वच्छ करत असू आम्ही ..

एकदा विजय सोबत मी या टाकी साफ करण्याच्या कामाला गेलो असताना .. त्या सोसायटीची पाण्याची टाकी गच्चीवर जरा उंच जागी होती ..टाकीवर चढायची शिडी मोडलेली ..मग मी टाकीत जाणाऱ्या पाण्याच्या पाईप ला धरून सुमारे पंधरा फुट वर चढू लागलो ..अगदी टाकीच्या जवळ पोचल्यावर कसा कोण जाने तो पाईप तुटला आणि १२ फुटांवरून मी धप्पकन खाली पडलो ..उठू लागलो तर लक्षात आले की पडताना पायाचा घोटा मुडपून खाली जमिनीवर आपटला आहे .. आधी विजय वगैरे हसले मी पडलो म्हणून ..पण मला उठता येत नाहीय म्हंटल्यावर गंभीर झाले ..मला आधार देवून त्यांनी उठवले ..पाय भप्प सुजलेला होता .. तसाच विजयच्या मोटार सायकलवर बसून मुक्तांगण मध्ये आलो ..एखादा दिवस आराम करून बरे वाटेल या विचाराने पेन किलर घेवून झोपलो ..मात्र रात्रभर पाय ठणकत होता ..अजिबात झोप लागली नाही ..सकाळी मला ससूनला नेले गेले ..एक्स रे काढला गेला तेव्हा समजले की पायाच्या घोट्याला हेअर लाईन फ्रँकचर आहे ... सूज कमी झाल्यावरच प्लास्टर लावता येईल ..आता वांधेच झाले होते माझे ..दोन दिवस तो दुखरा सुजलेला पाय घेवून बोंबलत होतो ..शेवटी पायाला एकदाचे प्लास्टर लागले .. आता माझा लंगडत कारभार होता .. सगळे मित्र मला चिडवत होते ..मस्करी करत होते .. मी मात्र खूप वैतागलो होतो ..कारण माझ्या हालचालींवर मर्यादा आल्या होत्या .. दिवभर मस्ती ..मस्करी .. पळापळ करण्याऱ्या माझ्या सारख्यावर पलंगावर पडून राहण्याची वेळ आलेली .

( बाकी पुढील भागात ) 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें