टिंगल ..टवाळी..मस्करी ! (पर्व दुसरे -भाग ५६ वा )
पायाला प्लास्टर लागल्यावर मी एकदमच बांधल्या सारखा झालो होतो .. सारखे एका पायावर लंगडत फिरणे कष्टदायक असे .. स्टाफ मधील पुण्यातच राहणाऱ्या मित्राला सांगून अल्युमिनियमच्या कुबड्या मागवल्या होत्या .. त्या कुबड्या घेवून फिरणे सुरु झाले .. माझी अशी अवस्था मित्रांसाठी हास्यास्पदच होती ..एरवी मी इतरांना चिडवणारा आता चांगलाच जायबंदी झालेला ..मग ते माझी मस्करी करू लागले ..इरफानने एकदा अगदी मला मदत मारण्याचा आव आणून तुझी दाढी करून देतो म्हणाला .. मी विश्वासाने मान त्याच्या हवाली केली ..तर दाढी करता करता त्याने माझ्या मिश्या भादरून टाकल्या ..आणि पळून गेला ..त्याच्यामागे धावणे मला शक्यच नव्हते ...किचन विभाग आफ्टर केअर विभागापासून दूरच असल्याने मला प्रत्यक वेळी जेवणासाठी किचनपर्यंत जायचे जीवावर यायचे ..तेव्हा इतरांना चहा ..नाश्ता ..जेवण आणून दे मला म्हणून विनंती करावी लागायची ..तेव्हा मित्र माझी फिरकी घेत असत ..आधी मला साहेब म्हण .. माझ्या पाया पड ..मगच तुझे काम करेन म्हणायचे ..अर्थात तात्पुरते मी असे करत असे ..काम झाले की शिव्या घालत असे .. बबलू नावाचा कार्यकर्ता एकदा नवीन प्रकारचे शूज घालून आला होता ..त्या शूजच्या तळाला मागच्या बाजूला लाईट होते ..बबलू चालू लागला की ते लाईट लागत असत ..बबल्या सगळ्यांना कौतुकाने ते शूज दाखवत होता ..मला त्याची मस्करी करण्याची इच्छा अनावर झाली ..त्याला माझ्या पलंगाजवळ प्रेमाने बोलाविले ..मग चालून दाखव बबल्या ..पाहू कसे लाईट लागतात ते ..असे निरागसपणे म्हणालो ..बबल्या माझ्याकडे पाठ करून चालू लागला...बुटाच्या तळाचे लाईट मस्त लुकलुकत होते .. मग मी मोठ्याने म्हंटले ..मस्त बूट आहेत यार ..आता असे लाईट लागल्याने तुझ्या ' बुडाखालचा अंधार ' उजळून निघेल .. झाले सगळे हसू लागले ..बबल्या जो भडकला ..मला तश्या प्लास्टर लावलेल्या अवस्थेत त्याने पलंगावरून खाली ओढून मारू लागला ..खाली पडून लाथा खाल्ल्या ..पण माझे कुत्सित हसणे मात्र थांबत नव्हते .. लहानपणापासून असे कोणाला चिडवणे ..मस्करी करणे ... फिदीफिदी हसणे ..माझ्या डाव्या हातचा मळ होता ..माझ्यात लपलेला तो खोडकर मुलगा ..अजूनही अधून मधून बाहेर डोके काढतो .
आफ्टर केअर विभागातील सगळे लोक ' इरसाल' ..किवा ' बाराचे ' म्हणून ओळखले जात ..नियम मोडणे ..पळवाटा शोधणे ..निरागस चेहरा ठेवून समोरच्या व्यक्तीला वेड्यात काढणे वगैरे मध्ये आमचा हातखंडा होता ..एकदा तीनचार जणांनी केसांना मेंदी लावायचे ठरवले .. मेंदी आणून ..भिजवून रात्री केसांना मेंदी लावण्याचा कार्यक्रम झाला ..सकाळी मेंदी धुतल्यावर त्यांचे केस छान चमकत होते ..वार्डात नुकत्याच दाखल झालेल्या आमच्या त्रंबकेश्वरच्या विजय नावाच्या जुन्या मित्राला त्यांचे चमकते केस पाहून आपणही मेंदी लावावी असे वाटले ..तो आमच्या मागेच लागला ..खरे तर मेंदी संपली होती .. पण तो खूपच लागे लागला मेंदी लावायची म्हणून.. शेवटी अजय नावाच्या एकाने आयडिया केली ..त्याने बाहेरून रस्त्यावर पडलेले गाईचे शेण आणले थोडेसे ..मग थोडीशीच मेंदी राहिलीय .. खरे तर तुला देणारच नव्हतो .. जुना मित्र आहेस म्हणून देतोय वगैरे सुनावत..विजयच्या डोक्याला अतिशय गंभीरपणे मेंदी म्हणून ते शेण लावले .. या मेंदीचा कसातरी वास येतोय असे विजय म्हणू लागला ..त्याला एकदम शेणा सारखा वास येतोय असे म्हणता येईना .. तर सांगितले की ही खूप जुनी मेंदी आहे ..जुन्या मेंदीचा वास असाच येतो ..नंतर दोन तास विजय ते शेण डोक्याला लावून मिरवत होता ..त्याला वार्डात कोणीतरी सांगितले की शेण आहे म्ह्णून ..मग नुसत्या शिव्या .
त्यावेळी मँडमची तब्येत नेहमीच नरम गरम असे ..त्यांना केमोथेरेपी सुरु असल्याने अगदी अशक्त झाल्या होत्या ..मुक्तांगण मध्ये देखील कमी वेळ थांबत ..त्यांना ' अलर्जी ' म्हणून ...वेगवेगळ्या वासानी उलटीची उबळ येई .. त्याच काळात मुक्ता मँडम मुक्तांगण ला येवू लागल्या होत्या ..मुक्त मँडमनी मानस शास्त्रातील पदवी घेवून याच क्षेत्रात काम करायचे निश्चित केले होते ..आफ्टर केअर विभागाचा प्रमुख म्हणून काम करायला बहुधा कोणी सिनियर कौन्सिलर सहजा सहजी तयार होत नसे ..मग ते काम मुक्ता मँडम कडे सोपविण्यात आले होते ..त्यांनी आफ्टर केअर विभागाचे टाईम टेबल थोडे बदलले ..दुपारी वाचन करावे असे ठरले .. व्यसनी व्यक्ती खूप चंचल असतात ..त्यामुळे एका जागी बसून वाचन करणे ..लेखन करणे वगैरे त्यांना मनापासून आवडत नाही ... नवीन नियम म्हंटल्यावर आधी काही दिवस सर्वांनी नियम मोडला मात्र मुक्ता मँडमने कौशल्याने सर्वाना सांभाळले .. पायाला प्लास्टर असतानाच एकदा मोठ्या मँडमने बोलाविले आहे असा मला निरोप आला ..घाबरतच मी भेटायला गेलो ..बहुतेक कोणीतरी आपली काहीतरी तक्रार केली असणार हीच भीती होती मनात .
( बाकी पुढील भागात )
======================================================
पाय मोडल्याचे फायदे ? ? ? ? (पर्व दुसरे -भाग ५७ )
मँडमच्या केबिन बाहेर ..मला आत बोलाविण्याची वाट पाहत बसलो ..निवासी कार्यकर्ते किव आफ्टर केअर मधील कोणाला मोठ्या मँडमनी भेटायला बोलावले की त्याला धास्तीच वाटे ..नक्की कोणीतरी आपली तक्रार केली असणार असाच संशय येई ..कारण आम्ही दिवसभर काहीतरी खोड्या ..टिवल्या बावल्या करीत असू ..आमच्या वागण्याने पिडीत एखादा गेला कि काय मँडमपर्यंत असे वाटे ..मग केबिनच्या बाहेर बसायला लागले कि आत जाई पर्यंत आपोआप आत्मपरीक्षण होई ..म्हणजे आठवडाभरात आपण काय काय केले याची मनातल्या मनात उजळणी चाले .. नक्की कोणत्या बाबतीत मँडम बोलतील याचा अंदाज घेतला जाई ...मनातल्या मनात.. काय उत्तर द्यायचे हे देखील ठरविल्या जाई..खरे तर एकदा मँडम समोर उभे राहून ..त्यांच्या भेदक नजरेला नजर दिल्यावर ..सगळी समर्थने गळून पडत .. जे खरे आहे तेच बाहेर पडे तोंडातून ..खोटे बोलण्याचा त्यांना खूप तिटकरा होता .. काय असेल ते खरे सांगून टाका ..चूक केली असेल तर ती प्रामाणिक पणे कबुल करण्याचे देखील धैर्य असायला हवे ..असे त्यांचे मत होते .. मला आत बोलाविल्यावर मी कुबड्या घेवून लंगडत आत गेलो ..मुद्दाम चेहऱ्यावर करूण भाव घेवून .' .बिच्चारा ' वाटावा अशी मुद्रा केली ..मँडम चक्क माझ्याकडे पाहून हसून म्हणाल्या ..अरे बस .. बर्याच दिवसात भेट नाही म्हणून बोलाविलेय तुला .. मला हायसे वाटले ..मग कसे चाललेय असे विचारले मला ..मी लगेच माझे रडगाणे सुरु केले ..पाय मोडल्यामुळे खूप अडचणी येतात .. जास्त वेळ पडून रहावे लागते ..अंघोळ ..जेवण चहा ..वगैरेंसाठी सारखी मदत मागावी लागते .. वगैरे .उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्लास्टर मध्ये घाम येवून खाज सुटते .. तर खाजवता देखील येत नाही ..खूप अस्वस्थ वाटते .. मँडम नि सगळे शांतपणे ऐकूण घेतले .. माझ्या पुढ्यात एक कागद-पेन सरकवला आणि म्हणाल्या ..पाय मोडल्यामुळे तुझे सध्या काय काय नुकसान होतेय ते तसेच पाय मोडल्याचे काय काय फायदे आहेत ते ..दोन्हीही मुद्दे या कागदावर लिही .. मी बावचळून पाहू लागलो ..तर त्यांनी लिहायची खूण केली .
पंचाईतच होती ..पाय मोडल्याने माझे होणारे नुकसान मी पटापट लिहिले .. जेव्हा फायदे लिहायची पाळी आली तेव्हा थबकलो ..काही केल्या सुचेना ..पाय मोडल्याचे फायदे कसले असणार ? विचार करूनही डोके चालेना ..वर पहिले ...मँडम मिस्कील पणे हसत होत्या .. शेवटी म्हणालो ..फायदे कसले असणार मँडम ..सगळा वैतागच आहे . मँडम बोलू लागल्या ..माणसाचे असेच होते ..एखाद्या संकटात किवा कठीण परिस्थितीत ..दुखण्यात वगैरे .. नेहमी त्या परिस्थितीच्या त्रासदायक बाजूंचाचआपण विचार करतो .. दुसरी बाजू ध्यानातच घेत नाही ..म्हणून परिस्थिती अधिक कठीण वाटते ..अडचणी .संकटे ..आजार .. हे तर निसर्ग नियम आहेत ..त्याला कोणीही अपवाद नाहीत ..प्रत्येकाला आपले संकट इतरांपेक्षा जास्तच मोठे वाटते ..अशा वेळी जर परिस्थितीच्या दुसर्या बाजूचा विचार केला तर .. त्या परिस्थितीच्या काही सकारात्मक बाजू देखील सापडतात ..तुला पाय मोडल्याचे फायदे लिहिता येत नाहीत.. कारण तू सकारात्मक बाजूचा काही विचारच केलेला नाहीस ..सारखा पाय मोडला म्हणजे वाईट झाले असाच नकारात्मक विचार करत असतोस .. मी सांगते काय काय फायदे आहेत ते ..तुला तुझ्या इतर कामामधून तात्पुरती सुट्टी मिळाली आहे हा पहिला फायदा .. दुसरे असे की तुला बरेचदा बसल्या जागी जेवण.. चहा ..नाष्टा मिळतो ..त्यासाठी जरी तुला मित्रांच्या मनधरण्या कराव्या लागत असतील तरी ते कंटाळून का होईना आणून देतात ना ? मनधरण्या करताना तुला हे देखील मनात जाणवत असेल की प्रत्येकाला कधीना कधी आसपासच्या लोकांची मदत लागते ..ही जाणीव अहंकार कमी करू शकते ..तुला त्यांच्याशी नम्रतेने वागायला शिकवते ..अजून एक म्हणजे तुला वाचनाची आवड असूनही ..पुन्हा पुन्हा रीलँप्स झाल्याने तुझी मनस्थिती अतिशय चंचल झालेली आहे ..म्हणून तू वाचन करणे टाळतोस .. आता इतर कामे नसल्याने तू ठरविलेस तर खूप वाचन करू शकतोस या काळात ..तसेच पडल्या पडल्या आत्मपरीक्षण करत राहणे ..भूतकाळातल्या चुकातून धडा घेणे वगैरे आहेच .
मँडम नेहमी बोलताना थेट डोळ्यात पाहून बोलत असत .. त्यांचा मुद्दा अगदी मनाच्या तळापर्यंत पोचण्यासाठी असावे बहुधा .. मी नुसताच मान डोलवत होतो .. ही दुसरी बाजू मी कधी ध्यानातच घेतली नव्हती ..मला असा सकारात्मक विचार करण्याची सवयच नव्हती म्हणूनच तर मी वारंवार निराश ...वैफल्यग्रस्त होतो होतो ..या पुढे आपण सांगता तसा विचार करून ..वाचन करीन ..वगैरे आश्वासन देवून मकी केबिनच्या बाहेर पडलो .. आश्वासन पाळले जाईल की नाही हे माझ्या प्रामाणिकतेवर अवलंबून होते .. तेथून थेट लायब्ररीत गेलो .. एक पुस्तक घेतले आणि बेडवर येवून वाचत पडलो .
( बाकी पुढील भागात )
======================================================
अंतर्मनाची अगाध शक्ती ??? (पर्व दुसरे -भाग ५८ वा )
मँडमच्या समुपदेशन नंतर मी नियमित वाचन सुरु केले ..त्यांनी सांगितल्या प्रमाणे प्रत्येक घटनेची सकारात्मक बाजू पहायची असे ठरवले ..उगाच मी किती गरीब ..बिच्चारा ..माझ्यावर अन्याय होतोय असे नकारात्मक विचार न करता ..आहे त्या परिस्थितीत आपल्याला काय चांगले करता येईल हे पहावे असे वाटू लागले ..त्या नंतर मी जरा शांत राहू लागलो .. आफ्टर केअर मधील माझ्या मित्रांना ..हा बदल आवडला नसावा बहुतेक ..तसेच असते ..सारखा टिंगल टवाळी..चेष्टा ..मस्ती करणारा मी शांत बसू लागलो तेव्हा माझ्या मित्रांना माझ्या अशा वागण्याची सवय नसल्याने ते सारखे मला डिवचत असत ..काहीतरी खोड्या कराव्या म्हणून ..माझे टोपण नाव काही मित्रांनी ' टवळया ' असेच ठेवले होते ..कितीही शांत राहायचा प्रयत्न केला तरी बंधू जवळ असला की मला राहवत नसे ..काही न काही कारणाने ..माझा शांत राहण्याचा निश्चय डळमळीत होई ..
एकदा माझ्या पोटात खूप दुखण्यास सुरवात झाली .. अचानक केव्हाही प्रचंड वेदना सुरु होत ..साधारण एक दोन तासांनी त्या थांबत .. आधी पित्त झाले असे वाटले ..म्हणून पित्त .. अपचन ..वगैरे गोळ्या घेवून झाल्या ..पण फरक पडेना ..या वेदना एकदा सुरु झाल्या की मला काही सुचत नसे ..सतत चार दिवस असे दुखणे सुरु राहिल्यावर मला राजन नावाचा मित्र.. दुखण्याची लक्षणे पाहून म्हणाला .. मला देखील पूर्वी असेच दुखायचे ..मग शेवटी सोनोग्राफी करावी लागली तेव्हा समजले कि ' युरीन स्टोन ' आहे ..मग तशी औषधे घेतली ... शस्त्रक्रिया करून काढला तो स्टोन .. राजनचे हे बोलणे मी खूप मनावर घेतले .. आपल्यालाही नक्की ' युरीन स्टोन ' असावा असे वाटू लागले ..आता अशा पायाला प्लास्टर लावलेल्या अवस्थेत ..बाहेर हॉस्पिटल मध्ये जाणे .. सोनोग्राफी वगैरे करणे कठीणच होते .. त्याच वेळी मला डॉ. दीपक केळकर यांच्या संमोहन शिबिराची आठवण झाली .. आपले अंतर्मन अतिशय शक्तिशाली असून .. आपण अंतर्मनालानेहमी योग्य पद्धतीने सूचना देत गेलो तर त्या सूचना अंतर्मन स्वीकारून शरीराला तसे करण्यास भाग पाडू शकते हे त्यांनी सांगितले होते .. त्या प्रमाणे आपण करायचे असे मी ठरवले ..
त्या नुसार ..जेव्हा जेव्हा पोटात दुखणे सुरु होईल तेव्हा .. मी मन पोटात ज्या भागात वेदना होत आहेत त्या ठिकाणी डोळे मिटून एकाग्र करीत असे .. त्या वेदना नीट अनुभवत असे .. मनाला असे सांगत असे ..की माझ्या शरीरात ज्या भागात वेदना होत आहेत ..तेथे जी काही समस्या असेल ती नष्ट कर .. असे लागोपाठ तीनचार दिवस सुरु ठेवले ..आणि पाचव्या दिवशी सकाळी लघवी करताना एकदम लघवीच्या मार्गात जळजळ सुरु झाली .. मूत्रमार्गातून काहीतरी बाहेर पडू पाहतेय असे जाणवले ..त्या अडथळयामुळे लघवी नीट होईना ... लघवीच्या मार्गाबाहेर काहीतरी अडकले असल्याचे जाणवले ..बोटाला अडकलेले ते काहीतरी खरखरीत लागले .. मी ताबडतोब आफ्टर केअर मधील ' डँनियल ' या मित्राला ते सांगितले व काय करू विचारले ..डँनिअलचा नर्सिंगचा कोर्स झालेला होता ..तो पूर्वी दुबई वगैरे ठिकाणी नर्सिंगचे काम करत होता .. त्याने सगळे निट पाहून.. मला भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला .. मी तसे केले ..आणि तासाभराने मला लघवी लागली .. मी मूत्रमार्गातून नेमके काय बाहेर पडतेय ते पाहण्यास उत्सुक होतो...त्यामुळे लघवी मुद्दाम प्लास्टिकच्या मगात केली ... आश्चर्य म्हणजे त्यात लघवी सोबत फोर्सने एक काळपट रंगाचा खरखरीत .. विटकरीच्या बारीक तुकड्यासारखा हरब-याच्या डाळी एव्हढा खडा बहर पडला .. डँनियलने तोच युरीन स्टोन असल्याचे सांगितले .. त्या नंतर माझे पोट दुखणे बंद झाले . मुक्तांगणचे फिजिशियन डॉ. जॉन अल्मेडा यांना जेव्हा तो खडा दाखवला तेव्हा इतका मोठा खडा काहीही औषध ...शस्त्रक्रिया ..न करता बाहेर पडला याच्यावर त्यांना विश्वास ठेवणे कठीण गेले .. माझ्या अंतर्मनाला मी एकाग्रपणे दिलेली सूचना इतकी प्रभावी होती कि नंतरही मला... साधारण वर्ष दोन वर्षातून असे खडे लघवीच्या मार्गातून बाहेर येण्याचा अनुभव आलेला आहे .
( बाकी पुढील भागात )
=====================================================
आशा-निराशेचा खेळ ! (पर्व दुसरे भाग ५९ वा )
मुक्तांगण मध्ये असतानाच एकदा आईचा फोन आला .. अकोल्याच्या माझ्या भाचीचे लग्न ठरले आहे असे तिने सांगितले .. तिने फक्त मला माहिती देण्यासाठी म्हणून हा फोन केला होता ..मला लग्नाला आग्रहाचे निमंत्रण वगैरे अजिबात नव्हते ..त्या फोनच्या निमित्ताने माझ्या मनात पुन्हा... अनघा भेटू शकेल ही आशा निर्माण झाली .. एकाच भागात राहत असल्याने लग्नाला अनघा येण्याची शक्यता होती ..कदाचित म्हणूनच आईने मला ' तू लग्नाला ये '..असे निमंत्रण दिले नसावे असे वाटले ..मी कसेही करून अकोल्याला जायचे ठरवले .. माझा पाय प्लास्टर मध्ये असल्याने मुक्तांगण मधून परवानगी मिळणे कठीणच होते ..त्यासाठी बरेच खोटेनाटे करावे लागणार होते ..नेमक्या त्याच काळात मँडम पुन्हा केमोथेरेपी साठी मुंबईला गेल्या होत्या .. पाय सहा आठवडे प्लास्टर मध्ये ठेवायला सांगितले होते डॉक्टरांनी.. आताशी चार आठवडे उलटून गेले होते .. मी कुबड्या न घेता पाय जमिनीवर ठेवून चालता येते का ते तपासले ..तर थोडे थोडे दुखले ..मात्र जमले ..लगेच प्लान केला ..रात्री मुद्दाम बाथरूममध्ये जाऊन प्लास्टरवर पाणी टाकून... ते ओले केले .. इतके ओले झाले की त्यातील कडकपणा निघूनच गेला .. मग सगळ्यांना ते लिबलिबीत प्लास्टर दाखवून ..याचा काही फायदा नाही आता ..कापूनच काढतो असे म्हणत ..ब्लेड ने ते प्लास्टर कापले .. आतील पायाचा भाग दुसऱ्या पायापेक्षा जरा बारीक आलेला दिसला .. थोडे चालायची सवय केली दोन दिवस .. मग मँडमच्या अनुपस्थितीत काम पाहणाऱ्या सरांना खोटेच सांगितले की पाय बरा झाला आता .. तसेच मँडमशी देखील पूर्वी बोलणे झाले आहे ..त्यांनी मला अकोल्याला लग्नाला जाण्यास परवानगी दिलेली आहे ..अकोल्याहून मग नाशिकला जावून पूर्ववत काम सुरु कर असे मडम म्हणाल्या होत्या हे देखील सांगितले ..सरांनी माझ्यावर विश्वास ठेवला ..त्यांनी मला अकोल्याला ..तेथून नाशिकला जाण्यास परवानगी दिली ...व्यसनी व्यक्ती इतरांना आपल्या बोलण्याच्या जाळ्यात सहजगत्या अडकवून ..स्वतच्या मनासारखे वागण्यास इतरांची संमती मिळवतो ' मँन्युप्युलेट ' करण्यात हातखंडा असतो आमचा .
उमराणी सरांची परवानगी मिळाल्यावर माझे काम झाले ..लग्नाच्या दोन दिवस आधी मी मुक्तांगण मधून डिस्चार्ज घेतला ... स्टाफ मिटिंग मध्ये रीलप्स झालेल्या कार्यकर्त्यांना सहा महिने पगार मिळणार नाही नियम झाला असला तरी माझ्या बँक खात्यात ' सामाजिक कृतज्ञता निधी ' चे मिळणारे मानधन जमा झालेले आढळले .म्हणजे तो नियम फक्त मुक्तांगण कडून पगार मिळणाऱ्या कार्यकर्त्यांना लागू झाला .मला खूप आनंद झाला ..माझ्या खात्यात आता बरीच रक्कम होती .. अर्थात ती मी मनासारखी काढू शकणार नव्हतो ..कारण पासबुक व चेकबुक मुक्तांगांच्या अकौंटंटच्या ताब्यात होते .. त्यांच्याकडून गोड बोलून ..खोटी नाटी कारणे सांगून तीन हजार रुपये काढले .. आणि अकोल्याला गेलो .. जर मँडम त्यावेळी मुक्तांगण मध्ये असत्या तर ..माझे खोटे नक्कीच चालले नसते .. एका व्यसानीला त्या चांगल्याच ओळखून असत .
अकोल्याला गेल्यावर ..सर्वाना मला पाहून आश्चर्य वाटले ..आईने तू एकदम कसा आलास वगैरे विचारले ..तिला मँडमने परवानगी दिली असे सांगितले .. प्लास्टर लवकर काढल्याने पाय चालताना जरा दुखत असे .. इतरांसमोर अजिबात दुखत नाही असे नाटक करावे लागे मला ....मी आडून पडून भाचीकडे अनघाची चौकशी केली ..तिने मला थांग लागू दिला नाही .. अनघाचे लग्न झाले होते हे नक्की होते ..तरीही मला तिला एकदा तरी डोळे भरून पहायची ..तिची माफी मागायची इच्छा होती ..लग्नाच्या दिवशी अनघाचे वादेईल लग्नाला आले होते ..पण सलील किवा अनघा या पैकी कोणीच आले नाही ..माझा अपेक्षाभंग झाला .. लगेच मनात निराशा दाटून आली .. वाटले आपली साधी अनघाला एकदा पाहण्याची देखील अपेक्षा पूर्ण होऊ नये हे किती दुर्दैव आहे आपले .. स्वतची खूप कीव आली .. त्या रात्री लग्नाला आलेल्या भाच्याच्या मित्रांबरोबर गुपचूप दारू प्यायलो... आमच्या सगळ्या सुख .दुखःच्या भावना नशेशी निगडीत असतात .हे नशेचे भावनिक बंधन तोडायला खूप प्रामाणिकता आणि वेळ द्यावा लागतो .
( बाकी पुढील भागात )
=====================================================
नवीन आघात ! ( पर्व दुसरे .. भाग ६० )
भाचीचे लग्न झाल्यावर .. आई , भाऊ , वाहिनी वगैरे अजून दोन दिवस तेथे राहणार होते ..अनघा बद्दल काहीच बातमी न समजल्याने ..तिची भेट न झाल्याने मी खूप निराश झालेलो होतो ..त्यामुळे तेथे थांबलो नाही .. घराची किल्ली घेवून एकटाच नाशिकला परत आलो .... दोन दिवस आई परत येईपर्यंत खूप दारू पिवून माझी निराशा साजरी केली .. आई परत आल्यावर... पुन्हा नियमित रोटरी हॉलच्या मिटींग्स सुरु केल्या ..भद्रकाली पोलीस स्टेशन मधून पाटील साहेबांची बदली झालेली होती ..तसेच रानडे साहेबांची देखील नाशिकहून पुण्याला बदली झाली ..भद्रकाली पोलीस स्टेशनला नव्याने बदलून आलेले श्री .भास्करराव धस साहेबांची आणि माझी पाटील साहेबांनी जाण्यापूर्वी ओळख करून दिलेलीच होती .. धस साहेब देखील व्यसनमुक्तीच्या कामात रस घेणारे होते .. त्यांनी पाटील साहेबांप्रमाणेच मला मदत करण्याची तयारी दर्शविली ..कादर..अजित ..संदीप .. संजय ..अविनाश वगैरे आठदहा जण पुन्हा मिटींग्सना नियमित येवू लागले होते ..सुमारे सहा महिने मी मुक्तांगणला राहून आलो तरी देखील पूर्वी नाशिकमध्ये चांगले काम केले असल्याने मिटींग्स वर फारसा फरक पडला नव्हता ..कादरचे ब्राऊन शुगर ओढणे सुरूच होते .. आता गौड साहेबांकडे आमचे जाणे कमी झाले होते ..कादर अजित व मी आमचे तिघांचे असे त्रिकुट झाले होते की प्रत्येक वेळी आमच्या पैकी एखादा जण रिलँप्स झाला की काही काळाने इतर दोघेही रिलँप्स होत असत .. हा तिढा सोडविण्यासाठी तिघांपैकी एकाने तरी खंबीर राहणे आवश्यक होते.
नाशिकला येवून सुमारे दोन महिने मी ब्राऊन शुगरकडे वळलो नाही ..परंतू अधून मधून गुपचूप रात्रीचे दारू पिणे सुरु होते .. खरेतर हे देखील वाईटच ..पण मी ब्राऊन शुगर तर पीत नाहीय ना ? असे स्वतःचे खोटे समाधान करून घेत होतो ..खरेतर दारू आणि ब्राऊन शुगर किवा इतर मादक पदार्थ यात फारसा फरक नव्हताच .. फक्त नुकसान होण्याचा वेग कमी जास्त असतो .... ब्राऊन शुगरच्या तुलनेत दारू स्वस्त असल्याने ..मला पैश्यांची फारशी अडचण येत नव्हती इतकेच ..मी पुन्हा ब्राऊन शुगरकडे वळू नये याची पुरेपूर काळजी घेत होतो .. म्हणून मिटींग्स पुरतेच कादर आणि अजितला भेटत असे .बाकी वेळ घरीच वाचनात वगैरे घालवीत होतो .. एकदा माझ्या मित्राने भगूर येथे उद्या रात्री काव्य संमेलन आहे असे सांगितले ..नाशिक मधील सगळे मातब्बर मंडळी येणार आहेत ..छान कवितांची मेजवानी आहे असे सांगितले .. मला जायचे होतेच पण दुसऱ्या दिवशी शनिवार होता ..आधी मिटिंग करून मग जाता आले असते .. पण संमेलन सायंकाळी सात वाजताच सुरु होणर होते ..मिटिंग नंतर गेलो तर उशीर होणार होता ..म्हणून एखादा दिवस मिटिंगला नाही गेलो तर काही फरक पडणार नाही असा विचार करून ..मी मिटींगला येणार नाही असा कोणालाही निरोप न देताच त्या साहित्यिक मित्रासोबत काव्य संमेलनाला गेलो .. संमेलन संपल्यावर खूप दारू ढोसली आणि मित्राच्याच घरी झोपलो .
सकाळी दहा वाजताच घरी आलो .. आल्यावर आईने निरोप दिला की संदीप आणि त्याची पत्नी मला भेटण्यासाठी आले होते .. संदीप खूप डिस्टर्ब होता .. त्याला माझ्याशी बोलायचे होते .. तो आधी मिटींगला गेला पत्नीला घेवून .. तेथे माझी वाट पाहिली..मी भेटलो नाही म्हणून तो तुषार घरी भेटेल ..त्याचे घर मला दाखव म्हणून कादरच्या मागे लागून पत्नी सोबत माझ्या घरी येवून गेला होता ..संदीप खूप दारू पिवून होता ..रडत होता ... आईने तुषार कुठे गेलाय माहित नाही हे सांगून त्याची समजूत काढली होती ....माझ्याकडे संदीपचे इतके काय अर्जंट काम असावे ते समजेना ...शेवटी पुढच्या मिटींगला भेटेल तेव्हा बोलू त्याच्याशी असा विचार केला ..संदीप हा मुक्तांगण मध्ये दोन वेळा उपचार घेवून.. गेल्या आठ महिन्यापासून चांगला राहत होता .. थोडासा अबोल ..वाचनाची खूप आवड असणारा संदीप विवाहित होता एक छान गोंडस सहा महिन्यांची मुलगी देखील होती त्याला ..त्यांचा घरचा व्यवसाय होता ..त्यात भावंडांमध्ये काहीतरी कुरबुरी होत असत .. तो मिटिंगला आला की सगळे माझ्याकडे शेअर करत असे .. यावेळी देखील काहीतरी किरकोळ कुरबुर झाली असावी त्याची घरी असा मी अंदाज बांधला .. संध्याकाळी कादर माझ्या घरी आला ..सांगू लागला ' कल तेरी बहोत राह देखी मिटिंगमे हमने .. संदीप को तेरे साथ बात करनी थी ....वगैरे ' दुसऱ्या दिवशी सकाळी पेपर वाचताना मला एकदम धक्काच बसला .. संदीपने ..आदल्या दिवशी रात्री घरीच खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची बातमी होती ..मी जर त्या दिवशी काव्य संमेलनाला गेलो नसतो ..तर नकीच संदीपची भेट झाली असती ..त्याला समुपदेशन करून शांत केले असते ..तो देखील त्याच आशेने मी मिटींगला भेटलो नाही म्हणून घरी येवून गेला ..म्हणजे अप्रत्यक्षपणे मीच त्याच्या मृत्यूला कारणीभूत होतो असे मला वाटू लागले .
( बाकी पुढील भागात )
Trekz Titanium Headphones - TITanium Arts
जवाब देंहटाएंThe T1 T-800G Headphones has a large band ti89 titanium calculators that can be attached to the titanium earring posts back ion titanium hair color of the pure titanium earrings neck. · The T1 comes with a Microphone that allows you to adjust the volume titanium price per ounce of