गुरुवार, 1 अगस्त 2013

व्यसनमुक्ती अभियान


पथनाट्ये ! (पर्व दुसरे - भाग ४१ वा )


व्यसनमुक्ती अभियानाचे उद्घाटन झाल्यावर..जेवून आम्ही सर्व पुन्हा हॉटेल वर गेलो ...पथनाट्याची तालीम करायची होती .. ..एक कॉलेजचा तरुण मुलगा ..अतिशय संवेदनशील ..मात्र व्यक्तिगत जीवनातील समस्यांमुळे हताश झालेला ..अश्या अवस्थेत त्याला कॉलेजमध्ये एक बिघडलेला मित्र भेटतो .. या मित्राच्या आग्रहामुळे नायक मुलगा बिघडतो ..व्यसनाधीन होतो .. घरात चोऱ्या..भांडणे करू लागतो ..सरतेशेवटी त्याला घरातून हाकलून दिले जाते ...मग तो भणंग अवस्थेत फुटपाथ वर राहतो .. शेवटी तो जिवनाला खूप कंटाळलेला ..वैफल्यग्रस्त अवस्थेत ..टर्कीत असताना मनापासून व्यसनमुक्तीची इच्छा दर्शवितो ..तेव्हा त्याला बिघडवणारा मित्र येतो ..हा मित्र आता ' मुक्तांगण ' मध्ये उपचार घेवून बरा झालेला आहे ..तो मित्र मग पथनाट्याच्या नायकाला व्यसनमुक्तीची प्रेरणा देतो ..आणि नायक व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतो .. अशी पथनाट्याची मध्यवर्ती संकल्पना होती ...यातील नायकाचा रोल बंधू करणार होता ..तर त्याला बिघडवणा-या बेरकी मित्राचा रोल मला करायचा होता .. पथनाट्याच्या सुरवातीला ..आम्ही सर्व व्यसनमुक्तीच्या घोषणा देत असू ..बंधू गळ्यात ढोलकी बांधून मध्यभागी उभा राहत असे ...गर्दी जमा झाली की मग पथनाट्य सुरु होई .. बंधू आणि माझे अभिनयाचे तसेच उत्स्फूर्त संवादाचे मस्त ट्युनिंग जमलेले होते .

सायंकाळी ५ वाजता पहिले पथनाट्य ..पेठ नाक्यावर झाले ..पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता ..पथनाट्याला बाबा मँडम देखील उपस्थित होत्या ..पथनाट्य चालू असताना लक्ष गेले तर मुक्ता मँडम आणि त्यांचा पती आशिष देखील आलेला दिसला ...खूप गर्दी होती पथनाट्याला कारण पोलिसांनी आधीच सगळीकडे जाहिरात केली होती याबाबत ..तो प्रयोग संपल्यावर लगेच पुढचा प्रयोग ..पेठरोड वरील फुले नगर येथे होता ..तो झाल्यावर लगेच नाशिकरोड येथे जेलरोड विभागात पाण्याच्या टाकीजवळ तिसरा प्रयोग .. आम्हाला पुन्हा हॉटेलवर परतायला रात्रीचे १२ वाजले .. सगळा दिवस एकदम मंतरल्या सारखा निघून गेला .. रात्री मी मुक्तांगणच्या मित्रांसोबत हॉटेलवरच झोपलो ..कादर जो सकाळी घाई घाईत दिसला तो नंतर परत आमच्याकडे फिरकला नाही ..नाशकात मुक्तांगणची आलेली असताना ..कादरचे असे आमच्यापासून दूर राहणे खचितच चांगले लक्षण नव्हते..दुसऱ्या दिवशी सर्व स्थानिक वर्तमान पत्रात व्यसनमुक्ती अभियानाची बातमी आलेली होती .. उद्घाटन माझ्या हस्ते झाल्याचा उल्लेख .. दैनिक सकाळचे पत्रकार श्री . प्रदीप निफाडकर यांनी खूप छान व सविस्तर बातमी दिलेली होती ..तसेच सकाळच्या पहिल्या पानावर माझा उद्घाटन करतानाचा फोटो देखील छापलेला ..सर्वांनी माझे अभिनंदन केले .. एका दिवसात माझे नाव नाशिक जिल्ह्यात पसरले होते ..सामाजिक कार्यकर्ता म्हणून . 

दुसऱ्या दिवशी पुन्हा शालीमार ..भद्रकाली आणि दुपारी त्र्यंबकेश्वर येथे पथनाट्ये झाली ..तिसऱ्या दिवशी .. कालिदास सभागृहात अभियानाचा समारोप झाला ..तेव्हा देखील पथनाट्य झाले .. नंतर दुपारी मुक्तांगणचे लोक पुण्याला परतले .. हे दोन दिवस एकदम भुर्रकन उडून गेले होते .. तिसऱ्या दिवशी कादर कालिदास सभागृहात आलेला होता .. माझी नजर चोरत होता .. मी त्याला हटकलेच शेवटी .. त्याला बाजूला घेवून गेलो आणि सरळ म्हंटले .." तेरा नाटक फिरसे शुरू हो गया ? " यावर क्षीण हसला .. व्यसनी माणूस जसा समर्थने देतो तसा घरच्या मंडळींवर आरोप करू लागला ..समर्थने देवू लागला .. सुमारे चार महिने चांगला राहून देखील घरची मंडळी विश्वास ठेवत नाहीत अशी तक्रार करू लागला .. या आजाराचे असेच असते .. व्यसनमुक्त असताना जीवनात सगळे काही चांगले घडावे ... ते देखील पटापट अशी अपेक्षा प्रत्येक व्यसनीला असते .. जेव्हा तसे घडत नाही ..तेव्हा परत व्यसन सुरु होते ... इतके वर्षांचा गमावलेला विश्वास काही दिवसात कसा परत मिळणार ? 

( बाकी पुढील भागात )

========================================================================


अहंकार ..! (पर्व दुसरे -भाग ४२ वा )


व्यसनमुक्ती अभियानामुळे मी चांगलाच प्रसिद्ध झालेलो होतो .. आता आठवड्यातून होणाऱ्या मिटींग्स न गर्दी वाढू लागली होती ..अभियानाच्या वेळी रानडे व पाटील साहेबांनी नाशिक शहरातील दानशूर लोकांकडून व्यसनमुक्ती साठी काही निधी गोळा केला होता .. जे व्यसनी अगदी गरीब आहेत ..ज्यांच्याकडे उपचारांना पुरेसे पैसे नाहीत .. अशा लोकांना या निधीतून पैसे देवून ' मुक्तांगण ' मध्ये उपचार घेण्यासाठी मदत करावी असा प्रस्ताव त्यांनी माझ्याकडे मांडला ..अतिशय चांगलाच प्रस्ताव होता .. अनेक जणांना मदत मिळू शकली असती .. जे लोक नियमित मिटींग्सन येतील..ज्यांची व्यसनमुक्तीची प्रामाणिक इच्छा असेल ..खरोखर गरीब असतील त्यांनाच ही मदत मिळणार होती ..असे व्यसनी निवडण्याचे काम रानडे साहेबांनी माझ्याकडे सोपविले ..त्यामुळे माझा भाव वाढला होता .. त्याच प्रमाणे नाशिक मधील काही पाकीटमार गर्दुल्ले .. किरकोळ चोऱ्या करणारे गर्दुल्ले यांच्यावर रानडे साहेबांनी गर्दच्या केसेस न करता कलम १०९ व ११० च्या केसेस केल्या होत्या ..या केसची सुनवाई सहाय्यक आयुक्तांकडेच असे ..अश्या लोकांना रानडे साहेब तू नियमित तुषार नातुना भेट ..त्यांनी तू मिटिंग ला येतोस असा निर्वाळा दिला तरच मी तुझ्यावरील केस निर्दोष करीन ..अन्यथा जेल मध्ये टाकीन असा दम भरला होता ..याचा परिणाम होऊन पूर्वी कधीच मिटिंगला आलेले .. उपचार न घेतलेले ..गुन्हेगारीच्या केसेस असलेले गर्दुल्ले मिटिंगला येवू लागले ..आवर्जून मिटींगच्या उपस्थितीच्या रजिस्टर मध्ये सही करू लागले .

एकदा एक संजय नावाच्या गर्दुल्ल्याची रानडे साहेबांकडे १०९ च्या केसची सुनवाई होती तो तीनचार मिटींग्स न लागोपाठ आला ..मग रानडे साहेबांपुढे हजर होण्याच्या आदल्या दिवशी मिटिंगला आला व मला विनंती केली की रानडे साहेबांकडे तुम्ही माझ्यासोबत चला व सांगा की मी मिटींग्सना नियमित येतोय ..तरच ते माझ्यावरची केस काढणार आहेत ..दुसऱ्या दिवशी मी त्याच्या सोबत मुंबई नाक्यावर असणाऱ्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात गेलो ..तेथे अनेक वकील मंडळी पण होती .. संजयच्या केसचा पुकारा झाल्यावर त्याचा वकील व मी दोघेही आत गेलो ..समोर रानडे साहेब बसलेले होते ..त्यांनी आम्हाला बसायची खुण केली ..आरोपी संजय मात्र उभाच होते .. त्याची बाजू मांडण्यासाठी त्याचा वकील उभा राहून रानडे साहेबांशी बोलू लागला ...वकिलाचे म्हणणे ऐकून मग रानडे साहेब माझ्याशी बोलू लागले .. संजय नियमित मिटिंगला येतो का असे त्यांनी मला विचारले ..मी बसूनच होकार दिला .. गेल्या चार पाच मिटींग्स पासून येतो आहे असे सांगितले ..हे सर्व बोलताना मी बसूनच बोलत होतो .. संजयचा वकील मला उभे राहून साहेबांशी बोला असे खुणावीत होता ..तेव्हा रानडे साहेबांनी त्या वकिलाला सांगितले की तुषार नातुना उभे राहून बोलण्याची काही गरज नाही ..बसूनच बोलले तरी चालतील .. एसीपी कोर्टात उभे राहून बोलायचे असते ही प्रथा मला माहित नव्हती . रानडे साहेबांनी मला बसून बोलले तरी चालेल अशी सवलत देवून माझा सन्मानच केला होता .. माझ्या सांगण्यावरून मग रानडे साहेबांनी संजायवरील केस काढून टाकली .

मला मिळत असलेला हा सन्मान नकळत माझा अहंकार वाढवीत होता ..अभयला मी झोपेच्या गोळ्या खाल्ल्या म्हणून रागावल्यापासून तो नियमित नाही पण अधून मधून गोळ्या खातच होता ..कादरचे ब्राऊन शुगर पिणे देखील सुरु झाले होते .. त्यामुळे माझा व्यापही वाढलेला .. कादरला उपचार परत घे असे समजावत राहिलो .. तितक्यात इतके दिवस चांगला राहणारा अजित देखील एकदोन वेळा कादर सोबत ब्राऊन शुगर प्यायल्याचे समजले .. मी खूप वैतागलो त्यांच्यावर ..एकीकडे यांच्या व्यसनमुक्तीसाठी मी जीवाचे रान करतोय ..मात्र यांना माझी काही किंमत नाही असे वाटू लागले .. आपण मदत केलेला प्रत्येक व्यक्ती व्यसनमुक्त राहिलाच पाहिजे हा अहंकार होता त्यामागे माझा. ..एकदा माझ्या साहित्यिक मित्रांसोबत एका कवी संमेलनाला गेलो होतो .. तेव्हा संमेलन संपल्यावर आम्ही दोघे तिघे रात्री एका बारमध्ये गप्पा मारत बसलो होतो ..त्या मित्रांनी बियर मागवली .. मला देखील थोडी घे असे म्हणाले .. त्यांना हे माहित नव्हते कि व्यसनाधीनता हा आजार असा आहे की कोणत्याही स्वरुपात मादक पदार्थ एकदा जरी सेवन केला तरी पुन्हा शारीरिक आणि मानसिक ओढ जागृत होते व लवकरच अधपतन सुरु होते ..अर्थात मला सगळे माहित असूनही ..माझा वाढलेला अहंकार मला सांगत होता की बियर पिण्यास काय हरकत आहे ..झाले .. आजार जिंकला ..मी त्यांच्यासोबत त्या दिवशी बियर प्यायलो थोडी ! 

( बाकी पुढील भागात )
========================================================================



दुहेरी जीवन ! (पर्व दुसरे -भाग ४३ वा ) 


व्यसनाधीनता या आजाराला धूर्त ..कावेबाज ..वाढत जाणारा ..गोंधळात टाकणारा ..ताकदवान आणि कायमचा आजार असे म्हंटले जाते ..म्हणजे ...व्यसनापायी खूप नुकसान होऊनही .. व्यसनमुक्त राहत असताना व्यसनी व्यक्तीला व्यसनाचे आकर्षण वाटत राहते ..तसेच मागच्या वेळी आपण जरा जास्त केले होते म्हणून नुकसान झाले आपले ..या वेळी आपण शहाणे झालो आहोत ..आता एखादे वेळी व्यसन केले तर ..पुन्हा तितक्या वाईट पातळीला आपण जाणार नाही ..असा फसवा .. खोटा आत्मविश्वास त्याला वाटत राहतो ..तसेच आपण व्यसनी आहोत किवा नाही ..आपल्याला हा आजार जडला आहे किवा नाही ..हे ठरविणे त्याला कठीण जाते ..त्याच्या मनाचा गोंधळ उडतो ..आपले अजूनही फारसे नुकसान झालेले नाही असे त्याला वाटत राहते ..लोक उगाच आपल्या व्यसनाचा बाऊ करतात .. यावेळी मागच्या वेळे सारखे नुकसान मी होऊ देणार नाही ..असे घातक विचार त्याच्या मनात गोंधळ माजवतात .. याला इंग्रजीत Doing same mistakes again and again ..expecting different results असे म्हणतात .

एकदा मनात थोडीशी घ्यावी असा विचार शिरला की तो विचार इतका शक्तिमान असतो की व्यसनी व्यक्तीला एकट्याच्या बळावर तो विचार टाळणे बहुधा जमत नाही ..अश्या वेळी त्याने कोणाची तरी प्रामाणिकपणे मदत घ्यायला हवी ...अन्यथा ' सारे रिश्ते नाते तोड के आ गई ..ले मै तेरे वास्ते जग छोडके आ गई ' अशी त्याची अवस्था होऊन तो सगळी वचने ..शपथा विसरून व्यसनाकडे ओढला जातो ..हा मनोशारीरिक आजार कायमचा मानला गेला आहे ..कारण पूर्वी अथवा सुरवातीच्या काळात व्यसनाने दिलेला आनंद व्यसनी व्यक्तीच्या मनात खोलवर रुजलेला असतो तो पुसून टाकणे सहजा सहजी शक्य होत नाही ..त्यासाठी विचार ..भावना ..वर्तन.. यात सातत्याने सुधारणा करत गेले पाहिजे .. ज्या ज्या वेळी व्यसनी व्यक्ती भावनिक दृष्ट्या असंतुलित होईल ..जेव्हा जेव्हा काही न काही कारणाने त्याच्या भावना उत्तेजित होतील तेव्हा पुन्हा एकदा तो व्यसन करण्याची दाट शक्यता असते .. या आकर्षणाला बळी पडून एकदा जरी त्याने व्यसन केले तरी ..अंतर्मनात दडून बसलेला तो आकर्षणाचा राक्षस जिवंत होऊन .. मानसिक ओढ वाढत जाते ..त्याच प्रमाणे शरीरातील पेशी न पेशी बंड करून उठते ..शरीर अजून अजून अशी मागणी करत रहाते .. सारे नकारात्मक विचार पुन्हा जिवंत होतात ..निराशा ..खुन्नस .. जुने अपमान ..वंचना ..अन्यायाची भावना..ढोंगीपणा ..अप्रमाणिकपणा .. जागृत होऊन व्यसनी व्यक्तीला सतत अवस्थ ठेवण्याचे काम करते ..
त्या दिवशी मित्रांसोबत फक्त एक ग्लास बियर प्यायल्या नंतर माझीही थोडीफार अशीच अवस्था झाली होती .. कादरने व्यसन पुन्हा सुरु केल्याचा राग .. त्याचे व्यसन सुरु झाले आहे ..हे गौड सरांना कळले तर ते त्याला लेबोरेटरी मध्ये राहण्यास बंदी करतील ही भीती ..त्यामुळे त्याचे व्यसन सुरु झालेले आहे हे लपवण्याची कसरत ..कादर सोबत अजित सुद्धा बिघडला याची खंत .. अभयचे गोळ्या खाणे ..वगैरे गोष्टीनी आलेला अस्वस्थपणा .. शिवाय व्यक्तिगत जीवनातील अनेक दुखःद घटनांची आठवण .. अनघाचे माझ्यापासून दुरावणे ..त्यासाठी जवाबदार असलेले भावाने पाठवलेले पत्र ..भविष्याबद्दल वाटणारी असुरक्षितता .. सगळे सगळे उफाळून आले .. त्या दिवशी रात्री मी लेबोरेटेरीत नीट झोपू शकलो नाही .. कादरला खूप रागावलो ..त्याने मी काहीतरी नशा केली आहे हे ओळखले बरोबर .. मी रागावलो तरी काही बोलला नाही तो ..उलट माझी माफी मागू लागला ..दुसऱ्या दिवसापासून .. सगळ्या नकारात्मक भावना जागृत झाल्याने ..माझी झोप उडाली .. लवकरच मी पुन्हा एकदा दारू प्यायलो .. मग हळू हळू ..रोज रात्री मी ब्राऊन शुगर नाही मात्र थोडी दारू पिणे सुरु केले .. घराच्या बाहेर राहत होतो ..त्यामुळे घरी कळाले नाही लवकर .. म्हणजे दिवसभर पेशंटचा फॉलोअप .. व्यसनमुक्तीच्या मिटींग्स .. इतरांना व्यसनमुक्तीसाठी समजाविणे ..आणि रात्री मात्र स्वतः दारू पिणे .. असे दुहेरी जीवन सुरु झाले माझे ..आजाराचा पुढील भाग असा की असे ब्राऊन शुगर ऐवजी पर्यायी व्यसन दारू केले तरी ..काही दिवसातच गाडी मूळ व्यसनावर घसरते ...अथवा या पर्यायी व्यसनाचेच प्रमाण इतके वाढते की त्याची समस्या बनते .

( बाकी पुढील भागात )
 =================================================


घरी कलह ! ( पर्व दुसरे -भाग ४४ वा )


रात्रीचे गुपचूप दारू पिणे सुरु झाले तसे ..माझ्या दैनंदिन कामाच्या वेळापत्रकात हळू हळू बदल होऊ लागला .. सकाळी उशिरा उठून मग डॉ. गौड यांच्या लँब मधून घरी जाऊन ..अंघोळ वगैरे उरकून परत यायला उशीर व्हायला लागला .. कधी कधी आज कंटाळा आला म्हणून घरुच झोप काढू लागलो ..मेरीतील लोकशाही मित्र च्या मुलांना भेटणे कमी झाले .. माझ्या दिनक्रमात होत जाणारा बदल सर्वात आधी आईने ओळखला ..तिने मला तसे बोलूनही दाखवले ..जरी रात्री दारू प्यायली असली आणि सकाळी त्याचा वास येणार नाही असे मला वाटत असले तरीही ..सकाळी तोंडाला थोडासा आंबूस वास येतोच .. मी मात्र घरी कोणी त्याबद्दल काही बोलले तर नकार देत होतो ..एकदम घरच्या लोकांवर चिडत होतो ..अशा वेळी मी खूप आक्रमक होई घरात ..माझे चुकते आहे हे कबुल करण्या ऐवजी त्यांच्यावरच आरोप करू लागलो ..तुम्हीच माझ्या जीवनाचे नुकसान केलेत म्हणू लागलो.. घरी भावाची मोहितच्या पाठीवर झालेली मुलगी रसिका होती ..तिच्याशी आधी सारखे खेळणे कमी झाले ...एकदोन वेळा भावाशी भांडणही झाले .. मला मिळणारे मानधन कधीच संपून ..आईकडे पुन्हा पैसे मागणे सुरु झाले ..

डॉ .गौड यांनी त्याच काळात आम्हाला नवीन काम दिले .. एड्सच्या विषाणूची लागण होण्याचा अधिक धोका असलेला दुसरा गट म्हणजे ' ट्रक चालक ' ... हे लोक आपल्या घरादारापासून अनेक दिवस दूर असतात ..अशा वेळी लैगिक भूक भागविण्या साठी ते शरीरविक्रय करणाऱ्या महिलांकडे जातात ..मुळची बेफिकीर वृत्ती असल्याने योग्य ती काळजी घेण्याचे भान रहात नाही .. या लोकांचे प्रबोधन करण्याचे काम गौड सरांनी कादर व माझ्यावर सोपविले ..द्वारका नाक्यापाशी थांबून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रक मध्ये बसायचे ... वाटेत ट्रक चालकाला एड्सची माहिती द्यायची ..थेट इगतपुरी ..कसारा ..भिवंडी पर्यंत वाटेत असलेल्या ढाब्यांवर थांबून तेथे जेवणासाठी ..विश्रांतीसाठी थांबलेल्या ट्रक चालकांशी संवाद साधणे ..त्यांना मोफत कंडोम वाटणे ..त्यांच्यापैकी कोणाला गुप्तरोगाची लागण आढळल्यास ..त्याला योग्य ते उपचार घेण्यास सुचविणे ..एड्स बद्दल माहिती असलेली माहितीपत्रके वाटणे ..वगैरे कामे आम्ही करत असू ..कादरला माझे दारू पिणे सुरु झाले याचे वाईट वाटत होते ..त्याने मला दोन तीन वेळा तसे बोलूनही दाखवले ...परंतु तो स्वतःच संधी मिळेल तेव्हा ब्राऊन शुगर ओढू लागला होता ..त्यामुळे मला काही बोलण्याचा त्याला तसा काही नैतिक अधिकार उरला नव्हता .. उलट तुम्हीच जास्त टेन्शन देता मला ..असे मी त्याला म्हणत असे .

साधारण एक महिनाभरातच माझी भीड चेपली ... एकदा मी कादरला सरळ सरळ आज मला ब्राऊन शागर प्यायची आहे असे म्हणालो ..तू आणून दे म्हणून त्याच्यामागे लागलो ..तो नकार देवू लागला ..माझ्या सर्व ब्राऊन शुगर विक्रेत्यांशी ओळखी झालेल्याच होत्या ..ते माझा खूप आदर करत असत ..त्यामुळे सरळ सरळ त्यांच्याकडे जाऊन ब्राऊन शुगर विकत घेणे मला जमले नसते ..सर्वाना समजले असते माझे पिणे सुरु झाले आहे ते ..बातमी ' मुक्तांगण ' पर्यंत जायला वेळ लागला नसता .कादारच्या गळी पडलो ..शेवटी तो तयार झाला .. ब्राऊन शुगर देखील पिणे सुरु झाले ..तीन वर्षा नंतर परत व्यसने सुरु झाली माझी ..आईकडे पैसे मागणे वाढले ..इकडे रानडे साहेबांनी ब्राऊन शुगर विक्रेत्यांविरुद्ध मोहीम कडक केलेली होती ...ते मला विक्रेत्यांची नावे विचारात असत ..मात्र मी त्यांना आता माहिती सांगणे बंद केले .. त्यातच एकदा त्यांच्या नाईट राउंड मध्ये त्यांनी एक सुनिता नावाची १४ वर्षांची मुलगी ब्राऊन शुगर सहित पकडली ..तसे नाशकात चार-पाच शरीर विक्रय करणाऱ्या महिला ..ब्राऊन शुगरच्या व्यसनाधीन होत्या .

इतक्या लहान वयाची मुलगी ब्राऊन शुगरच्या व्यसनात अडकल्याचे हे पहिलेच उदाहरण होते नाशिकमधले ...रानडे साहेब भयंकर चवताळले ..त्यांनी सगळ्या विक्रेत्यांवर धाडी टाकण्याचे सत्र सुरु केले ...सुनिता अतिशय दुर्दैवाने या व्यसनात अडकली होती ..सुरेश पानवाला या ब्राऊन शुगर विक्रत्याच्या घरी सुनीताची आई धुणी -भांडी करण्याचे काम करत असे ..वडील दारुडे होते ..सुनिता नवनीत असताना आई आजारी पडली म्हणून ..सुरेशच्या घरी आईच्या ऐवजी ती धुणी भांडी करण्यास जाऊ लागली ..सुरेशच्या घरची मंडळी गावी गेली असताना ..एकदा सुरेशची नजर फिरली.. सुनिता नेहमी त्याला असे पन्नी घेवून ब्राऊन शुगर ओढताना पाहत असे ...नजर फिरल्यावर सुरेश तिला उगाचच खाऊ वगैरे साठी जास्त पैसे देवू लागला होता .. एकदा त्याने आग्रह केला व तिला ब्राऊन शुगर पाजली ..भले बुरे समजण्याचे तिचे वयच नव्हते ..शिवाय घरात दारुडा बाप .. अठराविश्वे दारिद्र्य .. सुरेश तिला पैसे देत होता ..तसेच तिचे लैंगिक शोषणही करत होता. ..

( बाकी पुढील भागात )
==========================================


सुनीताची फरफट ! ( पर्व दुसरे -भाग ४५ वा )


सुनीताला अल्पवयीन म्हणून रानडे साहेबांनी बालसुधार केंद्रात सहा महिने ठेवले .. इकडे सगळ्या ब्राऊन शुगर विक्रेत्यांवर कडक कारवाई सुरु केली ..अर्थात तरीही कोणी ना कोणी नवीन ब्राऊन शुगर विक्रेता तयार होतच होता .. आता माझे आणि कादरचे पिणेही सोबतच सुरु झालेले ... मला बहुतेक सगळे विक्रेते ओळखत असल्याने .. मी प्रत्यक्ष ब्राऊन शुगर विकत घ्यायला जाणे प्रशस्त नव्हते .. मी कादरच्या हातून माल मागवू लागलो .. मी पुन्हा पिणे सुरु केले आहे हे ' मुक्तांगण ' मध्ये कोणाला कळू नये याची दक्षता घेताना खूप कसरत करावी लागे ..त्याच काळात सोमवार पेठेत राहणाऱ्याअविनाश नावाच्या एका गर्दुल्ल्याशी ओळख झाली .. अविनाश पूर्वी सैन्यात ड्रायव्हर होता .. तेथून सुटीत घरी आला असताना त्याला ब्राऊन शुगरचे व्यसन लागले ..नंतर कामावर गेलाच नाही ..व्यसनापायी पत्नी मुलाला घेवून माहेरी निघून गेलेली .. हा एकटाच त्याच्या खोलीवर रहात असे.. अतिशय उत्कृष्ट पेंटर देखील होता ..साईन बोर्ड रंगविणे ..वगैरे कामे त्याला मिळत ..सगळे पैसे व्यसनात उडवत असे .. अविनाश खोलीवर एकटाच राहत असल्याने ..त्याच्या खोलीवर बसून निवांत ब्राऊन शुगर पिता येत असे !

सुनिता सहा महिने बाल सुधार गृहात राहून आली तरीही ब्राऊन शुगरच्या व्यसनाचा पगडा तिच्या मनावर बसलेला होताच .. आधी तिला सुरेश पानवाला शरीरसुखाच्या बदल्यात फुकट ब्राऊन शुगर पाजत असे ..रानडे साहेबांनी सुरेशवर कडक कारवाई केल्यानंतर सुरेशचा धंदा बंद पडला.. सुनीताचे ब्राऊन शुगर पिणे पुन्हा सुरु झाल्यावर व्यसनासाठी पैसे हवेत म्हणून ती सहजच वाममार्गाला लागली ... कोणत्याही भणंग गर्दुल्ल्यासोबत ती दिसे .. एक दोन पुड्यांच्या बदल्यात कोणासोबत ही शैय्यासोबत करू लागली ..काहीवेळा तर एका वेळी तीन चार गर्दुल्ले मिळून तिचा उपभोग घेत ... हे सर्व माझ्या कानावर येत होते मात्र मी स्वतःच त्यावेळी पुन्हा व्यसनात अडकलो असल्याने सुनीताला काही मदत करू शकलो नाही ...एकदोन वेळा सुनिता मला अविनाशच्या रूम वर भेटली .. तेथे ती अविनाश एकटा राहतो म्हणून कधी कधी रात्री झोपायला येई ..एकदा ती टर्कीत असताना तिला माल देखील पाजला ...मात्र तिच्या कडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही .. सुनिता बद्दल इतर गर्दुल्ले करत चर्चा ऐकूनच मला तिची दया येई ..तिच्या या अवस्थेचा फायदा घेवून तिच्याकडून शरीर सुखाची अपेक्षा करणे म्हणजे निव्वळ निर्दयीपणा होता ..मी तिला बरेच समजविण्याचा प्रयत्न केला ..मात्र ठोस अशी मदत करू शकलो नाही ..त्यावेळी ' मुक्तांगण चा महिला वार्ड अस्तित्वात नव्हता ..नाहीतर तिला तेथे दाखल होण्यास मदत करता आली असती .आता पुणे ..मुंबई येथे महिलांसाठी व्यसनमुक्ती केंद्रे सुरु झालीत .

सुनीताच्या बाबतीत शेवटी अपेक्षित होते तेच घडले ..असुरक्षित शरीर संबंध ठेवल्याने ती एच .आय .व्ही बाधित झाली ..तिच्या सहवासात आलेल्या अनेक गर्दुल्ल्यांपैकी बहुतेक मीच एकटा असा होतो की तिच्या शरीर सुखाच्या मोहात पडलो नव्हतो .. सुनिता पुढे तीन चारवर्षांनी एका पाकीटमार गर्दुल्ल्यासोबत टाकळी रोड वरील झोपडपट्टीत राहू लागली..तिला एक मुलगाही झाला .. त्याचे नाव तिने का कोणजाणे ' तुषार ' असेच ठेवले होते ..कदाचित तिच्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता तिला ब्राऊन शुगर पाजणारा तिला मी एकमेव भेटलो असेन ... चार महिन्यांनी पेपर मध्ये बातमी आली सुनिता नावाच्या एका महिलेचा 'एड्स ' मुळे मृत्यू तो पाकीटमार गर्दुल्लाही बहुधा मेला असावा आधीच ..तिच्या लहानग्या मुलाचा सांभाळ झोपडट्टीतील महिला मिळून करत आहेत अश्या आशयाची ती बातमी होती . अविनाश देखील गेला कारण तो देखील सुनीताच्या सहवासात आला होता .. नाशिक मधील आठ दहा गर्दुल्ले मृत्युमुखी पडण्याचे कारण सुनिताचा घेतलेला भोग हेच होते . !

( बाकी पुढील भागात ) 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें