गुरुवार, 1 अगस्त 2013

समाज सुधारणा....???

प्राँपर्टी...हिस्सा ..वाटणी .. ! (पर्व दुसरे -भाग ४६ वा )

सगळे काही मनासारखे घडावे , ..यश ..पैसा ..कीर्ती सगळे आयते मिळावे इतकेच काय जीवनातील आनंद देखील विनासायास मिळावा अशी व्यसनी व्यक्तीची मनोवृत्ती झालेली असते, ..चिकाटी ..सहनशीलता ..संयम ..प्रामाणिकपणे मेहनत करणे.. सहिष्णुता ( इतरांच्या भावनांचा विचार करणे ) वगैरे गोष्टी व्यसनामुळे त्याने गमावलेल्या असतात असा बहुधा सर्वत्र अनुभव येतो . त्यामुळे व्यसन सुरु झाले की व्यासनीला जेव्हा घरातून व्यसन करण्यास मनाई होते ..अडथळा येतो ..तेव्हा त्याच्या डोक्यात वेगळे होण्याचे विचार येतात .. तो वडिलोपार्जित संपत्तीत वाटणी मागतो ..स्वतचा हिस्सा हवा म्हणून हट्ट धरतो .. 

माझ्याही बाबतीत पुन्हा व्यसन सुरु झाल्यावर असेच घडले ..खरे तर वडिलोपार्जित अशी काहीच संपत्ती नव्हती आमची ..तरी पुन्हा याची गाडी घसरली आहे असे लक्षात येताच जेव्हा भावाने माझ्याशी भांडण करायला सुरवात केली तेव्हा मला आपण वेगळे रहावे असे वाटू लागले ..घरच्या कटकटी मुळे आपले व्यसन वाढतेय ..असे वाटू लागले .. व मी घरात मला वेगळे राहायचे आहे असा हट्ट सुरु केला .. वडिलांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळी मिळालेल्या पैश्यातून भावाला साठ हजार रुपये दिले होते ..भावाने त्यात स्वतचे साठ हजार टाकून ' आदर्श गोकुळ ' सोसायटीत फ्लँट घेतला होता तेथेच आम्ही सर्व राहत होतो .. मी व्यसनी व्यक्तीच्या मनोवृत्तीनुसार विचार करू लागलो कि वडिलांनी जे साठ हजार रुपये दिले आहेत त्यातील माझा वाटा म्हणून तीस हजार रुपये आहेत ..ते तीस हजार रुपये मी भावाला मागू लागलो ..मला तीस हजार रुपये दे ..मग मी घरच सोडून जातो कायमचा अशी कटकट घरी सुरु केली . वास्तव असे होते की आतापर्यंत मी वडिलांच्या कमाईचे लाखो रुपये व्यसनात उडविले होते .. भाऊ समजूतदार ..प्रेमळ ..जवाबदारीची जाणीव असणारा होता म्हणूनच त्याने मला घरात ठेवले होते ..अन्यथा पूर्वीच मी इतके नुकसान केले होते की माझी घरात ठेवायची लायकी देखील नव्हती ...शिवाय वडिलांच्या आजारपणात देखील त्याने खूप पैसे लावले होते . तरीही ' मेरी मुर्गी की एक टांग ' या वृतीने मी घरात भांडण सुरु केले . मी व्यसन करत नाहीय ..तुम्ही उगाच माझ्यावर संशय घेता ..मला घरात सुखाने राहू देत नाही ..असे आरोप करत होतो .

इकडे कादरला माझे व्यसन पुन्हा त्याच्यामुळे सुरु झाले अशी अपराधीपणाची भावना वाटत होती ..म्हणून तो भावाला सांगून पुन्हा ' मुक्तांगण ' मध्ये उपचारांसाठी दाखल झाला ..तो गेल्यावर मी अजितला पकडले ..त्याच्यासोबत ब्राऊन शुगर पिणे सुरु केले ..अजितने त्याच्या लग्नात ब्राऊन शुगर पिवू नये म्हणून काळजी घेणारा मी आता राजरोस त्याच्या सोबतच पिवू लागलो .. डॉ. गौड याच्याकडे राहायचे सोडून मी पुन्हा घरी राहायला आलो .. घरात स्वतंत्रपणे बिडी ओढता येत नव्हती .. तसेच घरी येण्या जाण्याच्या वेळा पाळाव्या लागत होत्या .. माझ्या वर्तनातील हे बदल आईच्या लक्षात येवूनही मी व्यसनी व्यक्तीच्या प्रवृत्तीनुसार ..पुन्हा पिणे सुरु झालेय ..मला उपचार घेण्याची गरज आहे हे कबुल करत नव्हतो ... शेवटी आईने एकदा मँडमन फोन करून सगळे सांगितले ..तसेच माझे नाव सांगू नका त्याला अशीही सूचना दिली .. मग मला निरोप दिला की दुपारी तू नसताना मँडमचा फोन आला होता ..त्यांनी तुला फोन करायला सांगितलेय .. खरा प्रकार मला माहित नसल्याने मी लगेच सायंकाळी मँडमला फोन केला ..त्यांनी सरळ सरळ ' काय चाललेय ? ... इतक्यात पुण्याला आला नाहीस.. मला सगळे खरे खरे सांग ' असे म्हंटल्यावर मी खोटे बोलू शकलो नाही .. एकदोन वेळा गडबड झाली असे अर्धसत्य सांगितले . यावर ' तू कोणताही संकोच न बाळगता ताबडतोब ' मुक्तांगण ' ला ये असे त्या म्हणाल्या . 

पडत्या फळाची आज्ञा म्हणून मी दुसऱ्या दिवशीच ' मुक्तांगण ' ला गेलो . माझे पिणे परत सुरु झाले असे कळले तर तेथील जुने मित्र काय म्हणतील ? ..असे विचार येत होते मनात म्हणून कोणालाही काही बोललो नाही .... मँडमने बोलाविले म्हणून आलो असे सांगितले . .मला तेथे पाहून कादरला खूप आनंद झाला .. मँडमनी वार्डात नाशिकचे मी दाखल केलेले पाच सहा पेशंट होते ..त्यांना मी रीलँप्स झाल्याचे कळू नये म्हणून मला वार्डात ठेवण्या ऐवजी ..आफ्टर केअर या विभागात ठेवले जेथे निवासी कर्मचारी व तीनचार महिन्यापासून राहणारे लोक राहतात ...मँडमनी भेटायला बोलाविल्यावर त्यांना अधून मधून पीत होतो असे सांगितले .. म्हणजे पुन्हा खोटे बोललो ...नाशिकमध्ये उत्तम प्रकारे फॉलोअपचे ...नियमित मिटिंग घेण्याचे काम केले होते याचा फायदा मिळाला ..काही दिवस इथे राहून पुन्हा नाशिकला जावून काम स्रुरू कर असे त्यांनी सांगितले . 

( बाकी पुढील भागात )
========================================================================

अयशस्वी समुपदेशक ??? ( पर्व दुसरे -भाग ४७ वा )


तीन वर्षे व्यसनमुक्त राहील्यानंतर रीलँप्स झाल्याने ..मला फार दिवस राहण्याची गरज नाही मुक्तांगण मध्ये असे माझे मत होते ..' तीन वर्षे व्यसनमुक्त होतो ' ... हा अभिमान पुढे मला खूप नडला ..खरे तर या क्षेत्रात आपल्या व्यसनमुक्तीचे श्रेय इतरांना म्हणजेच मी श्रद्धा ठेवत असलेला ईश्वर ..पालक ..समुपदेशक या सर्वाना माझ्या व्यसनमुक्तीचे श्रेय होते ..अल्कोहोलिक्स अँनाँनिमसचे सदस्य देखील शेअरिंग करताना ..आज मी केवळ ईश्वराची असीम कृपा .. अल्कोहोलिक्स अँनाँनिमसने दाखवलेला बारा पायऱ्यांचा सुंदर जीवनमार्ग ..व इतरांच्या मदतीने व्यसनमुक्त आहे असे म्हणतात ..याचे प्रमुख कारण म्हणजे व्यसनीला स्वतच्या अहंकारावर नेहमी नियंत्रण ठेवावे लागते . मुक्तांगण मध्ये केवळ २९ दिवस मी राहिलो .. मँडमच्या प्रत्येक भेटीत ..माझे नेमके काय चुकले .. माझ्या घसरण्यामागील मानसिकता कशी होती ...माझे मानसिक संतुलन कसे ढासळले होते ..या गोष्टींची चर्चा न करता ..मी कसा चांगला राहत होतो ..मिटींगला कशी गर्दी होत होती ..या गोष्टींबद्दल जास्त बोललो .. तसेच नाशिकला मी जर जास्त दिवस गैरहजर राहिलो तर मिटींग्सचे कसे नुकसान होईल वगैरे भीती दर्शविली ..स्वाभाविकपणे मला जास्त दिवस न ठेवता मँडमनी फक्त २९ दिवसात घरी जाण्यास परवानगी दिली ....कादर मात्र तेथेच राहिला जास्ती दिवस .

नाशिकला परत आल्यावर जेव्हा मिटींगला गेलो तेव्हा उपस्थितांचे प्रमाण कमी झालेले आढळले ..कारण गेल्या चार मिटींग्स न मी उपस्थित नव्हतो ..फॉलोअप पण झाला नव्हता ..अभय भेटला परंतु त्याची अवस्था चांगली नव्हती ..अगदी सुरवातीला मी समुपदेशन केल्यानंतर कोठेही व्यसनमुक्तीसाठी उपचार न घेता अभय बराच काळ महिने चांगला राहिला होता ..नंतर त्याने दारूला पर्यायी नशा म्हणून झोपेच्या गोळ्या खाण्यास सुरवात केल्यावर ..अधून मधून त्याचे हे झोपेच्या गोळ्या खाणे सुरूच राहिले होते ..नंतर मी स्वतच रीलँप्स झाल्यावर त्याला समुपदेशन करणे कमी झाले होते ..फक्त त्याला रागावण्याचे काम करत होतो मी ..अभय पुन्हा दोन तीन मिटींग्सना रेग्युलर आला .. इकडे मी देखील पुन्हा ' एकदाच ' या मोहाच्या आहारी गेलो .. असे म्हणतात की व्यसनमुक्तीची सर्वात पहिली पायरी म्हणजे सर्व प्रकारच्या व्यसनांसमोर आपला शिक्षण ..बुद्धी ..पैसा ..मान सन्मान .. वगैरे गोष्टींचा अहंकार कमी करून ..मी इतर बाबतीत कितीही थोर असलो तरी व्यसन करण्यास नालायक आहे हे सतत स्वतःला बजावावे लागते ..मी तसे न करता माझी तीन वर्षांची व्यसनमुक्ती ..व्यसनमुक्ती अभियान .. नाशिक मध्ये सुरु केलेल्या मिटींग्स ..वगैरेचा अहंकार बाळगून होतो .

एकदा अभय मिटींगला खूप गोळ्या खावून आला होता .. म्हणाला तुषार मला तुझ्या मदतीची गरज आहे .. दोन दिवसांपासून माझी आई ..भाऊ व बहिण माझ्यावर रागावून .मामाकडे राहायला गेल्या आहेत .. तू जर मध्यस्ती केलीस तर ते नक्की तुझे ऐकतील ..त्या वेळेस खरे तर मी अभयला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होण्याचा सल्ला द्यायला हवा होता ..कारण पूर्वी जरी माझ्या समुपदेशनाने तो चांगला राहिला असला तरी प्रत्येक वेळी माझ्या समजावण्याने तो चांगला राहीलच अशी खात्री नव्हती ..परंतु मी त्याला व्यसनमुक्तीसाठी ठोस उपचार घेण्याचा सल्ला न देता .. त्याला समजावत बसलो .. तसेच येत्या शनिवारी मी नक्की तुझ्यासोबत मामाकडे येतो व आई आणि भावाला समजावितो असे वचन दिले त्याला ..दोन दिवसानंतरच्या शनिवारी .. मी नाशिक मध्ये ब्राऊन शुगरचा तुटवडा असल्याने अजित सोबत ब्राऊन शुगर शोधात नाशिकरोडला गेलो ..आपण अभयला मिटिंगला बोलाविले आहे हे साफ विसरलो . रात्री उशिरा ९ वाजता जेव्हा मी रोटरीहॉल येथे मिटींगच्या जागी गेलो तेव्हा तेथे कोणीच नव्हते ..तेथील पहारेकऱ्याने मला सांगितले कि अभय खूप वेळ माझी वाट पाहत होता ..शेवटी साडेआठ वाजता मी येत नाही असे समजून निघून गेला ...त्याकाळी मोबाईल अस्तित्वात नव्हताच त्यामुळे सहजपणे निरोप देणे वगैरे शक्य नसे . दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी घाबऱ्या घाबऱ्या अजित माझ्याकडे आला ..म्हणाला आपल्याला सिव्हील हॉस्पिटलला जायचे आहे ..मला समजेना काय प्रकार आहे...तर म्हणाला काल रात्री अभयने खूप झोपेच्या गोळ्या खावून घरातील सिलेंडर उघडा ठेवून स्वतःला काडी लावून घेतली आहे .. अभय ९० टक्के भाजला आहे ..सिडकोतील त्याचे घर उध्वस्त झालेय सिलेंडरच्या स्फोटाने ...मला पुढचे काही ऐकवेना ..मटकन खाली बसलो .. खूप अपराधी वाटू लागले ..काल जर मी वेळेवर मिटिंगला गेलो असतो तर हा अनर्थ टळला असता असे वाटले..केवळ माझ्यामुळेच अभयने हा प्रकार केला असावा .. मी त्याच्या सोबत जावून त्याच्या कुटुंबियांशी बोलणार होतो ..मात्र मी मिटिंगला न आल्याने निराश होऊन अभयने असे केले ..हि सर्व जवाबदारी माझीच आहे असे वाटू लागले ..माझ्यात हॉस्पिटल मध्ये जावून कोळसा झालेल्या अभयचे कलेवर पाहण्याची हिम्मतच नव्हती .

( बाकी पुढील भागात )
========================================================================

 
सैरभैर मन ..! ( पर्व दुसरे -भाग ४८ वा )

अभयने केलेला आत्मघात माझ्या खूपच जिव्हारी लागला होता .. समुपदेशकाने ज्या व्यक्तीला समुपदेशन केले जातेय त्याला स्वतःवर कधीच निर्भर ठेवता कामा नये ..उलट त्याला स्वतच्या पायावर भावनिक दृष्ट्या ठाम उभे राहण्यास मदत केली पाहिजे .. समुपदेशकाने जर सारी जवाबदारी स्वतःवर घेतली तर ..समुपदेशन केले जाणारी व्यक्ती नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी समुपदेशाकावर अवलंबून राहते ...त्याच्या स्वतःतील ताकद विसरून जाते ..मी तीच चूक केली होती ..शिवाय अभयला मी आधी तू व्यसनमुक्त रहा मग सगळे काही ठीक होईल असा धीर दिला पाहिजे होता ..त्याला व्यसनमुक्तीसाठी उपचार घेण्याचा सल्ला द्यायला हवा होता .. त्या ऐवजी त्याला मी तुझे काम करतो .. तुझ्या आईला समजावतो व तिला परत घरी यायला सांगतो असे सांगितले होते ..तसेच मी त्याला दिलेली वेळ पाळली नव्हती ..अर्थात हे सगळे माझे व्यसन पुन्हा सुरु झाल्यामुळेच घडले होते ...मला स्वतःचाच खूप राग येवू लागला होता .. तसेच माझे नशीबच वाईट आहे हि भावना मनात पुन्हा घर करू लागली ..त्या अपराधीपणाच्या ..वैफल्याच्या भरात मी जोरदार पाने व्यसन सुरु केले .. ईश्वरावरची उरली सुरली श्रद्धा देखील नष्ट झाली .. अशा वेळी मी ताबडतोब मँडम ची मदत घेणे गरजेचे होते ..ताबडतोब मुक्तांगण ला जाऊन सारे काही कबुल करून उपचारांसाठी दाखल व्हायला हवे होते . मात्र ते न करता मी व्यसन करीतच राहिलो ..अर्थात हे सगळे शहाणपण आता सुचते आहे मला .

माझी घरी पुन्हा माझा हिस्सा ..वाटणी वगैरेची मागणी सुरु झाली ..भावाला हे माहित होते कि याला कितीही पैसे दिले तरी कमीच पडतील ..हा भांडून काहीही हक्क नसताना वाटणी मागेल ..मिळालेला पैसा उडवून टाकेल ..मग पुन्हा आपल्यालाच त्रास देईल ..भाऊ एक पैसा देखील द्यायला तयार होईना ..मग तुझ्यामुळेच अनघाला गमवावे लागले .. तूच सगळ्याच्या मुळाशी आहेस .वगैरे आरोप करू लागलो त्याच्यावर ..तो सरळ प्रवृत्तीचा असल्याने बहुधा माझ्याशी हमरातुमरीवर येत नसे .. शेवटी त्याने मला रोख पैसे देण्याएवजी ..जर तुला आमच्यामध्ये राहायचे नसेल तर ..मी तुला वेगळे घर करून देतो राहायला असे सांगितले ..मात्र ते घर तो आईच्या नावावर घेणार होता ..व माझ्या सोबत आई राहणार असेल तरच हे होणार होते ..मी आईकडे हट्ट सुरु केला .. नाईलाजाने आई भावाचे घर सोडून माझ्यासोबत राहायला तयार झाली .. आधी त्याने भाड्याने घर घेतले तेथे आई व मी काही दिवस राहिलो ..मग भावाने दीड लाखाला जुना पेट्रोल पंप ..म्हसरूळ रोडला ' यज्ञेश ' सोसायटी मध्ये एक रूम किचन चा एक छोटासा फ्लँट घेतला तेथे आई व मी राहायला गेलो ..आता तर मी मोकाटच झालो होतो . रात्री बेरात्री घरी येणे सुरु आले .. जेवणाच्या ..झोपण्याच्या सगळ्या वेळा बदलल्या ..आई बिचारी त्यावेळी कशी राहिली असेल याची आता कल्पनाही करवत नाही .. वडिलांच्या मागे तिची काळजी घेण्या ऐवजी उलट मी नकळत तिला त्रास देत होतो .. कोणी काही बोलले तर लगेच तुम्हीच माझ्या जीवनाचे वाटोळे केलेत असा आरोप करून मी मोकळा होई .. कुटुंबीयांवर वाट्टेल तसे आरोप करणे हे बहुतेक व्यसनी व्यक्तींचे शस्त्र असते .. अशा वेळी कुटुंबीय पण अपराधीपणाच्या भावनेने ग्रस्त होतात ..आपोआपच त्यांचा व्यसनी व्यक्तीला होणारा विरोध कमी होतो तसेच घडत होते माझ्या बाबतीत .

पूर्वी मला स्वतःला ब्राऊन शुगर विकत घ्यायला जायला लाज वाटत असे.. मात्र आता मी बिनदिक्कत अड्ड्यावर जावून माल विकत घेवू लागलो होतो .. सुरवातीला विक्रेते माझ्याकडून कमी पैसे घेत ..कधी कधी फुकट माल देत ..नंतर सगळे बंद झाले ..सर्वसामान्य गर्दुल्ल्याप्रमाणे मला वागवले जावू लागले .. पूर्वी हेच लोक मी आसपास असलो कि माल विकायला घाबरत असत .. सगळा दोष माझ्याच करणीचा होता ... तुम्ही जसे असाल तसेच जग तुम्हाला वागवते . मेरीतील ' लोकशाही मित्र ' चे सगळे सदस्य माझ्यावर चिडले होते .. ते परोपरीने मला समजावत होते ..परंतु मी कोणाचेच ऐकत नसे ..एकदा माझा कटिंग सलूनवाला मित्र मला म्हणाला ' तुषार भाऊ ..इथे परवा एक शीतल नावाची मुलगी आली होती .. जवळच राहते ..तिला दारूचे व्यसन लागले आहे ..जर तिला काहीमाडत करता आली तर पहा .. ' मला मुलगी दारुडी आहे हे ऐकून कुतूहल वाटले ..त्याला तिचे वय विचारले तर फक्त १७ वर्षे आहे असे म्हणाला ..मग त्याने मला थोडक्यात तिच्याबद्दल त्याला असलेली माहिती सांगितली ..ती म्हणे रोज संध्याकाळी इथे मेरी बसस्टॉपवर येते ..मग कोणीही रिक्षावाला तिला गावात घेवून जातो .. रात्री दारू पिवून परत येते . ..मी शीतलची भेट घेण्याचे ठरविले ..दुसऱ्या दिवशी सायंकाळी मी नंदू च्या कटिंग सलूनमध्ये जावून बसलो ..शीतल तेथून रस्त्यावरून जाताना दिसताच नंदूने तिला हक मारली ..एक सावळी ..साधारण पाच फुट उंच ..दिसायला बरी अशी मुलगी साधा पंजाबी ड्रेस घालून होती ...ती जवळ येताच नंदूने तिला माझी ओळख करून दिली . मी व्यसनमुक्तीचा कार्यकर्ता आहे असे तिला सांगितले ..तिने मला खालवर निरखून पहिले .. जरा बेरकी वाटली ..मग म्हणाली .'.मी रोज दारू पिते ..माझी दारू कशी सोडवाल ? ' ..' आधी आपण एकदा बोललो पाहिजे यावर ..मग पाहू तुला काय मदत करता येईल ते ' असे त्रोटक उत्तर दिले तिला ..' उद्या दुपारी मी तुम्हाला इथेच भेटेन असे सांगून तिने रस्त्यावरून जाणाऱ्या आटोरिक्षाला हात दिला ..निघून गेली .

( बाकी पुढील भागात )
========================================================================


शीतलचे अधःपतन ! ( पर्व दुसरे -भाग ४९ वा )

दुसऱ्या दिवशी दुपारी नंदूच्या दुकानात शीतल आली .. मला म्हणाली आपण तिकडे मंदिरात जावून बसू ..म्हणजे नीट बोलता येईल .. माझी काहीच हरकत नव्हती ..आम्ही गणपती मंदिरात एका बेंचवर जावून बसलो .. मला शीतल सोबत चालताना पाहून स्टँड वरचे सगळे ऑटोवाले कुत्सित हसत आहेत असे वाटले ...मी बिडी काढून पेटविली ..हम्म बोल आता असे तिला म्हणालो .. यावर म्हणाली ' मी माझ्याबद्दल कोणालाच सांगत नाही ..पण तुम्हाला पाहून वाटले कि सांगावे ..कारण तुमची नजर स्वच्छ वाटली मला ' माझ्या बद्दलची पावतीच होती ही.. डॉ .गौड यांच्यासोबत 'एड्स ' विरोधी कार्य करताना .. महिलांशी बोलताना फक्त त्यांच्या तोंडाकडे पहायचे ..उगाच इकडे तिकडे नजर रेंगाळू द्यायची नाही हे पथ्य शिकविले होते गौड सरांनी ... कोणतेही आढेवेढे न घेता शितल बोलू लागली ' माझे वडील वारले तेव्हा मी आठवीत होते ..दारू पिवून अपघातात ते गेले ..माझे खूप प्रेम होते त्यांच्यावर ..ते दारू पीत असले तरी मला खूप आवडत होते ..त्यांच्या छोटासा व्यवसाय होता .. ते गेल्यावर समजले की व्यवसायात त्यांनी खूप कर्ज करून ठेवले होते .. त्यापायी आमचे राहते घर विकावे लागले आईला ..घरी मी आई आणि छोटा भाऊ होतो .. आईने सगळी विकटिक केली वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी ..घरही गेले ..या सगळ्याचा आईच्या डोक्यावर परिणाम झाला असावा ..ती एकदम अबोल झाली ..शांत शांत राहू लागली .. जेवणाची सुद्धा आठवण करून द्यावी लागायची तिला ... आम्ही मामाच्या घरी राहायला आलो ..मामाही फार श्रीमंत नाहीय माझा .. त्याच्या छोट्या घरात आमची अडचण म्हणून मामी कटकट करते नेहमी ..इलाज नाही म्हणून तेथे राहत होतो .

माझे शाळेत जाणे सुरूच होते ..मी शाळेत खूप हुशार होते ..शिकायची खूप इच्छा होती .. आमच्या शाळेतून घरी येण्याच्या वाटेवर एक हॉटेल आहे .. गल्ल्यावर नेहमी एक हसतमुख माणूस बसत असे ..त्याचा चेहरा इतका हसरा होता की वाटे आपल्याकडे पाहूनच हसतोय .. त्याचे वय साधारण माझ्या वडीलांइतकेच होते .. ...कधी कधी त्याला पाहून मला वडिलांचीच आठवण येई ..एकदोन वेळा तो माझ्या कडे पाहून हसला म्हणून मी पण हसले.... एकदा त्याने खुणेने जवळ बोलाविले ..गेले तर माझ्या हातात लाडू आणि चिवड्याचा पुडा दिला त्याने .. मला खूप आनंद झाला .. पुढे तो असाच दर तीन चार दिवसांनी मला खावू देवू लागला .. एकदा सिनेमाला जावू म्हणाला तर मी गेले ..मग तेथून तो मला लॉजवर घेवून गेला .. मला मिठीत घेतले ..हे सर्व शीतल एकदम निर्विकारपणे सांगत होती ... मला तिच्या निर्विकारपणाचे आश्चर्य वाटत होते ..पुढे म्हणाली ..त्याने पहिल्यांदा मला शरीरसुखाची चटक लावली ..मग रोजच हे घडू लागले ..तो बियर पीत असे ..त्याच्यासोबत मी देखील बियर पिवू लागले .. पुढे त्याने माझ्याशी संबंध तोडले ..नंतर मात्र मी बियर आणि शरीरसुखाची चटक लागल्यामुळे ..एक दोन ऑटोरिक्षा वाल्यांसोबत बियर प्यायला गेले .. पुढचे शीतलने सांगायची गरजच नव्हती ..ही उफाड्याची ..केवळ १५ वर्षांची मुलगी ..ऑटोत नेवून बियर पाजली तर सर्व काही मिळते ...अशी जाहिरात सगळ्या ऑटोचालकांमध्ये व्हायला वेळ लागला नाही ..गेल्या दोन वर्षांपासून शीतलचे हे सर्व सुरु होते ..आता तिला दारूचे व्यसन लागले होते .. नंतर शाळा सोडून दिली तिने . आता घरी रोज माझ्यावरून कटकटी होतात .. म्हणून मी जास्तीत जास्त वेळ बाहेर असते .. 

शीतलला मी सांगितले की मी तुझ्या मामाला व आईला भेटून तुला मदत करायला सांगतो ..यावर ती हसली ..म्हणाली ..आईला सांगून काही फायदा नाही ..तिचे डोके फिरलेले आहे .. मामाला सांगितले तर.. मामा मला घराबाहेर काढेल आधी ..मला काहीच उपाय सुचेना ..तसेच माझी ब्राऊन शुगर प्यायची वेळ झालेलीच होती ..परत भेटू असे सांगून मी उठू लागलो ..तर म्हणाली मी पण येते तुझ्यासोबत गावात ..मग आम्ही दोघे नाशिक शहरात आलो .. तेथून मी माझ्या एका गर्दुल्ल्या मित्राकडे गेलो ..ब्राऊन शुगर घेतली .. प्यायलो ..तू व्यसनमुक्तीचा कार्यकर्ता आहेस ना ? असे विचारू लागली ..तुला नंतर माझी सगळी स्टोरी सांगतो असे म्हणून तिला शांत बसविले .. मी ब्राऊन शुगर पिताना माझ्याकडे एकटक पाहत होती .. मग तिने मला दारूला पैसे मागितले .. माझ्याकडे जेमतेम वीस रुपये उरले होते .. त्यात एक देशी दारूची क्वार्टर नक्की आली असती .. शीतल ने क्वार्टर घेतली आणि आम्ही परत मेरीला आलो ..रात्रीचे नऊ वाजून गेले होते .. आज मी खूप लवकर घरी आले ते पाहून माझ्या मामीला आश्चर्य वाटेल म्हणाली ..अशीच रोज लवकर घरी गेलीस तर सगळे ठीक होईल असे म्हणून गुडनाईट केले .. उद्या परत भेटू असे म्हणाली ती ...दुसऱ्या दिवशी पुन्हा दुपारी भेट असे सांगून ती मामाच्या घराकडे वळली .

( बाकी पुढील भागात )


========================================================================

आस्था आणि सहानुभूती ? (  पर्व दुसरे - भाग ५० वा ) 

 

समुपदेशन करताना ज्याला समुपदेशन केले जातेय अश्या व्यक्तीच्या भावनेत समुपदेशकाने वहात
जाता नये असे सांगितले जाते ..तटस्थपणे समोरच्या व्यक्तीच्या समस्यांचा अभ्यास करून ..मग उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी नेमका कमीत कमी नुकसान पोचविणारा आणि फायद देणारा पर्याय निवडायला त्या व्यक्तीला मदत करणे ..तसेच निवडलेल्या पर्याय निभावून नेण्यासाठी त्याला वेळो वेळी धीर देत रहाणे... हे पाळले गेले तरच योग्य पद्धतीने समुपदेशनाचा लाभ होतो ...हे शिकण्यासाठी मला बरेच अनुभव घ्यावे लागले आहेत ..आस्था आणि सहानुभूती असा हा फरक सांगितला जातो ..म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या समस्येबद्दल योग्य ती जाणीव बाळगणे व स्वतचे तसेच त्या व्यक्तीचे नुकसान न होऊ देता त्याला मदत करण्याबद्दल पर्याय शोधणे.. याला आस्था म्हणतात तर ..समोरच्या व्यक्तीला त्याच्या समस्येमुळे होणाऱ्या भावनिक त्रासांचा स्वतः देखील अनुभव घेणे व त्याच्या सारखेच सैरभैर ..भावनिक दृष्ट्या अस्थिर होऊन ..मदत करण्यासाठी भावनेच्या भरात निर्णय घेणे म्हणजे सहानुभूती असे म्हणता येईल . इंग्रजीत याला Empathy आणि sympathy असे म्हणतात . अर्थात मी मानस शास्त्राचा तज्ञ नसल्याने हे सगळे मला माहित असणे शक्य नव्हते ..त्याचप्रमाणे मी स्वतः एक व्यसनी व्यक्ती असल्याने माझ्या भावनांवर माझे नियंत्रण नव्हतेच .. झाले असे की शीतल दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटल्यावर ती माझ्या सोबत फिरली .. तिने उगाच दारू साठी फालतू लोकांसोबत फिरू नये हा माझा उद्देश होता ..तिलाही माझ्यासोबत अधिक मोकळे वाटत असावे म्हणून ती आपणहून माझ्याबरोबर येत होती .. असे तीनचार वेळा घडले .. मी स्वतःच ब्राऊन शुगर ओढत असल्याने ..शीतलला दारू पिण्यास मनाई करू शकत नव्हतो...एकदा रात्री १२ वाजता मला ओळखणाऱ्या एका मेरीतील मित्रासोबत शीतल माझ्या घरी आली .. त्या दिवशी मी जवळ भरपूर ब्राऊन शुगरचा साठा असल्याने सायंकाळी घराबाहेर पडलो नव्हतो ... इतक्या रात्री दारात मित्र आणि शीतल पाहून जरा भांबावलोच.. आई देखील जागीच होती .. तिला शीतल बद्दल ओझरते सांगितले होते मी .. ही मला बसस्टॉप वर भेटली ..तुझ्या घराचा पत्ता विचारीत होती म्हणून घर दाखवायला आलो असे सांगून मित्र शीतलला माझ्या दाराशी निघून गेला..शीतलच्या तोंडाचा दारूचा वास लपत नव्हता ..आई समोर काही बोलणे नको म्हणून मी शीतल सोबत गच्चीवर गेलो ..

सायंकाळी तू भेटला नाहीस ..म्हणून एकासोबत गेले होते फिरायला ...येताना उशीर झाला ..आज मामाने घराचे दार उघडलेच नाही .. मी खूप वेळ दार वाजविले आणि शेवटी तुझ्याकडे आले असे म्हणू लागली ..आता मोठे संकटच होते .. एकप्रकारे शीतलला घरातून हाकलून दिल्या सारखेच होते ..तरीही ..उद्या पाहू सर्वकाही ठीक होईल असा तिला धीर दिला ..आता रात्रीपुरती शीतलची झोपण्याची सोय केली पाहजे होती ..आईला सांगून तिला असे घरात ठेवणे कठीणच वाटले ..म्हणून आजची रात्र तू इथे गच्चीवर झोप ..मी तुला अंथरूण आणून देतो असे म्हणालो ..घरातून एक जाड सतरंजी ..ब्लकेट ..उशी घेवून निघालो तर आईने हटकले..आईला सर्व सांगितले ..थंडीचे दिवस सुरु होते .. तसेच असे एका मुलीला एकटीला गच्चीवर झोपाविणे आईला योग्य वाटले नाही ..शेवटी आईने शीतलला घरात झोपू देण्यास परवानगी दिली .. जरी स्त्रीच्या स्वाभाविक दयावृत्ती मुळे आईने अशी परवानगी दिली असली तरी .. आता हे काय नवीन प्रकरण आहे ? अशी चिंता आईच्या चेहऱ्यावर होतीच..शीतल आईच्याच बाजूला झोपली ..दुसऱ्या दिवशी मी उठलो तर आई आणि शीतल आधीच उठलेल्या होत्या ..त्यांच्या गप्पा सुरु होत्या .. बहुतेक आईने शीतलची सर्व माहिती काढली होती ..तुषार हिला आता जाऊ दे हिच्या मामाकडे असे आई म्हणू लागली .. ठीक आहे म्हणत मी सर्व आवरून शीतल सोबत बाहेर पडलो .. तिला मामाच्या घरी जा असा आग्रह केला ..ठीक आहे असे म्हणून ती गेली ... मी माझे धंदे उरकून दुपारी घरी झोपलो असताना ..परत दारात शीतल हजर.. हातात एक छोटीशी पिशवी .. मामा घरात घ्यायला तयार नाहीय मला .. माझे कपडे घेवून आलेय मी .. बापरे ..म्हणजे हे संकटच होते ...आईची कशीतरी समजूत काढली ..शीतलला काही दिवस आपल्याकडे राहू दे म्हणू लागलो ..नाईलाजाने आईने परवानगी दिली ..मात्र एका तरुण मुलीने काहीही नातेगोते नसताना ..तसेच घरात आपला तरुण मुलगा असताना असे राहणे तिला नक्कीच पसंत नव्हते ...शीतलच्या बाबतीत केवळ एक व्यसनी ..दुख्खी ..मुलगी या खेरीज माझ्या मनात कोणतेही भाव नव्हते ..आणि शीतलला मदत करावी हा एकमेव हेतू होता माझा ..मात्र हे सगळे लोकांना पटणे कठीणच होते .. तुला जर इथे राहायचे असेल तर सर्वात आधी दारू सोडली पाहिजे ..नाहीतर आई घरात राहू देणार नाही असे मी शीतलला बजावले होते ..तसेच मला सांगितल्याशिवाय कुठेही बाहेर पडायचे नाही हि दुसरी अट मी घातली तिला ..तिने सगळे मान्य केले ...

एकदोन दिवस ठीक गेले ..नंतर एकदा मी रात्री घरी आल्यावर ..आईने सांगितले की शीतल पाय मोकळे करून येते म्हणून बाहेर गेलीय .. रात्रीचे दहा वाजून गेले होते .. त्या रात्री शीतल घरी आलीच नाही ..मला काळजी वाटत होती .. बहुतेक ती पुन्हा दारू साठी ऑटोरिक्षावाल्यांसोबत फिरत असावी .दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता शीतल परत आली .. मी तिला रागावलो .. तर रडू लागली . मग काही बोललो नाही . सायंकाळी मला म्हणाली ..अरे मी फक्त नाक्यावर गेले होते ..तर तिथे एक ऑटोवाला भेटला .. मला ऑटोत बस म्हणाला ..मी नकार देणार होते ..पण जमले नाही .. गेले त्याच्या सोबत ..त्याने मला दारू पाजली आणि त्याच्या मित्राच्या रूमवर नेले ..तेथे अजून चार जण होते ..पुढचे सर्व मला न सांगताच समजले ..म्हणजे शीतलला नुसते दारूचेच नव्हे तर पुरुषी सहवासाचेही व्यसन लागले होते ... त्यावेळी मी जर सरळ सरळ मँडमना फोन करून सगळी परिस्थिती सांगितली असती तर नक्कीच मँडमनी काहीतरी मार्ग सुचविला असता ..मात्र माझे व्यसन सुरु असल्याने मी ' मुक्तांगण ' ला फोन करणे टाळले ..तसेच भद्रकालीचे पोलीस इन्स्पेक्टर सुरेंद्र पाटील साहेब देखील पुण्याला बदलून गेले असल्याने त्यांचीही मदत घेवू शकलो नाही ..काय करावे काहीच समजेना .. शीतलला मदत करावी ही इच्छा देखील सोडवेना . 

( बाकी पुढील भागात )  

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें