शनिवार, 21 सितंबर 2013

सुधारणेचे शिवधनुष्य

सुधारणेचे निष्फळ प्रयत्न !( पर्व दुसरे -भाग ६१ वा )

एक वर्षापूर्वी अभयची आत्महत्या आणि आता संदीप ... मी मनाने खचून गेलो होतो .. आपण कितीही चांगले केले तरी आपल्याला यश मिळत नाही हा निराशेचा भाव मनात गहिरा होत गेला .. शिवाय या दोन्हीही केसेस मध्ये त्यांना मी वेळेवर भेटलो असतो तर नक्की त्यांचे जीव वाचले असते ... असे वाटू लागले ..दोन्हीही वेळा मी त्यांना वेळेवर भेटू शकलो नाही ...ही अपराधीपणाची भावना मनात ठसली .. शेवटी पुन्हा माझे नशीबच वाईट आहे .. असे नेहमीचे वैफल्य . परिणाम म्हणून मी पुन्हा ब्राऊन शुगर पिण्यास सुरवात केली .. कादर माझा साथीदार .. आम्ही दोघेही एकमेकांच्या साथीने अधिक खोलात अडकत होतो ..दिवसेंदिवस ब्राऊन शुगर महाग होत गेली तशी पैश्यांची अधिकच चणचण भासू लागली ..अर्थात आईचा त्रास वाढला ..माझ्या सोबत वेगळी राहायला आल्याचा तिला पश्चाताप होऊ लागला .. त्याच काळात अधीक पैसे मिळावेत म्ह्णून मी दारोदारी फिरून घरगुती उपयोगाची उत्पादने विकण्याचा देखील उद्योग केला .. सकाळी सकाळी घराबाहेर पडून ..ब्राऊन शुगर पिवून ..मग संध्याकाळ पर्यंत फ्राय पँन , इलेक्ट्रिक शेगडी ..टिफिन .. वगैरे विक्रीच्या वस्तू बँगेत भरून दारोदार भटकायचे .. सायंकाळी आलेल्या सगळ्या पैश्यांचा धूर ...कादर व मी अनेकदा उद्यापासून बंद असे ठरवत होतो परंतु ते पाळता येत नव्हते ..एकदा आपण दोघांनी तीनचार दिवस स्वतःला घरात कोंडून घ्यायचे ..टर्की सहन करायची ..अशी योजना बनवून आईला तसे सांगितले .. आईने आम्हाला दोघांना घरात ठेवून बाहेरून घराला कुलूप लावून घेतले व ती भावाकडे राहायला चार दिवस गेली .. घरात खाण्याचे पदार्थ .. मनोरंजन वगैरे सगळे होतेच .. आम्ही जेमतेम दोन दिवस टर्की सहन करू शकलो ..नंतर आईला उगाच बाहेरून कुलूप लावायला सांगितले असे वाटू लागले .. तडफड सुरु झाली .. मग खिडकीतून बाहेरून जाणा-या एकाला आवाज देवून ..त्याला भावाच्या घरी जावून आईला निरोप देण्यास सांगितले .. शेवटी काम झाले आणि आईने येवून कुलूप उघडले .. पुन्हास सरळ अड्यावर गेलो दोघे .. स्वतच्या मनाच्या ताकदीवर कायमचे व्यसन बंद ठेवणे जमत नव्हते ..आणि ते कबूलही करता येत नव्हते ..मुक्तांगणची मदत पुन्हा घेण्याची मानसिक तयारी होत नव्हती ..अश्या कात्रीत सापडलो होतो .

खूप थोडे लोक असे असतात ज्यांना स्वतच्या इच्छाशक्तीच्या बळावर सुरु झालेले व्यसन पुन्हा दीर्घकाळ थांबवता येते .. कारण हा मनालाच झालेला आजार असल्याने व्यसनीचे मन खूप कमकुवत झालेले असते ..त्याचा आत्मविश्वास संपुष्टात आलेला असतो ..कितीही ठरवले तरी त्याला स्वतच्या बळावर व्यसन थांबवता येत नाही .. तरीही या आजाराचा धूर्तपणाचा भाग असा की त्या व्यासानीला उगाचच आपण स्वतःहून व्यसन सोडू शकू असा पोकळ आत्मविश्वास वाटत रहातो ..त्याच काळात.. यावेळी ' मुक्तांगण ' मध्ये माझ्या सोबत उपचार घेतलेला ' विश्वदीप ' नावाचा मुलगा नाशिक मध्ये नोकरी मिळाली म्हणून राहायला आला .. त्याला मुक्तांगण मधून त्याने माझ्या घरचा पत्ता घेतला होता .. हा मुळचा आसाम मधील गुवाहाटी येथील राहणारा .. जवळ जवळजवळ सात फुट उंच ..धिप्पाड होता .. त्याचे व्यसन फोर्टवीनच्या इंजेक्शन्सचे होते ..खूप श्रीमंत घरचा .. त्याने आता पूर्ण यशस्वी झाल्याशिवाय पुन्हा गुवाहाटीला जायचे नाही असे पक्के ठरवले होते ..महाराष्ट्रातच तो राहणार होता ..मुक्तांगणला जवळ जवळ आठ महिने राहून आता नाशिकला नोकरी मिळाली म्हणून इथे आलेला .. त्याला कायनेटिक मध्ये छान विक्री प्रतिनिधीची नोकरी लागलेली ..विश्वदीपला घरगुती वातावरण हवे होते ..म्हणून त्याने भाड्याने खोली घेवून राहण्यापेक्षा माझ्या घरी पेइंग गेस्ट म्हणून राहण्याचा प्रस्ताव मांडला .. दुर्दैव असे कि तो व्यसनामुळे एच.आय.व्ही बाधित झालेला होता .. तरीही मनाने न खचता पुन्हा नव्याने उभे राहण्याची त्याने तयारी केली होती .. त्याचा प्रस्ताव मी लगेच मान्य केला ..कारण तेव्हढेच काही पैसे मिळाले असते .. आईला सर्व सांगितल्यावर आई नाईलाजाने तयार झाली .. आईला तो बाधित आहे हे देखील सांगितले तरी कोणतेही गैरसमज न बाळगता तिने शेवटी परवानगी दिली .

( बाकी पुढील भागात )

======================================================

विपश्यना ! ( पर्व दुसरे -भाग ६२ वा )
विश्वदीप पेइंग गेस्ट म्हणून घरी राहायला लागल्यापासून ..त्याच्यापासून लपवून माझे व्यसन करणे मला कठीणच जाऊ लागले .. तो समोर असताना आईला पैसे मागायला संकोच वाटत असे .. तसेच आई त्याला माझे व्यसन परत सुरु झालेय असे सांगते की काय हि देखील भीती होतीच .. विश्वदीप अगदी मनापासून चांगला राहत असे ...त्याने स्वतचे पूर्वायुष्य पूर्णपणे विसरायचे पक्के ठरवलेले दिसले ... तो लवकरच नाशिकमध्ये व नोकरीत रुळला .. अगदी आमच्या घरचा सदस्य असल्यासारखा राहू लागला .. तो माझ्या आईला आँटी ऐवजी ' आई ' असेच म्हणत असे .. भाजी आणणे ..गँस साठी नंबर लावणे .. घरातील सामान आणणे अश्या जवाबदा-या त्याने स्वतःहून उचलल्या होत्या .. त्याच्यातील सुधारणा पाहून मला स्वतःचे वैषम्य वाटे .. पूर्वी मी देखील तीन वर्षे चांगलाच होतो .. परंतु व्यसन बंद करूनही काही फायदा झाला नाही .. अनघा माझी होऊ शकली नाही .. मनासारखी एकही गोष्ट झाली नाही .. समस्या येतच राहिल्या ..म्हणून नाईलाजाने मला पुन्हा व्यसन करावे लागले असे स्वतचे समर्थन करत गेलो ..व्यसनी व्यक्ती जेव्हा व्यसन सोडतो तेव्हा त्याच्या मनात भविष्याबद्दल अनेक उच्च कोटीची स्वप्ने असतात ..आपले जीवन आश्चर्यकारकपणे बदलावे असे त्याला वाटते ..तसेच आता व्यसन बंद केलेय म्हणजे मला कोणतीच समस्या यायला नको असे त्याला मनापासून वाटते .. जीवन एकदम साधे ..सरळ ..सोपे व्हावे अशी त्याची मागणी असते ..व तसे घडले नाही कि निराश होऊन तो पुन्हा व्यसनाकडे वाळू शकतो .. खरेतर ..व्यसन बंद केले याचा सरळ सरळ इतकाच अर्थ असतो कि त्याच्या व्यसनाधीनते मुळे उद्भवणाऱ्या समस्या त्याने थांबवल्या आहेत .. बाकी सर्वसामान्य जीवनात येणाऱ्या अडी-अडचणी , संकटे ..समस्या .. या येणारच असतात ..कारण हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे ..चांगल्या जीवनावरची श्रद्धा कायम ठेवली म्हणजे व्यसनमुक्ती सहज पुढे नेता येते .. स्वतच्या क्षमता ..आणि स्वतचे दोष ओळखून त्यात सातत्याने बदल करण्याच्या प्रक्रियेत राहिले तरच व्यसनमुक्तीचा निर्धार टिकतो .

कादर ..अजित ..मी असे तिघेही पुन्हा पुन्हा त्याच निराशावादी विचारातून व्यसनाकडे वळत होतो .. विश्वदीपला माझे एकंदरीत रुटीन पाहून संशय आलाच होता ..त्याने तसे आडून पाडून मला विचारले होते ..पण त्याच्यापाशी मी व्यसन पुन्हा सुरु आहे हे कबुल करत नव्हतो ..त्याला उघडपणे मला काही बोलता यात नव्हते कारण एकतर मला राग आला असता .. दुसरे कारण असे मी मी त्याच्या पेक्षा या क्षेत्रात सिनियर होतो ..विश्वदीप घरी राहायला लागल्यापासून मी शक्यतो घरातील संडासात ब्राऊन शुगर ओढत नसे ..त्याने वास लगेच ओळखला असता .. तसेच त्याचे व्यसन सुरु होऊ नये याचीही मला काळजी होतीच ..मी व कादर सोमवार पेठेत एकट्या राहणाऱ्या अविनाश कडे जावून ब्राऊन शुगर ओढत बसे .. अविनाशने पूर्वी दोन तीन वेळा इगतपुरी येथे जावून विपश्यना केली होती ..त्या नंतर त्याचे व्यसन काही काळ बंद होई ..मात्र विचारसरणीत बदल न झाल्याने तो देखील आमच्या सारखाच ..एकदा अविनाश अचानक १० दिवस गायब झाला .. परत आला तेव्हा त्याने ब्राऊन शुगर बंद केलेली होती .. तो विपश्यना येथे जाऊन आला होता .. सुमारे महिनाभर तो चांगला राहत होता ..मात्र आम्ही त्याच्या खोलीवर जावून व्यसन करतच होतो ..तो आम्हाला वारंवार ' विपश्यना ' तुम्ही पण करा असे म्हणू लागला .. शेवटी कादर आणि मी विपश्यनेला जायला तयार झालो . त्यासाठी अविनेच आमचा दोघांचा नंबर लावून तारीख वगैरे घेतली .. ऐन गणेशोत्सवात आम्हाला ' विपश्यना ' ची तारीख मिळाली ...तेथे टर्की होईल ही भीती मनात होतीच .

( बाकी पुढील भागात )
======================================================

धम्मगिरी ! ( पर्व दुसरे - भाग ६३ )
इगतपुरी रेल्वेस्टेशन पासून जवळच ' धम्मगिरी ' आहे .. आम्ही ठरलेल्या तारखेनुसार तेथे दुपारी चार वाजता पोचलो ..तेथे तंबाखू ..धुम्रपान किवा अन्य कोणतेही व्यसन करता येणार न अहि हे अवीने आधीच सांगितले होते म्हणून आम्ही सोबत बिड्यांचा स्टॉक घेतला नाही .. आपल्याला तेथे खूप टर्की होईल ...ती सहन करण्याची मानसिक तयारी कादर आणि मी केली होतीच .. एका पर्वतावर वसलेले हे ध्यान धारणा केंद्र भारतातील प्रमुख केंद्र मानले जाते .. श्री .सत्यनारायण गोयंका यांनी याची सुरवात केली अशी माहिती अवीने आम्हाला सांगितली ..हे मोठे उद्योगपती व्यक्तिगत जीवनात खूप दुखः ..निराशा यामुळे कंटाळून ब्रम्हदेशात गेले होते ..तेथे त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन .. गौतम बुद्धाने बारा वर्षे तपस्चर्या करून स्वतः विषयी मिळवलेल्या ज्ञानाच्या आधारे ..एक विशिष्ट ध्यानधारणा पद्धत विकसित केली ती म्हणजे ' विपश्यना ' ..ही विपश्यना मग सत्यनारायण गोयंका यांनी भारतात सुरु केली ..अवीने पूर्वी विपश्यना बद्दल दिलेल्या माहितीमुळे आमचे कुतूहल खूप वाढलेलेच होते ..खूप उत्साहाने आम्ही धम्मगिरी पर्वतावर पोचलो .

साधारण शंभर ते दीडशे एकर जागेत संपूर्ण डोंगरावरच हे केंद्र वसलेले आहे .. वर कार्यालयाजवळ बरीच गर्दी होती ..उद्यापासून शिबीर सुरु होणार होते ..आज नोंदणी करणे ..नियम समजून घेणे ..निवास व्यवस्था ..वगैरे कामे आज होणार होती .. स्वतःबद्दल माहितीचा फॉर्म भरताना त्यात सगळा खरा खरा उल्लेख करा असे अवीने सांगितले होते त्यानुसार आम्ही फॉर्मवर ब्राऊन शुगर व अन्य मादक पदार्थांचा व्यसनी असल्याचे लिहिले .. नंतर सर्व शिबिरीर्थीना ..एका मोठ्या हॉल मध्ये एकत्र करण्यात आले .. त्या ठिकाणी एकंदरीत दहा दिवस कसा कार्यकम असेल त्याची कल्पना व्यवस्थापकांनी दिली ... पहिले तीन दिवस केवळ ' आनापान सत्ती ' नावाचा प्रकार असणार होता ..नंतर चौथ्या दिवसापासून प्रत्यक्ष विपश्यना सुरु होणार होती .. या सर्व काळात पूर्णतः मौन बाळगावे अशी सूचना वारंवार देण्यात आली ..तसेच या काळात कोणतेही अनुचित वर्तन करू नये अशी विंनती देखील करण्यात आली .. येथे ' आर्य मौन ' हा मौनाचा नवीन प्रकार समजला ..केवळ तोंडानेच नव्हे तर ..खाणाखुणा .. इशारे .. लेखन .. वगैरे कोणत्याच प्रकारे आसपासच्या साधकांशी संपर्क साधण्यास मनाई होती .. या पूर्वी मौन म्हणजे फक्त तोंडाने बोलायचे नाही ..बाकी इशारे केले किवा आपल्याला जे सांगायचे आहे ते लिहून दिले तर चालते असा माझा समज होता ..हे ' आर्यमौन ' म्हणजे जरा कठीणच प्रकार वाटला मला .. बघू जमेल तसे निभावून नेवू असा निर्धार केला मनाशी ..

नोंदणी कार्यालयातच एक गम्मत झाली ..आमचा जुना गर्दुल्ला मित्र संजय हा देखील पुण्याहून तेथे आला होता ..हा संजय अगदी विनोदी आणि इरसाल ..मुक्तांगण मध्ये आम्ही खूप धम्माल केली होती ..त्याला तेथे पाहून आम्हाला हसू आवरेना .. तो देखील रीलँप्स झाला असावा हे त्याच्या ताब्येतीवरून समजतच होते ..मात्र आम्हीही त्याला आम्ही रीलँप्स झाल्याचे सांगितले नाही आणि त्यानेही स्वतःबद्दल सांगितले नाही .. तेथे संजयला पाहून आमच्या जुन्या आठवणी जागृत झाल्या .. बराच वेळ गप्पा मस्करी यात गेला .. कादर.. मी अवि व संजय आमची सर्वांची राहण्याची व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी केली गेली .. त्यामुळे सायंकाळी आठ नंतर आम्ही एकमेकांपासून दूर झालो ..आपापल्या निवासस्थानी गेलो .. एकावेळी सुमारे एक हजार साधक साधना करण्यासाठी उपस्थित असतात .. त्यांची सर्वांची निवास ..भोजन अशी व्यवस्था करणे सोपे काम नव्हे ..परंतु विनामूल्य हे काम केले जाते या बदल नवल वाटले ..मुख्य बुद्ध मंदिराच्या आसपास वेगवेगळे हॉल तसेच खोल्या बांधलेल्या होत्या निवासासाठी .. तेथे काम करणाऱ्या लोकांना ' धम्मसेवक ' असे म्हंटले जाते हे समजले .. त्याच्या साठी वेगळी निवास व्यवस्था होती .

( बाकी पुढील भागात )
======================================================

धम्म सेवक ! ( पर्व दुसरे -भाग ६४ )

 
सायंकाळी सर्वाना नियम समजावून झाल्यावर ... एका ठिकाणी सर्वाना मक्याच्या लाह्याची छोटी पाकिटे वितरीत करण्यात आली .. येथे सकाळी नाश्ता आणि दुपारी जेवण असते ..रात्री काहीतरी हलके फुलके खायला मिळेल असे समजले ...नेहमीपेक्षा जरा कमी जेवूनच ध्यान साधना नीट होते अन्यथा सुस्ती ..गुंगी येते ध्यान करताना ...असे याचे कारण समजले ..तसेच येथे इतर शारीरिक मेहनतीची कामे नसल्याने उगाच जास्ती जेवून ते पचलेही नसते ..शरीरीला जितक्या कँलरीजची आवश्यकता असेल तितकेच अन्न मिळणार होते .. फक्त ज्यांना मधुमेह आहे अश्यांना मात्र रात्री देखील थोडे जेवण मिळणार होते ..आम्ही कादर ..संजू आणि मी तिघेही रिलँप्स असल्याने तसेही जेवण आमच्या दृष्टीने महत्वाचे नव्हतेच ..मक्याच्या लाह्या खाऊन झाल्यावर अचानक कादर आणि संजय बाथरूमला जातो म्हणून पाच मिनिटे गायब झाले ..मला संशय आला की माझ्यापासून लपवून हे लोक माल प्यायला तर गेले नसतील ..ते परत आल्यावर खोदुन खोडदुन विचारले तेव्हा समजले ..संजयच्या खिश्यात एक शेवटची बिडी उरली होती ..ती ओढायला ते गेले होते .

.नंतर परत सर्वाना एका हॉलमध्ये जमविण्यात आले .. तेथे प्रोजेक्टर लावून श्री . सत्यनारायण गोयंका यांचे ' विपश्यना ' बद्दल .. एक तासभर विवेचन दाखविण्यात आले ...त्यात त्यांनी सांगितले की या दहा दिवसात आपण सर्व एका वेगळ्या प्रकारच्या अनुभवातून जाणार आहोत .. अतिशय दिव्य असा हा अनुभव असणार आहे ..पूर्वीचे आपले धार्मिक ..अध्यात्मिक ..सर्व प्रकारचे विचार बाजूला ठेवून ..कोणताही पूर्वग्रह न ठेवता या अनुभवला सामोरे गेलात तर अतिशय योग्य लाभ मिळू शकेल .. त्या काळात .नामस्मरण .. एखाद्या विशिष्ट देवाचा जप .. मानसपूजा . वगैरे प्रकार न करता फक्त ज्या ज्या सूचना दिल्या जातील त्याच प्रमाणे ध्यान करायचे आहे .. या काळात आपणास काही शारीरिक अथवा मानसिक समस्या उद्भवल्यास आपल्या सेवेस धम्मगिरीचे वैद्यकीय पथक मदतीस असणार आहे ..त्वरित त्यांची मदत उपलब्ध होऊ शकेल ..नियमांचे काटेकोर पालन करावे ..एकमेकांशी जरी बोलण्यास मनाई असली तरी काही अडचण असल्यास आपण येथील धम्म्सेवक व आचार्य यांचेशी बोलायला हरकत नाही ..या काळात फोन ..वर्तमानपत्र ..डायरी पेन ..लेखन ..वाचन .. असे कोणतेही बाह्य जगाशी संबंध जोडणारे प्रकार न करता केवळ ध्यानावरच लक्ष केंद्रित ठेवा ..अतिशय सुंदर .. शुद्ध हिंदीत ..ओघवत्या स्वरात गोयंका गुरुजींनी सूचना दिल्या पडद्यावर ...ते झाल्यावर मग धम्म्सेवक सर्वाना आपापली निवासस्थाने दाखविण्यास घेवून निघाले ..आमची फाटाफूट झाली .

हे धम्म्सेवक अतिशय नम्र होते ..त्यांना लोक अनेक प्रकारचे प्रश्न विचारून हैराण करत होते ..तरी ते अतिशय शांततेने त्यांचे शंका निरसन करत होते...त्या पैकी एका धम्मसेवकाला मी उगाचच त्याची व्यक्तिगत माहिती विचारली ..यावर समजले की तो इंजिनियर आहे .. सगळे सोडून तो येथे सेवा व ध्यान करण्यास आला आहे..हे ऐकून मला जरा आश्चर्य वाटले ..आधी मला वाटले होते की हे पगारी नोकर असणार ..नंतर समजले की हे सगळे धम्म्सेवक चांगले शिकले सावरलेले असून... त्यांनी कौटुंबिक कर्तव्यातून सन्यास घेवून ..बुद्धाच्या मार्गाचे अनुसरण आणि सेवा हेच आपले कर्तव्य मानले होते ..राष्ट्रीय स्वयंसेवक संघात देखील अश्या प्रकारचे लोक प्रचारक म्हणून आपले अवघे जीवन संघासाठी आणि जनसेवेसाठी व्यतीत करतात हे ऐकून होतो पूर्वी ..इथे देखील अश्या प्रकारची मंडळी होती आढळली .. भोगापेक्षा त्यागाला श्रेष्ठ मानणारी ही मंडळी खरोखर थोर म्हणावी लागतील ...

( बाकी पुढील भागात )
======================================================


घंटानाद ! ( पर्व दुसरे -भाग ६५ ) 

माझ्या निवासाची व्यवस्था ज्या हॉल मध्ये केली होती त्या हॉल मध्ये एकूण २० पलंग होते ..प्रत्येक पलंगाच्या चारही कडांना मच्छरदाणी बांधण्यासाठी लोखंडी रॉडची चौकट .. त्यावर मच्छरदाणी अडकवलेली ..स्वच्छ चादर ..उशी ..अंगावर घ्यायला जाड चादर अशी उत्तम व्यवस्था ..उद्यापासून कोणाला एकमेकांशी बोलता येणार नव्हते म्हणून सर्व जण भरपूर गप्पा मारण्यात ..एकमेकांशी ओळखी करून घेण्यात मग्न झालेले ..तेथे काही जण माझ्यासारखे नवखे तर काही दुसर्यांदा किवा तिसर्यांदा शिबिराला आलेले जुने साधक होते ..जुने लोक पाहता पाहता झोपी गेले ..नवखे बराच वेळ रात्री जागे होते ..मला झोप येणे शक्यच नव्हते .. टर्की सुरु झाली होती ..सारखा कूस बदलत होतो .. पलंगावर पडून कंटाळा आला म्हणून हॉल बाहेर येवून बसलो .. हलका पाउस सुरु झालेला ..सगळे वातावरण अतिशय कुंद झालेले .. भूतासारखा एकटाच तेथे एका दगडावर बसून राहिलो बराच वेळ ..नंतर परिसरात चक्कर मारली ..सगळीकडे सामसूम होती ..बिडीची खूप तलफ आली होती मला .. काल सायंकाळपासून बिडी ओढलीच नव्हती ..सायंकाळी हे विशेष जाणवले नाही ..आता भयाण रात्री एकटा पडल्यावर तीव्रतेने बिडीची आठवण येवू लागली ..आपण अविला न सांगता एखादा बिडी बंडल सोबत आणला असता तर बरे झाले असते असे वाटले ..अवीने झडती होते असे सांगून आम्हाला घाबरवले होते ..प्रत्यक्षात अशी झडती वगैरे काही प्रकार नव्हता ..येथे येणारे साधक नियम मोडणार नाहीत यावर ' विपश्यना ' प्रशासनाचा गाढ विश्वास असावा कदाचित ... रात्रभर इकडे जागाच होतो .. बिडीचे एखादे थोटूक कुठे आढळते का यावर बारीक नजर ठेवून होतो ..

पहाटे साधारण चारच्या सुमारास एक धम्म्सेवक ..हातात देवघरात असते त्या पेक्षा जरा मोठी पितळी घंटा घेवून आमच्या हॉल मध्ये आला .तो ती घंटा जोरात जोरात वाजवीत होता .. त्या आवाजाने लोक हळू हळू उठू लागले .. जे उठत नव्हते त्यांच्या पलंगाजवळ तो धम्म्सेवक जरा जास्त वेळ थांबून घंटानाद करी ..मग ते उठत .. आमच्या हॉल मधील सगळे उठल्यावर तो दुसऱ्या ठिकाणी गेला इतरांना उठवायला ...उठविण्याचा हा प्रकार मला खूप आवडला .. अजून दोनतीन धम्म्सेवक अशी घंटा घेवून फिरत असावेत ...पहाटेच्या त्या मधुर घंटानादाने सगळे वातावरण भारले गेले ..सर्वजण तोंड वगैरे धुवून ..काल सायंकाळी दाखवलेल्या ध्यानकक्षात पोचले .. एकावेळी सुमारे चारशे जण आरामात बसतील अश्या ध्यान कक्षात सगळे जमले .. असे तेथे पाच सहा हॉल असावेत .. कालच प्रत्येकाला बैठक क्रमांक देवून बसण्यासाठी छान सतरंजी सारखी आसने मांडलेल्या ठिकाणी आपापल्या क्रमांकानुसार बसायला सांगितले गेले होते ..त्या नुसार मी माझ्या क्रमांकाच्या आसनावर बसलो ..कादरही माझ्याच ध्यानकक्षात होता ..संजय बहुधा क्रमांक दोनच्या ध्यानकक्षात असावा... कादरची बैठक माझ्या पुढे चारपाच ओळी सोडून .. एकमेकांशी आजपासून बोलायचे नव्हते ..म्हणून मी कादरला पाहूनही न पाहिल्यासारखे केले ..मात्र तो सारखा मागे वळून वळून माझ्या तोंडाकडे पाहत होता ..शेवटी त्याला एक स्माईल दिलेच ..मग त्याचे समाधान झाले .. 

जरा वेळाने समोर असलेल्या चौथऱ्यावर एक मध्यमवयीन व्यक्ती येवून बसली ..साधा पंधरा पायजमा आणी पंधरा शर्ट असा वेष....त्या व्यक्तीने खाली आसनावर बसल्यावर .व्यवस्था केलेल्या टिकाणी एक कँसेट लावली .. लगेच स्पीकरवरू गोयंका गुरुजींचा धीर गंभीर आवाज येवू लागला .. सर्वांचे स्वागत करून त्यांनी शुभेच्छा दिल्या .. हलकेच डोळे मिटून घेण्याची सूचना दिली ..जसे सोयीस्कर वाटेल तसे बसण्यास हरकत नव्हती ..त्याला सहजासन म्हणतात .. मी पूर्वी योगासने केली असल्याने पद्मासनात बसलो होतो .. काही लोक मांडी घालून तर काही साधे सरळ जमेल तसे बसलेले .. डोळे मिटल्यावर गुरुजींनी श्वासोश्वास कसा होतो आहे ते अनुभवण्यास सांगितले .. सतत त्यांचा आवाज आणि सूचना .. नाकपुड्यांमधून श्वास आता जाताना ...नाकाखाली असलेल्या भागाजवळ हलक्याशा संवेदना होतात .. तसेच नाकपुडीच्या आत देखील श्वास घेतला जातोय हे जाणवते ...त्याकडे लक्ष देण्यास सांगितले... अंत:चक्षु द्वारे हे करायचे होते म्हणजे शरीराचे डोळे बंद ठेवून... मनाचे डोळे उघडून हे सर्व अनुभवायचे होते ..शरीराला जिवंत ठेवणारी सगळ्यात महत्वाची क्रिया आहे श्वासोश्वासाची ...मात्र सहजगत्या श्वास होत असल्याने आपण क्वचितच त्याची दखल घेतो ..आपल्याला जिवंत ठेवणाऱ्या या क्रियेचे स्वस्थपणे निरीक्षण करणे होतच नाही कधी .. आता जाणीवपूर्वक हे करायचे होते ..नाकाजवळ जाणवणारी अगदी हलकीशी संवेदना देखील अनुभवायची होती ..इतके एकाग्र होणे मला क्षणभरच जमले ..नंतर मन भरकटले ..श्वास दुर्लक्षिला गेला .. घर ..मित्र ..ब्राऊन शुगरचा अडडा ..नातलग ..असे मन फिरू लागले ..काही क्षणांनी पुन्हा गुरुजींच्या आवाजाने भानावर आलो ..पुन्हा श्वासोश्वास निरखू लागलो .. गुरुजीना हे माहित होते की मन भरकटते म्हणून त सतत बोलत असावेत ..त्यांनी हे देखील आधीच सांगितले की चंचल मन वेगवेगळ्या विषयांमध्ये भटकेल .. भांबावेल .. अडखळेल .. ठेचकाळेल ...त्याला पुन्हा पुन्हा श्वासाच्या दाव्याला बांधावे लागेल ...मनात येणारे सगळे विचार सारखे लोचटा सारखे येत राहतील ..भुलवतील ..फूस लावतील मनाला .. विचारांची श्वापदे कधी अचानक मनावर झडप घालतील आणि कब्जा घेतील ..तरीही न कंटाळता मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करत रहायचे .

( बाकी पुढील भागात ) 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें