आर्यमौन ! ( पर्व दुसरे -भाग ६६ )
स्पीकरवरून सतत गुरुजींच्या सूचना आणि मार्गदर्शन सुरु .. माझी मन एकाग्र करण्याची केविलवाणी धडपड .. किती वेळ झाला असावा याचा अंदाज लागत नव्हता .. केव्हा एकदा गुरुजी डोळे उघडायला सांगतात असे झाले होते मला .. मध्ये एक दोन वेळा डोळे किलकिले करून पहिले ...आता पायाला रग लागलेली .. मग पद्मासन सोडून ..साधी मांडी घातली .. जरा वेळाने पुन्हा मांडी बदलून बदलली ..अतिशय अवस्थ झालो होतो ..मुळातच चंचल असलेले मन ...टर्की मुळे अधिकच सैरभैर झालेले होते ...शेवटी न राहवून डोळे उघडले ..आजूबाजूला पहिले तर माझ्य सारखे काही नवखे डोळे उघडून होते ..एकमेकांची नजरानजर होताच कानकोंडे होऊन पुन्हा डोळे मिटत होते ..कादर बसलेल्या जागी पहिले तर तो जागेवर नव्हता ..पुन्हा डोळे मिटले ..मग मन कादर कुठे गेला असेल हा विचार करण्यात गुंतले ..एकंदरीत मन श्वासोश्वासावर काही केंद्रित रहात नव्हते ..नेमका श्वासोश्वास सोडून सगळीकडे भटकत होते ....मध्येच लघवी वैगरेला जायचे असेल तर जाता येईल असे कालच सांगितले गेलेले ..त्या सूचनेचा फायदा घेवून लघवीसाठी उठलो .. चोर पावलांनी बाहेर आलो..एकदोन जण हॉलच्या बाहेर असलेल्या बाथरूम मध्ये होते .. बहुधा ते देखील कंटाळून बाहेर पडले असावेत ..त्या पैकी एकाने मला खुणेने तळहातावर बोट चोळून तंबाखू आहे की असे मोठ्या आशेने विचारले .. मी मानेने नकार दिल्यावर त्याचा चेहरा उतरला ...
कादर कुठे दिसेना ..परत हॉल मध्ये येवून बसलो ..सुमारे तासाभराने डोळे उघडण्याची सूचना मिळाली ..एकदम हायसे वाटले मला .. नाश्त्याची सुटी झाली ..आता सुमारे मध्ये दीड ते दोन तास वेळ होता नाश्ता व इतर गोष्टींसाठी ..आधी कादरला शोधू लागलो ..तर एका ठिकाणी कादर आणि संजय दिसले ..बोलायचे नव्हतेच ..नुसताच त्यांच्या बाजूला जावून उभा राहिलो ..मग संजयने खुण केली आणि एका बाथरूमच्या मागे आम्ही तिघे गेलो ..तेथे आसपास कोणीही नव्हते .. संजय एकदम हसायला लागला ..तो स्वतच्याच वैतागाला हसतोय हे लक्षात येवून आम्हीही हसू लागलो ..एकमेकांना टाळ्या दिल्या ..न बोलताच एकमेकांची ' ध्यान ' करताना काय गोची झाली असावी हे एकमेकांना समजले होते ... हे हसणे स्वतच्याच फजितीवर होते ..लगेच हलक्या आवाजात बोलणे देखील सुरु झाले ..हे ' आर्यमौन ' म्हणजे कठीणच होते ..पहिल्याच दिवशी आम्ही मौनाचा नियम मोडला ..आमची कुजबुज सुरु असताना एक धम्मसेवक अचानक समोर आला ..हात जोडून उभा राहिला ... त्याने आम्ही बोलतो आहोत हे कुठूनतरी पहिले होते ..नम्रपणे तो आम्हाला नियम पाळण्याची आठवण करून देत होता ..त्याचे असे हात जोडून उभे राहणे आम्हाला खजील करणारे होते ..गुपचूप इथून सटकलो सगळे ..
डायनिंग हॉलच्या बाहेर नाष्ट्या साठी रांग लागलेली ..तेथे रांगेत लागलो ..निशब्दपणे सगळा कारभार चाललेला ..नाश्त्यामध्ये उपमा ..दोन केळी.. दुध होते ..मला टर्कीत असल्याने भूक लागलेली नव्हतीच ..मात्र रात्रभरच्या जागरणाने खूप पित्त झालेले होते ..म्हणून अर्धा ग्लास दुध घेतले ..इतकी माणसे आजूबाजूला वावरत असूनही सगळीकडे निरव शांतता .. सगळा कारभार न बोलता . खाणाखुणा न करता चाललेला .. दुध घेवून बाहेर आलो ..समोरच एका बाकावर कादर आणि संजय पुन्हा बसलेले दिसले .. कदाचित आम्ही नकळत एकमेकांवर नजर ठेवून होतो .. बिडीची पुन्हा आठवण झाली ..कादर आणि संजय इतके स्वस्थ कसे बसले असावेत ? साल्यानी गुपचूप कुठूनतरी बिडीचा बंदोबस्त केला असावा असा संशय आला .. त्यांना खुणेने बिडी मागितली .तर अगदी अपराध्या सारखा चेहरा करून त्यांनी नकार दिला ..पुन्हा तिघे जरा निर्जन ठिकाणी जावून बोलू लागलो ..बिडीचा काहीतरी बंदोबस्त झाला पाहजे असे तीव्रतेने आम्हाला वाटत होते ...जणू आमच्यावरच नजर ठेवून असल्यासारखा तो धम्मसेवक पुन्हा कुठून तरी उगवला ..हात जोडून समोर उभा राहिला .. त्याची नम्रता आम्हाला खूप लाजवणारी होती ..भामटे होऊन पुन्हा एकमेकांपासून दूर झालो .
( बाकी पुढील भागात )
======================================================
अनित्य भाव ! ( पर्व दुसरे -भाग ६७ )
नाश्ता झाल्यावर अंघोळ उरकून ध्यानकक्षात गेलो ...आता पुन्हा दोन तास ध्यान होते .. मांडी घालून बसल्यावर परत कँसेट लावली गेली ...तोच भारून टाकणारा धीर गंभीर आवाज ..सूचना ... संवेदनाचा अनुभव .. मनाचा चुकारपणा .. मध्येच लहानपणी शाळेत पाठ केलेली बहिणाबाईंची कविता आठवली .. ' मन पाखरू पाखरू , त्याले ठायी ठायी वाटा ..आता होतं भुईवर गेल गेल आभाळात ' हे अवखळ मन कसे ताब्यात ठेवावे ? सारखी विचारांची आवर्तने ..म्हणजे एकाच वेळी मी सूचनाही ऐकत होतो .. त्या पालन करण्याचा निर्धारही करत होतो ..त्याच वेळी मनही आपले स्वतच्या मस्तीत चौफेर उंडारत होते ..नेमक्या त्याच वेळी ..लहानपणीच्या अगदी विस्मृतीच्या गर्तेत गेलेल्या आठवणी हटकून मन:पटलावर येवून वाकुल्या दाखवत होत्या ....अगदी कितीही हाकलल्या तरी सारख्या मला टुक टुक करत होत्या .. चारपाच वेळा मांडी बदलून झाली ..पायाला रग लागली ...पाठीत कळा.. डोक्यात विचारांचा भुंगा .. आणि त्यात टर्की ..वेड्यासारखे झाले मला ..अचानक गहिवरून यायला लागले ..वाटले खूप रडून घ्यावे ..स्वतच्या आयुष्यावर .. पराभवावर ..सतत गोंजारत बसलेल्या व्यथेवर .. शेवटी डोळे उघडलेच .. बाथरूमसाठी बाहेर सटकलो ....कादरची सहनशक्ती माझ्याआधीच संपलेली ..तो जणू माझीच वाट पाहत असल्यासारखा बाहेर उभा ..मला बाहेर येताना पाहून मनापासून हसला .. मग बाथरूमच्या मागे गेलो दोघे ..हळूच कुजबुज करत .एकमेकांचे हाल हवाल घेवू लागलो ....एकदोन जण अजून उठून बाहेर आले तसे आम्ही अपराध्यासारखे पुन्हा आत गेलो .. गुरुजींच्या सूचना सुरूच होत्या स्पीकरवर ..श्वास आला ... गेला ..पुन्हा नवीन श्वास .. प्रत्येक श्वासागणिक जीवन पुढे जातेय ..कणाकणाने ..क्षणाक्षणाने..तिळतीळ.. मघाचा क्षण मागे पडला .. नवीन श्वास नवीन क्षण .. नाकाजवळ श्वास घेताना हलकेसे हुरहूरलेपण .. रोमांच .. खाजवल्याची भावना ..
गेला तो क्षण ..सगळ्या वेदना ...संवेदना अनित्य आहेत ..भ्रम आहेत मनाचे ...एकमेव सत्य हेच की श्वास सुरु आहे ..शरीर जिंवंत आहे ..त्याची सगळ्यात निकडीची गरज म्हणजे पुढचा श्वास .
जीवनातील दुख: ..आनंद .. निराशा .. वैफल्य ..सगळ्या भावना अनित्य ..क्षणभंगुर .. सगळे उत्सव कधी न कधी संपणार .. भ्रमित भावनाचक्र असेच फिरत राहील...काही क्षण गुरुजींच्या सूचनांकडे मन एकाग्र झाले .. खरोखर हे जीवन पुढे पुढे जात आहे .. आपणही हळू हळू ..प्रत्येक श्वासागणिक वार्धक्याकडे जाणार .. मग ..मग ..जरा.. व्याधी ..शेवटी मृत्यूला सामोरे जाणार.. ज्या शरीराच्या भोगांसाठी मरमर केली ..हेवेदावे ..वैर ..द्वेष ..तिरस्कार ...लळा ..जिव्हाळा .. ओढ ..तारुण्याचा उन्माद ..आसक्ती ..सगळे सगळे शेवटी शून्य होणार ..निश्चेत होणार शरीर ... वासनांचे उत्सव थंडावणार ....बापरे ! ..मी एकदम घाबरून डोळे उघडले ....पुन्हा मोहाच्या दुनियेत प्रवेशलो ...घर .. कॉलेज .. मित्र ..अनघा .. मुक्तांगण .. पुन्हा असत्याची झापडे ओढून स्वतःवरच खुष झालो ...वेळ संपत आली होती .. गुरुजींनी एक पाली भाषेतील श्लोक म्हंटला .. शेवटी सबका मंगल हो ..सबका मंगल हो ..सबका मंगल हो असे गुरुजींनी म्हंटले ..त्यांच्या पाठोपाठ सर्वांनी तेच म्हंटले ....मला आठवले लहानपणी ' शुभंकरोति कल्याणं , आरोग्यं धनसंपदा ..शत्रुबुद्धि विनाशाय ..दीपज्योती नमोस्तुते : ' म्हणून झाल्यावर शेवटी आई देवासमोर हात जोडून ..सर्वाना चांगली बुद्धी दे .. असे म्हणायला लावायची .
जेवणाची वेळ झाली होती ..सगळे डायनिंग हॉल कडे निघाले ....जेवणात अगदी कमी तिखट ..कमी मसाले ..मात्र अतिशय रुचकर जेवण होते .. थोडासे जेवलो .. आता विडीची तल्लफ आली .. तेथे काहीतरी दुरुस्तीचे काम सुरु होते .. काम करणारे मजूर आराम करत बसले होते एका झाडाखाली .. कादरने डोळ्यानीच त्या मजुरांकडे इशारा केला ..मी समजलो ..त्या मजुरांकडे नक्की बिडी असणार ..हळूच आम्ही दोघे त्या मजुरांमध्ये जावून बसलो ..कादरने हलक्या स्वरात त्यांना बिडी मागितली ..तर त्यांनी नकारार्थी मान हलवून हातातील तंबाखूची डबी दाखवली .. कादरने लगेच हात पुढे करून चिमुटभर तंबाखू घेतली त्याच्याकडून .. मला तंबाखू खाणे अजिबात जमत नसे .. पूर्वी एकदोन वेळा चिमुटभर दाढेखाली ठेवली होती ..मात्र नंतर थुंकून टाकल्यावर बराच वेळ तोंडात काहीतरी अडकलेय असे वाटत राहिले ..शेवटी स्वच्छ चूळ भरून दात घासले तेव्हा .. बरे वाटले होते ..तेव्हा पासून मी तंबाखूच्या वाट्याला गेलो नव्हतो .
दोन तास विश्रांतीसाठी मोकळे होते .. संजय आलाच आम्हाला शोधात ..मग तिघेही ..एकांतात जावून कुजबुजल्या स्वरात गप्पा मारू लागलो .... उगाच इकडे तिकडे टंगळ मंगळ करत फिरलो .. ध्यानाची वेळ झाल्यावर आपापल्या जागी जावून बसलो .. पुन्हा दोन तास ..अनित्य भाव .. फक्त श्वास एके श्वास ..
( बाकी पुढील भागात )
=====================================================
साधक नव्हे बाधक ! (पर्व दुसरे -भाग ६८ )
पाहता पाहता दोन दिवस उलटले ' विपश्यनेचे ' ..दिवसभरात सुमारे सहा तास ध्यान ..नंतर सायंकाळी २ तास गोयंका गुरुजींचे विवेचन ..त्या विवेचनात गुरुजी मनात काय काय खळबळ उडते ते अगदी तंतोतंत सांगत असत .. सायंकाळी जेवणा ऐवजी मक्याच्या लाह्या ..रात्री ज्यांना मधुमेह आहे त्यांच्या करिता जेवण असे त्या जागी स्टीलच्या मोठ्या किटलीत भरून ' जिंजर वाँटर ' ठेवले जाई .. आल्याचा रस घातलेले गरम पाणी प्यायला छान वाटे ...घश्याला शेक मिळावा म्हणून मी ते आनंदाने घेई .. या वेळी टर्की लवकर कमी झाली असे वाटले .. मात्र बिडीसाठी अवस्थता होतीच .. रोज दुपारच्या ध्यानानंतर हॉल मधील आचार्य एकेकाला जवळ बोलावून त्याची विचारपूस करत असत ..मन एकाग्र झाले का ? काय काय विचार आले मनात ? काय काय त्रास जाणवले वगैरे प्रश्न ते विचारात असत .. मी सांगितले होते की शरीर आणि मन खूप अवस्थ होते ..मनात भलते सलते विचार ..जुन्या आठवणी ..गहिवर ..वगैरे .. ते म्हणाले ' चिंता मत करो ..सब विकार निकाल रहे है...धीरे धीरे ये सब बंद होगा '...म्हणजे त्यांच्या मते माझ्या मनातील सुप्त विकार या प्रक्रियेने बाहेर पडत होते ...ध्यानात एकाग्रता मिळाली की हे सुप्त विकार जागृत होऊन मनात खळबळ माजवण्याचे काम करत असत ..तरीही न कंटाळता मन एकाग्र करत गेले की हळू हळू विकार निष्प्रभ होत ..जातात ..फक्त जशा जशा सूचना मिळतील तसे ध्यान पुढे न्यायचे .. अगदी बरोबर होते त्यांचे म्हणणे ..मी येथे आल्यावर मौनाचा नियम मात्र पूर्णपणे मोडला होता .. याचे कारण एकटा न येता मित्रांसोबत आलो होतो .. तिथे आमच्या सारखे मौनाचा नियम मोडणारे काही लोक होते ते देखील एकटे न येता मित्रांसोबत आले होते ..एक दोन जोडपी होती मध्यमवयीन ..नवरा आणि बायको दोघांचीही राहण्याची व्यवस्था वेगवेगळी .. त्यामुळे रोज पहाटे आधी हॉल मध्ये आले की ते नवरा बायको एकमेकांची खबर घेत असत ..विपश्यनाचा खरा फायदा हवा असेल तर कोणी मित्र नातलग त्या शिबिराला असता कामा नये असे वाटले ..!
तिसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता झाल्यानंतर ...संजय कादर आणि मी ..एका बाथरूम मध्ये गुपचूप बोलत असताना ..कादरला एक जुने जीर्ण झालेले ..उन पाउस .वारा खाऊन खरपूस तपकिरी रंगाचे झालेले एक बिडीचे थोटूक सापडले ..जवळ जवळ अर्धी बिडीच होती ..आम्हाला एकदम लॉटरी लागल्यासारखा आनंद झाला ..आता वांधा होता तो माचीसचा ... कादरला आठवले ...ध्यानकक्षाच्या कोपऱ्यात कासवछाप अगरबत्ती लावायला एक माचीस ठेवलेली असते अशी त्याने झाडी केली होती .. कादर हळूच ध्यान कक्षात जावून ती माचीस चोरून घेवून आला .. ते थोटूक पेटवून पहिला झुरका मी मारला ..आणि एकदम गरगरू लागले .. अगदी चक्करच आली मला .. एकाच झुरक्यात मी एकदम सुन्न झालो ..डोके धरून खालीच बसलो ..मग कादरला आणि संजयला देखील तोच अनुभव आला ..सुमारे अडीच दिवसानंतर आम्ही बिडीचा दम मारला होता.
त्या विडीच्या झुरक्याने पुन्हा मनात चलबिचल सुरु झाली ..आपण बिड्या सोबत आणायला हव्या होत्या असे वाटले ..
आमच्या जवळचे थोडेफार पैसे आम्ही अविनाश जवळ देवून ठेवले होते ..संजयच्या मनात एक प्लान तयार झाला ..अविकडून किमान दहा रुपये मागून घ्यायचे आणि गुपचूप डोंगर उतरून खाली वस्तीत जावून बिडीबंडल आणायचा ..लगेच आम्ही अविला शोधले ..अवि भेटला पण म्हणाला तुमचे पैसे मी सध्या प्रशासनाकडे जमा केलेले आहेत ..आता ते पैसे एकदम परत जातानाच मिळतील .. आमची निराशा झाली ..संजयला आठवले त्याच्या राहण्याच्या जागी ..एक मध्यम वयीन गृहस्थ आमच्या सारखाच तंबाखूसाठी अवस्थ झालेला होता .. त्याच्या जवळ पैसे होते .. संजयने दुपारी जेवणाच्या वेळी त्या माणसाला गाठले आणि त्याला तंबाखू आणून देतो असे सांगून त्याच्या कडून दहा रुपये घेतले .. मग जेवण झाल्यावर मध्ये जे दोन तास विश्रांती साठी असतात त्या वेळात .. आम्ही तिघेही ध्यान कक्षाच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूम कडून डोंगर खाली उतरलो ..खाच खळगे पार करत ...वाटेत दोन ठिकाणी तारेचे कुंपण होते ..तारा वाकवून त्या खालून सटकलो .. पावसाळा असल्याने खूप चिखल होता .. आमचे पाय पूर्ण चिखलाने भरले .. डोंगरावरून खाली उतरल्यावर ..भाताची शेते लागली ..त्यातही गुढघाभर पाणी साचलेले ..ते तुडवत कसे तरी सुमारे तीन किलोमीटरचा वळसा घालून ..एका वस्तीत पोचलो .. एका किराणा दिकानातून एक बिडी बंडल आणि तंबाखूच्या दोन पुड्या घेतल्या ..कादरला तीन दिवसात चहा मिळाला नव्हता ..तो एक नंबर चहाबाज ..एका चहाच्या गाडीवर तिघांनी मिळून एक चहा घोट घोट घेतला ..आणि परत तसाच वळसा घेवून पुन्हा डोंगरावर शिबिरात परतलो ..
( बाकी पुढील भागात )
======================================================
माघार .....! ( पर्व दुसरे -भाग ६९ )
बिडीबंडल घेवून आल्यावर तर आमची चंचलता अजून वाढली .. दर तासाभराने आम्ही बिडी ओढण्यासाठी म्हणून ध्यानकक्षातून बाहेर पडत असू ..एव्हाना सर्व धम्मसेवकांना यांचे त्रिकुट सारखे नियम मोडते आहे हे कळून चुकले असावे ..ते सारखे आमच्यासमोर येवून हात जोडून उभे रहात ..इतकी नम्रता आम्हाला लाजवणारी होती ..ते जर आम्हाला काही बोलले असते तर बरे असे अनेकवेळा वाटले ..कारण ते बोलले असते तर आम्ही त्यांना समर्थने देवू शकलो असतो ..काहीतरी कारणे देवू शकलो असतो ..मात्र काहीही न बोलता माफी मागत असल्यासारखे हात जोडून समोर उभे राहणे खूप लाजिरवाणे होई .. तो बिडी बंडल आम्ही अगदी क्वचित बिडी ओढायची असे ठरवून दहा दिवस पुरवायचा असे ठरवले होते ..परंतु जेमतेम दीड दिवसात आम्ही बंडल संपवला .. दिवशी चौथ्या दिवशी सकाळी बिड्या संपल्या मग संजय आणि कादरची कुरकुर सुरु झाली ... इतके दिवस राहणे कठीण आहे वगैरे बडबड करू लागले .. मी त्यांना समजावत होतो ..पाहता पाहता चार दिवस होत आले आहेत .. अजून सहा दिवस कसेही काढू ..पण सगळे शिकून घेवू वैगरे ..मग त्यांनी समर्थने सुरु केली ..आता टर्की तर संपल्यातच जमा आहे ..आपण त्याच उद्देशाने आले होतो ..बाकी इतके सगळे आध्यात्म आता शिकून काय सन्यास घ्यायचा आहे का आपल्याला वगैरे...खरेतर गुरुजींनी सुरवातीच्या सत्रातच ' विपश्यना ' म्हणजे सन्यास नाही असे स्पष्ट केले होते ..उलट विपश्यना म्हणजे संसारात राहून ..जीवनात नित्य नवीन येणाऱ्या अडचणी ...समस्या ..चिंता यांचा यशस्वी पणे सामना करत ..स्वतःला शांत चित्त ठेवण्याची एक कला आहे .. अर्थात कादर आणि संजय यांनी परत जाण्याचा निश्चय केलाच होता त्यामुळे त्यांची समजूत काढण्यात काही अर्थ नव्हता .. ते दोघेही आचार्यांकडे गेले आणि आम्हाला घरी जायचे आहे असे सांगितले .. आचार्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला ...तर यांनी आम्ही येथील बहुतेक नियम मोडले आहेत असे त्यांना सांगितले ... वर बिडी बंडल आणला ..माचीस चोरली ही देखील माहिती पुरवली ..यावर बिचारे आचार्य अवाक झाले .. यांना समजावण्यात काही अर्थ नाही हे त्यांनी ओळखले आणि जाण्याची परवानगी दिली .. दोघेही लगेच समान घेवून सायंकाळी चारच्या सुमारास निघून गेले .
ते दोघे गेल्यावर सुरवातीला दोन तास मला बरे झाले ते गेले असे वाटले ..कारण आता ध्यानातून उठून बाहेर येण्याचे कारण उरले नाही ..जरा जास्त एकाग्रतेने ध्यान होऊ लागले ..चौथ्या दिवसापासून ' आनापान सत्ती ' हा फक्त श्वासावर लक्ष ठेवण्याचा अभ्यास संपून प्रत्यक्ष विपश्यना सुरु झाली होती ..म्हणजे आता डोक्याच्या टाळू पासून शरीरातील संवेदना तपासायला सुरवात करायची होती ..शरीरातील प्रत्येक भागात नेमक्या कोणत्या कोणत्या संवेदना जाणवतात ते अभ्यासून ..त्या संवेदना कशा बदलत आहेत ..अनित्य आहेत ..हे अनुभवायचे होते ..निसर्गाने प्रदान केलेल्या ज्ञानेंद्रियांमार्फत आपल्याला बाह्य जगातील संवेदनांचे ज्ञान होते .. मात्र शरीराअंतर्गत होणाऱ्या अत्यंत सूक्ष्म संवेदना या क्रियेने अनुभवता येणार होत्या .. शरीरातील प्रत्येक अवयवाची सविस्तर खबरबात घ्यायची होती ..शरीर जिवंत ठेवण्यास ..कार्यक्षमतेने जगण्यास ..विचारांप्रमाणे कृती करण्यास शरीराला साथ देणारे अवयव कसे कार्य करतात ते जाणून घ्यायचे होते ..एरवी निसर्गाने दिलेले शरीर एखाद्या मशीन प्रमाणे नियमित सगळी कार्ये बिनबोभाट पार पाडत असल्याने कधी त्याच्याकडे लक्ष जात नाही ..फक्त जेव्हा एखादी वेदना ..त्रास .दुखणे उद्भवले तरच आपण शरीराची दखल घेतो ..औषधे गोळ्या घेवून ..डॉक्टरकडे जावून ..तात्पुरती मलमपट्टी करतो .. आता आस्थेने या शरीराची विचारपूस करायची होती .
( बाकी पुढील भागात )
======================================================
माझाही पराभव ! ( पर्व दुसरे -भाग ७० )
प्रत्यक्ष ' विपश्यना ' करणे हा खरोखरच आनंदानुभव होता .. डोक्याच्या टाळू पासून सुरवात केल्यावर सर्व शरीरातील संवेदना अनुभवताना ..स्वतच्या शरीराकडे तटस्थपणे पाहायला गम्मत वाटायची .. आपले शरीर हा केवळ एक हाडामासाचे बनलेले साधन आहे ..जे मनाच्या द्वारा इच्छापूर्ती साठी ..वासनापूर्तीसाठी राबवले जातेय .. ? आसपासच्या परिस्थितीचे ..वातावरणाचे ..पंचेंद्रियां मार्फत आकलन करून जे संदेश मेंदूकडे कडे पाठवले जातात... त्यानुसार मेंदू शरीराला प्रतिक्रिया देण्याचे आदेश देतो ..हे सर्व आदेश मनाच्या कलाने दिले जातात ...बापरे ..सगळे समजून घेण्यास कठीण होते मात्र ..अनुभवताना मजा येई ..गुरुजींनी सांगितलेला ' अनित्य भाव , वेळोवेळी प्रत्ययास येत होता ..कधी कधी शरीराच्या एखाद्या वेदना जाणवत ..काहीतरी अस्वस्थ आहे ..कुठेतरी खुपतेय ..गडबड आहे असे वाटे ..तर काही क्षणातच ते बोचणारे ..दुखणारे गायब होऊन तेथे दुसरी आनंदाची .. संवेदना जाणवे ..पूर्वीपेक्षा आता माझे मन जास्त एकाग्र होऊ लागले होते .. तरीही अजूनही हवी तशी तटस्थता मिळत नव्हती ..हे सगळे हवेहवेसे वाटले तरी ..मन मात्र विषयांचा पाठलाग सहजासहजी सोडायला तयार होत नाही ..कारण आपण मनाला तशी भोगांची सवयच लावली असते किंबहुना ..जमला आल्यापासून आपल्या मनाचे आपण लाड करत गेल्यामुळे मन असे तटस्थ राहणे कठीणच असते .. सारे विकार टपूनच बसलेले असतात ...घरदार ..नातलग ..प्रिय व्यक्ती ..खाण्यापिण्याचे वेगवेगळी स्वादिष्ट स्वादिष्ट पदार्थ .. उत्तम उंची कपडे ..ते कपडे घालून दिसणारी आपली छबी .. लोकांकडून मिळणारा मान ..सन्मान ... भौतिक सुखे मिळवण्याची आंतरिक ओढ ..लैंगिक सुख भोगण्याची अनावर लालसा ..कधी कधी मला विपश्यना करताना स्वतःचेच शरीर परके वाटे ..मात्र हा परकेपणाचा भाव फार काळ जपता येत नव्हता .
कादर आणि संजय नसल्याने आता मधल्या वेळात मी सर्व परिसर भटकून माहिती घेत राहिलो .. तेथे दुसऱ्या वेळी ' विपश्यना ' करण्यास आलेल्या साधकांची ..दुपारच्या वेळच्या ध्यानाची वेगळी सोय केलेली होती ..जेथे मुख्य बुद्ध विहाराच्या बाजूने गोलाकार अश्या छोट्या छोट्या ..जेमतेम एका वेळी एक व्यक्ती व्यवस्थित सुखासनात बसू शकेल अश्या खोल्या बांधलेल्या होत्या ..त्यात हे जुने साधक बसून ध्यान करत असत .. दहा दिवसांचे शिबीर होते तसेच २० दिवस ..१ महिना ..२ महिने अशी दीर्घ साधनेची देखील शिबिरे होती ...ध्यान प्रक्रियेतील पूर्णत्व गाठण्यासाठी .. काही लोक अशी शिबिरे करतात असे समजले .. हे दीर्घ शिबिरातील लोक चालताना अतिशय हळुवार ..नजर खाली ठेवून चालत असत .. अगदी आत्मसंमोहनाच्या अवस्थेत असल्यासारखी .. मन डोळ्यांद्वारे इकडे तिकडे भटकू नये म्हणून त्यांची दृष्टी फक्त पायाकडे असे ..चालताना फक्त रस्ता दिसावा हा हेतू .. एकदा गम्मत झाली ..असाच एक दीर्घ शिबिराचा परदेशी साधक खाली दृष्टी ठेवून ...चालत समोरून येत होता .. मी त्याचे निरीक्षण करत होतो ..तितक्यात मागील बाजूने एक मुलींचा घोळका येत होता ..बहुधा या मुली ' विपश्यना ' परिसर पाहण्यासाठी आलेल्या असाव्यात .. त्यांची आपापसात किलबिल चालू होती .. मुलींचा आवाज ऐकल्याबरोबर त्या साधकाने पटकन मागे वळून पहिले ..तरुण मुली ...सुंदर ..त्यात काही मुलीनी जीन्स , टी शर्ट असे घट्ट कपडे परिधान करून शरीराच्या आकर्षणात भर घातलेली .. त्या मुलींकडे मागे वळून पाहणारा तो साधक क्षणभर थांबला ..सुमारे मिनिटभर तो तसाच स्तब्धपणे त्या मुलींकडे पाहत होता .. त्याच्या मनातील विकार जागृत होत होते हे मला जाणवले .. साधारणपणे मिनिट भराने... बहुधा मोठ्या निग्रहाने त्या मुलींकडे पाहणे बंद करून पुन्हा समोर तोंड केले .. आणि हलकेच स्वतच्या गालावर दोन चापट्या मारून घेतल्या ..त्या चापट्या अश्यासाठी की भरकटलेल्या मनाला त्याने ताकीद दिली असावी .. पुन्हा साधनेच्या मार्गावर येण्यासाठी . मनात विकार जागृत होणे हा मनाचा स्थायी भाव आहे ..मात्र वारंवार अश्या मनाला चापट्या माराव्या लागतील हे त्याने दर्शवले होते .
विपश्यनेच्या सहाव्या दिवशी सकाळपासूनच मला जास्त अवस्थ वाटू लागले .... या अलिप्ततेच्या जगातून केव्हा एकदा ..पुन्हा मोहाच्या जगात शिरतो अशी घाई झाली .. आणि मी शिबीर सोडण्याचा निर्णय घेतला .. आचार्यांकडे जावून त्यांना तशी परवानगी मागितली ..तर त्यांनी आता जेमतेम चार दिवस बाकी आहेत .. थोडा मनाला आवर घाला असे समजावले ..तर मी त्यांना खोटेच सांगितले की काल माझ्या स्वप्नात माझी आई खूप आजारी आहे असे मला दिसले ..मला तिची काळजी वाटते आहे म्हणून मी जाणे आवश्यक आहे वगैरे समर्थने दिली .. शेवटी त्यांनी परवानगी दिली .मुळातच चंचल असलेल्या मनाला ..व्यसने करून मी अधिकच चंचल बनवले असल्याने मी विपश्यना पूर्ण दहा दिवस करू शकलो नाही ..सहा दिवसांनी माझा निर्धार कोलमडला व मी शिबीर सोडले !
( बाकी पुढील भागात )
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें