कुबेरचा अंत !( पर्व दुसरे - भाग १४६ वा )
कोणत्याही व्यसनमुक्ती केंद्रात एखाद्या उपचार घेणाऱ्या व्यक्तीसाठी किमान गरजेच्या वैद्यकीय सुविधा असतात ..ज्यात फर्स्टएड ...रक्तदाब तपासणी ....शुगर टेस्ट ...तसेच ताप ..सर्दी ..खोकला ..अंगदुखी .. सलाईन लावण्याची सोय ..इंजेक्शन देण्याची सोय ..तो करत असलेल्या व्यसनाच्या विरहात त्याला होणा-या त्रासावरची( विड्राँवल सिम्पटम्स ) काही औषधे ..इतकी मोजकी वैद्यकीयव्यवस्था असते ..कारण व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे हॉस्पिटल नव्हे .. व्यसनमुक्ती केंद्रात जेव्हा व्यसनामुळे खूप शारीरिक नुकसान झालेला व्यसनी भरती होतो तेव्हा ..तेथील वैद्यकीय अधिकारी त्याला तपासून हा येथे राहू शकेल किवां नाही ते ठरवतात ..एकदोन दिवस त्याचे निरीक्षण करून ....आवश्यक तपासण्या करून ..जर त्याला सतत वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्याची गरज आहे असे आढळले तर ..पालकांना सांगून त्याला ..तो चालण्या फिरण्या इतपत ..जेवण पचण्या इतपत साधारण झाला की मग पुन्हा व्यसनमुक्ती केंद्रात आणा ..तो पर्यंत एखाद्या चांगल्या हॉस्पिटल मध्ये याला ठेवा अशी स्पष्ट सूचना देतात ..तरीही काही वेळा ..काही व्यसनी असे असतात की आतून त्यांचे झालेले नुकसान सुरवातीला ताबडतोब जाणवत नाही ...कारण बहुधा दाखल होण्याच्या वेळी त्याने व्यसन केलेले असते ..त्या नशेत अनेक शारीरिक त्रास त्याला सुसह्य वाटत असतात ..तो डॉक्टरना नीट काही सांगतही नाही ..मग व्यसन बंद होऊन काही दिवस झाले की त्याला निरनिराळे त्रास होऊ लागतात ..जर ते त्रास आटोक्यात ठेवण्याच्या बाहेर असतील तर ..डॉक्टर व समुपदेशक अशा व्यक्तीला हॉस्पिटल मध्ये पाठवतात ..गम्मत अशी की अनेक पालकांच्या हे पचनी पडत नाही ..याचे कारण असे की एकतर हॉस्पिटल मध्ये व्यसनमुक्ती केंद्रापेक्षा जास्त खर्च येतो ..दुसरे कारण असे की हॉस्पिटल मध्ये पेशंटपाशी थांबायला ..त्याच्यावर लक्ष ठेवायला पालकांना वेळ नसतो..काही पालक तर अशा वेळी चक्क आमच्याशी वाद घालतात की ' याला आणला तेव्हा तर हा ठीक होता ..एकदम असे कसे झाले याला ..तुम्ही नीट लक्ष दिले नाही वगैरे आरोप करतात ' त्यांची समजूत घालणे खूप कठीण होऊन बसते ....म्हणून कुबेरच्या बाबतीत डॉ. अहिर रावांनी आधीच योग्य ती काळजी म्हणून त्याच्या पालकांना सोबत आणण्यास सांगितले होते मला .
कुबेरची राहायची व्यवस्था वार्डच्या बाजूच्याच एका छोट्या खोलीत केली गेली होती ..त्याल क्षयरोग झाल्याचा संशय होताच ..सुरवातीला सोबत त्याने आणलेल्या २० पुड्या होत्या त्याच्या सोबत ..त्यापैकी पाच पुड्या मी व बंधू ने संपवल्या ..मग तिस-या दिवशी आप्पांनी कुबेरच एक्स रे काढण्यासाठी मला त्याला धुळ्याला घेवून जायला सांगितले ..त्या नुसार आम्ही जावून आलो ..आता त्याच्याकडे जेमतेम दोन पुड्या शिल्लक होत्या ...एक्सरे चा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी कळणार होता ..मात्र दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच माल संपल्यावर कुबेरला टर्की सुरु झाली ....खूप तडफडत होता तो ...पलंगावर उठून बसणेही कठीण झाले त्याला ..हातापायाच्या काड्या झालेल्या ..छातीचा पोकळ पिंजरा ..निस्तेज त्वचा ...त्याची अत्यंत वाईट अवस्था दिसत होती ...बोलणेही कठीण होऊ लागले त्याला ..दुपारी तीन वाजता त्याने डोळे सताड उघडे ठेवून बाकी साऱ्या हालचाली बंद केल्या ...त्याची पत्नी रडू लागली ....त्याची पत्नी सीता ही त्याची लग्नाची नव्हे तर अशीच कुठूनतरी भरकटत आलेली ..आधार म्हणून त्याच्या सोबत गेल्या दहा वर्षांपासून राहणारी स्त्री ...हा पाकीटमार ...मुलबाळ झालेले नव्हते ..कारण बहुधा खूप वर्षे व्यसन केल्यामुळे कुबेर त्या साठी असमर्थ झाला असावा ...कुबेरची अवस्था पाहून मला खूप कसेतरी झाले ...त्याला उगाच इथे आणले असे वाटले ..मात्र त्यानेच आग्रह केला होता माझ्यासोबत धुळ्याला येण्याचा ..या पूर्वी अनेकवेळा त्याला मुक्तांगणला उपचार घे असे सुचवले असूनही तो कधी तयार झाला नव्हता ..' यार तुषार अपनी जिंदगी सुधार के बाहर हुई है ' असे म्हणत असे ...' मध्यमवर्गीय घरातला कुबेर लहान असतानाच बिघडलेला ..शाळेला दांड्या मारून सिनेमा पाहणे ...चोरून बिडी ओढणे ..वगैरे सुरु झालेले होते ..वडिलांच्या मृत्युनंतर शाळा सोडून व्यसनी मित्रांच्या संगतीत आला ..पाकीटमारीचे शिक्षण मिळाले ...भरपूर पैसे कमवू लागला ..व्यसनही भरपूर केले ..आपण पाकीट मारतो ..नक्कीच मोठे पाप करतो ही टोचणी घालवण्यासाठी दिवसरात्र नशेत राहू लागला ...मी रिलँप्स असताना त्याने अनेकदा मला ब्राऊन शुगर पाजली होती ..मला त्यावेळी त्याच्या खिश्यात भरपूर पैसे पाहून त्याचा खूप हेवा वाटे ..आपणही असे एखादे झटपट पैसा मिळू शकणारे काम करावे असा मोह होई ..त्याला मी एकदोन वेळा मला पण पाकीटमारी शिकव असा आग्रह केला होता ..मात्र त्याने मला फटकारले होते .." देख भाई ..ये बहोत बुरा काम है ....बहोत हाय ( शाप )लगती है लोगोंकी ...तू कभी इस काम ने नही पडना..कभी जरुरत पडी तो मै तेरे को नशा पिलाउंगा ..पर तू ये पाप मत करना " असे सांगत असे ...पाकीटमारी करायला निघताना आवर्जून देवळात जावून अर्धा तास प्रार्थना करणारा ..कपाळाला टिळा लावून पाकीट मारी करणारा ...डोळे उघडे ठेवून बेशुद्ध पडलेल्या कुबेरकडे पाहून मला ते सारे आठवू लागले .
आम्ही त्याला एखाद्या हॉस्पिटल मध्ये हलवायचे ठरवले ..त्याच्या पत्नीकडे पैसेही नव्हते जास्त ..म्हणून त्याला लगेच नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटल मध्ये न्यावे असे नक्की झाले ...एक कार भाड्याने घेवून त्यात ड्रायव्हर ..त्याच्या शेजारी पुढे कुबेरची पत्नी ..मागच्या सीटवर कुबेरचे डोके माझ्या मांडीवर घेवून बसलेला मी ..असे निघालो ..कुबेरच्या पत्नीला कुबेरजवळ बसवले नाही कारण ती त्याच्या चेहऱ्याकडे पाहून सारखी रडत होती..सायंकाळी सहाला आम्ही निघालो ..बेटावद ते नाशिक असा एकंदरीत चार पाच तासांचा प्रवास होता ....वाटेत त्याची पत्नी सारखी मागे वळून कुबेर शुद्धीवर आला का ते मला विचारात होती ..मी त्याच्या धापापणा-या छातीवरच हात ठेवून बसलेला होतो ..माझे लक्ष श्वास सुरु आहे ना याकडे लागलेले ..वाटेत कुठेही न थांबता नाशिकजवळ पोचलो ..कसेही करून कुबेरला सिव्हील हॉस्पिटल पर्यंत काही होऊ नये अशी प्रार्थना करत होतो मनात ..एकदाचा हॉस्पिटलला पोचला की त्याला चांगली मदत मिळू शकली असती ..नाशिकच्या हद्दीत आडगाव नाक्याजवळ आल्यावर ..मला एकदम संडासचा आणि लघवी केल्याचा वास आला ..गाडीत अंधारच होता ..त्याचवेळी माझ्या मांडीवर असलेली कुबेरची मान निर्जीव वाटली ..त्याच्या छातीवर ठेवलेल्या माझ्या हाताला ..छातीचे धपापणे बंद झाल्याचे जाणवले ..मी समजलो कुबेर गेला ..त्याच्या पत्नीला ते सांगितले असते तर तिची गाडीतच मोठ्याने रडारड सुरु झाली असती ..अजून त्याच्या घरी पोचायला अर्धा तास बाकी होता ..आता कुबेरच्या म्हाताऱ्या आईला कसे तोंड दाखवायचे ?...आम्ही बेटावदला जायला निघताना तिने ' ठीक होकर ही वापस आना ' असा गुजराथी भाषेत दिलेला आशीर्वाद आठवला ...कुबेरची निर्जीव मान जणू काही तो जिवंतच आहे अश्या अविर्भावात मांडीवर घेवून मी चुपचाप बसलो होतो गाडीत..एकदाची गाडी त्याच्या घराजवळ पोचली ..मी ताबडतोब त्याला उचलून त्याच्या घरी आणला ..त्याची आई घाबरली होती ..' काय झाले याला ' असे विचारू लागली ..जरा बेशुद्ध पडलाय ..याला हॉस्पिटल मध्ये न्यावे लगणार असे तिला म्हणालो ..त्याला पलंगावर ठेवल्यावर आई त्याच्या जवळ गेली ..त्याला स्पर्श केला ..आणि मोठ्याने हंबरडा फोडला तिने ..' मरी गयो ..रे ' धाय मोकलून रडू लागली ...त्याची पत्नी देखील रडू लागली ..शेजारी पाजारी गोळा झाले ..लोक उगाचच फालतू चौकश्या करतील ..उगाच आपल्याला अडकवतील या भीतीने मी गाडीच्या ड्रायव्हरला खूण करून तेथून सटकलो .
( क्रमश: )
=======================================================================
=======================================================================
पुन्हा नागपूर ! ( पर्व दुसरे -भाग १४७ वा )
कुबेरच्या मृत्यूनंतर पुन्हा बेटावद गेल्यावर मी सैरभैर झालेला होतो ..इतक्या जवळून ..अगदी माझ्याच मांडीवर झालेला त्याचा करुण अंत ...ज्या व्यसनासाठी त्याने सगळे आयुष्य उधळून लावले ....पणाला लावले..ते व्यसनही शेवटी मरताना त्याला मिळू शकले नव्हते ....व्यसनाविना तडफडत प्राण सोडला होता त्याने ..व्यसनाची इतकी प्रचंड गुलामी मी अगदी जवळून अनुभवली होती ....त्याची तब्येत चांगली असताना त्याला अनेकदा आग्रह केला होता मी व्यसनमुक्ती केंद्रात भरती होण्याचा ..मात्र तेव्हा तो नकार देत गेला ..अगदी शरीर जर्जर होईपर्यंत तो व्यसन करण्यासाठी निकराने लढत राहिला ..जेव्हा व्यसनमुक्त व्हावे अशी इच्छा वाटली ..तेव्हाच नेमका काळाने त्याचा घात केला होता ..शेवटच्या क्षणी तर तो कोमातच होता ...स्वैरपणे... स्वतःच्या मर्जीने ..कोणालाही न जुमानता ...कशाचीही पर्वा न करता जगलेल्या कुबेरला शेवटी मृत्यूने गाठलेच होते ...मृत्युपुढे तो हरला होता ...निसर्गापुढे माणूस किती छोटा आहे याची जाणीव मला त्याच्या मृत्यूने करून दिली होती ...अनेक माणसे अशीच ...एका धुंदीत ..कैफात ..मोहात ..विशिष्ट अहंकारात जगतात ..कधीतरी मृत्यू येणार हे माहित असूनही सगळे काही कायमचे टिकेल या भ्रमात ...आमच्या सारखीच व्यसने ..सत्ता ..संपत्ती ..अधिकार ..या गोष्टींच्या मागे राहतात ....खूप काही मिळवण्याच्या अट्टाहासाने ..निसर्गाने प्रदान केलेल्या शक्तीचा ..बुद्धीचा ..गैरवापर करून ....लांड्या लबाड्या करून ....इतरांवर अन्याय करतात ....या सर्व काळात एक माणूस म्हणून जगणे ..इतरांना आनंद देण्यासाठी जगणे ...मिळालेल्या अनमोल जीवनाचे सार्थक करणे राहूनच जाते ...
पुढे बंधूचे व माझे व्यसन वाढतच गेले ..हे होणारच होते ..आप्पा व अक्कानाही आता सर्व माहित झाले होते ...मात्र ते आम्हाला स्पष्ट बोलू शकत नव्हते ..आमच्या पिण्यामुळे उपचार घेणाऱ्या इतर मित्रांवर परिणाम होत होता ..कोणी आम्हाला तोंडवर काही बोलत नव्हते तरी ...आमची प्रत्यक बाबतीतली अनियमितता ..त्या केंद्रासाठी हानिकारकच ठरत होती ...शेवटी मी एकदा अप्पाना पंधरा दिवस सुटी पाहिजे असे विचारायला गेलो तेव्हा ते म्हणालेच ..' सध्या आपल्याकडे पेशंटही कमी आहेत ..तेव्हा तुम्ही महिना सहा महिने सुटी घेतलीत तरी चालेल ..जेव्हा पुन्हा पेशंट वाढतील तेव्हा मी तुम्हाला बोलावून घेईन ' याचा अर्थ सरळ होता ..सध्या मी काही महिने घरीच बसावे ...मी सायंकाळी बेटावद सोडून निघालो ..बसस्टँड वर मला सोडायला बंधू आला होता ....नाशिकला घरी आल्यावर ..मी नोकरी सोडलीय हे समजल्यावर मानसी आणि आईला धक्काच बसला ..आता पुन्हा हा काय गोंधळ घालणार या भीतीने त्या धस्तावल्या ...सुमित आता तीन वर्षांचा होत होता ..त्याला शाळेत घालायचे होते ..पुढे जवाबदारी वाढत जाणार होती ..मी मात्र कशाचेच सोयरसुतक नसल्यासारखा वागत होतो ...भावानेच सुमितची मेरीच्या चांगल्या शाळेत अँडमिशन करून दिली ...आता घरी पैसे मागून त्रास देणेही प्रशस्त वाटत नव्हते ..भावाने पुन्हा अनिल साहेबांकडे नोकरी करतोस का विचारले ..परंतु मी नकार दिला ..अनिल साहेबांपुढे उभे राहण्याचे धैर्य नव्हते माझ्याकडे ....बहुतेक काळ निराशेत ..घरी झोपून रहात होतो ....कधीतरी संधी मिळाली की थोडेफार पैसे घेवून व्यसन करत होतो ..किवा स्वस्त मिळतात म्हणून स्पाज्मो प्रॉक्सीव्हानच्या गोळ्या खावून ' दुधाची तहान ताकावर ' या न्यायाने ब्राऊन शुगरची तहान भागवत होतो...पुन्हा रविला फोन करून मैत्रीत जावे असे अनेकदा वाटले ..मात्र मी स्वतःहून मैत्री सोडले होते ..आता परत रवी काय म्हणेल ? कदाचित तो नकार देईल या भीतीने ..त्याला फोन करणे टाळत होतो ...परंतु मैत्रीत पुन्हा जाण्याची मनापासून इच्छा होती ..कदाचित माझी इच्छा समजल्यासारखे की काय ...एकदा रवीचाच मला फोन आला ...मी बेटावद सोडलेय हे त्याला समजले होते ..माझ्यानंतर पंधरा दिवसातच बंधुनेही बेटावद सोडले होते ..चार दिवस बंधू नागपूरला टर्की काढायला जावून ..तेथूनच पुण्याला गेला होता ..रविला त्याने माझ्या बद्दल सांगितले होते ..रवीने विचारले ' येता का पुन्हा इकडे तुषार भाऊ ' ..मी त्याच प्रतीक्षेत होतो ..लगेच होकार दिला ..आणि दुस-याच दिवशी नागपूरला निघालो ..
नागपूरला पोचल्यावर समजले की इरफान आणि अँगी दोघेही मैत्री सोडून परत पुण्याला गेले होते ..रवी एकटाच सर्व कारभार पाहत होता ..त्याची खूप ओढाताण होत होती ..त्याच्या मृदू स्वभावामुळे उपचार घेणाऱ्या मित्रांचा उपचार खर्च पालक वेळच्या वेळी भरत नव्हते ..खर्च वाढतच चालले होते ..सगळी तोंडमिळवणी करणे कठीण झालेले ...पुन्हा आम्ही दोघे जोमाने काम करायचे ठरवून कामाला लागलो ...पुढच्या महिन्यात अगदी सेंटरचे रेशन भरायला देखील जवळ पैसे नाहीत अशी अवस्था आली होती ..रवीने आतापर्यंत घरून सुमारे वीस हजार रुपये आणून सेंटर सुरु ठेवले होते ..आता त्याला घरी पैसे मागायलाही संकोच वाटत होता ...शेवटी आम्ही एक उपाय काढला ..मैत्रीला नेहमी मदत करणारे सहायक पोलीस आयुक्त जाधव साहेब यांच्याकडे पैसे मागण्याचा ..आम्ही दोघेही जाधव साहेबाना भेटायला कमिशनर ऑफिस मध्ये गेलो ..त्यांना सर्व परिस्थिती सांगितली ..यावर त्यांनी विचारले ' किती पैसे लागतील तुम्हाला ? ..आम्ही नेमका आकडा सांगायला कचरत होतो ..शेवटी रवीने मनात सर्व हिशोब करून त्यांना तीन हजार रुपये मिळाले तर सध्याची गरज भागेल असे सांगितले ..त्यांनी पटकन पाकीट काढून आम्हाला तीन हजार रुपये काढून दिले ..पैसे घेताना रवी म्हणाला '' सर ..जमले तर एक दोन महिन्यात आपले पैसे मी परत करतो " ते म्हणाले ' जर पैसे परत करणार असला तर मी देत नाही ' हे पैसे माझ्यातर्फे देणगी आहे मैत्रीला असे समजा ..आम्ही भारावलो होतो ...अशीही माणसे जगात आहेत ..कुठलाही गाजावाजा न करता ..उपकार केल्याचे न दर्शवता ..एखद्या अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत करतात ..पोलीस दलात कार्यरत असलेल्या जाधव साहेबांची माणुसकी ...आमच्या व्यसनमुक्तीच्या कार्यासाठी असलेली तळमळ ग्रेटच होती....पुढे एक आठवडा भरातच आम्हाला पूर्वी भेटलेल्या लोकमतच्या पत्रकार वर्षा पाटील यांनी लोकमत ' सखी ' च्या साप्ताहिक पुरवणीत व्यसनमुक्तीवर आधारित लेखमाला सुरु करण्याचा मानस असून त्यासाठी आम्ही काहीतरी लिहावे असे आम्हाला सांगितले ..ही चांगली संधी होती ..मैत्रीचे काम लोकांपर्यंत पोचवण्याची ..रवीने आणि मी चर्चा करून काहीतरी वेगळ्या पद्धतीने लिहावे असे ठरवले ..त्यातूनच ' एका बेवड्याची डायरी ' ही लेख मला लिहिणे सुरु केले ..लेख लिहिल्यावर मी रवीला दाखवून त्यात आवशक ते बदल करून वर्षा मँडम कडे देऊ लागलो ..
( क्रमश: )
========================================================================
=======================================================================
========================================================================
========================================================================
व्यसनावरील श्रद्धा ? ? ? ? ( पर्व दुसरे - भाग १४८ वा )
लोकमतच्या ' सखी ' या साप्ताहिक पुरवणीत ' एका बेवड्याची डायरी ' ही लेखमाला लिहिणे सुरु केल्यावर ...दर गुरुवारी ही लेखमाला प्रकाशित होऊ लागली ..एका भागाच्या लेखनाचे मला त्यावेळी दीडशे रुपये मिळत असत ...या लेखमालेमुळे हजारो वाचकांपर्यंत ..व्यसनाधीनते बद्दल शास्त्रीय माहिती पोचण्यास सुरवात झाली ...व्यसनाबद्दलचे अनेक गैरसमज दूर होण्यास मदत होऊ लागली ....तसेच व्यसनमुक्ती केंद्राबाबत असलेले गैरसमज दूर होऊन व्यसनी मित्र स्वतःहून उपचारांना येण्यास सुरवात झाली..आमच्या कडे चौकशी करणारी ..स्वतःच्या व्यसनाबद्दल कबुली देणारी ..मदत मागणारी ..पत्रे येवू लागली ..त्या पत्रांना उत्तरे देण्याचे काम सुरु झाले ..व्यसनाधीनता हा एक मनो-शारीरिक आजार आहे हे लोकांना समजू लागले ...मौज म्हणून ..आनंद म्हणून ..मित्रांचा आग्रह म्हणून ..विरंगुळा म्हणून ..सेलिब्रेशन ... श्रमपरिहार म्हणून ..समाजात निर्लज्जपणे प्रस्थापित होत असलेल्या असलेल्या ' ड्रिंक्स ' संस्कृतीला तसेच ' पार्टी ' वादी मानसिकतेला मला सुरुंग लावायचा होता ..दारूला लाभलेली प्रतिष्ठा ..त्यामुळे मिळणारा आनंद ..किती भयानक परिणाम देवू शकतो हे मी त्या लेखमालेतून दर्शवत होतो ...या लेखमालेचे सुमारे ३८ लेख लिहून झाल्यावर वर्षा पाटील मँडम एकदा गमतीने म्हणाल्या ' अहो ..ही लेखमाला कधी बंद करणार ? असे माझ्या कामावरचे अनेक सहकारी मला विचारात आहेत ..कारण म्हणे या लेखमालेच्या वाचनामुळे त्यांच्या घरातील कटकटी वाढल्या आहेत ..त्यांच्या बायका त्यांना पिण्यास मनाई करत आहेत ..' थोडी थोडी घेत गेला ..बघता बघता बेवडा झाला ' हे त्यांना इतके पटले आहे की आमच्या पिण्यावर बंधने येवू लागली आहेत ..आपण आता हे थांबवले तर बरे होईल ..' त्यांचे हे बोलणे जरी लेखमाला बंद करण्यासंबंधी होते तरी त्यातच लेखमालेचे यश स्पष्ट होते होते ....अजून बरेच भाग लिहिणे बाकी होते ..तरी शेवटी ती लेखमाला बंद करण्यासाठी वर्षा मँडमवर वेगवेगळ्या कारणांनी दबाव वाढल्यावर शेवटी लेखमाला बंद करावी लागली . ' मैत्रीत ' उपचार घेणाऱ्यांची संख्या बरीच वाढली होती ..त्या वर्षभरात अनेक जण स्वतःहून उपचारांना आले ..
या काळात आमच्याकडे पुरेसे अनुभवी ..प्रशिक्षित कार्यकर्ते नसल्याने ..कामाचा सर्व भार रवी व माझ्यावर होता ..रवी सामान आणणे ..भाजी आणणे ..भेटीगाठी घेणे ..एखादा समूह उपचार घेणे अशी कामे करत असे ..तर मी वार्डमधील अंतर्गत व्यवस्था सांभाळण्याचे ..किचन मध्ये स्वैपाकाचे ..योगाभ्यास ....ध्यान ..समूहउपचार ..वगैरे पातळींवर व्यस्त होतो ...दिवस कसा निघून जाई काळात नसे ..हळू हळू आमच्या तालमीत तयार कार्यकर्ते मैत्रीत काम करू लागले ..मैत्रीला आर्थिक स्थैर्य येवू लागल्याने मला दरमहिना तीन हजार रुपये मानधन मिळू शकत होते ..ते पैसे रवी परस्पर नाशिकला पाठवत असे ..माझा खर्च असा नव्हताच ..कपडे ..जेवण .इतर किरकोळ खर्च रवी भागवत असे ...तिकडे नाशिकला ही सगळे व्यवस्थित चालले होते ..मानसीने माँटेसरीचा कोर्स पूर्ण करून एका बालवाडीत नोकरी सुरु केली होती ..सुमित पहिलीला गेला होता ...मी मैत्रीत सगळी सकारात्मक कामे करीत असलो तरी माझ्या मनावरील व्यसनाचा सुप्त असलेला पगडा काही पूर्ण निघाला नव्हता ..व्यसनाने सुरवातीच्या काळात दिलेला आनंद इतका गहिरा आणि खोलवर मनात रुजतो ..की व्यसानीला हळू हळू त्यापुढे जीवनातील इतर आनंदाची किंमत व्यर्थ असते ..एकप्रकारे त्याची व्यसनावर गाढ श्रद्धा बसलेली असते ..माझ्या समस्या ..माझी दुखः ..अडचणी ..भावनिक अवस्थता ..वगैरे गोष्टींवर एखादेवेळी व्यसन करून करून मला तात्पुरता दिलासा मिळतो ...त्या अवस्थेत मी चांगला विचार करू शकतो ..माझ्या भविष्याच्या योजना अधिक चांगल्या पद्धतीने आखू शकतो ..वगैरे व्यसनावरील ही श्रद्धा खरे तर अंधश्रद्धा असते ..तरीही माझ्या सारख्या मनस्वी व्यक्तीला ती अंधश्रद्धा आहे हे समजण्यास ..मनातून त्याचा पगडा काढून टाकण्यास बरीच वर्षे घालवावी लागू शकतात ...त्यासाठी व्यसनमुक्तीच्या बाबतीत पूर्ण प्रामाणिकता यावी लागते ...या एकदीड वर्षात मी तीनचार वेळा नाशिकला नातलगांच्या भेटीला जावून आलो ...मनात असलेली व्यसनाची सुप्त ओढ मी मैत्रीत असताना थांबवू शकत होतो मात्र नाशिकला गेलो की सुरक्षित पद्धतीने ..कोणाला समजणार नाही अश्या रीतीने ..एकदोन दिवस मी ..दारू ..ब्राऊन शुगर ..अशी व्यसने करत गेलो ..मानसी व आईला समजले तरी हा परत मैत्रीत जाणारच आहे एक दोन दिवसात ..तेथे आपोआप थांबेल ...या विचाराने उगाच कटकट नको म्हणून कदाचित त्या काही बोलत नसाव्यात ..नागपूरला आलो की मी परत नॉर्मल राही ..अर्थात ही स्वतःचीच फसवणूक चालली होती ....मात्र आपण आता इतरांना त्रास देत नाही या समाधानात हे सुरु होते ....नागपूरला जर परत यावे लागले नसते तर ??? मी पुन्हा तसाच गोंधळ केला असता ..
नाशिकला गेल्यावर असे एकदोन दिवस व्यसन करणे मैत्रीत कोणाला कळत नसे ...परत आलो की माझे पुन्हा नियमित रुटीन सुरु होई ..त्याच काळात मैत्री सोडून पुण्याला गेलेला अँगी परत मैत्रीत आला ..तो रीलँप्स होताच ..व्यसनाधीनतेच्या क्षेत्रात तो देखील माझ्या सारखाच ' पुराना पापी ' असल्याने ..मी नाशिकला जावून गुपचूप पीत असणार हे त्याला लक्षात आले ..एकदा तो मला मी नाशिकला निघालो असताना म्हणाला ' साले अकेले अकेले मजा करत है क्या ? ' त्याचा रोख उघड होता ..तू नाशिकला जावून एकदोन दिवस गडबड करतोस ..अशी माझी खात्री आहे हे त्याला सुचवायचे होते ..मी त्याला सपशेल नाही असे म्हणू शकलो नाही .. " हा थोडा करता हुं " अशी कबुली दिली त्याला ..पुढे तो म्हणाला ' मेरी सोबरायटी अभी जादा हो गई है ..इस बार जरा मेरे लिये भी लेकर आना थोडा प्रसाद ' यावर मी त्याला तसे करणे योग्य योणार नाही ..रवीला समजले तर त्याला खूप वाईट वाटेल वगिरे सांगितले ..तरी तो हट्टाला पेटला ..जवळच्या मित्रांना नकार देणे व्यसानीला जमतच नाही ..शेवटी मी तयार झालो ..नाशिकहून येताना थोडा माल अँगीला आणण्यासाठी ..ती तारीख होती ३ डिसेंबर २००४ ..मी तीन दिवसांसाठी म्हणून नाशिकला जायला निघालो होतो ..निघताना रविकडून सोबत खर्चायला म्हणून एक हजार रुपये घेतले होते ...
( क्रमश: )
=======================================================================
शेवटचा लोचा ! ( पर्व दुसरे - भाग १४९ वा )
त्या नाशिकच्या तीन दिवसांच्या फेरीत ..मी गाडीतून उतरून थेट अड्ड्यावर गेलो ..एकदम हजार रुपयांचा माल घेतला ..दोन दिवस घराच्या बाहेर पडलोच नव्हतो ..सारखा संडास मध्ये जाऊन माल पिणे आणि मग पलंगावर येवून झोपून राहणे ..आईने मला तीन चार वेळा हटकले देखील ..मात्र तेथे मैत्रीत मी खूप कष्ट करतो ..खूप कामे असतात ..येथे मी सुटीवर आलोय तेव्हा मला जरा आराम करू द्या ..माझी तब्येत खराब आहे वगैरे करणे सांगून तिला चूप बसवले ..त्यांना दिलासा इतकाच होता की माझे परतीचे रिझर्व्हेशन झालेले होते ..निघण्याच्या दिवशी पुन्हा अड्ड्यावर जावून माल घेवून ..एक दारूची क्वार्टर घेवूनच गाडीत बसलो .. रात्रभर मी रेल्वेत माझ्या बर्थवर कमी आणि गाडीच्या टाँयलेट मध्ये जास्त वेळ होतो ..अगदी सगळे नियंत्रण सुटल्यासारखे झाले होते ...पहाटे सातला मैत्रीत पोचलो ..माझे डोळे लाललाल झालेले ..मैत्रीतील सगळे कार्यकर्ते आमच्याच हाताखाली तयार झालेले असल्याने संशय येवूनही कोणीही मला काही बोलण्याची हिम्मत केली नाही....खरेतर प्रत्येक व्यसनमुक्ती केंद्रात बाहेरून आलेल्या व्यक्तीची झडती घेण्याची प्रथा असते ..आमच्याकडेही ती प्रथा होती ..फाँलोअपला येणारे पेशंटस ..बाहेर जावून परत केंद्रात आलेले स्टाफ मेम्बर्स ..यांची झडती घेतली जाई ..अर्थात याला अपवाद मी आणि रवी होतो ..कारण आम्हीच तर केंद्राचे सर्वेसर्वा...कोणी माझी झडती घेण्याचा प्रश्नच नव्हता ..अँगी माझी वाटच पाहत होता ..गुपचूप त्याला गुपचूप सोबत आणलेल्या ब्राऊन शुगरच्या दहा पुड्यांपैकी तीन पुड्या दिल्या..आणि कोतवाल नगर मध्ये शिफ्ट झालेल्या सेन्टरच्या वरच्या मजल्यावर संडासात जावून मी दोन पुड्या ओढून ..आराम करतो म्हणून झोपलो ...पाच पुड्या तशाच ठेवल्या ..एकदम सायंकाळी चारलाच उठलो ..रविला तो सकाळी दहाला सेंटरला आल्यावर मी नाशिकहून परत आलोय हे समजले होते ..मात्र मी झोपलो असल्याने आमची भेट होऊ शकली नव्हती ..त्याने देखील आराम करु दे तुषारभाऊंना म्हणून माझी भेट घेतली नाही ..सायंकाळी चारला उठल्यावर ..पुन्हा संडासात गेलो ..सगळा माल संपवून टाकू एकदाचा असा विचार करून ..सुमारे दोन तास मी संडासात चेसिंग करत बसलो होतो ..दोन वेळा मला बाहेरून आमच्या कार्यकर्त्याने रवीने बोलाविले आहे असा निरोप दिला त्या वेळात ..एकदाचा सगळा माल संपवून बाहेर पडलो ..तयार होऊन ...बाहेर ऑफिस मध्ये येवून बसलो ..तेथे रवी ..आमचे दोन तीन कार्यकर्ते ..बरे होऊन फॉलोआपला आलेले आमचे दोन मित्र ..मैत्रीचे हितचिंतक वगैरे बसलेले ..मला पाहून सगळे एकदम चूप झाले ..त्यात मुकुंद नावाचा आमचा एक शुभचिंतक मित्रही होता ..हा मुकुंद बांधकाम व्यावसायिक होता ..मैत्रीचा सच्चा शुभचिंतक ...रवीचा व माझा चांगला मित्र ..अतिशय सरळ आणि स्पष्ट बोलणारा ..
मुकुंदनेच विषय काढला ..' तुषार ..हे काय चालले आहे ? ' मुकुंदचा तेवढा अधिकार होता मैत्रीच्या नात्याने माझ्यावर ...तो मला एकप्रकारे माझ्या वागण्याचा जाबच विचारात होता ..' कुठे काय ? ' मी अनभिज्ञ असल्यासारखे दाखवले ..पुढे मुकुंद म्हणाला .." सकाळी नाशिकहून परत आल्यापासून तू झोपून आहेस ..कोणाला भेटला नाहीस ..संध्याकाळी झोपेतून उठल्याबरोबर संडासात जाऊन बसलास ..दोन वेळा तुला निरोप पाठवावा लागला ..इतका वेळ संडासात काय करत होतास ? ...तू असा पूर्वी वागला नव्हतास कधी .... " मुकुंदचा रोख सरळ होता ..माझ्या सकाळपासूनच्या एकंदरीत वर्तनाबद्दल त्यांना संशय होता ..मी पुन्हा प्यायला लागलोय की काय ? असे एकदम न विचारता मुकुंद तेच वेगळ्या पद्धतीने व्यक्त करत होता .... मी जणू त्या गावचाच नाही असे दाखवत ..माझी तब्येत जरा खराब आहे अशी करणे देवू लागलो ..तितक्यात वार्डमधून अँगी त्याच्या सामानाची बँग घेवून बाहेर ऑफिसात आला ..एकदम सामान वगैरे घेवून अँगी कुठे निघालाय हे मला समजेना .. मुकुंद अँगीला म्हणाला.." आपको नयेसे मौका मिला था इसबार ..लेकीन आपने फिर गडबड कर दी " ..अँगी गुपचूप मान खाली घालून उभा होता ...मुकुंद मला सांगू लागला ... तुषार हा अँगी सकाळी तू झोपल्यावर संडासात गेला होता ..तेथून बाहेर आल्यावर चक्कर येवून खाली पडला ..त्याला सावध झाल्यावर काय झाले असे विचारले तर नीट सांगेना ..खोदून खोदून विचारल्यावर अँगीने ..त्याने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या आहेत हे सांगितले ...म्हणून त्याला आम्ही परत पुण्याला पाठवतो आहोत ..इथे सगळ्या चांगल्या ..शिस्तीच्या वातावरणात याचे असे स्लीप होणे योग्य नाही ..म्हणून सर्वांनी हा निर्णय घेतला आहे " ..एकंदरीत काय प्रकार घडला ते माझ्या लक्षात आले ..मी दिलेल्या तीन पुड्या अँगी संडासात जावून प्यायला होता ..खूप दिवसांनी एकदम अधाश्या सारख्या तीन पुड्या प्यायल्यावर अँगीला नशा जास्त झाली ..संडासातून बाहेर पडल्यावर तो चक्कर येवून खाली पडला ..जेव्हा त्याला याचे कारण विचारले गेले तेव्हा ..त्याने आपण तुषारने दिलेल्या पुड्या प्यायल्याने चक्कर येवून पडलो हे न सांगता ..झोपेच्या गोळ्या खाल्ल्या हे सांगितले ..त्याने माझे नाव मुद्दाम घेतले नव्हते ..मला नुकसान होऊ नये म्हणून ..अँगीला एक प्रकारे सेंटरमधून हाकलण्यात येत होते ...मला ते पाहून कसेसेच झाले ..माझ्यामुळे अँगिला हाकलले जातेय हे मला चांगले वाटेना ..वाटले आपण आता सगळे खरे सांगून टाकावे ..मी सर्वाना खरा प्रकार सांगितला ..मी नाशिकला गेलो होतो तेव्हा ..सोबत ब्राऊन शुगर आणली होती ..त्यातील तीन पुड्या मी अँगिला दिल्या ..म्हणून त्याला चक्कर आली ...त्यात त्याचा काही दोष नाहीय ..सर्वाना बहुतेक याचा अंदाज होता फक्त मला कोणी डायरेक्ट म्हणाले नव्हते ..माझी कबुली ऐकून मुकुंद म्हणाला आम्हाला तोच संशय होता ..बरे झाले तूच कबुल केलेस ते ..आता पुढे आम्ही काय करावे असे तुझे म्हणणे आहे ?
चूक माझी होती हे मी मान्य केले असले तरी ..त्यावर उपाय काय असे मुकुंदने विचारताच ..म्हणालो या पुढे मी असे वागणार नाही ..अर्थात त्यांना हे इतकेच अपेक्षित नव्हते ..मुकुंद रवीचा प्रतिनिधी म्हणूनच बोलत होता ..कारण रवीच्या मुळच्या संकोची स्वभावामुळे मला स्पष्ट बोलणे त्याला जमले नसते हे मी ओळखले ..मुकुंद म्हणाला आम्ही सर्वांनी तुझ्या बाबतीत असा निर्णय घेतलाय की तू एक महिना रीतसर पेशंट म्हणून पुन्हा मैत्रीमध्ये उपचार घ्यावेस ..मगच जवाबदा-या घ्याव्यास ..एक महिना तू कोणत्याही प्रशासकीय कामात पडायचे नाहीस ..कोणतीही थेरेपी घ्यायची नाहीस ..समुपदेशन वैगरे बंद ..फक्त आपण इथे एक उपचार घेणारे पेशंट आहोत हे समजून वागायचे ..तुला हे मान्य आहे का ?
( क्रमश : )
========================================================================
मोडेन पण ....वाकणार नाही ! ( पर्व दुसरे - भाग १५० )
माझ्या समोर मुकुंदने महिनाभर मैत्रीत पेशंट बनून उपचार घेण्याचा पर्याय ठेवल्यावर मला ते प्रचंड अपमानास्पद वाटले ...माझा अहंकार आडवा आला ..मला सगळे काही माहित आहे ..मीच मैत्री उभी राहण्यास हातभार लावला आहे ...येथील बहुतेक कार्यकर्ते माझ्याच हाताखाली शिकून तयार झालेत ... मी आता त्यांच्याकडेच पुन्हा नव्याने व्यसनमुक्ती शिकायची हे काही माझ्या पचनी पडत नव्हते ..व्यसनी व्यक्ती वर वर जरी कितीही मनमोकळा ..जॉली ..सर्वाना समजून घेणारा ..विनम्र वाटत असला तरी ..आतून तो प्रचंड अहंकारी असतो ..वर्तमानात माझी स्थिती उपचार घ्यावे अशीच होती ..मी जेथे प्रामाणिकपणाचे धडे देत होतो ..व्यसनमुक्तीची माहिती देत होतो ..जेथे मी काटेकोर नियम बनवले होते ..इतरांनी ते नियम पाळावेत असा आग्रह करत होतो ..तेथेच मी स्वतः नियमांचे उल्लंघन केले होते ..इतरांना आपण व्यसनमुक्तीचे धडे देतोय याचा अर्थ असा नव्हे की मी अधून मधून व्यसन करावे ..मैत्रीचे सगळे नियम धाब्यावर बसवून तेथे मी ब्राऊन शुगर घेवून आलो होतो ..प्यायलो होतो ..मी कितीही हुशार असलो ....मैत्रीसाठी कितीही उपयुक्त असलो ..तरी माझ्या चुकांबद्दल मला भरपाई करणे भाग होते ...नुसते ' यापुढे असे करणार नाही ' असे म्हणून भागणार नव्हते ..परत महिनाभर पेशंट बनून राहणे मला मंजूर होत नव्हते ..मी मुकुंदची ..रविशी ..वाद घालू लागलो ..त्यांना मी पूर्वी किती चांगली कामे केली आहेत याची आठवण करून देवू लागलो ..तुम्ही माझ्यावर अन्याय करत आहात असे म्हणून लागलो ...व्यसन सुरु झाल्यावर येणारी नकारात्मकता माझ्या तोंडून बाहेर पडत होती ..अगदी मुर्खासारखा वाद घालत होतो त्यांच्याशी ..आता ते सगळे आठवल्यावर स्वतःचेच हसू येते ..स्वतच्या बुद्धीची कीवही येते ..जी बुद्धी नेहमी मी माझ्या समर्थनासाठी ..बचावासाठी ..इतरांना दोष देण्यासाठी ..इतरांच्या चुका शोधून माझ्यावर कसा अन्याय झालाय हे शोधण्यासाठी वापरली होती ..ती कुशाग्र बुद्धी जर मी ..स्वतःची कर्तव्ये ..जवाबदार-या पार पाडण्यासाठी ...आत्मपरीक्षण करण्यासाठी ...प्रामाणिकपणे व्यसनमुक्त राहण्यासाठी वापरली असती तर ...इतके रामायण माझ्या बाबतीत घडलेच नसते ..परंतु व्यसनी व्यक्तीची अतिरिक्त बुध्दिमत्ता ...जर तो सतत आत्मपरीक्षण करत राहिला तरच त्याच्या भल्यासाठी उपयोगात आणता येते त्याला ....आमच्याकडे सध्या उपचारांना आलेल्या ..उपचारांना न येणाऱ्या ..मी व्यसनी आहे हे मनापासून न समजू शकणाऱ्या ..माझा माझ्यावर कंट्रोल आहे ..मी केव्हाही सोडू शकतो ..पूर्वी मी खूप काहीतरी मोठे काम केले आहे ....मी स्कॉलर आहे एकेकाळचा ..वगैरे समर्थने देवून ...वर्तमानात माझे नेमके काय होतेय ..हे न उमगणाऱ्या सगळ्या मित्रांना ..माझे हेच सांगणे असते ...
मी पुन्हा उपचार घेण्यास अजिबात तयार होत नव्हतो ..कोणी दुसरा व्यक्ती जर असा माझ्या सारखा वाद घालत असता तर ...मी त्यावेळी त्याच्याशी वाद न घालता सरळ त्याला बळाचा वापर करून जबरदस्तीने मैत्रीत डांबले असते ..कारण एकदा व्यसन सुरु झाल्यावर व्यसानीची नकारात्मकता ..आजाराचा नकार जागृत होतो ..अशा वेळी वाद घालण्यात अर्थ नसतो ..सर्वात आधी त्याला व्यसनमुक्त ठेवण्यासाठी उपाययोजना करणे आवशक असते ..एकदा त्याची नशा उतरली की दोन तीन दिवसात तो जरा सरळ विचार करू शकतो ..मुकुंद ..रवी व आमच्या इतर कार्यकर्त्यांना माझ्यावर बळाचा वापर करण्याचे धाडस होत नव्हते ...ते फक्त सन्माननिय पद्धतीने मला वारंवार समजावत राहिले ..शेवटी मला समजावण्याचा शेवटचा मार्ग म्हणून रवीने नाशिकला घरी आईला फोन लावला ..तिला सगळे संगितले ..मला तिने चार समजुतीच्या गोष्टी सांगाव्यात अशी तिला विनंती केली ..आई काय म्हणत आहेत ते ऐका असे म्हणून माझ्याकडे फोन दिला ..फोन घेताना त्याला म्हणालो ..ब्रम्हदेव जरी आला आता तरी मी त्याचेही ऐकणार नाही ..आई मला फोनवर म्हणाली " अरे ..किती वेळा हे असे करणार ..जरा मानसी ..सुमित यांच्या भविष्याचा तरी विचार केला पाहिजेस तू ..काय हरकत आहे पुन्हा उपचार घ्यायला " मला कोणाचेही काहीही ऐकायचे नव्हतेच ..माझा टोकाचा अहंकार मला मोडेन पण वाकणार नाही या अवस्थेला घेवून गेला होता ..मी आईला वेगळेच तत्वज्ञान संगु लागलो ..म्हणालो ' आई .शेवटी माणूस एकटा जन्माला येतो आणि एकटा मरतो ..वाटेत सोबती म्हणून तो नातीगोती निर्माण करतो .. कोणाचे भविष्य कोणामुळे बिघडत नाही ..मी मेलो तरी मानसी व सुमितच्या भविष्याचा मला विचार करण्याची गरज नाही ...तो ईश्वर समर्थ आहे त्यांना सांभाळायला ..ज्याने चोच दिली तो चाऱ्याचाही बंदोबस्त करतो ' वगैरे म्हणत मी आईचा फोन कापला ..मी आत्ताच्या आत्ता मैत्री सोडतोय असे रविला म्हणालो ..हे माझे त्यांना इमोशनल ब्लँकमेल करणे होते ...मी कायमचा मैत्री सोडून जातोय म्हंटल्यावर कदाचित ते त्यांचा मी पुन्हा उपचार घेण्याचा आग्रह सोडून देतील असे मला वाटले होते ..मात्र त्यांनी मला थांबवले नाही ..याचे डोके लवकरच ठिकाणावर येईल अशी कदाचित त्यांना खात्री असावी ..जशी तुमची मर्जी तुषारभाऊ असे रवी म्हणाला ..मी लगेच रवीकडे दोन हजार रुपये मागितले ..रवी पैसे देण्यास मनापासून तयार नव्हता ..हे सगळे पैसे हा व्यसनात उडवेल हे त्याला माहित होते..तरीही सुमारे दोन तासांपासून चाललेल्या वाद्विवादा मुळे सगळेच वैतागले होते ..एकदाचे हे प्रकरण तडीस लगावे असे सर्वांनाच वाटत असावे ...रवीने नाईलाजाने मला दोन हजार रुपये दिले ..मी तडतड करत वार्ड मध्ये जावून माझे समान गोळा केले ..ते घेवून बाहेर आलो ..सर्वाना बाय बाय करून अँगी सोबत सेंटर सोडून निघालो ..मी निघाल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता ..काळजी ..दुख: ..माझ्याबद्दलची कणव दिसत होती ..तर माझ्या चेहऱ्यावर अहंकाराचा. ..गुर्मीचा तडफदारपणा ...
बाहेर पडल्यावर कुठे जावे हा प्रश्न होताच ....मात्र त्या आधी आम्हाला ब्राऊन शुगरची गरज होती ....नागपूरला ब्राऊन शुगर कुठे मिळते हे आम्हाला दोघानांही माहित नव्हते ..त्यासाठी मैत्रीत पूर्वी उपचार घेतलेल्या आणि आता रीलँप्स असलेल्या मित्राची गरज भासली ..आम्हाला आठवले एक अनिल नावाचा तरुण मुलगा दोन महिन्यापूर्वीच मैत्रीतून उपचार घेवून बाहेर पडल्यावर पंधरा दिवसात रीलँप्स झाला होता ..अँगिला त्याचे घर कोणत्या एरियात आहे ते माहित होते ..मात्र नक्की गल्ली ...घर नंबर वगैरे माहित नव्हते ..आम्ही त्याला भेटायचे ठरवले ..थंडीचे दिवस ..रात्रीचे दहा वाजलेले ..तो कुठे सापडेल या बाबत शंकाच होती ....तो राहत असलेल्या एरियात त्याचे घर शोधणे तसे सोपे गेले असते ....कारण त्याच्या आई ..संगीताबाईचा दारूचा धंदा होता ..नवरा गेल्यानंतर तिने उदरनिर्वाहाचा मार्ग म्हणून ..गावठी दारू ..मोहाची दारू ..देशी दारू ..विकण्याचा बेकायदेशीर अड्डा चालवण्यास सुरवात केलेली होती ..धिप्पाड शरीरयष्टीच्या संगीताबाईचा दारूचा धंदा प्रसिद्ध होता त्या एरियात ..या संगीताबाई त्यांच्या मुलाला अनिलला मैत्रीत दाखल केल्यावर मला एकदोन वेळेस भेटल्या होत्या समुपदेशनासाठी ..त्यांना मी अतिशय उत्तम प्रकारे दिलासा दिला होता ..माझी चांगली छाप पडली होती त्यांच्यावर ..त्या नक्की माझे स्वागत चांगले करतील अशी मला खात्री होती..एरवी दारूचा धंदा म्हंटल्यावर जसे उर्मट ..तोऱ्यात वागणे असते ..तसेच वागणे असे संगीताबाईचे ..वेळ पडल्यास एखाद्या उधार दारू मागणाऱ्या दारुड्याला गच्ची पकडून ..अर्वाच्च शिव्या देवून बाहेर काढण्याची देखील त्यांच्यात धमक होती .. कसेतरी संगीता बाईंचा अड्डा शोधत तेथे पोचलो ..अड्डा म्हणजे एक अंधारी खोली होती ..आम्ही बाहेरून आवाज दिला ..' संगीताबाई अहो संगीताबाई ' ..कोण आहे म्हणत संगीताबाई बाहेर आल्या ..अंधारात त्यांनी आमचे चेहरे ओळखले नव्हते ..मी पुढे होऊन ..मी तुषार नातू ..असे म्हणालो ..माझा आवाज ओळखून त्यांनी एकदम पदर वगैरे घेतला डोक्यावर ..' अरे .सर तुम्ही कसे काय इथे आलात .? .' म्हणत आदराने पुढे आल्या ..मी त्यांना खोटेच संगितले की मी नाशिकला गेलो होतो दोन दिवसांसाठी ..आता परत आलोय ..मैत्रीत गेलो होतो ..पण तिथे सगळे झोपलेले आहेत ..कोणीच दरवाजा उघडायला उठले नाही ..म्हणून इथे आलोय ..उद्या सकाळी जाईन मैत्रीत ....माझे बोलणे त्यांना पटले होते ..चला ना घरी बसू असे म्हणत त्या पुढे निघाल्या ..अड्ड्यापासून जेमतेम शंभर पावलांवर त्यांचे घर होते ..वाटेत अनिलचे पिणे परत सुरु झालेय ..बरे झाले तुम्ही आलात ..त्याला जरा समजावा सर ...असे त्या सांगत होत्या ..
( क्रमश : )
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें